Mirgad_मिरगड

नाशिक जिल्हा हा गिरिदुर्गांची खाणच. पण त्या खालोखाल जर कोणत्या जिह्याचा नंबर लागत असेल तर तो रायगड जिह्याचा. हा जिल्हा तर डोंगरी आणि सागरी अशा दोन्ही दुर्गांसाठी प्रसिद्ध. चला तर मग आज याच रायगड जिह्यातील थोड्या आडवाटेवरच्या मिरगड या छोट्या  किल्ल्याची भटकंती करू. 


कोंढवी गावातून दिसणारा मिरगड


मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर असणारे पेण हे गाव शाडूच्या गणेशमूर्तींसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या पेण तालुक्यात सांकशी, रत्नगड आणि मिरगड असे तीन किल्ले येतात. या तीन किल्ल्यांपैकी सांकशीचा किल्ला हा बरीच माहिती उपलब्ध असल्याने पुण्या-मुंबईकडील सर्व ट्रेकर्सना सुपरिचित आहे. मात्र महल मीरा डोंगररांगेत येणारे रत्नगड आणि मिरगड हे किल्ले माहितीच्या अभावामुळे अल्पपरिचित बनले आहेत. त्यामुळे फार कमी म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच ट्रेकर्स या किल्ल्यांना भेट देतात.  


झापडी गावातून साधारण एक तास चालून आलो कि आपण पठारावर पोहोचतो आणि समोर मिरगडाचा डोंगर जवळ दिसायला लागतो

मिरगडला जाण्यासाठी प्रथम पेण शहर गाठावे. मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्गावर पणजीकडे जाताना वडखळ नाका ओलांडल्यानंतर कासू नावाचे कोकणरेल्वेचे स्टेशन लागते. या कासू गावानंतर महामार्गावरच थोडे पुढे पाबळ गावाला जाणाऱ्या फाटयावर डावीकडे वळायचे. हा रस्ता पुढे रेल्वे पुलाखालून निगडे, पाबळ, कोंढवी अशी छोटी छोटी गावे ओलांडत शेवटी झापडी या गावाजवळ संपतो. कोंढवी गावातूनच चार छोटे छोटे उंचवटे असणारा मिरगड दिसायला लागतो. तशी एक वाट या कोंढवी गावातूनही मिरगाडावर जाते पण ही वाट थोडी लांबची असल्याने आपण मात्र जरा आणखी पुढचे झापडी गाव गाठायचे. 


मिरगडाचा डावीकडचा सगळ्यात पहिला डोंगर. या डोंगरवर कोणतेही अवशेष नाहीत.


झापडी गावाच्या शेवटी जिथे पक्का गाडी रस्ता संपतो तिथूनच एक कच्ची पण प्रशस्थ अशी बैलगाडी वाट मिरगडाच्या खालच्या पठारावर असणाऱ्या धनगरवाडीत (सोनगीरवाडी) जाते. हि वाट प्रशस्थ असली तरी वळणावळणाची असल्याने या वाटेवर पावसाळा सोडल्यास दुचाकी नेता येऊ शकते. आपण मात्र आपली चारचाकी झापडी गावात लावायची आणि झापडी ते धनगरवाडी हे ३ किलोमीटरचे अंतर चालतच पार करायचे. पठारावर पोहोचताच समोर एक डेरेदार आंब्याचे झाड आपले स्वागत करते. या झाडाखाली थोडी विश्रांती घ्यायची आणि तासाभाराचे अंतर चालून लागलेला थकवा घालवायचा. येथून समोरच आपल्याला मिरगडाचा डोंगर दिसायला लागतो. या झाडाखाली पठारावरच्या धनगरवाडीतली काही माणस किंवा खेळणारी पोर नक्की भेटतात. त्यांनाच किल्ल्यावर जाण्याची वाट विचारायची. अगदी कुणी भेटलच नाही तर निराश न होता समोर उजवीकडे धनगरवाडीत जाणारी वाट धरायची. हि धनगरवाडी म्हणजे वीस घरांची छोटी वस्ती. किल्ल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मोकळ्या पठारावर शेती करणे हा इथल्या लोकांचा व्यवसाय. घरटी एक माणूस मुंबईत कामानिमित्त राहणारा. किल्ल्यावर पाणी नसल्याने या वाडीतच आपल्या जवळच्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि गावातल्या एखाद्या माणसाकडून किल्ल्याकडे जाणारी वाट निट समजून घ्यायची. 


किल्ल्यावर असणारे जुन्या बांधकामांचे अवशेष

धनगरवाडीतून समोरच चार छोटे उंचवटे असणारा मिरगड दिसतो. यापैकी डावीकडून दुसऱ्या आणि तिसऱ्या डोंगरावर किल्ल्याचे थोडेफार अवशेष शिल्लक आहेत. धनगरवाडीतून किल्ल्यावर जाणारी मळलेली पायवाट देखील याच दोन डोंगरामधून वर जाते. मिरगड समुद्रसपाटीपासून १२०० फुट तर धनगरवाडीतून फक्त १०० फुट उठावला आहे. त्यामुळे धनगरवाडीपासून अर्ध्या तासात आपण दोन डोंगरांमुळे तयार झालेल्या खिंडीत येऊन पोहोचतो. 
आता प्रथम आपला मोर्चा डावीकडील डोंगराकडे वळवायचा. या डोंगरावर जुन्या बांधकामचे अवशेष दाखवणारी दोन बांधकामाची जोती आहेत. बाकी तसे या डोंगरावर कोणतेच अवशेष नाहीत. आता पुन्हा खिंडीत परत यायचे आणि उजव्या हाताचा डोंगर चढून वर जायचं. या डोंगरावर समोरच पूर्वेकडील टोकाला एक आणि थोडे पुढे दक्षिणेला अशी दोन पाण्याची टाकी आहेत. मात्र उपसा नसल्याने दोन्ही टाकी आज कोरडी पडलेली आहेत. या डोंगरवर सुद्धा काही जुन्या बांधकामाची जोती दिसतात. हे सर्व अवशेष पाहून उत्तरेकडील चौथ्या उंचवटयाकडे जाणारी पायवाट धरायची.


पाण्याचे टाके

गडावर दोन पाण्याची टाकी आहेत मात्र दोन्ही टाकी उपसा नसल्याने कोरडी पडली आहेत

आता या चौथ्या उंचवटयावर गडाची देवता म्हणजे झाडीत दोन पाषाणात कोरलेल्या मुर्त्या आहेत. बहुदा पूर्वी गडावर एखादे मंदिर असावे आणि त्या मंदिरातील या मुर्त्या मंदिर उद्ध्वस्त झाल्यानंतर कुणीतरी येथे झाडीत आणून ठेवल्या असाव्यात. या चौथ्या उंचवटयानंतर पुन्हा लांबवर पसरलेले पठार आणि पाचगणी नावाचे छोटे गाव दिसते. रेंज ट्रेक करण्याची इच्छा असणाऱ्या भटक्यांसाठी पाचगणी गावाकडून येणारी वाट हा मिरगडला येण्यासाठी दुसरा उत्तम पर्याय होऊ शकतो. काही ट्रेकर्स पेण जवळील रत्नगडाला आधी भेट देतात आणि मग प्राचीन व्याघ्रेश्वर शिवमंदीर व त्याजवळील धबधबा पाहून पाचगणी मार्गे मिरगडला येतात. 


गडावरील देवतांच्या भग्न मूर्ती

आता येथे आपली मिरगडाची ३ तासांची छोटेखानी भटकंती पूर्ण होते. मिरगडाला भेट देण्यासाठी पावसाळयाचा कालावधी सर्वोत्तम कारण गडावर फारसे अवशेष नाहीत आणि उन्हाळ्यात कोकणातील वातावरण चांगलाच घाम काढते. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची, निवाऱ्याची आणि जेवणाची कोणतीही होय नाही. मात्र पठारावरील धनगरवाडीत पूर्व कल्पना दिल्यास काही घरांमध्ये जेवणाची सोय होऊ शकते.


गडाच्या शेवटच्या छोट्या उंचवट्यावर झाडाखाली या जुन्या मुर्त्या ठेवलेल्या आहेत

मिरगडाला फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरील तुटपुंजे अवशेष पाहता इतिहासकाळात किल्ल्याचा उपयोग निश्चितच एक वॉच टॉवर म्हणून केला गेला असावा. इ.स १६६२ मध्ये मोगल सरदार नामदारखान याने पेण व आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला होता. तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी हा भाग घेतला होता. ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख आढळतो. (संदर्भ: ट्रेकक्षितीज वेबसाईट). काही कागदपत्रात मिरगडाचा उल्लेख २८ मार्च १७४० मधे येतो. संभाजी आंग्रे यांच्या मदतीसाठी जेव्हा चिमाजी अप्पा आणि नानासाहेब पेशवे या परिसरात आले होते तेव्हा त्यांनी पाली, उरण आणि मिरगड हे भूभाग जिंकून घेतले अशी माहिती आंग्रे यांच्या पत्रव्यवहारात मिळते. (संदर्भ: रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव – श्री. सचिन जोशी)


तर महल मीरा डोंगर रांगेतील रत्नगड ते मिरगड अशी दोन दिवसाची सुंदर पावसाळी भटकंतीसाठी नक्की करावी. वेळ असेल तर पेण जवळचा सांकशीचा किल्ला ही या भटकंतीमधे पहावा. सरतेशेवटी एक विनंती, ट्रेकींग जरूर करा मात्र “पाऊलखुणा शिवाय मागे काही ठेऊ नका आणि सुखद आठवणी शिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि पश्चिम घाट हि आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याला पडणाऱ्या प्लास्टिकच्या विळख्यातून वाचवा”.


@ VINIT DATE – विनीत दाते


Link for Picasa photo album

Comments

 1. मस्त माहितीशीर ब्लॉग ! धन्यवाद

  ReplyDelete
 2. छान माहीती

  ReplyDelete
  Replies
  1. धनयवाद जावळीकर sir

   Delete
 3. एकदम ऑफबीट दुर्ग..
  शोधून काढावे लागतात दुर्गावशेष..
  फोटोज आणि माहिती मस्त लिहिलीये. धन्यवाद!!!

  ReplyDelete
 4. मस्त. चालू द्या.

  ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

रांगणा_Rangana

पावनगड