सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग २

सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग १ पासून पुढे ... 



दिवस तिसरा: मंगळवार, २४ ऑक्टोबर २०१७ :

===============================


आजच्या दिवसाची सुरवात सकाळी थोडी उशिरानेच झाली. आम्ही उतरलेल्या हॉटेलचेच उत्तम उपहारगृह हॉटेलच्या खालच्या मजल्यावर असल्याने पुन्हा एकदा इडली, उडीदवडा, सांबर यांचा भरपेट नाष्टा झाला आणि त्यानंतरच गाडी मुख्य मंदिराच्या दिशेने वळवली. मुरुडेश्वर मंदिराच्या अगदी समोरच गाडी लावण्यासाठी भव्य पार्किंग (वाहनतळ) उपलब्ध आहे.


मुरुडेश्वर येथील सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे येथे असणारी भव्य दिव्य अशी भगवान शंकराची मूर्ती आणि मंदिरासमोर असणारा तब्बल २० मजली उंच गोपूर. ह्या दोन्ही गोष्टी किती तरी लांबून म्हणजे अगदी पनवेल-कन्याकुमारी हायवेवरून सुद्धा सहज दिसतात. मंदिराच्या पार्किंग जवळ पोहोचल्यावर ही मूर्ती आणि गोपूर एवढे भव्य दिसत होते की मान वर करून त्यांच्याकडे पाहताना आता आपली मान मोडते की काय असे वाटायला लागले. या भगवान शंकराच्या मूर्तीला "दोड्डा ईश्वरा" तर गोपूरला "राज गोपुरा" असे म्हणतात.


मंदिरासमोर असणारा भव्यदिव्य "राज गोपूर"


प्रत्येक प्राचीन मंदिराला काहीतरी इतिहास हा नक्कीच असतो किंवा मग त्या मंदिरस्थापने मागे एखादी रंजक कथा तरी असते. मुरूडेश्वर येथे जी भली मोठी शंकराची मूर्ती आहे त्या मूर्तीपुढे रावण एका बाल गुराख्याला शंकराची पिंड धरायला सांगताना दाखवला आहे. त्यावरून मुरुडेश्वराचा संबंध देखील गोकर्णाच्या कथेशी येतो. पहिल्या लेखात तुम्ही गोकर्णाविषयीची ती रंजक कथा वाचली असेलच. तर त्या कथेत सांगितल्याप्रमाणे बाल गुराख्याने शंकराची पिंड म्हणजेच साक्षात शंकराचे आत्मलिंग जमिनीवर ठेऊन त्याची स्थापना केलेली पाहून रावण भयानक संतापला व त्याने आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली. त्यातील ज्या वस्त्रातून रावणाने आत्मलिंग झाकून आणले ते वस्त्र त्याने ज्या टेकडीवर टाकले तिथे या मुरडेश्वराची स्थापना झाली असे सांगतात. 


मुरुडेश्वराचे मंदीर कुंडकागिरी नावाच्या टेकडीवर आहे. ह्या टेकडीच्या तिन्ही बाजूंना अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे. ह्याच टेकडीवर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच शंकराची मूर्ती आहे. या मूर्तीची उंची १२३ फुट आहे. शिमोगा येथील प्रसिद्ध शिल्पकार काशिनाथ यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने हे भव्य दिव्य शिल्प साकारले आहे. मूर्तीच्या समोरच मंदिराच्या प्रवेशद्वाराशी २० मजली भव्य गोपुर आहे.  या गोपुराची उंची २५० फुट असून हा जगातील सगळ्यात उंच गोपूर आहे असं म्हणतात. श्री. आर. एन. शेट्टी नामक एका परोपकारी उद्योजकाने हे सर्व बांधकाम करवून घेतले आहे. 


"दोड्डा ईश्वरा" म्हणजे भगवान शंकराची भव्य मूर्ती


आपण मंदिरात जो प्रवेश करतो तो या गोपुराच्या प्रमुख दरवाज्यातून. या गोपुराच्या प्रवेशद्वारात खर्‍या हत्तींच्या उंचीचे अगदी खरे वाटतील असे दोन मोठ्ठे हत्ती बनवलेले आहेत. राज गोपुराच्या आत प्रवेश करताच डाव्या हातास दोन लिफ्ट दिसतात. या लिफ्टने गोपुराच्या १८ व्या मजल्यावर जाता येते. जवळच असणाऱ्या तिकीट खिडकीवरून १० रुपयांचे तिकीट काढायचे आणि सगळ्यात आधी आपला मोर्च्या या लिफ्टकडे वळवायचा. येथे १०-१० च्या ग्रुपने लिफ्टमधून वरती पाठवतात. दोन्ही लिफ्ट फक्त १८ व्या मजल्यावरच थांबतात. मोजून तीन ते चार मिनिटात या लिफ्टने आपण १८ व्या मजल्यावर हजर होतो. 


गोपुराच्या प्रवेशद्वारावर असणारे हत्ती


तुम्ही सकाळी अगदी लवकर किंवा मग संध्याकाळी जर का मुरुडेश्वर मंदिर परिसरात आला असाल तर इतरत्र कुठेही न भटकता सर्वात आधी या राज गोपुराच्या १८ व्या मजल्यावर जायचे. आपण तब्बल २५० फुट उंचीवर पोहोचलेलो असतो आणि येथून मुरुडेश्वर परिसराचा जो काही नजरा दिसतो त्याला तोड नाही. येथे गोपुराच्या चारी बाजूंच्या भिंतीत मोठ्या खिडक्या आहेत. या प्रत्येक खिडकीतून वेगवेगळे दृश पाहता येते. थोडक्यात सांगायचं तर संपूर्ण मुरुडेश्वर परिसराचा एरीअल व्हीव येथून पाहता येतो. अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र आणि मुरुडेश्वरचा समुद्र किनारा पाहावा तर तो फक्त इथूनच. मंदिराच्या पायथ्याशी उभारल्यानंतर भव्य दिव्य वाटणारी ती शंकराची मूर्ती इथून पाहिल्यानंतर मात्र एकदमच छोटी वाटायला लागते. इथं फक्त एकच प्रोब्लेम आहे तो म्हणजे आजूबाजूचे दृश बघायला ठेवलेल्या खिडक्यांची साईझ थोडी छोटी (कोनाड्यासारखी) आहे पण इथं येणारी गर्दी मात्र खूप जास्त आहे. थोडक्यात काय तर येथे लोकांची सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी खूप दाटीवाटी झालेली असते. पण थोडा वेळ काढून इथं येऊन जे काही सुंदर दृश पाहायला मिळत त्यापुढे यासर्व गोष्टी मग न्यून वाटायला लागतात. 


"राज गोपुरा" च्या १८ व्या मजल्यावरून दिसणारे विहंगम दृश


गोपूराचा परिसर पहायचा आणि गोपुराच्या प्रवेशद्वारातून मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करायचा. मुख्य मंदिरात गणपती, कार्तिकेय, दत्तात्रय, देवी यांची अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत तर मध्यभागी रामेश्वराचे (मुरुडेश्वर) लिंग असणारे अतिभव्य असे प्राचीन मंदिर आहे. मंदिराचे आवार आणि एकूणच सर्व परिसर खूप स्वच्छ आहे. मुरुडेश्वर हे धार्मिक स्थळ व त्याचबरोबर समुद्रकिनारा लाभलेले एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण असल्याने येथे कायमच पर्यटकांची खूप गर्दी असते. त्यामुळे बरेच वेळेस दर्शनाच्या रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागते. 


मंदिराचा अंतर्भाग
मंदिराचा बाह्यभाग
छोट्या छोट्या मंदिरावर असणारे सुंदर कळस
मंदिराच्या आवारात तयार केलेले पौराणिक प्रसंग
मंदिरातील खांबावर असणारे नक्षीकाम


मुख्य मंदिरातील दर्शन आटोपले की पुन्हा राज गोपुरातील प्रवेशद्वारातून बाहेर यायचे आणि आता मंदिराला लागून असणाऱ्या रस्त्याने मंदिराच्या मागील बाजुस असणाऱ्या टेकडीवर जायचे. हा रस्ता आपल्याला त्या भव्य शिव मूर्तीच्या बरोबर खाली बनवलेल्या मानवनिर्मित गुहेकडे घेऊन जातो. येथे या गुहेला "भु कैलासा केव्ह" म्हणून ओळखले जाते. माणशी १० रुपयांचे तिकीट काढून या मानवनिर्मित गुहेमधे प्रवेश करायचा. या गुहेत रावणाने कठोर तपश्चर्या करून शिवाकडून आत्मलिंग कसे मिळवले, गणपतीने बालगुराख्याचा अवतार घेऊन ते रावणाकडून कसे काढून घेतले, आत्मलिंगाची स्थापना गोकर्ण येथे कशी झाली ही सर्व कथा येथील कृत्रीम मानवनिर्मीत गुहेत मोठमोठ्या मूर्त्यांमध्ये साकारलेली आहे.  


कठोर तपश्चर्या मग्न रावण. तसेच कैलास उचलताना व शिवापुढे आपले शीर अपर्ण करताना रावण

आत्मलिंग रावणाला मिळाले असे कळताच नारद देवांना मदत करण्याची विनंती करण्यासाठी श्री विष्णू व गणपतीकडे धावले


गुहा पाहून झाली की याच टेकडीवर भगवान शंकराच्या भव्य मूर्तीबरोबर इतर अनेक मोठ्या मूर्त्यां तयार केलेल्या आहेत त्यांना धावती भेट द्यायची. श्रीकृष्ण रथाचे सारथ्य करत अर्जुनाला भगवतगीतेचा उपदेश देताना तसेच शंकराच्या मस्तकातून गंगा अवतरण्याची कथा असे पुराणातील अनेक प्रसंग मूर्ती रुपात बघता येतात. 


मंदिर परिसरात असणाऱ्या इतर काही भव्य मूर्ती


येथे मंदिराच्या बाजूलाच मुरुडेश्वरचा बीच आहे. या समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही स्कुबा डायविंग व इतर अनेक साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद घेऊ शकता. येथे बीचवर थोडे आत समुद्राच्या पाण्यात उभारलेला "नवीन बीच रेस्टॉरंट" नावाचा तीन-चार मजली कॅफेटेरिया आहे. या रेस्टॉरंटमध्ये बसून तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांची लज्जत घेत अथांग पसरलेल्या समुद्राचे, उंच गोपुराचे व सुबक, प्रमाणबद्ध अश्या अतिभव्य शिव मूर्तीचे अवलोकन करू शकता. मंदिराजवळच समुद्र किनाऱ्यावरील "RNS RESIDENCY" हॉटेल देखील आहे. या हॉटेलच्या जवळ जवळ सगळ्यात खोल्यामधून समुद्राचा सुंदर नजरा दिसतो असं सांगतात. हे हॉटेल मुरुडेश्वर गावातील इतर स्थानिक हॉटेलपेक्षा थोडे महाग असून येथे आगाऊ बुकिंग केल्यास अगदी मंदिराच्या व समुद्रकिनाऱ्याजवळ राहण्याचा आनंद उपभोगता येतो.


मुरुडेश्वर मंदिराचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/JRPTx9CwfxD2


मुरुडेश्वरचा संपूर्ण मंदिर परिसर निवांत बघण्यासाठी व दर्शनासाठी साधारण ३ तासांचा कालावधी लागतो. आम्ही सकाळी ९.१५ वाजता मंदिरात प्रवेश केला आणि साधारण २.३० तासात सर्व मंदिर परिसर पाहून ११.४५ वाजता मुरुडेश्वरचा निरोप घेतला. आता आजचे पुढचे ठिकाण होते उडुपी जिल्ह्याच्या कुंडापुर/कुंदापूर (Kundapura) तालुक्यात येणारे कोल्लूर गावातील मुकांबिका (मुकाम्बिका) मंदिर.


मुरुडेश्वर मंदिराची स्वागत कमान


मुरुडेश्वर गावाच्या कमानीतून बाहेर पडताच आपण पुन्हा पनवेल-कोचीन-कन्याकुमारी NH66 या महामार्गावर येतो. येथे उजवीकडे म्हणजे दक्षिणेकडे गाडी वळवायची आणि सुसाट वेगाने महामार्गावर पळवायला सुरवात करायची. थोड्याच वेळात आपण उत्तर कन्नड जिल्ह्याची सीमा ओलांडून उडपी जिल्ह्यात प्रवेश करतो. महामार्गावर मुरुडेश्वरपासून साधारण ३३ किमी अंतरावर बैन्दूर नावाचे गाव लागते. या गावातून एक रस्ता डावीकडे कोल्लूरकडे जातो. महामार्गापासून कोल्लूरपर्यंतचे अंतर साधारण २७ किमी एवढे आहे. पण बैन्दूर ते कोल्लूर हा रस्ता खूपच सुंदर, वळणावळणाचा आणि एकदम चकाचक असा खड्डे विरहीत आहे. शेवटच्या १० किलोमीटरमधे तर हा रस्ता "मुकांबिका वाइल्ड लाइफ सेंचुरी" या जंगलातून जातो त्यामुळे भर दुपारी १ वाजता सुद्धा आजूबाजूच्या हिरव्यागार झाडीमुळे हा परिसर बऱ्यापैकी थंड असतो. 



कोल्लूरकडे जाणारा "मुकांबिका वाइल्ड लाइफ सेंचुरी" मधील सुंदर रस्ता


पश्चिम घाटाच्या हिरव्यागार वनश्रीचा अनुभव घेत आपण थोड्याच वेळात कोल्लूर येथे पोहोचतो. सुपर्णिका नदीच्या किनाऱ्यावर डोंगररांगांनी वेढलेल्या परिसरात असणारे मुकांबिकेचे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरावरील तांब्याचे छत आणि सोन्याचा महिरप तसेच आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेली पंचधातूची श्रीचक्रावरील स्थापित देवीची मूर्ती हि या मंदिराची वैशिष्ट्ये. श्रीचक्रामध्ये जसे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात, तसेच या पाषाणात आदिशक्तीचे वास्तव्य असते, अशी श्रद्धा आहे. मुकाम्बिका मंदिर हे दक्षिण भारतातील ७ शक्तीपिठातील एक महत्वाचे आदीशक्ती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. 


कोल्लूर येथील स्वागत कमान


येथील स्थानिक कथेनुसार, कोल्लूर किंवा कोलापूरा हे नाव ऋषी कोला महर्षी यांच्या नावावरून पडले असे म्हणतात. कोला महर्षींनी कामहसूरा या राक्षसाला सर्व शक्ती मिळवून देण्यासाठी महालक्ष्मीचा आशीर्वाद कठोर तपश्चर्येद्वारे प्राप्त केला. शक्ती प्राप्त झालेल्या या राक्षसाने अमरत्वाचा वर मिळविण्यासाठी शिवाची आराधना सुरू केली. हे लक्षात येताच देवीने या राक्षसाला मुके (गुंगे) केले. त्यानंतर तो मुकासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. मुळातच राक्षसी प्रवृत्तीचा असल्याने त्याने देवदेवतांना त्रास देणे सुरूच ठेवले होते. अखेरीस त्याला धडा शिकविण्यासाठी देवीने त्याला त्याच्या सैन्यांसह ठार केले. मुकासूराने तत्पूर्वी शिवाकडून वर मिळवला होता, की हरी किंवा हर यांच्यापैकी कुणीही त्याला ठार मारू शकणार नाही. म्हणून देवीकडून त्याला यमसदनास पाठविण्यात आले. मुकासुर राक्षसाचा वध केल्याने या देवीचे नाव मुकअंबिका म्हणजेच मुकांबिका असे पडले.


मंदिर परिसर व मुकाम्बिका देवीची सुंदर मूर्ती (फोटो इंटरनेटवरून साभार)


मुकांबिका देवी येथील मंदिराच्या मुख्य गर्भगृहात ज्योतिर्लिंग स्वरूपात आहे. गर्भगृहात प्रकृती, शक्ती, काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. पाषाणाच्या पश्चिमेला देवीची पंचधातूची सुंदर मूर्ती आहे. मिरवणुकीवेळी हीच मूर्ती पालखीत ठेवली जाते. ही देवी पद्मासनात बसली असून हातात शंक, चक्र आणि एक अभय हस्त आहे. मंदिराच्या आवारात इतरही देवदेवता आहेत. दक्षिणेला दशभूजा गणपती आहे. पश्चिमेला आदी शंकराचार्यांचे तापस पीठ आहे. मुख्य मंदिरात प्रवेश करण्याअगोदर पुरुषांना अंगातील शर्ट/टीशर्ट काढणे अनिवार्य आहे. मंदिराच्या बाह्य आवारात बळीपीठ, ध्वजस्तंभ आणि दीपस्तंभ आहे. ध्वजस्तंभावर सोनेरी आवरण आहे. वायव्य दिशेला यज्ञशाळा आणि वीरभद्रेश्वराचा पुतळा आहे. पुराणातील कथेनुसार, देवीने मुकासूराशी युद्ध आरंभले तेव्हा वीरभद्राने तिला सहाय्य केले होते. म्हणून वीरभद्राची विभूती पूजा येथे केली जाते.


मंदिराचा अंतर्गत भाग


विजयादशमीचा दिवस येथे विद्यादशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुलांच्या शिक्षणाचा आरंभ व्हावा या हेतूने येथे 'विद्यारंभम' नावाचा विधी केला जातो. येथे रोज भाविकांसाठी अन्नदान देखील केले जाते. भात, सार, रस्सम आणि सांबार अश्या उत्कृष्ठ दाक्षिणात्य महाप्रसादाचा आस्वाद भाविकांनी येथे नक्कीच घ्यावा. हे मंदिर दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत दर्शनासाठी बंद असते. 


मुकांबिका देवीच्या मंदिराचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/KwY6uR7nbuH2


आम्ही मुरुडेश्वर येथून सकाळी ११.४५ ला निघाल्यामुळे थोडे घाईतच ७२ किमीचा जवळपास १ तास ४५ मिनिटांचा नॉनस्टॉप प्रवास करत अगदी दर्शन बंद होण्याचे वेळी म्हणजे दुपारी १.३० वाजता कोल्लुरला पोहोचलो. देवीचे दर्शन होईल का नाही अशी काळजी करतच मंदिरात पाय ठेवला. पण मुकांबिका देवीची आम्हाला दर्शन देण्याची इच्छा असल्याने अगदी शेवटची पाच-दहा माणसे रांगेत उभी असताना आणि गाभाऱ्याचे प्रवेशद्वार बंद होण्याआधी आम्हाला खूप सुंदर दर्शन मिळाले. मंदिराचा उर्वरित परिसर पाहून महाप्रसाद घेण्यासाठी हॉलजवळ पोहोचलो पण तोपर्यंत महाप्रसादाची वेळ मात्र संपून गेली होती. मग मंदिराजवळच असणाऱ्या एका छोट्या हॉटेलमधे दुपारचे जेवण उरकले आणि साधारण ३ वाजता पुढच्या प्रवासाला सुरवात केली.


कोल्लूर येथून पुन्हा २७ किमीचा प्रवास करून बैन्दूर येथे पनवेल-कोचीन-कन्याकुमारी NH66 या महामार्गावर आलो. तसे कोल्लूर येथून उडुपीला जायचे झाल्यास मधून एक शॉर्टकट आहे पण या रस्त्याने गेल्यास मारवंथे बीच लागत नाही. थोडे अंतर जास्त पडले तरी हरकत नाही पण मारवंथे बीच हे महामार्गालगत असणारे एक सुंदर आकर्षण अजिबात चुकवू नये. बैन्दूर येथे राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर गाडी डावीकडे म्हणजे उडपीच्या दिशेने वळवायची आणि साधारण १७ किलोमीटर अंतर गेलो की महामार्गावरच निसर्गाचा एक सुंदर अविष्कार पाहायला मिळतो तो म्हणजे मारवंथे/मरवंथे येथील समुद्रकिनारा. 


शांत वाहणारी सुपर्णिका नदी 


आता तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत आपण वेगवेगळे समुद्रकिनारेच पहात आलोय तर यात असं काय वेगळ. पण महामार्गाच्या एका बाजूला अगदी लागून असणारा समुद्रकिनारा तर दुसर्‍या बाजूला संथ वाहणारी नदी आणि या दोन्हीमधून धावणारा पनवेल-कोचीन-कन्याकुमारी हायवे. आहे की नाही एकदम हटके कॉम्बिनेशन. तुम्ही कुठेही पाहिला नसेल असा हा निसर्ग अविष्कार तुम्हाला फक्त येथेच पाहायला मिळतो. जवळ जवळ दोन-तीन किलोमीटर सरळ धावणारा हा रस्ता फारच सुंदर आहे. रस्त्याच्या पश्चिमेला अगदी रस्त्याला समांतर असा चमकदार वाळूचा समुद्रकिनारा तर रस्त्याच्या पूर्वेला रस्त्याला समांतर वाहणारी सुपर्णिका नदी. त्यातच जर का तुम्ही अगदी सूर्यास्तावेळी या रस्त्यावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. समुद्रकिनाऱ्यावर नभात उमटलेले लालसर, केशरी, पिवळे असे मावळतीचे रंग आणि अवकाशातील त्या रंगात रंगलेला तो अथांग जलाशय हे सार काही तुम्ही अगदी गाडी चालवत येथे अनुभवू शकता. 


मरवंथे बीचचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/yMZ2WsvnkPT2


डाव्या हाताला नदी तर उजव्या हाताला समुद्र आणि मधून जाणारा पनवेल-कन्याकुमारी हायवे


आम्ही मात्र वेळेच्या बाबतीत थोडे कमनशिबी होतो कारण भर दुपारी ४ वाजता आम्ही या रस्त्यावर प्रवास करत होतो. पण पुढील २ तास फक्त सूर्यास्त पाहण्यासाठी येथे घालवण्यात तसा फारसा काही अर्थ नव्हता. तरी देखील दोन-तीन ठिकाणी थांबून छान फोटोसेशन केले आणि उडुपी शहराच्या दिशेने निघालो. आज उडपी शहरात मुक्काम करायचा होता. मारवंथे येथून उडुपी शहर फक्त ५२ किमी म्हणजे साधारण सव्वा तासाच्या अंतरावर होते. त्यामुळे उडुपी गावात मुक्कामाला जाण्याआधी अनेगुडे येथील महागणपती मंदिर बघायचे ठरवले.


महामार्गावरून उडुपीच्या दिशेने जाताना मारवंथे पासून साधारण २० किमी अंतरावर "कुंभासी" नावाचे गाव लागते. येथे अनेगुडे येथील महागणपती मंदिराची सुंदर स्वागत कमान आहे. या स्वागत कमानीतून डाव्या हातास आत गाडी वळताच रस्ता सरळ फक्त ७०० मीटर अंतरावर असणाऱ्या "श्री विनायक मंदिरा" च्या आवारात जातो. 


अनेगुडे उर्फ कुंभासी येथील स्वागत कमान

महागणपती मंदिराचा परिसर


अनेगुडे गाव उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यात येते. अनेगुडे गाव कुंभासी नावाने देखील ओळखले जाते. कुंभासी हे नाव कुंभासुरा या राक्षसाच्या नावावरून पडले असे सांगतात. येथील पौराणिक कथेनुसार, कुंभासूर राक्षस लोकांचा फार छळ करत असे. एकदा त्याने आपल्या शक्तींचा वापर करून या परिसरावर भयंकर मोठा दुष्काळ पाडला. तेव्हा अगस्ती ऋषी आपल्या भक्तांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी धावून गेले. अगस्तींनी वरूण राजाची कठोर तपश्चर्या करून त्याला संतुष्ट करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी मोठा यज्ञ करण्यास प्रारंभ केला. परंतु कुंभासूर राक्षस ऋषिजनांचा हा यज्ञ व तपश्चर्या वारंवार भंग करू लागला. कुंभासूर राक्षसापासून सुटका मिळण्यासाठी अगस्ती ऋषींनी मग गणेशाची प्रार्थना सुरु केली. गणपतीने प्रसन्न होऊन पाच पांडवामधील सर्वात बलशाली असणाऱ्या भीमाला एक खास शस्त्र देऊन कुंभासूराचा वध करण्याची आज्ञा केली. भीमाने कुंभासूर राक्षसाचा वध करून अगस्ती ऋषींचा यज्ञ पूर्ण होण्यास मदत केली. कुंभासूर राक्षसाचा वध या परिसरात झाला म्हणून या गावाचे नाव "कुंभासी" असे पडले. 

  

अनेगुडे हे नाव "अने" म्हणजे "हत्ती" किंवा "गज" आणि "गुडे" म्हणजे "डोंगराळ" या दोन शब्दांपासून तयार झाले आहे. गजांचा अधिपती म्हणजे श्री विनायक याचे अनेगुडे हे निवासस्थान मानले जाते. अनेगुडे हे परशुरामांनी स्थापन केलेल्या सात मुक्तीस्थळांपैकी एक आहे. गर्भगृहातील गणेशाची मूर्ती १२ फुट उंचीची असून एका अखंड पाषाणात घडवलेली आहे. मूर्ती चतुर्भुज असून मूळ मूर्तीवर सुंदर स्वर्णमुख बसवलेले आहे. गणेशाची इतर सर्व आभूषणे आणि वस्त्रे चांदीत बनवलेली आहेत. हे मंदिर अतिशय प्राचीन असून मंदिराच्या बाह्य भागावर पुराणातील विविध कथा कोरलेल्या दिसतात. मंदिर परिसर खूपच स्वच्छ व भव्य असून येथे भाविकांच्या निवासासाठी "अमोद" आणि "प्रमोद" असे गणपतीच्या नावांचे दोन भव्य भक्तनिवास आहेत.


अनेगुडे येथील महागणपती व मंदिराचे अंतरंग (गणपतीचा फोटो इंटरनेटवरून साभार)
प्राचीन मंदिराच्या बाह्यभागावरील कोरीवकाम

अनेगुडे येथील विनायक मंदिराचे GPS लोकेशनhttps://goo.gl/maps/mCiypXemkAm


ट्रीपमधे संध्याकाळचा चहा फार महत्वाचा असतो त्यामुळे तो चुकवणे तसे अवघडच. महागणपतीचे दर्शन घेतले आणि मंदिरासमोर असणाऱ्या एका हॉटेलमधे संध्याकाळचा चहा घेण्याचा कार्यक्रम पार पडला. आता संध्याकाळचे ५.३० वाजले होते आणि मुक्कामासाठी उडुपी शहर गाठणे एवढे एकच काम शिल्लक होते. अनेगुडे गणपती मंदिरापासून उडुपी फक्त ३० किलोमीटर अंतरावर आहे. रस्ता पण मस्त फोर लेनचा हायवे त्यामुळे अगदी निवांत गाडी चालवली तरी ४० मिनिटात तुम्ही उडुपी शहरात पोहोचता. 


उडुपी हे दक्षिण भारतातले एक मोठे जिल्ह्याचे शहर आहे. इथला श्रीकृष्ण मठ (मंदिर) तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध ठिकाण. आजचा मुक्काम उडुपी शहरातच असल्याने शहराकडे जाताना रस्त्यात मुक्कामासाठी अनेक छान छान हॉटेल्स दिसत होते पण आम्ही मात्र मुक्काम श्रीकृष्ण मठाच्या परिसरातच करायचे असे ठरवले. आजच्या दिवसाचा प्रवास तसा बऱ्यापैकी लवकर म्हणजे ६.३० पर्यंत संपणार असल्याने मंदिराच्या जवळपास राहिलो तर संध्याकाळी निवांत श्रीकृष्ण मठ पाहता येईल असा विचार डोक्यात होता. त्यामुळे गाडी सरळ श्रीकृष्ण मठाच्या पार्किंग परिसराकडे नेली. गाडी मठाच्या पार्किंगमधे लावताच समोर दोन-तीन बऱ्यापैकी चांगली हॉटेल्स दिसली. त्यापैकी "हॉटेल श्रीनिवासा रेसिडेन्सी" ह्या नुकत्याच बांधलेल्या हॉटेलमधे चांगल्या रूम्स अगदी आमच्या बजेटनुसार मिळाल्या. या हॉटेलच्या अगदी समोरच "हॉटेल मथुरा कम्फर्ट" नावाचे अजून एक अगदी त्याच दर्जाचे दुसरे हॉटेल देखील राहण्यासाठी उपलब्ध आहे. हि दोन्ही हॉटेल्स पूर्ण बुक असतील तर श्रीकृष्ण मठामधे दोन-तीन भक्तनिवास देखील निवासासाठी उपलब्ध असतात. 


Hotel Srinivasa Residency

Near Krishna Mutt Parking Area, Rajangana, Maruthi Veethika, 

Udupi, Karnataka 576101

http://srinivasaresidencyudupi.com/index.html

Phone : 08202530289

हॉटेलचे Google map location : https://goo.gl/maps/6A6Za2hfeDF2


हॉटेल रूमचा ताबा मिळताच फ्रेश झालो आणि पुन्हा संध्याकाळी ७.३० वाजता हॉटेलच्या अगदी समोरच असणारा श्रीकृष्ण मंदिराचा परिसर फिरण्यासाठी बाहेर पडलो. खरतर उद्या सकाळी मंदिर परिसर बघायचा असं ठरलं होत पण सहज मनात आलं की आत्ता तासाभराचा वेळ रूमवर बसून वाया घालवण्यापेक्षा सायंकाळच्या शांत वातावरणात एकदा मंदिरात जाऊन यावं. तसंही एवढ्या लांब येऊन श्रीकृष्णाचे दर्शन दोनदा झाले तरी कुणाला नकोय. आणि झालंही अगदी तसचं. संध्याकाळच्या शांत वातावरणात मंदिर परिसरात फार गर्दी नसल्यामुळे श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर दर्शन झाले. तसेच विविध मठातून ऐकू येणाऱ्या मंत्राच्या वेदघोषांनी, आरत्यांनी व खास दाक्षिणात्य कर्नाटक संगीत पद्धतीच्या भक्ती गीतांनी सर्व मंदिर परिसर खूपच छान वाटत होता. 


साधारण तासभराचा वेळ मंदिरात घालवल्यानंतर रात्री ८.३० वाजता आम्ही मुक्कामासाठी उतरलेल्या हॉटेलच्या अगदी समोरच असणाऱ्या "हॉटेल मथुरा कम्फर्ट" या हॉटेलच्या शुद्ध शाकाहारी डायनिंग हॉलमधे रात्रीचे जेवण केले. येथे व्हेज थाळी, पंजाबी डिशेश, पावभाजी व चायनीज अश्या गोष्टी जेवणासाठी उपलब्ध आहेत. रात्री ९.३० वाजता रूमवर आलो आणि ट्रीपच्या तिसऱ्या दिवसाची समाप्ती केली. आज दिवसभराचे गाडीचे एकूण रनिंग झाले होते १६० किमी.  


मुरुडेश्वर अंतर्गत फिरणे - ३ किमी

मुरुडेश्वर ते कोल्लूर - ६५ किमी

कोल्लूर ते मारवंथे बीच - ४० किमी

मारवंथे बीच ते अनेगुडे मंदिर - २२ किमी

अनेगुडे मंदिर ते उडुपी श्रीकृष्ण मंदिर - ३० किमी


दिवस चौथा: बुधवार, २५ ऑक्टोबर २०१७ :

==============================


मंदिराचा परिसर अगदीच हॉटेलच्या समोर असल्याने आज दिवसाची सुरवात सुंदर भक्तिगीतांच्या आवाजाने झाली. लवकर उठल्याने सगळ्यात आधी गाडीचे (कारचे) स्वच्छता अभियान पार पाडले. तीन दिवस सततचा प्रवास आणि बरेच खाणे पिणे गाडीत होत असल्यामुळे कार आतून बाहेरून स्वच्छ करणे गरजेचे होते. अनायासे हॉटेलच्या पार्किंगमधे नळ आणि मोठा पाईप मिळाल्यामुळे कारला मस्त अंघोळ घातली. बाकी सगळेजण तयार झाल्यावर नाष्टा करण्याआधी आज पुन्हा एकदा श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायचे असे ठरवून सकाळी ८.३० वाजता मंदिरात पोहोचलो. 


वाहन तळाजवळ असणाऱ्या "उडुपी श्रीकृष्ण महाद्वार" असे लिहलेल्या भव्य प्रवेशद्वारातून आपला मंदिर परिसरात प्रवेश होतो. कर्नाटकातल्या अनेक प्रसिद्ध धर्मस्थळांपैकी एक म्हणजे उडुपीचे हे कृष्णमंदिर. मंदिर परिसरात एकूण आठ मठ आहेत त्यापैकी श्रीकृष्ण मठ हा येथील गोपाळकृष्णामुळे सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. वेद्शास्त्राचे गाढे अभ्यासक श्री माधवाचार्य यांनी जवळ जवळ ७०० ते ८०० वर्षांपूर्वी मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाच्या दुर्मिळ अशा बालामुद्रेतील मूर्तीची येथे स्थापना केली. ही मूर्ती त्यांना कशी सापडली यामागे सुद्धा एक आख्यायिका आहे ती अशी. 


उडुपी श्रीकृष्ण मंदिर परिसराचे महाद्वार 


१३ व्या शतकात जेव्हा मुसलमान शासकांनी उत्तरेकडील सोमनाथ आणि द्वारका येथे आक्रमण केले तेव्हा एका भक्ताने तेथील नित्य पूजेतील बालकृष्णाची मूर्ती पळवली. तो सम्रुदकिनाऱ्यावर आला व दक्षिणेकडे निघालेल्या एका जहाजात बसला. खूप दिवस प्रवास करत ते जहाज एका भयंकर वादळात अडकले. वादळ, घोंघावणारा वारा, उसळलेल्या समुद्राच्या लाटांवर हेलकावे खाणारे ते जहाज सर्व आपत्तींवर मात करून एका किनार्‍याला लागले. तो किनारा होता उडुपी जवळचा मालपे बिच. जेव्हा जहाज किनार्‍याला लागले तेव्हा त्याच किनार्‍यावर माधवाचार्य समाधीत लीन होते. माधवाचार्यांच्या योग शक्तीच्या जोरापुढे वादळ जोर धरु शकले नाही. म्हणून माधवाचार्यांना नमस्कार करत त्या जहाजाच्या खलाश्यांनी व व्यापार्‍यांनी जहाजात आणलेली सगळी संपत्ती त्यांना अर्पण केली. गोपालकृष्ण हे माधवाचार्यांचं परमाराध्य दैवत त्यामुळे माधवाचार्यांनी त्यातले काहीही न घेता स्वतःला स्वप्नांत झालेल्या दृष्टांतानुसार फक्त एक कृष्णमूर्ती त्या भाविकाकडून घेतली. तीच ही कृष्णमूर्ती. द्वापार युगात अर्जुनाने द्वारकेत प्रतिष्ठापणा केलेली हि मूर्ती आहे असे सांगतात. 


पुढे कालौघात ह्या मंदिराचे व्यवस्थापन सुरळीत रित्या पार पडावे यासाठी माधवाचार्यांनी आठ उपमठांची निर्मीती केली तेच हे अष्ठ्मठी. यापैकी मुख्य असणाऱ्या श्रीकृष्ण मठाचे पौरोहित्य करण्याचा मान प्रत्येक मठाला दोन वर्षे मिळतो. इथं माध्वमठांच्या गाभ्यातच चंद्रमौलीश्वर आणि अनंतेश्वर ही दोन पुरातन शिवमंदिरं देखील आहेत. ही दोन्ही मंदिर दगड व लाकूड यातून बनवलेली असून माधवाचार्यांच्या उदयापूर्वीची म्हणजे सुमारे १५०० वर्षे जुनी आहेत. अनंतेश्वर, चंद्रमौलीश्वर, कृष्ण मंदीर आणि अष्ठमठी हे सगळे एकाच आवारात आहेत. या आठ मठांच्या परिसरामुळे या मंदिरात आल्यानंतर आपण एखाद्या आश्रमात फिरत आहोत असाच भास होतो.


श्रीकृष्ण मठ व उत्सवात वापरला जाणारा रथ


येथील श्रीकृष्ण मंदिर देखील देशातील इतर कृष्णाच्या मंदिरापेक्षा थोडे वेगळे आहे. कोणत्याही मंदिरात दरवाजातून प्रवेश केला की भाविकांना सर्वप्रथम गाभाऱ्यातील मूर्ती दिसते. पण इथे मात्र मठाच्या विशाल मंडपातून आत प्रवेश केल्याबरोबर श्रीकृष्णाचे थेट दर्शन होत नाही. तर गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या खिडकीतून श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती दर्शन देते. या खिडकीला "कनकदासाची खिडकी" असे म्हणतात. असे सांगतात की कनकदास नावाचा एक कृष्ण भक्त होता. तो अत्यंत गरीब असल्याने मंदिराचे पुजारी त्याला मंदिरात प्रवेश देत नसत. एकदा कनकदासाने कळवळून कृष्णलल्लाची प्रार्थना केली व दर्शन दे अशी विनवणी केली. तेव्हा कृष्णाने प्रसन्न होऊन मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीतून कनकदासाला दर्शन दिले. आता या कथेत कितपत तथ्य आहे ते फक्त त्या कृष्णाला आणि त्या कनकदासालाच माहित पण सध्या मात्र आपल्याला श्रीकृष्णाचे दर्शन या खिडकीतूनच घ्यावे लागते. कारण 
कनकदासाला दर्शन नाकारण्याच्या पायात कृष्णानेच गाभाऱ्याच्या दरवाज्याकडे पाठ फिरवली.  


श्रीकृष्ण मठातील बालकृष्णाची मूर्ती व या कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी असणारी नवग्रह दिंडी (फोटो इंटरनेटवरून साभार)
कनकदासा गोपूर व कनकदासा दिंडी


हे मंदीर दिवसरात्र सुरुच असते. या मंदिरात सूर्यापासून हनुमानापर्यंत अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा असून या सर्व मूर्ती प्राचीन आहेत. मंदिर प्रांगणात विष्णुचे आसन नागराजाचेही मंदिर आहे. मंदिरातील भितींवर कांही चित्रेही रेखाटली गेली असून तीही खूप जुनी आहेत. मंदिरातील भव्य चांदीचे मखर व मोठमोठ्या पितळी समया सगळेच कसे आकर्षक आहे. मंदिराजवळ स्वच्छ पाण्याची मोठी पुष्करणी आहे. सकाळी लवकर गेल्यास या पुष्करणीच्या पाण्यात मंदिराचे अतिशय सुंदर प्रतिबिंब उमटते. 


मठाच्या परिसरात असणारी सुंदर पुष्करणी


मंदिर परिसरात तांब्या पितळीच्या मूर्त्या व जुन्या वस्तू मिळण्याची अनेक दुकाने आहेत. येथील प्रत्येक दुकानात आवर्जून दिसते ते म्हणजे ताक/लोणी घुसळण्यासाठी वापरली जाणारी रवी आणि लोणी साठवण्यासाठी उपयोग केले जाणारे मडके/माठ. हि रवी म्हणजे एक प्रकारे बालकृष्णाचे शस्त्रच आणि त्याच्या बाललीलांमधे त्याने माठ फोडून लोणी चोरून खाल्लेले आपण ऐकले आहेच. त्यामुळे येथे प्रत्येक दुकानात अगदी बोटाच्या आकारापासून ते मोठ मोठ्या रव्या तसेच आकर्षक कलाकुसर केलेले अगदी छोटे ते मोठे लोण्याचे माठ विकायला ठेवलेले दिसतात. उडुपीच्या श्रीकृष्ण मठाला भेट दिलेली आठवण म्हणून या दोन गोष्टी येथे नक्की खरेदी कराव्यात.  

उडुपी येथील श्रीकृष्ण मठाचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/s8r5bVE9KRN2


दक्षिणेकडील भाग सोडला तर इतर संपूर्ण देशभर ‘साऊथ इंडियन’ पदार्थ मिळण्याची खास उडुपी हॉटेल्स असतात. इडली, मेदूवडा, उत्तप्पा, डोसा, सांबार, चटणी असे पदार्थ बनवण्याची उडुपी लोकांची एक खासियत आहे. त्याच चवीची आता आपल्या मराठी जिभेला पण सवय झाली आहे. हे सगळे बल्लवाचार्य या उडुपी जिल्ह्यातले. मठाच्या परिसरात पण यांची अनेक उपहारगृह आहेत. त्यापैकीच एका उपहारगृहात सकाळचा भरपेट नाष्टा उरकून साधारण १०.३० वाजता मालपे बीचकडे निघालो.


आपल्या सगळ्यांना उडुपी परिचयाचे आहे ते उडुपी हॉटेल्समुळे किंवा मग इथल्या प्रसिध्द श्रीकृष्ण मंदिरामुळे. पण उडुपी
पासून फक्त ६ किमी अंतरावर मालपे नावाचा एक निसर्गसंपन्न आणि लांबच लांब पसरलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. मालपे कर्नाटकातील एक महत्वाचे बंदर असून ते मासेमारीसाठी खूप प्रसिद्ध आहे. येथील मासे जगभरात निर्यात होतात. मालपेचा सम्रुदकिनाऱ्यावर प्रवेश करताच समोर गांधीजींचा पुतळा आपले स्वागत करतो. या सम्रुदकिनाऱ्यावरील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे येथे थोड्या थोड्या अंतरावर एका रेषेत उभे केलेले हट्स, जे या किनाऱ्याच्या सौंदर्यात एक वेगळीच भर घालतात. येथे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने खाण्यापिण्याचे तसेच कोकणी सीफूड मिळण्याचे अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. 


मालपे बीच


फ्री वायफाय (wifi) देणारे मालपे हे भारतातील पहिलेच बीच बर का. खर तर मी या सुविधेचा वापर केला नाही पण दिवसभरात एका व्यक्तीस ३० मिनिटे फ्री वायफायची सुविधा या बीचवर वापरता येते. BSNL या कंपनीद्वारे हि सुविधा जानेवारी २०१६ पासून मालपे बीचवर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे फ्री वायफायसाठी का होईना पण मालपे बीच की एक व्हीजीट तो बनती है!

मालपे बीचचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/cXSovqSbpjC2


मालपे येथील सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे इथल्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणारी चार छोटी बेटे (आयलंड). समुद्रातील ही खडकाळ बेटे ज्वालामुखीच्या उद्रेकातून शांत झालेल्या लाव्हापासून तयार झालेली आहेत. Columnar Basaltic लाव्हामुळे दगडातील वेगवेगळ्या संरचना या बेटांवर आपल्याला पाहता येतात. उभ्या बेसॉल्ट खडकाच्या स्तंभांनी ही चार बेट बनली आहेत. बहुदा भारतातली अशा प्रकारची बेसाल्टीक संरचना असणारे हे एकमेव बेट असावे. म्हणून की काय जिओग्राफ़िकल सर्व्हे ऑफ़ इंडीयाने २००१ साली या बेटांना "नॅशनल जिओग्राफ़िक मॉन्युमेंटचा" दर्जाही दिलेला आहे.


बेसाल्टीक संरचना असणारे सेंट मेरीज आयलंड


या चार बेटांपैकी सेंट मेरीज आयलंड नावाचे एक विस्मयकारक आणि अतिशय सुंदर बेट मालपेच्या समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ आहे. या आयलंडची भेट आपल्या उडुपी भेटीत अजिबात चुकवू नये. सेंट मेरीज आयलंड येथे जाण्यासाठी मालपे बीच येथून बोटींची उत्तम सोय उपलब्ध आहे. माणशी ३०० रुपयांचे तिकीट काढून साधारण ३० मिनिटांचा जलप्रवास करत आपण सेंट मेरीज आयलंडच्या किनाऱ्याला लागतो. तुम्ही जर बूट, साडी, फुल पैंट अश्या गोष्टी घातल्या असतील तर त्या येथे नक्की भिजणार कारण मालपे बीच आणि आयलंड या दोन्ही ठिकाणी बोटी उभ्या करण्यासाठी धक्का नाही. त्यामुळे समुद्राच्या पाण्यात हेलकावे खाणाऱ्या बोटीतच चढावे आणि उतरवे लागते. पण ही थोडी अडचण आणि कसरत तुम्हाला खूप सुंदर अनुभव देऊन जाते एवढे मात्र नक्की.


सेंट मेरीज आयलंड

सेंट मेरीज आयलंडच्या मऊशार पांढऱ्याशुभ्र रेतीवर आपले पाय ठेवताच बोटमन आपल्याला १ तासात परत न्यायला येणार असल्याची आठवण करून देतो. म्हणजे या नितांत सुंदर बेटावर वेळ घालवण्यासाठी आपल्याकडे तब्बल एका तासाचा कालावधी असतो. या बेटाचे क्षेत्रफळ तसे खूपच कमी आहे. संपूर्ण बेटाच्या अगदी कोपऱ्यातून फेरी मारायची म्हणले तरी पाउण तासाचा वेळ खूप झाला. तसेही या बेटावर खाण्यापिण्याचे हॉटेल्स नाहीत (सध्यातरी) त्यामुळे नकळतच सर्व वेळ फिरण्यात जातो. फिरून अगदी कंटाळा आलाच तर नारळांचा आणि सुरुच्या गच्च झाडीमधे पर्यटकांच्या विश्रांतीसाठी राहुट्या बनवलेल्या आहेतच.




पण इतक्या सुंदर ठिकाणी आलाच आहात तर या आयलंडला संपूर्ण चक्कर नक्की मारावी. Columnar basaltic लाव्हामुळे तयार झालेले दगडांचे वेगवेगळे आकार आपण येथे पाहू शकतो. अनेक छोट्या मोठ्या  आकाराचे आणि लाल तांबूस नारंगी अश्या वेगवेगळ्या रंगाचे दगड आणि या दगडांवर जोरजोरात आदळणाऱ्या लाटा हे सर्व पाहण्यात एक वेगळीच मजा येते. या आयलंडच्या आसपास असणारे समुद्राचे पाणी पण किती स्वच्छ तर अगदी गुडघाभर पाण्यात उभारलो तरी खाली पाय व्यवस्थित दिसतात. येथील अजून एक वैशिष्ठ म्हणजे येथे किनाऱ्यावर वाळू कमी पण सर्वत्र शंख-शिंपले मात्र अमाप आहेत. येथे कपल्स तसेच प्रेमी युगुलांना फोटो काढण्याची हौस भागवण्यासाठी "LOVE" "PEACE" असे शब्द असणारी मोठमोठी अक्षरे अगदी योग्य जागी कल्पकतेने लावलेली आहेत. 




येथे फिरत असताना एका बोर्डावर या बेटाचा शोध कसा लागला याविषयीची थोडक्यात माहिती दिलेली आहे ती अशी. वास्को दि गामा हा १४९८ साली पोर्तुगालवरून केरळकडे जात असताना या बेटावर थांबला आणि मदर मेरीच्या नावावरून त्याने या बेटाला सेंट मेरी आयलंड (ओ पाड्रो दी सांता मारीया) असे नाव दिले. या बेटावर नारळाची अनेक झाडे असल्याने स्थानिक लोक या बेटाला कोकनट आयलंड या नावाने देखील ओळखतात. नॉर्थ आयलंड, दर्या बहादुरगड आयलंड आणि साऊथ आयलंड ही मालपे परिसरातील इतर तीन आयलंड्स आहेत. त्यापैकी दर्या बहादुरगड आयलंड येथे किल्ला असल्याचे बोटमनने सांगितले पण वेळेअभावी त्या किल्ल्याची भेट मात्र राहिली. असो! काही तरी पहायचे राहिले तरच आपण पुन्हा पुन्हा अश्या सुंदर ठिकाणी जातो ना असे स्वतःच्याच मनाची समजूत घालून मालपे बीचचा निरोप घेतला. 



आम्ही उडुपी येथे उतरलेल्या हॉटेलची २४ तासांची चेकइन व चेकआउट सुविधा असल्याने आम्ही हॉटेल रूमचा ताबा अजून सोडलेला नव्हता. त्यामुळे उडुपी शहरात येऊन एका उपहारगृहात दुपारचे जेवण केले व फ्रेश होण्यासाठी पुन्हा हॉटेल रूमवर परतलो. दुपारी साधारण ३.३० वाजता सर्व सामान गाडीत भरून पुढील प्रवासासाठी उडपी शहर सोडले. आजचा मुक्काम उडुपी शहरापासून ११० किमी अंतरावर असणाऱ्या धर्मस्थळ येथे करायचा होता. कोठेही न थांबता गेलो तरी संध्याकाळी ६ पर्यंत धर्मस्थळ गाठणे सहज शक्य होते. पण उडुपीकडून धर्मस्थळकडे जाताना वाटेत लागणाऱ्या मणिपाल गावात एक हेरीटेज व्हिलेज पाहण्यासारखे आहे असे इंटरनेटवर वाचण्यात आले होते. या ठिकाणाची वेबसाईट (http://indiaheritagevillage.org/index.html), मी आधीच पाहिलेली असल्याने या ठिकाणाला भेट देण्याची खूपच उत्सुकता होती. त्यामुळे मग धर्मस्थळला जाण्याआधी मणिपाल गावातील या "हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेज" ला भेट द्यायचीच असे ठरवले.


हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेजचे प्रवेशद्वार व हे गाव उभे करणारे विश्वनाथ शेनोय


मणिपाल हे उडुपी शहरापासून फक्त ८ किमीवर असणारे एक उपनगर. येथे असणारे मणिपाल विश्वविद्यालय जगभर प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या देशातील जवळजवळ २५००० पेक्षाही जास्त विद्यार्थी प्रतिवर्षी मणिपाल युनिवर्सिटीमधे शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे या उपनगराला विद्यापीठाचे शहर अशी देखील वेगळी ओळख आहे. याच मणिपाल गावात अगदी तरुणपणापासून पुरातन वस्तूंचा संग्रह करण्याचे वेड असलेल्या एका अवलियाचे एक छोटेसे गाव आहे. हो, या ध्येयवेड्या माणसाने आजपर्यंत इतक्या जुन्या व पुरातन वस्तू जमा केल्या आहेत की त्याचे एक अख्खे गाव येथे आज उभे आहे. त्या ठिकाणाचे नाव "हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेज" तर त्या ध्येयवेड्या व्यक्तीचे नाव "विजयनाथ शेनोय" (Vijayanath Shenoy). पण एक दुखद गोष्ट अशी की अगदी अलीकडेच म्हणजे ९ मार्च २०१७ रोजी विजयनाथ शेनोय यांचे देहावसान झाले.


हस्तशिल्प हेरीटेज यथील काही उत्कृष्ठ वास्तू


विजयनाथ यांचा जन्म ३ जुन १९३४ मधे उडुपी येथे झाला. उडुपीजवळील ज्या गावात विजयनाथ राहिले व मोठे झाले त्या गावात अनेक जुनी घरे आणि पुरातन वास्तू त्यांच्या आजूबाजूला होत्या. पण काळाबरोबर लोकांना अश्या पुरातन वस्तू न वापरता नवीन आधुनिक गोष्टी वापरण्यात जास्त रस होता हे पाहून त्यांना दुख होत असे. मग कोणत्याही घरातील एखादी जुनी वस्तू वापरणे कुणी बंद केले की विजयनाथ ते आपल्याकडे घेऊन येत आणि अश्याप्रकारे वास्तुरचना व वारसा संवर्धन यामधे त्यांचे सौंदर्यशास्त्र विकसित झाले.

कुकनूर येथील कमल महाल
कमल महाल येथे सुंदररित्या मांडून ठेवलेल्या पुरातन वस्तू


बँक कर्मचारी असणाऱ्या विजयनाथ यांनी नंतरच्या काळात आपल्या या छंदाला व्यापक रूप द्यायचे ठरवून अनेक मोठमोठे सरदार, संस्थानिक, राजे आणि प्रथितयश जुनी घराणी यांचेकडून पुरातन वस्तू जमा करण्यास सुरवात केली आणि याप्रकारे १९९० साली स्वतःच्या राहत्या घरी "हस्तशिल्प हेरीटेज हाउस" ची सुरवात झाली. प्राचीन वस्तू जमा करण्याबरोबरच मग त्यांनी उध्वस्त झालेल्या जुन्या पुरातन वास्तू शोधून त्यांचे विखुरलेले भाग एकत्र करून पुन्हा तशीच वास्तू उभारण्याचे काम सुरु केले. त्यांच्या वाचण्यात, ऐकण्यात किंवा पाहण्यात कोठेही एखादी पुरातन वास्तू उध्वस्त होणार आहे असे कळाले की विजयनाथ तेथे पोहोचत आणि त्या वास्तूंचे सर्व भाग एकत्र करून ती वास्तू पुन्हा तशीच उभी करण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे पुढील काही वर्षातच "हस्तशिल्प हेरीटेज हाउस" हे जुन्या व पुरातन गोष्टी स्थानिक हवामान आणि वातावरणाशी सुसंगत होत सुंदररितीने पुन्हा कश्या मांडल्या जाऊ शकतात याचे एक प्रत्यक्ष उदाहरण बनले. या संकल्पनेतूनच मग १९९७ साली मणिपाल येथे "हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेज" या नावाने सहा एकरांवर उभे असलेले एक भव्यदिव्य खुले संग्रहालय तयार झाले. 


देशविदेशातील गजबगजब वस्तू असणारी एक वास्तू
अबब! खरोखरच या ध्येयवेड्या माणसाने काय काय गोळा केलंय


सध्या "हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेज" येथे कला, हस्तकला, वस्त्रे, भांडी, जुन्या वस्तू, फर्निचर आणि खेळणी यांच्या अनेक गॅलरी उभ्या आहेत. आज येथे स्थानिक पुरातन वस्तू तर बघायला मिळतातच पण त्याचबरोबर जगविख्यात बेल्जियम ग्लासपासून तयार केलेली अनेक झुंबरे व बाहेरील देशातून आणलेल्या अनेक जुन्या गोष्टी देखील पाहता येतात. हेरिटेज गाव खूप मोठे असून त्यात दोन डझनपेक्षा देखील जास्त विविध वास्तू आणि या प्रत्येक वास्तूमधे एक लहान संग्रहालय आहे. येथे ख्रिश्चन होम, मुघल दरबार, मराठा पद्धतीचे वाडे, अनेक जुनी मंदिरे अश्या एक ना अनेक वास्तू त्यातील संग्रहासह पाहता येतात. 


दक्खनेतल्या एका मुघल सरदाराचा महाल


कर्नाटकमधील एका दुर्गम गावात असणारे २०० वर्षांपूर्वीचे "मियार हाउस" नावाचे जुने घर, कुकनूर येथील मुघल स्थापत्याचा कमल महाल, दख्खनच्या नवाबाचा महाल, मुधोळ येथील दरबार हॉल, केरळ येथील उध्वस्त झालेले हरिहर मंदिर अश्या काही अप्रतिम कलाकृती पाहताना हे सार विश्व एका माणसाने उभे केले आहे हे पाहून मन थक्क होऊन जाते. 


एक ख्रिश्चन घर त्यातील वापरातील वस्तूसह


दीड तासांच्या गाईडेड टूरमधेच हे सर्व गाव फिरता आणि पाहता येते. म्हणजे इथं फिरायचं तर गाईड बरोबर घ्यायचाच. गाईडशिवाय येथे फिरण्यास परवानगी नाही. तसंही गाईडशिवाय हा सर्व गाव फिरण्यात मजा देखील नाही कारण गाईड येथील प्रत्येक वास्तूची माहिती देत त्या वास्तू कशा बांधल्या, संग्रहातील पुरातन वस्तू कुठून आणल्या, त्या विजयनाथ यांनी विविध लोकांकडून कश्या मिळवल्या अश्या अनेक गोष्टी सांगत तुम्हाला हा गाव फिरवून आणतो. 


एक टिपिकल मराठा शैलेचे घर


येथे माणशी ३०० रुपयांचे तिकीट असून दिवसातून फक्त तीन वेळा म्हणजे सकाळी ११.३०, दुपारी २ व संध्याकाळी ४.३० या वेळेतच गाईडसोबत तुम्हाला या गावात प्रवेश दिला जातो. प्रत्येक टूर दीड तासांची असते म्हणजे सकाळी ११.३० ला सुरु होणारी टूर पूर्ण हेरीटेज गाव फिरून दुपारी १ वाजता संपते तर संध्याकाळी ४.३० वाजता सुरु होणारी टूर ६ वाजता संपते. येथे फक्त एकच प्रोब्लेम आहे तो म्हणजे येथील गाईड फक्त इंग्रजी आणि कन्नड या दोनच भाषात माहिती देतो.  


केरळ येथील उध्वस्त पण पुन्हा जसेच्या तसे उभे केले हरीहर मंदिर


आम्ही "हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेज" इथं दुपारी ४ वाजता पोहोचलो तेव्हा सुरवातीला आम्ही फक्त ५ जण होतो. आता पुढचा अर्धा तास तिथं थांबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. साडेचार वाजत आले तसे अजून तीन चार लोक तिथं आले. ठीक ४.३० वाजता गाईडने आम्हाला तिकीट दिले आणि आम्ही या अद्भुत गावात प्रवेश केला. आमच्या बरोबर असणारा गाईड खूप सुंदर पद्धतीने प्रत्येक वास्तूची माहिती देत होता. आम्ही ज्या वास्तूमधे प्रवेश करू बरोबर त्याच्या ५ मिनिटे आधी तेथील कर्मचारी प्रत्येक वास्तूचे कुलूप उघडून लाईट लावत आणि एक सुंदर क्लासिकल धून चालू करत. आम्ही तिथून बाहेर पडलो की लगेच स्वच्छता करून ती वास्तू पुन्हा कुलुपबंद होत असे. असा सुंदर समन्वय तेथील गाईड आणि इतर कर्मचाऱ्यामधे दिसून आला. येथे तुम्ही मनसोक्त फोटो काढू शकता त्यामुळे गाईड सांगत असलेली माहिती ऐकत तुमचा दीड तासांचा वेळ कसा निघून जातो ते कळत देखील नाही. 


हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेजचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/WdSrwxD4gV92


संपूर्ण हेरीटेज व्हिलेज फिरून बाहेर पडलो तेव्हा सायंकाळचे ६ वाजले होते. खरतर आम्ही या वेळेपर्यंत धर्मस्थळ येथे मुक्कामी पोहोचणे अपेक्षित होते पण मणिपाल गावातले हे एक सुंदर ठिकाण पाहायला थांबल्याने ६ वाजले तरी आम्ही अजून उडुपीच्या आसपासच होतो. आता मात्र घाई करणे गरजेचे होते कारण उडुपी ते धर्मस्थळ यामधले बरेचसे अंतर हे घाटरस्त्याचे होते आणि धर्मस्थळ येथे पोहोचायला रात्रीचे ८.१५ तरी वाजणारच होते. आम्ही साधारण ६० किमी अंतर कापले असेल नसेल तो पर्यंत अचानकच जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्रीची वेळ त्यात वळणावळणाचा घाट रस्ता आणि वर कहर म्हणजे बाहेर पडणारा घमासान पाऊस त्यामुळे साहजिकच माझा गाडी चालवण्याचा स्पीड अजून कमी झाला. पण अर्ध्यातासातच पाऊस थांबला आणि आम्ही ८.१५ वाजता धर्मस्थळ गावात पोहोचलो.


धर्मस्थळ गावात प्रवेश करताच रात्रीच्या मुक्कामासाठी चांगल्या लॉजचा शोध सुरु झाला. गावात पोहोचल्यावर लक्षात आले की धर्मस्थळ गावात कोणतेही प्रायवेट हॉटेल्स किंवा लॉज नाहीत. गावात जी काही निवास व्यवस्था उपलब्ध आहे ती फक्त धर्मस्थळ संस्थानामार्फत चालवल्या जाणाऱ्या यात्री निवासातच होते. गावात संस्थानाचे नेत्रावती, गायत्री, गंगोत्री, वैशाली, शरावती, रजताद्री, सह्याद्री, साकेत अश्या नावाचे अनेक मोठे यात्री निवास आहेत. या सर्व यात्री निवासात राहण्यासाठी https://www.shridharmasthala.org/ या वेबसाईट आगाऊ स्वरुपात ऑनलाइन बुकिंग करता येते. अगदी AC डीलक्स रूम पासून ते छोट्या खोलीपर्यंत सर्व प्रकारची निवास व्यवस्था येथे उपलब्ध आहे. हे सर्व यात्री निवास धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथ स्वामी मंदिराच्या आसपास आहेत. या यात्री निवासा व्यतिरिक्त काही प्रायवेट लॉजेस व हॉटेल्स मंदिरापासून सुमारे ४ ते ५ किमी दूर आहेत. आम्हाला दोन तीन यात्री निवास फिरल्यानंतर रजताद्री नावाच्या एका मोठ्या यात्री निवासात फारच माफक दारात दोन रूम्स मिळाल्या. 


रात्री जवळच असणाऱ्या उपहारगृहात जेवण उरकून ट्रीपच्या चौथ्या दिवसाची समाप्ती केली तेव्हा आज दिवसभराचे गाडीचे एकूण रनिंग झाले होते १३६ किमी. 


उडुपी कृष्ण मंदिर ते मालपे बीच - ११ किमी

मालपे बीच ते उडुपी कृष्ण मंदिर - ११ किमी

उडुपी कृष्ण मंदिर ते हस्तशिल्प हेरीटेज व्हिलेज (मणिपाल) - ८ किमी

मणिपाल ते धर्मस्थळ - १०५ किमी 


क्रमश: 


धर्मस्थळ ते सागर आणि सागर ते सिरसी दरम्यान भेट दिलेल्या पर्यटनस्थळांबद्दल कोस्टल कर्नाटक ट्रिपचा भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लीक करा ....


@ VINIT DATE – विनीत दाते


पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.

Comments

  1. अतिशय सुंदर आणि सविस्तर वर्णन! पुनः प्रत्ययाचा आनंद व तेव्हाच बरेच काही miss केल्याची जाणीव! - श्रीकांत मापारी

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन. खूप दिवसाची इच्छा आहे जायची बघू कधी जमतंय.

    ReplyDelete
  3. सुंदर वर्णन. खूप दिवसाची इच्छा आहे जायची बघू कधी जमतंय.

    ReplyDelete
  4. खूप मस्त माहिती

    ReplyDelete
  5. विनीत,
    सुंदर वर्णन आणि तपशीलवार माहिती....
    पुढच्या भागाची वाट पाहतोय..

    जीपीएस लोकेशन्समुळे ब्लॉग आणखीनच भारी झालाय 👌

    रोजच्या प्रवासाच्या मार्गाचा एखादा हैंडमेड नकाशा टाक, जेणेकरून आणखी जास्त सूटसुटितपणा येईल.

    ReplyDelete
  6. बापरे! काय जबरी झालाय. फिरणे, खाणे, पिणे, राहणे, जाणे, येणे , वेळ अगदी अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत.आता ओढ निर्माण झालीय तिकडे भटकण्याची. शेवटच्या ब्लॉग ची वाट पाहतोय.

    ReplyDelete
  7. Apratim lekh dosta!! Virtual tour cha feel jabrat!!

    ReplyDelete
  8. मस्त झालाय ब्लॉग विनीत. Detailed info. Photo, gps locations सगळं मस्त

    ReplyDelete
  9. काय मस्त वर्णन केलस रे विनीत अगदि प्रत्यक्ष पाहील्या सारख वाटत खुप छान

    ReplyDelete
  10. very beautiful. Written very well..

    ReplyDelete
  11. Lekh gadi surekh jhala aahe. sarva mahiti atishay nemkya shabdat lihili aahes. Raste, distances aani khana khuna hey atishay uttam. aani mukhtya pics tar khup chaan aahet. mukhya mhanje tu pics madhun jaaga dakhvalyya aahes. karan public jagaeche pics kami aani swatache pics jaast taktat

    ReplyDelete
  12. मस्त वर्णन ..👍👍👍

    ReplyDelete
  13. Very good blog, it reminds me my same trip I did in 2009,the flow and sentence formations are so simple that as you go on reading, , one can imagine the entire picture of that place n front of his eyes, same is experienced by me while reading

    ReplyDelete
  14. संपूर्ण माहिती अतिशय सुंदर,उपयुक्त व मोजक्या शब्दात मांडलेली आहे.त्याबद्दल आपणास धन्यवाद!!!!!
    टूर कंपनी बरोबर जाण्यापेक्षा स्वत: कुटूंबासोबत प्रवास करावा अशी माहिती.
    फक्त प्रवासातील धोके व शाकाहारी व्यक्तींसाठी भोजनाची सोय हि अधिकची माहिती समाविष्ट केल्यास उत्तम.
    Nice blog

    ReplyDelete
  15. Vinit bhava parat ekada vachkanchi man jinkalis tu...
    Yed palatay vachun asa mhanava lagel
    Lekhankan, khup kashta ghetale he nakkich
    Dad dili pahije khupch chan, lahan lahan goshti cover kelya ahet, costal karnataka var ekhada pustak vachatoy asa ki kai etaka chan lihila ahes, tyat photo atishay surekh
    Me sudha inspired zhalo hi trip karayala
    Lavkarch

    ReplyDelete
  16. डिटेलिंग किंवा तपशीलवार लेखन काय असावं हे हा ब्लॉग वाचून कळतं. कोस्टल कर्नाटक बद्दल मराठीत इतकं सुंदर आणि सुलभरीत्या माहिती देणारं कोणतंही पुस्तक किंवा ब्लॉग नाही ती कमी या लेखमालेच्या निमित्ताने भरून निघतीये याचा मनस्वी आनंद आहे.

    ReplyDelete
  17. उत्तम. खूप भारी. पुस्तक लिही. प्रचंड खप होईल. मी पहिला वाचक होईन. तुझी भाषा फार सुंदर आहे. सामान्य नजरेला जे दिसत नाही, ते तू टिपतोस

    ReplyDelete
  18. superbly written sir...very inspiring!!!

    ReplyDelete
  19. खूप सुंदर शब्दात वर्णन केलं आहे. अतिशय सुरेख.

    ReplyDelete
  20. विनित नमस्कार,कोस्टल कर्नाटकचे दोन्ही ब्लाॕग वाचून झाले. खूप छान आणि सविस्तर माहिती. मस्तच ��
    पुढील ब्लाॕगची वाट पाहत आहे.
    I have already planned for same route in diwali vacation but it was cancelled. Hopefully planning for same route in next month ��
    - Rahul Mane, Nigdi

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

पावनगड

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana