रांगणा_Rangana

दुर्गम आणि रांगडा “किल्ले रांगणा”!


कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक जिल्हा. पंचगंगेच्या तीरावर वसलेले कोल्हापूर शहर करवीर नगरी म्हणून देखील ओळखले जाते. ही करवीर नगरी जेवढी इतिहासप्रसिद्ध तेवढीच ती प्रसिद्ध येथील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरामुळे. कराकरा वाजणारी कोल्हापुरी चप्पल, बलदंड शरीराच्या पैलवानांची कुस्ती, ठसका आणणारा तिखटजाळ तांबडा-पांढरा रस्सा आणि काळ्या कसदार सुपीक जमिनीत होणारी शेती यामुळे कोल्हापूर जिल्हा जगभर प्रसिद्ध आहे. भटकंतीसाठी उत्तम हवामान असणाऱ्या या जिल्ह्यात गगनबावडा, दाजीपुर, राधानगरी अशी सुंदर पर्यटन स्थळे तर आहेतच पण कोकणाला अगदीच खेटून असल्याने सह्याद्रीच्या ऐन कड्यातील काही इतिहासप्रसिद्ध किल्ले देखील या जिल्ह्यात आहेत. चला तर मग आज दुर्गसफर करू याच कोल्हापूर जिह्यातील एका रांगड्या दुर्गरत्नाची म्हणजेच किल्ले रांगण्याची!


मला जर कुणी विचारलं कि कोल्हापूर जिह्यातील सर्वात सुंदर किल्ला कोणता तर माझं झुकत माप नक्कीच असेल ते किल्ले रांगण्याला. “येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल” या एकाच ऐतिहासिक उल्लेखात या किल्ल्याचे महत्व स्पष्ट होते. छत्रपती शिवरायांना सर्वच किल्ले प्रिय होते पण रांगणा हा त्यांचा अत्यंत आवडत्या किल्ल्यापैकी एक. दस्तूरखुद्द गडपती शिवरायांचा सहवास लाभलेल्या या गडाच्या डागडुजीसाठी इतिहासकाळात सहा हजार होन खर्च केल्याची नोंद आढळते. मराठ्यांच्या इतिहासात हा किल्ला प्रसिद्धगड या नावाने देखील ओळखला जातो.

कोल्हापूर जिह्यातील सर्वात सुंदर किल्ला असणाऱ्या रांगण्यावरून दिसणारा सुंदर सभोवतालकिल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्याच एका मुख्य धारेतून वेगळ्या झालेल्या पण घाटमाथ्याला एका निमुळत्या डोंगरसोंडेने जोडलेल्या अवाढव्य अशा दक्षिणोत्तर डोंगरावर बांधलेला आहे. अशीच काहीशी रचना आपल्याला सातारा जिह्यातील भैरवगड किंवा सांगली जिह्यातील प्रचीतगड या किल्ल्यांची आढळते. रांगणा किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ६८० मीटर असून कोकणातील सिंधुदुर्ग आणि घाटमाथ्यावरील कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर हा किल्ला येतो. त्यामुळे हा किल्ला एक तर कोकणातून ३ तासाच्या खड्या चढाईने किंवा मग घाटमाथ्यावरून थोडक्या शारीरिक श्रमात गाठता येतो. 


किल्ले रांगणा


रांगणा किल्ल्याला घाटमाथ्याकडून जाण्यासाठी सर्वात जवळचे डांबरी रस्त्याने जोडलेले गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातले भटवाडी. कोल्हापूर शहरापासून साधारण १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या भटवाडी पर्यंत कसे पोहोचायचे हे लेखाच्या शेवटी सविस्तरपणे दिलेले आहेच. भटवाडीत पोहोचल्यावर गावाच्या मधून जाणार्‍या रस्त्याने आपण धरणाच्या भिंतीजवळ पोहोचतो. येथून एक लाल मातीचा कच्चा गाडी रस्ता सुमारे ९ किलोमीटर अंतरावरील चिक्केवाडी या छोट्याश्या वस्तीपर्यंत जातो. चिक्केवाडी हि रांगणा किल्ल्याच्या जवळ असणारी शेवटची नागरी वस्ती.


भटवाडी ते चिक्केवाडी हा कच्चा रस्ता अनेक छोट्या चढ-उतारांचा, दगडधोंड्यांनी भरलेला आणि दाट जंगलाचा आहे. तसेच या रस्त्यावर एक-दोन पाण्याचे ओढे देखील पार करावे लागतात. त्यामुळे हा मार्ग एक तर चालत किंवा मग एखाद्या दणकट दुचाकीने डर्ट बाइकिंगची मजा लुटत पार करावा. पावसाळा सोडल्यास जीप, सुमो किंवा फोरव्हील ड्राईव असणाऱ्या वाहनामधून सुद्धा हे अंतर पार करता येते. मात्र दुचाकी किंवा चारचाकी वाहनाचे कोणत्याही कारणामुळे नुकसान झाल्यास किंवा वाहन पंक्चर झाल्यास दूर दूर पर्यंत कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकत नाही. चिक्केवाडी पर्यंतचे हे अंतर दाट जंगलातून जात असल्याने जंगलात बिबटे, गवे, रानडुक्कर आणि अस्वलांचा मुक्त वावर आहे असे स्थानिक लोक सांगतात. त्यामुळे हा रस्ता भर दिवसा उजेडी पार करून किल्ल्यावर अथवा चिक्केवाडीत पोहोचावे. 


भटवाडी ते चिक्केवाडी हा प्रवास करण्यासाठी अशी दणकट गाडी हवी नाहीतर मग निघायच कदमताल करत


हे ९ किलोमीटरचे अंतर पार केले कि आपण थोड्या मोकळवनात पोहोचतो आणि समोरच दिसतो कागल येथील वनमित्र संस्थेने बसवलेला “किल्ले रांगणा” असा बोर्ड. या वाटेने तसेच पुढे जाताच एक दगडी उंबरठा अडवा येतो आणि त्याच्या जवळच अगदी थोडके अस्तित्व राहिलेली चौकीवजा वास्तूची एक भिंत दिसते. हे अवशेष आपल्याला गड परिसर आता अगदीच समीप आला आहे याची साक्ष पटवून देतात आणि थोड्याच वेळात दाट झाडीतून खिंड उतरून आपण एका पठारावर येतो. येथून आपल्याला प्रथमच डोंगर धारेने जोडलेला रांगणा किल्ला दिसतो. सहयाद्रीमधील प्रत्येक गडात प्रवेश करण्यासाठी डोंगरावर चढाई करावे लागते, रांगण्याच्या बाबतीत मात्र गणित थोड उलट आहे. येथे चक्क डोंगर उतार उतरुन आपण गडाजवळ पोहोचतो.किल्ल्याच्या जवळ गेल्यावर दिसणारे काही अवशेष


पठारावर पोहोचतात वाटेच्या उजवीकडे एक दगडी कुंड दिसते. इतिहासकाळात बहुदा घोड्यांना पाणी पिण्यासाठी हि सोय केलेली असावी. येथेच पुढे झाडीत एक जीर्ण मंदिर आहे ज्याला स्थानिक लोक “बांदेश्वर मंदिर” म्हणतात. मंदिरावरील पत्र्याचे छत उडून गेलेले असून बाजूच्या दगडी भिंती थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहेत. मंदिरात श्रीगणेश, विष्णू आणि देवी यांच्या छोट्या कोरीव मूर्त्या दिसतात. मंदिरासमोर असणारे दगडी तुळशी वृंदावन आजूबाजूची झाडी आणि गवत यामधे पार झाकोळून गेलेले आहे. हे अवशेष पाहून पुन्हा पठारावर यायचं आणि आता रांगण्याचं रांगड रूप न्याहाळत किल्ल्याकडे चालू लागायचं. समोरच दिसतो तो किल्ल्याचा भव्य बुरुज. हा बुरुज म्हणजे एक १०० फुटाची नैसर्गिक कातळभिंत आणि त्यावर पुन्हा दगडी बांधीव तटबंदीचा सुंदर साज चढवलेला. ऐन मोक्याच्या ठिकाणी टेहळणी करण्यासाठी हा बलदंड बुरुज उभा आहे. याच बुरूजाच्या डाव्या बाजूच्या तटाखालून किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे.


बांदेश्वर मंदिर
किल्ले रांगण्याचा भव्य बुरुज


पायवाटेने किल्ल्यावर प्रवेश करताना डावीकडे साथ देते ती लांबवर पसरलेली खोल दरी तर उजवीकडे असतो किल्ल्याचा तट. दोन फर्लांग वाटचालीनंतर आपण येतो रांगण्याच्या पहिल्या भग्न दरवाज्यात ज्याचे नाव आहे "गणेश दरवाजा". दरवाज्यातून आत प्रवेश करण्यासाठी १० दगडी पायऱ्या असून डाव्या बाजूचा गोलाकार बुरुज आजही आपले अस्तित्व टिकवून उभा आहे. पुढे आणखीन काही ओबडधोबड दगडी पायऱ्या चढून गेलो कि दिसतो किल्ल्याचा भव्य आणि उत्तम स्थितीत असणारा दुसरा "हनुमंत" दरवाजा. हा दरवाजा मुद्दाम थोडा बुरुजाचा आडोसा देऊन बांधल्यासारखा वाटतो. या दरवाज्याच्या आत पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत मात्र आता त्याची बरीच पडझड झालेली आहे. "गणेश दरवाजा"
"हनुमंत दरवाजा"
दुसऱ्या दरवाज्याची आतली बाजू


इथं दरवाज्यात घटकाभर बसायचं आणि युद्धशात्रातील रणमंडळ या संरक्षण रचनेचा थोडासा मागोवा घ्यायचा. किल्ल्याचा मोक्याच्या ठिकाणी बांधलेला तो भव्य बुरुज आणि या दोन दरवाज्यांची बुरुजाच्या तटाच्या बाजूने बनवलेली अरुंद आणि चिंचोळी पायवाट शत्रूला किल्ल्यामधे सहज प्रवेश करूच देत नाही. अश्या संरक्षण रचनेत शत्रू लांबूनच येताना दिसला की सगळ्यात आधी त्याच्यावर बुरुजावरून तोफांचा भयंकर मारा केला जातो. पण तरीही काही कारणाने जर का शत्रू किल्ल्याच्या तटाला भिडलाच तर प्रवेशद्वारांच्या या अरुंद व चिंचोळ्या वाटेवर त्याला अडचणीत पकडून तटावरून दगडांचा भेदक मारा केला जातो.


किल्ल्याची रणमंडळ हि रचना


दुसऱ्या दरवाज्यातून आत गेल्यावर एक पायवाट लगेच उजवीकडे झाडीत वळते. हि वाट आपल्याला रांगणा किल्ल्याच्या समोर असणाऱ्या बाह्य बुरुजाकडे घेऊन जाते. बुरुजाकडे जाताना दोन्ही बाजूने भक्कम तट आणि तटावर चढण्यासाठी ठिकठिकाणी जिने केलेले दिसतात. या वाटेच्या शेवटी आपण येतो किल्ल्याच्या दर्शनी बाजूस असणाऱ्या भव्य बुरुजाच्या आतील बाजूस. येथे समोर तट फोडून तयार केलेला एक चोर दरवाजा दिसतो. दरवाज्यावर हनुमंताचे छोटे शिल्प कोरलेले आहे. मात्र हा चोर दरवाजा पुढे दगडधोंड्यांनी बुजला असल्याने आत जाता येत नाही. येथेच शेजारी असणाऱ्या तटबंदीमधील पायऱ्या चढून बुरुजावर जाता येते. बुरुजावर समोरच भगवा अगदी डौलाने फडकताना दिसतो. आता हे सर्व अवशेष पाहून माघारी फिरायचं आणि पुन्हा दुसऱ्या दरवाज्यापाशी परत यायचं.


भव्य बुरुजाच्या आतील बाजू आणि त्यामधला हनुमान दिंडी दरवाजा 


दरवाज्या समोरच उजव्या बाजूस एक जांभ्या दगडाची लांब भिंत आणि त्यामधे तयार केलेला लहान दरवाजा दिसतो. हा आहे किल्ल्यामधला "निंबाळकर वाडा". वाड्याच्या छोट्याश्या दरवाज्यातून आत प्रवेश केला की दारातच डाव्या हातास एका दगडावर एक अस्पष्ट फारसी शिलालेख आहे. दरवाज्यासमोर एक विहीर असून तिला "निंबाळकर बावडी" असे म्हणतात. विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या असून पाणी मात्र उपसा नसल्याने मातकट झालेले आहे. वाड्याच्या दरवाज्या जवळ एक पडझड झालेली दगडी वास्तू आहे. पण सद्यस्थितीत तिला झाडांझुडपांचा गराडा पडलेला असल्याने आत काय आहे ते मात्र पाहता येत नाही. वाड्यात बऱ्यापैकी मोकळी जागा असून वाड्याच्या दरीकडील बाजूस कोणतीही भिंत किंवा तटबंदी दिसत नाही. येथे उभारून सूर्यास्ताचे आणि दूरवर पसरलेल्या दरीचे नयनरम्य दर्शन मात्र नक्कीच घडते.


निंबाळकर वाडा आणि वाड्यातली बाव 


वाडा पाहून तसेच पुढे गेले की समोर येतो किल्ल्याचा तिसरा भरभक्कम दरवाजा. हा गडाचा "यशवंत" दरवाजा नावाप्रमाणेच भव्य आणि थोड्या वेगळ्या धाटणीचा बांधलेला दिसतो. दरवाज्याच्या दोन्ही बाजूस उंच जांभ्या दगडाच्या भिंतीचे तट असून त्यातच टेहाळणीसाठी बुरुज केलेले दिसतात. या दरवाज्याला सुंदर कमानी असून कमानीमधे पहारेकर्यांच्या विसाव्यासाठी ओवऱ्या आणि तटावर जाण्यासाठी जिने आहेत. अशी दरवाज्याची वेगळ्या पद्धतीची बांधणी न्याहाळत दरवाजा ओलांडला की समोर दोन पाऊलवाटा दिसतात. आपण मात्र डाव्याबाजूच्या पाऊलवाटेकडे तूर्तास दुर्लक्ष करायचं आणि सरळ जाणारी पायवाट धरायची. 


किल्ल्याचा भव्य "यशवंत दरवाजा"


दरवाज्यातून सरळ जाणारी पायवाट चालत गेलं कि आपण पोहोचतो किल्ल्याच्या एका मोकळया विस्तृत पठारावर. या पठारावर मधोमध बारमाही पाण्याने भरलेला भव्य तलाव आहे. हा तलाव म्हणजे गडावरील पिण्याच्या पाण्याचा एकमेव असा स्त्रोत. तलावातील पाण्याचा साठा जरी खूपच मोठा आणि सदैव टिकणारा असला तरी गडावर येणाऱ्या भटक्यांनी या तलावाचे पाणी पोहणे, कपडे अथवा भांडी धुणे यासाठी वापरून खराब करू नये हि विनंती. तलावाच्या उजव्या बाजूस असणारी पायवाट आपल्याला काही समाध्या आणि एका भग्न शिवमंदिराकडे घेऊन जाते तर डाव्याबाजुने सरळ चालत गेलो कि समोर रांगणाई देवीचे मंदिर दिसते. आपण आधी उजव्या काठाने चालत जाऊन काही उघड्यावरील समाध्या पहायच्या आणि एका कोपर्‍यात असणाऱ्या भग्न शिवमंदिरा जवळ पोहोचायचे. या छप्पर नसलेल्या पण बाजूच्या तीनही भिंती तग धरून उभे असलेल्या शिवमंदिरात चार कोपऱ्यात कोरीव खांब उभे केलेले दिसतात. मंदिरात एक शिवलिंग असून त्याच्या समोर आणि मंदिराबाहेर असे दोन नंदी आहेत. शिवलिंगामागे एका कोपऱ्यात कोरीव खांबाला टेकून एक भग्न गणेश मूर्ती ठेवलेली आहे. हे सर्व अवशेष पहायचे आणि एक छोटा ओढ्यामुळे तयार झालेला खड्डा पार करून रांगणाई देवीच्या मंदिरात पोहोचायचे. 


किल्ल्यावरचा पाण्याचा भव्य तलाव आणि काही समाध्या
तलावाच्या बाजूचे भग्न शिवमंदिर


रांगणाई देवीचा मंदिर परिसर खूपच सुंदर आहे. मंदिरासमोर एक भली मोठी काळया चिरांची दगडी दीपमाळ आजही उत्तम स्थितीत उभी आहे. रांगणाई देवीचे कौलारू मंदिर प्रशस्त असून गडावरील मुक्कामास अगदी योग्य असे ठिकाण आहे. मंदिरासमोरील चौथऱ्यावर पत्र्याचे छप्पर अलिकडचे टाकलेले दिसते. मंदिरात रांगणाई देवीची जुनी पाषाणातील मूर्ती असून हातात ढाल, तलवार, त्रिशूळ अशी आयुधे घेतलेली आहेत. देवीच्या डाव्या हातास श्री विष्णूची तर उजव्या हातास भैरवाची व इतर काही छोट्या मूर्त्या आहेत. देवीसमोरच शिलालेखासारखे लिखाण असणारा एक गोल दगड ठेवलेला आहे. मंदिराच्या मूळच्या बांधकामापैकी लाकडावरील नक्षीकाम उत्कृष्ट आहे. रांगणाई देवीच्या मंदिरा शेजारीच अजून एक दगडी चौथरा असून त्यावर एक छोटे हनुमंताचे मंदिर आहे. मंदिरात एक छोटी आणि एक मोठी अशी हनुमंताची मूर्ती ठेवलेली आहे. 


रांगणाई देवीचे कौलारू मंदिर 
मंदिरासमोरील भव्य दगडी दीपमाळ आणि समाध्या
देवीचे सुंदर लाकडी कोरीवकाम असलेले मंदिर
मधे रांगणाई देवी आणि बाजूला इतर मूर्त्या
रांगणाई मंदिराशेजारील हनुमानाचे मंदिर 


आता रांगणाई देवीच्या मंदिरामागे असणारी मळलेली पायवाट धरून सरळ किल्ल्याच्या पश्चिम टोकाकडे चालत निघायचे. पश्चिम टोकावर पोहचल्यावर आपल्याला कड्यालगत लांबपर्यंत बांधलेली तटबंदी व एक गोल बुरुज दिसतो. या तटबंदी जवळ जाण्यासाठी थोडे खाली उतरले की समोर दिसतो गडाचा पश्चिमेकडील "कोकण दरवाजा". या दरवाज्याने कोकणातील नारूर गावात उतरता येते म्हणून याला “नारूर दरवाजा” असेही म्हणतात. मुख्य दरवाज्या शेजारीच तटबंदी मधे काढलेला आणखी एक छोटा दरवाजा देखील आहे. किल्ल्याचा हा परिसर बरोबर रंगणाई देवीच्या मंदिरा पाठीमागे येतो त्यामुळे या परिसरात मुद्दाम संध्याकाळी वेळ काढून यावे. कारण एकच ते म्हणजे सुर्यास्त होताना रंगण्याभोवती खोल दऱ्याखोऱ्यांनी फेर धरलेला आणि लांबवर पसरलेला निसर्ग लाजवाब दिसतो. येथील गोल बुरूजावरून सूर्यास्ताचे जे नयनमनोहर दर्शन घडते, ते अवर्णनीय आहे. समोरून वाहणारे संध्याकाळचे वारे अंगावर घेत हे दृष्य आपल्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून घ्यावेच असे अप्रतिम दिसते.


पश्चिमेकडील "कोकण दरवाजा"
किल्ल्याची पाचीमेकडील तटबंदी
किल्ल्याचे "कोकण दरवाज्या"कडील काही अवशेष


येथे आपली किल्ल्याची अर्धी गडफेरी पूर्ण होते. रांगणा किल्ला विस्ताराने खूप मोठा आहे. ह्या किल्ल्याचा डोंगर जवळ जवळ तीन कि.मी. लांबीचा आणि एक ते दीड कि. मी. रूंदीचा आहे. सहजा रांगणा किल्ल्याला भेट देणारे दुर्गप्रेमी फक्त वरील दिलेले अवशेष पाहतात आणि गडफेरी समाप्त करून परतीच्या वाटेला लागतात. मात्र किल्ल्यावर अजून बरेच सुंदर अवशेष विखुरलेले आहेत जे पाहण्यासाठी किल्ल्याच्या डोंगराला तटाकडेने पूर्ण फेरी मारणे गरजेचे आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यास वरील अवशेष पहिल्या दिवशी पाहून किल्ल्यावर एक मुक्काम करावा व दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून उरलेला किल्ला पाहण्यासाठी निघावे. आता उरलेली गडफेरी करण्यासाठी किल्ल्याच्या तिसऱ्या "यशवंत" दरवाज्यापाशी परत यावे (रांगणाई देवीच्या मंदिराकडून येताना लागणारा पहिला दरवाजा) आणि येथून दरवाज्याकडे तोंडकरून उजवीकडे जाणारी पायवाट धरावी. या सर्व वाटांची माहिती सविस्तरपणे देण्याचे कारण एकच, ते म्हणजे किल्ल्यावर भयंकर झाडी वाढलेली असल्याने किल्ल्यावर कुठूनही फिरल्यास वाट भरकटण्याची दाट शक्यता आहे.


रांगणा किल्ल्यावरचा मुक्काम म्हणजे एक कधीही न विसरण्यासारखी आठवण 
रांगणा किल्ल्यावरून पाहायला मिळालेला सुंदर सूर्यास्त 


"यशवंत" दरवाज्यापासून साधारण १५ मिनिटे चालत जाताच वाटेला पुढे दोन फाटे फुटतात. यापैकी प्रथम उजवीकडील वाटेवर असणारे महादेवाचे मंदिर आणि मंदिरासमोर सुंदर नक्षीकाम केलेले वृंदावन पाहण्यासारखे आहे. हे महादेव मंदिर दाट झाडीत लपलेले असून कोल्हापूरच्या ‘निसर्गवेध परिवार’ चे अध्यक्ष भगवान चिले सर आणि सहकार्यांनी चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून या मंदिरचा जीर्णोद्धार केला आहे. सध्या हे नव्याने बांधलेले मंदिर त्याचे पावित्र्य राखले जावे व जनावरांनी घाण करू नये यासाठी कुलूपबंद असते. मात्र मंदिराच्या लोखंडी दरवाज्यातून महादेवाची पिंड उत्तमरित्या पाहता येते. मंदिरासमोर नंदी असून त्याच्या मागे एक सुंदर नक्षीकाम केलेला चौथरा आहे. आता हे तुळशी वृंदावन आहे का कोणा थोराचे स्मारक हे सांगणे थोडे कठीण आहे. मात्र चौथऱ्याच्या चारी बाजूने सुंदर गजमुख कोरलेले असून वरील बाजूस सुद्धा नक्षीकाम केलेले दिसते.


"निसर्गवेध" परिवाराने जीर्णोद्धारीत केलेले महादेव मंदिर आणि त्यासमोरील सुंदर स्मारक


हे अवशेष पाहून पुन्हा मागे फिरावे आणि समोर किल्ल्याच्या तटाकडे जाणारी वाट धरावी. या वाटेवर छोटेसे गणेशमंदिर लागते. मंदिर खूपच छोटे असून आत गणपतीची सुंदर दगडी मूर्ती आहे. गणरायाचे दर्शन घेऊन तसेच तटाकडेने चालत जाताना थोड्याच वेळात आपण एका गाळाने भरलेल्या कोरड्या तलावाजवळ येतो. या तलावाच्या बाजूने दगडी तटबंदी असून एका काठावर छोट्या घुमटीमधे एक शिवलिंग ठेवलेले आहे. हे शिवलिंग मात्र नेहमीच्या शिवलिंगापेक्षा थोडे वेगळ्या धाटणीचे आहे. कारण यावर आहेत चक्क दोन लिंग. तसेच पिंडीच्या बाजूने सुबक नक्षी देखील काढलेली आहे. हे अवशेष पाहून पुन्हा तटाकडेने चालत राहायचे. येथून किल्ल्याच्या चहुबाजूनी घनदाट अरण्याने वेढलेल्या आणि लांबवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा खूपच सुंदर दिसतात.


कड्यालगत असणारे गणेश मंदिर
एक वेगळेच शिवलिंग
दाट अरण्य आणि डोंगराने वेढलेला परिसर


तटाकडेने चालत आता आपण किल्ल्याच्या पूर्वेकडे येतो आणि वाटेवर लागतो किल्ल्याचा "नेरूर दरवाजा". या दरवाज्यातून वाट कोकणातील कुडाळ तालुक्यातील नेरूर गावी उतरते. दरवाज्यातून खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुस्थितीत असून हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. दरवाज्यावरील बुरुज अजूनही उत्तम स्थितीत उभा असून समोरच तटबंदीमध्ये एक गोल तोंडाची विहिर आहे. ड्रेनेजचा खड्डा असावा अशी हि छोटीशी विहीर आतून मात्र कोरडी ठणठणीत आहे. या परिसरातील अवशेष पाहून पुन्हा तटबंदीच्याकडेने दक्षिणेकडे चालायला लागायचे. साधारण पंधरा मिनिटे दाट झाडीतून मार्गक्रमण गेल्यानंतर आपल्याला गडाच्या आग्नेयेकडे लांबवर पसरलेली एक सोंड दिसते आणि थोड्यावेळ आपण राजगड किल्ल्यावर आहोत कि काय असा भास होतो. कारण रांगणा किल्ल्याची हि लांबवर पसरलेली हत्तीसोंड माची अगदी संजीवनी माचीप्रमाणेच तटबंदीचा साज चढवलेली आहे."नेरूर दरवाजा"


पुढे हत्तीसोंड माचीकडे चालत जाताना दोन्ही बाजूस दगडी तटबंदीने बंदिस्त तट आणि त्यावर ठिकठिकाणी जिने दिसतात. पुढे तटाच्या उजव्या हाताच्या उतारावर एक चिलखती बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. या बुरुजावर उतरल्यानंतर समोरच आणखी एक अर्धगोलाकार बुरुज बांधलेला दिसतो. या खालच्या बुरुजात उतरण्यासाठी एक चोरवाट काढलेली आहे. शत्रूच्या हल्ल्याच्या दृष्टीने नाजूक ठिकाणी असे चिलखती बुरूज बांधले जातात. या रचनेत एका बुरुजाच्या समोर थोडे अंतर सोडून दुसरा छोटा बुरुज बांधलेला असतो. आतील बुरुजाची उंची बाहेरील बुरुजापेक्षा जास्त असते. या रचनेमुळे शत्रूच्या तोफेच्या माऱ्यामुळे बाहेरील बुरूज पडला तरी आतल्या बुरुजावरून शत्रूवर मारा करता येतो. अशा प्रकारचे चिलखती बुरूज रायगड, सुधागड, सिंधुदुर्ग अशा अनेक मोठ्या किल्ल्यांवर पाहायला मिळतात.


किल्ल्याची हत्तीसोंड माची आणि तिथून दिसणारा रांगणा किल्ल्याचा विस्तार
चिलखती बुरुज
चिलखती बुरुजाची रचना 


हा चिलखती बुरुज पाहून पुन्हा वर यायचे आणि सोंडेच्या टोकावर असणाऱ्या चोर दरवाज्यात उतरायचे. बारा कमानी असलेला आणि दगडात खोदून काढलेल्या या चोर दरवाज्यात खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. मात्र त्या थोड्या काळजीपूर्वक आणि सावकाशच उतरायच्या, कारण पायऱ्यांच्या शेवटी आहे आ वासून उभी असलेली खोल दरी!


किल्ल्याचे दक्षिणेकडील शेवटचे टोक ... हत्तीसोंड माची 
चोर दरवाजा


माचीवरील हे अवशेष पाहून परत मागे फिरायचे आणि तटाकडेने चालत समोरील डोंगराच्याकडेने डावीकडील वाट धरायची. या वाटेवर आपल्याला किल्ल्याचा आणखी एक भव्य असा "केरवडे दरवाजा" लागतो. हा दरवाजा देखील गोमुखी बांधणीचा आहे. या दरवाज्यातून उतरणारी वाट कोकणातील केरवडे गावात जाते. आता इथून पुढे कधी तटाकडेने तर कधी दाट झाडीभरल्या माथ्यावरून चालत आपण पश्चिमेकडील कोकण दरवाजाच्या माथ्यावर येतो. हे ठिकाण म्हणजे रांगणाई देवीच्या मंदिराची बरोबर मागची बाजू. येथे आपली साधारण ६ तासांची गडफेरी पूर्ण होते. रांगणाई मातेचे दर्शन घ्यायचे आणि गडाला निरोप देऊन परतीचा प्रवास सुरु करायचा.


"केरवडे दरवाजा"


रांगणा किल्ला जसा आकाराने मोठा तसा त्याचा इतिहासही भला मोठा आहे. या किल्ल्याने इतिहासकाळात अनेक स्थित्यंतरे पाहिली. त्यामुळे या किल्ल्याच्या इतिहासाच्या फार खोलात न जाता आपण थोडक्यात त्याची माहिती करून घेऊ. रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय १२ व्या शतकात शिलाहार वंशीय महामंडलेश्वर राजा भोज (दुसरा) याच्याकडे जाते. पुढे १५ व्या शतकात हा किल्ला संगमेश्वरावर राजवट असणाऱ्या जखुरायकडे होता. सन १४७० मध्ये बहामनी राज्यसत्तेच्या महंमद गवानने किल्ला जिंकला. बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर सन १६५८ मधे किल्ला अदिलशाहीत आला. सन १६५८ मध्ये हा किल्ला विजापूरचा सरदार रुस्तम जमानने लखम सावंताकडून जिंकून घेतला. सन १६६६ मधे राहुजी पंडित यांनी किल्ला स्वराज्यात आणला. पुढे १६६७ च्या उन्हाळ्यात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजीराजे भोसले यांनी वेढा दिला जो शिवरायांनी जातीने येऊन मोडून काढला. तेव्हाच सन १६७० मधे शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केले. सन १७०४ मधे वारणा तहानुसार किल्ला करवीरकर छत्रपतींकडे आला. सन १७५७ मध्ये सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला. परंतु करवीरकरांच्या सुभान यशवंतराव शिंदे या वीराने गड पुन्हा हस्तगत केला आणि शेवटी १८५० पर्यंत हा किल्ला करवीरकरांकडेच राहिला.


रांगणा किल्ला गाठण्यासाठी कोल्हापूर ==> गारगोटी ==> पाटगाव ==> भटवाडी असा साधारण १०० किलोमीटरचा गाडी रस्ता आहे. भटवाडी पासून किल्ल्यावर कसे जायचे ते लेखाच्या सुरवातीला सविस्तर दिलेले आहेच. वेळ असल्यास पाटगाव येथील श्री मौनी महाराजांच्या मठाला देखील नक्की भेट द्यावी. रांगणा किल्ल्याबरोबरच भुदरगड तालुक्यातील भुदरगड किल्ला सुद्धा पाहता येतो. रांगण्यापासून साधारण ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भुदरगडावर किल्ल्याच्या माथ्यापर्यंत वाहनाने जाता येते.


तर रांगणा हा अशाप्रकारे निवांत वेळ हाताशी ठेऊन पाहण्यासारखा एक नितांत सुंदर किल्ला आहे. तसेच या किल्ल्यावरचा मुक्काम आणि संध्याकाळी या किल्ल्यावरून पाहिलेले निसर्गाचे वेड लावणारे दृष्य, एक कधीही न विसरणारा अनुभव नक्कीच देईल.

सरतेशेवटी एक विनंती, ट्रेकींग जरूर करा मात्र “पाऊलखुणा शिवाय मागे काही ठेऊ नका आणि सुखद आठवणी शिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि पश्चिम घाट हि आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याला पडणाऱ्या प्लास्टिकच्या विळख्यातून वाचवा”.

@ VINIT DATE – विनीत दाते


सगळे फोटो पिकासा अल्बमवर पाहण्यासाठी येथे टिचकी मारा

Comments

 1. मस्त माहिती...

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद दत्तू शेठ

   Delete
 2. Super blog.... Very detailed information you have provided. Sahi ahe.. Keep posting in marathi.

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Ajit Patil ... नक्कीच मराठीच ब्लॉग लिहणार!

   Delete
 3. ब्लॉग तर जबर पण फोटू त्यापेक्षा भारी! थोडे फोटोग्राफी चे टिप्स द्या आम्हास पण भाऊ!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद चेतन! ... कसले टिप्स आणि काय मालक ... साधा point & shoot कॅमेरा वापरतो मी गरीब ... चला एखादा ट्रेक होऊन जाऊदे तेव्हा देतो टिप्स :)

   Delete
 4. वाह!!! अप्रतीम माहितीपूर्ण ब्लॉग...सुर्यास्ताचा फोटो तर दर्जा!!!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद सागर! अरे तो सूर्यास्तच तेव्हढा सुंदर होता त्यामुळे फोटोही छान आला

   Delete
 5. छान लेख. आवळेगावात रांगण्याचा जवळ जाऊनही किल्ला पाहणे जमलं नाही :(

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद! नक्की जाऊन या पुढल्यावेळी गावाकडे गेलात कि ... खूप सुंदर किल्ला आहे

   Delete
 6. Hi Vinit, thank you for sharing... very nicely written and detailed... keep hiking

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks for reading my blog and this nice comment

   Delete
 7. माहितीपूर्ण लेख,किल्ला करताना उपयोग होईल

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद प्रवण भाऊ!

   Delete
 8. माहितीपूर्ण लेख आणि एकसे बढके एक फोटोज...

  ReplyDelete
 9. खुपच सुंदर ब्लॉग आहे तुमचा आणि फोटोग्राफी अफलातून आहे. मी रांगणा भटकंती केली होती तेव्हा माझ्याकडे रोल कॅमेरा होता, त्यामुळे ईतके छान फोटो माझ्याकडे नाही. सध्या मी http://www.misalpav.com या वेबसाईटवर अनवट किल्ले हि मालिका लिहीतो आहे, त्यामधे यातील काही फोटो वापरले तर चालतील का? अर्थात आपल्या नावासहच ते वापरणार आहे आणि तसा उल्लेखही असेलच.
  कृपया कळवावे. माझे मिसळ्पाव वरचे लेखन तुम्ही ईथे पाहू शकता. http://www.misalpav.com/node/39881

  ReplyDelete
  Replies
  1. फोटो नक्कीच वापरू शकता मात्र त्यावरील copyright वॉटरमार्क न काढता वापरणे तसेच फोटोसाठी उल्लेख व योग्य क्रेडिट देत असल्यास माझी काहीच हरकत नाही. धन्यवाद. लिहीत राहा

   Delete
 10. धन्यवाद सर! साधारण पंधरा दिवसानी गगनगड आणि भुदरगडावरचे लेख झाल्यानंतर रांगणा किल्ल्यावर लेख येईल. त्याची लिंक मी ईथे किंवा तुमचा ई-मेलला पाठवेन. फोटो अर्थातच कॉपीराईट चिन्ह ठेवून वापरणार आहे. मी एक ट्रेकर म्हणून त्याचे महत्व जाणतो. आपल्या परवानगी बध्दल शतशः धन्यवाद.

  ReplyDelete
 11. A very interesting and informative blog. Vinit has both the patience and the art of writing. The beautiful photos give a vivid impression of being on the fort while reading the blog. One more plus point of ViniK...in most places he takes all his family members. Keep it up Vinit. Waiting for more interesting blogs.

  ReplyDelete
 12. रांगण्याचा ट्रेक कोल्हापूर पासून एका दिवसात करता येतो का?

  ReplyDelete
  Replies
  1. करता येईल. पण खर सांगायचं तर रांगणा हा खूप मोठा किल्ला आहे. त्यामुळे संपूर्ण किल्ला निवांत पाहायला ६/७ तास तरी द्या. पुन्हा तुम्ही किल्ल्यापर्यंत कसे जाणार तो वेळ पण गृहीत धरला पाहिजे. तुमची गाडी जर का किल्ल्याच्या अगदी जवळ जाणारी असेल (सुमो, Trax, बलेरो) तर एका दिवसात किल्ला होईल. पण जर का भटवाडीतून चालत जाण्याचे प्रयोजन असेल तर भटवाडी ते किल्ला हे अंतर एका बाजूने चालत जायला ३ तास हवेत. या सगळ्याचा विचार करा. धन्यवाद!

   Delete
 13. माहितीनी परिपूर्ण लेख , सुंदर वर्णन
  - राजेंद्र

  ReplyDelete
 14. अप्रतिम माहिती.....

  ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

पावनगड