लहुगड_Lahugad
अमेरिका तसेच परदेशात नाताळच्या सणाला फार महत्व आहे. त्यामुळे डिसेंबर एंड म्हणजे आमच्या सारख्या IT वाल्यांना कामातून निवांतपणा मिळणारा महिना. याच सुट्टीचा फायदा घेत २०१४ च्या डिसेंबर महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातले तब्बल ८ किल्ले पाहीले होते. दोन वर्ष होत आली आता या औरंगाबाद जिह्याच्या भन्नाट ट्रेकला. तेव्हापासूनच मनात होत कि मराठवाड्यातील या किल्ल्यांबद्दल लिहावं आणि त्यातही खास करून फुलंब्री जवळच्या लहुगडाबद्दल सगळ्यात आधी. याच कारणही तसचं आहे मित्रांनो. तुम्ही अगदी “जो सब कूछ जानता है” वाल्या गुगलवर जरी “लहुगड” असा शब्द टाकला तरी तो सुद्धा तुम्हाला लोणावळ्या जवळच्या “अति”प्रसिद्ध लोहगडाचीच माहिती दाखवतो. चला तर मग, थोडक्या माहितीमुळे ऑफबीट वाटणाऱ्या पण अनेक कातळकोरीव अवशेषांनी नटलेल्या लहुगडाची एक भन्नाट सैर करू. लहुगड हा अजिंठा डोंगररांगेला समांतर अश्या अजंठा-वेरूळ लेण्यांच्या डोंगररांगेत येणारा किल्ला आहे. जवळच असणारा देवगिरी सारखा किल्ला आणि प्रसिद्ध अजंठा लेण्यांच्या परिसरातून जाणाऱ्या पुरातन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. गडावर असणारे गुहा आणि खांब टाक्...