चला सिक्कीम फिरुया - भाग २

चला सिक्कीम फिरुया - भाग १ - सिक्कीम राज्याविषयी माहिती, पुर्वतयारी आणि भ्रमंतीचे नियोजन 

 

सिक्कीमला प्रस्थान आणि उत्तर सिक्कीमची भटकंती ==> लाचेन व गुरुडोंगमार सरोवर


यावर्षीच्या उन्हाळ्यापासून पूर्वांचलातील राज्यांची भटकंती करायची आणि त्याचा श्रीगणेशा सिक्कीम राज्यापासून करायचा यावर जेव्हा आम्हा उभयतांचे शिक्कामोर्तब झाले तसे सहलीच्या तयारीला सुरवात केली. उन्हाळ्याची सुट्टी लागली कि आपण बर्फ बघायला जातोय हे जेव्हा अन्विताला सांगितले तेव्हा तिला तर खूपच आनंद झाला. तिचा आनंद साहजिकच होता म्हणा कारण तिने आत्तापर्यंत बर्फ हा फक्त फ्रीजमधेच पाहिलेला. आम्ही मग जेव्हा तिला तिच्या जन्माआधीचे म्हणजे मार्च २०१२ मधे केलेल्या कश्मीर भटकंतीचे काही फोटो दाखवले तेव्हा कुठे तिचा या गोष्टीवर विश्वास बसला कि बर्फाचे सुद्धा खरे खुरे डोंगर असतात आणि त्यावर आपण चालू आणि खेळू शकतो. झालं, अन्विताला जेव्हा हे समजलं तसं तिने सगळीकडे "आम्ही शाळेला सुट्टी लागल्यावर बर्फ बघायला जाणार" अशी दवंडी पिटवायला सुरवात केली. साहजिकच मग आमच्याच अपार्टमेंटमधे राहणाऱ्या आणखी एका कुटुंबाने आमच्याबरोबर या सिक्कीमच्या सहलीला यायची इच्छा व्यक्त केली. मग काय दाते आणि पाटील कुटुंब असे चार मोठे आणि दोन लहान मुले मिळून आम्ही एकूण सहा जण या सहलीला जायला तयार झालो. मग इंटरनेटवरून विविध ठिकाणांची माहिती गोळा करणे, वेगवेगळ्या ट्रॅव्हल एजंटशी संपर्क करून त्यांच्याकडून खर्चाचे कोटेशन घेणे अशी कामे सुरु झाली. संपूर्ण सिक्कीम आणि दार्जिलिंगच्या भटकंतीसाठी कमीत कमी दहा ते अकरा दिवस तरी काढावे लागणार होते. त्यात पुन्हा येण्या-जाण्याच्या रेल्वे प्रवासासाठी आणखी तीन-चार दिवसांची जास्तीची रजा काढणे शक्य नसल्याने मग सर्वानुमते थोडा खर्चिक वाटत तरी दोन्ही वेळा विमानप्रवास करायचा असे ठरले.  


साधारण एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शनिवार-रविवार जोडून ऑफिसमधून सुट्टी घ्यायचे असे ठरवले. पण बऱ्याच ट्रॅव्हल एजंटनी तुम्ही एप्रिलच्या शेवटीच सिक्कीमच्या सहलीला यावे असे सुचवले. याचे कारण म्हणजे मे महिना हा सिक्कीममधील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात पिक सीजन समजला जातो त्यामुळे अर्थातच सगळीकडे पर्यटकांची जास्त गर्दी असते. अशी अति गर्दी टाळायची असेल तर एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सिक्कीममधे आलात तर उत्तम होईल असे अनेक ट्रॅव्हल एजंटचे म्हणणे होते. आम्हालाही हा पर्याय योग्य वाटल्याने मग विमानप्रवासाची तिकिटे बुक केली, ट्रॅव्हल एजंटला त्याचा अ‍ॅडव्हांस दिला आणि सहलीचा दिवस जवळ येण्याची वाट पाहात बसलो. खरंतर इंटरनेटवरून सिक्कीममधल्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती गोळा करताना तिथले सुंदर सुंदर फोटो आणि व्हिडीओ बघून आम्ही मनाने कधीच सिक्कीमला पोहोचलो होतो.


विमानप्रवास असल्याने सहलीला बरोबर न्यायच्या सामानावर अर्थातच मर्यादा येणार होती. तशी सर्व तयारी झाल्याने प्रवासाचे काही फारसे टेन्शन नव्हते पण तरीही सहलीसाठी लागणारे सामान गोळा करणे, गरम कपडे कोणते व किती घ्यायचे, खाण्याचे पदार्थ काय घ्यावे काय नको याचा शेवटच्या क्षणापर्यन्त चाललेला गोंधळ, अनेकवेळा बॅगा भरणे आणि पुन्हा रिकाम्या करणे हे सगळे करता करता एकदाचा शुक्रवार, १९ एप्रिल २०१९ म्हणजे आमच्या प्रस्थानाचा दिवस उजाडला. त्यात आमची पुण्याहून कलकत्याला जाणारी "इंडिगो" एअरलाइन्सची फ्लाईट थोडी विचित्र वेळेला म्हणजे पहाटे २.४५ ला होती. त्यामुळे आम्ही मुलांच्या झोपेचा विचका होणार कि काय या चिंतेत होतो. पण दोन्ही मुले मात्र त्यांचा पहिलाच विमानप्रवास असल्यामुळे अजिबात कंटाळली नव्हती. त्यांनी याआधी एकतर चित्रात किंवा मग आकाशात उडतानाच विमान पाहिलेले. आज ती प्रत्यक्ष विमानात बसणार होती. जवळजवळ पहाटे ३ वाजता फ्लाईटने आकाशात उड्डाण करेपर्यंत दोन्ही मुले अजिबात झोपली नाहीत. मग आधी पुणे ते कलकत्ता आणि मग कलकत्ता ते बागडोगरा असा दोन वेगवेगळ्या विमानकंपन्याचा प्रवास करत दुपारी ३ वाजता बागडोगरा विमानतळावर पोहोचलो. बागडोगरा विमानतळाच्या पार्किंगमधे आम्हाला गंगटोकला घेऊन जाणारी इनोव्हा गाडी आधीपासूनच येऊन उभी होती. ड्रायवरशी संपर्क झाला आणि सर्व सामान गाडीत टाकून गंगटोकच्या दिशेने प्रवास सुरु केला. विमान प्रवासात खाण्याचे थोडे हाल झाल्याने गाडीत बसताच ड्रायवरला एखादे चांगले हॉटेल बघून जेवायला थांबायची विनंती केली. त्याने सिलीगुडी शहराच्या ट्राफिकमधून बाहेर पडताच सिलीगुडी-गंगटोक हायवेवर एका छानशा हॉटेलवर गाडी थांबवली. भूक लागलेलीच, त्यात व्हेज थाळी मिळाल्याने व्यवस्थित व भरपेट जेवण केले आणि पुढच्या प्रवासाला सुरवात केली. 


सिक्कीम ट्रीपला निघालेली गँग ... पुणे विमानतळ ... रात्री १२ वाजता

पुणे ते कलकत्ता ... इंडिगो फ्लाईट ... पहाटे २.४५

विमानातून दिसणारे कलकत्ता शहर व आजूबाजूचा परिसर ... पहाटे ५.१५
कलकत्ता विमानतळावर सूर्योदय ... पहाटे ५.४५
कलकत्ता विमानतळ
कलकत्ता ते बागडोगरा गो-एअर फ्लाईट ... दुपारी १२.४५
बागडोगरा विमानतळ ... दुपारी ३ वाजता

बागडोगरा-सिलीगुडी रस्त्यावरील काही टी-गार्डन्स


सिलीगुडीपासून गंगटोकचे अंतर १२० किमी आहे. आपल्याकडे एवढा प्रवास करण्यासाठी साधारण ३ तास पुरेसे असतात. पण वेळेचे आणि प्रवासाचे आपले हे गणित सिक्कीममधे मात्र हमखास गंडते. कारण इथं आहे संपूर्ण घाटाचा रस्ता आणि तोही अत्यंत धोकादायक वळणे असलेला. इथे सरळ असे रस्ते नाहीतच. काही ठिकाणी तर रस्तेच नाहीत म्हणालात तरी चालेल. सतत पडणारा पाऊस, दरडी कोसळणे यामुळे इथले रस्ते कमालीचे खराब होतात. त्यातल्या त्यात सिलीगुडी ते गंगटोक हा रस्ता बराच चांगला आहे. एकीकडे खोल खोल जाणारी दरी आणि दुसरीकडे उंचच उंच जाणारे पहाड, अश्या घाटातून वाहन चालवणे हे खरोखरच वाखाणण्याजोगे कौशल्य आहे. मला आठवतंय तसं सिलीगुडीवरून निघाल्यापासून ते अकराव्या दिवशी सिलीगुडीला सहल संपेपर्यंत मी ड्रायवरला फक्त पंख्यासारखे स्टेरिंग गोल गोल फिरवतानाच पाहिले. काय होत असेल त्या हातांचे? केवढे ते कष्ट आणि केवढा तो हातांना व्यायाम. बरं वाहन चालवण्याचे इतके कष्ट असून देखील ऊगाच कोणी वाहतुकीची शिस्त मोडीत नाही, ना कुणाला ओव्हरटेक करण्याची घाई असते. शे-सव्वाशे किलोमीटरचा घाटरस्ता पण वाहनांची एकच रांग. त्यामुळे साहजिकच इथं अपघात कमी होतात. नाहीतर आपल्याकडे बघा. चार-पाच किलोमीटरचा छोटा घाट असला तरी आठवड्यातून दोन ते तीन अपघात ठरलेलेच. खरंच आपल्याकडील वाहनचालकांनीही अशी शिस्त पाळण्याची गरज आहे.


सिलीगुडी हे तसे अगदीच सपाटीवर वसलेले गाव. उंची समुद्रसपाटीपासून जेमतेम ४०० फुट. तर गंगटोक हे पार ५५०० फुटांवर डोंगरावर वसलेले शहर. त्यामुळे जसे तुम्ही सिलीगुडीवरून गंगटोकच्या दिशेने प्रवास सुरु करता तसे घाटरस्ते सुरु होतात आणि लवकरच आपण चढणीच्या मार्गाला लागतो. या पाच तासांच्या प्रवासात बाहेरचा निसर्ग मात्र क्षणाक्षणाला बदलत जातो आणि निसर्गाची विविध रूपे आपल्याला दाखवतो. सिलीगुडीपासून तासाभराचे अंतर पार केल्यावर आपली पहिली भेट होते ती सिक्कीम राज्याची जीवनदायिनी असणाऱ्या तिस्ता नदीची. सिक्कीमच्या उत्तर भागात भारत-चीन देशांच्या सीमेजवळ हिमालयाच्या पर्वतामध्ये उगम पावणारी ही नदी पुढे पश्चिम बंगालमधून वाहत जात बांगलादेशात रंगपूर येथे ब्रह्मपुत्रेला मिळते. सिक्कीम व पश्चिम बंगाल राज्यांची सीमा देखील हीच तिस्ता नदी ठरवते. सिलीगुडीपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर सिवोक येथे याच तिस्ता नदीवर एक भव्य पूल बांधलेला आहे. याला "कॉरोनेशन ब्रिज" असे म्हणतात. या पुलाच्या बांधणीचा नारळ १९३७ साली राणी एलिजाबेथ आणि जॉर्ज ६वा यांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाच्यावेळी फोडला गेला म्हणून इंग्रज याला "कॉरोनेशन ब्रिज" म्हणत. पण स्थानिक लोक मात्र या पुलाला "सिवोक पूल" किंवा या पुलाच्या सुरवातीला असणाऱ्या दोन भव्य वाघांच्या पुतळ्यामुळे "बाघ पूल" असे म्हणतात. हा भव्य आणि मिलिटरीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पूल पुण्याचे इंजिनिअर कै. द. रा. लिमये यांनी १९४१ पर्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बांधून पूर्ण केला. किमान यासाठी तरी का होईना पण प्रत्येक मराठी माणसाने या पुलावर थांबून त्याची भव्यता नक्की पहावी. सिवोकपासून पुढच्या प्रवासात मात्र तिस्ता नदी कधी उजवीकडे तर कधी डावीकडे कायम आपली सोबत करत राहते. पुढे रेंग्पो येथे तिला रंगीत नावाची सिक्कीममधेच उगम पावणारी दुसरी नदी येऊन मिळते. रेंग्पो येथे बनवलेल्या एका व्हिव पॉइंटवरून या दोन नद्यांच्या संगमाचे सुंदर दृश पाहता येते. 


कॉरोनेशन ब्रिज
कॉरोनेशन ब्रिज खालून वाहणारी तिस्ता नदी
कॉरोनेशन ब्रिजजवळ एका भिंतीवर लावलेली कोनशीला


रेंग्पो गाव म्हणजे सिक्कीमचे प्रवेशद्वार. येथे सीमेवर आर्मीचे एक चेकपोस्ट असून आर्मीचे जवान येथे गाडीत डोकावतात व आपण किती लोक आहोत, कोठून आलो आहोत आणि कुठे चाललो आहोत या प्रकारची जुजबी आणि प्राथमिक चौकशी करतात. आता इथून पुढचा प्रवास मात्र खऱ्या अर्थाने चढणीचा, खोल दऱ्या, खोरी आणि निसर्गरम्य अश्या दाट जंगलातून सुरु होतो. या सर्व निसर्ग सौन्दर्याचा आनंद घेत आम्ही जसे जसे गंगटोकच्या दिशेने जायला लागतो तसं तसे बाहेर वाढत जाणारी थंडी जाणवायला लागली आणि नकळतच खिडकीच्या काचा वर यायला लागल्या. 
 


रांग्पो येथे पश्चिम बंगालमधून सिक्कीम राज्यात प्रवेश व तेथील चेकपोस्ट
तिस्ता नदीकाठी वसलेले रंग्पो गाव


आजचा मुक्काम गंगटोक शहरातील "हॉटेल ओमेगा इन्" या हॉटेलवर होता. आम्हाला या हॉटेलवर पोहोचेपर्यंत रात्रीचे जवळपास ८.३० वाजले. सकाळी ४० डिग्री तापमानातुन सुरू झालेला आमचा प्रवास रात्री एकदम ६ डिग्री तापमनावर येऊन संपला होता. त्यामुळे गाडीतून बाहेर पडताच चांगलीच थंडी वाजायला लागली. त्यात आमचे हॉटेल शहराच्या थोडे बाहेर एका डोंगर उतारावर असल्यामुळे जरा जास्तच थंड वाटत होते. पटापट रूमचा ताबा घेतला आणि अंगावर स्वेटर आणि जॅकेट असे गरम कपडे चढवून रात्री ९ वाजता हॉटेलच्या डायनींग हॉलमधे दोन्ही कुटुंब जेवणासाठी एकत्र भेटलो. तिथंच सिक्कीमची आमची ट्रिप ठरवून देणारे ट्रॅव्हल एजंट दीपकजी यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी आम्हाला पुढील दोन रात्री आणि तीन दिवसांच्या नॉर्थ (उत्तर) सिक्कीम जिल्ह्याच्या भटकंतीची रीतसर माहिती दिली. हा नॉर्थ सिक्कीम जिल्हा म्हणजे सगळा अतिउंचीवरील प्रदेश. नॉर्थ सिक्कीमची सफर करणे हे सुख-सुविधांनीयुक्त अन्य पर्यटनस्थळांना भेटी देण्यापेक्षा थोडे वेगळे निश्चितच आहे. विरळ हवेमुळे होणारा त्रास, खूप थंड वातावरण, बदलत्या हवामानामुळे आखीव-रेखीव कार्यक्रमात अचानक करावे लागणारे बदल, अशा सर्व गोष्टींसाठी असावी लागणारी मानसिक तयारी यामुळे नॉर्थ सिक्कीमचे पर्यटन अगदी पदभ्रमणाइतके कठिण नसले तरी साहसी पर्यटन म्हणावे इतपत निश्चितच वेगळे आहे. त्यामुळे मग दीपकजी यांनी नॉर्थ सिक्कीममधे फिरताना घ्यावयाची काळजी तसेच तेथे राहण्याची असणारी साधी होम-स्टेसारखी व्यवस्था याविषयी आमच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांचे निरसन केले. आम्हीही दिवसभराच्या प्रवासामुळे बरेच कंटाळलो होतो त्यामुळे साधारण १० वाजता पुन्हा रुममधे परत येऊन निद्रादेवीच्या आधीन झालो.


आमचे गंगटोक येथील ट्रॅव्हल एजंट दीपककुमार नेचाली राय यांच्यासोबत एक फोटो


एकतर थंडी आणि त्यात आदल्या दिवशीच्या प्रवासामुळे झालेली दगदग यामुळे दुसऱ्या दिवसाची सुरवात थोडी उशिरानेच झाली. सगळं आवरून सकाळी ९ वाजता पुन्हा दोन्ही कुटुंब ब्रेकफास्टसाठी एकत्र भेटलो. तेथेच हॉटेलच्या मॅनेजरने आम्हाला पुढच्या तीन दिवसांच्या भटकंतीसाठी बरोबर येणाऱ्या ड्रायवरचे नाव, त्याचा संपर्क क्रमांक आणि गाडीचा नंबर दिला. नॉर्थ सिक्कीमचा बराचसा भाग हा डोंगराळ आणि भारत-चीन यांच्या सीमावर्ती भागात मोडत असल्याने येथे आपल्या भारतीय सैन्याचे अनेक तळ आहेत. त्यामुळे या भागात पर्यटकांना पूर्ण परवानगी व टुरीस्ट परमिट असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. या संपूर्ण जिल्ह्यात ठरविक अंतरावर आर्मी व पोलिसांचे चेकपोस्ट असून ड्रायव्हरला या प्रत्येक ठिकाणी टुरीस्ट परमिट  दाखवतच पुढे प्रवास करावा लागतो. हे टुरीस्ट परमिट प्रवासाच्या फक्त एकच दिवस आधी गंगटोक येथील सिक्कीम टुरिझमच्या अधिकृत ऑफिसमधे मिळते. यासाठी प्रत्येक पर्यटकाला किमान दोन पासपोर्ट साईज फोटो आणि फोटो असलेले एक ओळखपत्र (Photo ID Proof) ट्रॅव्हल एजंटकडे द्यावे लागते. आम्ही या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सहलीला निघण्याअगोदरच इमेलद्वारे केलेली असल्याने आमचे टुरीस्ट परमिट आधीच तयार होते. 


गंगटोक शहर हे पूर्ण डोंगरउतारावर वसलेले आहे. इथले रस्ते एकावेळी जेमतेम दोन छोट्या गाड्या जाऊ शकतील एवढे अरुंद आणि चढ उतारांचे आहेत. त्यामुळे जर का एखादी गाडी मोजून ५ मिनिटे जरी एका जागी रस्त्यात उभी राहिली तर मागे लगेच वाहनांची ही भली मोठी रांग लागते. त्यामुळे साहजिकच येथे कुणीही रस्त्यामधे गाडी उभी करून तुमची वाट पाहत नाही. यासाठीच आमची गाडी देखील हॉटेलपासून थोडी लांब एका मोठ्या वाहनतळावर उभी करण्यात आली होती. हे वाहनतळ हॉटेलपासून मोजून पाचच मिनिटांच्या चालीवर असल्याने ठीक ९.३० वाजता आम्ही तिथे पोहोचलो. पुढच्या तीन दिवसांच्या प्रवासासाठी आम्हाला टाटा कंपनीची दणकट अशी सुमो गाडी देण्यात आली होती. तेथेच आमची व ड्रायवर लामा लेप्चा याची भेट झाली. मग गाडीत बसताच “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष केला आणि नॉर्थ सिक्कीमच्या अविस्मरणीय प्रवासाला सुरवात केली. 


नॉर्थ सिक्कीम हा येथील भौगोलिकदृष्टया सगळ्यात मोठा जिल्हा, पण अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे येथील लोकसंख्या मात्र अगदीच विरळ आहे. कांचनजुंगा गिरीशिखराच्या कुशीत वसलेल्या उत्तर सिक्कीमच्या या भागात बर्फाच्छादित शिखरे, उंचच उंच डोंगरावरून उड्या घेणारे धबधबे, सुचीपर्णी वृक्षांची वने, अनेक सरोवरे, ऱ्होडोडेंड्रॉनची गच्च झाडी आणि गरम पाण्याचे झरे असे सर्व काही आहे. उत्तर सिक्कीममध्ये लाचुंग आणि लाचेन अशी दोन गावे आहेत. "ला" चा पहाडी भाषेतील अर्थ खिंड. त्यामुळे ला-चुंग म्हणजे छोटी खिंड तर ला-चेन म्हणजे मोठी खिंड. जवळपास ९ हजार फुटांवर वसलेली ही दोन्ही गावं म्हणजे सिक्कीममधली कायम लोकवस्ती असलेली शेवटची दोन गावं. यापैकी लाचेनहुन पुढे गुरुडोंगमार सरोवराकडे जाता येतं तर लाचुंगहुन पुढे युमथांगची दरी आणि झिरो पॉईंट या ठिकाणी पोहोचता येते. या दोन्ही ठिकाणानंतर मात्र पुढे चीन-तिबेटची सरहद्द सुरु होते. नॉर्थ सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर, युमथांग व्ह्याली, झिरो पॉईंट ही सर्व ठिकाणे अतिउंचावर म्हणजे जवळपास १२००० फुटांवर असल्यामुळे पर्यटकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे असणाऱ्या विरळ हवामानाशी जुळवून घेण्यासाठी लाचेन आणि लाचुंग दोन गावात अनुक्रमे एक रात्रीचा मुक्काम करावा लागतो. 


आमचा देखील आज गंगटोक ते लाचेन असा ११० किमीचा प्रवास करणे, वाटेतील काही मोजक्या दोन-तीन पर्यटकस्थळांना भेट देणे व संध्याकाळपर्यंत मुक्कामासाठी लाचेन गाव गाठणे असा साधा आणि सोप्पा कार्यक्रम होता. आज आम्ही ५५०० फुटांवरून तब्बल ९००० फुटांची उंची गाठणार होतो. उद्या म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्हाला १७१०० फुटांवरील गुरुडोंगमार या अतिउंचीवरील सरोवराला भेट द्यायची असल्याने acclaimtization साठी (अतिउंचीवरील विरळ हवामानाशी जुळवून घेण्यासाठी) ९००० फुटांवरील लाचेन या गावात मुक्काम करणे आवश्यक होते. तसे गंगटोकवरून नॉर्थ सिक्कीमला जाण्यासाठी गाडी मार्गाचे दोन पर्याय आहेत. एक मार्ग गंगटोक - तिंगडा - काबी - फोडोंग - मंगन - चुंगथान - लाचेन असा १२२ किमीचा तर दुसरा मार्ग गंगटोक - तिंटेक - डिकचू - मंगन - चुंगथान - लाचेन असा १०७ किमीचा आहे. तुम्ही यातला कोणताही पर्याय निवडा पण खराब रस्त्यांमुळे तसेच दुपारचे जेवण, वाटेतील पर्यटनस्थळे पाहणे हे सगळे करत लाचेनपर्यंतचे अंतर कापण्यासाठी ७ ते ८ तासांचा कालावधी हा लागतोच. यात पुन्हा बरेच ड्रायवर किलोमीटर वाचवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या रस्त्यानेच नॉर्थ सिक्कीमकडे नेतात. आता हे मला प्रवासादरम्यान माझा गुगल मॅप सतत सुरू असल्यामुळे व प्रवासाला निघण्यापूर्वी रस्त्याचा थोडाफार अभ्यास केल्यामुळे लक्षात आले नाहीतर बाकी प्रवाश्यांना तर हे समजणार देखील नाही. आता हे मुद्दाम इथे सांगायचे कारण म्हणजे यापैकी ज्या रस्त्याने आपला प्रवास होणार आहे त्यानुसार आपली प्रवासातील काही पर्यटनस्थळे बदलणार आहेत हे लक्षात घ्यावे. जर का आपण पहिला रस्ता घेतला तर साधारणपणे ड्रायव्हर आपल्याला काबी लुंगचोक हे इतिहासिक स्थळ, सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल, सिंघिक येथील कांचनजुंगा व्हिव पॉईंट आणि नागा वॉटरफॉल अशी ठिकाणे दाखवत लाचेनला मुक्कामी नेतात तर दुसऱ्या मार्गाने गेल्यास बटरफ्लाय वॉटरफॉल, सिंघिक येथील कांचनजुंगा व्हिव पॉईंट आणि नागा वॉटरफॉल अशी ठिकाणे दाखवत लाचेनला पोहोचवतात. थोडक्यात आपल्या प्रवासाच्या मार्गानुसार रस्त्यात भेट देण्याऱ्या पर्यटनस्थळांमधे थोडाफार बदल होऊ शकतो. आमच्या ड्रायवरने देखील त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे शॉर्टकट घेतला आणि आमचे काबी येथील ऐतिहासिक स्थळ व सेव्हन सिस्टर्स वॉटरफॉल बघायचे राहून गेले. माझ्यासारख्या भटक्याला एकवेळ एखादा वॉटरफॉल बघायला मिळाला नाही तरी चालतो पण एखादे ऐतिहासिक स्थळ किंवा थोडे हटके ठिकाण मिस झाले तर खूप हळहळ होते. मी जेव्हा ड्रायवरला याबाबत विचारले तसे त्याने पहिल्या रस्त्याला खूप ट्राफिक असते किंवा रस्ता खूप खराब आहे अशी थातुरमातुर उत्तरे दिली. 



असो तर आम्ही गंगटोकवरून निघालो आणि गाडीत डीझेल भरण्याचे सोपस्कार पार पाडून तिंटेक-डिकचू रस्त्याला लागलो. हा रस्ता देखील निसर्गसौदर्याने भरभरून नटलेला होता. रस्त्याचं प्रत्येक वळण एक नवीनच पॅलेट डोळ्यासमोर घेऊन येत होतं. रस्त्याच्या दुतर्फा असणारी हिरवीगार झाडी, त्यामधून धावणारा वळणावळणाचा रस्ता आणि ठराविक अंतराने डोंगरदऱ्यांच्या काठाकाठाने वसलेली छोटी छोटी गावं. ही गावं पण किती सुंदर तर अगदी एखाद्या चित्रातल्यासारखी. घरं रस्त्यावरून एक-दोन मजली दिसणारी पण प्रत्यक्षात मात्र खाली दरीत चार-पाच मजली बांधलेली. पुन्हा प्रत्येक घर विविध फुलं, झाडं, वेलींचा वापर करून अतिशय सुंदरपणे सजवलेलं. सोबतीला निळा, पिवळा, लाल, हिरवा, जांभळा असा वाट्टेल तो रंग घराच्या भिंतीना देऊन एक वेगळच कॉम्बिनेशन तयार झालेलं. आणि या सगळ्याची कमी की काय म्हणून सगळीकडे प्रकर्षाने जाणवणारी स्वच्छता. ना कुठे प्लास्टिक ना कुठे कसला कचरा. खरंच घर बांधण आणि ते सजवणं या गोष्टी इथली माणसं अगदी आवडीने करताना दिसतात. गाडीच्या खिडकीतून बदलत जाणारा हा निसर्ग अनुभवत आता आम्ही गंगटोक शहरापासून बऱ्यापैकी लांब एका डोंगरावर आलो होतो. इथून डोंगरउतारावर वसलेलं गंगटोक शहर खूप छान दिसत होत. पाय मोकळे करण्यासाठी म्हणून थोडं थांबलो, फोटोग्राफी केली आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरवात केली. पुन्हा तसेच चढ आणि उतार. इथलं प्रत्येक गाव एका पर्वतराशीवरील टेकडीवर वसलेलं. ती टेकडी, तो पर्वत उतरून खाली जायचं, नदीच्या काठाकाठाने प्रवास करायचा, कुठेतरी नदीवर बांधलेला एखादा लोखंडी पूल ओलांडायचा आणि पुन्हा नदीच्या काठाकाठाने दुसर्‍या तीरावरला पर्वत चढू लागायचं. मग पुन्हा ईप्सित टेकडी गाठायची आणि घाटरस्त्याने गंतव्यस्थळी पोहोचायचं. सिक्कीममधे फिरताना चढ-उताराची ही प्रक्रिया आम्ही अनेकवेळा अनुभवली.  


डोंगरउतारावर वसलेलं गंगटोक शहर


नॉर्थ सिक्कीम म्हणजे धबधब्यांचे माहेरघर. तुम्ही एकदा गंगटोक सोडले कि थोड्या थोड्या अंतराने डोंगर उतारावरून खळाळत वाहत येणारे अनेक लहान-मोठे धबधबे तुम्हाला रस्त्याच्या प्रत्येक वळणावर दिसायला लागतात. पण हे असे धबधबे म्हणजे "दुरून डोंगर साजिरे" म्हणत लांबूनच पाहिलेले बरे. कधी दरड कोसळून एखादा दगड गडगडत वाहत यायचा, सांगता येत नाही. पण काही धबधबे मात्र पर्यटकांना पाण्यात उतरण्याचा आनंद घेण्यासाठी योग्य सोयी सुविधा केलेले आहेत. गंगटोकवरून निघाल्यापासून दोन-एक तासांनी आम्ही देखील अश्याच एका छोट्या धबधब्याजवळ थांबलो. या वॉटरफॉलचे नाव होते बटरफ्लाय वॉटरफॉल. दोन हिरव्यागार डोंगराच्या घळीतून हा धबधबा वाहत येत असल्यामुळे येथे फुलपाखरांची कायम रेलचेल असते. त्यामुळे या धबधब्याचे नाव बटरफ्लाय वॉटरफॉल असे आमच्या ड्रायवरने सांगितले. आम्हाला मात्र इथे जवळपास अर्धा तास घालवून देखील एकही फुलपाखरू दिसले नाही. मी एका स्थानिकला याचे कारण विचारले असता त्याने या परिसरात फुलपाखरे पाहण्यासाठी पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या दरम्यान यावे असे सांगितले. असो, तर हा वॉटरफॉल अगदी फार काही देखणा वैगरे नाही. कारण यापेक्षाही अनेक मोठे वॉटरफॉल लाचेन-लाचुंग मार्गावर आपल्या स्वागताला पुढे कोसळत असतात. पण प्रवासादरम्यान थोड्या थोड्या वेळाने पाय मोकळे करण्यासाठी अश्या ठिकाणी उतरलेले बरे असते. दुसरी गोष्ट म्हणजे हा वॉटरफॉल अत्यंत सुरक्षित आहे. याच्या अगदी जवळ जाण्यासाठी पायऱ्यांचा एक छान मार्ग बनवलेला आहे तसेच धबधब्या समोर उंचावर एक मनोरा सदृश इमारत उभारली असून या ठिकाणावरून मागे पडणाऱ्या धबधब्याबरोबर छान फोटोही काढता येतात. येथे पे अँड युज टॉयलेट आणि क्षुधा शांतीसाठी खाण्यापिण्याचे काही छोटे स्टॉल्स देखील आहेत. 


बटरफ्लाय वॉटरफॉल


बटरफ्लाय वॉटरफॉल पाहून झाल्यावर थोड्याच वेळात आमच्या ड्रायव्हरने एका हॉटेलजवळ दुपारच्या जेवणासाठी गाडी थांबवली. खरंतर आत्ता कुठे फक्त दुपारचे बाराच वाजलेले होते आणि म्हणावी तशी भूकही लागलेली नव्हती. पण आमचे सर्व ठिकाणाचे जेवण टूर पॅकेजमधेच समाविष्ठ असल्यामुळे टूर एजंटने ठरवून दिलेल्या हॉटेलमधेच आम्हाला जेवण करणे क्रमप्राप्त होते. हॉटेल होते छोटेसेच पण एका डोंगरकड्यावर खूप छान ठिकाणी बांधलेले होते. आता थांबलोच आहोत तर इथंच थोडी टंगळमंगळ करावी आणि मग थोड्यावेळाने जेवण करावे असा विचार करत गाडीतून बाहेर पडलो पण त्याच हॉटेलमधे आमच्यानंतर आणखी एक खूप मोठा ग्रुप जेवायला येणार असल्याचे हॉटेलमालकाने आम्हाला सांगितले व लवकर जेवण करून घेण्याची विनंती केली. कोबी- बटाट्याची मिक्स सुकी भाजी, सोयाबीनची रस्सा भाजी, डाळ, भात आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडाकरी असा सगळा मेनू एका टेबलावर छान मांडून ठेवला होता. जेवणात सगळं होतं पण पोळीचा (रोटी/चपातीचा) पत्ताच नाही. आम्ही याबद्दल हॉटेल मालकास विचारले असता रोटी फक्त आगाऊ ऑर्डर दिली असल्यासच मिळू शकते आता बनवली जाऊ शकत नाही असे उत्तर मिळाले. ड्रायव्हरकडून कळाले की सिक्कीममधे बहुतांशी बंगाली लोक फिरायला येतात आणि त्यांच्या जेवणात भाताचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे येथे सगळ्यांनाच सरसकट भात वाढला जातो आणि रोटी अर्थात पोळ्या या फक्त तुम्ही पुर्वकल्पना दिली तरच ऑर्डरप्रमाणे बनवल्या जातात. असो तर बाकी जेवण मात्र छानच होते. त्यामुळे जेवण उरकले आणि तेथे फार वेळ न दवडता लगेच पुढच्या प्रवासाला सुरवात केली. थोड्याच वेळात डिकचूमार्गे मंगन गावाच्या थोडे अलिकडे गंगटोकवरून येणाऱ्या मुख्य मार्गाला लागलो. आता येथे खऱ्या अर्थाने आमचा उत्तर सिक्कीम जिल्ह्यात प्रवेश झाला. मंगन हे उत्तर सिक्कीम जिल्ह्याचे मुख्यालय. त्यामुळे हे गाव नॉर्थ सिक्कीममधील इतर गावांपेक्षा थोडे मोठे आहे. गावात आमच्या ड्रायवरचे थोडे वैयक्तिक काम असल्यामुळे एका ठिकाणी गाडी लाऊन तो थोड्यावेळासाठी निघून गेला. आम्ही देखील या संधीचा फायदा घेऊन मंगन गावातील लोकल मार्केटमधे एक फेरफटका मारून आलो. येथेच अन्विताच्या नवीन रंगीबेरंगी जर्किनची खरेदी देखील झाली. 


डीकचू-मंगन मार्गावर खोल दरीत वाहणाऱ्या तिस्ता नदीचे एक दृश


मंगनपासून फक्त चार किमी अंतरावर सिंघिक (Singhik) नावाचे गाव आहे. येथे असलेला कांचनजुंगा व्हीव पॉईंट तर आवर्जून पाहण्यासारखा. हे ठिकाण बऱ्यापैकी उंचावर असल्यामुळे येथून खोल खोल जाणारी दरी, त्यातून खळाळत वाहणारी तिस्ता नदी आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर 
कांचनजुंगा आणि सिनिओल्चु या बर्फाच्छादित पर्वतांचे खूप सुंदर असे दृश दिसते. फक्त हे दृश दिसण्यासाठी वातावरण स्वच्छ असणे गरजेचे असते. आमच्या दुर्दैवाने आज ढगाळ वातावरण असल्यामुळे खूप दूर काही बर्फाच्छादित शिखरे ढगाआड लपलेली दिसत होती पण त्यातले नेमके कांचनजुंगा शिखर कोणते ते मात्र कळणे अवघड होते. सूर्योदयाच्या वेळेस आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या सीजनमधे आल्यास या ठिकाणावरून कांचनजुंगा गिरीशिखराचे  हमखास दर्शन होते असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले. असो तर आज जे दिसले तेही नसे थोडके असे मानून फोटोग्राफी केली आणि लगेच पुढे निघालो. इथून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक भला मोठा वॉटरफॉल लागतो. हा आहे नॉर्थ सिक्कीम मधील काही मोठ्या वॉटरफॉल्सपैकी एक मानला जाणारा नागा फॉल्स. एका उंच पर्वतशिखरावरून वेगाने खाली कोसळणारा तो जलप्रपात पाहणे हा एक अविस्मरणीय असा अनुभव आहे. या धबधब्याच्या समोरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असून त्यात काहीशे फुट खाली उडी घेणारे पाणी पाहताना मनात धडकी भरते. निसर्गाचे ते अचाट वैभव पाहून आपल्याला "गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळे | धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे |" या रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळींची आठवण झाल्यावाचून रहात नाही. नागा फॉल्सच्या परिसरात थोडे फोटो काढले आणि तिथेच एका छोट्या टपरीवजा हॉटेलात खास तिबेटी पदार्थ असणाऱ्या मोमोजवर ताव मारला. लाल तिखट चटणीबरोबर मोमोज खाल्यानंतर गरमागरम चहाची तलफ तर होणारच. मस्त थंड वातावरणात हातातल्या वाफाळत्या चहाचे फुरके घेत समोर खळाळून वाहणारा तो जलप्रपात पाहणे म्हणजे एक वेगळीच मजा होती. 


सिंघिक येथील कांचनजुंगा व्हीव पॉईंटवरून दिसणारा नजारा. मागे अस्पष्ट बर्फाच्छादित शिखरे
वातावरण स्वच्छ असल्यास व्हीव पॉईंटवरून दिसणारे कांचनजुंगा शिखर (फोटो इंटरनेट साभार)

नागा वॉटरफॉल



Yummi मोमोज आणि तिखट चटणी

नागा फॉल पाहून पुढे गेल्यावर थोड्याच वेळात तिस्ता नदीच्या किनाऱ्यावर वसलेले चुंगथांग गाव लागले. लाचेन गावातून वाहत येणारी लाचेन-चू नदी आणि लाचुंग गावातून वाहत येणारी लाचुंग-चू नदी या दोन्ही नद्यांचा प्रवाह एकत्र येऊन पुढे तिस्ता नदीचा प्रवाह सुरु होतो. चुंगथांग येथे या दोन्ही नद्यांचे डोंगरातून खळाळत वाहत येणारे पाणी अडवले असून त्यावर बांध घालून एक मोठा जलाशय बनवलेला आहे. याच जलाशयातील पाण्यापासून विदयुत निर्मित करण्यासाठी येथे एक मोठा हाईड्रो इलेक्ट्रिक पॉवरप्लांट देखील आहे. चुंगथांग गाव सुरु होण्याच्या साधारण २ किलोमीटर आधी घाटातील एका उंच ठिकाणावरून निळ्याशार पाण्याने भरलेला हा जलाशय, त्याकाठी वसलेले चुंगथांग गाव व या हाईड्रो इलेक्ट्रिक पॉवरप्लांटचे खूप सुंदर दृश दिसते. बौद्ध धर्म गुरु आचार्य पद्मसंभव सातव्या शतकात तिबेटला जाताना चुंगथांग गावात थांबले होते आणि त्यावेळी त्यांनी चुंगथांग येथील दरीला आशीर्वाद दिला होता असे स्थानिक सांगतात. त्याचप्रमाणे चुंगथांग हे शीख धर्मीयांसाठी सुद्धा एक पवित्र स्थान मानले जाते. येथे असणारा गुरुद्वारा नानक नावाचा ऐतिहासिक गुरुद्वारा पाहण्यासारखा आहे. चुंगथांग गावानंतर रस्त्याला दोन फाटे फुटतात. यातला एक रस्ता डावीकडे लाचेन गावाकडे जातो तर उजवीकडचा रस्ता लाचुंगकडे जातो. आमचा आजचा मुक्काम लाचेन गावात तर उद्या गुरुडोंगमार सरोवर पाहून रात्रीचा मुक्काम लाचुंग गावात होता. त्यामुळे आज आम्हाला डावीकडे लाचेनकडे वळायचे होते पण त्याआधी मात्र येथे असणाऱ्या भारतीय लष्कराच्या चेकपोस्टवर आम्हाला लाचेन गावात जाण्यासाठी बनवलेले परमिट दाखवावे लागले.


चुंगथांग गाव

चुंगथांग येथील हाईड्रो इलेक्ट्रिक पॉवरप्लांट आणि अडवलेला तिस्ता नदीचा प्रवाह

तिस्ता नदीकाठी वसलेले चुंगथांग गाव

उत्तर सिक्कीमच्या बराचसा परिसर हा चीन-तिबेट यांच्याशी आंतरराष्ट्रीय सीमेने भिडलेला असल्यामुळे येथे जागोजागी लष्कराच्या अश्या अनेक लहान-मोठ्या छावण्या आहेत आणि साहजिकच त्यामुळे जागोजागी सैनिकही. पण येथील जनतेमध्ये सैन्याबद्दल आदर आणि जिव्हाळा आहे हे आमच्या ड्रायव्हरच्या बोलण्यातून जाणवले. काश्मीरसारखं इथे अजिबात नाही. येथील लोकांना सैनिकांचा खूप मोठा आधार वाटतो. उत्तर सिक्कीमच्या अनेक भागात ना कायमस्वरूपी डॉक्टर ना जवळ एखादं सरकारी इस्पितळ. इथं कुणी आजारी पडलं तरी सैन्याचे डॉक्टरच मदतीला धावून येतात. कधी गरज पडली तर ते त्यांच्या जीपमधून लोकांना जवळच्या इस्पितळात पोहोचवतात. दरड कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तसेच हिवाळ्यात बर्फामुळे अनेकदा इथले रस्ते बंद होतात व या गावांचा इतर देशाशी संपर्क तुटतो अश्यावेळी सैनिकच गावकऱ्यांच्या मदतीला धावून येतात. सैनिकच युद्धपातळीवर काम करून रस्ता मोकळा करतात. गावकऱ्यांसाठी त्यांच्या स्टोअररूममधून शिध्याची व औषधांची सोय देखील करतात. अतिहीमवृष्टी किंवा पाऊस यामुळे सिक्कीममधे फिरायला आलेले पर्यटक जरी एखाद्या ठिकाणी अडकले तरी त्यांची अश्या आपत्तीतून सुटका करण्याचे काम देखील आपले भारतीय जवानच करतात. हाडे गोठवणारी थंडी, भयंकर वारा, वारंवार होणारे भूस्खलन अश्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाची सीमा तर सांभाळायचीच पण त्याचबरोबरच आसपासच्या जनतेला हरएक प्रकारे मदत करायची. खरंच केवढं मोठं काम आहे हे. त्यामुळे प्रवासात कोठेही सैनिक दिसले की त्यांना पाहून अभिमानाने उर भरून यायचा आणि नकळत हाताने सॅल्युट झडत तोंडातुन "जय हिंद" असे शब्द बाहेर पडायचे.


आम्ही चुंगथांगवरून लाचेन रस्त्याला लागलो तेव्हा दुपारचे ४.३० वाजले होते. सकाळी १० वाजल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे साधारण साडेसहा तासात आम्ही दुपारचे जेवण आणि जेमतेम दोन-तीन ठिकाणांना भेट देत फक्त ८५ किलोमीटरचा प्रवास केला होता. आजच्या मुक्कामाचे लाचेन गाव गाठण्यासाठी अजूनही २५ किलोमीटरचा प्रवास करणे बाकी होते. त्यात चुंगथांगवरून लाचेनला जाणारा रस्ता आधीच्या रस्त्यापेक्षा बराच खराब आणि अरुंद होत चालला होता. एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन वाहून गेलेले रस्ते. त्यात रस्त्यावर काही ठिकाणी डोंगराचा भाग इतका बाहेर आलेला कि जेमतेम एकच गाडी जाऊ शकेल. अश्यावेळी समोरून एखादी गाडी आली तर? नुसत्या कल्पनेने देखील मनात धस्स होत होतं. पण आमचा ड्रायव्हर मात्र अगदी शिताफीने आणि बिनधास्त गाडी चालवत होता. त्याच्यासाठी हे नेहमीचेच रस्ते म्हणा. 








आम्ही संध्याकाळी ५.१५ च्या सुमारास पुन्हा एका टपरीवजा हॉटेलवर चहासाठी थांबलो. गाडीतून बाहेर पडताच चोहोबाजूंनी लांबवर का होईना पण आता बर्फाच्छादित शिखरे खुणावू लागली. आज लाचेन येथे मुक्काम करून उद्या हीच बर्फाच्छादित शिखरे अगदी जवळून बघायला मिळणार होती. आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेले हॉटेल बहुदा आमच्या ड्रायव्हरच्या कुणा नातेवाईकाचेच असावे. कारण तो सरळ त्यांच्या किचनमधे घुसला आणि जेवायला जाऊन बसला. हे हॉटेल दोन सिक्कीमी तरुणी चालवत होत्या. दोघीही दिसायला अतिशय सुंदर, तिबेटीयन चेहरेपट्टीच्या, गोऱ्यापान, नेटकी नाक असलेल्या आणि प्रत्येकाचे अगदी अदबीने व हसतमुखाने स्वागत करणाऱ्या होत्या. सिक्कीममधे एकूणच पुरुषांच्या अगदी बरोबरीने स्त्रिया देखील सर्व काम करताना दिसतात. आम्ही आज दिवसभरात ज्या काही दोन-चार हॉटेलवर थांबलो त्या सर्वच हॉटेलवर स्त्रिया मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसल्या. इथं पुरुष एकतर शेती किंवा मग ड्रायविंगचे काम जास्त प्रमाणात करतात. आम्ही चहा पिऊन पुढच्या प्रवासाला सुरवात केली तसे बाहेर अंधार दाटून आला आणि अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. आता मात्र पोरं कंटाळून गेली होती आणि कधी एकदा लाचेनला पोहोचतोय असं सगळयांना झालं होत.


Cute Sikkimi Dolls

शेवटी सात-आठ तासांचा प्रवास करून साधारण संध्याकाळी ६.३० वाजता आम्ही एकदाचे मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे लाचेन गावातल्या "Mountview Residency" या हॉटेलात पोहोचलो. नुकताच पाऊस होऊन गेल्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती. बाहेरचे तापमान बहुदा १ ते २ अंश सेल्सियस इतके कमी असावे. कधी एकदा हॉटेलच्या रूममधे घुसतोय आणि पटापट गरम कपडे अंगावर चढवतोय असं झालं होत. आमचे हॉटेल होम स्टे प्रकारात मोडणारे होते आणि याबाबतची पुर्वकल्पना आम्हाला आमच्या ट्रॅव्हल एजंटने आधीच दिलेली होती. लाचेन हे समुद्रसपाटीपासून अदमासे ९०२२ फुटावर वसलेले जेमतेम दीड-दोनशे उंबऱ्यांचे छोटेसे गाव. गुरुडोंगमार सरोवराला भेट देण्याआधी एक रात्रीचा मुक्काम येथील विरळ हवामानशी जुळवून घ्यायला सोयीचा पडतो म्हणून प्रवासी येथे थांबतात. त्यामुळे लाचेन गावात फार सोयीसुविधा असणारी स्टार कॅटेगरीतली हॉटेल्स नाहीत. येथील जवळपास प्रत्येक घर म्हणजे एक छोटेसे हॉटेलच आहे. घराचा एक मजला स्वतः पुरता वापरायला ठेवून इतर मजल्यांवर असणाऱ्या खोल्यात प्रवाश्यांच्या उतरण्याची सोय केली जाते. प्रत्येकाला एक स्वतंत्र खोली, त्यात एक डबल बेड, खोलीला संलग्न संडास व बाथरूम आणि त्यात गरम पाण्याच्या सोयीसाठी इलेक्ट्रिक गिझर एवढ्या बेसिक सुविधा इथल्या सगळ्याच होम-स्टेमधे पुरवल्या जातात. आपले जेवण देखील त्यांच्या राहत्या घरातील किचनमधेच बनवले जाते आणि डायनिंग हॉलमधे एकत्र दिले जाते.


डोंगराच्या कुशीत वसलेले लाचेन गाव
लाचेन गावातील छोटे रस्ते

आम्ही उतरलेल्या हॉटेलमध्ये आमच्यासाठी दोन खोल्या आधीच राखून ठेवलेल्या होत्या. सगळे सामान उतरवून गरम पाण्याने हातपाय धुवावेत या विचाराने गिजर चालू करून आम्ही पटापट गरम कपडे अंगावर चढवले. सगळ्यात आत थर्मल, त्यावर ट्रॅकपॅन्ट व टीशर्ट, त्यावर पुन्हा स्वेटर आणि या सगळ्यावर कमी की काय म्हणून जर्किनसुद्धा. पण अशी जवळपास चार-पाच गरम कपड्यांची आवरणं अंगावर चढवून सुद्धा थंडी वाजतच होती. अन्विता आणि अमृता या दोघी तर या व्यतिरिक्त कानटोपी, हातमोजे, पायमोजे असे बरोबर आणलेल्या सगळ्या गोष्टी अंगावर चढवून बसल्या होत्या. हे सगळं करण्यात अर्धा तास तरी गेला असेल पण इतका वेळ होऊनही थंडीमुळे गिझरचे पाणी मात्र म्हणावे तसे गरम येत नव्हते. कदाचित थंडीमुळे गच्चीवरील पाण्याचा बर्फ झाला असेल किंवा मग अतिथंडीमुळे पाणी गरम करायला गिझरला देखील वेळ लागत असेल. आम्हाला कसेबसे एखादं दुसरी बादली गरम पाणी मिळाले. पण हेही नसे थोडके असे मानून हातपाय धुतले आणि गावात फेरफटका मारून यावा या उद्देशाने रुमच्या बाहेर पडलो.


मायलेकीनी थंडी वाजू नये म्हणून केलेली जय्यत तयारी


हिमालयात जेव्हा आपण एखाद्या नवीन उंचीवर मुक्कामासाठी पोहोचतो तेव्हा तेथे गेल्यानंतर लगेच झोपणे किंवा खोलीत बसून राहणे कटाक्षाने टाळावे. थोडावेळ का होईना पण त्या परिसरातील मोकळ्या वातावरणात एखादा फेरफटका मारून यावा. यामुळे आपले शरीर त्या परिसरातील विरळ हवामानाशी जुळवून घ्यायला मदत करते आणि दुसऱ्या दिवशी आणखी जास्त उंचीवर पोहोचल्यावर होणारा त्रास थोड्या प्रमाणात का होईना पण कमी करता येतो. याच विचाराने आम्ही देखील गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. छोट्या छोट्या लाईटमधे उजळून निघालेलं डोंगरउतारावरच ते लाचेन गाव फार छान दिसत होतं. छोटीशी घर आणि त्याच्या विविध रंगानी रंगवलेल्या दरवाजे व खिडक्या. कधी त्यावर अष्टचिन्हांकीत नक्षी तर कुठे विविध ड्रगन रंगवलेले. वर्षभर अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे घरांवर धूळ अशी नाहीच. सगळ कसं स्वच्छ अगदी आत्ताच रंगवल्यासारखं. प्रत्येक दोन-तीन घरांच्यामागे बिडीकाडीपासून ते अगदी भाजीपाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी मिळणारं एक छोट दुकान. या दुकानांची एक खासियत म्हणजे येथे प्रत्येक दुकानात सर्रास दारू विकत मिळते. येथील शासनाकडून दारूच्या धंद्याला चालना दिली जात असल्यामुळे येथे विस्की, रम, ब्रँडी, वाइन यासारखी पेये इतर राज्याच्या मानाने खूप स्वस्त आणि कोठेही मिळतात. मिलेट या ज्वारीसारख्या प्रकारात पाणी आणि यीस्ट घालून शिजवलेली "थुंबा" नावाची स्थानिक बियर तर खास बांबूच्या ग्लासात देतात व ती बांबूच्याच स्ट्रोने पिण्याची पद्धत येथे आहे. शरीरात गरमी रहावी व अतिथंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी येथील स्थानिक लोक सर्रास मद्याचा वापर करतात. ब्रँडी किंवा वाईन घेण्याची माझीही अतीव इच्छा होती पण सहकुटुंब भटकत असल्याने या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करण्याशिवाय पर्याय नव्हता. Dam it! 


लाचेन गावात फेरफटका

लाचेन गावातील घरांच्या विविध रंगांत रंगवलेल्या खिडक्या आणि दरवाजे


आमचे हॉटेल मुख्य गावापासून तसे बऱ्यापैकी उंचावर होते. थंड आणि प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत आम्ही आमच्या हॉटेलपासून बरेच अंतर उतरून खाली आलो होतो. पण मग नंतर लक्षात आले कि आता हेच अंतर पुन्हा चढून वर जायचे आहे. इथल्या विरळ वातावरणाची फारशी सवय नसल्यामुळे अगदी चार पावलं जोरात टाकली तरी धाप लागत होती. पण कसे तरी थांबत आणि दम काढत का होईना पण तासाभरात हॉटेलमधे परत आलो तसे जेवण तयार असल्याची वर्दी मिळाली. जेवणात काय तर पुन्हा तेच. डाळ, भात, बटाटा कोबीची सुकी मिक्स भाजी आणि गवारीसारखी कोणत्या तरी बिन्सची एक भाजी. पुन्हा या जेवणात पण रोटीचा पत्ताच नाही. दुपारी नुसत्याच भातावर समाधान मानल्यामुळे किमान रात्रीच्या जेवणात तरी रोटी मिळेल अशी अपेक्षा होती. सिक्कीममधे येऊन आत्ता कुठे २ दिवस झालेत आणि पुढचे अजून ८ दिवस रोटीशिवाय जेवण करणे अशक्य वाटत होते त्यामुळे तडक आमच्या ट्रॅव्हल एजंटला फोन लावला आणि त्याला किमान उद्यापासून का होईना पण दोन्ही वेळा जेवणात रोटीचा समावेश करण्यास सांगितले. जेवण साधेच असले तरी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या आणि त्यांच्या विशिष्ठ मसाल्यांमुळे ते स्वादिष्ट होते. उद्या गुरुडोंगमार सरोवराला भेट देण्यासाठी पहाटे ५ वाजता प्रस्थान करायचे असल्याने किमान पहाटे ४.१५ वाजता उठणे गरजेचे होते. त्यामुळे सगळ्यांच्या मोबाईलवर पाच दहा मिनिटांच्या फरकाने अलार्म लावून फार वेळ न दवडता दोन्ही कुटुंब पुन्हा आपापल्या खोल्यात येऊन निद्रिस्त झालो. 


आमच्या ड्रायव्हर साहेबांनी पहाटे ५ वाजता गुरुडोंगमार सरोवरासाठी निघायचे आहे म्हणून सांगितले होते. याचे कारण या परिसरातील वातावरण कधीही खराब होऊ शकते. तुम्ही हिमालयात अगर कोठेही डोंगराळ भागात असाल तर एक सूत्र कायम लक्षात ठेवावे. "When you are in mountains start early" म्हणजे "डोंगरात असताना दिवस कायम लवकर सुरु करावा". हिमालयात तर हे सूत्र कटाक्षाने पाळावे. याच एक कारण म्हणजे हिमालयात दिवस फार लवकर उजाडतो आणि दूसर कारण म्हणजे हिमालयाच्या पर्वतरांगांमधील वातावरणात वेगाने बदल होतात. स्वच्छ सूर्यप्रकाश व थंडगार वाऱ्यांच्या झोतांनी सुरु होणारी येथील आल्हाददायक सकाळ, दुपारी मात्र ढगाळ वातावरणात रुपांतरीत होते. दुपारचे बारा-एक वाजले कि आकाशात काळे ढग जमा होण्यास सुरवात होते. कधीकधी तर दुपारनंतर हवामान इतके वेगाने बदलते कि जोरदार पाऊस देखील सुरु होतो. त्यात गुरुडोंगमार सरोवराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सैनिकांचे अनेक तळ असल्याने हवामान थोडे देखील खराब झाले किंवा हवामान खराब होण्याची चिन्हे जरी दिसू लागली तरी सैनिक कोणत्याही गाड्यांना सरोवरापर्यंत जाऊ देत नाहीत. आमच्या ड्रायव्हर साहेबांच्या सांगण्याप्रमाणे तर कालच गुरुडोंगमार परिसरात हवामान खराब होऊन बर्फ पडून गेला होता. खरे तर लाचेन ते गुरुडोंगमार सरोवर यामधले अंतर आहे जेमतेम ६५ किमी पण इतके अंतर पार करण्यासाठी तेथील अत्यंत खराब रस्त्यांमुळे जवळपास चार ते पाच तास लागतात. म्हणजे लाचेन ते गुरुडोंगमार सरोवर हा १३० किमीचा गाडी प्रवास करून हवामान खराब होण्याआधी दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत आपल्याला लाचेन गावात सुखरूप परत आणणे हे या ड्रायव्हर लोकांचे उदिष्ट्य असते.   


तर असा हा सगळा परिस्थिती प्रपंच ध्यानात ठेऊनच काल रात्री झोपेला कुशीत घेतल्यामुळे पहाटे अलार्म वाजण्याच्या पाच मिनिटे अगोदरच जाग आली. काल रात्री गिझर आणि गरम पाण्याचा झालेला खेळखंडोबा लक्षात ठेऊन गिजर रात्रीपासूनच चालू ठेवला होता. पण एवढं करून सुद्धा गरम पाणी काही व्यवस्थित मिळालं नाही. तसेही अंगात घातलेल्या गरम कपड्यांमुळे निर्माण झालेली उब घालवण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही तिघांनी अंघोळीची गोळी घेण्याचा निर्णय घेतला. मग कसेबसे उपलब्ध झालेल्या गरम पाण्यात सकाळचे विधी उरकून बरोबर पाच वाजता खाली गाडीपाशी येऊन उभे राहिलो. पहाटे पाच वाजता सुद्धा बाहेर बऱ्यापैकी उजाडलेले होते. पाईन वृक्षांनी भरलेले डोंगर, त्यावरची बर्फाच्छादित शिखरं आणि त्याच्या पायथ्याशी वसलेले टुमदार लाचेन गाव. सकाळच्या आल्हादायक वातावरणात हे असं सुंदर निसर्गदृश डोळ्यात साठवत गरमागरम चहाचे घोट घेण्यात एक वेगळीच मजा येत होती.  



आम्ही ठीक ५.१५ वाजता गुरुडोंगमार सरोवराच्या दिशेने निघालो. आमच्याही आधी बऱ्याच गाड्या तिथून निघाल्या होत्या. प्रवासा दरम्यान काही कठीण प्रसंग उद्भवल्यास एकमेकांना मदत करण्याच्या उद्देशाने सगळ्या गाड्या एकत्र निघणेच पसंत करतात असे आमच्या ड्रायव्हरने सांगितले. लाचेन गावातून बाहेर पडताच रस्त्याने आपले रागरंग दाखवायला सुरवात केली. इथून पुढचा रस्ता आम्ही आत्तापर्यंत प्रवास केलेल्या रस्त्यापेक्षाही निर्मनुष्य, खडतर, खड्या चढणीचा व नागमोडी वळणावळणांचा होता. पण आजूबाजूचा परिसर मात्र आत्तापर्यंत बघितलेल्या सिक्कीमपेक्षा फारच वेगळा होता. कालपर्यंत जी बर्फाच्छादित शिखरं आम्ही लांबून पाहिली होती ती आता हळू हळू जवळ येत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला साठलेल्या पाण्याचा रात्रीच्या थंड वातावरणामुळे बर्फ झालेला दिसत होता. आज आम्हाला ९००० फुटावरील लाचेन गावातून पार १७१०० फुटावरील गुरुडोंगमार सरोवर गाठायचे होते. हे अंतर जरी आम्ही गाडीत बसून पार करणार असलो तरी हिमालयात एवढ्या जलदगतीने नवीन उंची गाठणे थोडे धोक्याचे असते. विरळ हवेला आपले शरीर लगेच सरावू शकत नसल्याने कमी दाबाच्या हवेचा त्रास होऊ शकतो. खास करून लहान मुले किंवा अतिवयस्क व्यक्तींची अश्यावेळी जास्त काळजी घ्यावी. आपण समुद्रसपाटीपासून जसे वर वर जातो तसे विरळ हवामानामुळे हवेतील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्याचा आपल्या मेंदूवर, डोळ्यांवर, पचनसंस्थेवर, स्वभावावर सगळ्यावरच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मग श्वास घेण्यास त्रास होणे, उलट्या, मळमळणे, चक्कर येणे, डोकेदुखी, पोट खराब होणे असे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. याला हाय अल्टीट्यूड सिकनेस (HAS) असे म्हणतात. यापैकी कोणताही त्रास व्हायला लागला किंवा त्याची प्राथमिक लक्षणे जरी दिसायला लागली तरी आपण ज्या उंचीवर पोहोचलो आहोत त्या उंचीवरच थांबणे योग्य असते. पण जर का हा त्रास फारच वाढला तर लवकरात लवकर खालच्या उंचीवर परतणे गरजेचे असते. कारण या लक्षणांकडे कानाडोळा केल्यास हाय अल्टीट्यूड सिकनेसची (HAS) लक्षणे वाढत जाऊन मग अक्युट माउंटन सिकनेस (AMS), हाय अल्टीट्यूड सेरेब्रल एडीमा (HACE) आणि हाय अल्टीट्यूड प्लमनरी एडीमा (HAPE) अश्या भयंकर पायऱ्या हा आजार गाठत जातो आणि मग ह्यात मृत्यूही ओढवू शकतो. पण सतत थोडे-थोडे पाणी पीत राहणे, कमी जेवणे, पुरेशी विश्रांती किंवा झोप घेणे, जलद हालचाली किंवा कृती न करणे, प्राणायाम करणे, श्वसनाचा त्रास जाणवू लागला तर सतत कापूर जवळ ठेवून तो हुंगणे, दीर्घ श्वास घेणे, चूविंगम किंवा चॉकलेट चघळणे, प्रवासादरम्यान न झोपणे असे अनेक छोटे व सोपे उपाय करून तुम्ही विरळ हवेमुळे होणारा त्रास काही प्रमाणात कमी करू शकता. पण एवढी काळजी घेऊनही जर का अतिउंचीवरील हवामानामुळे एखाद्या व्यक्तीस फारच त्रास झाल्यास घाबरून न जाता अशा व्यक्तीस जवळच्या लष्कराच्या छावणीवर घेऊन जावे. लष्कराच्या प्रत्येक छावणीवर लष्कराचे डॉक्टर्स व एक छोटेखानी हॉस्पिटल असते जेथे कृत्रिम ऑक्सिजन लावण्यासारखे सर्व आवश्यक उपचार त्वरित केले जातात. 


लाचेनवरून गुरुडोंगमार सरोवराकडे जाणारा रस्ता. ये तो सिर्फ ट्रेलर है
खराब रस्त्यामुळे लागलेल्या वाहनांच्या रांगा

लाचेनपासून वर वर चढत जाणारा रस्ता साधारण दोन तासांनी आम्हाला समुद्रसपाटीपासून १३००० फुट उंचीवर वसलेल्या थांगु गावात घेऊन गेला. गुरुडोंगमार सरोवराला जाणाऱ्या सर्व गाड्या या गावात चहा-नाष्ट्याचा ब्रेक घेण्यासाठी थांबतात. खरंतर हे ठिकाण म्हणजे सिक्कीममधील सैनिकी परिसरातील एक छोटसं गावठाणच भासत होतं. कदाचित हा सैनिकांचा एकदा मोठा तळ असावा. सकाळचे ७.३० वाजले होते. आमच्या ड्रायव्हरने देखील थांगु गावात एका छोट्या टपरीवजा हॉटेलसमोर गाडी थांबवली. आम्हाला तेथे ब्रेकफास्ट करायला सांगून तो थांगु गावातील सैन्याच्या चेकपोस्टवर गेला व आमच्या पुढच्या प्रवासावर शिक्का घेऊन आला. आम्ही देखील नाष्ट्याची तयारी होईपर्यंत मग त्या छोट्याश्या गावात थोडा फेरफटका मारला. गावाशेजारून खळाळत वाहणारी लाचेन-चू नदी आणि तिच्या पार्श्वभूमीवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरे. वाह! काय नजरा होता म्हणून सांगू. आम्ही ते निसर्गचित्र डोळ्यांत आणि कॅमेऱ्यात साठवून नाष्ट्यासाठी हॉटेलमधे परत आलो. हॉटेलमधे ब्रेकफास्टसाठी उकडलेली अंडी, ओम्लेट आणि मॅगी एवढेच खाण्याचे पर्याय उपलब्ध होते. पण दारू मात्र इथंही मिळत होती बरं का :). आम्हाला फारशी भूक नसल्याने थोडी मॅगी खाल्ली व गरमागरम चहा घेतला. अजून अर्धेअधिक अंतर तरी पार करायचे असल्यामुळे नाष्टयासाठी फार वेळ न दवडता ८.३० वाजता पुढच्या प्रवासाला सुरवात केली.


१३००० फुटांवरील सुंदर थांगु व्ह्याली
थांगु व्ह्यालीमधे अन्विता 
थांगु व्ह्याली

थांगुपासून २० मिनिटांचे अंतर पार करून गेलो की रस्त्याला डावीकडे एक फाटा फुटतो तर एक रस्ता सरळ वर चढत जातो. डावीकडे जाणारा रस्ता समुद्रसपाटीपासून १४००० फुटांवर असणाऱ्या चोप्ता दरीत जातो. हिवाळ्यात या दरीत बर्फावरून चालण्याचा तसेच स्कीइंगचा आनंद लुटण्यासाठी लोक येत असतात तर ऑगस्ट-सप्टेंबरमधे या परिसरात नाना तऱ्हेची व प्रकाराची रंगीबेरंगी फुले पाहता येतात. आम्ही मात्र सरळ जाणाऱ्या रस्त्याला लागलो. थांगु ही या मार्गावरील सर्वात शेवटची मनुष्यवस्ती. येथून पुढे संपूर्णपणे लष्कराचा अंमल सुरु होतो व प्रत्येक ठिकाणी फक्त लष्कराच्याच छावण्या दिसायला लागतात. कारण येथून चीन-तिबेटची सरहद्द अगदीच हाकेच्या अंतरावर म्हणजे फक्त ३० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे येथे लष्कराचे मोठमोठाले ट्रक, रणगाडे व इतर अनेक प्रकारची मशिनरी मांडून ठेवलेली दिसते. काही ठिकाणी तर या ट्रक व रणगाड्यांच्या बाजूने अर्ध्या अर्ध्या उंचीपर्यंत बर्फ जमा झालेला दिसत होता. एका ठिकाणी तर सैनिकांची परेड देखील सुरु होती. खरंच एवढ्या अतिदुर्गम भागात व इतक्या थंड हवामानात सुद्धा आपली फौज सतत आपल्या भारतीय सीमेचे संरक्षण करत आहे. सिक्कीममधे ज्या ठिकाणी लष्कराचा तळ आहे त्या परिसरात फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याचे फलक लावलेले आहेत. कुणी बघत असेल अथवा नसेल पण कमीतकमी आपल्या राष्ट्रीय सुरक्षीततेसाठी तरी असे बोर्ड लावलेल्या ठिकाणी फोटो काढून आपल्याच सैन्याला अडचणीत आणू नये असे मला वाटते. 


चोप्ता दरीकडे जाणारा रस्ता


थांगुपासून साधारण तासाभराचे अंतर पार केल्यावर लष्कराचे शेवटचे चेकपोस्ट लागते. हे चेकपोस्ट समुद्रसपाटीपासून जवळपास १६००० फुटांवर आहे. या चेकपोस्टवर सकाळी ११ च्या आधी आपली हजेरी लागली तरच आपल्याला गुरुडोंगमार सरोवराला भेट देण्याची परवानगी मिळते. अतिउंचीवरील या परिसरातील वातावरण दुपार नंतर भयंकर रूप धारण करते. जोराचा वारा, बर्फवृष्टी किंवा जोरदार पावसाला सुरवात झाल्यास पर्यटकांना येथे अडकून पडावे लागते. त्यामुळे सकाळी ११ नंतर या चेकपोस्टवरून पर्यटकांना घेऊन जाणारी एकही गाडी सरोवराच्या दिशेने सोडली जात नाही. आम्ही पहाटे लवकर म्हणजे ५.१५ वाजता निघाल्यामुळे सुदैवाने सकाळी ९.३० वाजताच या शेवटच्या चेकपोस्टवर पोहोचलो. येथून पुढे शेवटचे १०-१२ किलोमीटरचे अंतर हे फक्त रेताड वाळवंट आहे. याला "कोल्ड डेझर्ट" असे म्हणतात. हा शेवटचा रस्ता एकदम सरळ जाणारा आणि फारशी चढण नसलेला. सुदैवाने रस्ता देखील अतिशय उत्तम. बहुदा आर्मीने नुकताच बनवलेला असावा. लांब लांब सरळ जाणारा डांबरी रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला वाळवंटासारखे भासणारे डोंगर, त्यांच्या मागे पुन्हा बर्फाचे उंच पर्वत, वर निळेशार आकाश आणि त्यावर कापूस पिंजल्यासारखे छोटेमोठे पांढरे ढग. आहाहा, काय निसर्गचित्र दिसत होतं म्हणून सांगू. थोड्यावेळ नकळत आपण लेह-लडाखच्या परिसरात आलो आहोत की काय असे वाटायला लागते. हिवाळ्यात मात्र या सर्वच ठिकाणी बर्फ असणार हे निश्चित. कारण आता ज्या ज्या डोंगरावरचे बर्फ वितळले होते तेथे एक वेगळ्याच प्रकारचे बारीक आणि पिवळसर गवत उगवले होते. याच गवतामधून अधेमधे याक चरताना दिसत होते. या याक नावाच्या प्राण्यापासून कायम सावध रहावे बरं का. म्हणजे फोटो काढायच्या नादात त्यांच्या फार जवळ जाऊ नये. कारण असे मोकळ्यात कुठेही चरणारे जंगली याक चिडून कधी तुमच्या अंगावर धावून येतील सांगता येत नाही. आमच्या समोरच एकाच्या पाठीमागे याक पळत सुटलेला आम्ही पाहिला होता.

 
लष्कराच्या शेवटच्या चेकपोस्ट जवळील डीझेलपंप. फक्त लष्कराच्या वापरासाठीच. उंची १६००० फुट
आहाहा! काय नजरा आहे. नाही का?
नुकताच पडलेला बर्फ बाजूला करून खुला करण्यात आलेला रस्ता 
हिमालयातले "कोल्ड डेझर्ट"


तर असे सर्व निसर्गदृश डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत एकदाचे गुरुडोंगमार तलावापाशी पोहोचते झालो. आमच्या आधीच येथे अनेक गाड्या पोहोचलेल्या दिसत होत्या आणि पर्यटकांची गर्दीही होती. समोर तो पूर्णतः गोठलेला पांढराशुभ्र जलाशय पाहून "याचसाठी केला होता अट्टाहास" हे शब्द नकळतच आमच्या तोंडातून बाहेर पडले. आम्ही सिक्कीममधील सर्वात मोठ्या आणि सर्वात जास्त उंचीवरच्या पवित्र अश्या सरोवरापाशी उभे होतो. समुद्रसपाटीपासून ५१८३ मीटर म्हणजे साधारण १७००० फुट उंचीवर हे सरोवर आहे. हे सरोवर अतिशय मनोहर असून येथे आल्यावर आपण जणू काही स्वर्गातच आहोत की काय असा भास होतो. हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्याचा मध्य या काळात हे सरोवर गोठलेले असते. तर जुन ते ऑक्टोबर या काळात या तलावाचे पाणी वितळलेले असते. त्यावेळी तलावाचे निळेशार पाणी आणि त्यात आजूबाजूच्या हिमाच्छादित पर्वतशिखरांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब असे खूप अवर्णनीय दृश दिसते. या सरोवराचे एक अनोखे वैशिष्ठ्य म्हणजे जेव्हा हे सरोवर पूर्णतः गोठलेले असते तेव्हा त्याचा एक छोटासा भाग मात्र वर्षभर कधीच गोठत नाही. यामागचे कारण असे सांगतात की एकदा बौद्ध धर्मगुरू पद्मसंभव अर्थात गुरु रेंपोचे या सरोवराच्या मार्गावरून तिबेटच्या प्रवासाला जात होते. तेव्हा अतिशय थंडीमुळे हे सरोवर गोठलेल्या अवस्थेत होते. त्याकाळी या परिसरात राहणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी गुरु पद्मसंभव यांना विनंती केली असता त्यांनी या सरोवरात आपल्या हाताचे एक बोट बुडवून या सरोवराला आशिर्वाद दिला आणि क्षणार्धात त्या भागातील बर्फाचे पाणी झाले. तेव्हापासून थंडीत देखील जेव्हा हे सरोवर पूर्णतः गोठलेले असते तेव्हाही या सरोवराच्या काही भागातील पाणी कधीच गोठत नाही. हे सरोवर बौद्ध, हिंदू व शीख धर्मियांसाठी एक पवित्र स्थळ मानले जाते. विशेष म्हणजे या सरोवराजवळ फक्त भारतीय नागरिकांनाच जाण्याची परवानगी आहे. परदेशी पर्यटक फक्त थांगु किंवा चोप्ता व्हॅलीपर्यंतच येऊ शकतात. याच कारण, येथून चीनची सीमा फक्त पाच-सात किलोमीटर एवढी जवळ आहे. 


शेवटी गुरुडोंगमार सरोवराजवळ पोहोचलो

पवित्र गुरुडोंगमार सरोवर ... उंची १७१०० फुट

सरोवराचा कधीही न गोठ्णारा भाग

तलावापाशी उभारल्यानंतर तलावाच्या मागील बाजूला माउंट स्वांगचेंगहाओ व चोमो योमो या दोन बर्फाच्छादित शिखरांचे अतिसुरेख असे दर्शन होते. या तलावापर्यंत खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या असून बरेच लोक या तलावाचे पाणी आपल्या जवळील बाटल्यात भरून घेताना दिसले. तलावाजवळच गुरु पद्मसंभव यांचे एक छोटे मंदिर व एक गुरुद्वारा आहे. सध्या दोन्ही ठिकाणे लष्कराच्या ताब्यात असून आम्ही गेलो तेव्हा येथे आत जाणाऱ्या फाटकास कुलूप घातलेले होते. ऑक्टोबर महिन्यात या सरोवराच्या परिसरात बौद्ध धर्मियांचा एक खूप मोठा उत्सव साजरा होतो. त्यावेळी या संपूर्ण सरोवराची परिक्रमा केली जाते. आम्ही सरोवराच्या परिसरात फिरत असताना अचानक बर्फवृष्टीला सुरवात झाली तसे ड्रायव्हरने आम्हाला परत निघण्याची विनंती केली. तसेही ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जास्त काळ येथे कुणी थांबणे योग्य नसते. आपल्याबरोबर आलेले ड्रायव्हर सुद्धा पंधरा-वीस मिनिटांनी आपल्याला परत निघण्यासाठी मागे लागतात. आम्ही जवळपास २० मिनिटे सरोवराच्या परिसरात भटकत होतो पण शेवटी वातावरणाचे बदलते तेवर पाहून आम्ही देखील लाचेनच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. 




सरोवराच्या परिसरातले मंदिर

आता परतीचा प्रवास कांटाळवाणा आणि उगाचच लांबचा वाटायला लागला. खरतर आम्ही ज्या रस्त्याने आलो होतो त्याच रस्त्याने आता परत चाललो होतो. वातावरणातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शरीर थकल्यासारखे वाटायला लागले आणि डोकं देखील दुखायला सुरवात झाली. त्यात पहाटे ४ वाजल्यापासून जागे असल्यामुळे आता डोळेही जड झालेले. बाहेरील वातावरण तर कमालीचे बदलत होते. थोड्याच वेळात आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार पावसाला सुरवात झाली. बाहेरची बदलत जाणारी निसर्गदृशे बघत एक-एक जण कधी निद्रादेवीच्या आधीन झाला ते कळले देखील नाही. थोडे पेंगत तर थोडी झोप काढत कसेबसे दुपारी २ वाजता पुन्हा लाचेन गावात हॉटेलवर पोहोचलो. थोडीफार झोप झाल्यामुळे आता सगळयांनाच जरा बरं वाटायला लागल होतं. आता रूमवर जाऊन पुन्हा मस्त ताणून द्यावे अशी सगळ्यांची इच्छा होती पण आमच्या ड्रायव्हर साहेबांनी गाडीतून उतरतानाच दुपारी ४ वाजेपर्यंत पुढच्या प्रवासाला निघण्याची घोषणा केली आणि आमच्या झोपेच्या स्वप्नाचा पार चक्काचूर केला. पहाटे ५.१५ वाजल्यापासून आत्तापर्यंत १३० किमीचा प्रवास झाला होता आणि त्यात अजून ५० किमीचा प्रवास करून मुक्कामासाठी लाचुंग गाव गाठायचे हा विचार सुद्धा थकायला लावणारा होता. त्यात पहाटे निघायच्या गडबडीत आमच्या खोल्यांमधील सामान जसेच्या तसे पडलेले होते. ते पुन्हा बॅगेत भरण्याचे दिव्य पार पाडायचे होते. हॉटेलवर पोहोचलो तसे जेवण तयार असल्याचे कळाले. या जेवणात मात्र त्यांनी आमच्यासाठी आठवणीने रोटी बनवली होती. खरतर भुकेपेक्षाही आता झोपेची जास्त गरज होती पण थोडक्यात जेवण उरकून रूमवर आलो आणि बॅगा आवरायला घेतल्या. 


सगळी आवराआवरी करेपर्यंत दुपारचे ३.३० वाजले. निघायला अजून तसा अर्धा तास बाकी होता पण या अश्या अर्धवट झोपेने काहीच साध्य होणार नसल्याने आम्ही लाचेन गावातील तिबेटीयन मॉनेस्ट्री बघायला जायचे ठरवले. भुरभूर पडणारा पाऊस आणि आजूबाजूच्या डोंगरांवर उतरलेले ढग, बाहेर एकूणच भन्नाट वातावरण होते. लाचेन मॉनेस्ट्री तशी गावापासून लांब एका डोंगरउतारावर बांधलेली आहे. हॉटेलमधे चौकशी केल्यावर कळाले की मॉनेस्ट्रीकडे जाणारी गाडीवाट थोडी लांबची आणि गावाला पार वळसा घालून जाणारी आहे. त्यापेक्षा हॉटेलच्या अगदी शेजारून जाणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेने फक्त १० मिनिटात तिथे पोहोचता येत होते. अर्थातच हा पर्याय उत्तम होता त्यामुळे ड्रायव्हरला अर्ध्या तासात परत येतो असे सांगून आम्ही पायऱ्या चढायला सुरवात केली. पण जेमतेम ५० पायऱ्या चढून गेलो असू नसू तसे भयंकर दम लागायला लागला. मॉनेस्ट्री तर अजून बरीच लांब वर दिसत होती. पण हळूहळू पायऱ्या मोजत, दम खात १० मिनिटांच्या ऐवजी २५ मिनिटांत लाचेन मॉनेस्ट्रीच्या गेटमधे पावते झालो. पण आमचे दुर्दैव! मॉनेस्ट्रीच्या नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे ती बंद ठेवण्यात आली होती. हॉटेलवाल्याला हे न सांगितल्याबद्दल मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली आणि बाहेरूनच मॉनेस्ट्रीचे काही फोटो काढून ४.३० वाजता गाडीपाशी हजर झालो. पटापट सामान गाडीत टाकले आणि पुढील प्रवासाला निघालो. 


लाचेन मॉनेस्ट्रीचे प्रवेशद्वार

लाचेन मॉनेस्ट्री

लाचेन मॉनेस्ट्री


आजचा मुक्काम ५० किमीवरील लाचुंग या गावी होता ज्या ठिकाणावरून उद्या आम्ही झिरो पॉईंट व युंगथान व्हॅली पहायला जाणार होतो. साधारण तासाभराने आम्ही लाचुंग गावाला जाण्याऱ्या फाट्याजवळ चुंगथांग येथे पोहोचलो. येथे लाचुंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा लष्कराच्या चौकीवर परवाना दाखवण्याचे सोपस्कार पार पाडले. लाचुंग गावाकडे जाणारा रस्ता लाचेनपेक्षा चांगला असल्यामुळे गाडीचा वेग कधी नव्हे तो ताशी २०-३० किमीवरून आता डायरेक्ट ताशी ४०-५० किमीवर आला होता. पुढे थोड्याच वेळात आम्ही एका मोठ्या धबधब्यापाशी थांबलो. या धबधब्याचे नाव होते "भीम नाला फॉल्स". हा धबधबा खूप उंचावरून पडतो त्यामुळे स्थानिक लोक याला "अमिताभ बच्चन फॉल्स" असेलही म्हणतात. या धबधब्याच्या परिसरात एका छोट्या हॉटेलवर चहा घेऊन लगेच पुढच्या प्रवासाला सुरवात केली. 


भीम नाला फॉल्स

@भीम नाला फॉल्स


आता येथून लाचुंग गाव हाकेच्या अंतरावर म्हणजे फक्त ८-१० किलोमीटर राहिले होते. साधारण संध्याकाळी ७ वाजता आम्ही आजच्या मुक्कामाच्या हॉटेलवर पोहोचलो. गावात शिरताच लाचुंग गाव हे लाचेनपेक्षा थोडे मोठे आणि सुखसोयींनीयुक्त असावे असे वाटले. कालच्या मानाने येथे बरीच मोठी हॉटेल्स दिसत होती. आमचा आजचा मुक्काम "Hotel Golden Fish" येथे होता जे कालच्या लाचेनमधील होमस्टेपेक्षा खूपच चांगल्या दर्जाचे होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येथील रूममधे टीव्ही होता त्यामुळे अन्विता जाम खूष झाली. गेले तीन दिवस अजिबात टीव्ही बघायला न मिळाल्याने तिने तडक टीव्हीच्या रिमोटचा ताबा घेतला व कार्टून चॅनेल लावले. येथे गिझर व गरम पाण्याची सुविधा पण उत्तम होती त्यामुळे सगळ्यांनी सकाळची राहिलेली अंघोळ उरकली आणि रात्री ८.३० वाजता जेवायला हजर झालो. जेवणात चक्क वांग्याची व गवारीची भाजी होती आणि मुख्य म्हणजे रोटी न सांगताच बनवलेली होती. बहुदा काल ट्रॅव्हल एजंटला फोन करून तंबी दिल्यामुळे त्याने सगळीकडे रोटी तयार ठेवण्याबाबत फर्मान सोडले असावे. आपला दराराच तसा आहे म्हणा.


चला सिक्कीम फिरुया - भाग ३ - उत्तर सिक्कीममधील लाचुंग, झिरो पॉईंट व युमथांग व्हॅलीची सफर


@ VINIT DATE – विनीत दाते


 

पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... 


Comments

  1. वाह, सुरेखच. मागच्या वर्षी आम्ही गंगटोक वरून भूतान ला गेलो होतो त्या वेळी ठरवलं होतं की उत्तर सिक्कीम ला पुढची ट्रिप करायची. पण आता हा लेख वाचून तुम्ही आमची उत्सुकता अजून वाढवली आहे /\

    ReplyDelete
  2. मस्तच. परीपूर्ण वर्णनामुळे आपणही तिथे फिरत आहोत असे वाटते.

    ReplyDelete
  3. अगदी विस्तृत सविस्तर वर्णन

    ReplyDelete
  4. नमस्कार, खूप छान आणि सविस्तर लिहिले आहे. आवडले. सतत लिहीत रहा. शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. Ek dum mast pics and description

    ReplyDelete
  6. Very well written Vinit. Khup chan

    ReplyDelete
  7. Great Vineet both episode are nicely written

    ReplyDelete
  8. आज निवांत ब्लॉगचे वाचन केले. खूप छान माहिती मिळाली व मार्गदर्शन पण

    ReplyDelete
  9. विनीत मस्त वर्णन केलं आहेस...खूप छान..

    ReplyDelete
  10. खुपच सुंदर...अप्रतिम....छान...तुमच्या लिखाणात जादु आहे.

    ReplyDelete
  11. निवांत वेळ काढुन आज ब्लॉग वाचला. नेहमीप्रमाणे अप्रतिम! घरबसल्या सिक्कीम यात्रा!

    ReplyDelete
  12. बर्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्या असं वाटल आणि विनीत प्रत्येक क्षणाशी जोडला जातो तस जोडल गेल तरच सिक्कीम सारखा प्रदेश आपला वाटू लागतो आम्ही गेलो ते परक्यासारखे अस प्रकर्षाने जाणवले असेच लिहा न जाणार्याना जावसं वाटेल आणि जे माझ्यासारखे जाऊन आले त्याना भ्रमंती करताना काय आणि कसं बघावं ते कळेल ! उशिरा मत दिल्याबद्दल क्षमस्व !

    ReplyDelete
  13. Mast blog punha. Jaam details ani baarik abhyas ahe asa lakshat yeta

    ReplyDelete
  14. वाचताना मजा आली आणि फोटो तर अप्रतिम!प्रवास अगदी लहान सहान नोटेशनसह,वेळेसह,खाण्यात आणि सहकुटुंब गेल्यामुळे 'पिण्यात' आलेले प्रॉब्लेम,तसेच उंचीवर होणारे,झालेले संभाव्य त्रास ,त्यातून काढलेले मार्ग यामुळे हा प्रवास इतका जिवंत केलाय की कमाल!सैनिकांबद्दल वाचून परत परत कौतुकमिश्रित अभिमान वाटला.इतक्या उंचीवर असणारा तो पेट्रोल पम्प ,बर्फ गोठवणार्या थंडीत कधीही न गोठणारा तलाव म्हणजे आश्चर्याच वाटलं.तो बर्फाच्या नजाऱ्याचे,पर्वतरानगांचेफोटो तर अफलातून!!भीमा,अमिताभ बच्चन फॉल्स पण मजेशीर वाटले.ते लोखंडी पूल या हिमालयिन रांगांमध्येच जास्त दिसतात.एकूणच खूप आवडल प्रवासवर्णन!लिहीत राहा ,तुमच्या लिखाणातून आम्हालाही भटकंतीचा अनुभव देत राहा.

    ReplyDelete
  15. Very nice blog. Please keep it up.
    “Travel is the only thing you buy that makes you richer”

    ReplyDelete
  16. विनीत,तुझे दोन्ही ब्लॉग्स वाचले!
    पहिला भाग विशेष महत्वपूर्ण झालाय.
    विषयाचं डिटेलिंग मस्त झालंय एखाद्या टेक्निकल आर्टिकलसारखं पण तरीही लिखाण सुटसुटीत आहे कॉम्प्लेक्स नाही

    ReplyDelete
  17. छानच लिहीलयं. अभिनंदन !!
    मला सुमारे १२ वर्षापूर्वी बघीतलेला सिक्कीम अन गंगटोक आठवले.

    ReplyDelete
  18. Apratmi likhan. All details covered. Photographs are amazing .your blog is as good as the Nature and culture of sikkim. One can easily go for trip using your blog. It is really tempting and feel like I must plan for a visit someday. Worth reading by everyone

    ReplyDelete
  19. बरेच दिवस झाले होते भाग २ ची पोस्ट येऊन. पण वाचण्यास वेळच मिळत नव्हता. आज ठरवले कि भाग २ आणि ३ दोन्ही वाचायचंच. असो. सिक्कीम ला जाण्यासाठीची पूर्वतयारी आणि मग विमान प्रवास (पुणे ते बागडोगरा) प्रवासवर्णन अतिशय सुरेख केले आहे. आणि त्यातील तेथील खरी वस्तुस्थिती सुंदर .... अप्रतिम छायाचित्रासह असल्यामुळे पुढे वाचन करीत राहावेसे वाटते. बागडोगरा ते सिलिगुडी अबब किती सर्व बारकावे आणि प्रवासातील सर्व दृश्ये नदी, पूल, टुरिस्ट परवानगीची माहिती, गंगटोक, नॉर्थ सिक्कीम, गंगटोक शहर, फुलपाखरांचा कालावधी, नयन मनोरम असे धबधब्यांचे फोटो, तिस्ता नदीचे फोटो, लाचेन गावातील कलाकुसर फोटो, गुरुडोंगमार सरोवर, बर्फाच्छादित हिमनगशिखरे, भीमनाला धबधबा, या सर्व ठिकाणचे फोटो पाहून आणि अत्यंत सुरेख असे वर्णन वाचून .... केव्हा एकदा जायला मिळेल असे नक्कीच वाटते आहे. पुढील लिखाणासाठी आणि भटकंतीसाठी शुभेच्छा

    ReplyDelete
  20. अतिशय दुर्मिळ पण सुंदर लेखनाची कला आहे तुमच्याकडे.. हे नुसतंच प्रवासवर्णन वाटलं नाही तर तत्सम विषयावरील एखादी documentary वजा डिस्कवरी चॅनेल ची फिल्म बघतोय असा आभास होत होता. वेळोवेळी वेळ काढून संग्राह्य केलेले छोटे मुद्दे आणि माहिती ही कौतुकास्पद आहेच. लिखाणातील सातत्य इतकं सुंदर आहे की तीव्र इच्छा होते हा प्रवास अनुभवण्याची. ट्रेलर चा पुढचा चित्रपट न दाखवता फक्त रस्त्याचं वर्णन केल्यामुळे प्रत्यक्षात अवघड असणारा प्रवास थोडा सोपा वाटतोय. बघुयात कधी योग येतोय पण त्यावेळेला सुद्धा ह्या लिखाणाचा उपयोग होईल. मनापासून धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana