सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग ३

सफर कोस्टल कर्नाटकाची - भाग २ पासून पुढे ...

 

कर्नाटकातील अप्रतिम असा उंचाल्ली धबधबा

 

आपण मागील दोन लेखांमधे केलेली कोस्टल कर्नाटकाची भटकंती ही अगदीच समुद्रकिनाऱ्याला लागून होती. पण आता यापुढील दोन भागात आपण समुद्रकिनाऱ्याची साथ सोडून मालेनाडूच्या पश्चिम घाटातील अरण्यमय डोंगराळ भागात प्रवेश करणार आहोत. 

 

मालेनाडू म्हणजे अरबी समुद्राला सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांपासून वेगळा करणारा पूर्वेकडील डोंगर उतारांचा भाग. थोडक्यात सांगायचं तर कर्नाटकात पश्चिम घाटाचा प्रदेश हा मालेनाडू म्हणून ओळखला जातो. लांबीला अंदाजे १०० किमी पसरलेला हा प्रदेश मुख्यतः उत्तर कन्नड व दक्षिण कन्नड या दोन जिल्ह्यात येतो. हा भाग व्यापला आहे अंशी, अगुंबे, भद्रा, मुकांबिका, कुद्रेमुख यासारख्या घनदाट जंगलांनी. याच प्रदेशात कुद्रेमुख, मलयगिरी यांच्यासारखी उंचच उंच शिखर तर आहेतच पण त्यामधून वाहणारे जोग, मुगोड, उंचाल्ली सारखे मोठे मोठे जलप्रपात देखील आहेत. चला तर मग भटकंती करू या नवीन प्रदेशाची. 


दिवस पाचवा : गुरुवार, २६ ऑक्टोंबर २०१७

===============================


धर्मस्थळ प्रसिद्ध आहे ते मंजूनाथेश्वराच्या म्हणजेच भगवान शंकराच्या मंदिरामुळे. त्यामुळे दिवसाची सुरवात अर्थातच देवाच्या दर्शनाने होणार हे ठरलेलेच होते. आम्ही मुक्कामासाठी उतरलेला रजताद्री नावाचा भक्तनिवास मंदिरापासून ३ किलोमीटर दूर असल्याने मंदिर आणि धर्मस्थळ परिसरातील इतर ठिकाणे पाहण्यासाठी आज भक्तनिवासापासून रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. धर्मस्थळ गावात मंदिरासमोरच भव्य पार्किंग उपलब्ध आहे पण सारखं गाडीतून फिरण्यापेक्षा कधीतरी स्थानिक ठिकाणे रिक्षातून बघण्याची मजा घ्यावी असे वाटले.


धर्मस्थळ गावाची स्वागत कमान 


आता थोडं धर्मस्थळबद्दल जाणून घेऊ. श्री क्षेत्र धर्मस्थळ, ८०० वर्षांचा इतिहास असणारे दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध व पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या बेलथंगड़ी तालुक्यात नेत्रावती नदीच्या काठी वसलेले हे गाव, उडुपीपासून १०० किलोमीटर तर मंगळूरपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. येथे असणाऱ्या मंजुनाथ स्वामी मंदिरात शंकराचे सुवर्ण शिवलिंग स्थापन केलेले आहे. तसेच अम्मनवरु म्हणजे पार्वती आणि चंद्रनाथ यांची मंदिर देखील आहेत. या मंदिराची खासीयत अशी की या मंदिराचे व्यवस्थापन जैन फॅमिलीकडे आहे तर मंदिराची पुजा मात्र वैष्णव पुजाऱ्यांकडून केली जाते.


श्री मंजुनाथ स्वामी मंदिर (बाहेरून)

मंजुनाथ स्वामी मंदिराचा अरीयल व्हिव (फोटो साभार : https://www.shridharmasthala.org)


या धार्मिक ठिकाणाची आख्यायिका अशी की, सुमारे ८०० वर्षांपूर्वी आत्ताच्या धर्मस्थळ येथे कुडमा (कुंडयम) नावाचे गाव होते. तेथे जैन धर्माचे जमीनदार बिरमन्ना परगडे त्यांच्या पत्नी सोबत रहात असत. एका रात्री बिरमन्ना यांना स्वप्न पडले की काही देवता त्यांना त्यांचे सध्याचे राहते घर मोकळे करायला सांगून त्याजागी एक मंदिर बांधण्यास सांगत आहेत. बिरमन्ना यांनी जर असे केले तर त्यांना खूप संपन्नता व प्रसिद्धी मिळेल असा दृष्टांत देवतांनी दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच त्यांनी फार विचार न करता दृष्टांताप्रमाणे आपले राहते घर सोडले व तिथे कन्याकुमारी, कलारकामी, कुमार स्वामी व कलाराई या चार धर्म देवतांचे मंदिर बांधले. 
बिरमन्ना स्वतः जैन असल्यामुळे त्यांनी या देवतांची पुजा व नित्यकर्म करण्यासाठी अन्नाप्पा नावाच्या एका ब्राम्हण पुजाऱ्याची नियुक्ती केली. अन्नाप्पा खूप भक्तिभावाने सर्व देवतांची पुजा करत असे. 


एके दिवशी अन्नाप्पाने बिरमन्ना यांना मंदिरातील इतर चार देवतांबरोबर शिवलिंगाची देखील स्थापना करावी अशी विनंती केली. त्याप्रमाने अन्नाप्पाने मंगलोर जवळील कादरी या गावातून एक शिवलिंग आणले आणि त्याची या इतर देवतांबरोबर स्थापना केली. मात्र त्या दिवसापासून अन्नाप्पा गायब झाला व पुन्हा कधीही कुणालाही दिसला नाही. पण शिवलिंग स्थापन केल्यापासून या मंदिराची ख्याती मात्र खूप वाढत गेली. तेच हे मंजुनाथाचे शिवलिंग.


मंजुनाथ स्वामी मंदिराचा अंतर्भाग (फोटो साभार : https://www.shridharmasthala.org)


१६ व्या शतकामध्ये श्री. देवराज हेगडे यांनी उडुपीच्या श्री वदिराजा स्वामी यांना आपल्या मंदिराला भेट देण्याचे आमंत्रण दिले. स्वामीजी देखील आनंदाने येथे आले पण त्यांनी भिक्षा स्वीकारण्यास मात्र नकार दिला. याचे कारण विचारले असता स्वामी म्हणाले की मंदिरात स्थापित केलेली भगवान मंजुनाथाची मूर्ती वैदिक अनुष्ठानानुसार पवित्र केलेली नाही. तेव्हा श्री. हेगडे यांनी स्वामीजींनाच योग्य ते वैदिक संस्कार करून शिवाची पुर्नस्थापना करण्याची विनंती केली. या शुभप्रसंगी हेगडे यांनी खुप दानधर्म केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या स्वामीजींनी या स्थळाला धर्म आणि धर्माचे निवासस्थान म्हणजेच धर्मस्थळ असे नाव दिले. 


मंजुनाथ स्वामी मंदिराचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/UK3TDtEKrir


सध्या मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणारे डॉ. डी. विरेंद्र हेगडे हे या मंदिराचे २१वे धर्माधिकारी आहेत. त्यांनी वयाच्या फक्त २० व्या वर्षी धर्माधिकारी हे पद स्विकारले. विरेंद्र हेगडे यांनी सुरवातीपासूनच आपल्या पूर्वजांच्या इच्छेनुसार अन्नदान, आरोग्यसेवा, शिक्षण आणि दानधर्म यांना भरपूर प्रोत्साहन देत धर्मस्थळाचा विस्तार केला आहे. सध्या धर्मस्थळ मंदिर ट्रस्ट समितीद्वारे जवळजवळ दोन डझन पेक्षाही जास्त महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था चालवल्या जातात जिथे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षणाबरोबरच राहण्यासाठी वसतिगृहाची व जेवणाची मोफत व्यवस्था केली जाते. तसेच श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्प, मुक्त अन्नदान, मंजूनाथेश्वर मेडिकल ट्रस्टतर्फे अनेक आरोग्य सेवा, हुंडाबंदीला विरोध करण्यासाठी सामुदायीक विवाह अश्या एक ना अनेक सामाजिक सेवा या संस्थेमार्फत केल्या जातात. 


डॉ. डी. विरेंद्र हेगडे


डॉ. डी. विरेंद्र हेगडे यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या या उदार सेवेबद्दल अनेक संस्था, विद्यापीठे आणि शासकीय संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांना सन २००९ साली प्रतिष्ठित अश्या "कर्नाटक रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर भारताचा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मभूषण आणि पद्म विभूषण हे दोन्ही पुरस्कार देऊन भारत सरकारने देखील त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 


धर्मस्थळ येथे सरासरी दररोज दहा हजार भाविक श्री मंजुनाथ स्वामींचे दर्शन घेतात. यात्रेकरूंच्या निवासव्यवस्थेसाठी मंदिराच्या आसपास दर दिवशी २०००० लोक राहू शकतील अशी मोठमोठी अतिथीगृहे आहेत. या अतिथीगृहात अगदी साध्या सुविधा असणाऱ्या छोट्या खोल्यापासून ते अगदी एसी व सुपर डिलक्स एसी सर्व प्रकारच्या रूम्स उपलब्ध आहेत.


धर्मस्थळ येथील विविध गेस्टहाउस (फोटो साभार : https://www.shridharmasthala.org)


धर्मस्थळ येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना अन्नदानाचा प्रसाद देण्यासाठी "अन्नपूर्णा" नावाचा एक सुसज्ज डायनिंग हॉल मंदिराजवळ बांधलेला आहे. अलिकडेच नॅशनल जियोग्राफिक या TV चैनलवर प्रसारित होणाऱ्या "वर्ल्ड्स लार्जेस्ट किचन" या कार्यक्रमात धर्मस्थळ येथील मंदिराद्वारे चालवल्या जाणाऱ्या "मेगा रसोई" यावर एक विशेष भाग दाखवण्यात आला होता. या कार्यक्रमात दाखवले गेले की धर्मस्थळ येथे होणाऱ्या वार्षिक लक्षद्वीप या महोत्सवामध्ये जवळ जवळ काही मिनिटातच लाखो लोकांच्या जेवणाच्या पंगती कशा वाढल्या जातात. तसेच सौर ऊर्जेचा व आधुनिक यंत्रणेचा वापरून करून दिवसभर गुणवत्तायुक्त अन्न कसे बनविते जाते. त्यामुळे धर्मस्थळ येथील "अन्नपूर्णा" हॉल मधे भात, सांबार व भाजी या कर्नाटकी प्रसादाचा आस्वाद भाविकांनी नक्की घ्यावा.


भगवान मंजुनाथाचे दर्शन झाले की धर्मस्थळ गावात पाहण्यासारखी इतर अनेक ठिकाणे आहेत. मुख्य मंदिराच्या अगदीच समोर असणारे ललितोध्यान उद्यान, मंजुषा म्युझियम (संग्रहालय), मोठमोठाले जुने रथ आणि विंटेज कार म्युझियम या गोष्टी धर्मस्थळ येथे आल्यावर अजिबात चुकवू नयेत. आपण सुरवात ललितोध्यान गार्डनपासून करायची. मंजुनाथाचे दर्शन घेण्यासाठी दर्शनाच्या लांबच लांब रांगेत एक दोन तास घालवले असतील तर पायाला व शरीराला आराम देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. त्यातच जर लहान मुले बरोबर असतील तर त्यांना खेळण्यासाठी हि एक उत्तम जागा आहे. संस्थानाने या छोट्याश्या उद्यानाची व्यवस्था खूप उत्तम ठेवलेली आहे. सगळीकडे स्वच्छता आहे. उद्यानात राधा-कृष्ण, भगवान शंकर आणि पुराणातील काही प्रसंग पुतळ्यांसह उत्कृष्ट रित्या मांडलेले आहेत. उद्यानाच्या परिसरात असणारे एक छोटे फिश अक्वेरीयम देखील नक्की पहावे असे. हे उद्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ६ यावेळेत पर्यटकांसाठी खुले असते.  


ललितोध्यान उद्यान
ललितोध्यान उद्यानातील विविध मुर्त्या


ललितोध्यान उद्यानाचे GPS लोकेशन:  https://goo.gl/maps/h2NcoCpET3Q2 

 

उद्यानात फेरफटका मारला की आपला मोर्च्या वळवायचा तो मंजुषा म्युझियमकडे. उद्यानापासून पुढे फक्त १०० मीटर अंतरावर एका मोठ्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर मंजुषा नावाचे संग्रहालय आहे. या बिल्डींगच्या खाली असणाऱ्या छोट्या छोट्या दुकानांच्या गर्दीमुळे याच बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर एक भव्य संग्रहालय असेल असे अजिबात वाटत नाही. पण म्हणतात ना "दिसतं तसं नसतं" अगदी त्याचीच प्रचीती या संग्रहालयात पाऊल ठेवल्यानंतर येते. अगदी नाममात्र ५ रुपयांचे तिकीट काढून आपण या संग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावर येतो. दैनंदिन तसेच सामाजिक व धार्मिक कार्यात वापरल्या जाणा-या विविध प्रकारच्या अनेक जुन्या कलाकृतींचे हे एक मोठे संग्रहालय आहे. धर्मस्थळाचे सध्याचे धर्माधिकारी डॉ. श्री. वीरेंद्र हेगडे यांचे हे खाजगी वारसा संग्रहालय असून त्यांनी गेल्या ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ या पुरातन वस्तू गोळा करून हे संग्रहालय उभे केले आहे. 



मंजुषा म्युझियमचा अंतर्भाग (फोटो साभार : http://www.veerendraheggade.com)

जर तुम्हाला प्राचीन वस्तू आणि इतिहास यात रस असेल तर हे ठिकाण अजिबात चुकवू नये. येथे विविध प्रकारच्या प्राचीन वस्तुंचे भव्य संकलन आहे. ऐतिहासिक नाणी, जुनी उंची वस्त्रे, भांडी, दागदागिने, तैलचित्रे, संगीत वाद्ये, जुने लाकडी फर्निचर, कर्नाटक परिसरात सापडलेली अनेक जुनी शिल्पे, मूर्त्या, शिलालेख अश्या एक ना अनेक गोष्टी येथे पाहता येतात. त्याचबरोबर जुने कॅमेरे, टंकलेखक म्हणजेच टाईपरायटर, फोन, टीव्ही, मोठमोठे यांत्रिक मशीन, संगणक यामधे कालपरत्वे होत गेलेले बदल येथे आपल्याला अनुभवता येतात. येथे मूळ भारतीय लेखांचा खूप चांगला संग्रह आहे. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही फक्त नाव काढा ती प्रत्येक जुनी गोष्ट या भव्य संग्रहालयात उपलब्ध आहे. हे संग्रहालय धावतपळत पहायचे म्हणले तरी कमीतकमी दोन तासांचा वेळ हाताशी हवा. फक्त वाईट एकाच गोष्टीचे वाटते ते म्हणजे येते फोटो काढण्यास मात्र सक्त मनाई आहे.


मंजुषा म्युझियममधील वस्तू संग्रह (फोटो साभार : http://www.veerendraheggade.com)

मंजुषा म्युझियमचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/hSZ6Rh7BWJu


मंजुषा म्युझीयमला भेट देऊन बाहेर पडताच समोर काही जुने लाकडी रथ आपले लक्ष वेधून घेतात. देशभरातील मोठमोठ्या मंदिरात वापरले गेलेले व केवळ देखरेख ठेवण्यास अशक्य नसल्याने खराब होत चालेले अनेक रथ आपल्या सांस्कृतिक वारशाचाच एक भाग आहेत हे जाणून श्री हेगडे यांनी त्यांचाही एक उत्तम संग्रह येथे ठेवला आहे. लाकडावरील सुबक शिल्पकामाने ओतप्रोत भरलेले व कोणे एकेकाळी विविध देवतांच्या मिरवणुकीसाठी अभिमानाने वापरले गेलेले हे भव्य रथ पाहून आपण अक्षरश: हरखून जातो. पण वेळेचे भान ठेवायचे आणि धर्मस्थळ येथील शेवटच्या ठिकाणाकडे आपला मोर्च्या वळवायचा.





आता धर्मस्थळ येथील सर्वात अजबगजब ठिकाण म्हणजे येथील मंजुषा कार म्युझियम. धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांना जुन्या विंटेज गाड्या गोळा करण्याचा व त्यातून फिरण्याचा छंद आहे. या कार प्रेमामुळे आज त्यांच्या संग्रहात २५० पेक्षा हि जास्त विंटेज तसेच लक्झरी मोटार गाड्या आहेत. या सर्व गाड्यांचा संग्रह मंजुषा कार म्युझियममधे पाहता येतो. या संग्रहालयात १९२९ चे मॉडेल असणारी स्टुबेकर, १९३७ सालची चार सिलेंडरवाली स्कोडा, १९३४ सालची ६ सिलेंडर व २२ हॉर्सपावरची सनबिम, सन १९२९ ची व्हॉऑकल हेरलिंगम, सन १९४१ ची याझ, १९२४ सालची ब्रिटीशकालीन रोल्स रॉयस, सन १९३० ची ओपेल कॅडेट व मोरीस ऑक्सफर्ड, १८४३ ची फोर्ड जीप, १९२५ चे फियाट मॉडेल, १९३३ ची ऑस्टिन, १९२६ ची मर्सिडीज बेंझ आणि १९३० ची वॉक्सवॅगन बीटल अश्या एक ना अनेक ब्रॅण्ड आणि विविध देशांमधील गाड्या येथे पाहायला मिळतात. येथे काही ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कार देखील आहेत त्यापैकी एक म्हणजे महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढाच्या काळात ज्या गाडीत प्रवास केला ती गाडी येथे आहे. तसेच सी. व्ही. रामन, मैसूरचे राजे वाडियार यांसारख्या प्रतिष्ठित व्यक्तींनी वापरलेल्या गाड्या देखील येथे आहेत. लंडनच्या एलिझाबेथ राणीच्या ताफ्यातील कार देखील येथे पाहता येतात. थोडक्यात काय तर कार प्रेमींसाठी हे संग्रहालय पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे.


मंजुषा विंटेज कार म्युझियम (फोटो मायाजालावरून साभार)

मंजुषा म्युझियम येथे असणाऱ्या बग्ग्या (फोटो मायाजालावरून साभार)

माणशी फक्त ५ रुपयांचे तिकीट काढून तुम्ही १९ आणि २० व्या शतकातील अनेक जुन्या कार येथे अगदी जवळून पाहू शकता. या कार संग्रहालयाची सगळ्यात मोठी खासियत अशी की येथील कार कितीही जुनी असली तरी ती उत्तम स्थितीत चालू आहे. आजही धर्माधिकारी वार्षिक उत्सवात तसेच मोठ्या सणा-समारंभात यापैकीच एखादी गाडी वापरतात. येथे विंटेज गाड्याबरोबरच स्कूटर व मोपेड सारख्या जुन्या दुचाकी तसेच अनेक प्रकारच्या सायकली आणि बग्ग्या यांचा देखील छोटा संग्रह आहे. हे संग्रहालय सकाळी ८.३० ते दुपारी १ व पुन्हा दुपारी २ ते सायंकाळी ७ अश्या दोन सत्रात प्रेक्षकांसाठी खुले असते. दुर्दैवाने येथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे पण येथील सर्व विंटेज कारचे फोटो असणारे एक छोटे बुकलेट ५० रुपयात विकत घेता येते. 


मंजुषा कार म्युझियममधील विंटेज गाड्या (फोटो साभार : http://www.veerendraheggade.com)

मंजुषा कार म्युझियममधील विंटेज गाड्या (फोटो साभार : http://www.veerendraheggade.com)

 

मंजुषा विंटेज कार म्युझियमचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/Nhc32iCV2yT2 

 

धर्मस्थळ येथे वरील ठिकाणांच्या व्यतिरिक्त अन्‍नाप्‍पा स्वामी बेट्टा म्हणजे जिथे बिरमन्ना परगडे यांनी ८०० वर्षांपूर्वी प्रथम देवतांची स्थापना केली ते जुने घर, नेत्रावती नदीवरील घाट, चंद्रनाथस्वामी बसाड़ी नावाचे जैन मंदिर, रत्नागिरी नावाच्या डोंगरावर असणारी ३९ फुट उंचीची भगवान बाहुबली यांची भव्य मूर्ती, स्वामी नित्यानंद यांनी स्थापन केलेले राम मंदिर व धर्मस्थळ गावात असणारे एसडीएम मनुस्क्रिप्ट (हस्तपत्रक) ग्रंथालय हि इतर काही ठिकाणे देखील वेळ असेल तशी पाहता येतात. पण यासाठी धर्मस्थळ येथे पूर्ण एक दिवस घालवणे अपेक्षित आहे. आम्हाला लगेच पुढील प्रवासाला निघायचे असल्याने आम्ही हि इतर ठिकाणे बघण्यात वेळ घालवला नाही.  


आज दिवसभरात सगळ्यात आधी धर्मस्थळ दर्शन, त्यानंतर शृंगेरी येथील जगतगुरु शंकराचाऱ्यांच्या मठाला भेट आणि दिवसाच्या शेवटी सागर या तालुक्याच्या गावात रात्रीचा मुक्काम असा एकूण प्रोग्राम ठरला होता. आज बघण्याची ठिकाणे तशी कमी असली तरी एकूण दिवसभराचा गाडीप्रवास जरा जास्तच म्हणजे जवळपास २२५ किमीचा होणार होता. त्यामुळे धर्मस्थळ येथे जास्त वेळ न घालवता दुपारी १२ वाजता पुढच्या प्रवासाला सुरवात केली. 


धर्मस्थळ ते शृंगेरी हा १०२ किमीचा प्रवास बऱ्यापैकी घाटमार्गाचा आणि वळणावळणाचा असला तरी कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट जंगलातून जाणारा असल्याने खूप सुंदर आहे. कुद्रेमुख हे कर्नाटकाच्या चिकमंगळूर जिल्ह्यातील एक पर्वतशिखर आहे आणि या शिखराच्या परिसरात असणारे घनदाट जंगल कुद्रेमुख याच नावाने ओळखले जाते. कुद्रेमुख हे कर्नाटकातील एक थंड हवेचे ठिकाण असल्याने साहजिकच आपण जसजसे शृंगेरीच्या दिशेने प्रवास करू लागतो तसतसे हवेतला थंडपणा देखील वाढत जातो. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाबरोबरच धर्मस्थळ-शृंगेरी मार्गावर थोडी वाकडी वाट करून गेल्यास लागणारे अगुंबे येथील सोमेश्वर राष्ट्रीय उद्यान हि दोन ठिकाणे पाहण्यासाठी एक ते दोन दिवसाचा वेगळा वेळ हाताशी हवा. म्हणजे मग जंगलसफारी, जंगल कॅम्पिंग आणि ट्रेकिंग अश्या साहसी गोष्टींचा आनंद घेता येतो. 


कुद्रेमुखच्या जंगलातून जाणारा रस्ता (फोटो चालत्या गाडीतून काढल्यामुळे थोडा ब्लर आला आहे)


आम्ही कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानातून जाणारा रस्ता संपताच एका छोट्या उपहारगृहात दुपारचे जेवण उरकले आणि साधारण दुपारी २.३० वाजता पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरवात केली. थोडे अंतर पुढे गेलो असू नसू तोच रस्त्याच्या डाव्याबाजूस डोंगरालगत नदी ओलांडण्यासाठी बांधलेला एक हैंगिंग ब्रिज (झुलता पूल) दिसला आणि लगेच गाडी त्या ठिकाणी थांबवण्यात आली. ब्रिजच्या अगदी समोरच असणाऱ्या एका दुकानात चौकशी केली तेव्हा कळाले की तुंग नदी ओलांडण्यासाठी हा झुलता पूल नुकताच बांधण्यात आला आहे. हा पूल आहे खूप दणकट पण आपण जसं जसे त्यावर चालायला लागू तसे तो हलायला लागतो. आम्ही तिथं असताना काही स्थानिक लोक तर चक्क त्यांच्या बाईक या ब्रिजवर चढवून एका टोकापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत बिनधास्त जात होते. या ब्रिजवर उभारल्यानंतर आजूबाजूचा डोंगराळ प्रदेश आणि त्यामधून वाहणारी तुंग नदी असे खूप सुंदर दृश्य पाहायला मिळते. स्वच्छ नितळ पाण्याचा तुंग नदीचा प्रवाह पहात थोडे फोटो काढण्यासाठी या ठिकाणी नक्की थांबावे. 


श्रुंगेरी गावाच्या आधी लागणारा एक हँगिंग ब्रिज / झुलता पूल 

हँगिंग ब्रिजवरून दिसणारा तुंगा नदीचा प्रवाह


हँगिंग ब्रिजचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/gHbdDsYEBt82 

 

हैंगिंग ब्रिजपासून फक्त ९ किलोमीटर पुढे शृंगेरी गाव वसलेले आहे. चिकमंगळूर जिल्ह्यात तुंगभद्रेची उपनदी असलेल्या तुंग नदीच्या किनारी वसलेले शृंगेरी हे गाव आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या मठासाठी प्रसिद्ध आहे. हा मठ शारदा पीठ म्हणून ओळखला जातो. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या उत्थानासाठी उत्तरेला ज्योर्तिमठ, पूर्वेला पुरीमठ, पश्‍चिमेला द्वारकामठ तर दक्षिणेला शृंगेरी पीठाची स्थापना केली. त्यापैकी पश्चिम घाटाच्या पायथ्याशी सुंदर अरण्यांनी वेढलेल्या शृंगेरी येथे शंकराचार्यांनी इ. स. पू. आठव्या शतकात त्यांचा पहिला मठ स्थापन केला. 


श्रुंगेरी मठ


भारतातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञांमध्ये शंकराचार्याची गणना होते. भारतीय तत्त्वज्ञानात त्यांनी नवा विचार मांडला. प्राचीन भारतीय सनातन परंपरेच्या विकासात तसेच हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसारात आदि शंकराचार्य यांचं मोठं योगदान आहे. हिंदू धर्माचा मूळ पाया वैदिक धर्म व परंपरा असल्यामुळे आठव्या शतकात या धर्माचे पुनरुज्जीवन करण्याकरिता आद्य शंकराचार्यांनी शृंगेरी पीठाची स्थापना केली व एक मोठी धर्मक्रांती घडवून आणली. त्यामुळे शृंगेरीला आध्यात्मिक मार्गदर्शनाचे प्रमुख पीठ म्हणजे आद्यमठ म्हणून वेगळेच महत्त्व आहे.  


मग शृंगेरीलाच प्रथम आचार्यपीठाची स्थापना का झाली? असे काय आहे या भूमीत? तर शंकराचार्य तुंगभद्रेच्या तीरावर भ्रमण करत असताना विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबले. तेवढ्यात येथे मोठा पाऊस सुरू झाला. त्यावेळी जवळच त्यांना एक अलौकीक दृश नजरेस पडले. एक नाग प्रसुत होत असलेल्या बेडकीवर आपला फणा काढून तिचे पावसापासून रक्षण करीत असल्याचे दृश्य शंकराचार्यांनी बघितले. बेडूक व साप, खरेतर एकमेकांचे कट्टर शत्रू पण त्यांच्या परस्परांच्या मैत्रीच्या रूपाने स्वामीजी भारावले व शृंगेरी ही निर्वैर भूमी आहे आणि या जागेत नक्कीच दैवी शक्ती आहे याची प्रचिती त्यांना आली. अश्याप्रकारे तुंगभद्रेच्या तीरावर हा पहिला लहानसा मठ स्थापन झाला. या गावाला शृंगेरी नाव पडले ते मुनी ॠष्यशृंगामुळे. प्रभू रामचंद्रांच्या ज्येष्ठ भगिनी ‘शांता’ हिचे पती म्हणजे ॠष्यशृंग ज्यांचा जन्म शृंगेरी येथेच झाला. त्यामुळे त्यांच्या नावावरून ‘शृंगेरी’ हे नाव गावाला लाभले. ‘शृंग’ म्हणजे शिंग आणि ‘गिरी’ म्हणजे पर्वत, यावरून शृंगेरी झाले असे मानतात. शृंगेरीपासून जवळच असणाऱ्या ॠष्यशृंगपुरम येथे छोट्या टेकडीवर ॠष्यशृंग मुनींचे व शांताम्माचे मंदिर आहे.

 

शृंगेरी गावात प्रवेश करताच तुंग नदीकिनारी भव्य पार्किंग उपलब्ध आहे. पार्किंगपासून फक्त २०० मीटर चालत जाताच आपण शृंगेरी मठाच्या भव्य गोपुरा समोर येऊन पोहोचतो. असंख्य देवदेवता कोरलेले रंगीबेरंगी नऊस्तरीय प्रचंड गोपुर पाहून मन थक्क होते. हे गोपूर म्हणजे असंख्य देवतांचे मंदिरच जणू! गोपुराच्या भव्य प्रवेशद्वारातून आपण एका प्रशस्त व स्वच्छ अश्या आवारात प्रवेश करतो. आवारात प्रवेश केल्याबरोबर शारदाम्बेचे सोनेरी कळस असलेले भव्य मंदिर दृष्टीस पडते. शंकराचार्य परंपरेमध्ये शारदाम्बेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदा म्हणजेच सरस्वती. ज्ञानाची, विद्येची देवता. शंकराचार्यानी श्रीचक्रावर शारदेची चंदनाची मूर्ती कोरून तिची या मंदिरात प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून शारदांबा ही शृंगेरीच्या शारदा मठाची उपास्य देवता झाली. 

 

श्रुंगेरी मठाचा भव्य गोपूर

श्रुंगेरी मठाच अनेक मंदिर असणारे प्रशस्थ आवार

 

१४ व्या शतकापासून शारदाम्बेच्या मंदिराच्या बांधकामाचे स्वरूप बदलत गेले. पुढे विद्यारण्यांनी शारदा मंदिर बांधले त्यावेळी त्यांनी शारदेच्या काष्ठमूर्तीच्या जागी पंचलोह विग्रह धातूची मूर्ती प्रतिष्ठित केली. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह, सभामंडप आणि प्राकार आहे. हे मंदिर द्राविड (द्राविडीयन) वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. होयसाळ व विजयनगरच्या धर्तीवर देवळातल्या खांबावर शिल्पकला कोरलेली आहे. हत्ती, सिंह, नर्तिका, मोर, असंख्य देवदेवता व पौराणिक दृश्ये यांचा अद्भुत संगम येथे असंख्य खांबांवर दिसतो. गर्भगृहातील देवीच्या मूर्तीचे स्वरूप खूपच सुंदर आहे. मूर्ती चर्तुभुज असून एक वरदहस्त, दुसरा अक्षमाला, तिसरा अमृतकुंभ तर चौथ्या हातात देवीने पुस्तक धारण केलेले आहे. 


श्रुंगेरीची मुख्य उपास्य देवता शारदाम्बेचे मंदिर


शारदाम्बेच्या मंदिराला लागुनच चालुक्य शैलीत बांधलेले व उत्कृष्ठ कोरीवकामाने नटलेले विद्याशंकर मंदिर आपले लक्ष वेधून घेते. या मंदिरात आचार्य विद्याशंकरांची समाधी आहे. आदी शंकराचार्यांच्या गुरूपरंपरेतील सर्वात प्रसिद्ध संन्यासी अर्थातच विद्यारण्यस्वामी होत. विद्यारण्यस्वामी वेदांचे महान भाष्यकार तसेच विजयनगर साम्राज्याचे शिल्पकार होते. आधी ते विजयनगरचे दिवाण होते. त्यांनी साधारण ई.स. १३३१ मधे संन्यास घेतला. पुढे १३३८ मधे हे विद्याशंकर मंदिर बांधले गेले. 


विद्याशंकर मंदिर

विद्याशंकर मंदिर


विद्याशंकर मंदिर आयताकृती आणि पूर्व-पश्चिम असे बांधलेले आहे. पश्चिम बाजूला गर्भगृह आहे. प्रवेशद्वाराच्या एका बाजूस गणपती आणि दुसऱ्या बाजूस दुर्गा आहे. गर्भगृहाच्या इतर तीनही बाजूंवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवतांच्या मुर्त्या आहेत. या आयताकृती मंदिरामध्ये १२ खांब आहेत, जे राशिचक्राच्या स्तंभाच्या रूपात प्रसिद्ध आहेत. प्रत्येक खांबावर सूर्यप्रकाश पडतो अशी ही शास्त्रोक्त रचना आहे. या सर्व स्तंभांवर १२ राशींची बारा चिन्हे दाखवणाऱ्या कोरीव प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराच्या मध्यभागी असणाऱ्या छप्परावर खूप सुंदर कोरीवकाम केलेले आहे. यामधे एक कमळ आणि पोपट दाखवलेला आहे. मंदिर कोरीवकामाने ओतप्रोत भरलेले आहे खरे पण दुर्दैवाने मंदिराच्या अंतर्भागाचे फोटो काढण्यास मनाई आहे. 

 

विद्याशंकर मंदिरावरील कोरीवकाम

विद्याशंकर मंदिरावरील कोरीवकाम


शृंगेरीच्या मठ परिसरात तोरणा गणपती, चंद्रमौलीश्‍वर, वागेश्वरी, जनार्दन अशी अनेक छोटी मोठी इतर मंदिरे आहेत. यापैकी शारदाम्बेच्या मंदिराला लागूनच अगदी अलिकडेच बांधण्यात आलेले श्री आदि शंकराचार्य मंदिर पाहण्यासारखे आहे. या मठ परिसरातील सगळी मंदिरे सकाळी ७ ते दुपारी १ व पुन्हा दुपारी ४.०० ते सायंकाळी ९ या वेळेत दर्शनासाठी उघडी असतात. सर्व मंदिरे आणि देव-देवतांचे दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसराच्या अगदी जवळूनच वाहणारा तुंग नदीचा शांत प्रवाह नक्की पहावा. येथे थोडे खाली उतरून तुम्ही नदीतील माश्यांना अन्न देखील देऊ शकता. 


श्री आदि शंकराचार्य मंदिर


शृंगेरी येथे निवास करायचा झाल्यास नृसिंहभारती योग मंडप, चंद्रशेखर भारती भवन, भारतीतीर्थ कृपा अश्या शारदा पीठातर्फे चालवल्या जाणाऱ्या काही धर्मशाळामधे माफक दारात राहण्याची सोय होऊ शकते. तसेच शृंगेरी गावात काही खाजगी लॉजेस देखील उपलब्ध आहेत. धर्मस्थळ प्रमाणेच शृंगेरी येथे देखील मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते जेथे भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी मठ परिसरात एकाच वेळेस ५ ते ६ हजार लोक जेवतील एवढी मोठी भोजनप्रणाली आहे.
 

 

शृंगेरीच्या मठाचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/e5zAitgrwDm 

 

शृंगेरीच्या मठ परिसरातील सर्व मंदिरे पाहून वाहनतळापाशी आलो तेव्हा संध्याकाळचे ४.४५ झाले होते. मग समोर असणाऱ्या एका छोट्या टपरीवजा हॉटेलमधे चहाचा कार्यक्रम पार पडला आणि पुन्हा एकदा सगळे पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाले. आता मुक्कामासाठी सागर गाव गाठायचे होते. शृंगेरीपासून सागर हे अंतर गुगल मॅपप्रमाणे १३० किलोमीटर आणि पोहोचण्यासाठी साधारण अडीच तासांचा वेळ लागणार होता. हॉटेलमधे चहा घेताना पुढील रस्त्याची कंडीशन कशी आहे याची चौकशी शृंगेरी येथील एका स्थानिकाकडे केली. तेथे गुगल मॅप दाखवत असलेला रस्ता बऱ्यापैकी खराब आहे असे कळाले. त्यामुळे त्या रस्त्याने न जाता शृंगेरी-कोप्पा-कुप्पली-तिर्थनहल्ली-कोनंदुरू-हुमचा-रीप्पोनपेट-सागर असा रोड घेण्याची सूचना त्या स्थानिकाने केली. त्यांच्याकडून पुन्हा पुन्हा गावांची नावे विचारून ती लिहून घेतली आणि लगेच पुढच्या प्रवासाला सुरवात केली. 


रात्री साधारण ७.४५ च्या जवळपास सागर गावाजवळ पोहोचलो. सागर हे तालुक्याचे ठिकाण असले तरी गावात चांगली म्हणावी अशी अगदीच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच हॉटेल्स आहेत. मात्र बसस्टँड परिसरात अनेक बजेट लॉज उपलब्ध आहेत. गाव सुरु होण्याच्या साधारण १ किमी आधी KTDC चे "हॉटेल वरद्श्री" दिसले आणि तेथे आमच्या बजेटमधे दोन रूम लगेच उपलब्ध झाल्या. रात्री जवळच असणाऱ्या प्युवर व्हेज हॉटेलमधे जेवण उरकले आणि पाचव्या दिवसाची सांगता केली. आज दिवसभराचा गाडी प्रवास गेल्या तीन-चार दिवसांपेक्षा थोडा जास्तच म्हणजे जवळपास २४० किमी इतका झाला होता. ड्रायवर म्हणजे माझ्यासकट सगळेच दमले असल्याने लवकरच झोपी गेलो. 

 

सागर गावातील KTDC च्या "हॉटेल वरद्श्री" चे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/eKr2FPNkVin 


धर्मस्थळ ते शृंगेरी = १०५ किमी

शृंगेरी ते सागर = १३५ किमी


दिवस सहावा: शुक्रवार, २७ ऑक्टोंबर २०१७

===============================


सकाळी सातपर्यंत उठून आठ/साडेआठ दरम्यान हॉटेल रूम सोडणे हे गेल्या चार-पाच दिवसापासून नित्याचेच झाले होते. हॉटेलमधून चेकआऊट केले आणि जवळच असणाऱ्या प्युअर व्हेज हॉटेलमधे इडली,मेदूवडा,डोसा असा टिपिकल नाष्टा उरकला. साउथ इंडियन ब्रेकफास्ट मला कितीही आवडत असला तरी आता इथून पुढे कमीत कमी २ महिने तरी हे सगळे पदार्थ खायचे नाही असे मनोमन ठरवून टाकले. आज सागर गावाच्या जवळपास असणाऱ्या केळदी, इक्केरी आणि वरदहळ्ळी या तीन स्थळांना भेट द्यायची आणि सिरसी येथे मुक्कामी पोहोचण्याआधी जोग फॉल्स आणि उंचाल्ली फॉल्स पहायचे असा एकूण भरगच्च कार्यक्रम ठरवला होता. त्याप्रमाणे सगळ्यात आधी निघालो ते केळदीच्या दिशेने.


केळदी! शिमोगा जिल्ह्यातील सागर या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ८ किलोमीटर अंतरावर असलेले एक टुमदार गाव. विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या नायक राजवंशाची केळदी ही राजधानी. येथे नायक राजवंशाचा राजा चंद्रप्पा नायक याने १६ व्या शतकात बांधलेले रामेश्वराचे एक खूप सुंदर मंदिर आहे. कदंब, होयसाळ आणि द्रविड अशा मिश्रशैलीमध्ये बांधलेले हे मंदिर अत्यंत देखणे असून वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. केळदी गावातले रामेश्वराचे मंदिर प्रथमदर्शनी एखाद्या कोकणी घरासारखे वाटते. दोन्हीबाजूला मोठमोठ्या लाकडी खांबांनी तोलून धरलेल्या उतरत्या छप्पराचा व्हरांडा आणि त्यामध्ये असलेले मंदिराचे छोटेसे प्रवेशद्वार अगदीच साधे वाटते. पण जेव्हा आपण दरवाज्यातून आत प्रवेश करतो तोच एका प्रशस्थ प्रांगणात द्राविडीयन पद्धतीने बांधलेली तीन सुंदर मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात.


बाहेरून कोकणी घरासारखे वाटणारे केळदी येथील रामेश्वराचे मंदिर


मंदिराच्या प्रांगणात पार्वती, विरभद्र आणि रामेश्वर अश्या तीन देवतांची मंदिरे आहेत पण मुख्य देवता रामेश्वर असल्याने या मंदिर समूहाला रामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराची प्रदक्षिणापथ असलेले गर्भगृह, महामंडप आणि मुखमंडप अशी रचना असून प्रदक्षिणा मार्ग उतरत्या छपराने संरक्षित केलेला व लाकडी खांबांनी तोललेला आहे. तिन्ही मंदिरे राखाडी रंगाच्या ग्रेनाईटमधे घडवलेली असून मंदिराच्या महामंडपाच्या पूर्व आणि पश्चिम भिंती सुंदर अशा शिल्पांनी सजवलेल्या आहेत. महामंडपाच्या एका भिंतीवर वास्तूपुरुष व त्याच्या उपदेवतांचे दुर्मिळ असे चित्र कोरलेले आहे. तसेच या मंदिराच्या आवारात सप्तमातृका पट देखील पाहता येतो.


रामेश्वर आणि विरभद्राचे मंदिर. दोन्ही मंदिरांचा सभामंडप एकच आहे. आत गर्भगृह मात्र वेगळवेगळे आहे.
हे काय असावे बरे? मंदिराच्या प्रदक्षिणा पथावर ठेवलेल्या काही मुर्त्या. बहुदा उत्सवात वापरल्या जाणाऱ्या मुर्त्या असाव्यात
वास्तूपुरुष व त्याच्या उपदेवतांचे दुर्मिळ चित्र. तसेच मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेले पौराणिक प्रसंग 
मंदिराच्या बाह्यांगावरील कोरीवकाम
सप्तमातृका पट


या तीन मंदिरापैकी सर्वात डावीकडचे मंदिर पार्वतीचे असून या मंदिराच्या सभामंडपातील लाकडावरील कलाकुसर न चुकता पहावी अशी. लाल रंगाच्या लाकडावर विविध प्रकारची संगीत वाद्ये आणि सुंदर फुलांचे डिझाईन्स कल्पकतेने कोरलेली आहेत. येथील लाकडावरील नक्षीकाम इतके नजाकतीने केलेले आहे की प्रत्येक फुल वेगवेगळ्या पद्धतीने लाकडावर घडवलेले आहे.  


पार्वतीच्या मंदिरातील लाकडावरील सुबक कोरीव काम 


मध्यभागी असणारे मंदिर रामेश्वराचे असून गर्भगृहात रामेश्वराचे लिंग आहे तर समोरच त्याचे वाहन असलेला नंदी गुडघे टेकून बसलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर व्याल व शिवाच्या इष्ट देवतांची चित्रे कोरलेली आहेत. या मंदिराच्या मुखमंडपातील खांबावर सुंदर फुलांचे नक्षीकाम केलेले आहे तर छतावर एका ठिकाणी सुंदर ब्रम्हकमळ काढलेले आहे. याशिवाय मंदिरात बोकडाचे तोंड असलेल्या दक्ष राजाची हात जोडून उभी असलेली दुर्मिळ मूर्ती देखील पाहायला मिळते. 


रामेश्वराचे मंदिर


तिसरे मंदिर विरभद्राचे असून या मंदिराच्या मुखमंडपातील खांब विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव दाखवतात. येथील सर्व खांबावर पुढचा पाय उंच करून उभारलेल्या व्याल या सिंहासारख्या दिसणार्‍या एका काल्पनिक प्राण्याचे शिल्प कोरलेले आहे. या मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर काही अद्वितीय शिल्पे पाहता येतात. त्यापैकी एक म्हणजे गंडभेरुंड अर्थात दोन तोंडी गरुडाचे शिल्प. एक धड, दोन डोकी व दोन पंख असलेला, काही प्रसंगी पक्षीरूप अथवा अर्धमानव देहधारी असणारा हा काल्पनिक पक्षी विजयनगरच्या साम्राज्याचे चिन्ह आहे. या पक्षाने त्याच्या दोन्ही चोचीत सिंहाला तर दोन्ही पायाच्या पंजाने हत्तींना पकडलेले दाखवले आहे. हे शिल्प म्हणजे तेव्हाच्या विजयनगर साम्राज्याच्या अफाट शक्तीचे प्रतीक मानले जायचे. येथील दुसरे अतिशय सुंदर शिल्प म्हणजे नागबंध किंवा नागमंडळ तर तिसरे शिल्प म्हणजे नवग्रह देवतांची काढलेली चित्रे. एकूण काय तर या मंदिरातील सर्वच कोरीवकाम मन थक्क करणारे आहे.


विरभद्राचे मंदिर

विरभद्राच्या मंदिरातील काही अप्रतिम कोरीवकाम


विरभद्र मंदिरासमोर मोकळ्या प्रांगणात एका दगडी जोत्यावर २४ फुट उंच एक भव्य महास्तंभ आहे. या स्तंभाच्या चारही बाजूंना विविध मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्यापैकी एका बाजूला गणेशाची मूर्ती असून त्याच्या खाली काही मानवाकृती कोरलेल्या दिसतात. त्या मानवाकृतीपैकी एक आहे नायक वंशाची राणी 
चिन्नम्मा तर दुसरे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज. आता तुम्हाला प्रश्न पडेल की राजाराम महाराजांचा या नायक वंशाशी काय संबंध? तर त्यामागे घडलेला इतिहास असा. 


मंदिराच्या प्रांगणातील महास्तंभ. यातील गणपतीच्या मूर्ती खाली राणी चेन्नम्मा व छत्रपती राजाराम महाराज दाखवले आहेत


राणी चिन्नम्मा ही कर्नाटकच्या इतिहासात होऊन गेलेली एक महापराक्रमी राणी. आपणा सर्वांना झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि महाराणी ताराबाई या रणरागिणींची माहिती आहेच, अगदी तशीच ही राणी चिन्नम्मा. केळदीच्या नायक राजवंशाचा ११ वा राजकर्ता सोमशेखर नायक याची हि पत्नी. लग्नानंतर दहाच वर्षात म्हणजे इ.स. १६७७ मधे सोमशेखर नायक याचा खून झाला आणि राणी चिन्नम्मा सत्तेवर आली. तिने इ.स. १६९७ पर्यंत म्हणजे तब्बल २५ वर्षापेक्षा जास्त काळ केळदीचा राज्यकारभार मोठय़ा हिमतीने चालवला. त्याकाळात चिन्नम्माने मोगल बादशाह औरंगजेब याच्याशी केलेले युद्ध ही एक ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्वाची घटना आहे. 


राणी चिन्नम्मा हीचा औरंगजेब याच्या विरुद्ध उभे राहण्याचा प्रसंग आला तो छत्रपती राजाराम महाराजांमुळे. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या मृत्यनंतर औरंगजेब मोठ्या फौजेसहित रायगडावर चालून गेला. पण छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे निघून जाण्यात यशस्वी झाले. मात्र जिंजीला जाताना औरंगजेबाची फौज त्यांच्या पाठलागावर होती. अश्यावेळी राजाराम महाराजांनी केळदीच्या राणीकडे आश्रय मागितला. त्या शूर राणी चिन्नम्माने मोठय़ा धाडसाने राजाराम महाराजांना आश्रय दिला. साहजिकच मुघलांची फौज केळदीवर चालून आली आणि राणी चिन्नम्माचा औरंगजेबाशी संघर्ष उभा ठाकला. परंतु राणी चिन्नम्माने चालून आलेल्या मुघल सन्याशी लढाई करून त्यांचा पराभव तर केलाच, पण मुघलांना तिच्याशी तह करायला भाग पाडले. केळदी चिन्नम्मामुळे पुढे राजाराम महाराजांचा जिंजीपर्यंतचा प्रवास निर्धोक झाला.


मंदिरावरील इतर ठिकाणी असणारे सुंदर कोरीवकाम


त्यामुळे आपल्या कर्नाटकच्या भेटीत मराठी अस्मितेचे रक्षण करणाऱ्या केळदी या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी पण त्याबरोबर येथील देखणे मंदिर आणि राजाराम महाराजांचा प्रसंग सांगणारा स्तंभ आवर्जून पाहायला हवा. केळदी येथील मंदिराला लागुनच पुरातत्वीय खात्याच्या देखरेखी खाली चालवले जाणारे संग्रहालय देखील आहे. येथे मंदिर परिसरात सापडलेल्या दुर्मिळ मूर्ती तसेच नायक घराण्याच्या हस्तलिखितांचा व शिलालेखांचा समृद्ध संग्रह पाहता येतो.

 

केळदी येथील रामेश्वर मंदिराचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/QmcXUaSgWrC2


केळदीवरून आम्ही निघालो ते आजच्या पुढच्या ठिकाणाकडे ते म्हणजे इक्केरीकडे. केळदी येथून सागर गावात परत यायचे आणि पुन्हा सागर येथून केळदीच्या बरोबर विरुद्धदिशेला ६ किलोमीटर अंतरावर असणारे इक्केरी गाठायचे. कन्नड भाषेत इक्केरी म्हणजे 'दोन रस्ते'. इक्केरी ही देखील नायक राजवंशाची पूर्वाश्रमीची राजधानी. सदाशिव नायक या राजाने १५४० च्या आसपास केळदी येथील आपली राजधानी इक्केरी येथे हलवली. तेव्हापासून त्यांना इक्केरीचे नायक असे संबोधले जाऊ लागले. त्यांनी जवळ जवळ १२० वर्ष इक्केरी येथून आपला राज्यकारभार चालवला. इक्केरी गावात पूर्वी एक खूप मोठा किल्ला होता व त्यात एक सुंदर राजवाडा होता असे सांगितले जाते. सध्या मात्र अश्या कोणत्याही अवशेषांचा मागमूस येथे सापडत नाही. इक्केरी गावात सध्या एकच जुनी इमारत शिल्लक आहे ती म्हणजे संकन्ना नायक या राजाने १६ व्या शतकात बांधलेले अघोरेश्वराचे मंदिर. 

 

इक्केरी येथील अघोरेश्वराचे मंदिर

 

इक्केरी येथील अघोरेश्वराचे मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. केळदी येथील रामेश्वर मंदिर आणि इक्केरी येथील अघोरेश्वर मंदिर यांच्या बांधणीत बऱ्यापैकी साम्य दिसून येते. हे मंदिर देखील कदंब, होयसाळ आणि द्रविड अशा मिश्रशैलीमध्ये बांधलेले असून या मंदिराच्या छताच्या पॅनेलवर व अन्य काही बांधकामात इस्लामिक वास्तूशैलीचा प्रभाव देखील जाणवतो. मंदिराच्या निर्मितीसाठी राखाडी, हिरव्या तसेच लाल रंगाच्या ग्रेनाईटचा विविध रंगसंगती साधण्यासाठी अत्यंत सुंदर प्रकारे उपयोग केलेला आहे. अघोरेश्वराचे मंदिर एका विशाल आयताकृती प्रांगणात जमिनीपासून थोड्याशा उंचीवर बांधलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करण्यासाठी गोपूर बांधण्याऐवजी ग्रेनाईटमधे एक साधी चौकोनी कमान कोरलेली असून त्यातून पायऱ्यांचा रस्ता बनवलेला आहे. 

 

हिरव्यागार गावतानी आणिफुलझाडांनी सुशोभित केलेला मंदिर परिसर

 

मंदिर प्रांगणात प्रवेश करताच समोर अतिशय भव्य असा नंदीमंडप आपले स्वागत करतो. प्रथमदर्शनी हा नंदीमंडप म्हणजे कोरीवकामाने नटलेले एखादे मंदिरच आहे असे भासते. या नंदीमंडपाच्या बाहेरील बाजूने केलेले कोरीवकाम खूप सुंदर आहे. येथे सर्वत्र व्याल व नृत्यांगना कोरलेल्या दिसतात. नंदीमंडपाच्या बाजूने असणाऱ्या कमानींवर मात्र इंडो-इस्लामिक शैलीचा प्रभाव दिसतो. मंडपामधे काळ्या पाषाणात घडवलेला आणि चकचकीत पॉलिश केलेला भव्य नंदी आहे. नंदीच्या गळ्यात असणाऱ्या माळा, माळांमध्ये गुंफलेल्या घंटा हे सर्वच अगदी खुबीने कोरलेले आहे. नंदीमंडपाला लागुनच नैवेद्य किंवा बळी अर्पण करण्यासाठी वापरले जाणारे बळीपीठ आहे.

 

आघोरेश्वराच्या मंदिरासमोर असणारा सुंदर नंदीमंडप
भव्य दिव्य नंदी आणि नंदीमंडपावरचे कोरीवकाम

नंदीमंडपासमोर मुख्य मंदिराचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार असून मंदिराला पूर्व आणि पश्चिम बाजूस देखील सालंकृत दरवाजे आहेत. लाल ग्रेनाईटचा उपयोग करून बांधलेल्या मंदिराच्या भिंतींवर काही शिल्पे तसेच जाळीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर काळ्या पाषाणातील पायऱ्या आणि दगडातील दोन हत्ती आहेत. मुख्य मंदिराच्या लाल/तांबूस दगडातील बांधकामासमोर गडद राखाडी रंगाचे हे हत्ती म्हणजे एकदम कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन वाटते.

 

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावरील कोरीवकाम


मुख्य मंदिराचे सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे तीन भाग पडतात जे बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. सभामंडप भव्य अश्या १२ खांबावर तोललेले असून ते विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव दर्शवतात. सभामंडपाच्या मध्यभागी छतावर सुंदर फुलांचे नक्षीकाम केलेले आहे. मंडपाच्या दोन्ही बाजूस दोन छोटे कोनाडे असून त्यात गणपती आणि कार्तिकेय यांच्या मूर्त्या आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार कोरीव कामाने नटलेले असून त्याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. गर्भगृहात अघोरेश्वराची शिवलिंगाच्या स्वरुपात पूजा केली जाते. अघोरेश्वराच्या मुख्य मंदिराशेजारीच प्रांगणामधे अखिलनंदेश्वरी म्हणजेच शिवाची पत्नी देवी पार्वतीचे एक छोटेसे मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरील सर्व खांबावर पुढील पाय उंच करून उभारलेल्या व्याल या सिंहासारख्या दिसणार्‍या एका काल्पनिक प्राण्याचे शिल्प कोरलेले आहे. इक्केरी येथील अघोरेश्वराचा हा मंदिर परिसर अतिशय स्वच्छ ठेवलेला असून संपूर्ण मंदिर परिसरात सुंदर फुलांच्या बागा फुलवून तो सुशोभित केलेला आहे.

 

मंदिराचा कोरीव खांबांनी सजलेला सभामंडप

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील कोरीवकाम

सभामंडपाच्या छतावरील अप्रतिम कोरीवकाम

मंदिराच्या बाहेरील बाजूने असलेली काही निवडक सुंदर शिल्पे

अखिलनंदेश्वरी म्हणजे पार्वतीचे मंदिर

 

इक्केरी येथील अघोरेश्वराचे मंदिर पहात असताना आमच्या सौ. ना (अमृता) त्यांच्या माहेरकडील एका नातेवाईकांचा फोन आला. आम्ही कोस्टल कर्नाटक ट्रीप करत आहोत आणि सध्या कर्नाटकातील सागर परिसरात फिरत आहोत असे जेव्हा त्यांना कळाले तेव्हा त्यांनी आम्हाला सागर गावापासून अगदी जवळच असणारा ‘वरद्पूर’ येथील श्रीधर स्वामींचा मठ व आश्रम परिसर पहा असे सुचवले. फोन झाल्यावर लगेचच मी मंदिरातील गुरुजींकडे वरदपूरबद्दल चौकशी केली. तेव्हा कळाले की वरदपूर हे तिथे 'वरदहळ्ळी’ या कानडी नावाने ओळखले जाते. त्यांच्याकडून वरदपूर (वरदहळ्ळी) कडे जाणारा रस्ता समजून घेतला आणि गाडी पुन्हा सागरच्या दिशेने वळवली.  

 

इक्केरी येथील अघोरेश्वराच्या मंदिराचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/uRisN4r8K7s 

 

सागर गावातून एक मोठा हमरस्ता जोग फॉल्सकडे जातो. या रस्त्याने सागर गावातून बाहेर पडताच थोड्याच अंतरावर हमरस्त्याच्या डाव्याबाजूला असणारा एक छोटा डांबरी रस्ता थेट वरदपुरला जातो. आता वरदपुर येथील श्रीधर स्वामींच्या मठाला भेट देण्याआधी ब्लॉग वाचकांना श्रीधर स्वामी कोण हे आधी माहिती व्हावे यासाठी श्रीधर स्वामींच्याबद्दल थोडक्यात माहिती येथे देतोय. श्रीधरस्वामी यांचा जन्म कर्नाटक राज्याच्या गुलबर्गा जिल्ह्यातील लाडाची चिंचोळी या गावी सन १९०८ साली दत्तजयंतीच्या परमपावन दिनी झाला. श्रीधरस्वामी हे समर्थ संप्रदायातले. ते प्रभू रामचंद्रांचे भक्त व सज्जनगड निवासी समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य होत. हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्यात आले. श्रीधरस्वामींना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आणि आवड होती त्यामुळे वेद, उपनिषदे, पुराणे यांना गौणत्व देणाऱ्या शिक्षणात त्यांना गोडी वाटेना. या ओढीनेच स्वामींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले. सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली. योगिराज कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला. अगदी त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली असे म्हणतात. सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते अगदी त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे. 

 

वरदपूर येथील मठाची स्वागत कमान
मठ परिसर नारळी पोफळीच्या बागांमुळे असा सुंदर हिरवागार आहे
  

समर्थ रामदासांनी श्रीधर स्वामींना दक्षिणेकडे म्हणजे कर्नाटकात जाऊन कार्य करण्याची आज्ञा केली. त्यामुळे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात तर आहेच पण त्याप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला. त्यांनी पुढे बारा वर्षें भारतभर पायी प्रवास केला. सगळीकडे वैदिक धर्माचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी लहानमोठे असे चाळीस ग्रंथ लिहिले. श्रीधर स्वामींनी सज्जनगड, शिवथरघळ, चाफळ या ठिकाणांचा प्रचंड विकास घडवुन आणला. त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिष्यांनी "श्री समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड" या संस्थेची स्थापन १९५० साली सज्जनगडावर केली. स्वामीजी वरदपूरला १९६७ मध्ये आले. जीवनातील अखेरची सहा वर्षे स्वामीजींनी वरदपूर येथील आश्रमात एकांतात व्यतीत केली. पुढे याच ठिकाणी १९७३ मधे त्यांनी समाधी घेतली.

 

मठ परिसरातील गोशाळा, मठाचे ऑफिस आणि पुष्करणी

 

सह्याद्री घाटाच्या निसर्गरम्य व हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या एका उंच डोंगरावर श्रीधर स्वामी यांची समाधी व आश्रम आहे. आश्रमाचा परिसर जेथून सुरू होतो त्या रस्त्यावर मोठे प्रवेशद्वार आहे. तेथून आत अर्धा किलोमीटर गेल्यावर आश्रमाचे ठिकाण लागते. पार्किंग जागेजवळ चिरेबंदी कुंड आहे, त्याला ‘श्रीधरतीर्थ’ असे म्हणतात. तीर्थाजवळ गोशाळा, भक्तनिवास आणि आश्रमाची नव्याने बांधलेली भव्य इमारत आहे. या इमारती जवळून काही पायऱ्या उंच डोंगरवर चढताना दिसतात. या डोंगरावर शिखरकुटी नावाच्या छोट्या जागेत श्रीधरस्वामींचे समाधी मंदिर आहे. समाधी मंदिर डोंगरावर असल्याने पार्किंग पासून समाधी स्थळापर्यंत जाण्यासाठी तीनशे पायऱ्या चढाव्या लागतात. पण हा डोंगर सुंदर हिरवाईने व उंच वृक्षवेलींनी वेढलेला असल्याने मोजून १५ मिनिटात आपण या ३०० पायऱ्या कधी चढून जातो ते कळत देखील नाही. समाधी परिसर अतिशय शांत, स्वच्छ आणि रम्य आहे. येथील सुंदर व निसर्गसंपन्न वातावरण पाहूनच श्रीधरस्वामींनी या परिसराची आपल्या आश्रमासाठी निवड केली असावी. 

 

छोट्या टेकडीवर असणारी श्रीधर स्वामींची समाधी


समाधी परिसरातील शांत वातावरणाने आमच्या सगळ्यांच्याच मनावर गारुड घातले होते. माझी आई आणि माझे सासरे असे दोघांनाही गुडघेदुखीचा आजार असून देखील समाधी स्थळापर्यंतच्या ३०० पायऱ्या ते दोघेही सहज चढून आले. हा निसंशय या मठ परिसरातील पवित्र आणि सकारात्मक उर्जेचा परिणाम असावा. दुपारी साधारण १२.३० च्या ठोक्याला मठ परिसर सोडला आणि आता निघालो आजच्या चौथ्या ठिकाणाकडे ते म्हणजे 'वर्ल्ड फेमस जोग धबधब्या'कडे.


वरदपूर येथील श्रीधर स्वामींच्या मठाचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/Q9Tm3h2SkCt


सागर येथून फक्त ३० किलोमीटर अंतरावर जोग फॉल्स आहे. हा संपूर्ण रस्ता शिमोगा-होनावर ही दोन मोठी शहरे जोडत असल्याने अतिशय उत्तम स्थितीत असून सागर येथून फक्त ४५ मिनिटात जोग फॉल्स येथे पोहोचता येते. आम्ही वरदपूर येथून सागर-जोग फॉल्स या मुख्य रस्त्याला लागलो आणि साधारण पुढच्या ३५ मिनिटात जोग फॉल्सच्या दोन किलोमीटर अलीकडे असणाऱ्या शरावती नदीवरच्या एका भल्या मोठ्या पुलावर येऊन पोहोचलो. हा शरावती नदीवरचा पूल जवळजवळ ५०० ते ७०० मीटर लांबीचा असून पुलाच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी आहे. पुलाच्या सुरवातीलाच "WELCOME TO WORLD FAMOUS JOG FALLS" असे मोठ्या अक्षरात लिहले आहे. पुलावरून लांबवर पसरलेले शरावती नदीचे पाणी दिसते. याच शरावती नदीचा प्रवाह पुढे एका भल्या मोठ्या डोंगरावरून खाली दरीत झेपावतो ज्यामुळे जगप्रसिद्ध जोग फॉल्स तयार झाला आहे.

 

शरावती नदीवरील मोठा पूल
 

शरावती नदीवरचा पूल ओलांडला की दीड किलोमीटर अंतरावर जोग फॉल्सचे मोठे प्रवेशद्वार लागते. येथे तिकीट खिडकी असून येथे प्रती माणशी १० रुपये व चार चाकी गाडीच्या पार्किंगसाठी २० रुपयांचे तिकीट काढावे लागते. गेटवर पैसे भरून प्रवेश करताच पार्किंगपर्यंत मस्त मोठे डांबरी रस्ते बांधलेले आहेत. कार व मोठ्या गाड्या लावण्यासाठी भव्य पटांगणात पार्किंग व्यवस्था आहे. पटांगणाच्या बाजूला प्रवाशांच्या सोईसाठी स्वच्छता गृहे व काही छोटी उपहारगृहे आहेत. परिसर स्वच्छ आणि नेटनेटका ठेवलेला आहे. पार्किंगपासून पेव्हिंग ब्लॉक्स टाकून बनवलेला रस्ता कड्याच्या टोकाकडे जातो. पार्किंग पासून मोजून ५ मिनिटात आपण कड्याच्या टोकावर पोहोचतो आणि समोर डोंगरावरून कोसळणारा प्रसिद्ध जोग धबधबा आपले लक्ष वेधून घेतो. येथे डोंगराच्या अगदी कोपऱ्यावर रेलिंग घातलेले आहे जेणेकरून कोणी पर्यटक तोल जाऊन दरीत कोसळू नये. 

 

पार्किंग परिसर,धबधब्याच्या तळाशी घेऊन जाणाऱ्या पायऱ्या (पहिला फोटो मायाजालावरून साभार)


आम्हाला मात्र जोग फॉल्स त्याच्याबद्दल जेवढ वाचल होत तेव्हढा काही खूप भारी वाटला नाही. बहुतेक आमचा येथे येण्याचा काळ चुकीचा असावा. ओसरत्या पाऊस काळात म्हणजे ऑगस्ट/सप्टेंबर मधे या धबधब्याला खूपच पाणी असणार हे तिथे आजूबाजूला लावलेल्या फॉल्सच्या फोटोकडे पाहून वाटत होते. पण पाऊस काळात काय सगळ्याच धबधब्यांना पाणी असत मग जोग फॉल्समधे असं काय वेगळ? तर या धबधब्याची उंची ८३० फूट असून तो भारतातील दुसरा (पहिला मेघालयमधील नोखालीखाई इथला ११०० फूट उंचीचा) सर्वात उंच धबधबा आहे. या धबधब्याला यूनेस्कोने सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यात येणाऱ्या हा जोग धबधबा केवळ भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. 


जोग फॉल्सचे दुसरे नाव म्हणजे गिरसप्पा धबधबा. याला जोगदागुंडी या नावाने देखील ओळखले जाते. या धबधब्याचे राजा, रोअरर, रॉकेट आणि राणी अश्या चमत्कारिक नावाचे चार प्रवाह आहेत. हे प्रवाह शरावती नदी उंचावरून थेट दरीत जवळ जवळ ८०० फुट खाली कोसळत असल्याने तयार झाले आहेत. यातला सगळ्यात डाव्या अंगाला असलेला "राजा" धबधबा ८३० फुट उंचीवरून १३२ फुट खोल कुंडामध्ये पडतो. या प्रवाहाला पडताना वरपासून खाली कुंडातपर्यंत कोणत्याही खडकाचा अडथळा नसल्याने तो राजासारखा दिमाखदार कोसळतो. दुसरा धबधबा जो अतिशय वेगात वळणदार मार्गाने प्रचंड कोलाहल निर्माण करत राजा धबधब्याला येऊन मिळतो तो "रोअरर". हा धबधबा पडताना प्रचंड कोलाहल निर्माण करतो म्हणून “रोअरर” असे नाव पडले. त्याच्या शेजारी तिसरा धबधबा म्हणजे "रॉकेट". हा धबधबा प्रथम १०० फुटांची उडी घेतो व नंतर या धबधब्याचे पाणी एका बाहेर आलेल्या खडकावर आदळून समोरच्या दरीत एखाद्या रॉकेट सारखे झेप घेते. यातला शेवटचा म्हणजे उजवीकडून पहिला "राणी" धबधबा आहे. हा प्रवाह हळूवारपणे घरंगळत सरळ खाली येतो. हे चारी धबधबे ज्या कुंडात पडतात तेथे पाण्याचे अनेक तुषार एकत्र उडून वरून पडणाऱ्या उन्हामुळे रंगीत चमकदार पडदा तयार होतो. हे सगळे दृश कितीतरी वेळ पहात रहावे असे सुंदर आहे. 

 

जगविख्यात जोग फॉल्स


खूप पूर्वी म्हणजे ५० एक वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारने शरावती नदीवर या धबधब्यापासून सुमारे ६ किलोमीटर मागे लिंगनमक्की या नावाचे एक मोठे धरण बांधले. या धरणामुळे शरावती नदी मध्ये वाहणार्‍या पाण्याचा ओघ एकदम आटल्यासारखा झाला. सध्या ऐन पावसाळ्यात जेंव्हा हे धरण पूर्ण भरून वाहू लागते त्याच वेळेस फक्त गिरसप्प्याचे म्हणजे जोग फॉल्सचे पूर्ण जलवैभव बघता येते. इतरवेळी मात्र जर का वरच्या धरणात अडवलेले पाणी सोडले तरच हा धबधबा मोठ्या जलप्रपातासह पाहता येतो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब एवढीच की थोडे का होईना पण चारी धबधब्यांचे प्रवाह वर्षभर पहायला मिळतात.


या धबधब्याचे सर्वात सुंदर दृश्य पहायचे असेल तर याच्या अगदी तळाशी जाणे क्रमप्राप्त आहे. होय, इथे रेलिंगच्या शेवटी खाली उतरण्यासाठी जिना केलेला आहे. जो सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंत सुरु असतो. या जिन्यावर ठराविक पायऱ्या उतरल्यानंतर विविध ठिकाणी पर्यटकांना थांबण्यासाठी मनोरे बांधलेले दिसतात. पायऱ्या उतरताना प्रत्येक ठिकाणावरून समोर कोसळणाऱ्या चारही जलप्रपातांचे वेगवेगळे दृश पाहता येते. या पायऱ्या उतरताना वेळेचे भान ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढ्या पायऱ्या आपण उतरून जाणार आहोत तेवढ्याच पायऱ्या परतताना चढाव्या लागणार आहेत हे देखील लक्षात ठेवायचे. येथे जवळपास १००० पायऱ्या उतरून तुम्हाला धबधब्याच्या अगदी जवळ पोहोचता येते. जोग फॉल्स येथे मुक्काम करायचा झाल्यास या परिसरात दोन-तीन प्रायव्हेट हॉटेल्स आहेत. तसेच अगदी मोक्याच्या जागी बांधलेले व कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागामार्फत चालवले जाणारे "मयुरा रिसोर्ट" हे हॉटेल मुक्कामासाठी अतिशय उत्तम आहे.

 


आम्ही भर दुपारी १ वाजता जोग फॉल्स पाहायला पोहोचलो. या आधी ज्या जोग फॉल्सचे खूप वर्णन ऐकले आणि वाचले होते तो प्रसिद्ध धबधबा समोर छोट्या धारांच्या रूपाने पडताना पाहून आमची थोडी निराशाच झाली. मग भर उन्हात धबधब्याच्या पायथ्याशी जाणाऱ्या पायऱ्या उतरण्याचा विचार सर्वानुमते रद्द करून धबधब्याचे समोरूनच जसे मिळतील तेवढे फोटो काढले आणि जवळच असणाऱ्या एका उपहारगृहात दुपारच्या जेवणासाठी हजर झालो. जेवण करून जोग फॉल्सच्या पार्किंगमधून गाडी काढली त्यावेळी घड्याळात दुपारचे २.३० वाजले होते. आज दुपारीच्या जेवणाआधीच चार ठिकाण पाहून झाली होती. त्यामुळे आता थोड्या आडवाटेवर असणारा उंचाल्ली फॉल्स पाहून आम्ही आरामात सिरसी गावात संध्याकाळच्या मुक्कामासाठी पोहोचू शकणार होतो. 

 

जोग फॉल्सचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/dA3nzqgksEx


घनदाट जंगलाच्या सानिध्यात असणारा उंचाल्ली फॉल्स अजिबात चुकवू नये असा आहे. जोग फॉल्स ते उंचाल्ली फॉल्स हे अंतर साधारण ५५ किलोमीटर असून पोहोचण्यासाठी साधारण दीड तासांचा कालावधी लागतो. हा रस्ता जोग फॉल्स–कोडकानी–सिद्दापूर–कोलसिरसी–उंचाल्ली फॉल्स असा आहे. जोग फॉल्स ते सिद्दापूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने उत्तम आहे. या मार्गावर उत्तर कन्नड जिल्ह्यातले सिद्दापूर हे मोठे तालुक्याचे गाव लागते. सिद्दापूर ओलांडल्यानंतर सिद्दापूर-सिरसी हायवे सुरु होतो. या रस्त्यावर सिद्दापूरपासून साधारण ४ किलोमीटर गेल्यानंतर डावीकडे उंचाल्ली फॉल्सकडे जाणारा रस्ता लागतो. एकदा का डावीकडे वळालो की मग रस्ता छोटा आणि अधेमधे थोडा खराब आहे. हा रस्ता पुढे कोलसिरसी, मुत्तीगे, हरसिकट्टा, होसतोट अशी छोटी छोटी गावे ओलांडत उंचाल्ली फॉल्सच्या प्रवेशद्वारापाशी येतो. होसतोट हे गाव ओलांडल्यानंतर वन विभागाची चौकी आपला रस्ता अडवते. येथे ३० रुपये भरून गाडीची रीतसर एन्ट्री करावी लागते. संध्याकाळी ५ नंतर या चौकीपलीकडील प्रवेश बंद होतो. या चौकी पासून शेवटचा ३ किमीचा रस्ता हा दाट जंगलातून जाणारा, थोड्या खड्या चढणीचा आणि वळणावळणाचा आहे. सगळ्यात महत्वाच म्हणजे हा रस्ता डांबरी असला तरी सध्या मात्र अत्यंत खराब अवस्थेत असून एकावेळी एकच वाहन जाऊ शकेल एवढा छोटा आहे. त्यामुळे येथे गाडी चालवताना योग्य ती काळजी घ्यावी. 


उंचाल्ली धबधब्याच्या चारी बाजूंना गर्द जंगल पसरलेले आहे. या जंगलातच एक लोखंडी प्रवेशद्वार लागते जिथे आपली चार चाकी गाडी व्यवस्थित लावायची आणि पुढचा पायी प्रवास सुरु करायचा. पार्किंगपासून उंचाल्ली धबधब्याजवळ जाणे म्हणजे येऊन जाऊन जवळ जवळ दीड ते दोन तासांचा एक छोटासा ट्रेकच आहे. थोडक्यात काय तर शारीरक श्रम केल्याशिवाय या जंगलाने वेढलेल्या धबधब्यापर्यंत पोहोचता येणे अशक्य आहे. आधी पार्किंगपासून कच्च्या मातीच्या रस्त्याने २ किलोमीटर चालत जायचे आणि त्यानंतर साधारण २५० पायऱ्या उतरल्यानंतर आपण धबधब्या समोर येऊन पोहोचतो. हा २ किमीचा संपूर्ण रस्ता जंगलाने वेढलेला, तीव्र उताराचा आणि ओबडधोबड आहे. पण या रस्त्याने चालत जाताना आजूबाजूला असणारे उंच उंच वृक्ष, हिरवीगार झाडी आणि विविध पक्षांच्या आवाजाचे सुमधूर संगीत तुमच्या मनावरचा ताण विसरायला लावते आणि साधारण वीस पंचवीस मिनिटात आपण हे अंतर कसे पार करून गेलो हे कळत देखील नाही. 

 

उंचाल्ली धबधब्याचे प्रवेशद्वार. येथून पायगाडीचा प्रवास सुरु होतो

जंगलात १ ते दीड किमी चालत जावे लागते पण या मार्गावरचे जंगल खूपच सुंदर आहे


आपण जसं जसे जंगलात आणखी आत जातो तसं तसे जवळपासच कुठेतरी वेगाने पाणी कोसळत असल्याचा आवाज आपल्या कानावर पडतो. कच्चा रस्ता जेथे संपतो तिथून पुढे पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. येथे वनविभागाने पर्यटकांच्या विश्रांतीसाठी लाडकी बाक तसेच झाडांच्या मोठमोठ्याला खोडापासून लाकडी स्टूल तयार केलेले आहेत. याठिकाणी बसून घटकाभर विश्रांती नक्की घ्यावी कारण जवळच पडणाऱ्या पाण्याचा आवाज, पक्षांची किलबिल आणि आजूबाजूला असणारी घनदाट झाडी हे सगळे वातावरण आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.    

 

वनविभागाने पर्यटकांच्या विश्रांतीसाठी केलेली व्यवस्था


पायऱ्यांचा मार्ग सुरु झाला कि मोजून फक्त ५० पायऱ्या उतरल्यानंतर समोरच पांढऱ्या सहस्त्रधारांसह कोसळणारा उंचाल्ली धबधबा पहिल्यांदा नजरेस पडतो. हे दृश पाहण्यासाठी वनविभागाने अगदी अचूक जागी पहिला मनोरा उभा केला आहे. पण या ठिकाणावरून धबधबा पूर्ण दिसत नाही. त्यामुळे आणखी १०० पायऱ्या उतरायच्या आणि दुसऱ्या मनोऱ्यामधे दाखल व्हायचे. या ठिकाणावरून धबधबा आणखी जवळ आणि चांगला दिसतो. पण उंचाल्ली धबधब्याचे “धबाबा लोटती धारा! धबाबा तोय आदळे” असे दृश पहायचे असेल तर शेवटच्या आणखी १०० पायऱ्या उतरून एका मोकळ्या प्लाटफॉर्मवर पोहोचायचे. येथे आपण उंचाल्ली धबधब्याच्या बरोबर समोर पोहोचलेलो असतो आणि आता त्याच्या व आपल्यामधे कोणताही अडथळा नसतो. समोर रुद्र अवतार धारण केलेला तो धबधबा, त्याच्या खळाळत पडण्यामुळे आजूबाजूला उडणारे पाण्याचे असंख्य तुषार आणि त्यातच सायंकाळच्या कोवळ्या उन्हात पाण्याच्या पडद्यामागे तयार होणारे इंद्रधनुष्य या सगळ्या गोष्टी आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात. 

धबधब्याचा संपूर्ण नजरा पाहण्यासाठी अश्या २०० ते २५० पायऱ्या उतराव्या लागतात

उंचाल्ली उर्फ लशिंग्टन उर्फ केप्पा जोगा धबधबा


मी तर म्हणेन कि जगप्रसिद्ध जोग फॉल्सपेक्षा हा उंचाल्ली धबधबा कैकपटीने उजवा आहे. याच कारण म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटी सुद्धा जर का हा धबधबा एवढ्या मोठ्या प्रवाहाने कोसळत असेल तर मग भर पावसाळ्यात येथील दृश काय कमाल असेल ह्याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. त्यामुळेच बहुदा उंचाल्ली धबधबा हा कर्नाटकातील एक रौद्र पण तितकाच नितांत सुंदर धबधबा मानला जातो. घनदाट जंगलाच्या एका रुंद घळीतून वाहत येणारी अघनाशि नदी येथे एका भल्या मोठ्या खडकावरून आदळत ११६ मीटर (३८१ फूट) उंचीवरून खाली झेप घेते त्यामुळे हा धबधबा तयार झाला आहे. सन १८४५ मध्ये जे.डी.लशिंग्टन नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने या धबधब्याचा प्रथम शोध लावला त्यामुळे याला "लशिंग्टन धबधबा" असेही म्हणतात. तर स्थानिक लोक या धबधब्याला "केप्पा जोगा" (म्हणजे भयंकर आवाज करत कोसळणारा) असे देखील म्हणतात.

 



धबधब्याच्या आजूबाजूचे घनदाट जंगल

 

हा धबधबा आजूबाजूच्या गावापासून तसा बराच लांब व थोड्या आडवाटेवर असल्याने येथे कोणतीही दुकाने नाहीत. त्यामुळे येथे येताना पाणी आणि खाण्याचे साहित्य बरोबर ठेवावे. तसेच हा धबधबा पाहताना वेळेचे भान असू द्यावे. कारण अंधार पडू लागला कि येथे आजूबाजूला असणारे जंगल अधिकच गूढ आणि शांत वाटायला लागते. परतीच्या वाटेवर आधी २५० पायऱ्या चढायच्या आणि त्यानंतर पुढे २ किलोमीटरचा खडा चढ असणारा ओबडधोबड कच्चा रस्ता पायी चालत पार करायचा यासाठी १ तास तरी हाताशी हवा. आम्ही ४.१५ वाजता उंचाल्ली धबधब्याला अलविदा केले आणि साधारण ५.१५ वाजता म्हणजे ४५ मिनिटात कुठेही न थांबता फॉरेस्टच्या गेट जवळ परत आलो.



उंचाल्ली धबधब्याचे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/vr8S53a5rCL2

 

आता सिरसीला मुक्कामी जाणे एवढाच एक कार्यक्रम शिल्लक होता. उंचाल्ली फॉल्स येथून सिरसी फक्त ३५ किलोमीटर अंतरावर आहे. सिरसीकडे जाताना होसतोट, हेग्गर्णे अशी गावे ओलांडत अम्मीनल्ली येथे सिरसी-कुमठा राष्ट्रीय महामार्गावर लागलो. मग जवळच असणाऱ्या छोट्या हॉटेलमधे संध्याकाळचा चहा घेऊन साधारण ६.३० वाजता सिरसी गावात दाखल झालो. सिरसी गावात पोहोचताच रोजच्या प्रमाणे मुक्कामासाठी हॉटेल शोधण्याचे काम सुरु झाले. पुढचा दोन्ही दिवसाचा मुक्काम सिरसी गावातच होणार असल्याने एकूणच हॉटेल व हॉटेल रूम्स दोन्ही जरा चांगले असणे गरजेचे होते. मग एक-दोन दुकानात जाऊन तिथल्या स्थानिकांकडे फॅमिली सोबत राहण्यासाठी चांगले हॉटेल कुठे मिळेल याची चौकशी केली. स्थानिकांच्या सांगण्यानुसार सिरसी-येल्लापूर रस्त्यावर सिरसी गावापासून थोडे बाहेर मधुवन आणि सम्राट नावाची दोन चांगली हॉटेल्स आहेत असे कळाले. या दोन्ही हॉटेल्समधे सिरसी परिसरात ट्रीपसाठी येणाऱ्या जवळ जवळ सगळ्याच ट्रॅव्हल कंपन्यांचे प्रवासी उतरतात अशी अधिकची माहिती देखील मिळाली. 


मग सगळ्यात आधी सम्राट हॉटेलकडे गाडी वळवली. पण आमच्या दुर्दैवाने कोणत्या तरी टूर कंपनीच्या लोकांनी या हॉटेलमधील सर्वच रूम्स बुक केलेल्या होत्या. मग सम्राट हॉटेलला लागूनच असणाऱ्या मधुवन हॉटेलमधे चौकशी केली. येथे देखील गुरुनाथ ट्रॅव्हल कंपनीचे प्रवासी उतरले होते पण आमच्या नशिबाने एक AC रूम आणि एक non-AC रूम शिल्लक होती. आम्हाला देखील अगदी तश्याच रूम्स हव्या असल्याने लगेच पुढील दोन दिवसाच्या मुक्कामासाठी हॉटेल बुक केले आणि साधारण ७ वाजता रूमवर पोहोचलो. सम्राट आणि मधुवन या दोन्ही हॉटेल्सच्या खाली त्यांचे स्वतःचे स्वतंत्र असे मोठे रेस्टॉरंट आहे. त्यामुळे आमचा दोन्ही रात्रींच्या जेवणाचा आणि सकाळच्या नाष्टाचा प्रश्न आपसूकच मिटला होता. 

 

सिरसी येथील "हॉटेल मधुवन" चे GPS लोकेशन : https://goo.gl/maps/G7286LuvkBF2


आज दिवसभरात केळदि आणि इक्केरी येथील सुंदर मंदिर, वरदपूर येथील श्रीधर स्वामींचा मठ व जोग आणि उंचल्ली सारखे सुंदर वॉटरफॉल्स अशी मस्त पाच ठिकाण पाहून दिवसभराचा एकूण १८० किलोमीटर प्रवास झाला होता.


सागर ते केळदि – ८ किमी

केळदि ते इक्केरी – १२ किमी

इक्केरी ते वरदपूर – १३ किमी 

वरदपूर ते जोग फॉल्स – ३४ किमी

जोग फॉल्स ते उंचाल्ली फॉल्स = ७० किमी

उंचाल्ली फॉल्स ते सिरसी (मधुवन हॉटेल) = ४३ किमी 


क्रमश: 


कोस्टल कर्नाटक ट्रिपचा सिरसी परिसरातील भेट दिलेल्या पर्यटनस्थळांबद्दल शेवटचा ४ था भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा ....


@ VINIT DATE – विनीत दाते

 

पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.

 



Comments

  1. विनीत, खरंच फोटोग्राफी खूप छान आणि शब्दांकन अप्रतिम केले आहे. दोन्ही गोष्टी बघून आणि वाचन करून तबियत एकदम खुश ..........हे बघितल्यावर अगदी आपण तिथेच आहोत कि काय आसा भास मात्र नक्कीच झाला. आणि दुसरे एक म्हणजे सर्वांनी प्रथम भारत भ्रमण करावे आणि मगच परदेश वारीचा विचार करावा असे मात्र नक्कीच वाटते. भारतात हे किती विलोभनीय दृश्य आहेत आणि आपणसुद्धा भारतवासीय किती श्रीमंत आहोत अनेक मंदिर आणि दुर्ग वैभवाने याची कल्पना येते. तू अगदी सर्व इ-सना सहित आणि तेथील त्या स्थळाचा इतिहास नक्की काय आहे ....या सर्व गोष्टी वर्णन केल्या आहेत. खूप छान वाटले. पुढील दुर्ग भमंती साठी शुभेच्छा.

    दत्तात्रय जोशी
    ९२७०२२३४४०
    सायंकाळ ६.०० ..... 13 MARCH 2018

    ReplyDelete
  2. अप्रतिमच लिहलय सर्व,तुम्हीं खरे म्हणजे पुस्तकच काढा तुमच्या भ्रमंतीचे, म्हणजे आम्हां सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल.

    ReplyDelete
  3. अप्रतिम प्रवासवर्णन...👍👍👍

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर व सविस्तर संदर्भासह लेखन, उत्तम फोटो

    ReplyDelete
  5. नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लिहिलंय! एखाद्या ठिकाणामागे जर देव-राक्षस, शाप-वरदान असा काही इतिहास असेल तर तेव्हडा भाग मी फार लक्षपूर्वक वाचत नाही.पण, आपली लेखनशैली इतकी सहज आहे की avoid करावसं वाटत नाही. मंदिरांमगिल घडून गेलेला सत्य इतिहास, कोरीव काम, जंगल-धबधबा सफारी तर मस्तच.👌 संग्रहालय आणि जुन्या कार्सच्या खजिन्याविषयी वाचून तर कधी बघायला मिळेल असे वाटतेय.मनःपूर्वक धन्यवाद विनितजी!

    ReplyDelete
  6. विनीतदादा,खुपच छान लिहिलंय ,
    ठिकाणांना भेट देण्याची इच्छा खूप प्रबळ झालीये

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर लिखाण

    ReplyDelete
  8. Great.... Great and great... Samgra likhan....ani navkhya lokana margdarshak ani mahitivardhak suddha

    ReplyDelete
  9. khup chan sir...

    ReplyDelete
  10. विनीत नेहमी प्रमाणे छान लिखाण व अप्रतिम फोटो अभिनंदन

    ReplyDelete
  11. Mast Vinit...vachatana asa vatate ki mi real madhe firto aahe ����������������

    ReplyDelete
  12. अभ्यासपुर्ण माहिती दिल्या बद्दल तुझे मन:पुर्वक अभिनंदन. लेखन छान झाले अाहे

    ReplyDelete
  13. This is surprising treat for me...प्रवास वर्णन खूप वाचली आहेत...पण ती लेखक मंडळी काही संपर्कात नाहीत 😜... आणि एवढा छान लेखक माझा मित्र आहे!!! हे विस्मयचकित करणारे प्रवासवर्णन अवर्णनीय आनंद देणारी आहेत. ह्या अभूतपूर्व जगाची ओळख होती पण ज्या प्रकारे ती पुन्हा वाचताना अनुभवली त्यासाठी मनःपूर्वक आभार... आता परत हे सर्व तुझ्याबरोबर आस्वाद घेण्याची आस लागली आहे...आगामी प्रवासात नक्की असेन...असाच लिहता रहा... लक्ष लक्ष शभेच्छा 💐

    ReplyDelete
  14. गड-किल्ल्यांच्या वर्णानासारखेच धबधबे, ऐतिहासिक ठिकाणे, देऊळं, आडवाटा या सगळ्यांचं वर्णनही अतिशय उत्तम. नुसते वर्णनच नाही तर त्यामागचा इतिहास त्याचे फोटो हे अप्रतिम. बाकी काहीही न वापरता फक्त ब्लॉग संपूर्ण रेफरन्स म्हणून वापरता येईल इतकी सुंदर माहिती ह्यात तू दिलेली आहेत.
    शेवटच्या भागाची वाट बघतो आहे.

    ReplyDelete
  15. व्वा विनीत प्रत्यक्ष फिरल्याची अनुभूती मिळाली...

    लेखन असेच उत्तमोत्तम होऊ दे...

    शुभेच्छा...

    पुन्हा एकदा तुझ्या सोबत भटकंतीची संधी मिळावी...

    ReplyDelete
  16. Appratim,it is very difficult to choose what is best trip, photo ki likhan. Infact sarwach khup chan ahe. Maja Ali. Khup upyogipan ahe.shabdankan,shabdarachana mandni sarwach khup chan

    ReplyDelete
  17. Khupach surekh varnan, really very helpful information with details...

    ReplyDelete
  18. अप्रतिम! अतिउत्तम शब्दांकन !!

    ReplyDelete
  19. जीपीजी लोकेशन काय आणि व्हिडिओ काय.. खुपछान लिहलं आहेस.. पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहातोयप. 👌👍

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

पावनगड

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana