विलासगड_Vilasgad

सांगली हा पश्चिम महाराष्ट्रातील एक सधन असा जिल्हा. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावर होणाऱ्या शेतीमुळे हा प्रदेश खूप हिरवागार बनला आहे. कोकणाच्या सह्याद्रीच्या सीमेला असलेल्या सांगली जिल्ह्यात प्रचितगडासारखा दुर्गम दुर्ग तर आहेच पण त्याचबरोबर मच्छिंद्रगड, विलासगड, बहादूरवाडी, बागणी, गणेशदुर्ग, मिरज, कोळदुर्ग, भूपालगड, जुना पन्हाळा आणि रामदुर्ग असे छोटे भूदुर्ग आणि गिरिदुर्ग देखील आहेत.


विलासगड किल्ला आणि त्याच्या मध्यावरचे मल्लिकार्जुनाचे मंदिर

पुणे-बंगळूर या राष्ट्रीय महामार्गालगत कराडनंतर पूर्वेकडे विलासगड नावाचा एक दुर्लक्षित किल्ला आहे. पण हा किल्ला डोंगरावरील मल्लिकार्जुन मंदिरामुळे परिसरात मल्लिकार्जुनगड म्हणूनच ओळखला जातो. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारा विलासगड समुद्रसपाटीपासून साधारण ८०० मीटर उंचीवर आहे. या किल्ल्यावर किल्ला म्हणून असणारे तटबंदी, बुरुज व दरवाजे असे कोणतेही अवशेष नसले तरीही हा गड पाहण्यासारखा आहे ते त्यावरील एक दोन जुन्या वास्तू व मल्लिकार्जुन मंदिराच्या पुरातन लेण्यांमुळे.


गडाकडे जाण्याऱ्या कातळकोरीव पायऱ्या

विलासगडाला जाण्यासाठी प्रथम येडेनिपाणी हे पायथ्याचे गाव गाठावे लागते. गडावरील मल्लिकार्जुन देवस्थानाचा 'क वर्ग' पर्यटन क्षेत्रांत समावेश झाल्यामुळे येडेनिपाणी गावाच्या मागच्या बाजूने एक डांबरी सडक पार गडाच्या पायथ्यापर्यंत गेली आहे. रस्ता संपला कि गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरवातीला बांधीव सिमेंटच्या पायऱ्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पायऱ्यांच्या बाजूने लोखंडी रेलिंग देखील लावलेले आहे. या सिमेंटच्या नवीन पायऱ्या संपल्या की सुरु होतो तो चक्क खडकात खोदून तयार केलेल्या एकसंध पायऱ्यांचा मार्ग. या खडकातील एकसंध पायऱ्या पाहून मन थक्क होतं आणि इथेच या डोंगराच्या प्राचीनत्वाची साक्ष मिळते. पायऱ्यांची हि नागमोडी वाट साधारण अर्धा ते पाऊण तासात आपल्याला गडाच्या थोडे खाली असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरात घेऊन जाते.


दगडी तटबंदीने असलेले मल्लिकार्जुनाचे मंदिर


मंदिरापाशी पोहोचल्यावर प्रथम उजव्या बाजूस मंदिरापासून थोड्या वेगळ्या असणाऱ्या दोन ओवऱ्या पहाव्यात. दोन कमानी व खांब असणारी हि हिंदू स्थापत्यशैलीतील वास्तू अगदी डोंगरकड्याला लागून बांधलेली आहे. ह्याच वाटेवर पुढे गडावरील एकमेव असे पिण्याच्या पाण्याचे गंगा टाके आहे. हे सर्व अवशेष पाहून पुन्हा मंदिराकडे परत यावे.


मंदिराशेजारी असणारी एक हिंदू वस्तूशैलीतील एक वास्तू

मल्लिकार्जुन मंदिराच्या आवाराला संपूर्ण दगडी तटबंदी केलेली दिसते आणि याच तटबंदीत मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील आहे. दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला एक ओसरी असून त्यावर पत्र्याचे छत घातलेले आहे. ओसरीला लागून डोंगरकड्यालगत काही ओवऱ्या बांधलेल्या असून गडावरील मुक्कामासाठी ही योग्य जागा आहे.


मंदिराचे प्रवेशद्वार
मंदिर आवारातील काही ओवऱ्या आणि बांधकाम

मंदिराच्या मुख्य दरवाज्यासमोर एक छोटे मंदिर आहे. या मंदिरामधे श्री विष्णूची एक सुबक अशी पाषाणातील मूर्ती आहे. या मंदिराला लागूनच उजव्या हातास एक मोठी ओवरी दिसते. या ओवरीला एक दरवाजा असून दरवाज्यामधून आत गेल्यावर कळते कि येथे दोन प्रचंड मोठाल्या लेण्या खोदलेल्या आहेत. या लेण्यांचा भार तोलुन धरण्यासाठी दोन खांब आहेत. त्यापैकी एका खांबावर थोडे जुने नक्षीकाम आढळते.


कातळात खोदलेल्या दोन गुहा 

या ओवऱ्यांना लागुनच मल्लिकार्जुनाचे मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिराचा दर्शनी भाग हेमाडपंती पद्धतीने बांधलेला दिसतो. हे मंदिर म्हणजे एक मोठे लेणेच असून यामध्ये चक्क सहा कोरीव खांब आहेत. या खाबांच्या छताजवळ उलटा कुंभ कोरलेला आहे. या मोठ्या लेण्यामध्ये आत एक छोटा विहार असून तेथे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. लेण्यात अजून इतरही दोन तीन छोटे विहार असून लेण्यांमधे खांबांजवळ काही कोरीव मुर्त्या ठेवलेल्या आहेत. मुख्य मंदिराचे हे सर्व कोरीवकाम पाहून मंदिर प्रांगणात परत यावे.


मल्लिकार्जुनाचे मुख्य मंदिर. या मंदिराचा दर्शनी भाग हेमाडपंती पद्धतीने बांधलेला दिसतो

मुख्य मंदिराच्या गुहा लेण्यातील कोरीव खांब

या मोठ्या लेण्यातील खांबावर उलटा कुंभ कोरलेला आहे
गुहा मंदिराचा कातळकोरीव दरवाजा आणि गणेशाची सुंदर मूर्ती


मंदिराच्या प्रांगणामध्ये मुख्य लेण्याशेजारी छोटी अर्धवट खोदलेली लेणी आहेत. या लेण्यात पुजाऱ्यांचे बरेचसे समान ठेवलेले आढळते. मंदिराच्या आवारात या व्यतिरिक्त एक मोठी दीपमाळ, तुळशी वृंदावन व एक स्तंभ देखील आहे. मंदिर परिसर खूप स्वच्छ ठेवलेला असला तरी रंगरंगोटीमुळे अनेक जुने कोरीवकाम आता नष्ट होण्याचा मार्गावर आहे.


मंदिर आवारातील एक दगडी दीपमाळ, तुळशी वृंदावन व स्तंभ 

मल्लिकार्जुन मंदिराचे हे सर्व अवशेष पाहून मंदिराच्या डाव्या बाजूने गड माथ्यावर जाणारी वाट धरावी. या वाटेवर पुढे गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. याच पायऱ्यांच्या जवळ चुन्याच्या घाण्याचे एक चाक अर्धे जमिनीत गाडलेले दिसते. येथेच पुढे उजव्या हातास अर्धवट खोदलेल्या दोन लेण्या देखील दिसतात. आता येथून फक्त दहाच मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो.


अर्धे गाडले गेलेले चुन्याच्या घाण्याचे चाक

किल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार


गडमाथ्यावर समोरच एक पांढऱ्या रंगाची जुनी तर त्याच्या अगदी शेजारी एक नवीन रंगवलेली मशीद दिसते. जुन्या मशिदीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या व इतर काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. या जुन्या मशिदी शेजारीच चौथऱ्यावर एक भग्न मंदिर आहे. मंदिरावर कृष्ण मंदिर असे लिहलेले आहे मात्र जुन्या मशिदीमध्ये असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बहुदा या जुन्या मंदिरातल्या असाव्यात असे वाटते. या श्रीकृष्ण मंदिराच्या चौथऱ्यात एक मोठा खड्डा आहे व या खड्ड्यात उतरण्यासाठी एका ठिकाणी पायऱ्या देखील आहेत. या खड्डयामध्ये डाव्या व उजव्या बाजूला कोनाडे असून पूर्वी याचा उपयोग बहुदा मंदिराचे साहित्य ठेवण्यासाठी अथवा धान्यकोठार म्हणून केला जात असावा.


गडमाथ्यावरील एक जुनी आणि नवीन मशीद/दर्गा
जीर्ण व पडझड झालेले श्री कृष्ण मंदिर


आता आपला मोर्चा नवीन मशिदीकडे वळवायचा. आपण मशिदीजवळ पोहोचतो तोच एक दगडी बांधीव वास्तू आपली नजर तिकडे चटकन आकर्षित करते. गडाचे गडपण दाखवणारी इतिहासकाळातील ही एकमेव वास्तू आज गडावर उभी आहे. त्यामुळे आपली पावले नकळतच तिकडे वळतात. या वास्तूच्या दोन्ही दरवाज्याच्या कमानी अजूनही शाबूत आहेत. आत दगडी जोती देखील दिसतात.


गडाचे गडपण सिद्ध करणारी एकमेव ऐतिहासिक वास्तू
हि वास्तू आदिलशाही शैलीतील वाटते. वास्तूच्या दगडी कमानी खूप सुंदर आहेत.

या ऐतिहासिक वस्तूच्या जवळच पाण्याचे एक नैसर्गिक तळे आहे. तळ्यापासून तसेच पुढे चालत गेलो कि आपण गडाच्या एका टोकावर पोहोचतो. या टोकावरून थोडे खाली एक सपाट पठार दिसते. हि गडावरची घोडे बांधण्याची जागा म्हणजेच घोडेतळ असे गडावरील राहणारे लोक सांगतात. गडमाथ्यावर दोन-तीन घरांची छोटी वस्ती असून हे लोक खूप पूर्वी पासून गडावर वास्तव्यास आहेत.


गडमाथ्यावरील एक नैसर्गिक तळे


गडमाथ्यावर या व्यतिरिक्त कोणतेही अवशेष नाहीत. मात्र गडाच्या कोणत्याही बाजूस उभे राहिल्यास लांब पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. या परिसरात मोरांना अभय असल्याने गडावर मुक्कामासाठी गेल्यास सकाळी लवकर अथवा संध्याकाळी मोरांची केकावली ऐकू येते. मल्लिकार्जुनाचे मंदिर व गडमाथा फिरण्यासाठी पायथ्यापासून तीन तासाचा कालावधी लागतो. मल्लिकार्जुनाचे भव्य मंदिर मुक्कामासाठी योग्य असून जेवणाची व्यवस्था मात्र आपण स्वतः करावी. पिण्याचे पाणी वर्षभर गडावरील गंगा टाक्यात उपलब्ध असते.


गडावरून दिसणारा सुंदर सभोवताल

गडावरील कातळकोरीव पायऱ्या, लेणी व खोदीव पाण्याची टाकी पाहता हा गड निश्चितच शिवपूर्वकालीन असावा असे वाटते. तसेच गडावरील दर्गा व शेजारील ऐतिहासिक वास्तूवर आदिलशाही शैलीचा प्रभाव जाणवतो. हा किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नाही पण साधारण १७१७-१८ च्या सुमारास हा किल्ला छत्रपती संभाजीराजे (करवीर) यांच्याकडे असावा. तसेच १७९८ मधे करवीरकरांकडून गड पुर्नबांधणीचा (जिर्णोद्धार) संकल्प आढळतो मात्र गड बांधणी अपूर्णच राहिलेली दिसते. (संदर्भ – “दुर्गसंपदा महाराष्ट्राची”, श्री. भगवान चिले व “दुर्गवास्तू”, श्री. आनंद पाळंदे)



विलासगडाला भेट देण्यासाठी पुणे-कोल्हापूर महामार्गावर कराडपासून पुढे पेठनाका (सांगली फाटा) व कामेरी अशी महामार्गावरील गावे ओलांडल्यानंतर डावीकडे येडेनिपाणी व गोठखिंडकडे जाणारा रस्ता आहे. महामार्गापासून येडेनिपाणी हे गाव फक्त ३ किलोमीटर अंतरावर आहे. येडेनिपाणी गावातून एक रस्ता गोठखिंडकडे जातो. या रस्त्यावर येडेनिपाणी गावापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याला उजवीकडे एक फाटा फुटतो. येथेच “श्रीशैल्य मल्लिकार्जुनकडे” असा बोर्ड लावलेला दिसतो. या फाट्यावर उजवीकडे वळले की समोरील डोंगरात दगडी तटबंदी असलेले मल्लिकार्जुन मंदिर दिसू लागते. येडेनिपाणी पासून गडपायथा साधारण ३ किलोमीटर आहे. तर असा हा थोडके पण पुरातन अवशेष अंगाखांद्यावर बाळगणारा विलासगड सांगली जिह्यातील इतर दुर्लक्षित किल्ल्यांबरोबर नक्कीच भेट द्यावा असा आहे.


@ VINIT DATE – विनीत दाते


Click here to visit Picasa album

ट्रेकिंग/भटकंती करताना:
  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 

“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.


Comments

  1. Khup chan wa sundar lihilay
    Janu me trek kartoy asa watat hota wachatana

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर, सविस्तर माहिती आहे...👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद कामतकर साहेब!

      Delete
    2. Excellent compilation Vinit. Any specific information about Juna Panhala?

      Delete
  3. to the point ..khupach masta

    ReplyDelete
  4. नेहमीप्रमाणे सविस्तर माहितीचा आणि दर्जेदार लिखाणाचा ब्लॉग. हुडहुडनाऱ्या थंडीत पावसाळी भटकंती झाली. angel फोटोग्राफी झक्कास जमलीय.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद देवा! होय हा ट्रेक मी २ वर्षापूर्वी म्हणजे २०१४ च्या सप्टेंबरमधे केला होता तेव्हाचे फोटोज आहेत

      Delete
  5. beautiful work........keep up the good work!!!!

    ReplyDelete
  6. Replies
    1. धन्यवाद विवेक सर!

      Delete
  7. सुंदर ब्लॉग. सविस्तर आणि दर्जेदार लिखाण.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुजित आभारी आहे

      Delete
  8. Got to know about this place. Thanks for detailed information. Very well written.

    ReplyDelete
  9. उत्तरं, या रस्त्याने मी कित्येक वेळा गेलो असेल आपण इकडे गड आहे किंवा असेल हे कधी ध्यानी मनी पण आले नाही. नक्कीच भेट देईन या गडाला!!!!

    ReplyDelete
  10. उत्तरं, या रस्त्याने मी कित्येक वेळा गेलो असेल आपण इकडे गड आहे किंवा असेल हे कधी ध्यानी मनी पण आले नाही. नक्कीच भेट देईन या गडाला!!!!

    ReplyDelete
  11. Gotkhindichyaबाजूने वर जाताना एक कातळ शिल्प त्याला शिवाजीचे कोडे म्हणतात हे काय असावे?

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana