लहुगड_Lahugad

अमेरिका तसेच परदेशात नाताळच्या सणाला फार महत्व आहे. त्यामुळे डिसेंबर एंड म्हणजे आमच्या सारख्या IT वाल्यांना कामातून निवांतपणा मिळणारा महिना. याच सुट्टीचा फायदा घेत २०१४ च्या डिसेंबर महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातले तब्बल ८ किल्ले पाहीले होते. दोन वर्ष होत आली आता या औरंगाबाद जिह्याच्या भन्नाट ट्रेकला. तेव्हापासूनच मनात होत कि मराठवाड्यातील या किल्ल्यांबद्दल लिहावं आणि त्यातही खास करून फुलंब्री जवळच्या लहुगडाबद्दल सगळ्यात आधी. याच कारणही तसचं आहे मित्रांनो. तुम्ही अगदी “जो सब कूछ जानता है” वाल्या गुगलवर जरी “लहुगड” असा शब्द टाकला तरी तो सुद्धा तुम्हाला लोणावळ्या जवळच्या “अति”प्रसिद्ध लोहगडाचीच माहिती दाखवतो. चला तर मग, थोडक्या माहितीमुळे ऑफबीट वाटणाऱ्या पण अनेक कातळकोरीव अवशेषांनी नटलेल्या लहुगडाची एक भन्नाट सैर करू.


लहुगड हा अजिंठा डोंगररांगेला समांतर अश्या अजंठा-वेरूळ लेण्यांच्या डोंगररांगेत येणारा किल्ला आहे. जवळच असणारा देवगिरी सारखा किल्ला आणि प्रसिद्ध अजंठा लेण्यांच्या परिसरातून जाणाऱ्या पुरातन मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला असावा. गडावर असणारे गुहा आणि खांब टाक्यांचे खोदकाम पाहता हा गड ७/८ व्या शतकातील वाटतो. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ८०० मीटर असून पायथ्यापासून किल्ला फक्त ५०० मीटर उठवला आहे.


लहुगडचा डोंगर


किल्ल्याजवळ पोहोचताच दोन्ही बाजूने असणाऱ्या डोंगरांच्या खिंडीमधून लहुगड उठवलेला दिसतो. पायथ्याला वडाचे एक खूप जुने झाड आहे जिथून गडावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. प्रथम समोरच असणारे हनुमानाचे मंदिर पहायचे आणि “श्री क्षेत्र रामेश्वर, महाद्वार, लहुगड नांद्रा” असा मजकूर लिहलेल्या दगडी कमानीतून गडच्या पायऱ्या चढायला लागायचं. गड चढाईच्या सुरवातीलाच असणाऱ्या सिमेंटच्या पायऱ्या व डोंगरावर दिसणारे मंदिराचे आधुनिक बांधकाम पाहून हा किल्ला आपला पूर्ण भ्रमनिरास करणार असेच वाटते. मात्र किल्ल्यावर असणारे अनेक पुरातन व कातळकोरीव अवशेष आपली वाट पाहत असतात. थोड्या पायऱ्या चढून वर गेलो कि डाव्याबाजूस प्रथम एक पाण्याच्या टाकी सारखे खोदकाम दिसते. यात एक शिवलिंग व नंदी आहे. पुढे आणखी पायऱ्या चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते आणि उजव्या बाजूस झाडाखाली एक जुनी गणपतीची मूर्ती दिसते. या मूर्तीसमोर एका साधूचे “महाराज मंदिर” असून त्याच्या लगेच शेजारी गडावर जाणाऱ्या कातळकात कोरलेल्या पायऱ्या दिसतात.


किल्ल्याच्या पायथ्याला जिथून पायऱ्या सुरु होतात तिथे असलेली कमान व गणपतीची एक पुरातन पण सुबक मूर्ती
खडकातील टाकी वजा खोदकाम. येथे एक नंदी आणि शिवलिंग आहे.


आपण मात्र या कातळातील पायऱ्यांच्या वाटेने गडमाथ्यावर न जाता तसेच पुढे चालत राहायचे कि लगेच समोर येते लहुगडाचे प्रमुख आकर्षण असणारे गुहा मंदिर. याला रामेश्वर किंवा रुद्रेश्वर मंदिर असे म्हणतात. हे कोरीव खांब असणारे शिवमंदिर म्हणजे एक वेगळा अभ्यासाचाच विषय आहे. मंदिरासमोर अनेक जुन्या व छोट्या कोरीव मुर्त्या व्यवस्थित मांडून ठेवलेल्या दिसतात. गुहामंदिराचा कळस मात्र नुकताच सिमेंटचा नवीन बनवलेला आहे.कातळात कोरलेले सुंदर रामेश्वर गुहा मंदिर
गुहा मंदिराचे मोठ मोठाले खांब सुरु होण्याआधी डाव्या हाताला कातळात खोदलेले एक खांब टाके दिसते. टाक्यातील पाणी स्वच्छ दिसत असले तरी वटवाघुळामुळे पाण्याला प्रचंड घाण वास येतो. टाक्याला लागुनच मंदिराचे बाहेरील बाजूचे दोन गोलाकार खांब दिसतात. पुढे थोडी जागा सोडून व्दारपट्टीका तसेच दोन बाजूंना खांब व नक्षी कोरलेला दरवाजा आहे. दरवाजाच्या दोनही बाजूंना कातळातच खोदलेल्या खिडक्या आहेत. दरवाजातून आत गेल्यावर ४ कोरीव खांबावर तोललेला मंदिराचा सभामंडप दिसतो. आत नंदी समोर एका छोट्या गुहा वजा गाभाऱ्यात शिवपिंड असून तिला रामेश्वर नावाने ओळखतात. गाभार्‍या समोर व डाव्या बाजूला अशा आणखी दोन खोल्या आहेत.


गुहामंदिरा शेजारीच एक खांब टाके.
गुहामंदिराचे बाहेरील बाजूचे गोलाकार व नक्षीकाम केलेले खांब
व्दारपट्टीका तसेच दोन बाजूंना खांब व नक्षी कोरलेला मंदिराचा दरवाजा
गुहामंदिराचा ४ कोरीव खांबावर तोललेला सभामंडप


या गुहा मंदिरासमोरच अखंड कातळात कोरलेले व सुबक नक्षीकाम केलेले तुळशी वृन्दावनासारखे एक मंदिर आहे. या छोट्या मंदिरात गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. मागे गडावर राहणाऱ्या साधूंचा मठ, पाण्याची टाकी आणि एक स्वयंपाकघर आहे. हे सर्व पाहून परत मागे गडमाथ्यावर जाणाऱ्या कातळकोरीव पायऱ्याजवळ जायचे.


रामेश्वर गुहा मंदिरासमोरील अखंड कातळात कोरलेले तुळशी वृंदावनासारखे छोटे मंदिर


कातळात कोरलेल्या पायर्‍या चढत असताना उजव्या हातास प्रथम एक शैवालयुक्त हिरव्यागार पाण्याने भरलेले टाके लागते. हे टाके पाहून थोड्या आणखी पायऱ्या वर चढून गेलो कि समोर येतो किल्ल्याचा संपूर्ण कातळात कोरलेला छोटासा दरवाजा. हा डोंगर तासून तयार केलेला बोगदा वजा दरवाजा पार केला की पलीकडे डाव्या बाजूस एक गुहा कोरलेली दिसते. इतिहासकाळात याचा वापर बहुदा पहारेकर्यांच्या विश्रांतीसाठी देवडया म्हणून होत असावा. पुढे उजवीकडे वळण घेत काही पायऱ्या चढून आपला लहूगडाच्या माथ्यावर प्रवेश होतो.


गडमाथ्यावर जाणाऱ्या कातळातील पायऱ्या व गडाचा संपूर्ण कातळात कोरलेला बोगदे वजा दरवाजा
गडमाथ्यावर जाताना पायऱ्या शेजारी असणारे एक पाण्याचे टाके
दरवाज्या जवळ असणारी एक गुहा. बहुदा पहारेकर्यांच्या विश्रांतीसाठी बांधलेली खोली असावी


लहुगडाचा माथा तसा आटोपशीरच असला तरी या गड्माथ्याच्या जवळजवळ सगळ्याच बाजूंनी कातळात खोदलेली खांब टाकी आणि गुहा आहेत. माथ्यावर जिथे आपला गडप्रवेश होतो तिथे समोरच छोट्या छोट्या अनेक टाक्यांचा समूह नजरेस पडतो. यातील काही टाक्यात पाणी आहे तर काही टाकी नुसतीच झाडाझुडपांनी भरून गेलेली आहेत. गडाच्या या भागात जरा जपून फिरावे लागते कारण आपला पाय कधी कोणत्या टाक्यात जाईल आणि कपाळमोक्ष होईल सांगता येत नाही.


माथ्यावर ८ ते १० टाक्यांचा एकत्रित समूह

जमिनीत खोदलेले खांब टाके


किल्ल्याची उरलेली भटकंती करण्यासाठी गडमाथा डावीकडे ठेवत उजव्या बाजूने पुढे चालत जावे. थोड्याच वेळात आपल्याला जमिनीमधे कातळात खोदलेले एक मोठे खांब टाके लागते. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे पुन्हा काही पाण्याची टाकी आणि लगेचच आणखी एक भले मोठे खांब टाके आहे. या गडावर अशा प्रकारे किमान २० तरी पाण्याची टाकी नक्कीच असावीत.


किल्ल्यावर अशी अनेक खांब टाकी व गुहा आहेत

आता डोंगराला एक छोटा वळसा मारून थोडे खाली उतरले कि आपण येतो किल्ल्याच्या पिछाडीला. येथे कातळात कोरलेली एक प्रशस्थ गुहा आहे. हि गुहा मुक्कामास अगदी योग्य असून आत एकाच बाजूस एक खांब शिल्लक आहे. या एक खांबी गुहेत प्रवेश करण्यासाठी एक छोटा दरवाजा व बाजूला हवेसाठी ३ खिडक्या काढलेल्या दिसतात. या गुहेच्या थोड पुढे किल्ल्याचे मागील बाजूचे भग्न प्रवेशव्दार, जुजबी तटबंदी व खाली उतरणाऱ्या काही जुन्या दगडी पायऱ्यांची वाट दिसते. हि वाट अंजनडोह गावाकडे उतरते. आपण मात्र या वाटेने खाली न उतरता पुन्हा गुहे जवळ परत येऊन गुहेच्या शेजारून वर जाणाऱ्या कातळात खोदलेल्या पावटया चढायच्या.


किल्ल्याच्या पिछाडीला असणारी मुक्कामासाठी योग्य गुहा
हि एक खांबी गुहा खूप प्रशस्थ आहे
किल्ल्याच्या पिछाडीला असणारी दगडी पायऱ्यांची वाट दिसते. हि वाट अंजनडोह गावाकडे उतरते. 


वर चढून आलो कि समोरच एका खोलगट भागात कातळात मधोमध खोदलेले एक मंदिर दिसते. याला सीता न्हाणी असे म्हणतात. मंदिरात पाषाणात कोरलेली एक स्त्री सदृश मूर्ती ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूलाच पुन्हा एक खांब टाक कोरलेले दिसते. हे सर्व कातळ खोदुन तयार केलेले बांधकामाचे अवशेष पाहून मन थक्क होते. इथून उजवीकडे खाली उतरल्यावर कातळात कोरलेली अजून एक प्रशस्त गुहा दिसते. या गुहेपासून देखील एक वाट गड पायथ्याच्या हनुमान मंदिराजवळ जाते. येथे आपली गडफेरी पूर्ण होत असल्याने आपण या दुसऱ्या वाटेने गडाचा पायथा गाठू शकतो किंवा मग आल्यावाटेने रामेश्वर मंदिराजवळून खाली उतरायचे.


सीता न्हाणी
सीता न्हाणी जवळ असणारे मोठे खांब टाके
गडाच्या पिछाडीकडे असणारी अजून एक गुहा


लहुगड तसा आकाराने व चढाईला अगदीच सोपा असला तरी सर्व अवशेष नीट पाहण्यासाठी किमान दोन तासाचा कालावधी लागतो. गडावर खाण्याची कोणतीही सोय नाही मात्र पिण्याचे पाणी गडमाथ्यावरील काही टाक्यात किंवा रामेश्वर मंदिरासमोरील मठात उपलब्ध होऊ शकते. लहूगडाच्या डाव्याबाजूस असणाऱ्या डोंगराला चांभार टेकडी असे म्हणतात. या डोंगरात देखील २ गुहा (लेणी) खोदलेल्या आहेत. त्यामुळे थोडा वेळ शिल्लक असेल तर गडापायथ्या पासून फक्त १५ मिनिटात हि लेणी आपण पाहू शकतो. 


लहूगडाला लागून असणाऱ्या चांभार टेकडीवर असणारी गुहा 


लहुगडाच्या पायथ्याचे नांद्रे (लोहनांद्रे) हे गाव औरंगाबाद शहरापासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे लहुगडाला भेट देण्यासाठी प्रथम औरंगाबाद शहर गाठावे. औरंगाबाद-सिल्लोड-जळगाव या हमरस्त्यावर फुलंब्री हे तालुक्याचे गाव आहे. फुलंब्री ओलांडली की फक्त ४ किलोमीटर अंतरावर पुढे पालफाटा लागतो. इथून एक रस्ता उजवीकडे राजुरीकडे जातो. या राजुरी रस्त्यावर ६ किलोमीटर पुढे उजवीकडे जातेगावला जाणारा रस्ता धरायचा. जातेगाव पासून पायथ्याचे नांद्रे गाव ४ किलोमीटर आहे. नांद्रे गावातून एक छोटा कच्चा गाडी रस्ता ३ किलोमीटर पुढे असणाऱ्या लहुगडाच्या पायथ्यापर्यंत जातो.


तर असा हा कोणतेही ऐतिहासिक उल्लेख नसलेला लहुगड औरंगाबाद जिह्याच्या किल्ले भटकंतीत थोडी वाकडी वाट करून नक्कीच पहावा असा आहे. सरते शेवटी नेहमीचीच पण एक महत्वाची विनंती “पाऊलखुणा शिवाय मागे काही ठेऊ नका आणि सुखद आठवणी शिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि पश्चिम घाट हि आपली नैसर्गिक साधन संपत्तीने आहे. त्याला पडणाऱ्या प्लास्टिकच्या विळख्यातून वाचवा”.


@ VINIT DATE – विनीत दाते


Link for Picasa photo album on Lahugad

Comments

 1. मस्त. एकदम अपरिचित.

  ReplyDelete
 2. thanks for sharing it sirji!!!!

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Ajit for reading this blog. And whats this sirji. Just call Vinit.

   Delete
 3. Replies
  1. धन्यवाद समीर भाऊ

   Delete
 4. Bharpur Photo aani tyabarobar mahiti...gadferi chyach sequence madhe ...perfect !!!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद काकडे साहेब. घरबसल्या गड फेरी हाच तर उद्देश आहे.

   Delete
 5. Khoooop chan vinit ... photo aasalyane je vachato tyache visualization hote
  ... perfect style ..

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Pradnya. छान वाटलं ऐकून कि ही style आवडली.

   Delete
 6. विनीत....
  एकदम मस्त लेख व फोटो.

  ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

रांगणा_Rangana

पावनगड