भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग १ पासून पुढे ....


पहिल्याच दिवशी तब्बल ३५० किलोमीटरचा प्रवास झाल्याने आजच्या दिवसाची सुरवात थोडी उशिरानेच झाली. आजच्या दिवसाचे ध्येय होते रत्नागिरी शहराच्या उत्तरेकडे जयगड बंदरापर्यंत ५५ किलोमीटरचा प्रवास करणे आणि या मार्गावरील विविध पर्यटनस्थळे पाहणे. कोकणात ट्रीपला येऊन सुद्धा काल दिवसभरात एकदाही समुद्र न दिसल्याने आमच्या कन्येचाही चांगलाच मूड ऑफ झाला होता. त्यामुळे आज सगळ्यात आधी अन्विताला समुद्र दर्शन घडवायचं आणि तिला मनसोक्त समुद्राच्या मातीत खेळू दयायचं असा ठराव पास झाला. आता आमचं मन देखील अन्विता प्रमाणेच अथांग समुद्र, स्वच्छ वाळूचे किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, लाल माती, जांभ्या दगडाची टुमदार कौलारू घरं, वळणावळणाचे रस्ते, गर्द झाडी व आमरायांनी सजलेलं कोकण पाहण्यासाठी आसुसलेलं होत. त्यामुळे मुक्कामाच्या हॉटेलमधेच पोटभर नाष्टा करून सकाळी बरोबर ९.३० वाजता हॉटेल सोडलं.

रत्नागिरी शहरातून जयगडला जाण्यासाठी रस्त्यांचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक रस्ता म्हणजे रत्नागिरी ==> आरे-वारे ==> नेवरे ==> भांडारपुळे ==> गणपतीपुळे ==> मालगुंड ==> जयगड असा सागरी महामार्ग ज्याला महाराष्ट्राचा कोस्टल हायवे म्हणतात. तर दुसरा रत्नागिरी ==> हातखंबा फाटा ==> निवळी फाटा ==> चाफे ==> खंडाळा ==> जयगड असा नेहमीचा थेट जाणारा रस्ता. यापैकी पहिला रस्ता पर्यटकांसाठी निश्चितच उत्तम कारण हा संपूर्ण रस्ता कधी समुद्राच्या अगदीच जवळून तर कधी डोंगरावरून छोटी छोटी वळणे घेत समुद्रकिनार्‍याचे विलोभनीय दृष्य दाखवतो. त्यामुळे रत्नागिरीवरून जयगडकडे जाताना या सागरी महामार्गाने जावे आणि परतीचा प्रवास अंधार पडल्यावर दुसऱ्या रस्त्याचा पर्याय ठेऊन थेट रत्नागिरी शहर गाठावे.


आरे बीच
आरे बीच
आरे बीच


रत्नागिरी शहरातून जयगड-गणपतीपुळ्याकडे जाण्यासाठी, अलीकडेच काही वर्षांपूर्वी आरे-वारे ह्या दोन गावांमधून जाणारा नवीन सागरी महामार्ग झाला आहे. एका बाजूने घाट आणि दुसऱ्या बाजूने समुद्रकिनारा असे सहसा न पाहिलेले "कॉम्बिनेशन” ज्या पर्यटकांना अनुभवायचे आहे त्यांनी आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळ्याला नक्कीच जावे. रत्नागिरी शहरापासून फक्त १२ किलोमीटर अंतरावर आरे-वारेचा समुद्रकिनारा आहे. रत्नागिरी शहरातून शिरगाव ==> काळबादेवी असा प्रवास करत पुढे गेल्यानंतर अथांग समुद्र सुरु होतो. येथेच एक मोठा ब्रिज आहे जो, आरे आणि वारे या दोन गावांना जोडतो. एकदा का या आरे-वारे रस्त्याला लागलो कि गाडीचा स्पीड आपोआपच कमी होऊ लागतो, कारण डाव्या हाताला दिसत असतो अथांग समुद्र आणि नजरेसमोर असतो समुद्राच्या बाजूने डोंगरातून जाणारा घाट रस्ता. दूरवर पसरलेला समुद्र, पांढरीशुभ्र रेती, आजूबाजूला नारळाची आणि सुरुची बने असा अस्सल कोकणातील निसर्ग सौंदर्याचा अनुभव येथे नक्कीच मिळतो. त्यामुळे येथे प्रत्येक वळणावर गाडी थांबवून हे निसर्गसौंदर्य कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहवत नाही.


आरे-वारे रस्ता
वारे बीच
वारे बीच
आरे-वारे रस्ता


आरे-वारे मार्गानेच पुढे गेल्यावर काही अंतरावरच काजीरभाटी गावाचा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा बाकी समुद्रकिनाऱ्यासारखाच पण अजून तरी पर्यटकांच्या "वक्रदृष्टी" पासून थोडा दूर त्यामुळे अतिशय शांत आणि स्वच्छ. अश्या एखाद्या सुंदर आणि जवळ जवळ निर्मनुष्य बीचवर समुद्रकिनाऱ्यावरून चालत चालत, लाटांचा धीरगंभीर आवाज कानात साठवत दूरवर एक फेरफटका मारण्यात काही वेगळीच मजा असते. येथील निळ्याभोर समुद्रकिनारी असलेली सुरुची झाडे आणि त्यामधून वाहणारा समुद्रावरचा थंड वारा मन प्रसन्न करून टाकतो. आम्ही उभयतांनी मग अशा सुंदर बीचवर छोट्या वॉकचा आनंद लुटला तर आमच्या अन्विताने मनसोक्त मातीत खेळण्याची तिची इच्छा पूर्ण करून घेतली.


काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
काजीरभाटी बीच
समुद्रामधलं सौंदर्य
काजीरभाटी बीच


काजीरभाटी बीचवर बराच वेळ घालवल्यानंतर आम्ही पुढे गणपतीपुळ्याकडे निघालो. पुन्हा तसाच वळणावळणाचा रस्ता आणि शेजारी अथांग पसरलेला समुद्र असे सुंदर दृश्य पहात भांडारपुळे गाव ओलांडून थोड्याच वेळात गणपतीपुळ्यात पोहोचलो. आता मात्र इतक्या वेळ शांत असणारा रस्ता वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीत हरवून गेला. माझ्या लहानपणापासून मी गणपतीपुळ्याला अनेक वेळ आलोय. कधीकाळी निळाशार समुद्र, चमचमती पांढरी वाळू, नजर पोहोचणार नाही असा लांबलचक सुंदर किनारा आणि त्यातच डोंगराच्या कुशीत विसावलेले शांत मंदिर अशी ओळख असणारे गणपतीपुळे हल्ली एक पर्यटन स्थळ म्हणून फारच नावारूपाला आलंय. त्यातच सन २००५ च्या सुमारास आलेल्या 'नवरा माझा नवसाचा' या पिक्चरचे शुटींग या गणपतीपुळे मंदिराच्या परिसरात झाले आणि या गावाला व येथील मंदिराला एक वेगळीच प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे सध्या गणपतीपुळे म्हणजे अतिप्रसिद्ध झालेले पर्यटकांचे एक तीर्थक्षेत्रच.

काजीरभाटी बीच डोंगरावरून
आरे-वारे ते गणपतीपुळे मार्गावर लागणारी एक खिंड
भांडारपुळे गावातील एक दृश
भांडारपुळे बीच डोंगरावरून

श्री क्षेत्र गणपतीपुळे म्हणजे धार्मिकतेला पर्यटनाची जोड लाभलेले क्षेत्र. पाठीशी हिरव्यागार डोंगराची भक्कम साथ तर पुढय़ात अफाट निळा अरबी समुद्र. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ४०० वर्ष जुने गणपती मंदिर हे गणपतीपुळ्याचे प्रमुख वैशिष्ठ्य. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे असे मानतात. पुळणीवर प्रकट झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभलेले हे गाव असून किनाऱ्याला लागूनच सुमारे तीनशे फूट उंचीची आणि एक किलोमीटर परिघाची टेकडी आहे. या टेकडीच्या पायथ्याशी समुद्राकडे तोंड करून पश्चिम दिशेला गणपतीचे मंदिर आहे. मंदिर डोंगराच्या एका बाजूला असल्याने गणपतीला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. साधारण दीड किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी एक शांत खेडं होतं तर पूर्वीचं मंदिर म्हणजे एक छोटसं कौलारू घर. पश्चिमेला मावळणार्‍या सूर्याचे किरण या मूर्तीवर पडत असत असं सांगतात. आता मात्र इथे भव्य मंदिर उभारले गेले आहे.

गणपतीपुळ्याचे प्रसिद्ध गणेश मंदिर




गणपती मंदिरावरील सुंदर मूर्त्या


मंदिरासमोरच गणपतीपुळ्याचा समुद्रकिनारा आहे. पण हा समुद्र जलक्रीडेसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. आतापर्यंत कितीतरी पर्यटकांना त्याने गिळंकृत केलेले आहे. कृपया या बीचवर गेल्यास खोल पाण्यात उतरू नका. ज्यांना पोहता येत नाही, त्यांनी विशेष काळजी घ्या. मंदिर प्रशासनाने अशा घटना घडू नयेत म्हणून ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. शासनाने लाईफ गार्ड नेमलेले आहेत तरी देखील आपण स्वतःच आपली काळजी घ्यावी.

गणपतीचे दर्शन घेतले आणि समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची तोबा गर्दी पाहून समुद्र किनाऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला. आता आमचे पुढचे ठिकाण होते गणपतीपुळ्यातलेच "प्राचीन कोकण" नावाचे अनोखे म्युझियम. हे म्युझियम मी आठ वर्षांपूर्वी जेव्हा गणपतीपुळ्याला गेलो होतो तेव्हा प्रथम पहिले होते. म्युझियम खूप सुंदर आहे आणि अगदी पुन्हा पुन्हा पाहावे असे. त्यातच यावेळी सौ, आई आणि अन्विता बरोबर असल्याने त्यांच्यासाठी पुन्हा एकदा पाहणे गरजेचेच होते. गणपतीपुळे गावात आणि मंदिर परिसरात फिरताना अनेक ठिकाणी "प्राचीन कोकण" असे जाहिरात असणारा बोर्ड लावलेला दिसतो आणि येथेच आपली या ठिकाणा बद्दलची उत्सुकता वाढते. 


महाराष्ट्र व देश-विदेशातील पर्यटकांना ५०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन कोकणाची माहिती व्हावी व कोकणची पुरातन संस्कृती कळावी या हेतूने कोकण टुरिझम डेव्हलपमेंटने गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण उभारले आहे. कोकणात पर्यटन विकास होत असताना इथे अत्याधुनिक सोयी उपलब्ध होण्याबरोबरच येथील सामाजिक, भौगोलिक, ऐतिहासिक वैशिष्टय़े लोकांसमोर जायला हवीत, या हेतूनेच ‘प्राचीन कोकण’ या अनोख्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या मोर्डे गावातील पदवीधर तरुण "वैभव सरदेसाई" यांच्या मनात महाविद्यालयीन जीवनापासून कोकणच्या संस्कृतीची महाराष्ट्राला व देशविदेशातील पर्यटकांना, तसेच स्थानिक तरुण पिढीला ओळख करून देण्यासाठी काही तरी वेगळे काम करण्याचा ध्यास होता. याच ओढीतून त्यांनी के.टी.डी.आर.सी.ची स्थापना करून या माध्यमातून गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण हा भव्य प्रकल्प उभा केला. गणपतीपुळे देवस्थानापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर ३ एकराच्या भव्य परिसरात उभारलेला प्राचीन कोकण हा प्रकल्प नक्कीच पाहण्यासारखा आहे. 

काळाचे प्रतिक असणारी गुहा, शिलालेखामधे कोरलेले कवि माधव यांचे कोकणगीत आणि कोकणाचे जनक भगवान श्री परशुराम यांची प्रतिकृती
३० ते ३५ फुट उंच मचाण, नदी किंवा ओढा पार करण्यासाठी साकव आणि दशावतारात सोंगे घेण्यासाठी वेगवेगळे मुखवटे

गुहा-भुयारे हे ऐतिहासिक कोकणाचे खास वैशिष्टय़ आहे. त्यामुळे प्राचीन कोकणाच्या प्रवेशद्वाराची रचना देखील भल्यामोठय़ा गुहेतून केली असून, क्षणभर ती कृत्रिम आहे यावर विश्वासच बसत नाही. ही गुहा वर्तमानकाळाचे प्रतीक आहे आणि आतील बाजूस आहे ५०० वर्षांपूर्वीचा भूतकाळ. येथून पुढे पाहायला मिळते ते ५०० वर्षांपूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांचे समाजजीवन, खानपान पद्धती, ग्रामव्यवस्था, बारा बलुतेदार व्यवसाय, त्यांची घरे, वेशभूषा आदी खास कोकणातील चालीरीती. लाईफसाईझ मुर्त्यांमधून सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे. सोबत असलेल्या गाईडकडून माहिती ऐकत गावात फेरफटका मारता येतो. येथे एक नक्षत्र बाग आहे ज्यामधे २७ नक्षत्रांना जोडून २७ झाडे दिली आहेत. प्रत्येक जन्मनक्षत्राचा एक आराध्य वृक्ष असतो, त्यानुसार ही नक्षत्र बाग लावण्यात आलेली आहे. भेट देणाऱ्यांनी आपापल्या जन्मनक्षत्रानुसार कुठला आराध्य वृक्ष आहे ते पहायचे. त्यांचे संरक्षण व संगोपन केल्यास आपल्याला ज्ञान, आरोग्य व संपन्नता मिळते असे प्राचीन ग्रंथात उल्लेख आहेत. ती झाडे प्राचीन कोकणामधे पाहायला मिळतात. येथे सुमारे १५० प्रकारची औषधी झाडे लावलेली आहेत. 

खोतांचे विशिष्ठ कोकणी घर, नाभिक आणि कोकणातील ग्रामदेवता “वाघजाई” देवीचे मंदिर

‘प्राचीन कोकण’ येथे कोकणातले सांस्कृतिक वैभव दृष्टिपथास पडते. खोतांच्या घराची रचना, कोळी बांधवांची मासे पकडण्याची खोबणी, छत्रीसारखे वापरले जाणारे इर्ले, कपडे वाळविण्यासाठीची उचल, भातुकली अशा काळाच्या पडद्याआड जाणाऱ्या वस्तूंचं दर्शन या प्रदर्शनात घडतं. गावातील बारा बलुतेदारांचं जीवन उत्तमरितीने मांडतांना त्याची माहितीदेखील तेवढ्याच रोचक पद्धतीने इथले गाईड सांगत असतात. कुंभार, तेली, सुतार, लोहार, न्हावी, सोनार यांचे जीवन जवळून पाहण्याचा अनुभव रोचक असाच असतो. त्याचवेळी त्या काळातील संस्कृती स्पष्ट करणाऱ्या अनेक वस्तू पहायला मिळतात. स्वयंपाकघरातील जुन्या प्रकारचे लाकडाचे पुरणयंत्र, मोदकपात्र, घंगाळे, उखळ आणि स्वयंपाकघराच्या बाजूला असलेल्या पाणवठ्यावर आपली नजर खिळते. 

बारा बलुतेदारांपैकी लोहार, सुतार, वाणी आणि कुंभार
बारा बलुतेदारांतील सोनार, कासार, बांबूचे काम करणारे कामगार आणि एक कोकणी स्वयंपाकघर


पर्यटकांना कोकणातील वैशिष्ट्य आठवणींच्या रुपात घरी नेता यावे यासाठी प्रकल्पाच्या शेवटी खास विक्रीचे दालन आहे. त्यात कोकणची वेगळी चव असणारे पदार्थ, सावंतवाडीची लाकडी खेळणी, शंखापासून बनविलेल्या वस्तू अशी विविध प्रकारची खरेदी करता येते. नुकतेच समुद्रकिनाऱ्यातील मत्स्यसंपत्तीचे नवे दालन येथे सुरू झाले आहे. येथील शंख-शिंपल्यांचे प्रदर्शन तर जरूर भेट द्यावे असेच. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी www.prachinkonkan.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

‘प्राचीन कोकण’ बघताना दोन-अडीच तासांचा वेळ कसा निघून गेला ते कळालेच नाही. दुपारचे ३.१५ वाजल्याने भुकेची चांगलीच जाणीव होऊ लागली. मग गणपतीपुळ्याच्याच एका हॉटेलमधे पोटातल्या कावळ्यांना शांत करून मालगुंडच्या दिशेने गाडी वळवली. 

मालगुंड! गणपतीपुळ्यापासून फक्त ३ किलोमीटर अंतरावर असणारं कोकणातील एक शांत, सुंदर आणि आटोपशीर असं समुद्रकिनारी वसलेलं गाव. मालगुंडची खास ओळख म्हणजे “जुने जाऊ द्या मरणालागुनी” असे म्हणत मराठी कवितेच्या इतिहासात एक क्रांतिकारक पर्व उभे करणारे युगप्रवर्तक कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांचं जन्मगाव. दि. ७ ऑक्टोबर १८६६ साली ज्या घरात कवी केशवसुत यांचा जन्म झाला त्या घराचे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मदतीने स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ८ मे १९९४ रोजी या स्मारकाचे उद्घाटन झाले. केशवसुतांच्या वापरातील अनेक वस्तूंच्या सहाय्याने, तसेच अनेक दुर्मिळ फ़ोटो वापरून या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. मूळ घर अगदी जसे आहे तसेच ठेऊन बाहेर सुंदर वाटिका तयार केलेली आहे आणि त्यात संगमरवराच्या फरशीवर केशवसुतांच्या कविता शिल्पित करून जिवंत करण्यात आल्या आहेत. 


कवी कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांचे मालगुंड गावातील घर
केशवसुत यांच्या कविता

आम्ही कोण?, नवा शिपाई, एक तुतारी द्या मज आणुनि, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही केशवसुतांच्या उल्लेखनीय कविता येथे बघायला मिळतात. या वास्तूत ग्रंथालय, अभ्यासिका, वाचनालय असे विविध कक्ष आहेत. एका स्वतंत्र दालनात महाराष्ट्रातील काही प्रतिभावंत कवींची माहिती, सुंदर स्केचेस आणि प्रत्येकाची एक उत्कृष्ट कविता येथे पाहायला मिळते. स्मारक भवनाच्या मागील बाजूस खुला रंगमंच असून तेथे साहित्यिक कार्यक्रम होत असतात. एखाद्या कवीचे अशा तऱ्हेचे उभारलेले हे महाराष्ट्रातील सध्यातरी एकमेव स्मारक असावे असे वाटते. त्यामुळे गणपतीपुळ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हि ठिकाण नक्कीच चुकवू नये असे आहे.



मालगुंड गावातील दुसरी बघण्यासारखी गोष्ट म्हणजे अलीकडेच सुरु झालेले छोटेखानी मत्स्यालय. कोण्या एका खाजगी कंपनीने "फिश वर्ल्ड" नावाने हे मत्स्यालय मालगुंड गावात सुरु केले आहे. मोठ्या माणसांसाठी ३०, तर लहान मुलांसाठी १० रुपये एवढे तिकीट काढून या छोट्या फिश वर्ल्डला भेट देता येते. येथे समुद्री घोडा, स्टार फिश, समुद्री साप, टायगर फिश, कॅट फिश, गोबरा असे अनेक सागरी व गोड्या पाण्यातील मासे पाहता येतात. लहान मुलांना अगदी जवळून हे रंगीबेरंगी समुद्री जीवन पाहता येत असल्याने येथेही नक्की भेट द्यावी.





केशवसुतांचे स्मारक आणि हे फिश वर्ल्ड पाहण्यात संध्याकाळचे ५ कधी वाजले ते कळालेच नाही. मग मालगुंड गावातच एका छोट्या हॉटेलात दुपारचा चहा घेऊन फ्रेश झालो आणि जयगडकडे जाणारा रस्ता धरला. आता पुढचे ठिकाण होते ते म्हणजे जयगड जवळील नांदिवडे येथील गूढ परिसर लाभलेले प्राचीन कऱ्हाटेश्वर मंदीर. 


कऱ्हाटेश्वर मंदीर आणि परिसर

मालगुंडवरून जयगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जयगडच्या थोडे अलीकडे जेएसडब्ल्यु (जिंदाल स्टील वर्क्स) यांचा भव्य दिव्य प्रकल्प उभा आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडे एक रस्ता पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिराजवळ जातो. आपले वाहन थेट मंदिरापर्यंत अगदी सहजपणे नेता येते. कऱ्हाटेश्वर हे भगवान शंकराचे देवस्थान आहे. जुन्या लाकडी बांधणीचं आणि कौलारू छपराचं कऱ्हाटेश्वराचं मंदिर समुद्र किनाऱ्यावरील एका मोठ्या खडकावर बांधले असल्याने एका तुटक्या कडय़ावर उभे असल्यासारखे भासते. या मंदिराला शांत आणि तितकाच गूढ परिसर लाभलेला आहे. मंदिर परिसरात दाखल होताच समुद्राची गाज कानावर पडते. शंकराचे दर्शन घेऊन मंदिरामागे असलेल्या साठ-सत्तर पायऱ्या उतरून गेल्यावर आपण समुद्राजवळ पोहोचतो. येथे एक आश्चर्य दडलेले आहे. एकीकडे खऱ्या पाण्याने भरलेला अथांग समुद्र असताना दुसऱ्या बाजूस चक्क गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. गोमुखातून पडणारे पाणी अतिशय नितळ, गार आणि चवीला गोड आहे. समोर दिसणारा निळा फेसाळणारा समुद्र, नारळीची झाडे, येथे मिळणारा शांत एकांत, खडकावर आदळणाऱ्या लाटांचा खेळ हे सारे पाहण्यासाठी या प्राचीन मंदिराला अवश्य भेट द्यावी.


समोर समृद्र असून देखील या गोमुखातून गोड पाण्याची संततधार पडत असते

कऱ्हाटेश्वर मंदिराजवळून सुंदर असा सूर्यास्त पाहिला आणि पुढे आजच्या शेवटच्या ठिकाणाकडे निघालो. गणपतीपुळे-जयगड रस्त्यावर मालगुंड सोडल्यानंतर थोड्याच अंतरावर उजव्या हातास एक सुंदर आणि वेगळ्या आधुनिक धाटणीचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. हे आहे जिंदाल ग्रुपने जयगड परिसरात बांधलेले "जय विनायक मंदिर". हे मंदिर कऱ्हाटेश्वरकडे जाण्याच्या अगदी मार्गावरच असले तरी कऱ्हाटेश्वर देवस्थान थोडे आडवाटेला असल्याने प्रथम शंकराचे दर्शन घ्यायचे आणि मगच मुलाकडे म्हणजेच गणपतीबाप्पाकडे यायचे. जय विनायक मंदिर म्हणजे विस्तीर्ण परिसर, सुंदर बाग, कारंजे, विशिष्ठ रेखीव बांधकाम आणि अतिशय प्रसन्न अशी गणेश मूर्ती. हे मंदिर पॅगोडा पद्धतीने बांधलेले आहे. मंदिरात सुंदर अशी ब्राँझची गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचे वेगळ्या पद्धतीचे आर्किटेक्चर, सुंदर रचना असलेल्या बागा आणि मग प्रसन्न करणारे वातावरण यासाठी या मंदिराला जाता जाता धावती भेट द्यायला हरकत नाही.


जय विनायक मंदिर, जयगड
जय विनायक मंदिर, जयगड

सुंदर गणेश मूर्ती

रात्री लाईटमधे प्रकाशमान झालेले मंदिर पाहण्यासारखे असते

गणपतीपुळय़ाच्या परिघात अनेक आडवाटेवरची प्रेक्षणीय स्थळे दडलेली आहेत. यातील जयगड परिसरात आम्ही भेट दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त जयगडचा किल्ला, जयगड बंदर, ब्रिटिशकालीन जयगडचा दिपगृह आणि कोळीसरे येथील लक्ष्मीकेशव मंदिर अशी इतर अजून काही ठिकाणे पाहता येतील. मी पूर्वी या ठिकाणांना भेट दिली असल्याने तसेच वेळे अभावी ही ठिकाणे यावेळी पाहणे टाळले. 

आता अंधार झाल्याने परतीचा प्रवास सुरु केला. रत्नागिरी शहर गाठण्यासाठी मालगुंड ==> गणपतीपुळे ==> आरे-वारे असा थोडा निर्मनुष्य सागरी महामार्ग न वापरता थेट जयगड ==> खंडाळा ==> चाफे ==> निवळी फाटा ==> हातखंबा फाटा असा प्रवास करत बरोबर रात्री ८.३० वाजता दुसऱ्या दिवसाची सांगता केली. आजचा एकूण प्रवास झाला होता १२५ किलोमीटर.

क्रमश:

@ VINIT DATE – विनीत दाते

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग ३ .....


पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.






Comments

  1. awaiting 3rd part. adivare is on my list for long now.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Dhuri sir. yup it will be posted soon

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद योगेश भाऊ

      Delete
  3. धन्यवाद मुकुंदा!

    ReplyDelete
  4. मस्त लिखाण विनित! सुरेख छायाचित्रे, सुरेख मांडणी.

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana