बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

अंजनेरी किल्ला_Anjaneri fort

मारुती, बजरंगबली, बलभीम, केसरीनंदन, आंजनेय, वायुपुत्र, पवनसुत, संकटमोचन अशा एक न अनेक नावांनी ज्याचा आपण उल्लेख करतो अश्या श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थळ म्हणजे किल्ले अंजनेरी. अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत असेही कुठेतरी वाचण्यात आले. त्यामुळे अंजनेरी किल्ल्याला जसे ऐतिहासिक महत्व आहे तसेच त्याला पौराणिक महत्व देखील आहे. समुद्रसपाटीपासून १३०९ मीटर तर पायथ्यापासून ८०० मीटर उंचीवर असणारा अंजनेरी किल्ला भास्करगडापासून सुरु होणाऱ्या त्र्यंबकरांगेत येतो.
नाशिक-त्रंबकेश्वर मार्गावर नाशिक पासून २३ किलोमीटर अंतरावर अंजनेरी गावाचा फाटा आहे. यथे हनुमंताची भली मोठी मूर्ती असलेले एक मंदिर आहे. या मंदिरा शेजारून एक वाट अंजनेरी या छोट्याश्या गावात जाते. गावात हनुमंताचे भक्त असणाऱ्या साधूंचे काही आखाडे व छोटी छोटी अनेक मारुतीची मंदिरे आहेत. अंजनेरी गाव ओलांडून एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या आजूबाजूला दिसणारे पहिने नवरा-नवरी व सासू असे सुळके बघत आपण किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या वनखात्याच्या चौकीपाशी येऊन पोहोचतो. तीन डेरेदार आंब्याच्या झाडाच्या विशाल सावलीत वनखात्याची हि चौकी विसावली आहे. वनखात्याने किल्ल्याच्या पायथ्याला पर्यटन योजनेतून केलेले वृक्षारोपण, बसण्यासाठी ओटे व पर्यटकांच्या विश्रांतीसाठी पागोडा उभारलेले पाहून झालेल्या विकासकामांची पावती मिळते.पायथ्याशी येताच डोंगराची विशालता आपल्या डोळ्यात भरते. मुख्य डोंगररांगेला चिकटलेली दक्षिण बाजू सोडल्यास टेंकडीच्या सर्वच बाजूस ताशीव कडे असल्याने या किल्ल्याला तटबंदीची तशी गरज पडली नाही. वनखात्याच्या चौकीपासून किल्ल्यावर जाणारा पायरीमार्ग सुरु होतो. काही जुन्या तरी काही नवीन सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या चढत किल्ल्याची उभी चढण सुरु होते. येथेच काही ठिकाणी सुरक्षेसाठी वनखात्याने रेलिंग सुद्धा लावलेली आहेत. दोन्ही बाजूला असणारे ताशीव डोंगरकडे आणि घळीमधून जाणारा पायऱ्यांचा मार्ग या किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देतो. या पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात डावीकडे एक छोटी गुहा व जमिनीपासून पुरुषभर उंचीवर या गुहेत जाण्यासाठी खोदलेल्या पायऱ्या दिसतात. हि आहे दिगंबर जैन १००८ यांची पार्श्वनाथ गुहा. या लेण्यात दोन दालने आहेत पैकी बाहेरच्या दालनात भैरव आणि हनुमानाचे शिल्प तर छतावर कमळपुष्प कोरलेले आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार नागशिल्प, कीर्तिमुख अशा आकृत्यांनी सजवलेले आहे तर दोन्ही अंगांना द्वारपालांची रचना आहे. आतील दालनात मधोमध पद्मासनातील पार्श्वनाथाची व दोन्ही बाजूंना अन्य मूर्ती कोरलेल्या आहेत. येथेच एक अस्पष्ट संस्कृत शिलालेख देखील आहे. कातळातील हे अचंबित करणार शिल्पकाम बघून पुन्हा उरलेल्या पायऱ्या चढायला लागायचं आणि थोड्याच वेळात एका भव्य पठारावर यायचं.

आपण किल्ल्यावर पोहोचलो असे वाटत असतानाच आपल्याला अंजनेरी किल्ल्याचा भव्य बालेकिल्ला दिसू लागतो आणि मग लक्षात येते कि आता पर्यंत जे चढून आलो ती फक्त किल्ल्याची माची आहे आणि गडमाथा अजून बराच लांब व उंचावर आहे. किल्ल्याचा माचीसदृश हा परिसर म्हणजे एक भव्य पठाराच आहे. माचीवर जेथे आपला गडप्रवेश होतो तिथे भग्न दरवाज्याचे काही अवशेष मात्र जरा डोळसपणेच शोधावे लागतात. किल्ल्याच्या या भव्य पठारावर ऐतिहासिक बांधकामांचे काही अवशेष विखुरलेले आहेत मात्र पूर्ण माची फिरण्यासाठी व हे अवशेष शोधण्यासाठी एक पूर्ण दिवस हाताशी ठेवावा लागतो. माचीवर वाहणारा थंडगार वारा अंगावर घेत बालेकिल्ल्याकडे जाण्याऱ्या पायवाटेने चालू लागल्यावर घडीव दगडात बांधलेले अंजनी मातेचे मंदिर व एक बांधीव टाके लागते. मंदिरात नवीन बसवलेली अंजनी मातेची व समोर नतमस्तक झालेल्या हनुमानाची मूर्ती आहे. हे मंदिर मुक्कामास योग्य असून १० जण येथे निवांत झोपू शकतात. अंजनी मातेच्या मंदिरापासून तशीच मळलेली पायवाट पुढे एका भव्य तलावापाशी जाते. याला हनुमान तळे असे म्हणतात. हे तळे वर्षभर थंडगार पाण्याने काठोकाठ भरलेले असते. तळ्यापासून उजवीकडे वर जाणारी वाट अंजनेरीच्या बालेकिल्ल्यावर जाते तर डावीकडील दाट झाडीत जाणारी वाट माचीवरील आश्रमाकडे व सीता गुंफेकडे जाते.


आपण प्रथम डावीकडील पायवाट धरून आश्रमाकडे चालायला लागायचे. हा आश्रम परिसर अनेक डेरेदार वृक्षांनी अछ्यादलेला आहे. काशी-वाराणसी येथून आलेल्या काही संत महंतांचा हा मठ आहे. याच आश्रम परिसरात नुकतीच बांधलेली हनुमान, गणपती व दत्ताची छोटी मंदिरे आहेत. हा सर्व आश्रम परिसर इतका सुंदर, रमणीय व मनाला भुरळ घालणारा आहे कि येथून आपला पाय निघता निघत नाही. मात्र येथे असणाऱ्या माकडांपासून सावध राहावे लागते कारण काही वेळातच आपली शांतता भंग करण्यासाठी मोठ्या संख्येने ते हजर होतात. थोडीशी विश्रांती झाल्यावर आश्रमाजवळून जाणाऱ्या पायवाटेने कातळात कोरलेल्या सीता गुंफेकडे चालायला लागायचे. बालेकिल्ल्याच्या कड्यातच सीता गुंफा कोरलेली आहे. लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालाच्या भूमिकेत एक कुटुंबच उभे आहे असे वाटते. या लेण्यात राम, लक्ष्मण, हनुमान, भैरव, महिषासुरमर्दिनी आदी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. अंजनीमातेने याच गुहेत हनुमानाला जन्म दिला अशी श्रद्धा आहे.

आश्रम व सीता गुंफा परिसराची भटकंती करून पुन्हा हनुमान तळ्यापाशी परत यायचं आणि उजवीकडे जाणारी बालेकिल्ल्याची वाट चालू लागायची. पुन्हा सिमेंटच्या नव्याने बांधलेल्या पायऱ्या चढत बालेकिल्ल्याचा चढ चढायचा आणि पोहोचायचं अजून एका भव्य पठारावर. अंजनेरी किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणजे पुन्हा एक भलं मोठ पठारच. या पठाराच्या मध्यभागी अजून एक अंजनी मातेचे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती मात्र थोडी वेगळी आहे. येथे अंजनी मातेच्या मांडीवर बालहनुमान बसलेला दाखवला आहे. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. याच ठिकाणावरून हनुमंताने सूर्याकडे झेप घेतली होती असे इथले लोक सांगतात. बालेकिल्ल्यावर या मंदिरा व्यतिरिक्त तसे कोणतेही अवशेष नाहीत मात्र येथून सभोवतालचा परिसर फार सुंदर दिसतो. जवळच असणारा ब्रम्हगिरीचा डोंगर आणि त्याचा उपदुर्ग असणारा दुर्गभांडार डोळे भरून पहावा तो अंजनेरी वरूनच. ब्रम्हगिरीच्या मागे मग त्र्यंबकरांगेतले हर्षगड व बसगड हे किल्ले तर ब्रम्हा डोंगर आणि उतवडचा डोंगर दिसतात. दुसऱ्या बाजूस डांग्या सुळका, रांजणगिरी, गडगडा, बहुला, वाघेरा, सोनगीर, खैराई असे एक न अनेक दुर्ग दिसतात.

आता अंजनेरी किल्ल्याच्या इतिहास डोकावून पाहू. १५०८ ते १५५३ याकाळात गड अहमदनगरच्या बुरहान निजामाकडे होता. १६७० मधे मोरोपंत पिंगळे यांनी किल्ला स्वराज्यात आणला. तर पेशवाईत राघोबादादा पेशवे यांनी गडावरील विशाल सपाटी आणि हवामानाची भुरळ पडून मुक्कामासाठी एक वाडाच बांधला होता. मराठय़ांनंतर इंग्रज अधिकारीही गडावर राहण्यासाठी येत होते. गडावरील प्राचीन खोदकाम व अंजनेरीच्या पायथ्याशीं मोठ्या सुंदर देवळांचे असणारे समूह पाहता अभ्यासकांच्या मते राष्ट्रकूट - चालुक्यांच्या काळापासून हा गड नांदत असावा. या भागात राज्य करणाऱ्या गवळी राजांची ही राजधानी होती. त्यांच्या वीरसेन अभीर नावाच्या राजाचा उल्लेख एका शिलालेखात येतो. याशिवाय अंजनेरी परिसरात मिळालेल्या दोन ताम्रपटांतही या परिसरात किल्ल्यावर इसवी सन ७१० मध्ये हरिश्चंद्रवंशीय घराणे राज्य करत होते याचे उल्लेख आले आहेत.
पूर्ण किल्ला फिरायला आणि व्यवस्थित पाहायला अंजनेरी गावातून ६ ते ७ तास तरी लागतात. किल्ल्यावर जेवणाची व्यव्यस्था नाही पण आश्रमातील लोकांना विनंती केल्यास व आगाऊ कल्पना दिल्यास दोन तीन जणांची जेवणाची व्यवस्था करतात. रात्र मुक्कामासाठी भरपूर जागा उपलब्ध आहेत. नाशिकवरून त्र्यंबककेशवर कडे जाणारी कोणतीही गाडी या अंजनेरी फाट्यावर थांबते. 


तर असा हा प्राचीन अंजनेरी गड त्याच्या ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमीमुळे तसेच येथील आल्हादायक वातावरणामुळे एक दिवसाची सवड काढून नक्की अनुभवावा असाच आहे. सरते शेवटी एकच विनंती “पाऊलखुणा शिवाय मागे काही ठेऊन नका आणि सुखद आठवणीशिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि पश्चिम घाट हि आपली नैसर्गिक साधन संपत्तीने आहे. त्याला पडणाऱ्या प्लास्टिकच्या विळख्यातून वाचवा”.


© VINIT DATE – विनीत दाते


३० टिप्पण्या:

 1. एकदम झकास! नेमकी आणि ऊपयुक्त माहीती! विनीत आता ब्लॉगलेखन चालू राहू दे!

  उत्तर द्याहटवा
 2. hi vinit,
  aare kiti chan lihile aahe tu.. vachun kharach tithe ekda jaun yavese vatate aahe
  hi sagali mahiti mazyasathi ekdan navin aahe.
  keep it up dear..
  :)

  उत्तर द्याहटवा
 3. एकदम छान लिखाण. प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळाला. लिहीत रहा.

  उत्तर द्याहटवा
 4. एकदम छान लिखाण. प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळाला. लिहीत रहा.

  उत्तर द्याहटवा
 5. अप्रतिम! पुढील लेखनासाठी शुभेच्छा !

  उत्तर द्याहटवा
 6. क्या बात है विनीत. एक्कच नंबर लिहिलंयस. तपशीलवार तरी इंटरेस्टींग. फोटोही मजकुराला यथोचीत. येऊ दे अजून.

  उत्तर द्याहटवा
 7. विनीत,
  सर्वप्रथम ब्लॉग सुरु केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!
  फेसबुकवरच्या स्फुट लिखाणापेक्षा ब्लॉगचं संचित मूल्य जास्त!
  सुरेख दुर्गाची चित्रसफर घडवलीयेस.. भारीच!!!

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद साई. मला कायम ब्लॉग लिहण्यासाठी सांगणारा तू हि एक आहेस. त्यामुळे सक्तीच्या विश्रांतीचा फायदा घेऊन लिहायला सुरुवात केलीये

   हटवा
 8. विनीत,
  सर्वप्रथम ब्लॉग सुरु केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद!
  फेसबुकवरच्या स्फुट लिखाणापेक्षा ब्लॉगचं संचित मूल्य जास्त!
  सुरेख दुर्गाची चित्रसफर घडवलीयेस.. भारीच!!!

  उत्तर द्याहटवा
 9. उत्तम लिहिले आहेस विनीत.
  तुझ्या अनेक भटकंतीच्या लेखांच्या प्रति़क्षेत.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद सागर. तुमचे लेण्यांवरचे अनेक अभ्यासपूर्ण लेख वाचले आहेत. खूप माहिती मिळते त्यातून. माझा प्रयत्न हा महाराष्ट्रातील जरा थोड्या हटके किल्ल्यांबद्दल लिहण्यावर जास्त राहील.

   हटवा
 10. लिखाण आणि फोटो अप्रतिम!!! कव्हर फोटो तर लाजवाब!!!

  उत्तर द्याहटवा
 11. व्वा! सुरेख अन माहितीपुर्णही!छान, विनीत!

  उत्तर द्याहटवा