पावनगड

दुर्लक्षित एकांडा पावनगड



कथा किंवा कांदबरीमधून आपण जुळ्या भावांविषयी विषयी नेहमीच ऐकत असतो तशीच दुर्गविश्वातही काही जुळी भावंडे आढळतात. मग तो नाशिक जिल्यातील रवळ्या-जावळ्या असो, पुणे जिह्यातील लोहगड-विसापूर असो किंवा मग पुरंदर-वज्रगड. या जोड किल्ल्यांप्रमाणेंच कोल्हापूर जिल्ह्यांतील पन्हाळा-पावनगड ही दुर्गजोडी देखील इतिहासात प्रसिद्ध आहे.

पन्हाळगड किल्ला माहित नाही असा दुर्गप्रेमी विरळाच. मराठ्यांच्या इतिहासातले अनेक महत्वाचे प्रसंग पन्हाळगडावर घडले त्यामुळे वर्षभर अनेक पर्यटक पन्हाळागडाला भेट देत असतात. मात्र त्याच्या शेजारीच असणाऱ्या पावनगडाला भेट देणाऱ्यांची संख्या अतिशय नगण्य आहे. पावनगड हा पन्हाळा किल्ल्याचाच एक भाग मानला गेल्याने कायम दुर्लक्षित राहिला. मात्र तो पन्हाळा किल्ल्याशेजारी असणारा एक स्वतंत्र जोडकिल्ला आहे. पन्हाळा किल्ला पूर्ण समजून घ्यावयाचा असेल, तर पावनगडाचे महत्त्व फार मोठे आहे. कारण पन्हाळा किल्ल्यावर जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली तेव्हा त्याचे पहिले वार या पावनगडानेच झेलले आहेत. एप्रिल १७०१ मध्ये औरंगजेबाने पन्हाळा आणि त्याचा उपदुर्ग म्हणजे पावनगड जिंकून घेण्याची योजना आखलेली होती. पण औरंगजेबाला पन्हाळा तर सोडाच पण पावनगड जिंकून घेण्यात सुद्धा यश आले नाही. अखेरीस भलीमोठी रक्कम घेऊन मराठा किल्लेदारांने २८ मे १७०१ रोजी पन्हाळा आणि पावनगड हे दोन्ही किल्ले मोगलांच्या हवाली केले. येथेच पावनगडाचे महत्व सिद्ध होते.

जोडकिल्ले हे शक्यतो एकाच राजाच्या कारकिर्दीत बांधले जातात. त्याचप्रमाणे पन्हाळगडासारखाच पावनगड किल्ला बांधण्याचे श्रेय देखील शिलाहार राजा भोज दुसरा (नृसिंह?) याच्याकडे जाते. मात्र शिलाहारांच्या काळात हा किल्ला फक्त एक चौकीचे छोटे ठाणे होता. त्यानंतर हा डोंगर अनेक वर्षे ओस पडून होता. या डोंगराला तट, बुरूज, दरवाजा, जुन्या वास्तू, मंदिरे असा किल्ल्याचा साज चढवून पुन्हा वसवण्याचे खरे श्रेय जाते ते गडपती शिवरायांना. मार्च १६६० मध्ये सिद्दी जौहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिला तेव्हा याच मार्कंडेय डोंगराच्या पूर्व बाजूने पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला. भविष्यातील हा धोका ओळखून शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये पन्हाळा किल्ला दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर या मार्कंडेय डोंगराला बंदिस्त तटाबुरुजांचे बांधकाम करून पुन्हा वसवले आणि त्याला पावनगड हे नाव दिले.

कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ गावापासून पन्हाळय़ाकडे जाताना डाव्या बाजूस दिसणारा डोंगर म्हणजेच पावनगड. या वाघबीळ गावातून पावनगड डावीकडे ठेवतच गाडीरस्ता बुधवार पेठेतून (पुण्याची नाही बर का :)) पन्हाळगडावर जातो. समुद्रसपाटीपासून ३१०० फुट उंचीवर असणाऱ्या पावनगडावर पोहचण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे थेट गाडी रस्त्याचा तर दुसरा म्हणजे २० मिनिटांची खडी चढाई करून किल्ल्यावर जाणारा.

यापैकी गाडी रस्त्याचा मार्ग हा पन्हाळगडाच्या पूर्वेकडे असणाऱ्या काळी बुरूजाजवळून रेडेघाटीच्या रस्त्याने एका खिंडीतून पावनगडावर येतो. किल्ल्यावर असणारा लुगडबंद फकिराचा दर्गा आणि मोठ्याप्रमाणावर असणारी वस्ती यामुळे पावनगडाच्या भग्न पश्चिम दरवाज्यातून थेट गाडी रस्ता किल्ल्यावर आला आहे. तर पावनगडाचा पायी चढून जाणारा मार्ग पन्हाळगडाच्या अलीकडे असणाऱ्या बुधवार पेठेतील "पन्हाळा पब्लिक स्कूल" समोर असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमागून डोंगराच्या पदरातून नागमोडी वळणे घेत व खडा चढ चढत पावनगडावर जातो. या मार्गाने गडाच्या भग्न तटबंदीतून आपला गडप्रवेश होतो.

बुधवार पेठेतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमागून पावनगडाचा डोंगर चढण्यास सुरवात करताच शाळेमागे पायवाटेवरच उजव्या बाजूस मारुतीरायाचे एक मंदिर लागते. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम जोरात सुरु असले तरी आतील बाजूस पूर्वीचे घुमटी वजा छोटे मंदिर तसेच ठेवले आहे. या मंदिरातील बलभिमाची मूर्ती मात्र थोडीशी वेगळीच वाटते. शक्तीची देवता असणारा मारुती इथल्या मूर्तीत थोडासा स्थूल दिसतो. शेपूट व हात उगारलेल्या या मारुतीच्या मांड्या व पोट थोडे मोठे दाखवलेले आहे. पिळदार शरीर यष्टीचा मारुती मी नेहमीच पहिला आहे पण याआधी अशी मारुतीची मूर्ती पाहिलेली आठवत नाही. तर असो! मारुतीला नमन करायचे आणि मळलेल्या पायवाटेने गडाचा डोंगर चढायला सुरवात करायची.

पावनगडावर चढून जायच्या वाटेवर शाळेमागे असणारे हनुमंतांचे मंदिर

शाळेपासून फक्त २० मिनिटात आपण गडावर पोहोचतो. भग्न तटबंदीतून आपला जेथे गडप्रवेश होतो तेथे असणाऱ्या पायऱ्यांच्या अवशेषांवरून इतिहासकाळात बहुदा येथे गडाचा एकदा दरवाजा असावा असे वाटते. पण सध्या मात्र त्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. गडावर पोहोचताच समोर पसरलेला पन्हाळगड आपले लक्ष वेधून घेतो. आता आपण ज्या पायवाटेने गडमाथ्यावर आलो तीच वाट पुढे गडाच्या मध्यावर घेऊन जाते.

पावनगडावर येथून आपला गड्प्रवेश होतो
पावनगडावरून दिसणारा पन्हाळगड

या पायवाटेने चालत जाताच समोर एक प्राचीन असे काळ्या पाषाणातील मंदिर आपले लक्ष वेधून घेते. मात्र या मंदिरापर्यंत पोहोचण्याआधीच आपल्याला काही कातळकोरीव पायऱ्या जमिनीत उतरताना दिसतात. जवळ जाऊन पाहीले असता लक्षात येते कि या पायऱ्या एका लांबलचक आयताकृती विहिरीत उतरत आहेत. हि विहीर जमिनीखाली कातळात खोदत नेलेली आहे. त्यामुळे पावनगडावरील हि विहीर पाहिल्यावर आपल्याला चटकन कोल्हापूर जिल्ह्यातील सामानगडावरील विहिरींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. जसे जसे विहिरीच्या पायऱ्या उतरून खाली जायला लागू तस तसे वातावरणातला थंडपणा वाढायला लागतो. विहिरीत बऱ्यापैकी पाणी शिल्लक असले तरी झाडांचा पालापाचोळा व वरून पडलेल्या मातीमुळे आता ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. थोडे निरखून पाहीले असता विहिरीच्या आत एक दगडी कमान देखील खोदलेली दिसते. पुन्हा पायऱ्या चढून विहिरी बाहेर आले असता जवळच पाणी साठवण्याचे एक जुने दगडी भांडे ठेवलेले दिसते.

पावनगडावरील विहीर
विहिरीच्या आता नीट पाहिल्यास एक दगडी कमान बांधलेली दिसते.
विहिरीजवळ ठेवलेले पाणी साठवण्याचे जुने दगडी भांडे

विहिरी पहायची आणि लगेच समोर दिसणाऱ्या काळ्यापाषाणातील सुंदर मंदिराकडे आपला मोर्च्या वळवायचा. मंदिराच्या दगडी बांधणीवरून ते खूपच पुरातन वाटते. मंदिरावर कोणतेही कोरीवकाम अथवा नक्षीकाम केलेले नसले तरी मंदिर खूपच आकर्षक दिसते. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची गर्भगृह व सभामंडप अशी रचना केलेली आहे. गर्भगृह व सभामंडपाला समोरासमोर दगडात कोरलेल्या दोन खिडक्या काढलेल्या आहेत. मंदिराचा सभामंडप सहा दगडी खांबांवर तोललेला असून सभामंडपात चारी बाजूला चार कोनाडे आहेत. गर्भगृहाचे (गाभारा) प्रवेशद्वार अगदी साधे असून द्वारपट्टीकेवर गणेशाची एक सुबक मूर्ती कोरलेली आहे. मंदिराचा गाभारा प्रशस्थ असून आत शिवपिंड ठेवलेली आहे. पण हि शिवपिंड व सभामंडपातील नंदी दोन्ही नंतरच्या काळात बसवल्याचे ठळकपणे जाणवते त्यामुळे हे मुळ मंदिर महादेवाचेच होते का अजून कोणा इतर देवतेचे हे सांगणे थोडे कठीण आहे. मंदिराच्या बांधणीवरून हे मंदिर शिवकालातील (१६४७ ते १७०७) अथवा पूर्व पेशवाईतील (१७०८ ते १७४९) असल्यासारखे वाटते.

गडाच्या मध्यावर असणारे काळ्या पाषाणातील सुंदर मंदिर


मंदिरातील अवशेष

मंदिरासमोर नंदीमंडपासारखी एक छोटी घुमटी वजा मंडप आहे मात्र त्या मधे नंदी अथवा इतर कोणतीही देवता स्थापन केलेली नाही. या छोट्या मंडपाशेजारीच भव्य वाड्याची वास्तू असून त्याच्या फक्त बाजूच्या काही भिंती व दर्शनी भाग तेवढा टिकून आहे. मंदिराच्या मागे एक छोटी घुमटी दिसते जी आहे पावनगडावरील घृतविहीर म्हणजे तुपाची विहीर. ही विहीर म्हणजे एक छोटा हौद असून त्यावर छत घातलेले दिसते. आज जरी त्यात पाणी व कचरा साठलेला दिसत असला तरी शिवकाळात बऱ्याच किल्ल्यांवर अश्या विहिरीत तूप साठवण्याची व्यवस्था केलेली होती. औषधे बनविण्यासाठी तसेच सैनिकांच्या जखमांवर लावण्यासाठी या विहिरीमधील तूपाचा वापर होत असे.

जुन्या वाड्याचे अवशेष
गडावरील तुपाची विहीर

कातळात खोदलेली पाण्याची विहीर, शिवकालीन तुपाची विहीर, काळ्यापाषाणातील शिवमंदिर, त्यासमोर असणारा नंदीमंडप व भग्न वाडा इत्यादी गडाच्या मध्यावरील अवशेष पाहून आपला मोर्च्या आता गडाच्या पूर्व टोकाला असणाऱ्या बुरुजाकडे वळवायचा. गडाच्या मध्यावरून साधारण दहा मिनिटात आपण गडाच्या या पूर्व टोकावर पोहोचतो. येथे एक भव्य बुरुज आणि त्यावर डौलात फडकणारा भगवा आपले स्वागत करतो. बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या उद्ध्वस्त झालेल्या असल्याने थोडी कसरत करतच या बुरुजावर चढावे लागते. मात्र बुरुजावर चढण्यासाठी वाया घालवलेले हे श्रम अजिबात व्यर्थ जात नाहीत. बुरुजावर चढताच भर्राट सुटलेला अनिर्बंध वारा काही वेळ आपल्याला इथे उभा देखील राहू देत नाही.

गडाचा पूर्वे टोकावरील भव्य बुरुज


थंडगार वारा अंगावर घेत बुरुजावरून आजूबाजूचा जो काही सुंदर नजरा दिसतो त्याला मात्र तोड नाही. गडाच्या डोंगरालगत उंचच उंच झाडांचे मस्त जंगल पसरलेले आहे. येथे सूर्यास्तावेळी किंवा भल्या सकाळी आजूबाजूच्या दाट झाडीतून ऐकू येणारा विविध पक्षांचा किलबिलाट मनाला मोहून टाकतो. भर मे महिन्यातही हिरवागार दिसणारा आजूबाजूचा प्रदेश पाहून कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एक सधन भाग का म्हणले जाते याचे उत्तर चटकन मिळून जाते. या पूर्व टोकावरून समोरच 'दख्खनचा राजा' व लाखो भाविकांचे कुलदैवत असणारा जोतिबाचा डोंगर देखील सुंदर दिसतो.

पूर्व टोकावरून दिसणारे पायथ्याचे जंगल
पूर्व टोकावरून समोर ज्योतिबाचा डोंगर


पूर्वेकडील बुरुजावरून दिसणारा सगळा नजरा डोळ्यात साठवून खाली उतरायचे आणि गडाचा तट डावीकडे ठेवत दक्षिण टोकाकडे चालयला सुरवात करायची. पुढच्या पाचच मिनिटात एका दर्ग्याच्या बाजूने असणारी लोखंडी तारांची कुंपणाची सीमा रेषा आपला हा तट फेरीचा रस्ता अडवते. हा आहे पावनगडावरील "लुगडबंद" फकिराचा दर्गा. दर्ग्याच्या परिसरात प्रवेश करताच समोर दोन तोफा अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. दर्ग्यात जाण्यासाठी पायर्‍यांवरून खाली उतरुन जावे लागते. इथे पूर्वी मार्कंडेय ऋषींची प्राचीन गुहा होती पण नंतर त्याचे कबरीत रुपांतर झाले (संदर्भ पुस्तक : दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे - भगवान चिले). सध्या मात्र येथे बघण्यासारखे काही नाही असे सांगून येथील लोक आपल्याला वाटेला लावतात त्यामुळे हि गुहा पाहता आली नाही. दर्ग्याच्या भिंतीवर एके ठिकाणी दोन दगडी कमळ कोरलेले मात्र स्पष्टपणे दिसतात.

दर्ग्याच्या आवारात असणाऱ्या दोन तोफा
दर्ग्याचा परिसर

दर्ग्याच्या परिसरातील अवशेष पाहून पुन्हा तटाकडेने फेरी मारण्यास सुरवात करायची. या गडफेरीत आपल्याला अनेक ठिकाणी पावनगडाची भक्कम तटबंदी नजरेस येते. ज्या ठिकाणी सुरक्षेची गरज भासली त्याठिकाणी दगडाची भिंत उभारण्यात आली आहे. दाट झाडीतून तटाकडेने फेरी मारत आपण पावनगडावर येणाऱ्या गाडी रस्त्याला येऊन मिळतो. या गाडी रस्त्याने पुन्हा गडाच्या मध्याकडे जायला लागताच रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणारी मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात.

गडावरील तटबंदीचे अवशेष

तीन मंदिरापैकी रस्त्याच्या उजव्या हातास असणाऱ्या पहिल्या मंदिरात जाण्यासाठी रस्त्याकडेला काही दगडी पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढून जाताच समोर एकावर एक दगड रचून तयार केलेल्या कुंपणाच्या आवारात एक छोटेखानी महादेवाचे मंदिर दिसते. येथे मंदिरासमोर एक दगडी दीपमाळ, स्तंभ, गणेशाची मूर्ती, दोन शिवलिंग व नंदी असे भग्नावशेष आहेत. हे मंदिर पाहून पुन्हा गाडी रस्त्यावर परत यायचे आणि आता रस्त्याच्या डावीकडे थोडे आत असणाऱ्या दुसऱ्या मंदिराकडे निघायचे. हे आहे गडावरील देवीचे मंदिर. या छोट्या दगडी मंदिरावरील असणारी दोन कोरीव शिल्पे आवर्जून पाहण्यासारखी आहेत.

रत्याच्या उजव्या बाजूस असणारे महादेवाचे मंदिर

महादेवाच्या मंदिर परिसरातील भग्न अवशेष
हि दोन्ही मंदिरे पाहून आपला मोर्चा समोर दिसणाऱ्या तिसऱ्या व शेवटच्या मंदिराकडे वळवायचा. हे मंदिर रस्त्याच्या डाव्या बाजूला पण रस्त्याला लागुनच आहे. या दगडी मंदिराबाहेर हनुमंतांचे एक भग्न शिल्प ठेवलेले आहे. हि तिन्ही मंदिरे पाहून आपण गडावर येणाऱ्या रस्त्याने पुन्हा गडाच्या मध्यवस्तीत दाखल होतो आणि येथेच आपली साधारण १ तासाची गडफेरी पूर्ण होते. परतीच्या प्रवासासाठी गड चढून आलेला मार्ग वापरावा किंवा मग लागुनच असलेल्या पन्हाळगडाला भेट द्यायची असल्यास पावनगडावर येणाऱ्या रस्त्याने पन्हाळगडावर जावे.

रस्त्याच्या डावीकडे असणारे देवीचे मंदिर

रस्त्याच्या डावीकडे असणारे तिसरी दगडी मंदिर

पावनगड हा शिवरायांनी वसवलेला एक किल्ला आहे. या किल्ल्याचे बांधकाम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या अर्जोजी यादव आणि हिरोजी फर्जंद या शिलेदारांना शिवरायांनी खुष होऊन प्रत्येकी पाच हजार होन बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला होता. पुढे १७०३ मधे जेव्हा औरंगजेबाने पन्हाळगडा बरोबर पावनगडाला वेढा दिला तेव्हा सर्जेराव घाटगे या मराठा सरदाराने मोठा पराक्रम केला. अनेक दिवस हा गड त्याने झुंजवत ठेवला. पण शेवटी १७०५ मधे पावनगड मुघलांच्या ताब्यात गेला व औरंगजेबाने त्याचे नाव रसूलगड असे ठेवले. पुढे सन १८४४ मध्ये हा पावनगड आणि पन्हाळा ब्रिटिशांना देण्यात आला. त्यानंतर काही वर्षांत या गडाची प्रचंड हानी झाली. इंग्रजांनी इतर किल्ल्याबरोबरच पावनगड देखील उद्ध्वस्त करून टाकला. गडाची दोन प्रवेशद्वारे तेव्हाच उद्‌ध्वस्त करण्यात आली.

मग जाताय ना या शिवनिर्मित पावनगडावर! तुमच्या पुढच्या पन्हाळगड भेटील या दुर्लक्षित किल्ल्याला नक्की भेट द्या.

@ VINIT DATE – विनीत दाते


ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 


“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.



Comments

  1. फार सुंदर पोस्ट, अवशेषांचे वर्णन अगदी in detail

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अजय! तुझ्यासारख्या दुर्ग भटक्याची प्रतिक्रिया पाहून आनंद वाटला. तू या किल्ल्यावर जाशील तेव्हा या किल्ल्याच्या नकाश्याचा एक मस्त स्केच नक्की बनव

      Delete
    2. सुंदर लिखाण....
      अशीच अविरत अभ्यासपूर्ण भटकंती आपल्या कडून घडत राहो.
      सुनील पिसाळ

      Delete
    3. धन्यवाद सुनीलजी

      Delete
  2. विनीत छान माहिती! ब्लॉग वाचून फेरी होते!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तुषार भाऊ!

      Delete
  3. दाते साहेब, उत्कृष्ट पावनगड किल्ला वर्णन, अजोड आणि अद्वितीय बांधकामातील एक मोती, ज्याचे आपण अचूक आणि फोटो देऊन वर्णन केले आहे. असे अनेक दुर्ग, किल्ले, गडकोट असतील ज्यांना माहिती स्वरूपात जगासमोर यायचं आहे, तो सर्व इतिहास छोटा का होईना लोकांसमोर निदान आपल्या मराठी माणसाला कळला पाहिजे. ही सहयाद्रीच्या अंगावरील वैभवं आहेत, जतन करणं आपलं काम! जय महाराष्ट्र

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गणेशजी! तुमचे म्हणणे अगदी बरोबर. छोट्यातला छोटा आणि अल्पपरिचित किल्ला मराठी माणसाला कळला पाहिजे याच उद्देशाने ब्लॉग लेखन करत आहे.

      Delete
  4. विनीत ,
    हे दुर्लक्षित किंवा अपरिचित गडांबद्दल तु जी माहिस आणि संदर्भ देतोस त्याबद्दल सर्व गडप्रेमी तुझ्या सदैव ऋणात राहतील ...छान !!!!

    ReplyDelete
    Replies
    1. मिलिंद दादू! खूप खूप धन्यवाद या सुंदर प्रतिक्रियेबद्दल. अश्या प्रतिक्रिया नक्कीच लिहण्यासाठी प्रोत्चाहन देतात.

      Delete
  5. छान माहिती विनीत

    ReplyDelete
  6. छान माहिती विनीत

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनुप काका!

      Delete
  7. खूप खूप छान भ्रमंती घडवून आणली. खूप छान माहिती खूप धन्यवाद

    ReplyDelete
  8. चालत जाण्याच्या वाटेने आता पावसाळ्यात जाणं कितपत योग्य ठरेल

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana