रत्नगड_Ratnagad

रायगड जिल्ह्यातील रत्नगड हा खूप कमी ट्रेकर्सना माहित असणारा किल्ला. गुगलवर रत्नगड असं शोधायला जरी गेलं तरी भंडारदऱ्याचा मुकुटमणी असणाऱ्या रतनगडाचीच भरभरून माहिती मिळते आणि रत्नगडाबद्दल मात्र निराशाच हाती पडते. चला तर मग जाणून घेऊन अशा या अल्पपरिचित रत्नगडाबद्दल.


रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात रत्ना नदीच्या काठी रत्नगड हा छोटासा किल्ला लपला आहे. स्थानिक लोक मात्र याला रतनगड या नावानेच ओळखतात. नगर जिल्ह्यातील प्रवरे काठचा रतनगड पाहण्यासाठी पूर्ण एक दिवस हाताशी हवा मात्र पेण जवळील या छोट्या रतनगडाला भेट देण्यासाठी अर्धा दिवस देखील पुरेसा आहे. कारण समुद्रसपाटी पासून रत्नगडाची उंची १३८० फुट असून पायथ्यापासून हा किल्ला फक्त ६५० फुट उठवला आहे. तसेच या डोंगरावर याला किल्ला म्हणावे असे बुरुज, तटबंदी किंवा दरवाजे असे कोणतेही महत्वाचे अवशेष नाहीत. 

रत्नगडाला जाण्यासाठी प्रथम खोपोली गाठावे. खोपोली-पेण रस्त्यावर पेणच्या साधारण ८ किलोमीटर आधी वाक्रूळ नावाचे गाव लागते. वाक्रूळ गावातून डावीकडील एक गाडी रस्ता आधी कामार्ली आणि मग पुढे गड पायथ्याच्या सायमाळ गावाकडे जातो. सायमाळ गावात गाडी रस्ता संपतो. येथून पुढे रत्नगडाच्या पायथ्याच्या काळभैरवाच्या मंदिरापाशी पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यावरून २० मिनिटाची तंगडतोड करावी लागते.सायमाळ गावातून दिसणारा रत्नगड aka रतनगड. समुद्रसपाटीपासून उंची साधारण ४०० मीटर

सायमाळ हे पेण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक टुमदार गाव. या गावाच्या आजूबाजूस अनेक छोटे मोठे डोंगर उठवलेले आहेत. हे सर्वच डोंगर एक सारखे भासत असल्यामुळे गावातील एखादया माहितगार माणसास नेमका रतनगडाचा डोंगर कुठला किंवा रत्नाई देवीची मूर्ती कोणत्या डोंगरावर आहे हे विचारून घ्यावे. मग गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात पडलेली एक तुटकी तोफ पहावी आणि लगेच किल्ल्याकडे कूच करावे.


गावाबाहेरील जिल्हा परिषेदेच्या शाळेच्या प्रांगणात पडलेली एक तुटकी तोफ

सायमाळ गावापासून साधारण २० मिनिटात आपण रत्नगडाच्या पायथ्याला असलेल्या काळभैरवाच्या मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरात दोन बाजूस दोन शीळा आणि मधे भैरवाची दगडी मूर्ती आहे. मंदिरामागून एक खड्या चढणीची व तीव्र घसाऱ्याची वाट आपल्याला बरोबर ३० मिनिटात किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर घेऊन जाते. पायथ्यापासून किल्ल्याची उंची जरी कमी असली तरी कोकणातील दमट वातावरणात ही खडी चढाई चांगलाच घाम काढते.


किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे काळभैरवाचे मंदिर. या मंदिराशेजारील वाट सरळ किल्ल्यावर नेते.

श्री. काळभैरव
किल्ल्याची खड्या चढणीची व घसाऱ्याची वाट


पायवाटेने माथ्यावर जाताना आधी किल्ल्याच्या मुख्य उंचवट्यामधे कातळात खोदलेले एक पाण्याचे टाके लागते. या टाक्यातील पाणी मात्र गवत व झाडी वाढल्याने पिण्यास योग्य नाही. येथून पुढे पाचच मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर दाखल होतो. किल्ल्याचा विस्तार खूपच छोटा आहे. माथ्यावर पोहोचताच समोर नजरेस पडते ती रत्नाई देवीची उघड्यावर असलेली मूर्ती. जवळच एक शिवपिंड देखील आहे. या दोन्हीही देवतांच्या मुर्त्या ऊन व वारा यांचा आघात सहन करत भग्न अवस्थेत पडलेल्या आहेत.


पाण्याचे टाके. या टाक्यात पाणी असते मात्र पिण्यायोग्य नाही.
रत्नाई देवीची मूर्ती

महादेवाची पिंड


हे अवशेष पाहून पश्चिमेकडे थोडं खाली उतरलं कि एक भुयार दिसते. आमच्या बरोबर आलेल्या सायमाळ गावातील वाटाडयाच्या मते या भुयारात पुढे मोठी गुहा असून आत बसण्यासाठी कट्टे देखील आहेत. आता खरे खोटे त्या देवालाच ठाऊक कारण आम्ही भर पावसाळ्यात गेल्याने आणि भुयाराच्या सुरवातीलाच पाणी साठलेले असल्याने आत जाण्याचे धाडस केले नाही. या भुयाराजवळून डाव्या हातास थोडे अजून खाली उतरले की कातळात खोदलेले एक पिण्यायोग्य पाण्याचे टाके लागते. हे टाके अगदीच डोंगरकडयात खोदलेले आहे त्यामुळे टाक्यापर्यंत जाणारी वाट थोडी अरुंद व धोकादायक आहे. पाण्याची गरज असेल तरच योग्य काळजी घेऊन खाली उतरावे. पण थोडासा धोका पत्करून या टाक्यापर्यंत येण्याचे श्रम मात्र नक्कीच सार्थकी लागतात. कारण या टाक्यात आहे नितळ आणि फ्रीजसारखे थंडगार पाणी.


किल्ल्याच्या पश्चिमेकडील कातळात असणारे एक भुयार. गावकऱ्यांच्या मते हे भुयार आत एका गुहेत उघडते व तिथे बरेच लोकांना बसण्याची जागा आहे. 

किल्ल्याच्या पश्चिमेकडील कातळात एक थंड पाण्याचे टाके आहे. तिकडे जाणारी हि वाट थोडी अरुंद व निसरडी आहे.

कातळातील ह्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.


इथेच आपली गडफेरी पूर्ण होते. त्यामुळे टाक्यातील थंडगार पाणी पिऊन थोडी विश्रांती घ्यायची आणि सभोवताल नजर फिरवायची. किल्ल्याच्या पश्चिमेला दरीपलीकडे मिऱ्याचा डोंगर उठवलेला आहे तर समोर कामार्ली गावाजवळचे हेटवणे धरण दिसते. वातावरण स्वच्छ असल्यास उत्तरेला दूरवर माणिकगड दिसतो. जवळच असणारे अनेक कौलारू घरांचे कोकणातील टुमदार सायमाळ गाव माथ्यावरून खूप सुंदर दिसते.


किल्ल्यावरून दिसणारा सुंदर सभोवताल


संपूर्ण किल्ला पाहून सायमाळ गावात परत येण्यासाठी ३ तासाचा कालावधी हवा. पिण्यायोग्य पाणी एकाच टाक्यात उपलब्ध आहे मात्र ते जरा धोकादायक ठिकाणी असल्याने सायमाळ गावातूनच पाण्याच्या बाटल्या भरून घ्याव्यात. गडावर राहण्याची कोणतीही सोय नाही मात्र पायथ्याच्या भैरवाच्या देवळात पाच जण झोपू शकतात किंवा सायमाळ गावाच्या सुरवातीलाच एक मोठे सभामंडप असणारे सुंदर मंदिर आहे. येथेही रात्रीच्या मुक्कामाची सोय होऊ शकते. जेवणाची व्यवस्था आपण स्वतः करावी किंवा मग गावात आगाऊ कल्पना दिल्यास जेवण मिळू शकते.


किल्ल्याचा छोटेखानी विस्तार पाहता याचा वापर मुख्यत: टेहाळणीसाठी होत असावा. रत्नगड हा किल्ला कुण्या बाबुराव पाशिलकर नावाच्या इसमाने बांधला असे गावातील लोक सांगतात. मुघलांकडून देखील एकदा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न झाला मात्र गडाचा किल्लेदार कावजी कोंढाळकर याने तो हाणून पडला. रत्नगडाचा हा किल्ला मिऱ्या-महल डोंगररांगेत येतो त्यामुळे ब्रिटीशांनी या डोंगराचा थंड हवेचे ठिकाण म्हणून वापर करावा असा विचार केला मात्र तो प्रत्यक्षात आला नाही. (संदर्भ – “रायगड जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा” – श्री. सचिन जोशी)


शेवटी एक विनंती, ट्रेकींग जरूर करा मात्र “पाऊलखुणा शिवाय मागे काही ठेऊ नका आणि सुखद आठवणी शिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि पश्चिम घाट हि आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याला पडणाऱ्या प्लास्टिकच्या विळख्यातून वाचवा”.


@ VINIT DATE – विनीत दाते


Click here for Picasa photo album

Comments

 1. wow......nice info.
  Thanks for sharing it!!!!

  ReplyDelete
 2. छान रे विनित ...

  ReplyDelete
 3. छान माहिती.. अपरिचित दुर्गाची..
  लवकरच जाउन येतो :-)

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद योगेश ... नक्की जा आणि हो जानेवारीच्या आधी जा ... कोकण you know

   Delete
 4. Awadla lekh.. Lahan astana gelo hoto pan ata athvat naie kai.. Punha ekda jaun yein.. Jawalach wyaghreshwarache mandir ahe.. Te suddha pahun yeu shakta

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद शंतनू ... व्याघरेश्वर मंदिर पहायचं राहिल

   Delete
 5. vinit sir chan mahiti dilit ratangad chi ajun mahal miryamade fort ahet tyachi mahiti ahe ka

  ReplyDelete
 6. धन्यवाद. हो मिरामहल रांगेतल्या मिरगडावर पण ब्लॉग लिहलेला आहे

  https://durgwedh.blogspot.com/2016/10/mirgad.html

  ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

रांगणा_Rangana

पावनगड