Posts

Showing posts from January, 2017

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २

Image
भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग १ पासून पुढे .... पहिल्याच दिवशी तब्बल ३५० किलोमीटरचा प्रवास झाल्याने आजच्या दिवसाची सुरवात थोडी उशिरानेच झाली. आजच्या दिवसाचे ध्येय होते रत्नागिरी शहराच्या उत्तरेकडे जयगड बंदरापर्यंत ५५ किलोमीटरचा प्रवास करणे आणि या मार्गावरील विविध पर्यटनस्थळे पाहणे. कोकणात ट्रीपला येऊन सुद्धा काल दिवसभरात एकदाही समुद्र न दिसल्याने आमच्या कन्येचाही चांगलाच मूड ऑफ झाला होता. त्यामुळे आज सगळ्यात आधी अन्विताला समुद्र दर्शन घडवायचं आणि तिला मनसोक्त समुद्राच्या मातीत खेळू दयायचं असा ठराव पास झाला. आता आमचं मन देखील अन्विता प्रमाणेच अथांग समुद्र, स्वच्छ वाळूचे किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, लाल माती, जांभ्या दगडाची टुमदार कौलारू घरं, वळणावळणाचे रस्ते, गर्द झाडी व आमरायांनी सजलेलं कोकण पाहण्यासाठी आसुसलेलं होत. त्यामुळे मुक्कामाच्या हॉटेलमधेच पोटभर नाष्टा करून सकाळी बरोबर ९.३० वाजता हॉटेल सोडलं. रत्नागिरी शहरातून जयगडला जाण्यासाठी रस्त्यांचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक रस्ता म्हणजे रत्नागिरी ==> आरे-वारे ==> नेवरे ==> भांडारपुळे ==> गणपतीपुळे