चला सिक्कीम फिरुया - भाग १

सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि आमच्या भ्रमंतीचे नियोजन ...


“केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार”, हे लहानपणी पुस्तकात वाचलेलं एक सुभाषित. आता प्रवास किंवा भटकंती केल्यामुळे चातुर्य येत का नाही ते माहित नाही पण प्रवासाचा अनुभव जीवन समृद्ध करतो हे मात्र खरं. आता तुम्हीच बघा, प्रवास केल्याने सृष्टीची रहस्ये कळतात. निसर्गात किंवा समाजात जे काही उदंड आहे ते समजतं. विविध लोकांशी संवाद साधता येतो. नुसतं पुस्तकात वाचण्यापेक्षा किंवा टीव्हीवर पाहण्यापेक्षा विविध ठिकाणच्या भाषा, भोजन, लोकांच राहणीमान, त्यांच्या चालीरीती, संस्कृति, इतिहास यांची प्रत्यक्ष ओळख होते. छोटे छोटे अनुभव तुमची समज वाढविण्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतात. इतकेच नव्हे तर तुम्ही जेव्हा प्रवासासाठी बाहेर पडता तेव्हा जगाप्रती असलेला तुमचा दृष्टीकोन अधिक उत्क्रांत होतो. वर्षातून एकदा तरी, कोठे तरी पर्यटन केलं तर ताणतणावांना आपण जवळही फिरकू देणार नाही. म्हणूनच रामदास स्वामी देशाटनाचे महत्व विशद करताना लिहितात, 'सृष्टीमध्ये बहु लोक। परिभ्रमणे कळे कौतुक! चुकोनी उदंड आढळते।‘. 


सुदैवाने आम्हा उभयतांची प्रवास आणि भटकण्याची आवड जुळणारी. त्यामुळे विवाहबंधनात अडकल्यापासून ते अगदी आमच्या छकुली अन्विताचा जन्म होईपर्यंत दोघे भरपूर भटकलो. मग पुन्हा अन्विता जेमतेम तीन-चार वर्षाची होईपर्यंत या भटकंतीतून उसंत घेतली खरी पण मग नंतर तिला बरोबर घेऊनच भटकंतीला सुरवात केली. या भटकंतीच्या आवडीतूनच मग महाराष्ट्रातली अगदी कानाकोपऱ्यातली ठिकाणे तर हिंडलोच पण त्याचबरोबर आपल्या भारत देशातील अनेक राज्य देखील पालथी घातली. हिमाचलप्रदेश, जम्मू-कश्मिर, केरळ, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश ते पार कन्याकुमारीपर्यंतचा दक्षिणभारत कधी स्वतःच्या कारने, कधी रेल्वेने तर कधी विमानप्रवास करून पालथा घातला. कधी ग्रुपटूर केली तर कधी कस्टमाईझ्ड पॅकेज टूर केली. कधी अगदी सगळं स्वतःच बुकिंग करून भटकलो. कोस्टल कर्नाटक आणि गुजरातची दहा-अकरा दिवसांची ट्रीप तर अगदी काहीही न ठरवता करून आलो. एकूण काय भरपूर हिंडलो आणि अजून बरचं फिरायच आहे. पण यातून एक लक्षात आलं ते म्हणजे समुद्र, डोंगर, पठारं, बर्फाच्छादित शिखरं, वाळवंट ते गर्द हिरवाईने नटलेली जंगलं अशी सगळी वैशिष्ट्यं दाखवणारा आपला भारत हा एकमेव देश आहे. माझा भारत, अतुल्य भारत!


आपल्या खंडप्राय भारत देशात प्रत्येक भागाचा आणि काही विशिष्ठ स्थळांचा एक खास मोसम असतो. खूप उत्तरेकडील म्हणजे हिमालयातील अति उंचीवरील ठिकाणे वगळल्यास नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ आपल्या देशात कोठेही भटकंती करायला सगळ्यात उत्तम काळ मानला जातो. या काळात तीव्र ऊन आणि पाऊसाचा ताप तसा कमी झालेला असतो तर गुलाबी थंडीची चाहूल पण लागलेली असते. ऑक्टोबरनंतर तर हिमालयातली अनेक ठिकाण बर्फ नसला तरी सरत्या पावसाळ्यात सुंदर हिरवाईने नटलेली असतात. अशा जरा ऑफबीट हंगामात सृष्टीचं रूप काही वेगळंच असतं. पण अतिगर्दीचा हंगाम टाळून अन्य कोणत्या कालावधीत कुठही भटकायला जर का तुम्ही “एक दुजे के लिये” म्हणजे दोघेच असाल तर ठीक आहे. कारण घरात जर का शाळेत जाणार एखादं लहान मुल असेल तर असं कधीही आठ-दहा दिवसांची सुट्टी काढून फिरायला जाण शक्य होत नाही. अश्यावेळी आमच्यासारख्या पालक भटक्यांना मुलांच्या शालेय शैक्षणिक सुट्ट्यांचा विचार करावा लागतो. मुलांच्या परीक्षा आणि त्यांच्या सुट्टय़ा याप्रमाणे पर्यटनाची आखणी करावी लागते. मग राहतात दोनच पर्याय, एक म्हणजे दिवाळीची सुट्टी आणि दुसरी ती उन्हाळ्याची सुट्टी.


दिवाळीच्या सुट्टीत उत्तर भारतातील हिमालयीन प्रदेश वगळल्यास आपल्या देशात कुठही प्रवासाला जाणं एकदम योग्य. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा दक्षिण आणि मध्य भारतातली अनेक राज्य उन्हाने तापलेली असतात आणि तापमानाचा उच्चांग गाठत असतात तेव्हा हिमालयाच्या कुशीत वसलेली काश्मीर, हिमाचलप्रदेश, उत्तराखंड आणि पूर्वांचलातील राज्यात भटकंती करणे हा उत्तम पर्याय होऊ शकतो. यामुळेच आम्ही देखील गेली तीन वर्षे अन्विताच्या या दोन शालेय सुट्ट्यांचा विचार करून भटकंतीला जाण्याचे पर्याय शोधतोय. यात North-East म्हणजे पूर्वांचलातील राज्य पाहण्याचा विचार खूप दिवसापासून डोक्यात होता ज्याचा श्रीगणेशा यावेळी “सिक्कीम” राज्याच्या भटकंतीने केला. त्यामुळे हा ब्लॉग खास सिक्कीमच्या सफरनाम्यावर.


सिक्कीम-दार्जिलिंग सहल काय शेकडो लोक करत असतात. त्याचे प्रवासवर्णन ते काय लिहीणार? आणि ते लिहीलेच तरी ते लोक आवडीने वाचतील का? असे काही प्रश्न ब्लॉग लिहायला सुरवात करण्याअगोदर डोक्यात घोळत होते. पण मग विचार केला कि अनेक लोक सिक्कीम फिरतही असतील, पण सगळेच काही लिहीत नाहीत. शिवाय माझ्या यापूर्वीच्या कोस्टल कर्नाटक भ्रमंतीवर लिहलेल्या ब्लॉगलाही वाचकांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला. (लिंक - https://durgwedh.blogspot.com/2017/12/coastalkarnataka1.html). त्यावेळी काहींनी तर खास फोन करून "तुमच्या कोस्टल कर्नाटकवरील ब्लॉगमुळे आमचा प्रवास अतिशय चांगला झाला. अनेक नवनवीन ठिकाणांची माहिती कळाली" असे अभिप्राय दिले. त्यामुळे सिक्कीमवरील भटकंतीचा देखील असाच ब्लॉग लिहण्याच ठरवलं. तसंही मी जे काही सिक्कीम पाहिलं, त्यापेक्षा पाहण्याच्या दृष्टीने अभ्यासच जास्त केला. त्या सगळ्याचे सार, नव्याने पर्यटनास उद्युक्त होणाऱ्यांना नक्कीच उपयोगी ठरू शकेल असे मला वाटते. होतकरू प्रवाशांना सिक्कीम-दार्जिलिंग ट्रीप ठरवताना काय पाहावे याचा अंदाज आला आणि कधीच तिथे न गेलेल्या व न जाऊ शकणार्‍यांना तिथे काय खास पाहण्यासारखे आहे हे जरी या ब्लॉगमधील माहिती आणि फोटोमुळे समजले तरी या प्रवासवर्णन लिहीण्याचे सार्थक झाले असे मी समजेन.


आता ज्या राज्याची भटकंती आपण करणार आहोत त्या राज्याची ऐतिहासिक, भौगोलिक, प्रादेशिक व सांस्कृतिक माहिती वाचकांना करून देणे मला क्रमप्राप्त वाटते. कारण एखाद्या ठिकाणाचा भूगोल आणि इतिहास माहिती नसेल तर अश्या ठिकाणाला भेट देण्यात काय अर्थ. तशीही ही माहिती अंतरजालावर विविध ठिकाणी उपलब्ध आहेच पण तरीही ती थोडक्यात व एकाच ठिकाणी देण्याचा इथे प्रयत्न करतोय. चला तर जाणून घेऊया सिक्कीम विषयी! 



खरंतर सिक्कीमबद्दल जेवढ लिहावं तेवढ कमीच आहे. केंद्र शासनाने अलीकडेच पूर्वांचलातील सात राज्यात या छोट्या राज्याची देखील भर घातली आहे. निसर्गसौंदर्याचा उत्तुंग अविष्कार म्हणजे सिक्कीम. निरभ्र आकाश, पांढऱ्याशुभ्र कापसासारख्या बर्फाने माखलेली शिखरे, नजर फिरेल तिकडे दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा, गच्च जंगलांनी वेढलेली नागमोडी वळणे, असंख्य कोसळणाऱ्या धबधब्यांनी दुमदुमणाऱ्या खोल दऱ्या, विविध फुलांनी विखुरलेले त्यांचे असंख्य रंग, बौध्द मठांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी अशी निसर्गाची नानाविध रूपे ल्यायलेले सिक्कीम फक्त निसर्गसौंदर्यासाठीच नाही तर साहसी खेळांसाठी देखील प्रसिद्ध आहे. रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग अशा वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा अनुभव सिक्कीममधे घेता येतो. तसेच सिक्कीममधून जगातील तिसऱ्या क्रमांकाचे तर भारत भूमीतील सर्वोच्च शिखर मानल्या जाणाऱ्या कांचनगंगा उर्फ कांग-चेन-जुंगा (उंची ८,५८६ मीटर) तसेच माउंट पंडिम, माउंट सिनिओल्चु, काब्रू, तालुंग अश्या अनेक बर्फाच्छादित शिखरांचे आरोहण केले जाते.


बाराव्या शतकापासून भूतिया या तिबेटी लोकांची स्थलांतरे सिक्कीमच्या प्रदेशात होऊ लागली. तेराव्या शतकापासून आसाममधून आलेल्या लेपचा स्थलांतरितांनी सिक्कीममध्ये वसाहती करण्यास प्रारंभ केला. चौदाव्या शतकात नामग्याल कुळातील लोकांचे या प्रदेशात आगमन झाले. त्यांनी हळुहळू सिक्कीमवर राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. या शतकात सिक्कीम हे नामग्याल कुळातील सत्ताधिशांचे स्वतंत्र राज्य राहिले. १६४१ मध्ये ल्हासाच्या लामाने सिक्कीममधील लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन पेंचु नामग्याल यांना ग्यालपो (राजा) म्हणून गादीवर बसविले. पुढे जवळपास ३३० वर्षे येथे नामग्याल सत्ता राहिली. इ. स. १८१७ मध्ये सिक्कीम ब्रिटिश अंमलाखाली आला. पुढे १९४७ मध्ये ब्रिटिश अंमल गेल्यानंतर ओघाओघाने ब्रिटिशांची सिक्कीममधील जबाबदारी भारताने उचलली. १९५० मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार सिक्कीम हे भारताचे रक्षित राज्य बनले. भारताने सिक्कीमच्या संरक्षण, परराष्ट्रीय धोरण व संदेशवहनाची जबाबदारी घेतली. सिक्कीमच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी भारताने मदत केली. १९७५ मध्ये सिक्कीममधील ९७% मतदारांनी सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्याच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे १६ मे १९७५ रोजी भारताचे बावीसावे घटकराज्य म्हणून सिक्कीम भारतात सामील झाले.


सिक्कीम म्हणजे लिंबू भाषेत "देवभूमी". नेपाळी लोक सिक्कीमला “सुक्खीम” म्हणजे नवे घर तर तिबेटी व लेपच्या जातीचे लोक याला “डेनझोंग” म्हणजे धान्याचे गुप्त कोठार असे म्हणतात. सिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून बौद्ध हा येथील प्रमुख धर्म आहे. त्यानंतर हिंदू धर्मीय बहुसंख्य असून ख्रिश्चन व मुसलमान आदी धर्म फारच थोड्या प्रमाणात आहे. लेपचा, भूतिया व त्साँग हे येथील प्रमुख वांशिक गट आहेत. येथे सिक्कीमी, नेपाळी, लेप्चा, भुतिया, लिंबू अश्या भाषा बोलल्या जात असल्या तरी स्थानिक लोक व्यवहारासाठी नेपाळी भाषेचा सर्वात जास्त वापर करतात तर पर्यटकांबरोबर बोलताना हिंदी भाषा वापरली जाते.



सिक्कीम हे काही फार मोठे राज्य नाही. अगदी छोटेसे राज्य आहे. किती छोटे? तर देशातील सर्वांत छोट्या राज्यांमधले शेवटून दुसरे असणारे राज्य. वर दिलेल्या नकाशाकडे अगदी वर-वर जरी पहिले तरी कोणालाही सिक्कीमचे भारताकरता असलेले भू-राजकीय महत्व समजून येईल. पूर्वेला भूतान, पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला चीन आणि दक्षिणेला बांगलादेश असलेला हा भारत-सिक्कीमचा भूभाग. ईशान्य भारत आणि उर्वरीत भारत हा सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या अत्यंत चिंचोळ्या भूपट्टीने जोडला गेलेला आहे. त्यामुळे तीन आंतरराष्ट्रीय सीमांच्या कोंदणात वसलेलं सिक्कीम हे राज्य लष्करी व राजकीय दृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराचे तेथे मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. येथील रस्त्यांची व्यवस्था देखील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) म्हणजे सैन्यातर्फेच पाहिली जाते. 


हिमालयातील स्थानामुळे सिक्कीमच्या प्राकृतिक रचनेत टोकाची तफावत आढळते. येथील पायथ्याच्या प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची उंची किमान ३०० मीटर असून ती कमाल ८,५९८ मीटर (कांजनगंगा) पर्यंत वाढत गेलेली आहे. सिक्कीमला पश्चिम, उत्तर व पूर्व अशा तिन्ही दिशांच्या पर्वतश्रेण्यांनी वेढलेले असून त्यामुळे सिक्कीमचा सर्वसाधारण आकार घोड्याच्या नालेसारखा दिसतो. डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे वगैरे आपत्तींना सिक्कीममधील रहिवाशांना नेहमीच सामोरे जावे लागते. हिमालयीन शिवालिक पर्वतराशींच्या पट्टीतील रंगीत आणि तिस्ता या दोन नद्यांच्या खोर्‍यात (पाणलोट क्षेत्रात) सिक्कीम वसलेले आहे. हे राज्य ७,३०० वर्ग किलोमीटर भूभागावर विस्तारलेले असून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा चार जिल्ह्यांमधे ते विभागलेले आहे. पूर्व (EAST SIKKIM) जिल्ह्याचे मुख्यालय तसेच संपूर्ण राज्याची राजधानी गंगटोक आहे. सिक्कीमचा उत्तर (NORTH SIKKIM) जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असून त्याचे मुख्यालय मंगन इथे आहे. पश्चिम (WEST SIKKIM) जिल्ह्याचे मुख्यालय गेयझिंग येथे असून दक्षिण (SOUTH SIKKIM) जिल्ह्याचे मुख्यालय नामची येथे आहे. 


एकीकडे कांचनगंगासारखी बर्फाच्छादित हिमशिखरे तर दुसरीकडे डोळ्यांचे पारणे फेडायला लावणारी विविध प्रकारची फुले अशा दोन्ही टोकाच्या गोष्टी सिक्कीममध्ये आहेत. जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील (हॉटस्पॉट) परिसरांपैकी सिक्कीम हे एक मानले जाते. उंच प्रदेशात आढळणाऱ्या सुमारे ५,००० पेक्षा अधिक जातीच्या सपुष्प वनस्पती या एका लहानशा राज्यात सापडतात. विविध प्रकारचे ओक, पाइन, फर, स्प्रूस, सिमल, साल, बांबू, प्रिम्यूला इ. वनस्पती प्रकार येथे आहेत. दुर्मिळ कस्तुरीमृग, याक, अस्वल, बर्फातला चित्ता, निळ्या मेंढ्या, रेड पांडा असे १५० प्रकारचे नानाविध प्राणी, अनेक प्रकारचे पक्षी, विविध रंगांची फुलपाखरे या राज्यात दिसतात. इतकंच काय तर ३६२ जातीचे नेचे, ५५० पेक्षा अधिक जातीचे ऑर्किड व ३६ जातीच्या ऱ्होडोडेंड्रॉन वनस्पती येथे आढळतात. भारतामधे होणाऱ्या एकूण फुलांच्या उत्पादनापैकी एकत्रीतीयांश फुले एका सिक्कीममधे आहेत. त्यामुळे सिक्कीमला फुलांचा प्रदेश तर ऑर्किडचे राज्य असे देखील म्हणले जाते. आणि हो, ही अजिबात अतिशयोक्ती वगैरे नाही बरं. येथे प्रत्येक घराच्या अंगणात विविध प्रकारची फुलझाडे लावलेली तुम्हाला दिसतील. प्रत्येक घराचे आंगण म्हणजे जणू काही एक छोटी नर्सरीच असते. एखादं छोट दुकान जरी असलं तरी त्यासमोर विविध रंगांची फुलझाडं लावलेली असतात. आणि हे सगळं कमी म्हणून कि काय, सिक्कीम हे सेंद्रिय शेतीसाठी केवळ आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अग्रेसर आहे. संयुक्त राष्ट्रांनी सिक्कीम राज्याला जगातलं पहिलं Organic State हा बहुमान प्रदान केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचा ‘फ्युचर पॉलिसी गोल्ड' पुरस्कार सिक्कीमला मिळाला आहे जे हरितक्षेत्रातले ऑस्कर मानले जाते. आहे की नाही मुर्ती लहान पण किर्ती महान!


हिमालयाच्या कुशीत वसलेले असले तरी सिक्कीममधील हवामान हे समशीतोष्ण आहे. बंगालची खाडी आणि दक्षिणेकडील मान्सूनच्या प्रभावामुळे येथील बराचश्या प्रदेश्यात आर्द्रता जाणवते. त्यामुळे येथे वर्षभर सर्वच ऋतूत कधीही पाऊस पडतो. एवढेच काय तर उत्तरेकडील अतिउंचीवरील म्हणजे १२,००० फुटावरील अनेक ठिकाणी उन्हाळ्यात देखील हिमवर्षाव होतो. पण सर्वसाधारणपणे सिक्कीममधे डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीन महिने अतिथंडीचे, मार्च ते जुन महिन्याचा पूर्वार्ध हे उन्हाळ्याचे, जुन ते सप्टेंबर हे अतिपावसाचे तर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हे महिने सरत्या पावसामुळे हिरव्यागार झालेल्या शरद ऋतूचे असतात. यात मार्च ते मे किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर हे महिने सिक्कीमला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. कारण या काळात येथील उत्तरेकडील अतिउंचीवरील तापमान हे साधारण २°c ते १२°c इतके असते तर दक्षिणेकडील अगदी खालच्या भागातील तापमान १४°c ते २६°c असते. त्यामुळे सिक्कीमला भेट देताना ऋतूनुसार आणि अतिउंचीवरील ठिकाणानुसार स्वेटर, जर्किन, थर्मल, कानटोपी, हातमोजे असे योग्य ते गरम कपडे बरोबर ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या प्रदेशात वर्षभर कधीही पाऊस पडत असल्याने येथे फिरताना एखादी छत्री किंवा वॉटरप्रुफ जर्किन बरोबर ठेवणे योग्य.  


सिक्कीमची भ्रमंती करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे हे राज्य खूप स्वच्छ आहे. इथली गावं छोटी असली तरी स्वच्छ आणि नीटनेटकी आहेत. कुठेही बोकाळलेली वस्ती नाही, कचरा नाही की कसली घाण नाही. डोंगर-घाटावर असून देखील एखाद्या मेट्रो सिटीला मागे टाकेल असे सिक्कीम राज्य आहे. अगदी वाहतुकीच्या नियमांपासून ते दुकानांच्या जागांपर्यंत सगळं काही व्यवस्थित ठरलेलं. मुळातच लोकसंख्या कमी असल्यामुळे गाड्या कमी, शिवाय डब्यातून ओसंडून वाहणारा कचरा सिक्कीम शहरात कुठेच पाहायला मिळत नाही. तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुकारलेल्या "स्वच्छ भारत" सर्वेक्षणात सिक्कीम राज्य शंभर टक्के स्वच्छतेच्या सुविधा देणारे पहिले राज्य ठरले आहे. २०१६ साली झालेल्या सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ राज्य म्हणून सिक्कीमची निवड करण्यात आली. यात आरोग्य आणि स्वच्छतेच्या निकषांत पहिल्या दहा जिल्ह्यांत सिक्कीमच्या चार जिल्ह्यांनी स्थान पटकावले आहे. येथे कोणीही उघड्यावर लघवी किंवा शौच करताना आढळत नाही आणि त्याबाबतचे नियमही फार कडक आहेत. येथे उघड्यावर लघवी अथवा शौच करताना आढळल्यास मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जाईल अश्या धमकीवजा सूचना सर्व ठिकाणी लिहलेल्या दिसतात. येथे प्रत्येक थोड्या अंतरावर तसेच प्रत्येक पर्यटनस्थळावर उत्तम सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे आणि पर्यटकांनी देखील त्याचाच उपयोग करावा यासाठी लोक आग्रही असतात. हे सगळं कमी कि काय म्हणून सिक्कीम हे प्लास्टिकबंदीच देखील रोल मॉडेल आहे. आपल्या राज्याला निसर्गाने जे काही भरभरून दिलेलं आहे त्याचं संवर्धन करण्यासाठी हिमालयातील फक्त काही लाख लोकसंख्या असलेल्या या राज्याने १९९८ साली प्लास्टिकबंदीच्या दृष्टीने पाहिले पाऊल उचललेले होते. येथे मोठ्या प्रमाणावर बाहेरील राज्यातील पर्यटक येत असले तरीही चिप्स किंवा बिस्कीट खाऊन किंवा पाणी पिऊन रस्त्यावर फेकलेली पाण्याची बाटली आणि पाकीट फारशी कुठे दिसणार नाहीत. सिक्कीमच्याउत्तरेकडील जिल्ह्यात तर पूर्णपणे प्लास्टिकबंदी राबवली जाते. येथे पाण्याची प्लास्टिक बाटली विकतही मिळत नाही किंवा पर्यटकांना अशी सिंगल युज प्लास्टिक बाटली घेऊन जायला परवानगी देखील नाही. बघा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देणारं एवढसं सिक्कीम राज्य हे करू शकत आणि आपण?


चला तर आता सिक्कीमला पोहोचायचं कसं ते पाहू. पर्वतीय क्षेत्रात वसलेलं असल्याने सिक्कीमला ना स्वतःच विमानतळ ना एखादं रेल्वेस्टेशन. त्यामुळे सिक्कीममधील सगळ्यात महत्वाचे राजधानीचे शहर असणारे गंगटोक गाठण्यासाठी सुद्धा आपल्याला शेजारील पश्चिम बंगाल या राज्यावर अवलंबून रहावे लागते. तसं म्हणायला नुकतच म्हणजे सप्टेंबर २०१८ मधे तत्कालीन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते गंगटोकजवळ "पॅक्याँग" येथे एका विमानतळाच उदघाटन झालय, पण ते अजून फारसं वापरात नाही. सध्या तरी तिथं कलकत्त्यावरून दिवसातून फक्त दोन-तीन विमान उतरतात आणि उड्डाण करतात. त्यामुळे सिक्कीमला जर का हवाईमार्गाने पोहोचायचे असेल तर पश्चिम बंगाल राज्यातील नजीकचे विमानतळ म्हणजे बागडोगरा. हा हवाईअड्डा देशातील इतर मोठ्या शहरांशी हवाईमार्गाने जोडलेला आहे. आता ज्यांना रेल्वेमार्गाने जायचे असेल त्यांना देखील पश्चिम बंगाल राज्यातीलच नजीकचे रेल्वेस्थानक न्यू-जल-पैगुडी स्टेशनचाच पर्याय धरावा लागतो. ही दोन्हीही ठिकाणे दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलिगुडी शहरानजीक आहेत. ज्यांना रेल्वेने आधी कोलकाता मग पुन्हा तिथून न्यूजलपाईगुडी आणि पुन्हा तिथून गाडीमार्गाने गंगटोक हा प्रवास कंटाळवाणा वाटत असेल त्यांनी विमानाने थेट गंगटोकजवळील बागडोगरा गाठावं आणि तिथून गंगटोकला गाडीमार्गाने जावं हे उत्तम. गंगटोकपासून बागडोगरा व न्यूजलपैगुडी ही दोन्ही ठिकाणे सारख्याच म्हणजे १२५ किमी अंतरावर आहेत. आता ज्यांना बागडोगरा ते गंगटोक हा गाडी प्रवास देखील टाळायचा आहे त्यांच्यासाठी "सिक्कीम पर्यटन निगम" यांच्यामार्फत बागडोगरा विमानतळावर हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध आहे. प्रतीव्यक्ती ३५००/- रुपयांचे तिकीट काढून बागडोगरा ते गंगटोक हा १२५ किमीचा प्रवास तुम्ही फक्त ३० मिनिटांत पूर्ण करू शकता. ही हेलिकॉप्टरची उड्डाणे मुंबई, दिल्ली व कलकत्ता येथून येणाऱ्या विमानांच्या वेळांशी संलग्न असतात. दुपारी १ ते ३ दरम्यान गंगटोकसाठी हेलिकॉप्टरचे उड्डाण असते. 


बाकी पूर्वी सांगितल्याप्रमाणे सिक्कीम हे तीन बाजूंनी आंतरराष्ट्रीय सीमांनी बंदिस्त असल्यामुळे येथील बऱ्याच अति-अंतरंगातील, किंबहुना सीमेलगतच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांना खास परवाना पत्र (SPECIAL PERMIT) काढावे लागते. पण सिक्कीम राज्याने पर्यटनस्नेही धोरण स्वीकारलेले असल्यामुळे काही महत्वाच्या कागदपात्रांची पूर्तता करून असे परमीट पर्यटकांना गंगटोक येथील सिक्कीम टुरिझम डिपार्टमेंटच्या (STDC) मुख्यालयातून अथवा अधिकृत ट्रॅव्हल एजंटकडून मिळवता येते. याबाबतच्या अधिक माहितीसाठी कृपया सिक्कीम टुरिझम डिपार्टमेंटच्या वेबसाईटला भेट द्यावी (लिंक - http://www.sikkimstdc.com/index.html). 


सिक्कीमच्या उत्तरेकडील अतिउंचीवरील दुर्गम भाग सोडल्यास पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम सोयीसुविधा देणारी अनेक हॉटेल्स सिक्कीमच्या गंगटोक, नामची, पेलिंग या शहरात उपलब्ध आहेत. मात्र लाचेन, लाचुंग, झुळूक अश्या दुर्गम भागात फक्त निवास व भोजन अश्या माफक सुविधा देण्याऱ्या “होम स्टे”वर पर्यटकांना समाधान मानावे लागते. एप्रिल व मे हा येथील पर्यटनाचा मुख्य सीजन. त्यामुळे तुम्ही जर का पर्यटनाचा मुख्य सीजन असणाऱ्या याच दोन महिन्यात सिक्कीमच्या सहलीला जाणार असाल तर सर्व ठिकाणच्या हॉटेल्सचे आगाऊ आरक्षण केलेले उत्तम. 


बाकी या राज्यात अंतर्गत फिरण्यासाठी तुम्हाला छोट्या गाड्यांवरच अवलंबून रहावे लागते. इथे मोठय़ा बस किंवा ट्रक फारश्या दिसत नाहीत. याला अपवाद म्हणजे फक्त सिलीगुडी ते गंगटोक (NH 31A) या राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या सिक्कीम नॅशनलाझ्ड ट्रान्सपोर्ट (SNT) च्या छोटया ३०-३२ सीटर बसेस. बाकी इथे फिरण्यासाठी जीप, सुमो, इनोव्हा, झायलो यासारखी छोटी वाहनेच उपलब्ध असतात. त्यातही सिक्कीममधे भटकंतीला जाताना स्वतःची गाडी घेऊन न गेलेलच बरं. याच कारण म्हणजे एकतर हा सर्व पर्वतीय प्रदेश, येथील रस्ते सततच्या पावसाने व दरडी कोसळण्यामुळे खराब झालेले, त्यात ते अत्यंत अरुंद व वळणावळणाचे. त्यामुळे इथले स्थानिक चालकच या रस्त्यांवरून गाडय़ा चालवू जाणे. त्यात तुम्ही जर का सीमेलगतच्या ठिकाणांना भेट देणार असाल तर या गाड्यांचा देखील वेगळा परवाना (permit) घ्यावा लागतो. 


आमच्या सिक्कीम भटकंतीचा रोडमॅप (कच्चा नकाशा अंतरासह)


थोडक्यात, जर का प्रवासासाठी लागणारी गाडी, निवासव्यवस्था आणि सीमावर्तीभागात जाण्यासाठी लागणारे विविध परवाने या सगळ्या गोष्टींच्या वेगवेगळ्या आरक्षणाचा मानसिक त्रास वाचवायचा असेल तर सिक्कीममधील एखाद्या स्थानिक ट्रॅव्हल एजंटकडून तुम्ही या सर्व गोष्टी एकत्र बुक (पॅकेज) करू शकता. त्यासाठी तुम्ही वर दिलेल्या सिक्कीम टुरिझम डिपार्टमेंटच्या वेबसाईटला भेट देऊन गंगटोक येथील अधिकृत ट्रॅव्हल एजंटची नावे व संपर्क क्रमांक मिळवू शकता. हे ट्रॅव्हल एजंट आपल्या वैयक्तिक इच्छेनुसार व बजेटनुसार Standard, Deluxe व Luxury असे वेगवेगळे पॅकेज आपल्याला देतात. मग आपण निवडलेल्या पॅकेजनुसार राहण्याची स्टार कॅटेगरी हॉटेल्स, प्रवासासाठी वाहनाची व्यवस्था व विविध ठिकाणी जाण्यासाठी लागणारे परमिट यांची व्यवस्था केलेली असते.  


आपल्या महाराष्ट्रीयांचे आपला प्रांत सोडल्यास बाकी ठिकाणी खाण्यापिण्याचे थोडे हाल होतात हा माझा आत्तापर्यंतच्या भटकंतीमधला अनुभव. याच कारण म्हणजे महाराष्ट्रातल्या अगदी कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, इथं एकाच हॉटेलमधे तुम्हाला इडली-डोसा अश्या साउथ इंडियन पदार्थापासून ते अगदी नॉर्थ इंडियन, चायनीज असं काय वाट्टेल ते वाट्टेल त्यावेळी खायला मिळू शकतं. पण हे असं सगळं एकाच ठिकाणी खायला मिळणं उत्तर भारतातील पहाडी प्रदेशात थोडं अवघड असतं. एकतर येथे पहाडी प्रदेश असल्यामुळे रस्त्यात आजूबाजूला असणारे हॉटेल्स कमी. त्यातून जरी एखाद हॉटेल दिसलच तर तिथं फक्त आलूपराठे, अंडी, ऑम्लेट आणि मॅगी ह्याच गोष्टी मुख्यत्वे करून मिळणार. आता हे सगळ इथं सांगायचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टीला सिक्कीम राज्य देखील फारसे अपवाद नाही. त्यामुळे निवासासाठी हॉटेल्स बुक करताना त्यातच सकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण समाविष्ठ करून घेणे योग्य. म्हणजे किमान ते तरी वेळेवर व आपण सांगू तसे थोड्याफार बदलाने मिळू शकते. नाहीतर दिवसभर फिरताना तुम्हाला जेवायला चांगली हॉटेल्स मिळण थोडं अवघडच. त्यातूनही दिवसभर पर्यटनस्थळांची भटकंती करताना किंवा प्रवासा दरम्यान एखाद हॉटेल दिसलच तरी त्यात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच पाच-सहा पदार्थच मिळणार. येथील खाण्याचे बहुतेक पदार्थ हे नुडल्सपासून बनवलेले असतात. याशिवाय रोजच्या जेवणात कोबी, फ्लॉवर व बटाट्याचा जास्त उपयोग होतो. मोमोज हा खास तिबेटी खाण्याचा पदार्थ सिक्कीममधे सगळीकडे मिळतो. मोमो म्हणजे खास कोकणस्थ ब्राम्हणी पदार्थ असणाऱ्या उकडीच्या मोदकासारखा. यात उकडीच्या मोदकासारखेच सारण भरलेले असते. व्हेज मोमो असतील तर त्यात चीज, लसून, आलं याबरोबर कोबीचे स्टफिंग असते तर नॉनव्हेज मोमोमधे चिकन अथवा मटणाचे स्टफिंग असते. मोमोचा आकार आतील सारणानुसार मोदक किंवा करंजीसारखा बदलतो. एका प्लेटमधे साधारण ८ मोमोज व त्याबरोबर एक खास लाल चटणी देतात. पण ट्रीपच्या सुरवातीला मॅगी, अंडी, थुक्पा, चौमीन नुडल्स, वायवाय नुडल्स, मोमोज, बांबू-शूट-राईस अश्या वेगवेगळ्या तिब्बती पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आपण कितीही उत्सुक असलो तरी चार-पाच दिवसानंतर तेच तेच पाच-सहा पदार्थ पुन्हा पुन्हा खाऊन कंटाळा यायला लागतो. त्यामुळे सिक्कीमला भटकंतीला जाताना दिवसभर खायला चिवडा, लाडू, फरसाण, खाकरा, चकली असा भरपूर कोरडा खाऊ बरोबर घेऊन जावे हे उत्तम. 


आता इतकं सगळ वाचल्यानंतर जर का तुम्ही सिक्कीमची सहल करायची ठरवली असेल तर संपूर्ण सिक्कीम म्हणजे या राज्यातील पूर्व (EAST), पश्चिम (WEST), उत्तर (NORTH) आणि दक्षिण (SOUTH) अश्या चारही जिल्ह्यातील महत्वाची ठिकाणं बघायला कमीत कमी ८-९ दिवसांची निवांत सवड काढायला हवी. पण ज्यांना उत्तर व पूर्व सिक्कीम जिल्ह्यातील अतिउंचीवरील ठिकाण टाळायची आहेत त्यांना इतर सिक्कीमची भटकंती करायला ५-६ दिवस देखील पुरेसे आहेत. पण खरं सांगू? सिक्कीमच्या उत्तरेकडील अतिउंचीवरील भाग हा नितांत सुंदर आहे त्यामुळे “नॉर्थ सिक्कीम नही देखा तो क्या सिक्कीम देखा” असं काहीसं होऊन जातं. तसेही उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल-मे च्या सीजनमधे सिक्कीममधे आलात तर फक्त याच परिसरात तुम्हाला बर्फ बघायला मिळू शकतो. बाकी बरेच पर्यटक सिक्कीम बरोबरच शेजारच्या पश्चिम बंगाल राज्यातील “क्विन ऑफ हिलस्टेशन” मानल्या जाणाऱ्या दार्जिलिंगला देखील भेट देतात. एका अर्थाने ते सोयीचे देखील आहे म्हणा, कारण दार्जिलिंग किंवा सिक्कीम दोन्हीला भेट देण्यासाठी जवळचे विमानतळ हे बागडोगराच आहे. परंतु सिक्कीमच्या सहलीत दार्जिलिंगचा देखील समावेश करायचा झाल्यास आणखी दोन दिवस वाढवावे लागतात.


तर ही झाली सिक्कीम विषयीची प्राथमिक माहिती. अश्याप्रकारे इंटरनेटवर शोधाशोध करून सिक्कीमबद्दल बरीचशी माहिती गोळा केली व त्यानुसार काय काय पहायचे आणि कोठे राहायचे याविषयीचा ११ दिवसांचा सिक्कीम व दार्जिलिंग भ्रमंतीचा एक प्लान मी तयार केला तो येथे खाली देत आहे. हाच प्लान मग मी गंगटोक येथील एका ट्रॅव्हल एजंटला दिला व माझ्या गरजेनुसार निवास, भोजनव्यवस्था, प्रवासासाठी गाडी आणि इनरलाईन परमीट्स या सगळ्याचे नियोजन करण्यासाठी OMEGA TOURS and TRAVELS यांच्याकडून रीतसर customized पॅकेज घेतले. या टूर कंपनीचे व्यवस्थापक श्री. दीपक कुमार नेचाली-राय यांनी माझ्या नियोजनानुसार सर्व हॉटेल्स बुक केली व बागडोगरा येथे विमानातून उतरल्यापासून ते पुन्हा ११ व्या दिवशी बागडोगरा विमानतळावर सोडण्यापर्यंत इनोव्हा गाडीची व्यवस्था केली. (येथे मी कोणत्याही ट्रॅव्हल एजंटची जाहिरात करत नाही कारण वर सिक्कीम टुरिझम डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर नावे असलेले सर्व अधिकृत ट्रॅव्हल एजंट थोड्याफार फरकाने सारखेच पॅकेज व हॉटेल्स ऑफर करतात). 


दिवस पहिला: 

==========

पुणे/मुंबई येथून विमानप्रवासाने प्रयाण आणि बागडोगरा येथे आगमन

बागडोगरा (सिलीगुडी) ते गंगटोक = १२५ किमी

गंगटोक येथे मुक्काम (५४१३ फुट)


दिवस दुसरा: (पुर्व सिक्कीम)

====================

गंगटोक ते लाचेन  = १०७ किमी

स्थळदर्शन: बटरफ्लाय वॉटरफॉल, शांघिक व्ह्यूपॉइंट, नागा वॉटरफॉल 

लाचेन येथे मुक्काम (९५०० फुट)


दिवस तिसरा: (उत्तर सिक्कीम)

======================

लाचेन ते गुरुडोंग्मार ते लाचुंग = १८० किमी

स्थळदर्शन: लाचेन मॉनेस्ट्री, गुरुडोंग्मार लेक, भीम नाला वॉटरफॉल उर्फ अमिताभ बच्चन वॉटरफॉल

लाचुंग येथे मुक्काम (८८०० फुट)


दिवस चौथा: (उत्तर सिक्कीम)

=====================

लाचुंग ते झिरो पॉईंट ते गंगटोक = २०० किमी

स्थळदर्शन: झिरो पॉईंट, युमथांग व्हॅली, हॉट स्प्रिंग

गंगटोक येथे मुक्काम (५४१३ फुट)


दिवस पाचवा: (पुर्व सिक्कीम)

=====================

गंगटोक स्थळदर्शन 

M.G. रोडला फेरफटका आणि खरेदी

गंगटोक येथे मुक्काम (५४१३ फुट)


दिवस सहावा: (पुर्व सिक्कीम)

==================== 

गंगटोक ते झुळूक = ९० किमी

स्थळदर्शन: छांगु लेक, नथुला खिंड, नवीन बाबा हरभजनसिंग मंदिर, एलीफंट लेक, जुने बाबा हरभजनसिंग मंदिर, थांबी व्ह्यूपॉइंट

झुळूक येथे मुक्काम (१०,००० फुट)


दिवस सातवा: (दक्षिण सिक्कीम)

=======================

झुळूक ते नामची = १०७ किमी

स्थळदर्शन: साम्दुर्स्ते (गुरु रेन्पोचे पुतळा), चारधाम (सोलोपोख), साई मंदिर

नामची येथे मुक्काम (५५०० फुट)


दिवस आठवा: (पश्चिम सिक्कीम)

=======================

नामची ते पेलिंग = ७० किमी

स्थळदर्शन: रवांग्ला बुद्धा पार्क, रबदेन्त्से रुइंस, पेमयांग्त्से मोनास्ट्री, संगचुलिंग मोनास्ट्री / चेंरेजिंग पुतळा, स्कायवॉक

पेलिंग येथे मुक्काम (७००० फुट)


दिवस नववा:

==========

पेलिंग ते दार्जिलिंग = ७५ किमी

दार्जिलिंग मॉल रोड फेरफटका व खरेदी

दार्जिलिंग येथे मुक्काम (६७०० फुट)


दिवस दहावा:

==========

दार्जिलिंग स्थळदर्शन

सायंकाळी दार्जिलिंग मिनी टॉय ट्रेनची सफर

दार्जिलिंग येथे मुक्काम


दिवस अकरावा:

============

दार्जिलिंग ते बागडोगरा (सिलीगुडी) = ७० किमी 

बागडोगरा येथून विमानप्रवासाने प्रयाण आणि पुणे/मुंबई येथे आगमन


तर वाचकांनो, ब्लॉगच्या या भागात तुम्हाला सिक्कीमबद्दलची भरभरून माहिती मिळाली असेल अशी आशा करतो. आता ब्लॉगच्या पुढच्या भागात आपण प्रत्यक्ष सिक्कीमच्या भटकंतीला सुरवात करू. या भटकंतीचा पुढचा म्हणजे दुसरा भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा.


चला सिक्कीम फिरुया - भाग २ ... सिक्कीमला प्रस्थान आणि उत्तर सिक्कीमची भटकंती ==> लाचेन व गुरुडोंगमार सरोवर


@ VINIT DATE – विनीत दाते

 

पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... 

Comments

  1. लेखन नेहमी प्रमाणे च खूप छान आणि सविस्तर !! प्रत्येकाला पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त अशी माहिती 👍

    ReplyDelete
  2. माहितीपूर्ण लिखाण ��

    ReplyDelete
  3. विनीत खुप सुंदर लिहीलेस छान पुढचा भाग लवकर लिही

    ReplyDelete
  4. Really very nice information....Thank you Vinit Sir for sharing your experience....Helpful information and superb writing...

    ReplyDelete
  5. superbly written as always....waiting for the next one sir!!!

    ReplyDelete
  6. विनीत अत्यंत परिपूर्ण आणि नेमकं वर्णन, सिक्कीम भेटीची उत्सुकता वाढीस लागलीये, आपण इथे दिलेली माहिती अनेकांना उपयोगी पडेल, हृदयपूर्वक धन्यवाद!

    ReplyDelete
  7. विनीत अत्यंत परिपूर्ण आणि नेमकं वर्णन, सिक्कीम भेटीची उत्सुकता वाढीस लागलीये, आपण इथे दिलेली माहिती अनेकांना उपयोगी पडेल, हृदयपूर्वक धन्यवाद!

    ReplyDelete
  8. विनीत,अगदीच अभ्यासपूर्ण आणि माहितीवजा मार्गदर्शन!मस्तच!!
    आता येऊ दे पुढचा भाग..

    ReplyDelete
  9. Very interesting and detailed information. Too good.

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर वर्णन.. लगेच बॅग भरावी आणि सिक्कीम ला प्रयाण करावं असं वाटतं.. असेच खूप खूप फिरा आणि अशीं सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा..

    ReplyDelete
  11. एक नंबर ब्लॉग, सर्व सिक्कीम अगदी डोळेसमोर उभे राहिले, डिटेल माहिती, एकदा हा ब्लॉग वाचला तर निवांत सिक्कीम का जावू शकतात, काही नवीन प्लॅनिंग करायची गरज नाही, सुंदर लिखाण - संदीप जोशी

    ReplyDelete
  12. मी यामधील 80 % प्रदेश पाहून आलो आहे, ब्लॉग वाचल्याने काही आठवणी आल्या, नियोजन चांगले केले आहेस !

    ReplyDelete
  13. Vikas Deshpande01 June, 2019 15:57

    खूपच छान वर्णन अगदी स्वतः प्रवास करतोय असच वाटतं.
    अभिनंदन व पुढील लेखनासाठी शुभेच्छा

    ReplyDelete
  14. My goodness so much of sorted information..kiti efforts ghetle astil blog lihnya karita te distay yaat...kudos !!

    ReplyDelete
  15. Waah...mastach Vinit ����������������������������������������

    ReplyDelete
  16. खूप सुंदर लिखाण आणि वर्णन

    ReplyDelete
  17. Uttam blog Date Saheb. Pudhcha bhag yeudya lavkarach

    ReplyDelete
  18. छान... उपयुक्त माहिती ��

    ReplyDelete
  19. एकदम सविस्तर व खुलासेदार लिखाण केले आहे विनित. वाचताना तुम्ही सिक्कीम दौर्‍याची केलेली तयारी दिसून आली. सिक्कीमला फुलांचा देश म्हणतात, माहीत नव्हते. मस्तच. - भगवान चिले

    ReplyDelete
  20. अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण लेख आम्हा दोघानाही खुप आवडला. - पंकज

    ReplyDelete
  21. व्वा व्वा व्वा! अत्योकृष्ट! मी चारही भाग फिरलेय, पण तुम्ही फारच बारकाईने सगळे फिरलात असे दिसतेय. पुढच्या ब्लॉगमधे प्रत्यक्ष ठिकाणांना भेट देतांना खूप मजा येईल. आतुरतेनं वाट बघते.

    ReplyDelete
  22. प्रवास का करावा इथपासून सुरू झालेला प्रवास तुमच्या तिघांची जमलेली भटकंतीची भट्टी, प्रवासाची योग्य वेळ, योग्य ठिकाण, ज्या भागात भटकंती केली त्याची ऐतिहासिक, भौगोलिक, प्रादेशिक व सांस्कृतिक सविस्तर माहिती , फिरण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या , खाद्य संस्कृती आणि अखेर दिवसागणिक केलेला परफेकट प्लॅन
    सगळं कसं एकदम क-ड-क
    मिस्टर पर्फेक्टनिष्ट दाते
    तुमच्या पहिल्या अभ्यासपूर्ण ब्लॉगचे नाणे एकदम खणखणीत वाजलंय.


    ReplyDelete
  23. सर मस्त झालाय ब्लॉग. तपशीलवार माहिती दिलीय, भविष्यात कधी सिक्कीमला गेलो तर या ब्लॉगचा नक्कीच फायदा होईल.
    पुढचा भाग येउद्या लवकरच...

    ReplyDelete
  24. agadi mast detailed mahiti dili aahes :)
    ek suggestion mhanje tu antar lihila aahes tya sobat wel kiti lagla (tasan madhe) hey pan namud karu shaktos. karan chotya rastyamule antar kami disla tari wel matra duppat lagato.

    ReplyDelete
  25. विनीतजी, सुरुवात छानच केली आहे आणि रामदास स्वामींच्या श्लोकाचा उल्लेख देखील ! माझा भारत अतुल्य कसा आहे हे पण तुम्ही पटवून दिले आहे. भटकंती करण्यास नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी योग्य कसा आहे हे पण आपण सांगितले आहे. सिक्कीम दार्जिलिंग भटकंती.... त्याचा सविस्तर अभ्यास करून त्यात इतिहास पण सनावळी सहित दिला आहे. लिखाणाची शैली ओघवती असल्यामुळे नक्कीच वाचतंच पुढे जावे वाटते. खरोखर " सिक्कीम - मूर्ती लहान पण कीर्ती महान " आहे हे आपल्या लिखाणावरून पटले आहे. तेथे जाण्यासाठी तेथील पर्यावरण, सोयी सुविधा, वाहने या सर्वच गोष्टींचा मागोवा या ब्लॉग मध्ये आलेला आहे. त्यामुळे प्रथमच जाणाऱ्यांना खूपच उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे नक्कीच जाण्याचा बेत अखवासा वाटतो. तेथील वर्णन समर्पक, वाचनीय आणि बारकावे त्यात आपण दिले आहेत. नेहमीच्या ब्लॉग प्रमाणे यात देखील खूपच उपयुक्त अशी माहिती असल्यामुळे जाणारांचा मार्ग आपण या ब्लॉगद्वारे सुकर केला आहे. आपण उभयता आणि सुकन्या ... अण्विता "त्या पोशाखात" छान दिसत आहेत. अश्या या छान ब्लॉग लिखाणाबद्दल आपले अभिनंदन आणि मित्र असल्याचे खूपच कौतुक देखील आहेच. पुढील ब्लॉगच्या प्रतीक्षेत आहेच ......

    ReplyDelete
  26. दादा सर्व माहिती नेहमी प्रमाणे खूपच छान आणि सविस्तर पणे मांडली आहे. सिक्कीमला (नॉर्थइस्ट) जायची उत्सुकता वाढली आहे आता. सुरवातीला टाकलेला फॅमिली फोटो मस्त.

    आणि हो टेक केअर ऑफ युर लेग ��

    ReplyDelete
  27. ब्लॉग कसा लिहावा हे तुमच्या ब्लॉग लिखाणातून शिकावं. एकही aspect राहून गेलाय अस जाणवत नाही. एकदम परिपूर्ण आणि सर्वांगीण कथन.

    ट्रिपची पूर्वतयारी कशी करावी हे ब्लॉग वाचून लक्षात तर येतेच परंतु त्या प्रातांचा पूर्वअभ्यास किती महत्वाचा आहे हे ही लक्षात येते.

    ब्लॉग मध्ये लिहिल्यानुसार मार्गदर्शक म्हणून ब्लॉग नक्कीच महत्वाचा आहे.

    पुढील ब्लॉग आणि स्थळवर्णन वाचायला नक्की आवडेल. तूर्तास पूर्वार्ध तर भन्नाटच

    ReplyDelete
  28. Ek number लिहिलंय विनीतदादा तुम्ही....परिपूर्ण ब्लॉग म्हणजे काय असते हे तुमचा हा ब्लॉग वाचून जाणवले...प्रत्येक बाजूने परिपुर्ण माहिती दिली तुम्ही

    ReplyDelete
  29. Vinit...excellent write up. I too visited but while going through blog, i recollected the memories and surprised so many itinarary,we missed.Waiting for your next blog pl

    ReplyDelete
  30. फारच विस्तृत आणि सुंदर

    ReplyDelete
  31. Very well written, all the details covered. One can definitely use the blog and plan for the trip without any problem. As usual you have covered all the details. Superb work

    ReplyDelete
  32. खूप छान विनीत.. मुद्देसूद आणि संपूर्ण माहिती लिहिली आहे.. एव्हढे छान वर्णन केले आहे की आत्ताच जावे असे वाटते.. 👌👌👍👍

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana