शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

नाशिक पासून २९ किलोमीटर अंतरावर असणारे त्र्यंबकेश्वर हे आद्य तीर्थक्षेत्र म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. याच त्र्यंबकेश्वर गावाच्या पाठीमागे ब्रम्हगिरीचा भला मोठा पर्वत उभा आहे. “दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपुरी” असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी ब्रम्हगिरीचे महात्म्य सांगितले. दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची मानली जाणारी गोदावरी नदी याच ब्रम्हगिरी पर्वतावर उगम पावते. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य म्हणजे हा ब्रम्हगिरीचा पर्वत. अनेक संत, महर्षी, ऋषी यांनी या पर्वतावर तपस्चर्या केली त्यामुळे या ब्रम्हगिरी पर्वताच्या अनेक पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी येणारे अनेक भाविक या पौराणिक महात्म्यामुळे ब्रम्हगिरी पर्वताची पायी प्रदक्षिणा करतात व हा डोंगर चढून जातात. 


ब्रम्हगिरी पर्वत

मात्र या पौराणिक महात्म्यापुढे ब्रम्हगिरीचे असणारे ऐतिहासिक महत्व थोडे फार डोंगर भटके आणि ट्रेकर सोडल्यास फार कमी लोकांना माहित आहे. इतिहासकाळात श्रीगड तसेच त्र्यंबकगड या नावाने ओळखला जाणारा ब्रम्हगिरी पर्वत हा एक नांदता गड होता. त्र्यंबकगड नावाने ब्रम्हगिरीचे अनेक ऐतिहासिक उल्लेख आढळतात. याच त्र्यंबकगडाला एक उपदुर्ग देखील आहे ज्याला दुर्गभांडार असे म्हणतात. दुर्गभांडार हा तसा स्वतंत्र किल्ला नसून त्र्यंबकगडाचाच एक भाग आहे. तर अशा या ब्रम्हगिरीच्या पौराणिक महात्म्याकडे जास्त न वळता आपण त्र्यंबकगडाची व त्याचा उपदुर्ग असणाऱ्या दुर्गभांडारची एक सहल करू.


ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग.

नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा ब्रम्हगिरी हा किल्ला समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट तर पायथ्यापासून अंदाजे १९०० फुट उंच आहे. याचा घेर १० मैल इतका मोठा असून किल्ल्याच्या जवळ जवळ सर्वच बाजुंनी ३०० ते ४०० फुट उंचीचा कातळकडा आहे. गावातील मंदिरापासून गंगाद्वारकडे जाणाऱ्या रस्त्याने चालू लागले की १५ मिनिटात आपण गंगाव्दाराकडे जाणार्‍या पायर्‍या जिथे सुरू होतात तेथे येऊन पोहोचतो. तिथून डावीकडे एक मोठी पायवाट वर चढत ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाते. या वाटेवर दोन्ही बाजूस चांगली गर्द झाडी असल्याने ती मस्त सावलीतून जाते. अर्धा तास चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक ऐतिहासिक वास्तू आपली नजर तिकडे आकर्षित करते. हि दुमजली इमारत एक जुना वाडाच शोभावा अशी दिमाखदार व सुंदर आहे. मात्र काही कपाळकरंट्या व नतद्रष्ट लोकांनी इतक्या सुंदर वास्तूची सगळीकडे नावे लिहून पार वाट लावली आहे. या इमारतीला तीन कमानी असून कमानीच्या प्रत्येक खांबावर कोरीव शिल्प आहेत. दुसऱ्या मजल्याला नक्षीकाम केलेले खिडकीवजा झरोके देखील आहेत. या वास्तूच्या थोडे मागे एक दगडी बाव बांधलेली दिसते. बहुदा इतिहासकाळात या वास्तूचा धर्मशाळा म्हणून उपयोग होत असावा.

 

किल्ल्याच्या पायऱ्या सुरु होण्याअगोदर उजव्या हाताला हि ऐतिहासिक वास्तू दिसते. 

हि दुमजली वास्तू एखादा सुंदर वाडा असावा किंवा मग पूर्वीच्या काळी वापरली जाणारी धर्मशाळा. 
या वास्तूच्या खांबावर सुंदर मुर्त्या कोरलेल्या आहेत.


ब्रम्हगिरीला जाणाऱ्या पायऱ्या या ऐतिहासिक वास्तू जवळूनच सुरु होतात. किल्ल्यावर चढण्यासाठी उत्तरेच्या बाजुने एका दानशूर व्यक्तीने या ४०० पायर्‍या बांधल्या. या नवीन बांधलेल्या पायऱ्या चढत असताना प्रथम उजवीकडे कातळात खोदलेली एक गुहा लागते आणि थोडे पुढे मारुतीरायाची एक दगडात कोरलेली भव्य मूर्ती. येथून पुढे खऱ्या अर्थाने दगडात कोरलेल्या पुरातन पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. हा पायऱ्यांचा मार्ग म्हणजे चक्क दगडात कोरलेले जिनेच म्हणावे लागतील. कारण उजव्या बाजूला आहे किल्ल्याचा ताशीव कातळकडा तर डावीकडे आहे दगडाची कातळभिंत.


ब्रम्हगिरी किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तरेकडून नवीन बांधलेल्या ४०० पायर्‍या. 

पायऱ्या चढत असताना उजवीकडे कातळात खोदलेली एक गुहा लागते आणि नंतर मारुती व इतर मुर्त्या कोरलेल्या दिसतात.

किल्ल्याच्या या पायऱ्या चढताना माकडांच्या पासून खूप सावध राहावे लागेत. त्यासाठी एखादी काठी जवळ ठेवणे हा उत्तम पर्याय.

नळीतून जाणाऱ्या पायऱ्या चढत आपण किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुख कातळात कोरलेल्या दरवाज्यापाशी पोहोचतो. हे प्रवेशद्वार अत्यंत साधे असून यावर कोणतेही शिल्पकाम नाही. यानंतर पुन्हा काही पायऱ्या चढून आपण किल्ल्याच्या मुख्य दुसऱ्या दक्षिणाभिमुख प्रवेशद्वाराजवळ येतो. हा संपूर्ण कातळात खोदलेला दरवाजा अत्यंत सुबक धाटणीचा असून याच्या दोन्ही बाजूस कमळाची तर मध्यभागी कमानीवर घंटेचे शिल्प कोरलेले आहे. दरवाज्याच्या पायथ्याला दोन्ही बाजूस हत्ती कोरलेले असून त्यांचे अस्तित्व आता जवळ जवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा पार केला कि लगेच आपण किल्ल्याच्या सपाटीवर पोहोचतो. त्र्यंबकेश्वर गावातून येथे पोहोचण्यासाठी साधारण दीड ते दोन तासाचा कालावधी लागतो. या किल्ल्याच्या सपाटीवर चहा, लिंबू सरबत व खाण्यापिण्याची अनेक छोटी दुकाने असून आत्तापर्यंत चढून आलेला थकवा येथे थांबून दूर करता येतो.


कातळात कोरलेला पहिला दरवाजा

गडावर जाणारा कातळकोरीव पायऱ्यांचा जिना

किल्ल्याचा दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा

दुसऱ्या दरवाज्यावर दोन्ही बाजूस कमळ तर मध्यभागी घंटेचे शिल्प कोरलेले आहे. दोन्ही बाजूस हत्ती देखील कोरलेले आहेत.


ब्रम्हगिरीचे पठार खूपच भव्य आणि दक्षिणोत्तर बरेच लांबवर पसरलेले आहे. पठारावर उभे राहिलो कि समोरच एक छोटा डोंगर अडवा येतो. या डोंगराच्या डाव्याबाजूस (दक्षिणेकडे) एक उंच शिखर उठावलेले दिसते ज्याला “पंचलिंग शिखर” म्हणतात तर उजव्या बाजूस (उत्तरेकडे) डाईक सारखी रचना असणारा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला एक मोठा प्रस्तरखंड दिसतो. पठारावरून मागे पूर्वेकडे लांबवर पसरलेले त्र्यंबकेश्वर शहर, अंजनेरी पर्वत आणि त्याच्या शेजारचे नवरा-नवरी सुळके नजरेस पडतात. पठारावर असणाऱ्या गोदावरी उगम स्थान, जटास्थान मंदिर व सिद्धाची गुहा अशा अनेक पौराणिक स्थानांमुळे सर्वच पायवाटा प्रशस्थ व मोडलेल्या आहेत. आपण खाण्यापिण्याच्या या टपऱ्यापासून थोडे बाहेर येऊन समोरील अडवा डोंगर प्रथम चढून जायचा व उत्तरेकडे असणाऱ्या डाईक सदृश टेकडीच्या पायथ्याचे जटामंदिर किंवा जटास्थान गाठायचे. 


किल्ल्याच्या सपाटीवरून त्र्यंबकेश्वर शहर, अंजनेरी पर्वत आणि त्याच्या शेजारचे नवरा-नवरी सुळके


गौतम ऋषींचे गोहत्येचे पापक्षमन करण्यासाठी भगवान शंकराने आपल्या जटा आपटून गंगेला या जटामंदिरात प्रकट केले अशी श्रद्धा आहे. एका खडकावर शंकराने जटा आपटलेल्या खुणा दिसतात आणि तिथेच एक पाण्याची बारीक धार दिसते. मंदिरा शेजारीच एक पाण्याचे टाके असून त्यातले पाणी पिण्यास योग्य आहे. हे मंदिर ब्रम्हगिरीच्या पश्चिमेकडे अगदी कड्यालगतच आहे. मंदिर प्रशासनाने या मंदिर परिसरात व डोंगर कड्याला रेलिंग्ज बसवलेले आहेत. मंदिराबाहेर उभे राहिले असता समोर कापडा, ब्रम्हा, उतवड, फणी असे डोंगर तर हरिहर आणि बसगड हे किल्ले दिसतात.


जटास्थान किवा जटामंदिर

जटामंदिर शेजारील पाण्याचे टाके. पाणी पिण्यास योग्य आहे.


आता आपले पुढचे लक्ष असते ते म्हणजे दुर्गभांडार. जटामंदीरा पाठीमागेच एक वाट ब्रम्हगिरीच्या उत्तर टोकाकडे असणाऱ्या दुर्गभांडारकडे जाते. हि वाट “बिकट वाट” या प्रकारातील आहे. एका बाजूस डोंगर तर डाव्या बाजूस खोल दरी अशी हि वाट सततच्या वापरातील नसल्याने थोडी गचपण, बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेली व घसाऱ्याची आहे. त्यामुळे ट्रेकींगचा योग्य पूर्वानुभव असल्याशिवाय दुर्गभांडार या उपदुर्गावर जाणे टाळावे. या वाटेने काळजीपूर्वक २० मिनिटे चालल्यानंतर उजव्या हातास एक जमिनीत खोदलेले खराब पाण्याचे टाके लागते. या टाक्यापासून एक छोटी अस्पष्ट पायवाट उजवीकडे टेकडीला वळसा घालून पुन्हा ब्रम्हगिरीच्या सुरवातीच्या पायऱ्या किंवा पठारावरील खाण्यापिण्याच्या टपऱ्यापाशी जाते. आपण मात्र टाक्यापासून सरळ पुढे जाणाऱ्या पायवाटेने चालत राहिलो की समोर दिसतो कातळकड्यांनी वेढलेला दुर्गभांडार. 


दुर्गभांडार या उपदुर्गाकडे जाणारी अवघड व घसाऱ्याची वाट

दुर्गभांडारच्या वाटेवर लागणारे पाण्याचे टाके. पाणी पिण्यास योग्य नाही 


दुर्गभांडारकडे जाणाऱ्या वाटेवरून मागे दिसणारे पंचलिंग शिखर

सर्वात डावीकडे कपडा, नंतर ब्रम्हा डोंगर, मागे हळूच डोकावणारा हरिहर (हर्षगड), त्याच्यामागे उतवड डोंगर. तर उजवीकडे दुर्गभांडार 


या ठिकाणावरून दुर्गभांडार दक्षिणोत्तर पसरलेला आणि एका चिंचोळ्या दगडी पुलाने ब्रम्हगिरीला जोडलेला दिसतो. मात्र प्रश्न पडतो कि त्या ठिकाणी पोहोचायचे तरी कसे? थोडे पुढे चालत गेले की या प्रश्नाचे उत्तर लगेच उलगडते कारण समोर येतो चक्क कातळ कोरून जमिनीत खालपर्यंत तयार केलेला जिना. इथेच सुरु होतो दुर्गभांडार किल्ल्याचा आगळावेगळा, चित्तथरारक आणि मंतरलेला प्रवास जो आपण कधीच विसरू शकत नाही. येथे खिंडीच्या सुरवातीलाच एक हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे. पुढे दीड फुटाची एक पायरी अशा पन्नास पायऱ्या उतरल्या कि समोर येतो कातळातला दरवाजा. प्रथमदर्शनी हा दरवाजा पाहून प्रश्न पडतो कि हा नक्की दरवाजा आहे कि खिडकी कारण हा दरवाजा फक्त दोन फुट इतकाच शिल्लक राहिलेला असून बाकी पूर्णपणे जमिनीत गाडला गेलेला आहे. या छोट्या दरवाज्यातून रांगत पलीकडे पोहोचलो कि समोर येतो ब्रम्हगिरी आणि दुर्गभांडार यांना जोडणारा फक्त आठ फुट रुंदीचा दगडी पूल. 


दुर्गभांडारकडे जाणारी भुयार सदृश कातळात कोरलेली वाट 

दुर्गभांडारकडे जाणाऱ्या वाटेवर कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती 

कातळकोरीव जिना आणि शेवटी दरवाजा

हा दुर्गभांडार किल्ल्याकडे नेणारा दरवाजा वरून फक्त २ फूटच शिल्लक आहे. बाकी बहुदा गाडला गेला असावा


हा दगडी पूल सावकाश ओलांडला कि आपण दुर्गभांडार किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. हे प्रवेशद्वार ही अगदी तसेच जमिनीत गाडले गेलेले. रांगत हा दरवाजा पार करायचा कि मग पुन्हा सुरु होतात किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या. या पायऱ्या देखील तश्याच कातळात वर पर्यंत खोदत नेलेल्या. दोन फुटी अवाढव्य अशा या पायऱ्या चढताना चांगलाच दम काढतात आणि खऱ्या अर्थाने आपला दुर्गभांडार किल्ल्यावर प्रवेश होतो. आता थोडी विश्रांती घेण्यासाठी पायवाटेवरच दहा पावलावर असणाऱ्या दोन पाण्याच्या टाक्यापाशी थांबायचं. एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. थंडगार पाणी पिऊन फ्रेश व्हायचं आणि मागे वळून आपण केलेल्या चित्त थरारक प्रवासाचे अवलोकन करायचे. दुर्गभांडार हा गंगाद्वार आणि गहनीनाथांची गुहा असणाऱ्या कातळकड्याच्या बरोबर वर आहे. त्यामुळे येथून गंगाद्वारकडे येणाऱ्या पायऱ्या खूप सुंदर दिसतात. मागे अजस्त्र ब्रम्हगिरी उभा असतो. आपण चालून आलेली चिंचोळी पायवाट पाहून स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची आणि उरलेला किल्ल्याचा भाग बघायला निघायचं.

 

समोर दुर्गभांडार आणि ब्रम्हगिरीला जोडणारा निमुळता दगडी पूल 

पुन्हा कातळकोरीव पायऱ्यांचा मार्ग. या पायऱ्या दीड फुटापेक्षा हि जास्त उंच असल्याने चढताना चांगलाच दम काढतात. 

दुर्गभांडारकिल्ल्याकडील दरवाजा. हा दरवाजा देखील वरून फक्त २ फूटच शिल्लक आहे. 

दुर्गभांडार किल्ल्यावरील पाण्याची टाकी. यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. 

दुर्गभांडार किल्ल्यावरून मागे दिसणारा अजस्त्र ब्रम्हगिरी पर्वत आणि दुर्गभांडार किल्ल्याकडे येणारी चिंचोळी बिकट वाट

दुर्गभांडार किल्ल्यावरून खाली त्र्यंबकेश्वर गाव, गंगाद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या, मागे पहिने नवरा-नवरी डोंगर, मागे अंजनेरी आणि त्याच्या शेजारचे नवरा-नवरी सुळके


दुर्गभांडारचा विस्तार खूपच छोटा आहे त्यामुळे पाचच मिनिटात आपण येतो किल्ल्याच्या शेवटच्या उत्तर टोकावर. येथे पुन्हा कातळ खोदुन तयार केलेली एक खिंड आणि पायऱ्या दिसतात. या पायऱ्या उत्तर टोकाकडे असणाऱ्या दगडी बुरुजाकडे नेतात. हा बुरुज चिलखती बांधणीचा आहे. या बुरुजावर बसून थंडगार वारा अंगावर घेत सभोवताल बघण्यात एक वेगळीच मजा येते. दुर्गभांडारवर याशिवाय दोन तीन जुनी बांधकामाची जोती आहेत मात्र भयंकर वाढलेल्या गवतामुळे ती हुडकणे थोडे अवघड जाते. त्यामुळे आता किल्ल्याला रामराम ठोकून आल्या रस्त्यानेच तोच चित्तथरारक प्रवास पुन्हा अनुभवत सावकाश जटामंदिरापाशी पोहोचायच. 


बुरुजाकडे जाण्यासाठी कातळ फोडून तयार केलेली चिंचोळी वाट आणि पायऱ्या

किल्ल्याच्या उत्तर टोकावरील दगडी चिलखती बुरुज 


जटामंदिरापासून मळलेली प्रशस्थ पायवाट पश्चिमकड्याच्या बाजूबाजूने दक्षिणेकडे असणाऱ्या गोदावरी उगमस्थानापाशी जाते. येथे एक घडीव दगडातील शिवमंदिर बांधलेले असून त्याला ब्रम्हगिरी मंदिर म्हणतात. पुढे गोदामाईची मूर्ती व गौमुखातून गोदावरी नदीचं उगम स्थान असणारे गोदातीर्थ आहे. तसेच पुढे चालत गेलो कि एका मंदिरात कनक ऋषी आणि गौतम ऋषी पती-पत्नी अशी जोडीने बसलेली मूर्ती दिसते. हा मंदिर परिसर मात्र नव्याने बांधलेला वाटतो आणि या परिसरात भाविकांची वर्दळ देखील जास्त असते. आपण या गर्दीतून बाहेर पडायचं आणि पंचलिंग शिखराच्या बाजूने ब्रम्हगिरीच्या दक्षिण टोकाकडे निघायच. 


गोदावरी उगमस्थाना पासून दिसणारा ब्रम्हगिरी डोंगराचा विस्तार आणि समोरील विहंगम दृश

ब्रम्हगिरी मंदिर अथवा गोदावरी उगम स्थान


दक्षिण टोकाकडे जाताना एक छप्पर नसलेले दारूकोठार दिसते. याच दक्षिण टोकाकडे ब्रम्हगिरी किल्ल्यावर पायथ्याच्या “मेट” गावातून येणारा महादरवाज्याचा किंवा हत्तीमेटचा एक मार्ग आहे असे श्री. भगवान चिले व अमित बेलोरे यांच्या पुस्तकातून वाचण्यात आले होते. मात्र दक्षिण टोकावर बराच शोध घेऊनही आम्हाला हा दरवाजा सापडला नाही. याच महादरवाज्याच्या वाटेवर किल्ल्याच्या हत्तीमेटाची जागा, दगडी बुरुज, मातीत गाडले गेलेले एक मंदिर व बांधीव तटबंदीचे काही अवशेष सापडतात. आता हे सर्व न पाहिलेले अवशेष बघण्यासाठी ब्रम्हगिरीची अजून एक भेट मात्र नक्की घ्यावी लागणार.


दक्षिण टोकावर दिसणाऱ्या काही जुन्या वास्तूंचे अवशेष

किल्ल्याच्या दक्षिण टोकावरून दिसणारे पंचलिंग शिखर 

त्र्यंबकगडाचा इतिहास फार मोठा आहे त्यामुळे आत्ता पर्यंत माझा ब्लॉग वाचून गडफेरी केलेल्या वाचकांना तो सर्व इतिहास वाचायला लावून आणखी वेळ घालवत नाही. त्यामुळे हा धावता इतिहास पाहू. त्र्यंबकगडाचा प्रथम उल्लेख इसवी सन १२०० च्या सुमारास आढळतो. १२७१ ते १३११ या दरम्यान देवगिरीचा राजा रामदेव याच्या भावाचा अंमल या परिसरावर होता. नंतर हा किल्ला बहनमी सत्तेच्या अधिपत्याखाली होता. १५५३ च्या आसपास निजामशहा पहिला याच्या ताब्यातील किल्ल्यांमध्ये त्र्यंबकगडाचा उल्लेख आढळतो. पुढे १६३३ ते १६३६ हा किल्ला निजामशाहीच्या वतीने शहाजीराजांकडे होता. निजामशाहीच्या अस्तानंतर तो मुघलांकडे गेला. १६७० मधे हा किल्ला मोरोपंत पिंगळे यांनी स्वराज्यात आणला. १६९१ मधे तो मुघलांनी पुन्हा जिंकून घेतला. १७५० च्या दरम्यान पेशवेकाळात गड पुन्हा मराठ्यांकडे आला. आणि सरते शेवटी सर्वच गिरीदुर्गा प्रमाणे १८१८ मधे त्र्यंबकगड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. 


ब्रम्हगिरीचा किल्ला संपूर्ण पाहण्यास व दुर्गभांडारला भेट देण्यासाठी किमान ८ तासाचा कालावधी जवळ हवा. त्यामुळे त्र्यंबकेश्वर गावात रात्रीचा मुक्काम करून सकाळी लवकर ब्रम्हगिरी पाहण्यासाठी जावे. त्र्यंबकेश्वर हे मोठे तीर्थक्षेत्र असल्याने राहण्याच्या व जेवणाच्या असंख्य सोयी गावात उपलब्ध आहेत. वेळ हाती असल्यास ब्रम्हगिरी पर्वताच्या आसपास असणारे गंगाद्वार तीर्थ, गोरक्षनाथ व गह्नीनाथ यांच्या गुहा, निवृत्तीनाथांचे समाधी स्थान अशा गोष्टी पाहू शकतो. 


सरते शेवटी एकच विनंती “पाऊलखुणा शिवाय मागे काही ठेऊ नका आणि सुखद आठवणी शिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि पश्चिम घाट हि आपली नैसर्गिक साधन संपत्तीने आहे. त्याला पडणाऱ्या प्लास्टिकच्या विळख्यातून वाचवा”.

© VINIT DATE – विनीत दाते१६ टिप्पण्या:

 1. सुंदर डॉक्युमेंटेशन. पुन:प्रत्ययाचा अनुभव दिलात. धन्यवाद. प्रज्ञा पिसोळकर

  उत्तर द्याहटवा
 2. खूप छान विस्तृत माहिती आणि फोटोग्राफ्स मुळे खरोखर गड फिरल्याचा फील आला.. खूप खूप धन्यवाद विनीतजी ...

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद रूपेशजी. प्रयत्न तसाच आहे की घर बसल्या किल्ल्याची सैर व्हावी

   हटवा
 3. प्रत्युत्तरे
  1. धनयवाद लिमये sir ... तुमचा दुर्गभांडारवरचा ब्लॉग वाचला तोही केवळ अप्रतिम लिहलाय

   हटवा
 4. उपयुक्त माहिती!
  दुर्गभांडारचा माकडांनी भेदरवण्याचा आमचा थरारक अनुभव आठवला.
  भास्कर-हर्ष-त्र्यंबक-अंजनेरीवर कोरीव 'जिन्या'चं दुर्गस्थापत्य हा समान धागा दिसतो.
  मस्त फोटो आणि लिखाण!

  उत्तर द्याहटवा
 5. उपयुक्त माहिती!
  दुर्गभांडारचा माकडांनी भेदरवण्याचा आमचा थरारक अनुभव आठवला.
  भास्कर-हर्ष-त्र्यंबक-अंजनेरीवर कोरीव 'जिन्या'चं दुर्गस्थापत्य हा समान धागा दिसतो.
  मस्त फोटो आणि लिखाण!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद साई. माकडांचा अनुभव आम्हालाही आला. दोंघांच्या हातात काठ्या असून पण ते जुमानत नाहीत. पायऱ्या बद्दल सही पकडे है.

   हटवा
 6. वाह... डॉक्युमेंटेशन मस्त... साई आणि लिमये सरांचा ब्लॉग वाचलाच आहे ह्या किल्ल्याबद्दल... पण आमच्या गुरुवर्य ढमढेरे काकांच्या तोंडून कधीतरी दुर्गभांडार चा थरारक किस्सा नक्की ऐक... अंगावर शहारे येतील...
  ब्लॉग लिहायला सुरवात केलीस हे छान केलंस... गुड... कितीदिवस आम्ही तरी गुगल प्लस मार्फत तुझं लिखाण वाचणार ?
  ओव्हरऑल मस्त...

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद दत्तू. होय, दुर्गभांडार प्रत्येक भेट देणाऱ्या भटक्याला थोड्याफार फरकाने नक्कीच थरारक अनुभव देतो. आम्हालाही तो साईसारखाच माकडांच्या त्रासाने मिळाला. बाकी ढमढरे काकांची निवांत भेट घ्यायचीच आहे. बघू कधी योग जुळवू येतो ते. पुनश्च धनुर्वाद :)

   हटवा