सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग १

भगवान शंकरांचं अधिष्ठान, निसर्गसौंदर्याचं वरदान असलेला, इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेला असा किनारी प्रदेश आणि या प्रदेशातील एक वैभवसंपन्न राज्य म्हणजेच कर्नाटक. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेला खेटून असणारे हे एक मोठे राज्य. हे राज्य देखील महाराष्ट्रासारखे विविधतेने नटलेले आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक संपन्नता आणि निसर्ग वैभव येथे आपण अनुभवू शकतो.


कर्नाटक राज्याला साधारण २८० किमीचा सागरकिनारा लाभलेला आहे जो महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीच्या अर्ध्यापेक्षा ही कमी आहे. कर्नाटकाची हि सागरी किनारपट्टी कोस्टल कर्नाटक म्हणून ओळखली जाते. हि सागरी किनारपट्टी उत्तर कन्नड, उडपी व दक्षिण कन्नड अश्या तीन जिल्ह्यांमधे विभागली गेली आहे. थोडक्यात सांगायचं तर कोस्टल कर्नाटक म्हणजे या तीन जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची सफर. पण ही सफर फार अविस्मरणीय आहे. कारण यात आहेत प्रसिद्ध, प्रेक्षणीय आणि प्राचीन अशी मंदिर, स्वच्छ मुलायम मातीचे समुद्रकिनारे, हिरवीगार घनदाट जंगले, नारळी पोफळी सुपारीच्या बागा आणि या सगळ्यामधून धावणारा लाल मातीचा वळणावळणाचा रस्ता. 


गेली दोन वर्ष हि कोस्टल कर्नाटकची ट्रीप स्वतःच्या गाडीने करण्याचा बेत डोक्यात घोळत होता. पण सप्टेंबर २०१६ मधे सायकलवरून धडपडलो आणि गतवर्षीच्या दिवाळीत घडून येणारी ही कोस्टल कर्नाटकाची रोड ट्रीप आपसूकच बारगळली. पुन्हा एप्रिल/मे २०१७ मधे या ट्रीपचे विचार डोक्यात घोळू लागले पण भर एप्रिल/मे महिन्याचा उन्हाळा आणि त्यात कोस्टल साईडला असणारी गर्मी या गोष्टींचा विचार करून पुन्हा एकदा बेत रद्द झाला. पण तेव्हाच ठरवलं की यावर्षी अन्विताच्या (माझी मुलगी) शाळेला दिवाळीची सुट्टी लागली की हि कोस्टल कर्नाटकाची ट्रीप करायचीच. पुण्यातून मी, अमृता (सौ), मातोश्री आणि अन्विता तर सांगली येथून माझे सासू-सासरे असे असे सहा जण माझ्या नवीनच घेतलेल्या टाटा टीयागो गाडीने जायचे ठरले.   


दिवाळीच्या एक महिना आधीपासूनच ट्रीपच्या तयारीला लागलो. कोणती ठिकाण पहायची, त्या ठिकाणांना जाणारे रस्ते कोणते, मुक्कामासाठी योग्य ठिकाण कोणती या सर्व गोष्टींचा अभ्यास सुरु झाला. कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवायची असली की ‘गुगल बाबा’ सर्वांच्या मदतीला धावून येतो. यावेळी सुद्धा त्याने मला ही ट्रीप प्लान करून देण्यासाठी भरभरून मदत केली. तसेच वर्षभरात वेगवेगळ्या मासिकात छापुन आलेली या ट्रीप विषयाची कात्रण जपून ठेवली होती त्यांचा देखील उपयोग झाला. प्लान करतानाच ठरवलं की कोणत्याही ठिकाणी हॉटेलच बुकिंग आधीपासून करायचं नाही. रोज सकाळी लवकर हॉटेल सोडायचं, नाष्टा करायचा आणि सायंकाळी ६ पर्यंत रस्त्यात लागणारी वेगवेगळी ठिकाण पहात पुढचा प्रवास करत राहायचा. संध्याकाळ झाली की जवळ असणाऱ्या बऱ्यापैकी मोठ्या गावात फॅमिलीसाठी योग्य हॉटेल किंवा लॉज पहायचा आणि मुक्काम करायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम तसचं पुढ्च रुटीन. मार्गात लागणाऱ्या पर्यटनस्थळांना योग्य तो न्याय देत रोज साधारण १२५ ते १५० किमीपेक्षा जास्त प्रवास करायचा नाही. 


पण एक प्रश्न होता तो म्हणजे ट्रीपच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी कराव्या लागणाऱ्या ५०० किमीपेक्षा जास्त गाडी प्रवासाचा. पहिल्या दिवशी चिंचवड ते कारवार असा ५४० किमीचा तर परतीच्या प्रवासात सिरसी ते चिंचवड असा ५५० किमीचा प्रवास घडणार होता. तसा मला गाडी चालवण्याचा काहीच प्रोब्लेम नव्हता पण बाकीची मंडळी आणि खास करून माझी मुलगी अन्विता एवढ्या मोठ्या सलग प्रवासाने कंटाळली असती म्हणून मग जाता येता दोन्हीवेळी सासूरवाडीला सांगली येथे एक मुक्काम करायचा असे ठरवले. तसेही सासू-सासरे ट्रीपला बरोबर येणार असल्याने त्यांनाही ते सोयिस्कर होणार होते आणि दोन्हीवेळी आपसूकच २०० किमीचा गाडी प्रवास देखील कमी होणार होता.


दिवस पहिला: रविवार, २२ ऑक्टोबर २०१७ :

================================


शनिवार, २१ ऑक्टोबर २०१७ ला आमच्या कन्येचा भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून दुपारी १२ वाजता चिंचवड सोडले आणि सायंकाळी ५ वाजता सांगली येथे मुक्कामी पोहोचलो. पुन्हा एकदा प्रवासात लागणाऱ्या सर्व गोष्टी व्यवस्थित आणल्या आहेत ना ते तपासून रविवार, २२ ऑक्टोबर २०१७ रोजी ठरल्याप्रमाणे सकाळी ७.३० वाजता सांगली येथून प्रवासाला सुरवात केली. आज सांगली ते कारवार असा ३५० किमीचा प्रवास करणे, कारवार गावातीलच दोन-तीन स्थानिक ठिकाणे पाहणे आणि कारवार येथे मुक्काम असा एकूण प्लान ठरवला होता. 


कर्नाटकात राज्यात महाराष्ट्रापेक्षा प्रतिलिटर ६ रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळत असल्याने निपाणी येथे कर्नाटक राज्याच्या सीमेत घुसताच गाडीला तिचे पोटभर जेवण (पेट्रोल) दिले. मग सांगली - कोल्हापूर - बेळगाव - खानापूर - लोंढा - रामनगर - गणेशगुडी - जोईदा (Joida) - कुंभारवाडा - कारवार असा रस्ता घेत सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, रस्त्यात लागणारे एक दोन व्हिव पॉइंट बघत दुपारी चार वाजता कारवार येथे पोहोचलो. आता या मार्गाबद्दल सांगायचे झाले तर सांगली-कोल्हापूर रस्ता हा महाराष्ट्रातील इतर स्टेट रोडसारखाच फार अपेक्षा न बाळगण्यासारखा आहे. पण कोल्हापूर ते बेळगाव हा रोड (NH4) मात्र चारपदरी व अत्यंत सुंदर आहे. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यान एकूण दोन टोल लागतात त्यापैकी पहिला कर्नाटक राज्यात प्रवेश करताच निपाणीजवळ ६० रुपयांचा तर दुसरा बेळगावच्या थोडंस आधी २५ रुपयांचा आहे. यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत मला कुठेही टोल दिल्याचे आठवत नाही. 


बेळगावजवळ हायवे सोडायचा आणि बेळगावातील ट्राफिकला तोंड देत (पुण्याच्या मानाने तसे कमीच) खानापूर रोडला लागायचे. एकदा का बेळगाव ओलांडले की मराठी सोडा पण इंग्लिशमधे सुद्धा बोर्ड सापडणे मुश्किल त्यामुळे सगळा भरवसा GPS वर ठेवावा लागतो. बेळगावपासून अगदी पार कारवारपर्यंत मग फक्त दोनच लेनचा रोड आहे. हा रस्ता छोटा असला तरी अगदी कारवारपर्यंत उत्तम स्थितीत आहे. गणेशगुडी गाव पार केल्यानंतर रस्ता दांडेली परिसराच्या आसपास असणाऱ्या अंशी नेशनल पार्कमधून जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले जंगलातील विविध प्राण्यांचे अस्तित्व दाखवणारे पोस्टर बघत आपण एखाद्या दाट जंगलातून गाडी चालवत आहोत असे वाटते. पुढे हा रस्ता कारवारच्या थोडे आधी पनवेल-कोची-कन्याकुमारी (NH66) हायवेला जोडतो. या प्रवासात मात्र बेळगाव ते कारवार दरम्यान कोठेही जेवणाची चांगली सोय उपलब्ध नाही. 


३४० किमीचा प्रवास करून दुपारी ४ वाजता कारवार गावात पोहोचलो. कारवार हे उत्तर कन्नडा जिल्ह्यात येणारे तालुक्याचे बऱ्यापैकी मोठे गाव आहे. हे एक आरमारी बंदर असून इथला समुद्रकिनारा अतिशय शांत व सुंदर आहे. गोवा राज्याच्या सीमेला अगदी खेटून असणाऱ्या कारवारपासून खऱ्या अर्थाने कोस्टल कर्नाटकाची सुरवात होते. 


कारवार गावात पोहोचताच "हॉटेल पंचतारा" नावाचे बऱ्यापैकी चांगले हॉटेल लगेच सापडले. फॅमिली बरोबर राहण्यासाठी एक चांगले आणि बजेट हॉटेल. तसेच हॉटेल कारवार गावातील अगदी मेन मार्केट परिसरात आहे त्यामुळे आजूबाजूला खाण्यापिण्याची अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. फार वेळ न घालवता लगेच रूमचा ताबा घेतला, फ्रेश झालो आणि संध्याकाळी ५ वाजता कारवार परिसरातील दोन-तीन ठिकाण बघण्यासाठी हॉटेलच्या बाहेर पडलो. 


Hotel Panchatara

Address: Konekar Wada, Karwar, Karnataka 581301

Phone: 083822 28855

डबल बेड AC रूम १४०० रुपये (Tax सहित) 

डबल बेड NON-AC रूम १००० रुपये

हॉटेल पंचतारा Google map location: https://goo.gl/maps/8mK2mPyKTnB2


कारवार गावात तसे फार काही पाहण्यासारखे नाही. मात्र संध्याकाळच्या दोन-तीन तासाचा वेळ सत्कारणी घालवायचा असेल तर खालील तीन ठिकाणे पाहू शकतो.


(१) INS Chapal Warship Museum (K94) : आयएनएस चपल ही भारतीय नौदलाच्या सेवेतील एक चमक क्लास मिसाईल बोट होती. १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान पश्चिम सीमेवर वर्चस्व प्राप्त करण्याची खूप महत्वाची भूमिका या बोटीने बजावली. या युद्धात आयएनएस चपल बोटीने आपल्या क्षेपणास्त्रांसह कराची शहरावर हल्ला केला व समुद्रातील व्यापार आणि सैन्यला थोपवत पाकिस्तानातील काही महत्वाच्या शहरांचा मोठ्या प्रमाणात विध्वंस केला. अश्याप्रकारे भारताच्या विजयात भरीव कामगिरी केल्याबद्दल आयएनएस चपल या बोटीच्या चालकांना २ परमवीर चक्र, ८ वीरचक्र व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.


INS Chapal Warship Museum
INS Chapal Warship Museum


जवळ जवळ तीस वर्षे भारतीय नौदलाला दिलेल्या अविरत सेवेनंतर या बोटीचे जतन सध्या कारवार येथील रविंद्रनाथ टागोर बीच येथे एका वॉरशिप म्युझियममधे रुपांतरीत करून केले गेले आहे. भारतीय नौदलाच्या लढाऊ बोटी कश्या असतात, त्यांचे अंतर्गत कामकाज कसे चालते आणि बोटीमधे असणारे विविध विभाग कसे असतात हे सामान्य नागरिकांना येथे जवळून पाहता येते. हि भारतीय युद्धनौका लहान मुलांनी व खास करून तरुणांनी तर नक्कीच पहावी. 


नौदलाच्या लढाऊ बोटीचे अंतरंग
नौदलाच्या लढाऊ बोटीचे अंतरंग


ही बोट पर्यटकांना सकाळी १० ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत पाहता येते. हि बोट पाहण्यासाठी माणशी १५ रुपये तिकीट असून त्यामधे भारतीय नौदलाच्या कार्याची माहिती देणारा १० मिनिटांचा एक छोटा व्हिडीओ देखील दाखवला जातो.


Google map location: https://goo.gl/maps/kKLtnn8WyfD2


(२) कारवार मरीन एक्वेरियम : हे मत्स्यालय रविंद्रनाथ टागोर बीचजवळ वॉरशिप म्युझियमला अगदी लागुनच आहे. ह्या मत्स्यालयात एकाच ठिकाणी समुद्री व गोड्या पाण्यातील माशांचा चांगला संग्रह पाहायला मिळतो. एक्वेरियम दुमजली असून खालच्या मजल्यावर समुद्री मासे तर वरच्या मजल्यावर गोड्या पाण्यातील मासे असे वर्गीकरण केलेले आहे. येथे व्हेल माश्याचा भला मोठा सापळा देखील पाहता येतो. हे एक्वेरियम पर्यटकांनासाठी सकाळी ९ ते दुपारी १ व पुन्हा दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत खुले असते. येथे प्रत्येकी २५ रुपये तिकीट असून फ्लॅश न वापरता माश्यांचे फोटो काढण्यास परवानगी आहे. 


Google map location: https://goo.gl/maps/icbE6spHufp



कारवार मरीन एक्वेरियमची दुमजली इमारत

(३) रविंद्रनाथ टागोर बीच / कारवार बीच : कारवार गावातील हा एक फेमस बीच आहे. बंगाली कवी आणि नोबेल पारितोषिक विजेता रबींद्रनाथ टागोर यांनी १८८९ मधे कारवारला भेट दिली होती. रबींद्रनाथांचे बंधू सत्येंद्रनाथ हे कारवारमधील जिल्हा न्यायाधीश होते त्यावेळी रबींद्रनाथांनी काही काळ कारवार येथे घालवला. कारवारचे निसर्गसौंदर्य हा यांच्या प्रेरणेचा एक स्रोत होता त्यामुळे त्यांनी या शहरातील आपल्या स्मृतींचा एक अध्याय येथे समर्पित केला. त्यांच्या स्मृतीमध्ये कारवार बीचला रविंद्रनाथ टागोर बीच असे म्हणले जाते. येथे Watersports, Banana ride आणि Paragliding अश्या गोष्टींची मजा घेता येते. या बीचवर भेळ, पाणीपुरी असे लोकल खाण्यापिण्याची अनेक छोटी दुकाने असून सुर्यास्ताचा निवांत वेळ घालवण्यासाठी हा एक छान पर्याय आहे. 


Google map location: https://goo.gl/maps/2s92UkFdX1C2


रविंद्रनाथ टागोर बीच



कारवार गावातील हि ठिकाणे पाहून साधारण ७ वाजता हॉटेलवर विश्रांतीसाठी परतलो. रात्रीच्या जेवणासाठी जवळच असणाऱ्या "अमृत" हॉटेलचा पर्याय रूमबॉयने सुचवला. कारवार गावात असाल तर रात्रीचे अथवा दुपारचे जेवण या अमृत हॉटेलमधे नक्की करावे. साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज, सी-फूड सगळ्याच गोष्टी येथे चांगल्या मिळतात. तसेच फॅमिली बरोबर जेवायला जाण्यासारखे हे एक चांगले हॉटेल आहे. (अमृत हॉटेलचे Google map location: https://goo.gl/maps/k2njcxKjLgn)


कारवार गावात पाहण्यासारख्या आणखी दोन गोष्टी म्हणजे कारवारच्या समुद्राजवळ असणारे देवबाग बीच आणि सदाशिवगड किल्ला. यापैकी देवबाग बीच हे एका स्वतंत्र आयलंडवर असून तिथे देवबाग बीच रिसोर्ट नावाचे हॉटेल मोठे आहे. या हॉटेल आणि बीचपर्यंत फक्त बोटीनेच पोहोचता येते. थोडे जास्त बजेट असेल आणि कारवार येथे एखादा दिवस जास्तीचा घालवायचा असेल तर देवबाग बीच रिसोर्ट येथे मुक्काम करणे हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. मात्र कारवार गावात असाल आणि किल्ले प्रेमी असला तर सदाशिवगडाला भेट देणे क्रमप्राप्त आहे. पण माझ्याबरोबर असणाऱ्या बाकी लोकांना किल्ला पाहण्यात फारसा इंटरेस्ट नसल्याने मी हा किल्ला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून एकट्यानेच भटकून यायचे ठरवले आणि ट्रिपचा पहिला दिवस संपवला. आज दिवसभराचे गाडीचे एकून रनिंग होते ३५० किमी.


दिवस दुसरा: सोमवार, २३ ऑक्टोबर २०१७ :

================================


कारवार गावात असाल तर सदाशिवगड किल्ल्याला नक्की भेट द्यावी. कारवार गावाची सुरवात होण्याआधी साधारण ४ किमी अलीकडे सदाशिवगड नावाचा एक परिसर लागतो. हा परिसर तिथे असणाऱ्या सदाशिवगड या किल्ल्यामुळे त्याच नावाने ओळखला जातो. दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श या किल्ल्याने दोनदा अनुभवला आहे. काली नदी समुद्राला जेथे मिळते तेथे खाडीच्या अगदी मुखावर समुद्रसपाटीपासून फक्त २०० मीटर उंचीवर हा छोटेखानी डोंगरी किल्ला बांधलेला आहे. ऐतिहासिक कागदपत्रानुसार या किल्ल्याचा उल्लेख विजयनगर साम्राज्याच्या आधीपासून आढळतो. विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला काही काळ विजापूरच्या बहमनी व नंतर अल्पकाळ आदिलशाही सत्तेच्या अंकित होता. फेब्रुवारी १५१० मधे अल्फांसो दी अल्बुकर्क या पोर्तुगीज अधिकाऱ्याने दक्षिणेकडून गोव्याकडे जाताना या किल्ल्यावर हल्ला करून येथे पोर्तुगीजांचा अंमल स्थापन केला. पुढे १६६५ च्या दरम्यान शिवाजी महाराज जेव्हा प्रथम दक्षिणेत उतरले तेव्हा जवळच असणारे अंकोला शहर जप्त करून कारवारवर चालून आले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी सदाशिवगडासह कारवार शहर काबीज केले व गडाच्या पायथ्याला असणाऱ्या दुर्गादेवी मंदिराचा जीर्णोद्धार केला.


सदाशिवगड किल्ल्याच्या पायथ्याचे दुर्गामाता मंदिर


सन १६७४ मधे म्हणजे शिवराज्याभिषेकानंतर काढलेल्या दुसऱ्या दक्षिण दिग्विजय मोहीमेत शिवाजी महाराजांनी सदाशिवगडापासून ते मिर्जन पर्यंतचा संपूर्ण प्रदेश काबीज केला. नंतर अगदी संभाजीराजांच्या मृत्यूपर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे १६९९ च्या आसपास हा भाग राजाराम महाराजांनी सिरसी परिसरावर आधिपत्य असणाऱ्या सोंडा वंशाच्या राज्यांना भाडेतत्त्वावर दिला. सोंडा वंशाच्या राजा बसवलिंगाने १७१५ च्या सुमारास हा किल्ला पुन्हा बांधून घेतला. नंतरच्या काळात म्हणजे १७८३ नंतर किल्ल्यावर इंग्रजांचा अंमल स्थापन झाला. सध्या गडपायथ्याशी असणारे प्रशस्थ असे दुर्गादेवी मंदिर सन १९२८ मधे भंडारी समुदायाने बांधले व ते या परिसरात स्थायिक झाले.


सदाशिवगड किल्ल्यावरील अवशेष


सध्या किल्ल्यावर फारच कमी अवशेष शिल्लक आहेत. एक भव्य दरवाजा, थोडी फार तटबंदी आणि त्यावरील पोर्तुगीज धाटणीचे बुरुज इतकेच काय ते थोडके अवशेष आज पाहायला मिळतात. बहुतेक भाग नाश पावलेल्या स्थितीत आहे. सदाशिवगडाच्या बालेकिल्ल्यावर एक वैशिष्ठयपूर्ण दगडी तोफ आणि एक दगडी घोडा बघायला मिळतो. बालेकिल्ल्याच्या सर्वात वरच्या बाजूला उभे राहिल्यावर समोर अरबी समुद्र व त्याला येऊन मिळणाऱ्या काली नदीचे पॅनोरमिक दृश्य खूप सुंदर दिसते. किल्ल्यावर जायचे झाल्यास दुर्गादेवी मंदिरापर्यंत गाडी रस्ता असून तिथून पायऱ्यांच्या मार्गाने १५ मिनिटात गडाच्या बालेकिल्ल्यावर पोहोचता येते. पायऱ्यांच्या मार्गाने किल्ल्यावर जाताना 
दुर्गादेवी मंदिराबाहेर अनेक तोफा कल्पकतेने मांडून ठेवलेल्या दिसतात. किल्ल्यावर सध्या शासकीय विश्रामगृहाची वास्तू उभारली असून एक गाडी रस्ता थोडा लांबून फिरून आत किल्ल्यातील  विश्रामगृहापर्यंत नेलेला आहे. 


Google map location : https://goo.gl/maps/kuUY8q4h2JQ2


सदाशिवगड किल्ल्यावरील अवशेष
सदाशिवगडावरून दिसणारे काली नदी व समुद्राचे विहंगम दृश


सदाशिवगड पाहून साधारण ८ वाजता हॉटेलवर परत आलो तो पर्यंत बाकीचे तयार होऊन माझी वाट पहात होते. लगेच "हॉटेल पंचतारा" चा निरोप घेतला आणि गाडी पुढील प्रवासाला निघाली. आजच्या दिवसाचे टार्गेट होते कारवार ते मुरुडेश्वर असा १५० किमीचा प्रवास आणि या मार्गावर लागणारी वेगवेगळी ठिकाणे पाहणे. त्यानुसार गाडी पनवेल-कोची-कन्याकुमारी हायवेवर म्हणजे NH66 वर मुरुडेश्वरच्या दिशेने वळवली. कारवार शहरातून बाहेर पडताच सकाळच्या नाष्ट्यासाठी चांगल्या हॉटेलचा शोध सुरु झाला. आमच्या सुदैवाने कारवारपासून १५ किमीवर एक चांगले हॉटेल दिसले आणि नाष्ट्यासाठी थांबलो. आता इथून पुढचे आठ दिवस प्रत्येक हॉटेलमधे नाष्ट्याचा ठरलेला मेनू ऐकायची सवय करून घ्यावी लागणार होती. उपीट, इडली-वडा-सांबर-चटणी, डोसा, पुरी-भाजी. आज पहिलाच दिवस असल्याने सगळ्यांनी गरमागरम उपीट, इडली सोबत खुसखुशीत उडीदवडा-सांबार आणि मसाला डोसा यावर यथेच्छ ताव मारला.


आजचे पहिले ठिकाण होते ते म्हणजे अंकोला गावाजवळील श्री लक्ष्मीनारायण महामाया देवस्थान. अतिशय कलात्मक पद्धतीने बांधलेले, स्वच्छ व सुंदर परिसर असणारे हे मंदिर नक्की पहावे. अंकोला हे कारवारपासून ३४ कि.मी. अंतरावर असणारे उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. अंकोल्याजवळ पोहोचताच महामार्गालगत उजव्या बाजूला एक भव्य कमान लक्ष वेधून घेते. कमानीतून आत वळताच रस्ता थेट ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या लक्ष्मीनारायण महामाया मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जातो.



अंकोला येथील श्री लक्ष्मिनारायण महामाया मंदिर
अंकोला येथील श्री लक्ष्मिनारायण महामाया मंदिराचे प्रशस्थ आवार  


भव्य प्रवेशद्वारातून आत जाताच समोर लक्ष्मीनारायण व भगवती देवीचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. मंदिराची कलात्मक बांधणी पाहताना थोड्यावेळ गोव्यातील मंगेशी व शांतादुर्गा मंदिरांची आठवण येते. प्रशस्थ अश्या मोठ्या आयताकृती प्रांगणात मध्यभागी मुख्य मंदिर असून एका बाजूला अग्रशाळा, मंदिरातील गुरुजींचे निवास्थान तर दुसऱ्या बाजूस भाविकांना उतरण्यासाठी मोठे वसतिगृह उभारलेले आहे. सभांगणाच्या मध्यभागी असणारे मंदिर त्रिस्तरीय असून अर्धमंडप, मुख्य मंडप व गर्भगृह अश्या तिन्ही मंडपांना सुंदर तांब्याचे आवरण घातलेले आहे. मंदिराच्या आवारात ग्रामपुरुष, भगवती, शिव-पार्वती, गणपती आणि रवळनाथ अश्या इतर काही परिवार देवतांची मंदिरे देखील आहेत. 


मंदिराचे सभामंडप व गर्भग्रह
देवळातील देवता (फोटो इंटरनेटवरून साभार)


श्री लक्ष्मीनारायण महामाया देवस्थान हे मुळ मंदिर गोव्यातील नागवे येथे होते. इ.स. १५१० मध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचाराला व छळाला कंटाळून ह्या मंदिराची पूजा करणाऱ्या भक्तांनी देवदेवतांसह दक्षिणेकडे जाण्याचा निर्णय घेतला व अंकोला येथे आजचे मंदिर स्थापन झाले. हे मंदिर अनेक सारस्वत व दैवज्ञ ब्राम्हण कुटुंबांचे कुलदैवत आहे. शुभ्र पांढऱ्या रंगावर सुंदर लाल नक्षीकाम केलेले हे मंदिर कोस्टल कर्नाटकाच्या भेटीत नक्की पहावे.


Google map location: https://goo.gl/maps/xVVvEjrh6C82



अंकोला येथील मंदिराचे पांढऱ्या रंगावर सुंदर लाल रंगाचे नक्षीकाम


आता पुढचे ठिकाण होते काशी रामेश्वरा इतकेच महत्वाचे मानले गेलेले गोकर्ण. अंकोल्यापासून फक्त २५ किमी तर कारवारपासून ६० किमी अंतरावर असणारे गोकर्ण प्रसिद्ध आहे ते येथील महाबळेश्वराच्या म्हणजेच भगवान शंकरांच्या आत्मलिंगामुळे. गोकर्ण हे उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कुमठा तालुक्यात गंगावली आणि अघनाशिनी नद्यांच्या संगमावर अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले एक निंतात सुंदर कोकणी गाव आहे.  गोकर्णला पाहायचे ते महाबळेश्वर मंदिर आणि महागणपती मंदिर. गावात मुख्य रस्त्याच्या पश्चिम टोकाला असलेले महाबळेश्वराचे प्राचीन शिवमंदिर अतिशय सुंदर आणि भव्य आहे. येथे शंकराचे आत्मलिंग किवा अमृतलिंग पिंडस्वरूपात आहे. हे आत्मलिंग येथे स्थापन होण्यामागची आख्यायिका देखील खूप सुंदर आहे. 
 


केकसी, भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक. ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे. राक्षसांचा राजा लंकाधीश हा या केकसीचा पुत्र. रावण हा अतिशय दुष्ट पण तितकाच विद्वान, महापराक्रमी आणि भगवान शंकराचा परमभक्त होता. एके दिवशी केकसीला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिका (वाळूचे) शिवलिंग करून त्याची भक्तीभावाने ती पूजा करीत होती. त्याचवेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता. आपली आई मृत्तिकाशिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने आपल्या आईला साक्षात शंकराकडूनच शिवलिंग आणून देण्याचे वचन दिले.


शिवलिंग आणण्यासाठी रावण तडक कैलासावर निघाला आणि तेथे जाऊन अतिशय कठोर तपश्चर्या त्याने सुरू केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला तुला काय देऊ असे विचारले तेव्हा रावणाने शंकराला आत्मलिंग मागितले. आत्मलिंग ज्याच्याजवळ त्याला मृत्यूचे, पराभवाचे भयच नाही. भोळ्या शंकराने आपले आत्मलिंग रावणाला दिले पण एक अट घातली की लंकेत पोहोचेपर्यंत हे लिंग जमिनीवर टेकवायचे नाही. जमिनीवर ठेवलेस तर तेथेच त्याची स्थापन होईल. रावण आत्मलिंग तळहातावर घेऊन आकाशमार्गे लंकेकडे निघाला.

शंकरांनी आपले आत्मलिंग रावणास दिल्याची वार्ता सर्व देवांना कळली. देव काळजीत पडले. रावण अजिंक्य होणार त्यामुळे तो अजूनच उन्मत्त होऊन देवांचे जीवन असह्य करेल अशी भीती त्यांना छळू लागली. हे विघ्न दूर करण्यासाठी सर्व देव गजाननाकडे गेले. देवांच्या विनंतीवरून गणपतीने आत्मलिंग लंकेत जाऊ न देण्याचे आव्हान स्वीकारले. समुद्रकिनार्‍यांवर तो बालगुराख्याचे रूप घेऊन आला. रावणाच्या मार्गातच हे ठिकाण होते. संध्याकाळ होत आली होती रावण अत्यंत कर्मठ व प्रकांडपंडित होता. तसेच परमशिवभक्तही होता. सायंसंध्यां पश्चिम समुद्रात करून शंकराची आराधना करण्याचा रावणाचा नित्यनेम होता. पण लिंग जमिनीवर ठेवायचे नाही आणि लिंग हातात असताना सायंसंध्यां करता येणार नाही. त्याला मोठा प्रश्न पडला तोपर्यंत बालगुराखी रूपातला गणपती त्याला दिसला. रावणाने बालगुराख्याला थोड्या वेळासाठी लिंग सांभाळायला सांगितले. तेव्हा बालगुराखी रावणास म्हणाला की हे लिंग फार जड आहे त्यामुळे मी ते फार काळ उचलू शकत नाही. तुम्ही लवकर या. मी तीन हाका मारे पर्यंत तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग येथेच ठेवून जाईन. ‘लवकरच परतेन’ असे सांगून रावणाने ते शिवलिंग बालगुराख्यांकडे दिले व तो सायंसंध्या करण्यास निघून गेला.

थोड्या वेळाने बालगुराख्याचे रूप घेतलेल्या गणेशाने पहिली हाक दिली, दुसरी हाक दिली व पुन्हा तिसऱ्यांदा आरोळी दिली. पण रावण आपल्या सायंसंध्येत मग्न असल्याने त्याला तिन्ही हाका ऐकू आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी गुराख्याने ते लिंग जमिनीवर ठेवले. थोड्या वेळाने रावण परतला आणि पाहतो तो काय! शिवलिंग जमिनीवर ठेवलेले. रावण खूप चिडला त्याने त्या बालगुराख्याच्या मस्तकावर वज्राने जोरदार प्रहार केला. नंतर रावणाने आपल्या सर्वशक्तिनीशी जोर लावून ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला. पण ते लिंग आपल्या जागेवरून तसूभर देखील हलले नाही. शेवटी रावणाने खूप जोर लावून ते लिंग पिरगळून ओढले. त्यामुळे ते ‘गोकर्णाकार’ म्हणजे गाईच्या कानासारखे झाले. गाईच्या कानासारखे म्हणून गोकर्ण तर महाबलशाली रावणाने अनेक प्रयत्न करुनही आत्मलिंग हलले नाही म्हणून महाबळेश्वर (महा+बळ+ईश्वर). अशा प्रकारे महादेवांच्या या आत्मलिंगास ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे नाव पडले.


श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण करत गोकर्ण येथे आले होते. सरस्वती गंगाधर रचित 'श्रीगुरुचरित्र' या मराठी ग्रंथामध्ये त्यांच्याबद्दल व गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राबद्दल माहिती मिळते (अध्याय ६ व ७). तसेच सन १६६५ च्या मार्च महिन्यात शिवाजीराजे मराठा आरमाराची पहिली मोहीम संपवून गोकर्ण महाबळेश्वरच्या दर्शनासाठी आले होते असे देखील दाखले मिळतात. 


गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार (फोटो इंटरनेटवरून साभार)


इतर स्थानिक कथानुसार आत्मलिंगाची स्थापना झालेली पाहून रावणाने संतापून आत्मलिंगासोबत आणलेली सर्व सामग्री इतरत्र फेकून दिली (उदा. आत्मलिंग आणलेला डब्बा, डब्ब्याचे झाकण, आत्मलिंगावर टाकलेले कापड, धागा इ.) या चारही वस्तू वेगवेगळया ठिकाणी जाऊन पडल्या. भगवान शंकर व पार्वती यांनी खालीलप्रमाणे या ठिकाणांस पंचक्षेत्र असे नाव दिले. गोकर्ण महाबळेश्वरबरोबरच या चारही ठिकाणांस धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि लोक याची यात्रा करतात.


१) गोकर्ण महाबळेश्वर - महादेवांचे मुख्य आत्मलिंग 

२) सज्जेश्वर - आत्मलिंग आणलेला डब्बा पडला ते ठिकाण (३५ कि.मी. अंतरावर)

३) धारेश्वर - आत्मलिंगास बांधून ठेवलेला धागा पडला ते ठिकाण (४५ कि.मी. अंतरावर)

४) गुनावंतेश्वर/गुणवंतेश्वर - जेथे आत्मलिंगाचे झाकण पडले ते ठिकाण (६० कि.मी. अंतरावर)

५) मुरुडेश्वर - आत्मलिंगास झाकलेले कापड ज्या ठिकाण पडले ते ठिकाण (७० कि.मी. अंतरावर)


गोकर्ण येथील महाबळेश्वराचे मूळ मंदिर ग्रॅनाइटचे असून चौथ्या शतकातील द्रविड स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात उजव्या हाताला दुर्गादेवी, डाव्या हाताला श्री गणेश तर मध्यभागी आत्मलिंग आहे. हे आत्मलिंग नेहमीच्या लिंगापेक्षा थोडे वेगळे आहे. सर्व लिंगामध्ये खाली पिंड व वर शाळूंखा असते. मात्र या आत्मलिंगात शाळूंखा सात पिंडींमध्ये बंदिस्त आहे आणि वरच्या पिंडीत मध्यभागी एक छिद्र असून या छिद्रातून बोटाद्वारे आपण आत्मलिंगाच्या अग्रभागाला स्पर्श करू शकतो. येथे गाभाऱ्यात प्रवेश करण्याअगोदर पुरुषांना अंगातील शर्ट व बनियन काढून उघड्याने गाभाऱ्यात जावे लागते.  


महाबळेश्वराचे मंदिर आतून (फोटो इंटरनेटवरून साभार)

महाबळेश्वर मंदिर


महाबळेश्वरच्या मुख्य मंदिराजवळच अत्यंत हुषारीने आत्मलिंग परत मिळविणाऱ्या गणेशाचे "महागणपती" मंदिर आहे ते नक्की पहावे. या गणपतीच्या मस्तकावर रावणाने आपल्या वज्राने केलेल्या प्रहराची भेग असून भाविक या गणपतीच्या मस्तकावर थंडगार पाण्याचा अभिषेक करतात. गोकर्ण पुराणातील प्रथेप्रमाणे या पट्टविनायकाचे प्रथम दर्शन घेऊन नंतरच श्री महाबळेश्वराच्या आत्मलिंगाचे दर्शन घेतल्यास यात्रेचे फळ मिळते असा संकेत आहे. महाबळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील रस्ता थेट गोकर्ण गावातील समुद्र किनाऱ्यावर जातो. मोठ्या प्रवासी बसेस तसेच सर्व चार चाकी गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था या समुद्रकिनाऱ्याजवळच आहे.

Google map location : https://goo.gl/maps/B6mE7Fw8H1k


महाबळेश्वर मंदिराला लागून असणारे महागणपती मंदिर (फोटो इंटरनेटवरून साभार)
गोकर्ण बीच
गोकर्ण बीच


गोकर्ण गावातला समुद्रकिनारा स्वच्छ असला तरी दर्शनाला आलेल्या भाविकांमुळे तसेच मंदिराच्या पार्किंगमुळे सतत गजबजलेला असतो. त्यामुळे गोकर्ण गावातल्या समुद्रकिनाऱ्यावर फार वेळ न घालवता दुपारी साधारण १२.३० वाजता तेथून जवळच असणाऱ्या ओम बीचकडे निघालो. गोकर्ण गावापासून ६ किलोमीटर अंतरावर ओम आणि कुडले (कुदळे?) अशी दोन शांत आणि रमणीय बीच आहेत. गोकर्ण गावातील मंदिर परिसरामुळे येथे फॉरेनर लोकांना आकर्षित करणाऱ्या रिसोर्ट, श्याक्स, रेस्टोरंट अश्या गोष्टी उपलब्ध नाहीत. त्यामुळे साहजिकच परदेशी प्रवाशांची गर्दी या दोन बीचवर जास्त आढळते. या दोन्ही बीचवर राहण्यासाठी अगदी समुद्राकाठी रिसोर्ट आहेत.   



ओम बीच


गोकर्ण गावातून बाहेर पडताच ओम बीचकडे जाणारा रस्ता छोट्या घाटातून वर चढत एका डोंगरावर जातो. डोंगरावरून लांबवर पसरलेला निळाशार समुद्र आणि ओम बीच येथील खडकाळ समुद्रकिनारा खूप सुंदर दिसतो. ओम बीचचा आकार अवकाशातून (Arial view) पाहिल्यानंतर नैसर्गिक रित्या अगदी "ॐ" चिन्हासारखा दिसतो असे सांगतात. या सागर किनाऱ्याजवळ पोहोचण्यासाठी मात्र गाडी डोंगरावर लावून साधारण १०० पायऱ्या उतरून खाली जावे लागते. किनाऱ्यावर असणारे मोठ मोठाले काळे खडक आणि त्याला जोरजोरात आदळणाऱ्या लाटा असे सुंदर दृश्य या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळते. येथे आम्ही पाण्यात खेळण्याचा आणि खडकांवर चढून फोटोग्राफी करण्याचा मनसोक्त आनंद घेतला. भुकेची आठवण होताच तिथेच समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या "नमस्ते कॅफे" या हॉटेलमधे दुपारचे जेवण उरकले आणि लगेच आजच्या पुढच्या आकर्षणाकडे निघालो. 


Google map location: https://goo.gl/maps/FzQ9JgN1VX22


ओम बीच
ओम बीच येथील सुंदर समुद्रकिनारा
ओम बीच


कोस्टल कर्नाटकाच्या ट्रीपमधे मंदिरांची रेलचेल जास्त आहे पण त्याचबरोबर धबधबे, लेणी, किल्ले अशी थोडीशी ऑफबीट ठिकाण पण बरीच पाहता येतात. गोकर्ण सोडल्यानंतर मुरुडेश्वरकडे जाताना लागणारे असेच एक थोडेसे वेगळे ठिकाण म्हणजे मिर्जन गाव. उत्तर कन्नड जिल्ह्याच्या कुमठा तालुक्यात अघनाशिनी नदीच्या तीरावर मिर्जन गाव वसलेले आहे. या गावात आहे एक अतिशय सुंदर आणि प्रशस्थ असा भुईकोट किल्ला. किल्ला कसा असावा किंवा तो कसा ठेवावा याच एक उत्तम उदाहरण म्हणून तरी प्रत्येक पर्यटकाने कोस्टल कर्नाटकच्या ट्रीपमधे मिर्जन किल्ला जरूर पहावा. 


मिर्जन किल्ला 

मिर्जन किल्ल्याची अभेद्य तटबंदी


ओम बीचवरून निघालो की गोकर्ण गावाला बगल देत साधारण १५ किलोमीटर अंतरावर आपण गोकर्ण क्रॉस येथे पनवेल-कोचीन-कन्याकुमारी हायवेला (NH66) लागतो. पुढे साधारण १० किलोमीटर अंतर याच हायवेवर सुसाट गाडी चालवण्याची मजा घेतल्यानंतर उजवीकडे मिर्जन किल्ल्याकडे जाणारा एक छोटा रस्ता लागतो. मुख्य रस्त्यापासून किल्ला फक्त ८०० मीटर अंतरावर आहे पण तो हायवे वरून मात्र अजिबात दिसत नाही. थोड्याश्या कच्च्या रस्त्याने किल्ल्याजवळ पोहोचताच सर्व बाजूंनी तटा-बुरुजांनी वेढलेला मिर्जन किल्ला एकदम समोर येतो. मिर्जन किल्ला केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडे म्हणजे ASI (Archaeological Survey of India) कडे असल्याने किल्ला फक्त सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेतच पाहता येतो. भारतीय पुरातत्त्व विभागाने या किल्ल्याची उत्तम प्रकारे डागडुजी करून तो मूळ स्वरूपात उभा केला आहे. 


मिर्जन किल्ला 


या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल अनेक मत-मतांतरे आहेत. सोडे-कदंबा राजवटीची गिरसप्पा येथील चिन्नभैरादेवी हिने सोळाव्या शतकात हा किल्ला बांधला असे सांगितले जाते. ही राणी या किल्ल्याचा मसाल्याचा व्यापार करण्यासाठी वखार म्हणून उपयोग करीत असे. मात्र भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या संशोधनानुसार आदिलशाही सरदार शरीफ-उल-मुल्कचा इ.स. १६०८-१६४० या काळात या किल्ल्यावर अंमल होता. मात्र शरीफ-उल-मुल्कच्या आधी देखील हा किल्ला विजयनगर साम्राज्याचा साक्षीदार असावा. विजयनगर, आदिलशाहीनंतर हा किल्ला मसाल्यांच्या व्यापारासाठी पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. त्यामुळेच बहुदा ह्या किल्ल्याच्या बांधकामात इस्लामिक आणि पोर्तुगीज या दोन्ही सत्तांचा प्रभाव दिसून येतो. तसेच सिंधुदुर्ग ते बसनूर या आरमारी मोहिमेच्यावेळी शिवछत्रपतींनी गोकर्ण, कारवार, अंकोला, सदाशिवगड या उत्तर कर्नाटकातील अनेक ठिकाणांबरोबर हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. 

 

मिर्जन किल्ल्याचे अंतरंग


हा भुईकोट किल्ला असल्याने साहजिकच त्याला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी किल्ल्याच्या सर्व बाजूंनी भला मोठा खंदक खोदलेला दिसतो. शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणाचा उपाय म्हणून सैन्यतळाभोवती असे खोल रुंद खंदक खोदण्याची पद्धत प्राचीन काळी रूढ होती. खंदकाचा बराचसा भाग आज मात्र बुजलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्या शेजारील अघनाशिनी नदीचे पाणी खंदकात सोडून त्यावर बोटीने प्रवेश केला जाई. खंदकावर किल्ल्यात येण्या-जाण्यासाठी पूल होता. संकटसमयी हा पूल मुख्य मार्गापासून वेगळा करण्याची सोय देखील होती. सध्या मात्र किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एका बाजूने रस्ता केलेला आहे. 


मिर्जन किल्ल्यातील भव्य ढालकाठीचा बुरुज आणि मोठी विहीर
मिर्जन किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार


खंदकाला लागून किल्ल्याची दुहेरी तटबंदी आणि अतिशय उंच बुरुज आहेत. तटाच्या बाजूने तळात खंदकात उघडणारे अनेक दरवाजे आहेत. बहुतेक हे चोर दरवाजे असावेत. साधारण ५ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर बांधण्यात आलेला हा किल्ला मुख्यता चिऱ्याच्या म्हणजेच कोकणात विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जांभा दगडात बांधलेला आहे. किल्ल्याला एकूण चार प्रवेशद्वारे आहेत, त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार भव्य असून इतर दरवाजे लहान आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर रुंद पायऱ्या असून या पायऱ्या चढून जाताच आपला किल्ल्याच्या मुख्य भागात प्रवेश होतो. 

मिर्जन किल्ल्यातील वास्तू
मिर्जन किल्ल्यातील वास्तू


या किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांना जोडणारे अनेक भुयारी मार्ग. शत्रूकडून किल्ल्यावर अचानक हल्ला झाल्यास जलद व गुप्त रीतीने किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी या भुयारी मार्गांचा उपयोग केला जात असे. किल्ला जेवढा मोठा तेवढीच पाण्याची गरज देखील जास्त. हि पाण्याची गरज भागवण्यासाठी किल्ल्यात दोन मोठ्या विहिरी खोदलेल्या आहेत. या विहिरीत उतरण्यासाठी सुंदर पायऱ्यांचे मार्ग आहेत. सध्या मात्र पुरातत्व विभागाने या विहिरीत व भुयारी मार्गात उतरणारे सर्व रस्ते दरवाजे लावून बंद केलेले असल्यामुळे हे सर्व दुर्ग वैशिष्ट्य आपल्याला बाहेरूनच पहावे लागते.    


किल्ल्यातील भुयारी मार्ग


किल्ला उत्तम अवस्थेत असून ढालकाठीचा बुरुज, अनेक घरांची जोती, उत्तम तटबंदी, प्रार्थनेच्या जागा, वॉच टॉवर आणि पहारेकऱ्यांच्या खोल्या अश्या अनेक गोष्टी या किल्ल्यात पाहता येतात. किल्ल्यात एका मोठ्या वृक्षाच्या छायेत महिषासुरमर्दिनीची एक देखणी मूर्ती ठेवलेली आहे. येथेच पारावर काही तोफगोळे, विरगळी व कोरीव दगड सुंदर रित्या मांडून ठेवलेले दिसतात. संपूर्ण किल्ला व्यवस्थित पाहण्यास साधारण १ तासाचा कालावधी लागतो.


Google map location : https://goo.gl/maps/3bYLCYKmkME2


झाडाखाली ठेवलेली महिषासूरमर्दिनी देवीची मूर्ती व काही विरगळी 



किल्ला पाहून बाहेर आलो तो पर्यंत दुपारचे ४.३० वाजले होते. तिथंच किल्ल्याबाहेर असणाऱ्या छोट्याश्या टपरीवर दुपारचा चहा घेतला आणि फ्रेश झालो. आजचा मुक्काम मुरुडेश्वर गावात करायचे ठरवले होते. पण त्याआधी आजच्या दिवसाचे शेवटचे ठिकाण पहायचे बाकी होते ते म्हणजे इडगुंजी येथील महागणपती विनायक मंदिर. मिर्जन किल्ल्यापासून इडगुंजी मंदिर साधारण ४८ किमी अंतरावर असल्याने अंधार पडण्याआधी म्हणजे संध्याकाळी ६ पर्यंत गणपती मंदिर पाहणे सहज शक्य होते. त्यामुळे लगेच गाडी पुन्हा हायवेला (NH66) घेऊन दक्षिणेकडे म्हणजे कन्याकुमारीच्या दिशेने वळवली. गोकर्ण किंवा मिर्जन येथून मुरुडेश्वरकडे जाताना हायवेच्या डाव्या बाजूस इडगुंजी गावात जाणारा फाटा आहे. येथे गणपतीचे शिल्प असणारी इडगुंजी गावाची एक स्वागत कमान आहे. या स्वागत कमानीपासून गणपती मंदिर फक्त ४ किमी अंतरावर आहे.


इडगुंजी गणेश मंदिर


इडगुंजी हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील होनावर तालुक्यात असणारे एक प्रसिद्ध गणपती मंदिर. शरावती नदीजवळ असलेल्या या प्राचीन मंदिराला १५०० वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे. येथील द्विभुज म्हणजेच दोन हात असणारी अखंड पाषाणातील गणेश मूर्ती खूपच सुंदर आहे. गणपतीच्या एका हातात मोदक तर दुसऱ्या हातात पद्म म्हणजेच कमळ आहे. मूर्तीवर कायम चांदीचा मुखवटा आणि विविध वस्त्रे चढवलेली असतात त्यामुळे मूळ मूर्ती पाहता येत नाहीत. त्यामुळे अखूड पाय आणि गोल गरगरीत पोट असणारी गणेशाची मूळ लोभसवाणी मूर्ती पाहायला मिळणे म्हणजे आपले भाग्यच. 

 

इडगुंजी येथील गणपतीची मुळ मूर्ती (फोटो इंटरनेटवरून साभार)


हे गणेश मंदिर नारदाने स्थापन केले असे सांगितले जाते. या स्थानाचा उल्लेख स्कंदपुराणातील सह्याद्री खंडात येतो. या पुराणानुसार आजचे इडगुंजी म्हणजे पूर्वीचे कुंजरारण्य. या घोर अरण्यात नारदमुनींच्या उपदेशानुसार अनेक ऋषीं-मुनींनी तपस्या केली व येथे गणपतीची स्थापना केली. प्रतिवर्षी १० लाखांपेक्षाही जास्त भाविक या मंदिराला भेट देतात. इडगुंजी मंदिर होनावरपासून १४ किमी, गोकर्णपासून ६५ किमी तर मुरुडेश्वरपासून फक्त २० किमी अंतरावर आहे. 


Google map location : https://goo.gl/maps/taN64it6XpG2



गणपतीचे दर्शन घेऊन इडगुंजी सोडले तेव्हा अंधारून आले होते. त्यामुळे आता गाडी कुठेही न थांबवता पुढे २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुरुडेश्वर गावाकडे निघालो. मुरुडेश्वर सुद्धा पनवेल-कोचीन-कन्याकुमारी (NH66) या मेन हायवेपासून फक्त २ किमी आत आहे. उडपी/मंगलोरच्या दिशेने जाताना हायवेच्या उजव्या हातास मुरुडेश्वर देवस्थानाची भली मोठी स्वागत कमान आहे. या कमानीतून आत शिरताच रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक हॉटेल्स व लॉज आपल्याला दिसतात. आम्ही कोणत्याच हॉटेलमधे आगाऊ बुकिंग केलेले नसल्याने मंदिर परिसराच्या आसपास असणाऱ्या दोन तीन हॉटेल्समधे रूमची चौकशी केली आणि शेवटी "जया पेरेडाइझ" या बजेट लॉजमधे चांगली रूम मिळाली. 

Jaya Paradise

Temple Road, Murdeswar Ta: Bhatkal. 581350

Ph: 08385- 268844  Mob: 8762268844, 9686421644

http://hoteljayaparadise.com/index.php


Google map location : https://goo.gl/maps/pxgvBcqmm982

ट्रीपच्या दुसऱ्या दिवसाची सांगता केली तेव्हा घड्याळात सायंकाळचे ७.३० वाजले होते आणि आजच्या दिवसभराचे गाडीचे एकून रनिंग झाले होते १७० किमी. 


कारवार गावातील अंतर्गत फिरणे व सदाशिवगड - १२ किमी

कारवार ते अंकोला मंदिर - ३८ किमी

अंकोला ते गोकर्ण मंदिर - २५ किमी

गोकर्ण मंदिर ते ओम बीच - ९ किमी

ओम बीच ते मिर्जन किल्ला - २६ किमी

मिर्जन किल्ला ते इडगुंजी - ४९ किमी

इडगुंजी ते मुरुडेश्वर - २२ किमी


क्रमश: 


मुरुडेश्वर ते उडुपी आणि उडपी ते धर्मस्थळ दरम्यान भेट दिलेल्या पर्यटनस्थळांबद्दल कोस्टल कर्नाटक ट्रिपचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा ....


@ VINIT DATE – विनीत दाते


पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.



Comments

  1. निनाद, अतिशय अभ्यासपूर्ण ब्लॉग लेखन, खूप सुंदर शब्दांकन केले आहे. लेख तर माहितीपूर्ण आहेच आणि नवीन जाणाऱ्यांसाठी खूप सविस्तरपणे सर्व गोष्टी इत्यंभूत स्पष्ट्पणे दिल्या आहे. फोटोग्राफी तर खूपच छान केली आहे. अवर्णनीय आणि सर्व वाचन करत करत फोटो पाहत गेले कि आपण त्या जागेवर आहोत कि काय असा भास नक्कीच निर्माण होतो. पुढील अश्याच नवनवीन ब्लॉगच्या प्रतीक्षेत नक्कीच राहायला आवडेल. ....... दत्तात्रय जोशी

    ReplyDelete
  2. विनीत खूप सुंदर लेख फोटोग्राफी

    ReplyDelete
  3. खूप सुंदर ब्लॉग...👍👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम लेखन दादासाहेब 👌👍

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर लेखन उत्तम फ़ोटोग्राफी

    ReplyDelete
  6. विनीत, खूपच छान आणि विस्तृत लेखन. बारीक सारिक महितीचा समावेश, संगतिला गूगल मेपचे लिंक, प्रत्येक ठिकानाचे उत्कृष्ट फोटोग्राफ. शेवटी निसर्ग जपन्या बद्दल मनापासून दिलेली सूचना. राहीले काय..? ब्लॉग वाचल्याअंती नेहमी भटकंति करणारा तर सोडा कधी न करणारा सुद्धा नियोजन करायला लागेल. खुप अभिनंदन आणि शुभेच्छा..💐💐 राजेश बी देशमुख..

    ReplyDelete
  7. डिअर विनीत..... कोस्टल कर्नाटका ब्लॉग खूपच सुंदर आणि बारकावे सुद्धा पाच सहा वर्षा पूर्वी मी सुधा कोस्टल कर्नाटक केले होते .तुझा ब्लॉग वाचताना सर्वे ठिकाणे माझ्या डोळ्या समोरून जात होती .इडली डोसा सांबर वर मस्त ताव मारत होतो .माझ्या बरोबरच सर्वेजन मात्र
    कंटाळे .आपण जाईल तिकडचा त्यामुळे मजा येते आणि प्रवास चांगला होतो.
    आमचे काही ठिकाणे राहिली होती ती ठिकाणे सुधा हा माहिती पूर्ण ब्लॉग वाचल्या मुळे पूर्ण झाली . धन्यवाद विनीत असाच प्रवास करत राहा हैप्पी जर्नी आणि पुढील मस्त ब्लॉग साठी शुभेच्छा ........दिपक पंडित
    🏎🚎🚲🛵🏍🚡✈✈✈🚢🚦

    ReplyDelete
  8. Apratim blog! As usual Vineet. Tumachi swatahachi lihinyachi ek shaili ahe, Tumachya kade shabdasampada khup. Upjat Ani afat aahe. Sarwatt mahatwache mhanaje te usfurta asate.sarwat mahatwache mhanje sarwa barkawe Ani details astat. Apan tithe na jatahi gelyacha anubhav milto. Asech liha, khup,khup liha. Parmeshwar apnas bharpur bhatkanti Ani lihinyachi sadbuddhi dewo.Ek diwas pustak lihinyacha vichar jarur Kara. Tumache sarwa anubhav ektra kelyas, Uttam pustak hoil he pudhchya anek pidhyana upyogi padel.all the best ... Kaustubh Palekar

    ReplyDelete
  9. विनितजी, मुरुडेश्वर पर्यंतची सफर खूपच छान, अप्रतिम झाली. पुढील भागाची प्रतीक्षा. धन्यवाद. दीपक नलावडे

    ReplyDelete
  10. तुमच्या ब्लॉग ला रिप्लाय द्यायचं म्हंटलं की नेहमीच डोकं खाजवत शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. आत्ताही तेच होतंय.�� नेहमीप्रमाणे खूप सोप्प्या पण उच्च श्रेणीच्या शब्दांचा वापर, सुबक आणि खुमासदार वाक्यांत गुंफण! सुरुवात तर अप्रतिमच! माझ्यासारख्यांना गुगल वर शोधूनही सापडणार नाही अशी बारीक सारीक माहिती. त्यामुळे गुगलशी वाद घालत बसण्यापेक्षा तुम्ही लिहिलेल्या कोणत्याही ब्लॉग ची त्या त्या ठिकाणी फिरतांना एक प्रिंट सोबत ठेवली तर गुगल ची आवश्यकताच नाही. इतकी विस्तृत माहिती तुम्ही नेहमीच लिहिता. काही अतिहुशार वाचकांना बरेचदा असे वाटत असते की इतकं काय त्यात बारीक सारीक गोष्टी लिहिण्याची गरज पण त्याच गोष्टी प्रत्यक्ष फिरतांना कधी कधी नाकी नऊ आणतात. थोडक्यात काय तर आम्हाला घरबसल्या, परंतु प्रत्यक्ष फिरवून आणल्या बद्दल खूप खूप धन्यवाद! ����

    ReplyDelete
  11. Apratim lekh dosta !!! Prajakt

    ReplyDelete
  12. वाहवा, अप्रतिम लिखाण. याची देही याची डोळा पाहिल्याची अनुभूती. कारवारचे INS दर्शन मानभावक...
    धन्यवाद

    ReplyDelete
  13. sundar.....mast lihilay.....thanks for sharing!!!!!!

    ReplyDelete
  14. दाद्या,
    आमच्या गावाकडचा हा भाग... त्यामुळे एक वेगळीच जवळीक आहे, आपुलकी आहे... मी तसा फिरलो आहे त्या भागात पण तुझ्या लिखाणाची गंमत अशी आहे की परत नव्याने ओळख झाल्यासारखं वाटतं आणि खूप भारी वाटतं... राहायची ठिकाणं आणि जेवायची ठिकाणं यांचा उल्लेख विशेष वाटला मला... तुझे ब्लॉग वाचल्यावर काहीच अडचण येणार नाही त्याभागात फिरायला इतका परिपूर्ण असतात ते...असाच भटकत रहा, लिहीत रहा आणि आनंद पसरवत रहा हिच सदिच्छा !!!!

    ReplyDelete
  15. Apratim, very well written. We are planning to visit coastalkarnataka in Dec-2018. Your details would surely help us. Keep writing.

    ReplyDelete
  16. Superb 👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  17. छानृ सुंदर लेखन व माहीती

    ReplyDelete
  18. फोटो सह खूपच सुंदर लेख

    ReplyDelete
  19. contact number please
    at shindess@hotmail. com

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana