Posts

Showing posts from August, 2017

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

Image
पाऊस….. निसर्गाने दिलेलं एक सुंदर असं वरदान. पावसाळा सुरु झाला की सगळा परिसर नवचैतन्याने भरून जातो. जणू सगळीकडे निसर्गाने हिरवा गालीचाच पसरलेला आहे. पावसात निसर्गातला जवळ जवळ प्रत्येक घटक बहरतो आणि फुलतो. आपसूकच मग धुक्यात हरवलेली घाटवाट, डोंगर, गड-किल्ले इत्यादी ठिकाणी भटक्यांची पावले वळायला लागतात. आषाढात पडून गेलेल्या धुवाधार पावसानंतर श्रावण-भाद्रपदातील रिमझिम बरसणा-या सरीमध्ये फिरण्याची मजा तर काही औरच असते. या दिवसात नेहमीच्या वाटा आणि रस्ते आपणांस नवीन वाटू लागतात. डोंगर, द-या, घाट, रस्ते आपले वेगळे रूप दाखवितात. शहर असो वा खेडं श्रावणाची किमया न्यारीच. श्रावणात आभाळही रंग खेळू लागतं. आभाळात ढग असतातच पण श्रावणात सूर्यही थोडा खट्याळ होतो. आपला नेहमीचा भारदस्तपणा सोडून तो ढगांबरोबर लपाछपी खेळू लागतो. मग नकळतच बालकवींची कविता ओठावर तरळते "श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे". गुप्त भीमाशंकर  पावसाळ्यात सह्य़ाद्रीत फिरायला जी मजा आहे ती कशातच नाही असं मला वाटतं. पावसाळ्यातलं धुकं, सर्वत्र दिसणारी हिरवळ मन मोहून