भुदरगड_Bhudargad
शिलाहारांच्या विविध शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे घराणे मानले जाते. या घराण्याने इसवी सन ९४० ते १२१२ या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण १६ राजे सिंहासनावर बसले त्यामधील शेवटचा राजा भोज (दुसरा) हा होता. त्याने ११७५ ते १२१२ या काळात राज्य केले आणि जवळ जवळ १५ किल्ले बांधले. सध्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्हयातील पन्हाळगड, विशाळगड, गगनगड, रांगणा, अजिंक्यतारा असे अनेक महत्वाचे किल्ले बांधण्याचे श्रेय या राजाकडेच जाते. चला तर मग, आज दुर्गभ्रमंती करू याच शिलाहार वंशीय महामंडलेश्वर राजा भोज (दुसरा) याने बांधलेल्या भुदरगड या किल्ल्याची. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यात त्याच नावाचा हा किल्ला आहे. खर तर भुदरगड किल्ल्याचेच नाव या तालुक्याला दिले आहे असे म्हणावे लागेल. कारण भुदरगड नावाचे कोणतेही गाव या तालुक्यात नाही. गारगोटी हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून सर्व प्रशासकीय कामे गारगोटी शहरातूनच चालतात. गारगोटी पासून फक्त १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. महाराष्ट्रातील निवडक क...