चला सिक्कीम फिरुया - भाग ३

चला सिक्कीम फिरुया - भाग १ - सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन 

चला सिक्कीम फिरुया - भाग २ -  प्रस्थान व उत्तर सिक्कीममधील लाचेन व गुरुडोंगमार सरोवरची भटकंती


उत्तर सिक्कीमची भटकंती ==> लाचुंग, झिरो पॉईंट, युमथांग व्हॅली व हॉट स्प्रिंग


उत्तर सिक्कीममधील नितांत सुंदर लाचुंग गाव (फोटो इंटरनेट साभार)


आज मंगळवार, २३ एप्रिल २०१९. आमच्या ट्रिपचा चौथा दिवस. "लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे" या धर्मशास्त्रात सांगितलेल्या नियमाचे आम्ही गेले दोन दिवस अगदी काटेकोरपणे पालन करत होतो. रात्री ९-९.३० वाजताच झोपायचो, त्यामुळे साहजिकच पहाटे ५-५.३० वाजता अलार्म वगैरे न लावताच जाग यायची. आजही प्रत्यक्षात पहाटे ५.३० वाजताचा गजर लावला असताना ५ वाजताच झोप पूर्ण झाल्यामुळे जाग आली. सहज म्हणून खिडकीचे पडदे बाजूला सारले तर बाहेर छान उजाडले होते. लाचुंग गावाला वेढा घातलेले बर्फाच्छादित डोंगर आणि त्यांच्या पडद्याआडून डोकावणारा सूर्यप्रकाश असं खूप सुंदर दृश खिडकीतून दिसत होतं. आजची सकाळ स्वच्छ सूर्यप्रकाश घेऊन उगवली म्हणजे एकूणच आजचा प्रवास छान होणार आणि मस्त फोटो मिळणार याची वर्दी मिळाली. काल लाचेनपेक्षा इथली थंडी देखील सहन करण्या इतपत होती. किंवा मग दोनच दिवसात आम्ही इथल्या थंडीला सरावलो असू बहुदा. आज निघायचे पण तासभर उशिराने असल्यामुळे सगळ्यांची झोपही छान झाली. त्यात हॉटेलवर गरम पाण्याची व्यवस्था उत्तम असल्यामुळे तिघेही अंघोळी उरकून फ्रेश झालो आणि सकाळी ६ वाजता ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली हॉटेलच्या डायनिंग हॉलमधे पोहोचलो. काल गुरुडोंगमार सरोवराकडे जातानाचा प्रवास बराच पहाटे सुरु केल्यामुळे निघताना चहाशिवाय काही घेतले नव्हते. पुढे त्याचा प्रवासात थोडा त्रास जाणवला होता. पण आज मात्र सकाळी ६.१५ वाजताच नाष्टा तयार होता. ग्रिल्ड व्हेजिटेबल सॅन्डविच, गरमागरम आलू पराठे, चहा आणि वेगवेगळी बिस्कीट व कुकीज असा नाष्ट्यासाठी छान बेत होता. पोटभर नाष्टा उरकला आणि सकाळी ६.४५ वाजता आजच्या भ्रमंतीची सुरवात केली.


पहाटे हॉटेलच्या खिडकीतून पाहायला मिळालेला नजरा

आज झिरो पॉईंट अर्थात युमेसमडोंग, युमथांग व्हॅली अर्थात युमथांग दरी आणि हॉट स्प्रिंग अर्थात गरम पाण्याचे झरे अशी तीन ठिकाण पाहून लाचुंग गावात याच हॉटेलवर दुपारच्या जेवणासाठी परत यायचे होते. दुपारचे जेवण उरकून फ्रेश व्हायचे आणि मुक्कामासाठी आज गंगटोक शहर गाठायचे असा एकूण कार्यक्रम होता. थोडक्यात आज दुपारी नॉर्थ सिक्कीमला अलविदा करून पुन्हा इस्ट सिक्कीममधे परत जायचे होते. झिरो पॉईंट अर्थात आजचे सगळ्यात लांबचे ठिकाण लाचुंगपासून ५० किमी अंतरावर तर युमथांग व्हॅली याच रस्त्यावर त्याआधी २५ किमी अंतरावर आहे. त्यात इकडचे रस्ते लाचेन आणि गुरुडोंगमार सरोवराकडे जाणाऱ्या रस्त्यापेक्षा बऱ्याच चांगल्या स्थितीत असल्यामुळे लाचुंगपासून झिरो पॉईंटला जाण्यासाठी दोन ते अडीच तासांचा कालावधी पुरेसा आहे. 


समुद्रसपाटीपासून ८८०० फुटांवर वसलेले लाचुंग हे एक खूप सुंदर गाव. लाचुंग दरीत असणारे छोट्या छोट्या वस्त्यांचे हे भुतिया जमातीचे खेडे लाचुंग-चू नदीच्या काठी वसलेले आहे. नॉर्थ सिक्कीममधल्या सर्वात सुंदर गावांमधे लाचुंगचा नंबर सगळ्यात वरचा आहे असं म्हणतात. दाट झाडी, उंचच उंच डोंगररांगा, त्यातून मध्येच डोकावणारी पांढरीशुभ्र शिखरं आणि गावाच्या बाजूने बागडत, दौडत, रोरावत वाहणारी लाचुंग-चू नदी. लाचुंग गावाला अश्या सुंदर दृशांच कोंदण लाभलं आहे. म्हणूनच बहुदा लाचुंग गावाची तुलना स्वित्झरलँडशी केली जात असावी. हवेतील तो गारवा, ती गुलाबी थंडी, तो किमयागार निसर्ग असे ते रूप डोळ्यात साठवत आम्ही युमथांग व्हॅलीच्या दिशेने प्रवासाला सुरवात केली.



लाचुंग गावातून एक रस्ता कटाओ या गावाकडे जातो. लाचुंगपासून ३० किलोमीटर अंतरावर असणारा माउंट कटाओ हा एक खूप सुंदर टूरिस्ट स्पॉट आहे. समुद्रसपाटीपासून १३५०० फुटांवर असणारी कटाओ दरी आणि चारीबाजूंनी बर्फाच्छादित पर्वतांच्या मध्यभागी वसलेले कटाओ गाव खूपच सुंदर दिसते. कटाओ दरीत जाण्यासाठी मात्र वेगळ्या परवान्याची आवश्यकता असते जो आम्ही गंगटोकमधून आधी घेतला नव्हता. तसेही वर दिलेली तीन ठिकाणे आणि कटाओ दरी पाहून आज रात्रीपर्यंत गंगटोक शहर गाठणे अशक्य होते. कटाओ आणि लाचुंग गावाच्या जवळ असणारे शिंगबा वन्यजीव अभयारण्य ही अतिरिक्त ठिकाणे पाहण्यासाठी लाचुंग गावात दोन दिवसांचा मुक्काम करणे आवश्यक आहे. पर्वतीय कुरणे आणि तेथील अनोखे वन्यजीवन यामुळे शिंगबा अभयारण्याचा सारा प्रदेश विहंगम झाला आहे. असो तर शिंगबा अभयारण्य आणि कटाओ दरी पाहण्यासाठी पुन्हा कधीतरी नक्की नॉर्थ सिक्कीमला परत यायचे असे ठरवून आम्ही लाचुंग गावातून सरळ वर चढत जाणाऱ्या रस्त्याला लागलो. शेवटी काही तरी बघायचे राहिले तरच आपण पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जातो ना.


लाचुंग गावातून थोडे अंतर जाताच आपल्या भारतीय सैन्याचा एक मोठा तळ लागतो. येथील चेकपोस्टवर आपल्याला युमथांग व्हॅली व झिरो पॉईंटकडे जाण्यासाठी काढलेला परवाना (टुरीस्ट परमिट) दाखवावा लागतो आणि गाडीची नोंद देखील करावी लागते. परमिटचे हे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी गाडी चेकपोस्टवर थांबली असता तेथील दोन सैनिकांमधे चाललेला संवाद सहज माझ्या कानावर पडला. ते दोघे चक्क मराठीतून बोलत होते. मी गाडीतून उतरून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विचारले ‘मराठी आहात का हो तुम्ही?’. तसे ते दोघे हसले आणि म्हणाले, "होय आम्ही महाराष्ट्रातले". दोघेही पंचविशीच्या आसपासचे उमदे तरुण. त्यांच्यातला एक जण नागपूरचा तर एक आपल्या साताऱ्या नजीकच्या कोण्या एका गावचा. त्यांचाकडून कळाले की सिक्कीममधे मराठा लाईट इन्फन्ट्रीची खूप मोठी तुकडी आहे. त्यामुळेच येथे अनेक ठिकाणी मराठी आणि महाराष्ट्रातील सैनिक तैनात आहेत. त्यांचा तो रुबाब, तो गणवेष, कुटुंबापासून शेकडो मैल दूर अश्या दुर्गम ठिकाणी देशाच्या सरहद्दीवर गस्त घालणे, त्या खडतर परिस्थितीत राहणे हे सगळे पाहून त्यांच्याविषयी अभिमानाने ऊर भरून आला आणि नकळत त्यांना सॅल्युट झाडल गेलं. कुठे आपल्या देशाच्या रक्षणासाठी तळहातावर प्राण घेऊन अहोरात्र लढणारे हे भारतीय जवान आणि कुठे यांच्यामुळेच सुरक्षित असणाऱ्या देशात राहून "भारत तेरे तुकडे होंगे" म्हणणारे तरुण. खरंतर मला त्यांच्याशी आणखी खूप बोलायची इच्छा होती पण मागे अनेक गाड्यांची लाईन लागली असल्याने तिथून लवकरच निघावे लागले.


लाचुंग गावातून बाहेर पडताच पहिल्यांदा नजरेला भिडते ते उंच कपारींच्या डोंगरांचे वैभव. डोंगर एकदमच उभा.कित्येकदा तर अगदी ८०-९० अंशाच्या कोनातला. डोंगरांचा माथा धुक्याने झाकलेला तर आजूबाजूला स्वच्छ उन पडलेलं. कधी हे धुकं झरकन बाजूला व्हायचं आणि मग डोंगरमाथ्यावर जमा झालेला पांढरा शुभ्र बर्फ दिसायला लागायचा. काहीवेळ तरी आसमंत फक्त चार रंगानी भरून गेला होता. आकाशाचा गर्द निळा, बर्फाचा पांढरा, पर्वतांचा करडा नि मातीचा तपकिरी. हे निसर्गदृश पहातच आमची गाडी पुढे पुढे सरकत होती. लाचुंग गावानंतरचा थोडा रस्ता अत्यंत खराब होता आणि अधूनमधून डोंगरावरून वाहत येणाऱ्या झऱ्यांच्या पाण्यामुळे वाहून गेलेला. येथे पाऊस भरपूर पडतो. त्यामुळे दगड फारसा मजबूत नाही. तसाही हिमालयाचा अंतरंग मृदू आहे. याचं कारण म्हणजे येथे दगडांच्या कपारीत पाणी साठून राहते. अतिउंचीमुळे पाण्याचा दाब वाढत जातो आणि मग डोंगर फुटतो. असे फुटलेले भाग वारंवार आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागतात. डोंगरावर फुटलेले भाग पाण्याबरोबर घसरत खाली येतात. आणि मग अशा खडकांची नदी झाल्यासारखी दिसते. कित्येकदा तर या दगडांच्या राशीतूनच आपली गाडी जात असते. पण हे दगड जर का खूपच मोठे असतील तर मग मात्र बोर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (BRO) लोकांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करेपर्यंत वाट पहावी लागते.





तर असा हा डोंगरदऱ्यामधला आमचा प्रवास हळूहळू बर्फाच्छादित शिखरांच्या जवळ जात होता. अचानक रस्त्याच्या दोन्हीबाजूला मातकट रंगाने माखलेल्या बर्फाचे डोंगर दिसायला लागले आणि आमची गाडी एका ठिकाणी थांबली. पुढे गाड्यांची रांग लागलेली दिसत होती. आज पहाटे बर्फाचा एक भला मोठा हिमलोट (Avalanche) वरच्या डोंगरावरून वाहत रस्त्यावर आल्याचे कळाले. रस्त्यावर वाहून आलेला बर्फ आणि त्याबरोबर आलेला राडारोडा बाजूला करण्याचे काम BRO चे जवान करत होते. या राडारोड्यामुळे काही ठिकाणी रस्ता खचला होता तर एके ठिकाणी उभ्या चढावर बर्फाचे पाणी वितळून भयंकर चिखल झाला होता. या चिखलातून गाड्या वर चढू शकत नव्हत्या. आता मात्र येथे प्रत्येक ड्रायव्हरचे कौशल्य पणाला लागले होते. काही गाड्या पटकन तो चढ चढून जात होत्या तर काही गाड्या अर्ध्या चढापर्यंत वर जाऊन आपोआप मागे येत होत्या. त्यामुळे प्रत्येक गाडीत योग्य अंतर ठेऊन बाकीचे ड्रायव्हर एकमेकाला गाडी वर चढवण्यासाठी मदत करत होते. ज्या गाड्यांमध्ये ८-१० पेक्षा जास्त लोकं बसली होती त्यांना गाडी वर चढवता यावी म्हणून गाडीतून खाली उतरवले जात होते. चिखलातून तो चढ पार करताना त्या पर्यटकांची होणारी तारांबळ आम्ही गाडीतून पाहत होतो. थोड्याच वेळात आमच्यावर देखील हीच वेळ येणार होती. पण आमच्या ड्रायव्हरने मात्र आम्हाला गाडीत बसवूनच एका दमात तो चढ साध्या टाटा सुमो गाडीने पार करून दाखवला. जे बात!



बर्फ बाजूला करून तयार करण्यात आलेला रस्ता


आज आम्ही जात होतो त्या नगाधिराज हिमालयाच्या कुशीत खेळण्यासाठी, त्याच्या मखमली धवल बर्फात न्हाऊन जाण्यासाठी. पण त्याआधी हा ड्रायव्हरची कसोटी पाहणारा रस्ता पार करणे गरजेचे होते. येथे क्षणोक्षणी आम्हाला हिमालयाचे रौद्र रूप दिसून येत होते. किंचीतश्या देखील चुकीला येथे माफी नव्हती. रस्ता होता पण तो केवळ मातीचा ज्यावरून गाडीचे टायर घसरत होते. परंतु अशातही ती हिमशिखरे आम्हाला साद घालत होती. खरंच या हिमालयाचे आव्हान पेलणे हे काही सोपे काम नाही. जिथे साऱ्या इतर डोंगररांगांची उंची संपते तिथून हिमालयाची उंची सुरु होते. आठ हजार मीटरहून अधिक उंची असणारी तब्बल चौदा शिखर याच हिमालयाने आपल्या कवेत घेतली आहेत. त्यामुळे आपण फक्त त्या नगाधिराज हिमालयाच्या भव्यतेकडे पाहून त्याच्या पुढे नतमस्तक व्हायचे आणि मनोमन त्याला अभिवादन करायचे. बाकी मग तो नगधिराज सगळं सांभाळून घेतो.



तर असा हा खडतर रस्ता पार केला आणि आता काहीश्या चांगल्या रस्त्याला सुरवात झाली. काही वेळातच बाहेरचे दृश देखील कमालीचे बदलले. इतक्यावेळ रखरखीत वाटणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आता ऱ्होडोडेनड्रोन/रोडोडेंड्रॉन (Rhododendron) अर्थात बुरांस/बुराशची हिरवीगार झाडे दिसायला लागली. जमीनीलगत तर एका वेगळ्याच जांभळ्या रंगांच्या फुलांचे गालिचे पसरलेले दिसले. युमथांग व्हॅलीच्या आधी रोडोडेंड्रॉन राष्ट्रीय उद्यान आहे त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लाल चुटूक फुलांच्या गुच्छांनी लगडलेली झाडं सगळीकडे पहायला मिळतात. पण ही फुले तोडण्यास येथे सक्त मनाई आहे. एप्रिलचा मध्य ते जुन या काळात हा सर्व प्रदेश रोडोडेंड्रॉनच्या सुंदर लाल फुलांनी बहरून जातो आणि ते दृश पाहण्यासाठी पर्यटक खास या परिसरात येतात. हिमालयात १५०० ते ३६०० मीटर उंचीवरच हे रोडोडेंड्रॉनचे वृक्ष आढळतात. बुरांसच्या या लाल फुलापासून गोड सरबत बनवले जाते तर पहाडी लोक या लाल फुलांची चटणी बनवून ती जेवणात सर्रास वापरतात असे ड्रायव्हरने सांगितले.


रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी रोडोडेंड्रॉनची झाडी

रोडोडेंड्रॉनची सुंदर लाल चुटूक फुलं

रोडोडेंड्रॉनच्या फुलाबरोबर आमचं फुल अन्विता

रोडोडेंड्रॉनची हिरवीगार झाडं, त्यांना लगडलेली लाल चुटूक फुलं आणि या झाडांच्या मधेमधे डोंगरावरून घसरत खाली आलेला पांढराशुभ्र बर्फ असं सुंदर दृश पहात आम्ही १२००० फुटांवरील युमथांग गावात पोहोचलो. खरंतर युमथांग हे काही गाव वगैरे नाही तर काही दुकानांमुळे तयार झालेली एक छोटी वस्ती आहे. इथं रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी मफलर्स, कानटोप्या, स्वेटर, हातमोजे विकणारी अनेक दुकानं आहेत. तर त्याचबरोबर मॅगी, ओम्लेट, थुक्पा, चौमीन, मोमोज आणि चहा यासारखी खाद्यपदार्थ मिळणारी छोटी छोटी हॉटेल्स. पर्यटकांना जर का युमथांगपासून थोडे आणखी वर म्हणजे १५२०० फुटांवरील झिरो पॉइंट येथे जायचे असेल तर बर्फात खेळण्यासाठी लागणारे वॉटरप्रूफ हॅन्डग्लोव्हज, बर्फात चालण्यासाठी लागणारे गमबूट आणि कपडे ओले होऊ नयेत व थंडी वाजू नये म्हणून घालायचा मोठा ओव्हरकोट अश्या वस्तू याच हॉटेल्समधे अगदी नाममात्र भाड्याने वापरायला दिल्या जातात. इथं अशी अनेक दुकानं असली तरी आपला ड्रायव्हर बरोबर त्याचं सेटिंग ज्या हॉटेलशी आहे अश्या हॉटेलसमोरच आपली गाडी थांबवतो व तिथूनच या वस्तू घेण्याचा आग्रह करतो. तसेही या वस्तू तुम्ही इथल्या अगदी कोणत्याही हॉटेलमधून घ्या, त्या तात्पुरत्या वापरायच्या असल्यामुळे आपण त्या कुठून घेतो याला फारसे महत्व नाही. आम्ही देखील सर्वात लांबचे ठिकाण असणारा झिरो पॉइंट आधी पहायचा आणि परतीच्या प्रवासात युमथांग व्हॅलीला भेट द्यायची असे ठरवल्यामुळे बर्फात खेळण्यासाठी लागणारे गमबूट व हॅन्डग्लोव्हज अश्या गरजेच्या गोष्टी घेतल्या व तडक झिरो पॉइंट दिशेने प्रवासाला सुरवात केली.


छोट्या छोट्या दुकानांचे युमथांग

कलरफुल युमथांग

आधी सांगितल्याप्रमाणे हिमालयातले वातावरण फारच बेभरवश्याचे असते. येथे क्षणात ऊन तर क्षणात ढग जमून पाऊस पडायला लागतो. जर का वातावरण बिघडलेच तर पुढे जाता येणार नाही आणि मग काहीच पाहायला मिळणार नाही असा विचार करून आम्ही युमथांग व्हॅलीला मागे टाकून आधी झिरो पॉइंट करण्याचे ठरवले. देवाच्या कृपेने नुकतेच स्वच्छ ऊन पडले होते आणि त्या उन्हात आजूबाजूचे बर्फाच्छादित डोंगर लख्ख झळाळत होते. पण अश्या या बर्फाकडे नुसत्या उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये बरं. कारण अश्या पांढऱ्याशुभ्र बर्फावरून परावर्तीत होणारे सूर्यकिरण जर का सरळ आपल्या डोळ्यांवर पडले तर सनब्लाइंडनेस होऊन डोळ्यांना तीव्र दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे बर्फात खेळायला जाताना किंवा बर्फाच्छादित डोंगराकडे पाहताना डोळ्यांवर कायम चांगल्या प्रतीचा व डार्क रंगाचा गॉगल (Sunglasses) वापरणे उत्तम. 


बर्फाच्छादित डोंगर. अश्या डोंगरांकडे तीव्र उन्हात उघड्या डोळ्यांनी पाहू नये


युमथांग व्हॅलीच्या परिसरात असणारा सपाट रस्ता आता पुन्हा नागमोडी वळणांचा आणि खड्या चढणीचा बनला. थोड्याच वेळात आम्ही युमथांगपासून १० किमी अंतरावर असणाऱ्या एका मोठ्या लष्करी तळाजवळ पोहोचलो. येथे झिरो पॉइंटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची नोंद करण्यासाठी आमची गाडी पुन्हा थांबवली गेली. तेवढ्यात समोर मला "जलेबी ढाबा" असे लिहलेले लष्कराचे एक कॅन्टीन दिसले. आमच्या गाडीची नोंदणी करणाऱ्या जवानालाच मग मी त्या कॅन्टीनमधे खरेच जिलेबी मिळते का आणि ते कॅन्टीन सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुले आहे का असे विचारले. त्या कॅन्टीनमधे जिलेबी तर मिळतेच पण त्याबरोबरच गरमागरम सामोसे आणि इतरही खाण्याचे काही पदार्थ मिळतात असे कळले. खरंतर अश्या उंच ठिकाणी आणि मस्त थंडीत जर का गरमागरम जिलेबी खायला मिळत असेल तर क्या बात है! पण आधी लगीन झिरो पॉइंटचे असे म्हणून मनाला आवर घातली आणि पुढे निघालो. पण परतीच्या प्रवासात मात्र येथे आठवणीने थांबायचे असे मनोमन ठरवले. 


थोड्या उंचावरून मागे दिसणारी युमथांग दरी 

झिरो पॉइंटच्या रस्त्यावर लागणारा लष्कराचा तळ. उंची १३२०० फुट


आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगराच्या कुशीतून दरीत झेप घेणारे फेसाळते झरे आणि पांढराशुभ्र बर्फ दिसायला लागला. या दृशांची मजा घेत अजून फक्त अर्धा तास पुढे गेलो तसे रस्त्यावर वाहून आलेला बर्फ नुकताच बाजूला करून रस्ता खुला केला आहे असे वाटू लागले. तसे आमच्या ड्रायव्हर महाशयांच्या मनात पुढचा रस्ता बंद असण्याची शंकेची पाल चूकचुकली. आणि तेवढ्यात समोर गाड्यांची भली मोठी लाईन लागलेली दिसली. गाडी थांबवून मी आणि ड्रायव्हर चौकशी करण्यासाठी म्हणून चालत पुढे गेलो. थोड्याच अंतरावर काही जवान रस्ता बंद करून उभे होते. तेथेच JCB च्या सहाय्याने रस्त्यावरील बर्फ व राडारोडा बाजूला करण्याचे काम सुरु असलेले दिसले. अर्थातच पुढचा रस्ता बंद आहे असे कळाले. आमचे दुर्दैव म्हणजे झिरो पॉइंटपासून फक्त ५ किमी अंतरावरून आम्हाला परत फिरावे लागणार होते. आम्ही जेथे उभे होते तिथून समोर असणाऱ्या डोंगराच्या सर्वात वरच्या टोकावर सैन्याचे काही बंकर दिसत होते. तोच झिरो पॉइंट आहे असे कळाले. या झीरो पॉइंटच्या पुढे मानवनिर्मित रस्ता नाही. भारताच्या हद्दीतला हा शेवटचा पॉइंट म्हणून त्याला झिरो पॉइंट म्हणतात. तिथून पुढे थोडा ‘नो मॅन्स लॅण्ड’ आणि मग नंतर चीन. हे या ठिकाणाचं भौगोलिक महत्त्व. कालमानाप्रमाणे इथेही आता खाण्यापिण्याच्या वस्तू, मॅगी, भुट्टा, लेज, चहा, सूप्स हे सर्व काही मिळू लागलं आहे. थोडक्यात, टुरिस्ट संस्कृतीची झालर इथेही आहे. पण हे ठिकाण आणि येथे जाण्याचा मार्ग हे दोन्ही एकदा तरी जरूर अनुभवावं असंच.


नुकताच पडलेला बर्फ बाजूला करून वाहतूकीसाठी खुला केलेला रस्ता

झिरो पॉइंटच्या रस्त्यावर आम्ही इथेपर्यंतच पोहोचू शकलो. समोरच्या डोंगरावर झिरो पॉइंट


आता इथंपर्यंत येऊन झिरो पॉइंट हे ठिकाण पाहता येणार नाही हे ऐकून सगळ्यांचे मन खट्टू झाले. पण आमची गाडी जेथे उभी होती तेथेच आजूबाजूच्या डोंगर उतारावर चिक्कार बर्फ साठलेला होता. त्यामुळे रस्त्याकडेला गाडी लावायची आणि येथेच बर्फात खेळायचे असा ठराव सर्वानुमते संमत झाला. गाडीतून उतरून त्या बर्फाकडे चालू लागलो. सिनेमात दिसतो अगदी तसाच पांढराशुभ्र बर्फ. फक्त सिनेमात तो सपाट जमिनीवर असतो, इथे डोंगराच्या उतारावर होता. भुरभुरत्या बर्फावर अलगद पाय ठेवला तसा पाय किंचित आत गेला. पायांखाली होता पांढराशुभ्र थंडगार बर्फ आणि डोळ्यांसमोर होती कुठल्याही शब्दांत वर्णन न करता येणारी अपूर्वाई. बर्फात गेल्यावर जे जे करतात ते सारं आम्ही केलं. म्हणजे अगदी बर्फाच्या मूर्ती बनवणं, गोळ्यांनी एकमेकांना मारणं असले सारे प्रकार आम्ही केले. असे क्षण आपल्या आयुष्यात फारच कमी वेळा येत असतात आणि आमची अन्विता तर ते पहिल्यांदाच अनुभवत होती. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळ त्या बर्फात खेळलो, अगदी मनसोक्त. तिथं बसून गरमागरम चहा देखील घेतला. खरंतर अशा त्या हिमनगरीतून परतावयास मन तयार होत नव्हतं पण जास्त मोह सुद्धा घातक असतो असं म्हणतात. त्यामुळे आम्ही परत फिरलो ते आता युमथांग व्हॅली पाहायला.








परतीच्या प्रवासात उंचावरूनच युमथांग व्हॅलीचे विहंगम दृश दिसत होते. तसे नैसर्गिक सौंदर्य पाहून आता डोळ्यांचे समाधान झाले पण आता थोडे पोटाचे समाधान करणे गरजेचे होते. त्यामुळे झिरो पॉइंटकडे जाताना लागलेल्या जलेबी ढाब्यावर आठवणीने थांबलो. गरमागरम जलेबी, सामोसे आणि चहा असा अल्पोपहार घेतला आणि मगच गाडी पुढे निघाली. साधारण अर्ध्या तासात युमथांग व्हॅलीजवळ पोहोचलो. या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूला बर्फाच्छादित डोंगर होते तर डाव्या बाजूला थोडा मोकळा परिसर व खाली व्हॅलीत उतरल्यासाठी एक भली मोठी पायवाट. लांबूनच व्हॅलीमधून खळाळत वाहणारी लाचुंग-चू नदी दिसत होती. नदीपलीकडे पुन्हा उंच डोंगररांग आणि त्यावर देवदार वृक्षांचं दाट जंगल असा सगळा नजरा होता. गाडीतून उतरून पायवाटेने आम्ही व्हॅलीत उतरण्यास सुरवात केली. पायवाटेवरून व्हॅलीत उतरताना एक भला मोठा दगड दिसला. मग मी आणि अन्विताने त्यावर चढण्याचा प्रयत्न केला. त्या दगडावर उभे राहून दोघांनी मागे दिसणाऱ्या नयनरम्य दृश्याबरोबर थोडे फोटो काढले.  


झिरो पॉइंटच्या मार्गावरून दिसणारे युमथांग व्हॅलीचे विहंगम दृश

आम्ही दोघे आणि मागे युमथांग दरी


उंच पर्वतमाथा, त्यामध्ये थोडा पठारी प्रदेश, पक्ष्यांचा किलबिलाट, नदीचा खळखळाट, आजूबाजूच्या शिखरांच्या माथ्यावर जमा झालेले हिम आणि थंडगार बोचरा वारा असे काहीसे त्या युमथांग व्हॅलीचे सुंदर दृश होते. पायाखाली तर अनेक रंगीबेरंगी अनामिक फुलांचा सडा पसरलेला होता. युमथांग व्हॅलीला सिक्कीमची ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ असे म्हणतात. मे महिन्यात येथे जमीनीलगत अनेक सुंदर सुंदर फुलांचे ताटवे फुललेले पाहायला मिळतात. खरंच युमथांग व्हॅलीत वसंत ऋतूत काय बहार असते, ते प्रत्यक्ष डोळ्यांनीच अनुभवण्याची गोष्ट आहे. हे सर्व निसर्गदृश डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत आम्ही व्हॅलीतील नदीकाठी पोहोचलो. एका अनाम ओढीनं आणि आपल्याच धुंदीत वाहणारा तो स्वच्छ फेसाळत्या पाण्याचा प्रवाह पाहून त्यात अक्षरशः उडी मारायची इच्छा होत होती. पण ते हिमालयातल्या बर्फाचं थंडगार पाणी होतं. त्यामुळे मनातली इच्छा मनातच राहू दिली. पण सगळं शरीर नाही तर किमान हाताची काही बोटे तरी त्या पाण्यात बुडवून बघितलीच. आहाहा, काय थंडगार पाणी होतं म्हणून सांगू. मोजून अगदी दोन सेकंदात थंडीमुळे डोक्यात कळ जाईल इतकं थंड. नदीपात्रात पाण्याबरोबर वाहून आलेल्या पांढर्‍या रंगाच्या दगडांचा सर्वत्र सडा पडलेला होता. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्या दगडांना वेगवेगळे आकार प्राप्त झाले होते. काही दगड अगदी नर्मदेतल्या गोट्यांसारखे गोल दिसत होते तर काही दगडांवर सोनेरी रंगाची पुटे (गंधक सदृश्य) दिसत होती. या गंधक सदृश्य गुणधर्मामुळेच बहुदा या परिसरात गरम पाण्याचे झरे असावेत.


युमथांग व्हॅली






युमथांग व्हॅली


युमथांग व्हॅलीमध्ये जवळपास पाऊण तास घालवून आम्ही पुन्हा गाडीपाशी परत आलो तसे मला रस्त्याच्या विरुद्धदिशेला डोंगराच्या पायथ्याशी एक बुद्धिस्ट चोर्टेन (Chorten) अर्थात स्तूप नजरेस पडला. मागे बर्फाच्छादित डोंगर, त्याच्या पायथ्याचा तो पांढऱ्या रंगातला स्तूप आणि त्याच्या आजूबाजूला वाऱ्यावर फडफडणाऱ्या बुद्धसूक्ते लिहिलेल्या रंगीबेरंगी पताका. एकूणच फोटोसाठी एक कमाल फ्रेम होती. तुम्ही सिक्कीममधेच काय तर हिमालयात अगदी कुठेही फिरताना वार्‍यावर फडफडणार्‍या अश्या रंगीबेरंगी कापडी पताका हमखास दिसतात. या विविध रंगातील पताकांवर काळ्या अक्षरात तिबेटी/बौद्ध भाषेत प्रार्थनेच्या ओळी किंवा मंत्र लिहलेले असतात. पताकांच्या वाऱ्यावर फडफडण्याने भूत-प्रेतांना दूर राहण्याचा संदेश मिळतो, भूमी पवित्र बनते, मानवी पाप-पुण्यांचे आलेख वाऱ्याबरोबर देवापर्यंत पोहोचवले जातात अशी येथील लोकांची समजूत आहे. या पताका हवेत हलतात त्यामुळे प्रार्थना सगळीकडे पसरते आणि अगदी पाण्यात राहणाऱ्या माश्यांपासून ते हवेत उडणाऱ्या पक्षांपर्यंत सगळ्यांना त्या प्रार्थनेचा लाभ होतो असे म्हणतात. मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ फक्त पांढऱ्या रंगाच्या पताका लावतात तर रंगीबेरंगी पताका या शुभप्रसंगी घर, बौधमंदिर, स्तूप अश्या विविध ठिकाणी लावल्या जातात. 


बुद्धिस्ट चोर्टेन (Chorten) अर्थात स्तूप

आम्ही लाचुंगच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला तेव्हा दुपारचे १२ वाजले होते. थोड्याच वेळात आम्ही गरम पाण्याचे झरे असलेल्या हॉटस्प्रिंग या ठिकाणी थांबलो. झऱ्याकडे जाण्यासाठी रस्त्यापासून थोडेसे अंतर आत चालत जावे लागणार होते. हे अंतर चालत पार केले की लाचुंग-चू नदी आपला रस्ता अडवते. गरम पाण्याचे झरे हे या नदीच्या पलीकडील काठावर आहेत. नदी ओलांडण्यासाठी येथे मोठा लोखंडी पूल बांधलेला आहे. या पुलाला सगळीकडे रंगीबेरंगी पताका लावलेल्या होत्या आणि वाऱ्याबरोबर त्या जोरजोरात फडफडत होत्या. आम्ही मग त्या पुलावर थोडी फोटो काढण्याची हौस भागवून गरम पाण्याच्या कुंडाकडे निघालो. नदीवरील पूल ओलांडून गरम पाण्याच्या झऱ्यापर्यंत जाण्यासाठी १०० पायऱ्या चढाव्या लागल्या. युमथांग येथील या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या बाजूने स्नानासाठी दोन कुंड व त्याबाजूने आडोश्यासाठी खोल्या बनवलेल्या आहेत. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा एका खोलीला कुलूप होते तर दुसऱ्या खोलीतील कुंडात काही तरुणांचे मस्त पोहणे सुरु होते. कुंडाच्या पाण्यातून वाफा येत होत्या त्यावरून पाणी खूपच गरम असेल असे वाटले. पण पाण्यात हात घातला असता ते फारसे गरम वाटले नाही. बहुदा आजूबाजूला असणाऱ्या थंडीमुळे त्या कुंडातून वाफा येत असाव्यात. गरम पाण्याचा झरा म्हणजे भूऔष्णिक (जिओथर्मल) जागा जिथून गरम भूजल जमिनीवर नियमित वाहते. या पाण्यामध्ये विरघळलेले धातू जसे की लिथियम, सल्फर, कॅल्शियम आढळतात. या गरम पाण्याचे तापमान ३० अंश ते ७० अंश सेल्सिअसपर्यंत असते. असे हे गरम पाण्याचे झरे प्रागैतिहासिक काळापासून मानवाला आकर्षित करीत आहेत. याचे मुख्य कारण त्या पाण्याचे औषधी गुणधर्म. या औषधी गुणधर्मामुळे त्वचेचे आजार बरे होतात व त्यावर उपचार होतो असे म्हणतात.  


देवदार वृक्षांच्या कुशीत असलेले हॉटस्प्रिंग अर्थात गरम पाण्याचे झरे

लाचुंग-चू नदी ओलांडण्यासाठी लोखंडी पूल

पुलावर लावलेल्या रंगीबेरंगी पताका

पुलावरून दिसणारं विहंगम दृश

गरम पाण्याचं कुंड



हॉट स्प्रिंग अर्थात गरम पाण्याचे झरे पाहून आम्ही लाचुंग येथील हॉटेलवर दुपारी २ वाजता पोहोचलो. जेवणाची तयारी होईपर्यंत बॅगा आवरून घेतल्या. थोड्याच वेळात जेवणासाठीचा निरोप आल्यानंतर जेवण करून घेतले. आजचे ही जेवण छान बनवले होते. जेवण होताच सगळे सामान गाडीत टाकले व दुपारी ३.१५ च्या सुमारास गंगटोकच्या दिशेने निघालो. लाचुंगपासून परतीच्या प्रवासात कोणत्याही स्थलदर्शनाचा कार्यक्रम नसल्याने सगळ्यांनी छान झोप काढण्याचा कार्यक्रम पार पाडला. मग थोडया गप्पागोष्टी आणि मुलांबरोबर अंताक्षरी खेळत लाचुंग ते गंगटोक असा १०० किमीचा प्रवास करून रात्री ८ वाजता गंगटोक शहरात पोहोचलो. आमचा पुढील दोन दिवसांचा मुक्काम गंगटोकमधेच ट्रीपच्या पहिल्या दिवशी उतरलेल्या हॉटेल OMEGA INN येथे होता. आज लाचुंग-झिरो पॉइंट-लाचुंग-गंगटोक असा दिवसभरात जवळपास २०० किमीचा प्रवास झाला असल्याने सगळ्यांनीच रात्रीच्या जेवणाची वर्दी मिळेपर्यंत रूमवर आराम करण्याचे ठरवले. मी डायरीमधे दिवसभराच्या प्रवासाच्या नोंदी करत बसलो तर अमृता आणि अन्विताने टीव्हीचा ताबा घेतला. रात्री ९ वाजता जेवण तयार असल्याची वर्दी मिळाल्यावर खाली हॉटेलच्या डायनिंग हॉलमधे एकत्र जेवायला भेटलो. तिथे आमचे टूर मॅनेजर दिपकजी यांची भेट झाली. त्यांच्याबरोबर गेल्या तीन दिवसांचा नॉर्थ सिक्कीममधे आलेला अनुभव शेअर केला आणि काही सुधारणा देखील सुचवल्या. 


उद्याचा आमचा ट्रिपचा पाचवा दिवस एकदम निवांत असणार आहे असे दिपकजी यांनी सांगितले. कारण उद्या आम्हाला गंगटोक शहराचे स्थानिक स्थलदर्शन करायचे होते. हे दिवसभराचे स्थलदर्शन करण्यासाठी आम्हाला इनोव्हा गाडी देण्यात आली होती. त्या गाडीच्या ड्रायव्हरचे नाव, गाडीचा व ड्रायव्हरचा नंबर दिपकजी यांनी आम्हाला दिला व सकाळी ९ वाजता ब्रेकफास्ट उरकून आम्हाला तयार राहण्यास सांगितले. उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी म्हणजे ट्रीपच्या सहाव्या दिवशी आम्हाला नथूला खिंडीत (भारत-चीन सीमा) जायचे होते. पण संपूर्ण एप्रिल महिना संपत आला तरी अजूनही एकाही टुरीस्टला यावर्षी नथुला पासचे परमिट लष्कराकडून देण्यात आलेले नाही असे त्यांच्याकडून कळले. तरीही उद्याच्या दिवसात पुन्हा परमिट मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन अशी दिपकजी यांनी ग्वाही दिली. पण जर का नथुला पास लष्करानेच काही अघोषित कारणामुळे बंद ठेवला असेल तर आमचे नथुला पास दर्शन होऊ शकणार नाही याची पुर्वकल्पना देखील दिली. आमच्यापुढे देखील पर्याय नव्हता त्यामुळे जसे होईल तसे पाहू असे म्हणून एकमेकांचा निरोप घेतला व रूमवर परत आलो. लाचेन आणि लाचुंग येथील थंडीला तीन दिवस शरीर चांगलेच सरावले असल्यामुळे आज गंगटोक येथे अजिबात थंडी वाजत नव्हती. दिवसभरात मोबाईलमधे काढलेले फोटो पहाता पहाता कधी झोप लागली ते कळले देखील नाही.


चला सिक्कीम फिरुया - भाग ४ - गंगटोक शहराचे स्थलदर्शन 


@ VINIT DATE – विनीत दाते


पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... 

   

Comments

  1. Nicely captured all movements,feel as though i am also travelling along with you.My memories resurfaced during my visit to sikkim in 2017

    ReplyDelete
  2. अप्रतिम! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत!

    ReplyDelete
  3. Amazing writing. Amazing photography, amazing nature. Amazing detailing. Everything is amazing just superb. If is difficult to decide which one is better nature, your write up or photography. Nice job as usual

    ReplyDelete
  4. 🙏तीनही ब्लॉग वाचले. सिक्कीमची ऐतिहासिक, भौगोलिक व लोकजीवनाबद्दलची माहिती घेऊन छानपैकी प्रत्यक्ष सहल केल्याचा आनंद मिळाला, प्रसन्न वाटले. धन्यवाद!👌👏

    ReplyDelete
  5. अप्रतिम !प्रवासवर्णन खूप छान जमलं आहे अगदी लहान मोठ्या मुद्द्यांसाहित.खूप आवडला लेख.फोटो देखील अगदी सुंदर.दगड ,खडक यांची समाविष्ट असणाऱ्या धातूची ,कुंडाची वैज्ञानिक माहिती तर वाखाणण्याजोगी. खर हे बर्फाळ वातावरण अगदी वेड लावणार असत.वाचून वाटलं ते सांगते ,अभ्यास आणि आनंदपूर्ण सहल अनुभवायला आपण बरोबर जाऊया पुढच्यावेळी सिक्कीमला.मिळून कतोआ आणि अभयारण्य पाहू. वाट पाहतेय स्थळदर्शनाची.

    ReplyDelete
  6. प्रवासवर्णन वाचताना प्रत्यक्ष स्वतःच तिथे असल्याचा अनुभव येतो. फोटो, माहीती व इतर तपशील हा सिक्कीम पाहण्याची ओढ निर्माण करतो. ����������

    ReplyDelete
  7. भारी लिहलय हा सुद्धा भाग इतर 2 भागा प्रमाणे

    ReplyDelete
  8. खूप मस्त लेख आणि फोटोज्

    ReplyDelete
  9. खूपच सुंदर फोटो आणि आपले लिखाण. मजा आली.

    ReplyDelete
  10. Zhakkas re. Nustach pravas nahi tar lihita suddha aala pahije. Best

    ReplyDelete
  11. नेहमी प्रमाणेच अप्रतिम.
    अगदी आपणच प्रवास करत असल्यासारखं चित्र डोळ्यासमोर येते.
    पुढील प्रवास लवकरच घडाव.

    ReplyDelete
  12. ब्लॉग वाचला खुप छान आहे. फोटो पण छान आहे. ब्लॉग शेअर केल्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  13. या तिसऱ्या भागात - उत्तर सिक्कीमची भटकंती : भटकंतीचा ४ था दिवस ज्यात ४ ठिकाणचे वर्णन आले आहे दरी, गरम पाण्याचे झरे, विविध मनोहारी बर्फाची दृश्ये, मराठी बोलणारे सैनिक, आकाशाला भिडणारे हिमनगाचे महाकाय डोंगर , टाटा सुमो ने पार केलेला रस्ता, हिमालयाचे ते रौद्र स्वरूप, खडतर रस्ता, अपरिचित पण मोहक फुले, झिरो पॉईंट चा प्रवास, बर्फाशी खेळण्याच्या गमती जमती, गरम पाण्याच्या झऱ्यांची शास्त्रीय दृष्टीने घेण्यात आलेली माहिती, रंगीबेरंगी झेंडे - पताका, मोबाईल मध्ये घेतलेली सर्वच फोटोस खूपच छान, तेथील विलोभनीय दृश्ये त्यात बरोबर टिपली आहेत. खूपच छान शब्दांकन .... शब्दांकनाला आणि मनमोहक अशी दृश्ये टिपण्यास खरोखर तोड नाही .... केवळ मोबाईल अथवा कॅमेरा हातात असून उपयोग नसतो तर फोटो काढण्यासाठी कोणता अँगल असावा याचे ज्ञान मात्र हवे आणि ते आपणास आहेच आहे हे काही वेगळे सांगणे नाहीच. असो. सर्व काही सर्वोत्तम.

    ReplyDelete
  14. ब्लॉग, फोटो,वर्णन,भाषा सर्वच एकदम भारी!प्रत्यक्ष आपण स्वतःच अनुभवत आहे असेच वाटते.तुमच्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना पण जाऊन आल्याचा आनंद तुमच्या लेखनातून नेहमीच मिळतो.असाच कायम मिळत रहावा !

    ReplyDelete
  15. नेहमी प्रमाणे फारच छान...!

    ReplyDelete
  16. उत्तमच. Sunblindness हा प्रकार माहीतही नव्हता.
    फोटो तर अफलातून!👌👌

    ReplyDelete
  17. सिक्कीमबद्दल परिपूर्ण लेखन🙏

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana