चला सिक्कीम फिरुया - भाग ४

चला सिक्कीम फिरुया - भाग १ - सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन 

चला सिक्कीम फिरुया - भाग २ -  प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती

चला सिक्कीम फिरुया - भाग ३ - उत्तर सिक्कीममधील लाचुंग, झिरो पॉईंट व युमथांग व्हॅलीची सफर


गंगटोक शहराचे स्थलदर्शन ...

आज बुधवार, २४ एप्रिल २०१९. आज सर्वजण बरेच रिलॅक्स होतो. याच कारण म्हणजे आजचा दिवस हा खास फक्त गंगटोक शहराच्या भटकंतीसाठी राखीव ठेवलेला होता. त्यामुळे आज फारसा प्रवास करायचा नव्हता. गंगटोक हे भारतातलं सर्वात स्वच्छ हिलस्टेशन म्हणून ओळखलं जातं. सिक्कीमची राजधानी असणारं हे शहर समुद्रसपाटीपासून तब्बल ५५०० फुटांवर वसलेलं एक फारच सुंदर ठिकाण आहे. स्थानिक लोक या शहराचा उच्चार गान्तोक किंवा गँटोक असा करतात. गँटोक म्हणजे डोंगराचं टोक किंवा डोंगरमाथा होय. गंगटोक हा शहरी भाग असला तरी पूर्ण डोंगरउतारावर वसलेलं हे शहर आहे. त्यामुळे इथं कुठेही जायचं झालं तरी अरुंद आणि वळणावळणाचा घाटरस्ता किंवा पायी जायचं झालं तरी पायऱ्या या ठरलेल्याच. उंच पर्वतावर वसलेले असल्याने गंगटोक शहर उंच-सखल जमिनीवर बांधलेल्या घरांतून नांदते. इथं अगदी शेजारच्या घरी जायचे असेल तरी कित्येकदा शे-पन्नास पायर्‍या चढाव्या-उतराव्या लागतात. उतार-चढावाचे रस्ते असल्याने एखादी टॅक्सी अगदी थोड्यावेळासाठी जरी कुठे उभी राहिली तरी रस्त्यातील वाहतूक तुंबून राहते. याकरता येथे रस्त्यांवर कुठेही टॅक्सी उभी करण्यास मनाई आहे. टॅक्सी विवक्षित जागीच उभी करावी लागते. त्यामुळे येथील बहुतांश घरांना आणि हॉटेल्सना गाडी लावण्यासाठी किंवा उभी करण्यासाठी एक गॅरेजसदृश गाळा प्रवेशद्वारानजीकच मोकळा सोडलेला असतो. टॅक्सी बोलावली असता ती तिथेच उभी केली जाते. उगीच कुठही रस्त्यावर नाही.


डोंगर-घाटावर असून देखील एखाद्या मेट्रो सिटीला मागे टाकेल असे सिक्कीम शहर आहे. अगदी वाहतुकीच्या नियमांपासून ते दुकानांच्या जागांपर्यंत सगळं काही ठरलेलं. गंगटोक शहरात सपाटी तशी कमीच आहे. त्यामुळे येथील मुख्य रस्ते देखील अरुंद आणि वर्दळीचे आहेत. अर्थातच त्यामुळे ते खूप गजबजलेले आहेत. पण शहर कितीही गजबजलेले असले तरी येथील प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे स्वच्छता. उगीच कुठेही थुंकलेले नाही की कचऱ्यामुळे ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याकुंड्या येथे दिसत नाहीत. स्वच्छता मोहीम खरीच अस्तित्वात असल्याच्या खुणा येथे जागोजागी दिसतात. हे राज्य पर्यावरणस्नेही आहे आणि इथे प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे हे ऐकून मनापासून बरं वाटतं. आणि ही बंदी म्हणजे खरोखरची बंदी आहे बरं का, उगाच टाईमपास बंदी नाही. गंगटोक शहराचा मध्यवर्ती आणि मुख्य रस्त्यांचा परिसर सोडल्यास शहरात इतरत्र बरीच शांतता असते. कुणीही विनाकारण गाड्यांचे भोंगे वाजवत नाही व स्वतः दोन पावले मागे येऊन दुसऱ्याला पुढे जाऊ देण्याची अदब सिक्कीमच्या वाहनचालकांमध्ये आहे. ठिकठिकाणी ट्राफीक पोलिसांच्या छोट्या छोट्या चौक्या आहेत आणि त्यात अगदी प्रसन्नपणे गाड्यांना दिशा दाखवणारे पोलीस उभे असतात.  


गंगटोक हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सधन शहर आहे. येथे प्रत्येक घरासमोर चारचाकी गाड्या दिसतात. इथं सत्तर हजार सरकारी कर्मचारी असून त्यात महिलांचे प्रमाणही बऱ्यापैकी आहे. विशेष म्हणजे मोठ्या पदांवर महिलाराज असल्याचे पाहायला मिळते. तसेही ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये महिला या घर चालवण्यासाठी काम करताना दिसतात. सिक्कीमला देखील हीच पद्धत आहे. इथे महिला नोकरी करतात तर पुरुष गाड्या चालवण्याचे काम करतात. त्यामुळे तेथील दुकाने व हॉटेल्मसध्ये महिला काम करताना अधिक प्रमाणात दिसतात. विद्यापीठापर्यंतचे शिक्षण येथे विनामूल्य आहे. गुन्ह्यांचे प्रमाण देखील नगण्य आहे. रोटी, कपडा, मकान याची चिंता नसल्याने बाहेरच्या राज्यात स्थलांतर करणाऱ्यांचे प्रमाण जवळपास नाहीच. शहराच्या आसपास सिक्कीमच्या लोकवस्तीपैकी सुमारे एकतृतीयांश लोक राहतात. लाल बाजार, आधुनिक राजवाडा, मंत्र्यांची निवासस्थाने, सचिवालय, विद्यालये इत्यादींमुळे गंगटोकच्या वैभवात भर पडली आहे. 


असो, तर ही झाली गंगटोक विषयी थोडक्यात माहिती. तर आमचा आजचा कार्यक्रम होता या सुंदर आणि संपन्न अश्या गंगटोक शहरातील १०-१२ किमीच्या परिघात असणाऱ्या स्थानिक पर्यटनस्थळांना भेट देण्याचा. गंगटोक शहराच्या आसपास बरीच ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. हे स्थलदर्शन फुल-डे किंवा हाफ-डे अश्या दोन प्रकारात करता येते. गंगटोक शहरातील स्थानिक टॅक्सी चालक देखील अश्याच प्रकारे स्थलदर्शन घडवतात. दिवसभराचे स्थलदर्शन म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत साधारण ८-१० ठिकाणे दाखवणे तर अर्ध्या दिवसाचे स्थलदर्शन म्हणजे सकाळी ९ ते १ किंवा दुपारी २ ते ६ या चार तासात ४-५ ठिकाणे फिरवून आणणे. आमचे स्थलदर्शन दिवसभराचे आणि आमच्या टूर पॅकेजमधेच समाविष्ठ होते. आमच्या आजच्या भटकंतीसाठी नेमलेली इनोव्हा गाडी आणि त्याचा ड्रायव्हर पेमा अगदी वेळेवर हजर होते. साधारण तिशीच्या आसपास असणारा, तिबेटीयन चेहरे पट्टीचा आणि चुणचुणीत असा पेमा एकदम जॉली माणूस होता. बरेच वर्ष पर्यटन व ड्रायविंग क्षेत्रात असल्यामुळे परिसरातील बारीकसारीक गोष्टींची त्याला चांगली ओळख होती. पर्यटकांशी काय बोलावे, कसे वागावे याची उत्तम जाण होती. गाडीत बसताच त्याने गंगटोक शहर आणि एकूणच सिक्कीमबद्दल बरीच माहिती आम्हाला सांगितली. आज बाहेर स्वच्छ ऊन पडलेले असल्याने स्थलदर्शनाची सुरवात ताशी विव्ह पॉईंटपासून करूया असे त्याने सुचवले. याचे कारण म्हणजे वातावरण चांगले असेल तर सकाळच्या वेळी ताशी व्ह्यू पॉईंट येथून कांचनजुंगा व त्याच्या आसपासच्या शिखरांचे खूप सुंदर दर्शन घडते.


सकाळी साधारण १० वाजता आम्ही ताशी व्ह्यू पॉईंटला पोहोचलो. सकाळची वेळ असल्याने सुदैवाने अजून पर्यटकांची फारशी गर्दी दिसत नव्हती. गंगटोक शहरातील सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे हा "ताशी व्ह्यू पॉईंट". मुख्य शहरापासून साधारण ८ ते १० किमी दूर असलेले हे ठिकाण म्हणजे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर असणाऱ्या कांचनगंगा पर्वतरांगेच्या हिमाच्छादीत शिखरांचं भन्नाट दर्शन घेण्याच एक खास ठिकाण. गंगटोक शहरातील वातावरण जर का स्वच्छ असेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हात कांचनगंगा शिखर बघायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच. यासाठी काही लोक तर पहाटे ५.३० वाजताच येथे हजर होतात. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी ताशी व्ह्यू पॉईंट हे गंगटोक शहरातील फारच प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे जर का तुम्ही गंगटोक शहरात मुक्कामाला असाल तर गंगटोक शहरातील स्थलदर्शनाची सुरवात ही आवर्जून ताशी व्ह्यू पॉईंटपासूनच करावी. त्यातही सकाळी थोडं लवकर हॉटेलमधून बाहेर पडता आल्यास उत्तमच. हा व्ह्यू पॉईंट गाडीतळापासून थोडा उंचावर असल्यामुळे आपल्याला गाडीतून उतरल्यानंतर साधारण १०० पायऱ्या चढून वरती जावे लागते. वरती बऱ्यापैकी मोकळी जागा असून येथून शहराचे व परिसराचे विहंगम दृश दिसते. ज्या पर्यटकांना आणखी उंचावर चढून जायचे आहे त्यांच्यासाठी येथे टेलीस्कोप हाऊस बनवलेले आहे. माणशी १० रुपये असे नाममात्र शुल्क देऊन आपण टेलीस्कोप हाऊसचे आणखी दोन मजले चढून थोडे आणखी वर जाऊ शकतो. टेलीस्कोप हाऊस बरोबरच येथे छोटासा कॅफेटेरिया देखील आहे. गरमागरम चहा व मोमोज खात संपूर्ण गंगटोक शहराचा नजरा येथून अनुभवता येतो. त्याचबरोबर समोरच्या मोकळ्या जागेत पारंपारिक सिक्किमी आणि तिबेटी कपडे घालून फोटो देखील काढता येतात. 


ताशी व्ह्यू पॉईंट येथून दिसणार कांचनजंगा पर्वताच सुंदर दृश

ताशी व्ह्यू पॉईंट येथून कांचनगंगा पर्वतरांग

अप्पर डेक किंवा टेलीस्कोप हाउस येथून दिसणारा ताशी व्ह्यू पॉईंटचा परिसर



ताशी व्ह्यू पॉईंट येथून गंगटोक शहराच्या आजूबाजूच्या टेकड्या 


आता यानंतरचे आमचे पुढचे ठिकाण होते ते म्हणजे गणेश टोक. हे ठिकाण म्हणजे शहरापासून दूर, थोड्याशा उंचावर बांधलेले गणेशाचे एक अष्टकोनी मंदिर. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ६१०० फुटांवर आहे. या ठिकाणी पर्यटकांची बरीच गर्दी होती. मंदिर देखील फार पुरातन अथवा जुने वाटले नाही. मंदिरात अलीकडेच बसवलेली गणेशाची संगमरवरी मूर्ती आहे. हे ठिकाण शहरापासून बऱ्यापैकी उंचावर असल्यामुळे येथे मुख्य मंदिरासमोर गंगटोक शहराचा नजरा पाहण्यासाठी एक गॅलरी (सज्जा) बनवलेली आहे. या ठिकाणाची एक खास गोष्ट म्हणजे येथून गंगटोक शहर, राजभवन परिसर व दूरदर्शन मनोऱ्याचे खूप विहंगम दृश्य दिसते (Bird's eye view). मंदिराच्या परिसरात छोट्या-मोठ्या तिबेटी वस्तू, खेळणी व आभूषणे मिळणारी अनेक दुकाने तसेच चहा, कॉफी व नाष्टा यासारख्या खानपानाची व्यवस्था करणारी छोटी हॉटेल्स देखील आहेत. गणेश टोक येथून अगदी हाकेच्या अंतरावर सिक्कीम हिमालयन झूलॉजिकल पार्क (Sikkim Himalayan Zoological Park) आहे. हे प्राणीसंग्रहालय थंड प्रदेशात राहणाऱ्या व सिक्कीम राज्याचा राज्यप्राणी असणाऱ्या रेड पांडासाठी खास प्रसिद्ध आहे. पण आमचे ड्रायव्हरसाहेब पेमा यांनी सांगितले की सध्या या प्राणीसंग्रहालयात फक्त दोनच रेड पांडा असून दोघेही आता खूप म्हातारे झाले आहेत. तुम्ही दार्जीलिंगला जाणारच आहात तर तिथले पद्मजा नायडू प्राणीसंग्रहालय आवर्जून बघा. तिथे रेड पांडा तर आहेतच पण इतरही अनेक प्राणी आहेत. आता यातले खरे काय आणि खोटे एक ते तर त्या "देवाला" नाहीतर या "पेमाला"च ठाऊक. बाकी हे ड्रायव्हर लोक एखादं ठिकाण दाखवायचं नसलं की असं काहीतरी थातूरमातुर सांगण्यात एकदम पटाईत असतात. एकूण काय तर आम्ही हे प्राणीसंग्रहालय बघण्याचे टाळून गंगटोक येथील सगळ्यात उंचावर असणाऱ्या हनुमान टोक या पुढच्या पर्यटनस्थळाकडे मार्गस्थ झालो.


गणेश टोक येथील गणपती मंदिर

गणेश टोक येथील गणपती मंदिर

मदिरातील गणपती बाप्पा. फोटो इंटरनेट साभार

गणेश टोक येथून दिसणारं गंगटोक शहराच विहंगम दृश


गणेश टोक येथील पार्किंगचा परिसर

जसे गणेश टोकावर गणेशाचे मंदिर आहे तसेच ‘हनुमान टोका’वर हनुमानाचे. तब्बल ७२०० फुट उंचीवर असणारे गंगटोक शहरातील हे सर्वात उंच ठिकाण मानले जाते. त्यामुळे या मंदिराकडे जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावरून गंगटोक आणि लगतच्या डोंगराळ भूभागाचा देखावा अनेकदा श्वास रोखून धरायला लावतो. हनुमान मंदिराजवळच सैन्याचे गोळीबार सराव केंद्र आहे. त्यामुळे या मंदिराचा परिसर व मंदिराची व्यवस्था भारतीय सैन्याच्या एका तुकडीकडून केली जाते. 'ब्लॅक कॅट' हे या भारतीय सैन्याच्या तुकडीचे नाव. रंगीबेरंगी, स्वच्छ आणि सुंदर अश्या या हनुमान मंदिराला नक्की भेट द्यावी. अतिशय देखण्या अशा या मंदिराच्या पायऱ्यालगत औषधी वनस्पतींचे वाफे तयार केलेले आहेत. त्याला नाव दिले आहे, द्रोणागिरी. मंदिरातील हनुमानाची मूर्ती काळ्या पाषाणातील असून त्याला सुंदर फुलांची आरास केलेली असते. या उंच ठिकाणावरून देखील कांचनगंगा पर्वतरांगेचे दर्शन घडते. पण आम्ही हनुमान टोकावर पोहोचेपर्यंत कांचनगंगा पर्वतरांगेवर ढगांची सेना चाल करून आली आणि सगळे दृश्य ढगांच्या पडद्याआड लपले गेले. आमचे येथून दिसणारे कांचनगंगा दर्शन हुकले. पण ताशी व्ह्यू पॉईंट येथून हाच नजारा अगदी छान पाहायला मिळाल्यामुळे आमची तशी फारशी निराशा झाली नाही


हनुमान टोकावरील मंदिर

मंदिर लष्कराच्या ताब्यात असल्याने कमालीची स्वच्छता पाहायला मिळते


हनुमानाचे मंदिर

मंदिरातील सुंदर मूर्ती

अंजनी माता मंदिर

कांचनजुंगा डोंगररांग पाहण्यासाठी असलेली खास व्हीविंग गॅलरी

व्हीविंग गॅलरीतून दिसणारे दृश व समोर दिसणाऱ्या पर्वतरांगेतील शिखरांची नावे


प्रत्येक हिलस्टेशनला किमान एक तरी फ्लॉवर शो, रोज गार्डन किंवा बोटॅनिकल गार्डन हे असतेच. आम्ही काश्मिर, उटी, केरळ अश्या अनेक हिलस्टेशनला फ्लॉवर शो पाहिले आहेत. पण गंगटोक शहरात असणारं फुलांच प्रदर्शन अर्थात फ्लॉवर एक्झिबिशन सेंटर खरच खूप सुंदर आणि नक्की भेट द्याव असं आहे. एप्रिल ते जून हे तीन महिने तर सिक्कीममधील फुलांचा खास मौसम. त्यामुळे फक्त या तीन महिन्यातच फ्लॉवर एक्झीबीशन सेंटर सुरु असते. सिक्कीम राज्यात फुलणारी विविध रंगांची फुले आणि जवळपास सर्व प्रकारचे ऑर्किड्स येथे एकाच छता खाली पाहायला मिळतात. ज्या लोकांना नैसर्गिक सौंदर्याची आवड त्यांनी तर या ठिकाणाला जरूर भेट द्यावी. आहाहा! काय ती सुंदर सुंदर फुलं, काय त्यांचे ते अप्रतिम विविध रंग, एकाच रंगांच्या अनेक छटा आणि लहान मोठे आकार. येथे पसरलेल्या ऑर्किडच्या रंगांमध्ये तुम्ही खरंच स्वतःला हरवून जाल. या पुष्प प्रदर्शनीला भेट देण्यासाठी माणशी प्रत्येकी ३० रुपये तिकीट आहे. विविध फुलांच्या बिया विकत घ्यायच्या असतील तर बियांचा एक विक्री कक्ष देखील येथे आहे. 


फ्लॉवर एक्झिबिशन सेंटर








फ्लॉवर एक्झिबिशन सेंटरच्या आवारातूनच एक रस्ता थोडे वर रिज पार्क अर्थात चोग्याल मेमोरिअल पार्कला जातो. येथे अनेक भले थोरले वृक्ष आपली प्रेमळ सावली धरून उभे आहेत. विविध रंगांच्या फुलांचे ताटवे लहान मोठ्या कारंज्याच्या संगतीने सुंदर पद्धतीने लावलेले आहेत. विश्रांतीसाठी पॅगोडा छत्री व बेंचेस बनवलेले असल्यामुळे दोन-तीन तासांची भटकंती केल्यानंतर थोड्यावेळ आराम करण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. आम्ही मग याच बागेत सिक्कीमी पारंपारिक वेशात फोटो काढण्याचा कार्यक्रम पार पाडून घेतला. माणशी ५० रूपये घेऊन आपल्याला सिक्कीमी पारंपारिक पोशाख घालण्यासाठी दिला जातो. तो घालून तुम्ही बागेत कोठेही अगदी तुमच्या स्वतःच्या कॅमेऱ्यात अथवा मोबाईलमधे फोटो काढू शकता. फ्लॉवर एक्झिबिशन सेंटर व रिज पार्कच्या समोरच सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अर्थात CM house आहे.  


रिज पार्क


रिज पार्क येथे विश्रांतीसाठी बांधलेला एक सुंदर पॅगोडा


सिक्कीमी पारंपारिक पोशाखात महाराष्ट्रीयन माणसं



रिज पार्क येथून निघालो तेव्हा दुपारचे साधारण १२.३० वाजले होते. आता पुढचे ठिकाण होते ते म्हणजे 'Directorate of Handicrafts & Handloom' अर्थात गव्हर्नमेंट कॉटेज इंडस्ट्रीज इन्स्टिट्यूट. येथे स्थानिक हस्तकला कौशल्याच्या लोकरी, गालिचे, शाली, बॅग्ज, पंखा, बाहुल्या, बांबू व लाकडाच्या अनेक नक्षीदार वस्तू, पहाडी पोशाख, लेपचा विणीच्या पिशव्या, रेशमी कपडे, चामडी वस्तू, रंगीत मुखवटे आणि फर्निचरसारख्या अनेक आकर्षक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत. हातमागावर लोकरीची वस्त्रे विणण्याचे तसेच लाकडावर कोरीव काम करण्याचे प्रशिक्षणही येथे दिले जाते. हे ठिकाण रविवार व सरकारी सुट्ट्या सोडून सकाळी ९.३० ते १२.३० तर दुपारी २ ते ४ या ठराविक वेळेतच उघडे असते. येथे आतमध्ये फोटो घ्यायला परवानगी नाही त्यामुळे मी बाहेरच्या परिसराचे काही फोटो काढले. हे हस्तकला प्रदर्शन सिक्किम सरकारच्या अखत्यारीत असल्याने येथील वस्तूंच्या किमती थोड्या जास्त वाटत होत्या. यापैकी जवळपास सर्वच वस्तू सिक्कीमच्या स्थानिक बाजारात आणखी कमी दराने मिळतात. आम्ही संध्याकाळी सिक्कीमच्या स्थानिक बाजाराला भेट देणार असल्यामुळे येथे फक्त एक धावता फेरफटका मारून आम्ही बाहेर पडलो. 






लाकडावर पेंटिंग करताना स्थानिक कलाकार


आता पुढचे ठिकाण होते ते म्हणजे न्यामगाल इन्स्टिट्यूट ऑफ तिब्बेटॉलॉजी. पारंपारिक पद्धतीने बांधण्यात आलेलं हे वस्तूसंग्रहालय तिबेटीयन संस्कृतीच्या संशोधनाचे स्थान आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ४ (रविवार व सरकारी सुट्ट्या सोडून) या वेळात ते पर्यटकांसाठी खुले असते. या वस्तूसंग्रहालयात २०० च्या वर बौद्ध धार्मिक मुर्त्या, वाद्ये, घंटा, मुखवटे, पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्मिळ वस्तू, वस्त्रे, आभूषणे आणि हत्यारे यांचा खूप मोठा संग्रह आहे. चीनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर ल्हासामधून अगणित निर्वासित सिक्कीममधे आले. त्यांचे पुनर्वसन आणि तिबेटमधील कला व परंपरांच्या जोपासनेकरता १९५८ साली या संस्थेची स्थापना झाली. बौद्ध धर्माच्या आणि सिक्किमच्या इतिहासात घडून गेलेल्या काही गोष्टी इथे चित्रबद्ध करून संग्रहित करण्यात आल्या आहेत. संग्रहालयाच्या अंतर्गत भिंती लाकडावरील सुबक कोरीवकाम, विविध रंगसंगतीत रंगवलेल्या बुद्धाच्या मुद्रा आणि तांत्रिक देवतांनी भरलेल्या आहेत. तिबेटी बौद्धधर्म ही बौद्धधर्माची वेगळी शाखा आहे. लडाख, भूतान, सिक्कीम, तिबेट येथील बौद्धधर्मावर या शाखेचा प्रभाव पडला आहे. यात बुद्धाच्या ज्ञानमार्गासोबतच तांत्रिक विद्याही मिसळली गेली. तिबेटी व चीनी भाषा तसेच तांत्रिक ज्ञानशाखेशी मी तसा पूर्णपणे अनभिज्ञ असल्याने त्यातले फारसे काही समजत नव्हते पण तरीसुद्धा बुद्धाच्या विविध मुद्रा, तांत्रिक पूजेसाठी वापरली जाणारी मानवी कवटी आणि त्यांची विविध शिरोभूषणे लक्षात राहण्यासारखी होती. या संग्रहालयाच्या वरच्या मजल्यावर भव्य असे ग्रंथालय आहे. विज्ञान, चिकित्सा, ज्योतिष अशा विषयांची अनेक पुस्तके इथल्या ग्रंथालयात पाहायला मिळतात. सगळीकडे बौद्ध धर्मीय पुस्तकेच पुस्तके दिसत होती. जुन्या बौद्ध वाड्मयाचा खजिना असलेले हे आशियातील एकमेव ठिकाण असून बौद्धधर्म व तत्त्वज्ञानाचे जगप्रसिद्ध अध्ययन केंद्र आहे. या संग्रहालयाच्या अंतर्गत भागात छायाचित्रणास सक्त मनाई असली तरी बाहेरून मात्र तुम्ही वाट्टेल तेवढे फोटो काढू शकता. एकूण काय तर तिबेटचा इतिहास आणि संस्कृती समजून घ्यायची असेल तर या वस्तूसंग्रहालयाला नक्की भेट द्यावी.



न्यामगाल इन्स्टिट्यूटची तिबेटीयन पारंपारिक पद्धतीने बांधण्यात आलेली भव्य वास्तू




यानंतर दो द्रूल चोर्टेन किंवा डो-ड्रील कॉर्टन हे होतं आता आमचं भेट देण्याचं पुढचं ठिकाण. जे नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजीपासून अगदी जवळ म्हणजे फक्त ५०० मीटर अंतराच्या चालीवर होतं. त्यामुळे आमच्या ड्रायव्हरने नामग्याल इन्स्टिट्यूटच्या बाहेर पार्क केलेली गाडी तेथेच ठेऊन आम्हाला हा चोर्टेन चालत जाऊन बघून येण्यास सांगितले. पण त्याआधी सगळ्यांनाच भुकेची तीव्र जाणीव झाल्याने काहीतरी खाऊन घ्यावं यावर एकमत झालं. गंगटोक शहरात MG Road अर्थात महात्मा गांधी रस्ता आणि मुक्कामाचे हॉटेल सोडल्यास खाद्यपदार्थांची व्हरायटी मिळण्याची ठिकाण तशी फारच कमी आहेत. जी काही छोटी हॉटेल्स रस्त्याकडेला असतात तिथे फक्त ठराविक तिबेटी/चायनीज पदार्थ मिळतात. नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी ते दो द्रूल चोर्टेन यांच्या मधल्या रस्त्यावर अशी अनेक छोटी हॉटेल्स आहेत. त्यातल्याच एका बऱ्या हॉटेलमधे शिरलो आणि व्हेज थुक्पा, मोमोज, चौमिंन आणि मॅगी अश्या खाद्यपदार्थांनी पोट भरून दो द्रूल चोर्टेनकडे चालायला सुरवात केली.



चोर्टेन म्हणजे स्तूप. दो द्रूल चोर्टेन हा सिक्कीममधील सर्वात जुना स्तूप असून गंगटोकच्या मुख्य आकर्षणापैकी एक महत्वाचे ठिकाण आहे. जणू काही गंगटोक शहरातील बौद्ध धर्मियांचे ग्रामदैवतच. तिबेटीयन बौद्ध धर्मातील न्यीन्गमा पंथाचे प्रमुख लामा त्रुशली रिंपोचे यांनी दुर्गुणांवर सदगुणांनी मिळवलेल्या जयाचे प्रतिक म्हणून सन १९४५ मध्ये हा स्तूप बांधला. या स्तूपाचे शिखर सोन्याचे आहे. स्तूपाच्या आत सर्व तिबेटी पवित्र बौद्ध धर्मग्रंथ ठेवलेले आहेत. याच आवारात चोर्टेन लाखांग व गुरु लाखांग यांचे आणखी दोन लहान स्तूप आहेत. स्तूपाच्या जवळच एका खोलीत असंख्य तेलाचे दिवे लावलेले असतात. हे ठिकाण बौद्ध मंदिरासारखेच भासते. स्तूपाभोवती भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी सोय करण्यात आली आहे. प्रदक्षिणा मार्ग १०८ प्रार्थना चक्रांनी (प्रेयर व्हील) सजलेला आहे. भाविक प्रदक्षिणा घालताना ते प्रार्थना चक्र ठराविक पद्धतीने गोल फिरवत 'ओम मणि पद्मे हूम' अश्या प्रार्थनेचा जप करतात. आम्हीही मग ते प्रेयर व्हील्स फिरवत स्तूपाला एक प्रदक्षिणा घातली. 


दो द्रूल चोर्टेन येथील भव्य स्तूप



प्रदक्षिणा मार्गावरील प्रेयर व्हील्स अर्थात प्रार्थना चक्र



दो द्रूल चोर्टेन पाहून आम्ही आता निघलो ते म्हणजे गंगटोक शहरातील रोपवे अर्थात केबल कारमधे बसायला. शहराच्या अगदी मध्यात म्हणजे MG road (महात्मा गांधी रोड) जवळच रोपवेचे स्टेशन आहे. गंगटोकच्या मुख्य रस्त्यावरून तुम्ही वरच्या टोकाला पोचता ते थेट विधानसभेच्या इमारतीजवळ. येथून पुन्हा परतीचा प्रवास करून तुम्ही सुरवातीच्या ठिकाणी येऊ शकता. शहराचा बर्ड आय व्ह्यू दाखवणारी ही रोपवे राइड फक्त ३० मिनिटांची आणि अदमासे १ किलोमीटरची आहे. आठवड्यातले सर्व दिवस सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० यावेळेत रोपवे  ही सर्विस सुरु असते. यासाठी माणशी ११७ रुपयांचे तिकीट आहे. ही रोपवे राइड करण्यासाठी आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो. पण दुर्दैवाने आमच्या या आनंदावर लवकरच पाणी फिरले. रोपवेच्या ऑफिसजवळ पोहोचल्यावर कळाले की आजच्या दिवशी रोपवे काही तांत्रिक कारणामुळे देखभालीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. Damn It! नेमकं आजच या रोपवेला बंद पडायचं होतं का?.  


रोप-वे मधून दिसणारा गंगटोक शहराचा बर्ड आय व्ह्यू. फोटो इंटरनेट साभार

गंगटोक रोप-वे. फोटो इंटरनेट साभार


मोनास्ट्री म्हणजे बौद्ध धर्मियांचे प्रार्थना मंदिर किंवा मठ. गंगटोक शहरात जागोजागी छोट्या-मोठ्या अनके मॉनेस्ट्री बघायला मिळतात. फिरताना दमलात तर तुम्ही या मॉनेस्ट्रीमधे जाऊन शांतता अनुभवू शकता. येथील अनेक मॉनेस्ट्री आकाराने जरी लहान असल्या तरी प्रथमदर्शनीच तुम्हाला प्रेमात पाडतात. आकर्षक रंगसंगतींमध्ये सजवलेल्या दारं-खिडक्या आणि कमानी ही तिबेटियन संस्कृती तुम्हाला मोहून टाकते. गंगटोक येथील रूमटेक आणि रांका या दोन सर्वात मोठ्या आणि जुन्या मॉनेस्ट्री आहेत. त्यामुळे जर का तुम्ही गंगटोक पाहायला आला आहात आणि या दोन मॉनेस्ट्रीला भेट दिली नाहीत तर तुमची गंगटोकची सहल पूर्ण होत नाही असे म्हणतात. पण या दोन्ही मॉनेस्ट्री गंगटोक शहरापासून बऱ्याच लांब आणि शहराच्या बरोबर दोन विरुद्ध टोकाला आहेत. रूमटेक मॉनेस्ट्री आहे शहरापासून ३० किमी अंतरावर तर रांका मॉनेस्ट्री आहे १५ किमी अंतरावर. त्यामुळे एका दिवसाच्या सहलीत स्थानिक टॅक्सी चालक तुम्हाला या दोन्हीपैकी कोणती तरी एकच मॉनेस्ट्री दाखवतात. रूमटेक मॉनेस्ट्री ही शहरापासून बरीच लांब असल्याने अर्धा दिवस वेगळा राखीव ठेवून ती पाहायला जाणे कधीही सोयीचे ठरते. कारण एका दिवसाच्या स्थलदर्शनात जर का तुम्ही रूमटेक मॉनेस्ट्री बघण्याचे ठरवले तर तुमचे गंगटोक शहरातले इतर अनेक चांगले मस्ट व्हिजीट स्पॉट बघायचे राहून जातात. 


आज दिवसभरात आम्ही देखील बरीच स्थानिक ठिकाणे पाहिल्यामुळे संध्याकाळ होत आलेली होती. त्यामुळे आम्हालाही त्यातल्या त्यात शहरापासून जवळ असणारी रांका मॉनेस्ट्री बघणे सोयीचे होते. त्यामुळे निघालो मग रांका मॉनेस्ट्रीकडे. रांका हे गंगटोकजवळील एक अतिशय भव्य प्रार्थनास्थळ आहे. विविध स्तूप, शाळा, मंदिरं आणि इतर अनेक इमारतींनी या प्रार्थनास्थळाचा आवार भरलेला आहे. बुद्धाची दहा फूट उंचीची मूर्ती आणि मुख्य मंदिराची दुमजली सुंदर इमारत ही या पर्यटनस्थळाचं वैशिष्ठ्य. मठाच्या आवारात अनेक फिरते दंडगोल (प्रेयर व्हील्स) भिंतीलगत लावलेले आहेत. पुण्यसंचयाकरता गुरू पद्मसंभव यांचे नामस्मरण करून ते फिरवावेत अशी प्रथा आहे. या चक्राची जितकी आवर्तने होतात तितके पुण्य तुमच्या गाठीशी जमा होते. मठाचा परीसर अतिशय भव्य आहे. मठाच्या मुख्य आवारात शिरताच समोर पांढऱ्या व लाल रंगात बांधलेली मठाची दुमजली वास्तू आणि तिच्या डोक्यावर बौद्ध वास्तुशैलीत बांधलेला सोनेरी कळस आपले लक्ष वेधून घेतो. तिबेटी धर्मगुरू रिम्पोचे यांचं हे शक्तीपीठ. सगळीकडे अतिशय स्वच्छ, टापटीपीचे आणि पवित्र वातावरण. चोहोबाजूंनी पर्वतांनी वेढलेली एक शांत जागा. इथं आवाज म्हणाल तर तो फक्त आमचाच! 


हे ठिकाण म्हणजे बौद्ध धर्मियांची गुरुकुल पद्धतीची शिक्षण संस्था आहे. मठाच्या आवारात विस्तृत ओवर्‍यांचे निवासी संकुल आहे. मुलांसाठी विद्यालय आणि ध्यान धारणेसाठी विविध कक्ष आहेत. मठाच्या मुख्य दालनात मध्यभागी अतिभव्य अशी बुद्धाची मूर्ती आहे तर बाजूला असणाऱ्या गुरु पद्मसंभव आणि अवलोकितेश्वर यांच्या मुर्त्यासुद्धा पाहतच राहाव्यात इतक्या सुंदर आहेत. याच दालनात शेकडो विद्यार्थ्यांच्या उभ्या-आडव्या ओळींतून बसण्याची सुरेख आसनव्यवस्था आहे. दोन्ही बाजूस पुरूषभर उंचीचे आडवे ढोल ठेवलेले आहेत. या मठात सकाळी व सायंकाळी बौध्दभिक्खुंद्वारे होणारी प्रार्थना अजिबात चुकवू नये. आम्ही तिथे पोहोचलो आणि ढोलांच्या ताशांच्या व विविध वाद्यांच्या आवाजात प्रार्थना सुरु झाली. थोड्यावेळासाठी का होईना पण आम्ही सगळेच त्या प्रार्थनेने भारावून गेलो होतो.   


रांका मोनास्ट्रीच्या आवारातील प्रेयर व्हील्सची रांग

रांका मोनास्ट्रीचे प्रवेशद्वार


रांका मोनास्ट्रीच्या मुख्य मंदिराची भव्य इमारत

सुंदर रंगसंगतीत रंगवलेल्या मोनास्ट्रीच्या मुख्य दालनाबाहेरील भिंती

रांका मॉनेस्ट्री येथील भव्य प्रार्थना कक्ष

प्रार्थना कक्षातील गौतम बुद्ध, गुरु पद्मसंभव व अवलोकितेश्वर यांच्या मुर्त्या


रांका मॉनेस्ट्रीचे भव्य आवार





रांका मठ पाहून आम्ही पुढे निघालो ते आजच्या शेवटच्या स्थलदर्शनाच्या ठिकाणी. ठिकाणाचे नाव होते बनझांकरी वॉटरफॉल. हे ठिकाण म्हणजे एक सुंदर अवखळत पडणारा धबधबा आणि त्याबरोबर कल्पकतेने तयार केलेले एक सुंदर गार्डन. बनझांकरीचा अर्थ जंगलातला वैदू किंवा पुजारी किंवा जादूगार. सिक्कीम सरकारने निर्माण केलेला बनझांकरी (म्हणजे वनाची झलक दाखवणारा) हा कृत्रिम धबधबा आणि सोबतचे सर्वच उद्यान सौर ऊर्जेवर संचलित आहे. इथे ऊर्जेच्या सर्वच स्वरूपांची, त्यांच्यातील परस्पर विनिमयांची आणि तत्संबंधी अनेक विषयांची माहिती, शालेय मुलांना नीट समजून घेता येईल अशा प्रात्यक्षिकांद्वारे व्यवस्थित उलगडून दाखवलेली आहे. बनझांकरी धबधबा हे इथलं वैशिष्ट्य. फार तर ८० ते १०० फुटांचा धबधबा असेल. डोंगराच्या उतारावर पाण्याच्या प्रवाहाचे विविध थर आहेत, आणि त्यावरून अवखळ मुलांसारखे पाणी नाचत-बागडत उड्या मारत, आवाज करीत खाली पडते. झाकरी ही इथली 'काळी जादू' करणारी वनवासी जमात. धबधब्याच्या परिसरात दोन-तीन ठिकाणी या आदिम जमातीच्या नायकांची शिल्पं उभी केलेली आहेत. हे ठिकाण आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ८ ते सायंकाळी ६ यावेळेत पर्यटकांसाठी खुले असते. येथे मोठ्यांना माणशी ३० रुपये तर लहान मुलांना १५ रुपये प्रवेश फी आहे. 


रांका मठ परिसरातून दिसणारे गंगटोक शहर

बनझांकरी वॉटरफॉल





बनझांकरी वॉटरफॉल




आता आमचे गंगटोक शहरातील स्थलदर्शन जवळपास पूर्ण झाले होते त्यामुळे आम्ही पेमाला (आमचा ड्रायव्हर) शहरातील एम जी रोड अर्थात महात्मा गांधी रस्त्याजवळ सोडण्यास सांगितले. प्रत्येक हिलस्टेशला एक मॉलरोड हा असतोच. संध्याकाळचा वेळ हॉटेलवर घालवण्यापेक्षा पर्यटक अश्या मॉलरोडवर फेरफटका मारण्यास पसंती देतात. त्यात पुन्हा एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर खरेदी करणं हे पर्यायाने आलंच. त्यासाठी गंगटोक शहरात तुमच्या दिमतीला आहे महात्मा गांधी उर्फ एम जी रोड. दुतर्फा १००-१५० दुकाने असलेला आणि शॉपिंग तसेच खाण्यापिण्याचे विविध पर्याय उपलब्ध असणारा शहराचा एक मध्यवर्ती भाग. येथे कोणालाही गाड्या घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे पेमाने आम्हाला या रस्त्याच्या सुरवातीला सोडले आणि तो त्याच्या कामाला निघून गेला. 


गंगटोक शहरातील एम जी रस्ता हा एक खूप सुंदर प्रकार आहे. या रस्त्याने पायी फिरताना तुम्ही भारतात नसून कुठल्या युरोपीय देशात आहात असा फील यावा इतकी स्वच्छता आणि सुंदर रचना असलेलं हे मार्केट आहे. गंगटोक मधील इतर सर्व रस्ते मुख्यता तसे चढ-उतारांचे आहेत. पण बाजाराचा मैलभराचा हा रस्ता मात्र एकदम सपाट आणि पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने नीट बांधलेला आहे. दुतर्फा खाण्यापिण्याची अनेक हॉटेल्स, खरेदीसाठी अनेक दुकानं, रस्त्याच्या मधोमध सुंदर झाडाफुलांचा डिव्हायडर, त्यावर आकर्षक दिव्यांची रचना आणि त्यासोबत फिरून दमलात तर चक्क बसायला बाक. जणू काही पाश्‍चात्त्य देशातील एखाद्या स्मार्ट सिटीत आल्याचा भास होतो. वाहनांना येथे येण्यास मनाई असल्याने निवांतपणे रेंगाळत, दुकानं हिंडत, खात-पित संध्याकाळ घालवायची असेल गंगटोक शहरातील हा महात्मा गांधी रस्ता ही एक मस्त जागा आहे. तुम्हाला अगदीच खरेदी करायची इच्छा नसेल तर चहा-कॉफीचे घुटके घेत किंवा थुक्पाची चव चाखत रस्त्याकडेला असलेल्या बाकांवर बसून राहिलं तरी निवांत सुट्टीचा परमोच्च आनंद मिळेल याची खात्री. 


एमजी मार्ग अर्थात महात्मा गांधी रस्ता



पण मुख्य एम. जी. मार्केट जरा महाग आहे. त्यामुळे खरेदी हा जर का तुमचा मुख्य हेतू असेल तर एम. जी. रोड संपता संपता उजवीकडे एक पायऱ्यांचा रस्ता खाली लाल मार्केटकडे उतरतो. इथे गोष्टी जरा जास्त स्वस्त मिळतात आणि तुम्हाला बार्गेनिंग करण्यासाठी पर्याय असतो. पण हा परिसर जरा जास्त गजबजाट असणारा, गर्दीचा आणि अरुंद असा आहे. पण स्थानिक आणि चिनी कारागिरांनी बनवलेल्या लाकडाच्या उत्तम कलाकुसरीच्या वस्तू, गरम कपडे, खास तिबेटी आभूषणे ही या लाल मार्केटची खासियत आहे. आम्ही देखील आधी या लाल मार्केट परिसरात खरेदी उरकली आणि मग मुख्य एम जी रोडवर फिरावयास आलो. गेले चार-पाच दिवस तेच ते ठरविक डाळ, भात, बटाटा कोबीची भाजी, उकडलेली अंडी, ओम्लेट, मॅगी असे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या आम्हा जीवांना आता एम जी रोडवरील साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, पाणी-पुरी, भेळपुरी असे अनेक पर्याय उपलब्ध असणारी हॉटेल्स खुणावू लागली. मग एका छानश्या हॉटेलमधे यथेच्छ जेवणाचा कार्यक्रम पार पडून रात्री १० वाजता मुक्कामी हॉटेलवर सगळे परत आलो.


आजचा दिवस एकूणच खूप मजेत गेला. आजच्या भटकंतीमधे ना कुठे जास्त गाडी प्रवास, ना कुठे चढण, ना बोचरी थंडी. खरतर गंगटोक शहराची सुंदरता इतकी पसरलेली आहे की २-३ दिवस खास गंगटोक शहरात राहून आजुबाजुचा परिसर अनुभवायला हवा. पण हे जरी शक्य नसले तरी गंगटोक शहरातली काही ‘मस्ट वॉच’ ठिकाण आज आम्ही पाहिली. स्वच्छ आणि चांगले डांबरी रस्ते, प्रदुषणमुक्त हवा, वाहतुकीची शिस्त या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही गंगटोक शहराच्या प्रेमातच पडलो. आता पुढच्या दिवसाच्या म्हणजे गुरुवारच्या नथुला पास, त्सोंगमो अर्थात छांगू लेक, बाबा हरभजनसिंग मंदिर, एलीफंट लेक, कुपुक लेक, वळणावळणाच्या सुंदर मार्गासाठी प्रसिद्ध असणारे झुळूक गाव अश्या थोडया अतिउंचावरील आणि बऱ्याच लांबच्या प्रवासाचे वेध लागलेले असल्याने लवकरच सगळे निद्रादेवीच्या आधीन झालो.


चला सिक्कीम फिरुया - भाग ५ - पूर्व सिक्कीमची भटकंती 


@ VINIT DATE – विनीत दाते


पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... 



Comments

  1. झकास, छान वर्णन केले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सुंदर, अप्रतिम वर्णन गँगटोकचे विनीत. प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळाला आणि अजून न पाहिल्याचा खेद पण नक्कीच 3~4 दिवस काढून जाण्याचा निश्चयही केला.
      लिहीत राहा, प्रेरणा देत जा! 😊💐🙏🏻👍🏻

      Delete
  2. Pankaja Ghodekar04 December, 2019 12:07

    Vinit... I have experienced this all recently...had been there just a couple of weeks back... Pan asa varnan mala jamalach nasta... Lekh vachun atta mi kahi minutes madhe parat he sagala firun aale asa vatala...

    ReplyDelete
  3. विनित खुपच सुंदर वर्णन केलस फाेटाे पण मस्तच आलेत छान छान

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर लिहिले आहेस. प्रत्यक्ष फिरत आहोत असे वाटले.

    ReplyDelete
  5. Sunder likhan dadya...khupach mast vatla vachun,jayacha yog yeil ka nahi te mahiti nahi...pan chaan mahiti milali...keep up the good work of inspiring us...

    ReplyDelete
  6. As usual, Superb!
    Shrikant Mapari

    ReplyDelete
  7. राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ! या ब्रिदवाक्याने सुरु होणारा हा ब्लॉग...... महाराष्ट्रातील गड, किल्ले याची अभ्यासपूर्ण अशी भटकंती आपण आपल्या पूर्वीच्या अनेक ब्लॉग मध्ये केलेली दिसून आलेली आहे. ज्या नवोदित भटक्यांना भटकंती करून पर्यटनाचा आनंद घ्यायचा आहे. नवनवीन गड, किल्ले आणि निसर्गाच्या विविधतेने नटलेल्या सौन्दर्याची आणि डोंगर, पाणी याची मुक्त उधळण बघायची आहे त्या सर्वांना आपला ब्लॉग म्हणजे एक प्रकारे संजीवनीच आहे. आपण केवळ महाराष्ट्रच नव्हे तर "आसेतु हिमाचल" निसर्गाचा वरदहस्त आपल्याला कसा लाभला आहे ! याची जाणीव या ब्लॉग द्वारे होते. आणि यातील सर्व बारकाव्याने केलेल्या वर्णनामुळे प्रथम जाणार्यांना मार्गदर्शन होते. आपली अभ्यासपूर्ण अशी भ्रमंती चालू असल्यामुळे ब्लॉग वाचनीय होतो. त्यामुळे पुन्हा पुढील ब्लॉग वाचनाचा मोह होतोच होतो.

    सिक्कीमच्या भटकंतीचे ३ भाग पूर्वी वाचलेले आहेतच आता हा ४ था भाग. गंगटोक शहराची खडा ना खडा माहिती आणि तेथील स्वच्छतेचे वर्णन. येथील पर्यटकांना आकर्षित करणारे ताशी व्हिऊ पॉईंट, कांचनगंगा पर्वत रांगा याचे वर्णन आणि सोबतची मन प्रसन्न करणारी अप्रतिम छायाचित्रे खूपच सुरेख. गणेश टोक, हनुमान टोक आणि मंदिर, विवीध रंगी मोहवून टाकणारी फ्लॉवर सेंटर मधील फुले , न्यामगाल इन्स्टिटयूट, प्रेयर व्हील्स, रोप वे चे सुंदर छायाचित्र. मॉनेस्ट्रीमधील लक्ष वेधून घेणारी आकर्षक रंगसंगती आणि इतर छायाचित्र वा वा अप्रतिमच. सुंदर असा बनशंकरी वॉटर फॉल आणि परिसरात जाताना सौरऊर्जेची निर्मिती करत असलेले पॅनेल्स पण स्पष्ट दिसतात. तसेच तेथील चित्र विचित्र पुतळे पण लक्ष वेधून घेतात. परदेशातील वाटणारी एम जी मार्केट, तेथील रंगीबेरंगी आणि आकर्षक असणारी दुकानासमोरील रोषणाई ! प्रदूषण मुक्त हवा, स्वच्छ आणि डांबरी रस्ते. असे हे सर्वांग सुंदर असणारे गंगटोक शहर ! मला पण आपल्या शब्दांच्या किमयेमुळे जाऊन आल्यासारखे वाटते आहे आणि त्याला जोड अप्रतिम अनेक छायाचित्रांची ! खरोखर लिखाण आणि छायाचित्रांचा मनोमन आनंद घेतला. पुढील अश्याच ब्लॉग लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! 💐 दत्तात्रय जोशी

    ReplyDelete
  8. विनीतराव किती सुंदर लिखाण व फोटोग्राफी केलीय. मस्तच.

    ReplyDelete
  9. Ek number blog!

    ReplyDelete
  10. Jitendra Pardeshi05 December, 2019 11:38

    सुंदर शहराचे अतिसुंदर वर्णन....छान सफर घडवली विनीत..सविस्तर माहीती...������������

    ReplyDelete
  11. very nice blog. asa watla ki apan swatah firun alo Gangtok.

    ReplyDelete
  12. अतिशय सुंदर प्रवासवर्णन. गंगटोक डोळ्यासमोर उभं राहिलं. खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  13. मस्त वर्णन. लेख सुंदर झाला आहे. गंगटोकला जायला हवे.

    ReplyDelete
  14. Good one...please do give information about medical facilities available there. Hope I haven't missed that in your bolg. But it's good keep it up. Regards,

    ReplyDelete
  15. एकदम मस्त माहिती संकलित केली आहेस. मोबाईलवर फोटो दिसले नाहीत पण नंतर पीसीवर पाहेन. माझ्या वडिलांना पण शेअर करतो.

    ReplyDelete
  16. Excellent as always.
    Memories of 2013 visit recalled

    ReplyDelete
  17. Superb, write up as usual. Khupach chan , apratim likhane. Tumachyabarobar phirnyacaha anubhav milato. One can easily complete the trip just by reading it. Mastach photipan Chan

    ReplyDelete
  18. फार छान अनुभव आहे

    ReplyDelete
  19. गंगटोक भारी आहे की. ब्लाॅग सविस्तर लिहिला आहे. फोटो सुध्दा मस्तच आलेत. Keep it up!

    ReplyDelete
  20. khoop chaaan lihitos

    ReplyDelete
  21. Pictursqe and very informative script supported with beautiful photographs.

    ReplyDelete
  22. Vinit khooop mast lihilays . Aani sagale ch photo apratim. He sagale itake chan varnan vachun 2 years back Sikkim la janyacha chance miss kevlyache vait vatate aahe mala

    ReplyDelete
  23. अप्रतिम फोटो आणि प्रवास वर्णन!
    स्वतः ती ठिकाण फिरून आल्याचा अनुभव वाचकाला मिळवून देणे इतकं सुंदर लिहिता दादा तूम्ही!ताशी व्यु,कांचनगंगा च्या पर्वत रांगा,फ्लॉवर गार्डन,हनुमान टोक,मॉनेस्ट्री या सगळ्याच वेळेसह केलेलं प्रवास वर्णन खूप खूप आवडला.न्यामगल इन्स्टिट्यूट,पुतळे अशी एक न एक खडा न खडा माहिती छानच मांडली आहे.रोप वे सारखी दळणवळणआधुनिक साधन ,वाढत पर्यटन आणि तरीसुद्धा प्लास्टिक मुक्त ,प्रदूषण विरहित असा भाग निसर्गाच्या सुद्धा खूप जवळ आहे हे वाचून छान वाटलं.निसर्ग सौंदर्य ,आणि एवढी टापटीप असतानाही तिकिटांचे दर पण माफक वाटले.
    एकूणच सिक्कीम भटकंती करायला नक्की आवडेल.तुमचं अभ्यासपूर्ण, व्यावहारिक लिखाण आणि फोटो खूप सुंदर.पुढच्या भागाची वाट पाहतेय.

    ReplyDelete
  24. Khupach chaan likhan. Mala Pravas varnane vachyala avadatat. Tyat tumache likhan khupach chaan ahe. Te vachayala ghetale ki apan swataha anubhavato ahe ase vatate. Waiting for your next part

    ReplyDelete
  25. Khupach chaan likhan. Mala Pravas varnane vachyala avadatat. Tyat tumache likhan khupach chaan ahe. Te vachayala ghetale ki apan swataha anubhavato ahe ase vatate. Waiting for your next part

    ReplyDelete
  26. Khupach chaan likhan. Mala Pravas varnane vachyala avadatat. Tyat tumache likhan khupach chaan ahe. Te vachayala ghetale ki apan swataha anubhavato ahe ase vatate. Waiting for your next part

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana