रामदरणे किल्ला

भटकंती रायगड जिल्ह्यातील अल्पपरिचित "रामदरणे" किल्ल्याची! 

 

पावसाळ्यात गडभटकंती आणि तीही गर्दीची ठिकाण टाळून? सध्या किल्ल्यावर होणाऱ्या गर्दीचे (कुंभमेळ्याचे) फोटो पाहून हे थोडं अवघडच काम वाटायला लागलंय. पण बाहेर पडणारा संततधार पाऊस आणि निसर्गाने सगळीकडे पांघरलेली हिरवीगार चादर माझ्यासारख्या भटक्याला घरी बसू देईल तर शपथ. मग शोध सुरु झाला अल्पपरिचित आणि अनवट वाटांचा. पुण्यातून पहाटे निघून जवळपास आणि फक्त एका दिवसाची गडभटकंती करायची असं ठरवल्यावर मग पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या किल्ल्यांच्या नावाची उजळणी सुरु झाली. तसे या तिन्ही जिल्ह्यातले जवळपास सगळे परिचित आणि अल्पपरिचित किल्ले आधीच भटकून झालेले असल्याने किल्ला करायचा तर तो शक्यतो याआधी न बघितलेला करावा असे ठरवल्यामुळे मग घरात असलेली गडकिल्ल्यावरील पुस्तके धुंडाळणे सुरु झाले. शेवटी दुर्गअभ्यासक आणि लेखक श्री. सचिन जोशी यांच्या "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" ह्या पुस्तकात अलिबाग जवळचा "रामदरणे" नावाचा किल्ला सापडला. आता येथे किल्ला सापडला म्हणजे किल्ला "शोधला" किंवा "सापडला" असा अर्थ नाही बरं. तर माझ्या लिस्टीत बघायचा राहून गेलेला किल्ला सापडला. होय आधीच स्पष्ट केलेलं बरं, कारण आजकाल हे दोन शब्द फार जपून वापरावे लागतात. पूर्ण माहिती न वाचताच यातून कोण आणि कुठला अन्वयार्थ काढेल सांगता येत नाही. असो, थोडं विषयांतर झालं. 

 

तर मग किल्ला ठरला आणि मोड ऑफ ट्रान्सपोर्टसाठी माझी "सह्याद्री एक्सप्रेस" दारात उभी होतीच. सोबतीला हक्काचा ट्रेकर मित्र प्रसाद परदेशी येणार म्हणल्यावर माझ्या गाडीतल्या पाच पैकी दोन जागा आधीच फिक्स झाल्या. मग ट्रेकिंगसंबंधी व्हॉट्सॲप ग्रुपवर हाक देताच ओंकार केळकर, कौस्तुभ पालेकर आणि निसर्गमित्र सातपुते काका बरोबर यायला तयार झाले आणि काही वेळातच उरलेल्या तीन जागा पण फुल्ल झाल्या. तसंही एखाद्या पूर्वी न पाहिलेल्या किल्ल्यावर जात असलो की सोबतीला शक्यतो समविचारी आणि नेहमीचे भटके मित्र सोबत असलेले बरे असतात. कारण होत काय की एकतर या किल्ल्यांच्या वाटा मळलेल्या नसतात त्यामुळे मग वाटा शोधणे आणि किल्ल्यावरील अवशेष शोधणे यात बराच वेळ जातो. आम्ही आपलं पुस्तकातली माहिती वाचत आणि संदर्भ जोडत किल्ला भटकतो. यासाठी मग बरोबर असलेल्या सवंगड्यामधे पेशन्स असणे गरजेचे असते. काही अवशेष दिसलेच तर चांगलं, नाहीच दिसले तर शेवटी एखादी डोंगर भटकंती पदरात पडल्याचं समाधान मानून घरी परततो. पण कुणा नवीन ट्रेकरला बरोबर नेऊन दीड-दोन तास एखादा डोंगर चढवायचा आणि वर जाऊन दाखवायचं काय तर थोडीफार शिल्लक राहिलेली तटबंदी आणि एक-दोन पाण्याची कोरडी ठाक पडलेली टाकी. त्यामुळे मग राजगड, तोरणा, लोहगड, सिंहगड आणि असे भरपूर दुर्गावशेष असणारे किल्ले पाहिलेल्या ट्रेकरच्या चेहऱ्यावर तो सांगत नसला तरी काहीच पहायला न मिळाल्याची निराशा दिसत असते. 

 
ट्रेकर मंडळ: विनीत दाते, कौस्तुभ पालेकर, प्रसाद परदेशी, ओंकार केळकर आणि विजय सातपुते (काका)


तर यावेळी देखील नेहमीचे सवंगडी एकत्र जमले आणि सगळ्यांनी ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी ६ वाजता चिंचवड येथे माझ्या घरी जमून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला. घरातून निघाल्यापासून पावसाची संततधार सुरु होती. त्यामुळे आज हा पाऊस दिवसभर आपली सोबत करणार याची खात्री झाली. आम्ही कामशेत ओलांडले तसे पावसाने चांगलाच जोर धरला. जातानाचा प्रवास लोणावळामार्गे जुन्या मुंबई-पुणे रस्त्यानेच करू असे ठरवले कारण पुर्वानुभवानुसार विकेंड आणि रविवार असला तरी सकाळी ७ वाजता काही सो कॉल्ड पिकनिक पब्लिक अजून लोणावळ्यात येत नाही हे ठाऊक होते. अगदी झालेही तसेच लोणावळा, खंडाळा दोन्हीकडे ट्राफिकमधे न अडकता अमृतांजन पूल ओलांडला आणि खंडाळा-खोपोली दरम्यान सर्वांना चकटफू (फ्री-वे) असणाऱ्या एक्सप्रेस हायवेला लागलो. पण थोडे अंतर जातोय न जातोय तोच लांबपर्यंत वाहनांच्या रांगा दिसायला लागल्या. पुणे-मुंबई प्रवास विना ट्राफिकचा घडणे यासाठी बहुदा फार पुण्य गाठीशी असावे लागते. आमच्या गाठीशी ते नाही हे समोरच्या ट्राफिक जॅम वरून दिसतच होते. पुढे जवळ जवळ अर्धा तास गाडी एकाच जागी थांबलेली होती. आजूबाजूच्या डोंगरावरून असंख्य पाण्याचे ओहोळ दुथडी भरून वाहत होते. काही पब्लिक तर तेवढ्या ट्राफिकमधे सुद्धा गाडीतून उतरून त्या छोट्या पाण्याच्या ओहोळांमधे भिजण्याचा आणि सेल्फी काढण्याचा आनंद घेत होती. आता यांना कोण सांगणार की बाबांनो तुम्ही एक्सप्रेस हायवेवर आहात. म्हणलं चालुदे, आम्ही आपले शांत गाडीत बसून मराठी भावगीतांचा आस्वाद घेत तो पोरकटपणा पहात होतो. शेवटी हळूहळू ट्राफिक सुटले आणि गाड्यांच्या गराड्यातून बाहेर पडलो. संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगराच्या बाजूचा अर्धा हायवे बंद केला होता आणि त्यामुळेच हे ट्राफिक जॅम झाले हे थोडे पुढे आल्यावर  लक्षात आले. 

 

एक्सप्रेस हायवेला खोपोली एक्झिट घेतला आणि शिळफाटा येथे खोपोली-पेण रस्त्याला लागलो तोपर्यंत घड्याळात ८ वाजले होते. मग पाली फाट्यावर असणाऱ्या "हॉटेल मयुरी स्नॅक्स" येथे गरमागरम वडापाव, पोहे आणि इडली सांबर अशी यथेच्छ खादाडी केली आणि ९ वाजता पुढच्या प्रवासाला निघालो. पेण गावाच्या अलिकडे असणारा पेण-खोपोली बायपास घेऊन तरणखोप येथे मुंबई-गोवा हायवेला लागलो तसे पुन्हा एकदा ट्राफिक जॅम आमच्या स्वागताला हजर होतेच. आता पेण ते वडखळ दरम्यान होणारी वाहतूकीची कोंडी म्हणजे तर अनेक वर्षापासूनचा वनवास. हे अंतर किती तर फक्त ७ किमी पण पेणवरून वडखळ नाक्याला पोहोचण्यासाठी वेळ लागतो किती तर तब्बल ४५ मिनिटे. अलिबाग परिसरात जायचे म्हणले की या वाहतूक कोंडीच्या दिव्यातून जाण्याशिवाय पर्याय नसतो. भरीस भर म्हणून पेण ते वडखळ दरम्यान असणारा भयंकर रस्ता. अहो रस्ता कसला खड्ड्यांची चाळणीच म्हणा की. येथे खड्डे चुकवायला चान्सच नाही. एक खड्डा चुकवायला गेलो की गेली गाडी दुसऱ्या खड्ड्यात. त्यामुळे "खा दणके, चालव गाडी" असं करत करत कसेबसे त्या ट्राफिकमधून बाहेर पडलो आणि १०.१५ च्या सुमारास कार्ले खिंडीत पोहोचलो.

 

अलिबाग शहरापासून फक्त ८ किलोमीटरवर अंतरावर असणारी कार्ले खिंड ही तशी पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. चौल, रेवदंडा या परिसरातून पेण, पनवेल, कल्याण परिसरात जाण्यासाठी कार्ले खिंडीचा वापर होत असे. अलिबाग तालुक्यात फक्त दोनच गिरिदुर्ग आहेत आणि हे दोन्ही गिरीदुर्ग या कार्ले खिंडीच्या आसपासच आहेत. यातील एक किल्ला म्हणजे इतिहासप्रसिद्ध सागरगड उर्फ खेडदुर्ग तर दुसरा म्हणजे कार्ले खिंडीला अगदी लागून असणारा रामदरणे किल्ला. यापैकी सागरगड हा किल्ला त्याच्या पायथ्याशी असणाऱ्या "धोंदाणे" धबधब्यामुळे पावसाळी भटकंतीसाठी ट्रेकर्समधे बराच प्रसिद्ध आहे तर त्याच्या अगदी समोर असणारा रामदरणे किल्ला मात्र थोडक्या अवशेषांमुळे ट्रेकर्सपासून अल्पपरिचित राहिलेला आहे. 

 

रामदरणे किल्ल्याची जी माहिती वाचली होती त्यामधे श्री. सचिन जोशी यांच्या पुस्तकानुसार किल्ल्यावर जाणारी वाट ही कार्ले खिंडीतून थळ या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील परहूर गावातून होती तर ट्रेकक्षितीज संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे किल्ल्याची वाट कार्ले खिंडीच्या थोडे आणखी पुढे किहीम-रेवसकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वायशेत गावातून होती. त्यामुळे आता आमच्यासमोर प्रश्न उभा ठाकला कि किल्ल्यावर नेमके जावे कुठून. मग कार्ले खिंडीतच भेटलेल्या काही स्थानिकांकडे आम्ही रामदरणे किल्ल्याविषयी चौकशी केली तसे सगळ्यांनीच आम्हाला सागरगडाची माहिती सांगायला सुरवात केली. यावरून असे लक्षात आले की रामदरणे किल्ला हा या परिसरातील लोकांना देखील फारसा माहित नाही. पण जेव्हा रामदरणेश्वर मंदिराचा उल्लेख निघाला तेव्हा तेथे बसलेल्या एका वृद्ध काकांनी रामदरणेश्वर मंदिराच्या समोर असणाऱ्या एका डोंगरावर पाण्याची काही टाकी आहेत असे सांगितले. पण त्यांनी देखील ती टाकी प्रत्यक्ष पाहिली नव्हती तर त्या टाक्यांच्याबद्दल फक्त ऐकून होते. त्या काकांनी आम्हाला एक पर्याय सुचवला. त्यांनी सांगितले की कार्ले खिंडीतून थळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सोगाव नावाच्या गावापाठीमागे डोंगरउतारावर एक आदिवासी पाडा आहे. त्या पाडयावरून रामदरणेश्वर मंदिर सगळ्यात जवळ आहे. तेव्हा त्या पाडयावरून एखादा माणूस बरोबर घ्या आणि आधी रामदरणेश्वर मंदिर गाठा. मग त्या स्थानिक माणसाच्या सोबतीनेच तुमची पाण्याची टाकी का किल्ला काय तो हुडका. पर्याय उत्तमच होता कारण संततधार पडणारा पाऊस आणि त्या परिसरातील डोंगरावर जमा झालेले धुके यामुळे दिशाभूल होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे त्या परिसराची माहिती असणारा एखादा स्थानीक आमच्या बरोबर असणे अत्यंत गरजेचे होते. काकांचे आभार मानले आणि कार्ले खिंडीपासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर असणारे सोगाव गाठले.


सोगाव गावात पोहोचताच गावाच्या नावाची पाटी रस्त्याच्या डाव्याबाजूला लावलेली आहे. त्या पाटीच्या बरोबर मागे एक सिमेंटचा रस्ता गावापाठीमागे डोंगरपायथ्याशी वसलेल्या एका आदिवासी पाडयावर जातो. या रस्त्याने थोडा चढ चढून गाडी आदिवासी पाड्यासमोर उभी केली. पाडयावर पुन्हा एकदा किल्ल्यांच्या अवशेषांबद्दल काही माहिती आहे का याची चौकशी केली. पण पाडयावरील लोकांनासुद्धा फक्त रामदरणेश्वराचे मंदिर आणि त्याच्या पायथ्याला असणारे एक देवीचे मंदिर एवढीच काय ती माहिती होती. मी वाचलेल्या किल्ल्याच्या माहितीप्रमाणे एका देवीच्या मंदिरापासूनच किल्ल्यावर जाणारी वाट होती त्यामुळे इथल्या माणसांना थोडी जास्तीची माहिती आहे हे ऐकून आनंद झाला. मग पाडयावरच्या नितीन नावाच्या एका तरुण पोराला बरोबर घेऊन त्याच वस्तीच्या मागे असणाऱ्या डोंगर चढाईला भिडलो. 

 

ट्रेकला सुरवात केली तेव्हा घड्याळात सकाळचे ११ वाजले होते. पुढे साधारण १५ मिनिटांचा खडा चढ चढून आदिवासी पाडयामागे असणाऱ्या टेकडीवर पोहोचलो तसे एका अस्ताव्यस्त पसरलेल्या पठाराने आमचे स्वागत केले. या पठारावर सर्वत्र पडलेला काळ्या दगडांचा सडा, त्यामधून उगवलेले हिरवेगार गवत आणि या सगळ्यातून वाट काढत वाहणारे छोटे मोठे पाण्याचे प्रवाह हे सर्व वातावरण टिपिकल पावसाळी भटकंतीचा फील देत होते. पठारावर पोहोचलो तसे समोरच दोन डोंगर उठलेले दिसत होते. त्यातील उजव्याबाजूचा डोंगर थोडा उंच आणि झाडीभरल्या माथ्याचा होता तर डावीकडचा डोंगर तुलनेने बराच छोटा व फक्त हिरव्यागार गवताने आछादलेला होता. रामदरणेश्वराचे मंदिर असणारा डोंगर मात्र या दोन्ही डोंगरांच्या मागे असल्याने दिसला नाही. मग समोर असणाऱ्या दोन्ही डोंगरांच्यामधे तयार झालेल्या थोडक्या सपाटीवर पोहोचणे हे पाहिले टार्गेट मानून समोरच्या डोंगराचा चढ चढण्यास सुरवात केली. 

 

पठारावर पोहोचताच समोर दिसणारे दोन डोंगर


 

पाडयापासून साधारण अर्ध्या तासात आम्ही दोन डोंगरांमधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचलो तसे समोर आणखी एक झाडीभरला डोंगर दिसायला लागला. याच झाडीभरल्या डोंगरावर रामदरणेश्वराचे मंदिर आहे असे वाटाडयाकडून कळाले. मग समोर दिसणाऱ्या डोंगराच्या माथ्यावरील मंदिर गाठणे हे पुढचे टार्गेट ठरवून त्यादिशेने चालायला सुरवात केली. पुढे दाट झाडीतून जाणाऱ्या पायवाटेने खडा चढ चढत १५ मिनिटात रामदरणेश्वर मंदिराच्या पुढ्यात दाखल झालो तेव्हा घड्याळात दुपारचे १२ वाजले होते. म्हणजे पायथ्याच्या आदिवासी पाड्यापासून या मंदिरापर्यंत पोहोचायला १ तास लागला होता.

 



रामदरणेश्वर मंदिराचा डोंगर
रामदरणेश्वर मंदिर असलेल्या डोंगराच्या आजूबाजूचे सुंदर जंगल

 

रामदरणेश्वर मंदिराचा नुकताच जिर्णोध्दार झालेला आहे. मंदिर ज्या डोंगरावर बांधलेले आहे त्याचा माथा खूपच छोटा आहे. हे रामदरणेश्वराचे मंदिर म्हणजे डोंगरमाथ्यावर बांधलेले दोन  खोल्या आणि अंगण असणारे एक छोटे कौलारू घरच. फक्त मधे एक कळस बांधलेला असल्यामुळे ते मंदिर वाटते. इथे असणाऱ्या दोन खोल्यांपैकी गाभारा असणारी खोली थोडी छोटी तर सभामंडपाची खोली प्रशस्थ आहे. गाभाऱ्यात शिवपिंड असून बाहेरील खोलीत अलीकडच्या काळातील नंदी, गणपती आणि अजून एका देवतेची मूर्ती ठेवलेली आहे. मंदिर परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि रमणीय आहे. मंदिर बंदिस्त असल्याने येथे १०/१५ लोकांच्या राहण्याची सोय होऊ शकते. मंदिराबाहेर जुन्या काळातील काही नंदी मांडून ठेवलेले आहेत. 

 
रामदरणेश्वर मंदिर
मंदिराबाहेरील जुने नंदी


रामदरणेश्वराचे मंदिर हे या डोंगररांगेतल्या सर्वोच्च डोंगरावर असल्यामुळे येथून खूप लांबवरचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. मंदिर जरी सर्वोच्च स्थानी असले तरी येथून रामदरणे किल्ला मात्र दिसत नाही. मंदिराचा जो उंच डोंगर आहे त्याच्या डावीकडे आणखी एक झाडीभरला डोंगर उठवलेला आहे. या डोंगरापलिकडे रामदरणे किल्ला लपला आहे. हो लपला आहे असच म्हणावं लागेल कारण रामदरणेश्वराचे मंदिर असणारा डोंगर आणि किल्ल्याचा डोंगर यांच्यामध्ये आलेल्या डोंगराची उंची किल्ल्याच्या डोंगरापेक्षा थोडी जास्त आहे. आम्ही मंदिरात पोहोचलो तसे पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरवात झाली आणि मंदिर व आजूबाजूचा सर्व परिसर दाट धुक्याने व्यापून गेला. पावसाचा जोर थांबेल अशी आशा बाळगून थोडा वेळ मंदिरात वाट पहात बसलो. तोपर्यंत बरोबर आणलेल्या चिवडा, मसाला पुरी आणि इतर कोरड्या खाऊ वर ताव मारला. पण बराच वेळ वाट पाहून सुद्धा जेव्हा पाऊस थांबायचं नाव घेईना तेव्हा मग बरोबर असणाऱ्या वाटाड्याच्या मदतीने तसेच भर पावसात पुढचा मार्ग शोधण्याचा विचार पक्का झाला. 

 


रामदरणेश्वर मंदिराकडे (पिंडीकडे) तोंडकरून उभे राहिल्यावर डाव्या बाजूने एक पायवाट खाली उतरताना दिसते. या पायवाटेने मंदिराचा डोंगर आणि मंदिराच्या डाव्याबाजूला उठवलेला डोंगर यामधे असणाऱ्या सपाटीवर उतरायला लागलो. पुढे साधारण १० मिनिटात तीव्र उतार उतरत दोन डोंगराच्यामधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचलो तसे समोरच एक पत्र्याचे नव्याने झालेले बांधकाम दिसले. हे बांधकाम म्हणजे अलीकडेच जीर्णोद्धारीत केलेले देवीचे मंदिर होय. पूर्वी या ठिकाणी दोन कौलारू झोपड्या होत्या असे वाटाड्याकडून कळाले. नव्याने बांधलेल्या या मंदिरात अलीकडच्या काळातील एक देवीची मुर्ती तर काही जुने तांदळे ठेवलेले आहेत. मंदिराच्या बाहेर देखील काही जुन्या दगडी मुर्त्या असून त्या ओळखण्यापलीकडे खराब झालेल्या आहेत. मी परिसराचा अंदाज घेण्यासाठी गुगल मॅपवर झूम करून पाहिले तर एका डोंगरावर पांढऱ्या रंगातले रामदरणेश्वराचे मंदिर तर त्याच डोंगराच्या पायथ्याशी निळ्या पत्र्याच्या शेडने बांधलेले देवीचे मंदिर स्पष्टपणे दिसत होते (GPS लोकेशन खाली देत आहे). रामदरणे किल्ल्यावर जाण्यासाठी या देवीच्या मंदिरात पोहोचणे फार गरजेचे आहे. कारण या मंदिरासमोर असणाऱ्या झाडीभरल्या डोंगराच्या बरोबर पाठीमागे रामदरणे किल्ला आहे. 

 

 

 

देवीच्या मंदिरापासून खऱ्या अर्थाने किल्ला चढायला सुरवात होते. त्यासाठी देवीच्या मंदिरासमोर असणाऱ्या डोंगरावर एक पुसटशी पायवाट गेलेली दिसते. या पायवाटेने डोंगर चढण्यास सुरवात करायची. मंदिरापासून साधारण १० मिनिटांचा चढ चढून गेलो की पायवाटेच्या डाव्याबाजूला झाडीत काही मुर्त्या उघड्यावर ठेवलेल्या दिसतात. महिषासुर मर्दीनी, खंडोबा आणि इतर काही देवतांच्या खूप सुंदर कोरीव मुर्त्या येथे ठेवलेल्या आहेत. या देवतांचे दर्शन घ्यायचे आणि आता उरलेला डोंगर चढून जायचा. पुढील पाचच मिनिटात आपण या डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो तशी पायवाट पुन्हा खाली समोर एका डोंगराकडे उतरताना दिसते. हा समोर दिसणारा डोंगर म्हणजेच रामदरणे किल्ला होय. 

 
किल्ल्याच्या वाटेवर झाडाखाली ठेवलेल्या काही कोरीव मुर्त्या

 

किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेने उतरायला सुरवात करताच किल्ल्याचा डोंगर आणि आत्ता आपण चढून आलेला डोंगर यामधे एक छोटी घळ आहे. हि घळ म्हणजे किल्ल्याला या डोंगरापासून वेगळे करण्यासाठी बनवलेली मानवनिर्मित खाच. या घळीत उतरताच पायवाटेच्या उजव्या हाताला झाडाखाली एक ४ फ़ुटी वारुळ दिसते. किल्ला व्यवस्थित फिरण्यासाठी आणि आल्यावाटेने परत जाण्यासाठी या वारुळाची खुण खूप महत्वाची आहे. या वारूळापासून उजव्या बाजूला खाली उतरणारी एक पाऊलवाट गडावरील तीन कातळकोरीव टाक्यांकडे जाते तर डाव्या बाजूला वर जाणारी पायवाट किल्ल्यावर घेऊन जाते. आपण प्रथम वारुळच्या मागे उजवीकडे जाणारी पायवाट पकडायची आणि पाण्याच्या टाक्यांकडे जाण्यास निघायचे. पाण्याच्या टाक्यांकडे जाणारी वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालत किल्ल्याच्या पिछाडीला जाते. ही वाट अनेक ठिकाणी ढासळलेली असल्याने खूप जपून आणि काळजीपूर्वक पार करावी लागते. वारुळापासून साधारण १० मिनिटात आपण पाण्याच्या टाक्यांपाशी पोहोचतो.

 

 
दाट झाडात लपलेले चार फुटी वारूळ

 

येथे कातळात कोरलेली ३ टाकी दिसतात. त्यापैकी पहिली दोन टाकी बुजलेली असून दुसऱ्या टाक्यातील जास्तीचे पाणी बाहेर जाण्यासाठी कातळात चर खोदलेला आहे. तिसरे टाके मात्र प्रशस्त खांब टाके असून या टाक्याचे छत दोन खांबांवर तोललेले आहे. या टाक्याच्या एका कोपऱ्यातील भिंतींवर काही देवतांची चित्र असलेल्या टाईल्स लावलेल्या आहेत. या खांब टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असून गडपायथ्याच्या आदिवासी पाड्यापासून या ठिकाणी पोहोचेपर्यंत फक्त याच ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. येथे आपल्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि उर्वरित गडभटकंती करण्यासाठी पुन्हा आलेल्या पायवाटेने वारुळाजवळ पोहोचायचे.

 
पाण्याचे पहिले कोरडे टाके
दुसरे कोरडे टाके
दुसऱ्या टाक्यातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी खोदलेले चर

गडावरील खांब टाके

 

आता वारुळासमोर असणाऱ्या डाव्याहाताच्या पायवाटेने गडमाथ्याकडे निघायचे. या वाटेने वर चढत असताना घडीव दगड एकमेकांवर रचून तयार केलेल्या एका गोलाकार बांधीव बुरूजावरून आपला गडावर प्रवेश होतो. मात्र ही गडाची मूळ वाट नसावी. इतिहासकाळात हा गोलाकार बुरुज आणि त्याच्या जवळच असणाऱ्या एकसलग तटबंदीमधून गडावर प्रवेश होत असावा किंवा त्यामधे किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असे वाटते. पण या गोलाकार बुरुजावर व तटबंदीच्या आजूबाजूला प्रचंड झाडी वाढलेली असल्याने त्या वाटेने खाली उतरून हे अवशेष पाहणे शक्य होत नाही.

 
गडमाथ्यावरून दिसणारा सुंदर परिसर

गडाची तटबंदी व गोलाकार बुरुज

बुरुजापासून वर चढणाऱ्या पायवाटेने उध्वस्त दरवाज्यातून आपला गडप्रवेश होतो आणि पुढच्या पाचच मिनिटात आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. किल्ल्याचा माथा म्हणजे एक छोटेसे पठार असून त्यावर एका मोठया उध्वस्त वास्तुचे अवशेष फक्त दिसून येतात. किल्ल्यावरून सभोवार नजर फिरवताच दक्षिणेला सागरगड किल्ला, उत्तरेला भगवान महादेवाचे जागृत स्थान असणारा कनकेश्वराचा डोंगर तर पश्चिमेला अथांग पसरलेला सागरकिनारा आणि त्यातील कुलाबा, सर्जेकोट, खांदेरी व उंदेरी असे जलदुर्ग दिसतात. रामदरणे किल्ल्याचा इतिहास ज्ञात नसला तरी किल्ल्याचे भौगोलिक स्थान आणि याचा थोडका आकार पाहाता या किल्ल्याचा उपयोग मुख्यता टेहळणीसाठी व मोजकी शिबंदी ठेवण्यासाठी केला जात असावा.

 
गडाचे उध्वस्त प्रवेशद्वार
गडावरील एका मोठ्या बांधकामाचे जोते


किल्ल्यावरील थोडके अवशेष पाहून दुपारी २ वाजता आम्ही किल्ला उतरण्यास सुरवात केली. समोरील डोंगर उतरून पुन्हा देवीच्या मंदिरापाशी परतलो. आता रामदारणेश्वराचे मंदिर असणारा डोंगर न चढता त्या डोंगराला बगल देत तसेच पठारावरून चालत पुढील ४५ मिनिटात आदिवासी पाड्यात परत आलो. वाटाड्या उर्फ नितीनला त्याची योग्य ती बिदागी देऊन त्याचा निरोप घेतला आणि दोन छत्र्यांच्या आडोशात पटापट ओले कपडे बदलले. सकाळी ८ ला केलेल्या नाष्ट्यानंतर पोटभर काही खाल्ले नसल्याने आणि त्यात दिवसभर पावसात भिजल्यामुळे सपाटून भूक लागली होती. पण दुपारी ४ वाजता एखादे हॉटेल उघडे असण्याची आणि गरमागरम जेवण मिळण्याची शक्यता कमीच होती. मिळेल ते खाऊ आणि लवकर पुण्याला परत जाऊ असे ठरवून सोगाव गावातून बाहेर पडलो. कार्ले खिंडीच्या रस्त्याला लागलो तसे परहूर गावाजवळ एक बरे हॉटेल दिसले. सहज म्हणून त्यांना जेवण मिळेल का असे विचारले असता त्यांनी गरमागरम चपात्या, दाल तडका आणि व्हेज कोल्हापुरी बनवून दिली. मग काय येथेच्छ जेवण करून ५ वाजता पुण्याच्या दिशेने निघालो. पुन्हा वडखळ नाका ते पेण-खोपोली बायपास या ७ किलोमीटरच्या अंतरात भयंकर ट्राफिकमधे अडकलो. रात्री १० पर्यंत लोणावळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता दोन पैसे जास्त गेले तरी हरकत नाही पण परतीचा प्रवास एक्सप्रेस हायवेनेच करायचा असे ठरवून पेण-खोपोली रस्त्यावरून एक्सप्रेस हायवेकडे वळालो. चांगला १७३ रुपयांचा टोल फाडला पण सुदैवाने एक्सप्रेस हायवेला कोठेही ट्राफिक न लागल्याने भरलेले पैसे वसूल झाल्यासारखे वाटले. चिंचवडला घरी पोहोचलो तेव्हा घड्याळात रात्रीचे ९ वाजले होते. 

 

 

आज दिवसभरात जाता येता लागलेले ट्राफिक जॅम आणि खड्डेमय रस्त्यावरून दणके खात गाडी चालवण्याची कटकट सोडली तर एक सुंदर अल्पपरिचित किल्ला बघून झाला होता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पावसाळी भटकंतीचा आनंद तर मिळालाच पण भरपूर पाऊस आणि धुके असून सुद्धा किल्ला आणि त्यावरील सगळे अवशेष सापडले याचे जास्त समाधान होते. 

 

ट्रेक दिनांक: रविवार, ८ जुलै २०१८

 

ट्रेकर मंडळ: विनीत दाते, प्रसाद परदेशी, ओंकार केळकर, कौस्तुभ पालेकर आणि विजय सातपुते 

 

किल्ल्याचे नाव: रामदरणे    किल्ल्याची उंची:  पायथ्यापासून ६५० फुट


जिल्हा : रायगड, तालुका : अलिबाग   

 

किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग, चढाई श्रेणी: सोपी

 

पाण्याची सोय: किल्ल्यावरील टाक्यात पिण्याचे पाणी आहे

 

राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. मात्र रामदरणेश्वर मंदिरात मुक्काम करता येईल. 

 

किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून रामदरणेश्वर मंदिर पाहून किल्ल्यावर जाण्यास दोन ते अडीच तास.

 

जाण्यासाठी उत्तम कालावधी: मार्च ते मे हा उन्हाळ्याचा कालावधी सोडून वर्षभर कधीही. पावसाळ्यानंतर गेल्यास उत्तमच

 

भटकंतीचा कालावधी: मुंबई/पुणे येथून एक दिवस

 

मार्ग: पुणे-लोणावळा-खोपोली-पेण-पोयनाड-कार्ले खिंड-थळ रोड-सोगाव

 

रामदरणेश्वर मंदिराचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/NFTDkTS9cSz

 

पठारावरील देवी मंदिराचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/ygh4Y8FXsuD2

 

आदिवासी पाड्याचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/Kg6EhQjqV6n


@ VINIT DATE – विनीत दाते  

 

ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित करणे असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 



“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.

 


 




Comments

  1. as usual mast lihila aahes aani chan detailed mahiti dili aahes.

    ReplyDelete
  2. मस्त वर्णन. एकदम detailed and सुटसुटीत.

    ReplyDelete
  3. ��������khup Chan

    ReplyDelete
  4. नवीन किल्ला, लिखाण तसंच सविस्तर.
    हिरवेगार फोटोंची कमाल, (हे फोटो उन्हाळ्यात पुन्हा बघताना जाम भारी वाली फिलिंग असते. )
    ब्लॉग अखेरीस माहिती देऊन ब्लॉगची नवीन मांडणी मस्त.

    ReplyDelete
  5. Zakkaassss...👌 अभिनंदन💐 खूप उपयुक्त व चांगली माहिती अगदी चकटफू दिल्याबद्दल 😋

    ReplyDelete
  6. अप्रतिम अभिनंदन
    वर्णन मस्त

    ReplyDelete
  7. मस्त ब्लॉग. आवडला. याच ब्लॉगच्या आधाराने आता आमच्यासारखे भटकेही हा किल्ला सहज करू शकतात. तुम्ही केलेलं परिसराचं वर्णन, किल्ल्याच्या इतिहासाची आणि भूगोलाची थोडक्यात पण गरजेची दिलेली माहिती विशेष आवडते. बाकी फोटोच्या फ्रेम पकडण्यात तुम्ही एक्स्पर्ट आहातच.

    ReplyDelete
  8. शेवटची माहितीची मांडणी विशेष आवडली

    ReplyDelete
  9. एक सर्वांग सुंदर वर्णन, एक अपरिचित दुर्ग पाहिला. त्या अजोड़ वास्तु आज क़ाय म्हणत असतील ? कालाय तस्मै नमः !!आपल्या लिखाणाला दंडवत ! प्र के घाणेकर ह्यांची लेखणी सारखी मांडणी ! अप्रतिम

    ReplyDelete
  10. व्वा, मस्तच एक छानशी अनवट अशी भ्रमंती!
    😍🌹👍🏾

    ReplyDelete
  11. अतिशय सुंदर मित्रा। मन रमून जातं वाचताना। keep it up

    ReplyDelete
  12. Sundar, apratim as expected but the new style of writing is also impressive. One can easily visit now using this blog. You have covered almost every micro-macro detail which will be very very useful for all. All this is very well supported by lovely pics. Very nice

    ReplyDelete
    Replies

    1. विनित,
      ओघवते वर्णन...सर्व बारकावे छान मांडलेत...
      आडवळणाच्या भटकंतीची मजा काही औरच असते...त्यातही पावसाळा असेल तर भटकंतीचा आनंद आणखी वाढतो...पिकनिकबाजांची गर्दी नाही, हा आणखी एक लाभ.
      या परिसरात आमचे फारसे भटकणे होत नाही, तरीपण सागरी किल्ल्याच्या मोटरसायकल सफरी प्रसंगी आमची सुरूवात पेण पासून झाली होती. वडखळला आम्ही धरमतर-गेट वे ऑफ इंडिया या सागरी जलतरण मोहिमेकरिता दोनदा येऊन गेलोय, त्यामुळे मध्यरात्रीच्या धरमतरखाडीची आठवण या प्रसंगी झाली...

      Delete
  13. Great Vinit very nice, vachatna wate ki kharokar aapan Trek karat pahat aahe. Dhanywad

    ReplyDelete
  14. अतिशय सुरेख आणि प्रवाही लिहिले आहे. वाचताना आपणही तो थ्रिल अनुभवतोय असा फिल येतो. फोटोग्राफी देखील सुंदर आहे. असा ट्रेक केलाच पाहिजे.

    ReplyDelete
  15. सुंदर विनितजी,ओघवते लिखाण, इत्यभूत माहिती, अप्रतिम फोटोग्राफी, ह्या सगळ्यांमुळे वाचण्यात एक वेगळीच मजा आली. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..����

    ReplyDelete
  16. ख़ूपच छान लिहितोस.अतिशय समृद्ध मराठी ओघवत्या भाषेत.

    ReplyDelete
  17. विनीतजी, अतिशय सुंदर प्रवासवर्णन. माझे घर श्रीकनकेश्वर च्या डोंगराच्या almost पायथ्याशी आहे . सोगाव पासून फारतर 15 मिनिटांच्या driving distance वर आहे. कनकेश्वर डोंगरावर अनेकदा गेलो आहे. तसेच रामदारणेश्वर डोंगरावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरातही अनेकदा गेलो आहे. परंतु अजून माथ्यावरच्या शिवमंदिरात गेलो नाही तसेच किल्लाही पहिला नाही. मात्र तुमचे वर्णन वाचून आता नक्की जाईन. Thanks for sharing this, mate! ---- डों. राजीव भाटकर, rajiv.bhatkar@gmail.com

    ReplyDelete
  18. विनीतजी, अतिशय सुंदर प्रवासवर्णन. माझे घर श्रीकनकेश्वर च्या डोंगराच्या almost पायथ्याशी आहे . सोगाव पासून फारतर 15 मिनिटांच्या driving distance वर आहे. कनकेश्वर डोंगरावर अनेकदा गेलो आहे. तसेच रामदारणेश्वर डोंगरावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरातही अनेकदा गेलो आहे. परंतु अजून माथ्यावरच्या शिवमंदिरात गेलो नाही तसेच किल्लाही पहिला नाही. मात्र तुमचे वर्णन वाचून आता नक्की जाईन. Thanks for sharing this, mate! ---- डों. राजीव भाटकर, rajiv.bhatkar@gmail.com

    ReplyDelete
  19. दादा तुम्ही कधी सडा किल्लावर गेलात का ? गेला असाल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो ... माहिती हवी होती 9763006829 गणेश जय शिवराय

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

पावनगड

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana