सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ४

सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ३ पासून पुढे ...

 

दिवस सातवा: शनिवार, २८ ऑक्टोंबर २०१७

================================

 

सिरसी हे उत्तर कर्नाटकाच्या हसन जिल्हयातील एक थंड हवेचे ठिकाण. हिरव्यागर्द झाडीने वेढ़लेले हे शहर सुपारीच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. आजुबाजुच्या अनेक गावांतील सुपारी सिरसीमधे विक्रीसाठी येते आणि येथून ती देश-विदेशात देखील पाठवली जाते. त्याचबरोबर कोस्टल कर्नाटक फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे सिरसी हे एक आवडते शहर. याच कारण म्हणजे या शहराच्या परिसरात पर्यटकांना भटकण्यासाठी याना केव्ह्ज, मरीकाम्बा मंदिर, उंचाल्ली धबधबा, सहस्रलिंग, बनवासी, मुगोड धबधबा, सोंडे मठ, तिबेटीयन मोनेस्ट्री अशी एक ना अनेक सुंदर ठिकाण आहेत. सिरसी शहरात मुक्काम करून दोन दिवसात ही सर्व ठिकाण अगदी निवांतपणे पाहता येतात.


आमच्या कोस्टल कर्नाटकाच्या ट्रीपला सुरवात करून बघता बघता ६ दिवस पूर्ण झाले. आता उरलेले दोन दिवस सिरसी गावात राहून आजूबाजूला असणारी प्रसिद्ध पर्यटन स्थळ बघायची आणि रविवारच्या सकाळीच म्हणजे २९ ऑक्टोबरला सांगलीच्या दिशेने परतीचा प्रवास करायचा असा एकूण कार्यक्रम ठरला. आत्तापर्यंत तरी ट्रीप अगदी ठरवल्याप्रमाणे सुरळीत चालली होती. सगळ्यात महत्वाच म्हणजे पुण्यातून निघाल्यापासून गेल्या ७ दिवसात जवळपास १५०० किमीचा प्रवास होऊन देखील माझी छोकरी अन्विता अजिबात कंटाळलेली नव्हती. खरच लहान मुलात मोठ्यांपेक्षा किती स्टॅमिना असतो नाही! 


तर नेहमीपेक्षा आजच्या दिवसाची सुरवात थोडी निवांतच झाली कारण आज सिरसी गावाच्या आजूबाजूला असणारी मोजकीच ठिकाण पाहून पुन्हा याच हॉटेलवर मुक्कामासाठी परत यायचं होत. पोटभर नाष्टा करून अगदी निवांत ९.३० वाजता हॉटेल सोडलं आणि याना रॉक्स पहायला निघालो. काही ठिकाण पाहतच तोंडातून “वाह्ह” असे उद्गार बाहेर पडतात अगदी त्यापैकी एक म्हणजे निसर्गाच्या दाट कोंदणात लपलेल्या याना केव्हज. सिरसीपासून फक्त ४० किमी अंतरावर उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कुमठा गावाजवळ घनदाट जंगलात याना गाव वसलेले आहे. सिरसी गावातून बाहेर पडताच सिद्धापूर रस्त्याला लागायचं की पुढे निलेकणी == हेग्डेकट्टा == देवनाहल्ली अशी गावे ओलांडत आपण याना केव्ह्जच्या पार्किंगजवळ पोहोचतो. येथे शेवटचा १५ किमीचा रस्ता दोन्ही बाजूची हिरवीगार झाडी आणि वळणावळणाचा असल्यामुळे कधी संपूच नये असा वाटत राहतो. 

 

कर्नाटकाच्या जंगलात फिरणारी आमची सह्याद्री एक्सप्रेस
याना रस्त्यावरील सुंदर निसर्ग
रस्त्याच्या दुतर्फा असलेले सुंदर घनदाट जंगल


याना येथे पोहोचताच प्रशस्थ वाहनतळावर आपली गाडी उभी करायची आणि इथून पुढचा साधारण दोन किमीचा कच्चा मातीचा रस्ता पायीच चालत पार करायचा. या रस्त्याने चालताना अजिबात कंटाळा येत नाही. भर दुपारीसुद्धा आपल्या मायेची उबदार सावली डोक्यावर धरणारे अनेक जुने जाणते वृक्ष कर्नाटक वनविभागाने येथे खूप छान जपले आहेत. या दोन-अडीच किमीच्या प्रवासात आपल्याला साथ मिळते ती उंचच उंच दाट झाडांची, जवळून वाहणार्‍या नदीच्या खळाळत्या प्रवाहाची, अवतीभोवती बिनधास्तपणे बागडणाऱ्या फुलपाखरांची, विविध पक्षांच्या किलबिलाटाची आणि इथल्या निरव शांततेची. त्यातूनही चालायचा कंटाळा आलाच तर वनविभागाने पर्यटकांच्या विश्रांतीसाठी विविध ठिकाणी बाकडे व विश्रांती थांबे केले आहेत.

 

याना रॉक्सकडे जाणारी सुंदर जंगलवाट


साधारण अर्ध्या तासाची पाऊलवाट तुडवल्यानंतर अचानकच आजूबाजूच्या झाडांआडून दोन प्रचंड मोठे काळेकभ्भीन पाषाण दिसायला लागतात. हेच ते याना येथील निसर्गनवल मानले जाणारे रॉक्स. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेत येणारे याना गाव अचानक प्रसिद्ध झाले ते याच कार्स्ट रॉक म्हणजे दोन प्रचंड मोठ्या उंचीच्या काळ्या प्रस्तरखंडामुळे. कार्स्ट रॉक म्हणजे खडकाची एक अशी क्लीष्ठ रचना जी चून्याचा दगड (लाईमस्टोन), डोलोमाईट आणि जिप्सम सारख्या विद्रव्य खडकांचे विघटन होऊन तयार होते. त्यामुळे याना येथे पाहायला मिळणारी ही प्रस्तररचना फार दुर्मिळ मानली जाते. मी तर या प्रकारची पाषाण शिखरे याआधी फक्त एक तर सायन्स फिक्शनच्या पुस्तकांतून पाहिली होती किंवा मग एखाद्या बॉलीवूड फिल्ममधे. ही शिखरे इथली वाटतच नाहीत मुळी. अचानक आपण एखाद्या परग्रहावर आलो की काय असे वाटायला लागते. या दोन्ही शिखरांना अनेक अणकुचीदार टोक आहेत तर मधे मधे तितक्याच टोकदार घळ्या. ही शिखरे व घळ्या, लाखो वर्षे पाऊस व हवेतील बदल सहन करत असल्याने, अतिशय खडबडीत झालेल्या आहेत तर त्यांच्या कडा अगदी धारदार बनल्या आहेत.  


याना येथील भैरवेश्वर शिखर

 

सह्याद्री पर्वतराजी ही साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी उद्रेक पावलेल्या एका ज्वालामुखीमधून बाहेर पडलेला लाव्हारसाचे घनीकरण झाल्याने तयार झालेली आहे. त्यामुळे सह्याद्रीतील बहुतांशी खडक हे बेसॉल्ट प्रकारचे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याना मधील हे दोन्ही पाषाण स्फटिकावस्थेतील लाईमस्टोन या प्रकारच्या दगडाचे बनलेले आहेत. लाईमस्टोन दगड साधारण जलचर प्राण्यांचे नष्ट होणे किंवा पाण्यात विरघळलेल्या कॅल्शियम क्षारांचे स्फटिकीकरण या सारख्या कारणांनी तयार होतात. जगभरात अनेक ठिकाणी गुहांमध्ये ठिबकणार्‍या जलामुळे असे लाईमस्टोन पाषाण तयार झालेले दिसतात. परंतु जमिनीच्या वर तयार झालेले लाईमस्टोन दगडांचे हे पर्वत व ते सुद्धा काळ्या रंगाचे असणे हे एक नैसर्गिक आश्चर्यच म्हणावे लागेल. भारतातल्या सर्व प्रेक्षणीय स्थळांप्रमाणेच याना येथील पाषाणांना देखील पौराणिक कथा जोडलेली आहे. या पाषाणस्तंभांना "भैरवेश्वर" आणि "मोहिनी" अशी नावे देऊन पुराणकथा जोडल्या गेल्या आहेत. भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून याच ठिकाणी भस्मासुराचा वध केला असे मानले जाते. त्यामुळे याना हे भूगर्भशास्त्रज्ञांसाठी आवडते ठिकाण तर आहेच पण आता ते तीर्थक्षेत्र म्हणून देखील नावारूपाला येत आहे. 

 

भैरवेश्वर शिखराच्या पायथ्याशी असणारे गुहामंदिर

मोहिनी शिखर

 

याना येथे असणाऱ्या दोन शिखरापैकी भैरवेश्वर शिखर हे १२० मीटर (३९० फुट) उंच असून मोहिनी शिखर हे त्यापेक्षा लहान म्हणेज ९० मीटर (३०० फुट) उंच आहे. भैरवेश्वर पाषाणाच्या पायथ्याशी एक सुंदर गुहामंदिर असून येथे स्वयंभू शिवपिंड आहे. या शिवपिंडीवर वरील खडकातून कायम जलाभिषेक होत असतो. भैरवेश्वर शिखराच्या डाव्या बाजूने एक रस्ता काढलेला आहे आणि वर चढून जाण्यासाठी काही पायर्‍या आहेत. चौकशी केल्यावर असे कळाले की भैरवेश्वर शिखराच्या पोटात प्रस्तराला भेगा पडून एक भली मोठी घळ तयार झाली आहे. या घळीमधून एका अरूंद रस्त्याने भैरवेश्वर शिखराला प्रदक्षिणा मारता येते. पण भैरव शिखर हे एक पवित्र स्थान मानले जात असल्याने ही प्रदक्षिणा पादत्राणे काढून करावी लागते. हा प्रदक्षिणेचा मार्ग काही ठिकाणी ओबडधोबड, काही ठिकाणी बांधीव पायऱ्यांचा तर काही ठिकाणी दगडातून जाणारा खडबडीत असा आहे. पण इतक्या लांब येऊन पाषाणामधल्या घळीतून चक्कर मारण्याची इतकी नामी संधी दवडण्याचा वेडेपणा अजिबात करू नये.  

 

भैरवेश्वर शिखराचा प्रदक्षिणा मार्ग

प्रदक्षिणा मार्गावर तयार झालेले दगडांचे विविध आकार

 

प्रदक्षिणेच्या सुरवातीला रेलिंग लावलेल्या पंधरा–वीस सिमेंटच्या पायर्‍या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन पोचतो. ही घळ म्हणजे एक भली मोठी गुहाच आहे. या घळीमधून चालताना वर मान करून पाहिले असता संपूर्ण आकाश कधी दिसतच नाही. काही ठिकाणी घळीचा वरचा भाग पूर्ण उघडा आहे तर काही ठिकाणी या घळीच्या दोन्ही बाजूंचे खडक एकमेकाला टेकलेले असल्याने एक नैसर्गिक छप्पर तयार झालेले आहे. काही ठिकाणी या नैसर्गिक छपरात मोठ्या फटी निर्माण झाल्या आहेत. गुहेच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींना उभ्या घळी आहेत व त्याच्या बाजूंचे खडक धारदार आणि एखाद्या तलवारीच्या पात्यासारखे दिसतात. या उभ्या घळींच्यामधे अनेक ठिकाणी तयार झालेल्या सपाट जागांमुळे हा प्रदक्षिणा मार्ग तयार झालेला आहे. पण काही ठिकाणी हा मार्ग इतका अरूंद होतो की जेमतेम एका माणसालाच त्यातून जाणे शक्य होते. पण साधारण २ किमीची ही प्रदक्षिणा प्रस्तरखंडाचे वेगवेगळे आकार न्याहाळत आणि त्यामधून होणारा ऊन-सावलीचा खेळ पहात करणे यात एक वेगळीच मजा आहे.  

 


 

याना हे तसे बऱ्यापैकी निर्मनुष्य रस्त्यावर असल्याने येथे शक्यतो सकाळी लवकर येणेच चांगले. तसेच सिरसी गाव सोडल्यापासून या परिसरात खाण्यापिण्याची दुकाने जवळजवळ नाहीतच. त्यामुळे इकडे येताना बरोबर खायला कोरडा खाऊ आणि पिण्याचे पाणी जवळ बाळगावे. तसे याना केव्ह्जच्या वाहनतळापाशी आणि लेणीमंदिराच्या अगदी समोर अशी दोन अगदी छोटी दुकाने आहेत. पण येथे मात्र चिप्स, वेफर्स आणि कोल्डड्रिंग यासारख्या गोष्टीच मिळतात. 

 

याना केव्हज येथील पार्किंग (वाहनतळाचे) GPS लोकेशन: https://goo.gl/maps/KzpzFRginXw

 

आम्ही याना पाहून वाहनतळापाशी परत आलो तेव्हा दुपारचे १२.१५ वाजले होते. आता पुढचे ठिकाण पहायचे होते ते म्हणजे ’बनवासी’ गावातील मधुकेश्वराचे पुरातन शिवमंदिर. पण बनवासी गाव सिरसीच्या विरुद्ध दिशेला असल्यामुळे आपल्याला याना येथून पुन्हा सिरसी गावात यावेच लागते. सिरसी गावात प्रसिद्ध "मरीकाम्बा" देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोरून बनवासीला जाणारा रस्ता आहे. येथून बनवासी फक्त २१ किलोमीटर. पण बनवासी हे लहानसे खेडे असल्यामुळे दुपारच्या जेवणाचा प्रश्न असल्यास तो शिरसी गावातच मिटवावा. म्हणजे सिरसी गावात दुपारचे जेवण करून मगच बनवासीकडे जावे. कारण बनवासी गावात जेवणासाठी फारशी हॉटेल्स उपलब्ध नाहीत. काही छोट्या खानावळी आहेत पण त्यामात्र अगदीच गरज वाटल्यास थांबण्यायोग्य.

 

बनवासी हे कर्नाटकातील एक प्राचीन गाव. हे गाव इतकं प्राचीन की बनवासी गावाचा मागील २२५० वर्षांचा इतिहास ज्ञात आहे. बनवासी गावाबद्दलची सर्वात जुनी ज्ञात नोंद आहे ती इ.स.पूर्व २४२ मधली. सम्राट अशोक गादीवर आल्यानंतर १८ वर्षांनी एक बौद्ध महासभा आयोजित केली गेली होती. या महासभेनंतर ‘रक्षित‘ या बौद्ध भिख्खूला बौद्ध धर्मप्रचारासाठी बनवासी येथे पाठवले गेले होते. पुण्याजवळ असलेल्या कार्ले लेण्यांमध्ये एक गुंफा मंदिर आहे ते बनवासी येथील एका व्यापार्‍याने इ.स.पूर्व १०० वर्षे या कालात दान देऊन बनवून घेतल्याचा उल्लेख आहे. बनवासी गाव तेंव्हा वैजयंती या नावाने ओळखले जात होते. नाशिक येथील प्रसिद्ध बौद्ध लेण्यांमधील एका गुंफेतील शिलालेखात (गुंफा क्रमांक २) वैजयंतीच्या प्रबळ सैन्यदलाचा उल्लेख सापडतो. दुसर्‍या शतकामध्ये ग्रीक भूगोलकार टॉलेमी याने बनवासी गावाचा Banaausi or Banauasi या नावाने उल्लेख केलेला आहे. बनवासी गावातच सापडलेल्या एका शिलालेखाप्रमाणे, टॉलेमीच्या काळातच, “हरितिपुत्र सातकर्णी” या महाराष्ट्रातील सातवाहन राजघराण्यातील एका राजाची सत्ता बनवासीवर होती. (संदर्भ Bombay Gazetteer Vol XV Part I). आता हे सर्व संदर्भ फार प्राचीन असले तरी बनवासी हे गाव कदंब राजांची राजधानी म्हणूनच मुख्यत्वे करून ओळखले जाते. पहिल्या कदंब राजघराण्याची बनवासीवर चवथ्या/पाचव्या शतकापासून सत्ता होती. कदंब राजघराण्यानंतर चालुक्य, सातवाहन, देवगिरीचे यादव, सोंदे राजघराणे अश्या अनेक राजवंशांची सत्ता बनवासीवर आली. या सर्व राजवंशांच्या इतिहासाचे एकुलते एक साक्षीदार म्हणजे बनवासी गावातील प्रसिद्ध मधुकेश्वर मंदिर.

 

'मधुकेश्वर' मंदिर हे कदंब व चालुक्यकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते. मंदिराचा सर्व परिसर १२ ते १५ फुट उंच भिंतीने सुरक्षित केलेला आहे. या भिंतीतच मंदिराचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना असणारी सुंदर गजशिल्पे आपले स्वागत करतात. गजशिल्पांच्या मागे ओसरी असून त्यावर दीड ते दोन फूट व्यासाचे कोरीव नक्षीकाम केलेले खांब आहेत. प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करताच समोर दोन विशाल दगडी स्तंभ दिसतात. यातील एक 'ध्वजस्तंभ' असून दुसरा 'दीप' किंवा 'ज्योतीस्तंभ' आहे. मंदिराचे आवार प्रशस्थ असून या विस्तीर्ण आवारात प्रवेशद्वाराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत भिंतीकडेने रांगेत विविध देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत. यात नृसिंह, कदंबेश्वर व अर्ध गणपती यांची मंदिर खास पाहण्यासारखी आहेत. पण इतर मंदिरात असणाऱ्या वरुण, कुबेर, इंद्र, शचि, यमदेव, कार्तिकेय तसेच अष्टदिग्पालांच्या सुंदर कोरीव मुर्त्या आपली नजर खिळवून ठेवतात. या मंदिरावर अनेक राजसत्तांनी राज्य केलं, त्यांनी या मुर्त्या भारतवर्षातून कुठून कुठून आणल्या असतील नाही.

 
मंदिराचे प्रवेशद्वार

प्रवेशद्वारातील सालंकृत गजशिल्प

मंदिराच्या आवारात असलेल्या प्राचीन व कोरीव मुर्त्या

अष्टदिग्पालांच्या सुंदर कोरीव मुर्त्या त्यांच्या वाहनासह


 

मंदिराच्या भव्य प्रांगणात ध्वजस्तंभाच्या बरोबर समोर मधुकेश्वराचे मुख्य मंदिर बांधलेले दिसते. त्याच्या शेजारीच मधुमती म्हणजे शंकराची पत्नी पार्वतीचे छोटे मंदिर आहे. दोन्ही मंदिराच्या सभामंडपाची बांधणी बाहेरून थोडा उंचावलेला तळ, त्यावर उभारलेले दगडी गोल खांब व त्यावर उतरते छत या पद्धतीची आहे. मधुकेश्वराच्या मुख्य मंदिरात प्रवेश करताच सभामंडपातील होयसाळ धर्तीच्या शैलीत बांधलेला ७ फुट उंचीचा प्रचंड मोठा नंदी आपले लक्ष वेधून घेतो. या नंदीचे वैशिष्ट्य असे की शिवमंदिरांतील बहुतेक नंदी हे सरळ पिंडीकडे चेहरा करून असतात. इथला नंदी मात्र थोडा तिरका बसलेला आहे. असे म्हणतात की त्याचा एक डोळा शंकराच्या पिंडीकडे असून दुसरा डोळा शेजारच्या मंदिरातील पार्वतीकडे आहे.

 
मंदिराच्या आवारातील मधुकेश्वराचे व इतर देवतांची मंदिरे



मंदिराच्या सभामंडपातील नंदी


नंदीमंडपाच्या थोडे पुढे नृत्यमंडप असून तिथे मध्यभागी एक गोल चबुतरा बांधलेला दिसतो. या चबुतर्‍यावर नर्तकी देवासमोर नृत्य सादर करत असत. या नृत्यमंडपाच्या चारी बाजूंना असलेले गोल दगडी खांब मात्र खूपच सुंदर आहेत. खांबांना असं काही गुळगुळीत 'पॉलीश' केलं आहे की त्यांत आपल्या कपड्यांचे रंग सुद्धा दिसतात. या खांबांच्या साधारण मध्यावर अंतर्गोल व बहिर्गोल असे अत्यंत गुळगुळीत पृष्ठभागाचे गोलावे दिलेले आहेत. नृत्यमंडपात नृत्य करणार्‍या नृत्यांगनांची अनेक प्रतिबिंबे या खांबावर दिसावीत हा या मागचा उद्देश. खरच किती विचार करून हे सर्व बांधकाम केले असेल नाही. पुढे नृत्यमंडपाच्या समोर तिसऱ्या मंडपात मंदिराचा गाभारा आहे. गाभार्‍याच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ एक मोठा दगडी देव्हारा ठेवलेला असून या देव्हार्‍याला "त्रैलोक्य मंडप" असे म्हणतात. या देव्हाऱ्याच्या तळाशी कोरलेला ५ फण्यांचा नाग, चारी बाजूला असलेल्या खांबावरील कोरीव मुर्त्या आणि छतावर कोरलेली नंदीवर आरूढ झालेल्या शिव–पार्वतीची मूर्ती हे सर्वच खूप सुंदर आहे. मुख्य गाभार्‍यात असलेले शिवलिंग खूपच सुंदर आणि भव्य आहे. मधु म्हणजे मध आणि त्या रंगातलं शिवलिंग म्हणून हा मधुकेश्वर. त्यामुळे या लिंगाला मधाचाच अभिषेक केला जातो.

 
मंदिराचे पॉलिश केल्याप्रमाणे दिसणारे खांब
त्रैलोक्य मंडप


मधुकेश्वर मंदिराच्या डाव्या अंगाला, मधुमतीचे लहान मंदिर आहे. या मंदिरातील खांबावर देखील सुबक कोरीवकाम केलेले आहे. आता ही दोन्ही मुख्य मंदिरे पाहून झाली कि आपला मोर्च्या वळवायचा तो या मंदिरात असलेले अजून एक आश्चर्य पाहायला. येथील मंदिराच्या आवारात बाह्य भिंतीजवळच्या एका खोलीत एक अतिशय सुंदररित्या घडवलेला एक पाषाण मंचक (पलंग) ठेवलेला आहे. या सहाशे वर्ष जुन्या ग्रानाईटच्या एकसंध मंचकाच्या चारी कडांना सुंदर नक्षीकाम केलेले खांब आहेत. हा मंचक सोंदे घराण्याचा राजा रघू नाईक याने मंदिराला भेट दिलेला आहे असे सांगतात. हा ग्रेनाईटचा प्रशस्त मंचक बहुदा भारतातला एकमेवच असावा.

 
मधुमती अर्थात पार्वतीचे मंदिर

मंदिराच्या सभामंडपावरील कोरीवकाम

मंदिराच्या बाहेरील बाजूने कोरलेले काही पौराणिक प्रसंग

एकसंध दगडात घडवलेला पाषाण मंचक

पाषाण मंचकावरील कोरीवकाम

 

बनवासी येथील मधुकेश्वर मंदिराचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/zPCDcdTwhUQ2

 

तेव्हा मंडळी, जेव्हा कधी सिरसी परिसरात भटकंतीसाठी जाल तेव्हा अनेकानेक वैशिष्ठे असणारे व शिल्पकलेचा उत्कृष्ठ नमुना असणारे बनवासी गावातील मधुकेश्वराचे मंदिर न चुकता पहा. या मंदिराचा परिसर खूपच सुंदर ठेवलेला असल्याने आमचा तर या मंदिरातून पायच निघत नव्हता. पण या मंदिराची भेट थोडी आवरती घेत आम्ही पुन्हा सिरसीच्या दिशेने निघालो. सिरसी गावात प्रवेश करताच "मरीकाम्बा" देवीचे मंदिर लागले. "मरीकाम्बा" ही सिरसी गावाची ग्रामदेवता त्यामुळे तिच्या दर्शनासाठी थांबलो.

 

सिरसी गावातील मारीकाम्बा देवीचे मंदिर

 

सिरसी शहराच्या मध्यभागी १६व्या शतकातील दाक्षिणात्य शैलीतील श्री मरिकांबा देवीचे मंदिर आहे. जवळपास ३५० वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिराची वास्तू प्रशस्त आहे. मंदिरात भक्तांना दर्शन आणि आरतीला जमण्यासाठी भलामोठा हॉल आहे. या हॉलच्या एका बाजूला स्टेजसारखा छोटा रंगमंच देखील बांधलेला आहे. हॉलमधील भिंतीवर विविध देवीरूपांच्या भल्यामोठ्या तसबिरी लावलेल्या आहेत. या तसबिरी आणि मंदिराचे नुकतेच केलेले रंगकाम यामुळे जुन्या वास्तू रचनेचे कोणतेही पुरावे येथे दिसत नाहीत. मंदिराच्या गाभाऱ्यात असणारी आदिशक्ती जगन्माता देवीची ७ फुट उंचीची मूर्ती मात्र खूपच भव्य आणि सुंदर आहे. हे मंदिर उत्तर कर्नाटकातील आदिशक्तीचे एक मुख्य शक्तीपीठ मानले जाते त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी असते. मंदिरातील एकूणच गर्दीमुळे मंदिर नीटसे पाहता आले नाही. तसेही मला गर्दीची ठिकाणे फारशी आवडत नसल्याने देवीचे दर्शन आवरते घेत आम्ही मंदिरातून लगेच बाहेर पडलो. 

 
मंदिरावरील लाल पांढऱ्या रंगसंगतीमधील सुंदर नक्षीकाम



मारीकाम्बा मंदिरासमोरील दक्षिणात्य शैलीतील महादेवाचे मंदिर


मारीकाम्बा मंदिराचे GPSलोकेशन: https://goo.gl/maps/anuhPT3oz2N2

 

आता आम्ही निघालो अजून एक आश्चर्यजनक जागा बघण्यासाठी. पण ही जागा निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित होती. हे पुढचे ठिकाण होते शाल्मला नदी पात्रात वेगवेगळ्या खडकावर कोरलेल्या हजारो शिवलिंगासाठी प्रसिद्ध असणारे "सहस्त्रलिंग". येथे जाण्यासाठी आम्ही पुन्हा सिरसी गावातून येल्लापूरकडे जाणारा रस्ता धरला आणि सिरसीपासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्यावरून डावीकडे हुळगोळ गावाकडे वळलो. पुढे छोट्या रस्त्याने साधारण २ किलोमीटर अंतर कापत एका नदी पात्राजवळ पोहोचलो. येथे एक प्रशस्थ वाहनतळ असून येथेच शाल्मला नदीच्या पात्रात उतरण्यासाठी काही पायऱ्या केलेल्या आहेत. आपण जस जसे पायर्‍या उतरायला सुरूवात करतो तसे समोरचा नदीपात्र निरनिराळ्या आकारांच्या खडकांनी व पाषाणांनी खचाखच भरलेला दिसतो. नदीपात्रातील जवळ जवळ प्रत्येक खडकावर शिवलिंगे व त्याच्या समोर नंदी कोरून काढलेले आहेत. या हजारो शिवलिंगामुळेच शाल्मला नदीच्या पात्रातील या स्थानाला "सहस्त्रलिंगम" असे नाव पडले. 

 
शाल्मला नदी पात्रातील सहस्त्रलिंग
प्रत्येक खडकावर शिवलिंग कोरलेले दिसते


आता हे एवढे शिवलिंग कोरण्याचा उद्योग कोणी आणि कशासाठी केला बरे? तर त्यासाठी येथे एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी. पूर्वी कोण्या एका राजाला मुलबाळ नव्हते, म्हणुन त्याने शिवाची आराधना केली. त्याला स्वप्नात दृष्टांत झाला कि एक हजार शिवलिंग कोरून घे आणि त्याची पूजा कर. त्या राजाने शाल्मल नदीच्या पात्रात असे एक हजार शिवलिंग कोरून त्याची पूजा केली आणि त्यास पुत्रप्राप्ती झाली. आता कथा काही का असेना पण सिरसीजवळ शाल्मला नदीच्या पात्रात असणारे हे मानवनिर्मित आश्चर्य नक्की पहावे. येथुन थोडे पुढे शाल्मला नदीवर एक झुलता पूल देखील आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व सहस्त्रलिंग हे ठिकाण पाहण्यासाठी कृत्रिमरीत्या या पुलाची निर्मिती केलेली आहे.

 
शाल्मला नदीचे पात्र

 

शाल्मला नदीकाठच्या सहस्त्रलिंग येथील वाहनतळाचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/X3JTH3vQQV12

 

सहस्त्रलिंग हे ठिकाण पाहून झाले तेव्हा घड्याळात दुपारचे फक्त ४.३० वाजले होते. आज सकाळी बऱ्यापैकी उशिरा सुरवात करून सुद्धा केवळ सिरसी गावाच्या आसपास फिरत असल्यामुळे आतापर्यंत चार ठिकाणे पाहून झाली होती. जवळपास फिरत असलो तरी सकाळपासून तशी बरीच भटकंती झाली होती त्यामुळे गरमागरम चहा पिऊन आलेला शिणवटा दूर केला आणि आजच्या दिवसाच्या शेवटच्या ठिकाणाकडे निघालो. आता पुढचे ठिकाण होते सोंदे गावातील श्री वादिराज मठ.

 

सोदे किंवा सोंडा हे सिरसी पासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असणारे उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक शांत आणि निसर्गरम्य गाव. शाल्मला नदीच्या किनारी वसलेले सोदे गाव माध्व संप्रदायाचे महान संत श्री वादिराज स्वामी यांच्या समाधीमुळे आणि त्यांनी सुरु केलेल्या मठामुळे प्रसिद्ध आहे. हा मठ उडुपी पीठाच्या अष्टमठांपैकी एक मानला जातो. इ.स. १४८० ते १६०० म्हणजे जवळ जवळ १२० वर्षे एवढे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या श्री वादिराज स्वामी यांनी वेद आणि अद्वैत वेदांत यासाठी खूप भरीव काम केले. स्वामीजी एक महान तर्कशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न कवी देखील होते. विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय आणि त्याचे उत्तराधिकारी यांच्या राजाश्रयाखाली असणारे एक महापंडितही अशी वादिराज स्वामी यांची ओळख होती. सोदे येथील मठाच्या परिसरात असणारे विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधलेले गेलेले त्रिविक्रमाचे मंदिर याची साक्ष देते. त्यावेळेचा सोदेवर राज्य करणारा राजा अर्सप्पा नायक याने स्वामीजींच्या आज्ञेने हे मंदिर बांधले असे म्हणतात.

 

सोदे मठाच्या भव्य प्रांगणात प्रवेश करताच एक प्राचीन दगडी मंदिर आपले लक्ष वेधून घेते. हेच ते विजयनगर स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असणारे त्रिविक्रमाचे मंदिर. हे मंदिर आतून आणि बाहेरून सुंदर कोरीवकामाने नटलेले आहे. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य असे कि या मंदिराचा गाभारा म्हणजे एक दगडी रथच. हा रथ मूर्तीसह हिमालयातील उत्तर बद्री (सध्याचे बद्रीनाथ असावे का?) येथून आणला असे मानले जाते. हा दगडी रथ मात्र फक्त तीनच चाकांवर उभा आहे. असे म्हणतात कि माध्व संप्रदायाचे संस्थापक श्री माधवाचार्य यांच्या नित्य पूजेतील एक विष्णू मूर्ती श्री भूतराज स्वामी यांनी श्री वादिराज स्वामी यांच्या आज्ञेवरून उत्तरेतील बद्री येथून दगडी रथासह सोदे येथे आणली. हा रथ सोदे येथे आणत असताना वाटेत भूतराज स्वामींना एका राक्षसाचा प्रतिकार करावा लागला. त्या राक्षसाला ठार मारण्यासाठी या रथाचे एक चाक भूतराज स्वामींनी राक्षसावर फेकले. त्यामुळे आजही हा रथ फक्त तीन चाकावर उभा असलेला दिसतो.

 
सोंदे मठाच्या प्रांगणातील त्रिविक्रमाचे मंदिर
मंदिरावरील सुंदर कोरीवकाम
मंदिराच्या द्वारातील गजशिल्प


मठाच्या प्रांगणात त्रिविक्रम मंदिराच्या पाठीमागे "राजधाम" नावाची अलीकडेच बांधलेली एक भव्य इमारत दिसते. या इमारतीत सोदे मठाअंतर्गत राहण्याची व जेवण्याची माफक दरात सोय केली जाते. या इमारती शेजारून साधारण ५० पायऱ्या उतरल्यानंतर आपला मुख्य मठ परिसरात प्रवेश होतो. येथे समोरच स्वच्छ पाण्याने काठोकाठ भरलेली "ढवळगंगा" नावाची एक पुष्करणी आपल्याला दिसते. या पुष्करणीच्या आजूबाजूला श्री वादीराज स्वामी यांनी स्वतः स्थापन केलेली वेणुगोपाल, विरभद्र, चंद्रमौलीश्वर आणि अंजनेय अश्या देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत. या पुष्करणीच्या समोरच वृंदावन म्हणजेच श्री वादीराज स्वामी यांची पवित्र समाधी आहे. एकूणच सर्व मठ परिसर शांत, रमणीय आणि स्वच्छ असल्यामुळे येथे एक वेगळीच पवित्रता जाणवते.

 

मठ परिसरातील "राजधाम" इमारत
ढवळगंगा नावाची पुष्करणी
पुष्करणीमधे पडलेले वादिराज स्वामींच्या समाधी मठाचे प्रतिबिंब

सोदे येथील वादिराज मठाचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/nFT5AMyvE562

 

सोदे येथील मठ परिसर पाहून ६.१५ वाजता आमची गाडी पुन्हा सिरसीच्या दिशेने सुसाट सुटली. साधारण ७ वाजता हॉटेल मधुवन समोर पोहोचलो तसे हॉटेलच्या समोर असणाऱ्या एका छोट्या हातगाडीवरून गरमागरम भजी आणि बटाटे वडे तळत असल्याचा वास आला. गेल्या सहा/सात दिवसात शोधूनही कोठे बटाटेवडे दिसले नव्हते. त्यामुळे रूमवर जाण्याआधी त्या बटाटे वड्यांवर यथेच्छ ताव मारण्यात आला. पोटभर बटाटे वडे खाऊन आणि तिथंच "तृप्तीची" ढेकर देऊन हॉटेल रूमवर परतलो. आज दिवसभाराची एकूण भटकंती झाली होती १७३ किमी.

 

सिरसी ते याना रॉक - ४१ किमी 

याना रॉक ते बनवासी - ६३ किमी

बनवासी ते सिरसी - २५ किमी

सिरसी ते सहस्रलिंग - १४ किमी

सहस्रलिंग ते सोंडा मठ - १० किमी

 सोंडा मठ ते सिरसी - २० किमी 


दिवस आठवा: रविवार, २९ ऑक्टोंबर २०१७

=============================== 

 

आजचा ट्रिपचा शेवटचा दिवस. गेल्या ७ दिवसाची कोस्टल कर्नाटकाची भटकंती आज आठव्या दिवशी सिरसी ते सांगली असा प्रवास करून संपणार होती. आज साधारण ३५० किमीचा प्रवास करून संध्याकाळपर्यंत सांगली गाठायचे होते. सकाळी ९ वाजता हॉटेलमधून चेक-आउट केले आणि सगळ्यांचा व्यवस्थित ब्रेकफास्ट झाल्यानंतर गाडी हुबळीच्या रस्त्याला लागली. आज ट्रीपच्या परतीच्या प्रवासात सिरसी-येल्लापूर रस्त्यावरील येल्लापूर गावाजवळचा मगोड फॉल्स बघण्याची माझी खूप इच्छा होती. पण मगोड फॉल्सला उंचल्ली फॉल्स प्रमाणेच जंगलातून चालत जावे लागते असे कळल्यामुळे मी सोडून बाकीच्या कुणालाच मगोड फॉल्स बघण्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. तसेही सिरसीवरून सांगलीला जाण्यासाठी सिरसी-मुंदगोड-हुबळी-बेळगाव-कोल्हापूर-सांगली असा सरळ मार्ग होता. मगोड फॉल्स बघायचे झाल्यास येल्लापूरमार्गे जाऊन जवळपास ५० किलोमीटरचा अधिकचा फेरा वाढणार होता. अंतर व वेळ दोन्ही वाढत असल्यामुळे आणि आता सगळ्यांनाच (मी सोडून) घराची ओढ लागल्यामुळे मगोड फॉल्स बघण्याचा प्लान बारगळला. आता मगोड फॉल्स नाही तर नाही पण वेगळ काही तरी पहायचं म्हणून सिरसी-हुबळी रस्त्यावर मुंदगोड गावानजीक असणारी तिबेटीयन वसाहत पाहू असे ठरवले.

 

सिरसी येथून सुमारे ६० किमीचे अंतर कापून सकाळी १०.३० वाजता मुंदगोड गावानजीक असलेल्या तिबेटीयन मॉनेस्ट्रीच्या जवळ पोहोचलो. कर्नाटक सरकारने १९६६ साली बेघर झालेल्या काही तिबेटीयांसाठी ४००० एकर जमीन दिली. मग त्यांनी येथे तीन मोठे मठ (मॉनेस्ट्रीज) बांधले. येथे आज जवळपास १५००० पेक्षाही जास्त बौध भिक्षुक आणि त्यांचे कुटुंब आपले कौटुंबिक जीवन जगत आहेत. भारताचे "मिनी तिबेट" अशी ओळख असणारी ही तिबेटी कॉलनी तिबेटीय लोकांचे राजकीय व आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचे प्रमुख केंद्र बनले आहे. दलाई लामा वर्षातून किमान एकदा तरी मुंदगोड जवळील या तिबेटीयन वसाहतीला भेट देतात. कर्नाटकात अश्या एकूण ३ तिबेटीयन वसाहती असून मुंदगोड येथील मॉनेस्ट्री ही भारतातील दुस-या क्रमांकाची बुद्ध मॉनेस्ट्री मानली जाते. 

 
तिबेटीय मोनेस्ट्री
अप्रतिम प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील तिबेटीयन कलाकुसर

स्तूप

 

मुंदगोड येथील तिबेटीयन वसाहतीमधे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, तिबेटी मेडिसिन्स आणि एस्ट्रो इन्स्टिट्यूटची शाखा देखील आहे. मुंदगोड गावात विविध ठिकाणी अनेक मॉनेस्ट्रीज आहेत पण त्यांच्यापैकी गादेन जांग्से नावाची मॉनेस्ट्री सर्वात लोकप्रिय आणि मोठी मॉनेस्ट्री मानली आहे. येथे खूप मोठा प्रार्थना हॉल असून येथील २५ फुट उंच सोन्याची बुद्ध मूर्ती हे प्रमुख आकर्षण आहे. मॉनेस्ट्रीच्या परिसरात सगळीकडे खास तिबेटियन वास्तूकलेवर आधारित विविध रंगसंगतीत बांधलेल्या इमारती आणि स्तूप आहेत. बौद्ध भिक्षुक कमीत कमी बोलणे पसंत करतात त्यामुळे सर्वच परिसरात कमालीची शांतता आणि स्वच्छता दिसून येते.

 
गादेन जांग्से मॉनेस्ट्री येथील प्रार्थना हॉल

दरवाज्यावरील सुंदर रंगकाम

भव्य प्रार्थना हॉल

 

मुंदगोड येथील तिबेटीयन मोनेस्ट्रीचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/dJ26PMHQkrP2

 

आम्ही तिबेटीयन वसाहतीमधील मुख्य मॉनेस्ट्री आणि प्रार्थना हॉल पाहून साधारण ११.३० वाजता पुन्हा सांगलीच्या दिशेने प्रवास सुरु केला. दुपारी बेळगावजवळ पोहोचताच खास महाराष्ट्रीयन हॉटेल पाहून चमचमीत जेवणावर ताव मारला आणि संध्याकाळी बरोबर ५ वाजता सांगली येथे सुखरूप पोहोचलो.  सिरसी ते सांगली असा ३५० किमीचा प्रवास एकाच दिवशी झाल्याने त्यादिवशी सासुरवाडीतच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पुण्याच्या दिशेने निघालो. गेल्या आठ/दहा दिवसात पुणे ते पुणे असा एकूण २३०० किमीचा प्रवास करत आणि अनेक सुंदर ठिकाण पहात एक भन्नाट ट्रीप पदरात पडली होती.  

 

समाप्तः

 

सफर कोस्टल कर्नाटकाची भाग १ ... कारवार ते मुर्डेश्वर

सफर कोस्टल कर्नाटकाची भाग २ ... मुर्डेश्वर ते धर्मस्थळ

सफर कोस्टल कर्नाटकाची भाग ३ ... धर्मस्थळ ते सिरसी

   

@ VINIT DATE – विनीत दाते

 

पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.

 

 

  

 



 

 

 

 

 

 


 

 

 

 

 



 

 



 

Comments

  1. अफ़लातुन फोटो व लीखाण
    एक ट्रीप अरेंज करावी
    ही विनंती ##धन्यवाद व शुभेच्छा आहेतच
    ।। दुर्ग महर्षी ।।

    ReplyDelete
  2. यातली काही ठिकाणं मी पाहिली आहेत. हा ब्लॉग वाचल्यानंतर पुन्हा तिथे जावसं वाटतंय.

    ReplyDelete
  3. सुरेख वर्णन केले आहे विनितजी तुम्ही

    ReplyDelete
  4. Apratim, detailed information. It is like i felt as if i should go there immediately. You have covered all aspects. Very useful in case if anybody wants to travel. Huge blog, i can only imagine amount of efforts put in. Simply mind-blowing

    ReplyDelete
  5. Ek number blog, I had visited all this places but never thought of any scientific and historical information of this place, you put all details and historical data for that place is really admirable

    ReplyDelete
  6. Heartily congrats for the superb trip. You made us feel as if we were traveling with u. Exhaustive info & fantastic photography. Keep going..

    ReplyDelete
  7. खुप छान फोटो लिखाण 👌👌👌

    ReplyDelete
  8. मस्त 👍👍👌

    ReplyDelete
  9. जबरदस्त.... याना rocks pics...and information...

    ReplyDelete
  10. A readers treat blog by blog
    Atishay uttam likhan. Blog ni vachakala Aatak karava asa karnAtak che sundar varnan
    Khup mast

    ReplyDelete
  11. Really a very nice write up. Its very much helpful information.Nice photo shot. Congrats Vinit.

    ReplyDelete
  12. नमस्कार.
    आम्ही या वर्षी Coastal Karnataka चा प्लॅन करतोय. तुमचा Blog वाचुन जायच्या आधीच तिकडे पोहोचलो. काही ठिकाणांबाबत संभ्रम आहे, तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर बोलता आले असते !
    धन्यवाद.

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

पावनगड

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana