रत्नगड_Ratnagad
रायगड जिल्ह्यातील रत्नगड हा खूप कमी ट्रेकर्सना माहित असणारा किल्ला. गुगलवर रत्नगड असं शोधायला जरी गेलं तरी भंडारदऱ्याचा मुकुटमणी असणाऱ्या रतनगडाचीच भरभरून माहिती मिळते आणि रत्नगडाबद्दल मात्र निराशाच हाती पडते. चला तर मग जाणून घेऊन अशा या अल्पपरिचित रत्नगडाबद्दल. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात रत्ना नदीच्या काठी रत्नगड हा छोटासा किल्ला लपला आहे. स्थानिक लोक मात्र याला रतनगड या नावानेच ओळखतात. नगर जिल्ह्यातील प्रवरे काठचा रतनगड पाहण्यासाठी पूर्ण एक दिवस हाताशी हवा मात्र पेण जवळील या छोट्या रतनगडाला भेट देण्यासाठी अर्धा दिवस देखील पुरेसा आहे. कारण समुद्रसपाटी पासून रत्नगडाची उंची १३८० फुट असून पायथ्यापासून हा किल्ला फक्त ६५० फुट उठवला आहे. तसेच या डोंगरावर याला किल्ला म्हणावे असे बुरुज, तटबंदी किंवा दरवाजे असे कोणतेही महत्वाचे अवशेष नाहीत. रत्नगडाला जाण्यासाठी प्रथम खोपोली गाठावे. खोपोली-पेण रस्त्यावर पेणच्या साधारण ८ किलोमीटर आधी वाक्रूळ नावाचे गाव लागते. वाक्रूळ गावातून डावीकडील एक गाडी रस्ता आधी कामार्ली आणि मग पुढे गड पायथ्याच्या सायमाळ गावाकडे जातो. स...