भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग १
गुढघ्याला झालेल्या दुखापतीमुळे जवळ जवळ अडीच महिने घरीच बसून काढले. सक्तीची विश्रांती होती खरी पण माझ्यासारख्या भटक्याला एवढा काळ घरी बसून काढायचा म्हणजे एक भयंकर शिक्षा सुनावल्यासारखं वाटत होत. अजून पुढचे ३/४ महिने तरी ट्रेकिंग किंवा सायकलिंग सारख्या जास्त स्ट्रेस देणाऱ्या गोष्टी करता येणार नसल्याने कुठतरी कौटुंबिक भटकंती तरी करून यावी असं सारखं मनात होत. त्यातच डॉक्टरांकडून कार चालवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याने सौं बरोबर चर्चा करून अखेरीस कोकणात भटकंतीला जाण्यावर शिक्कामोर्तब झाले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा तसा कोकणात भटकंतीला जाण्याचा एक सर्वोत्तम काळ. त्यानुसार ९ ते १२ डिसेंबर २०१६ असे सुट्ट्या पाहून चार दिवस मोकळे काढले. ठरलं असं की रत्नागिरी शहरातल्या एखाद्या बऱ्यापैकी हॉटेलमधे राहायच आणि एकेक दिवस रत्नागिरी शहराच्या उत्तर आणि दक्षिण बाजूकडील ५० किलोमीटरचा परिसर भटकायचा. त्यानुसार या चार दिवसात कोणकोणती मंदिर, समुद्र किनारे आणि अनवट ठिकाण पाहता येतील याचा शोध सुरु झाला. त्याप्रमाणे चार दिवसात जी ठिकाण पहिली ती अशी
दिवस पहिला: पुणे ते रत्नागिरी
- माजगावचा प्रताप मारुती
- चाफळचे श्री राममंदिर
- चाफळचे विर आणि दास मारुती
- शिंगणवाडीचा खडीचा (बाल) मारुती
- शिवसमर्थ स्मारक
- चाफळ जवळची रामघळ (कुबडीतीर्थ)
- डेरवण येथील शिवसमर्थ गड (शिवश्रुष्टी)
दिवस दुसरा: रत्नागिरी शहराच्या उत्तरेकडे
- आरे-वारे समुद्र किनारा
- काजीरभाटी बीच
- भांडारपुळे बीच
- गणपतीपुळे मंदिर
- प्राचीन कोकण दालन, गणपतीपुळे
- कवी केशवसुत स्मारक, मालगुंड
- मालगुंड Fish Aquarium
- जिंदाल ग्रुपचे जय विनायक मंदिर, जयगड
- कऱ्हाटेश्वर मंदिर, जयगड
दिवस तिसरा: रत्नागिरी शहराच्या दक्षिणेकडे
- भाट्ये समुद्र किनारा
- टाइटैनिक पॉइंट
- श्री क्षेत्र पावस
- गणेशगुळे येथील गणपती मंदिर
- कनकादित्य मंदिर, कशेळी
- महाकाली मंदिर, आडीवरे
- यशवंतगड, नाटे
- आंबोळगडचा समुद्रकिनारा
- वेत्ये समुद्रकिनारा
दिवस चौथा: रत्नागिरी शहरातील पर्यटन स्थळे आणि रत्नागिरी - पुणे प्रवास
- भगवती मंदिर व रत्नदुर्ग किल्ला
- रत्नागिरी Fish Aquarium
- लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान
- पतितपावन मंदिर
- स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक
- ऐतिहासिक थिबा पॅलेस
दिवस पहिला, शुक्रवार, ९ डिसेंबर २०१६:
ठरल्याप्रमाणे सकाळी बरोबर ७ वाजता घर (चिंचवड) सोडलं आणि सकाळच्या गुलाबी थंडीत पुणे-सातारा रस्ता धरला. गाडीच्या चाकातील हवा चेक करणे, पेट्रोल भरणे असे सोपस्कार पार पाडत साधारण ८.३० वाजता खंबाटकी घाट सुरु होण्याअगोदर नाष्टा करण्यासाठी थांबलो. पोहे, इडली-वडा, मिसळ असा यथेच्छ नाष्टा करून ९.३० ला पुन्हा सातारा रोडला गाडी दामटवली. सातारा ओलांडल्यानंतर उंब्रज येथे ओव्हरब्रिज खालून उजवीकडे चिपळूणकडे जाणारा रस्ता धरला. उंब्रज-पाटण रस्त्यावर उंब्रजपासून साधारण ६ किलोमीटर अंतरावर चाफळला जाण्यासाठी उजवीकडे एक फाटा लागतो. येथे “चाफळ” असे मोठ्या अक्षरात लिहलेले आहे. हा “चाफळ” असा बोर्ड पाहिला आणि आमच्या मातोश्री व सौं यांना चाफळचे राम मंदिर पाहण्याची इच्छा झाली. पूर्वी अनेकवेळा या रस्त्यावरून प्रवास केला पण माझाही चाफळला जाण्याचा योग आला नव्हता. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता गाडी चाफळ रस्त्याला उजवीकडे वळवली.
या फाट्यापासून चाफळ फक्त ६ किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्याने जाताना साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर माजगाव हे गाव लागते. या गावात समर्थ स्थापीत अकरा मारुतींपैकी एक “श्रीमारुती” आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थानी मारुतीचे रूप दिले. माजगावच्या वेशीवर एक घोडय़ाच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थानी शके १५७१ म्हणजेच इ.स. १६५० मध्ये याच धोंडय़ावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. पाच फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राममंदिराकडे तोंड करून उभी आहे. या श्रीमारुतीचे दर्शन घेतले आणि पुढे चाफळ गावाकडे निघालो.
माजगावचा समर्थ स्थापित "श्रीमारुती" |
माजगावपासून चाफळ फक्त २.५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सकाळी ११ वाजता चाफळला पोहोचलो. चाफळची खऱ्या अर्थाने ओळख म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेले श्री राम मंदिर आणि समर्थ स्थापीत अकरा मारुतीपैकी आणखी दोन मारुती. समर्थ रामदासांच्या जीवन-कार्यात चाफळचे महत्व फार मोठे आहे. चाफळचे प्रसिध्द राममंदिर समर्थ रामदासांनी शके १५६९ (सन १६४८) मध्ये आपले शिष्य व गांवकरी यांच्या मदतीने बांधले. प्रभु रामचंद्रानी दिलेल्या दृष्टांताप्रमाणे चाफळपासून जवळच असलेल्या अंगापूरच्या डोहातली रामाची मूर्ती त्यांनी बाहेर काढली व तिची हया देवळात प्रतिष्ठापना केली.
चाफळच्या राम मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार |
राम मंदिराचे मागील प्रवेशद्वार |
चाफळ गाव चारही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगामधे वसलेले आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असला तरी मंदिराची रचना फार आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतीवर सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या गाभ्यारात राम, लक्ष्मण, सीता आणि समोर हनुमानाची काळ्या पाषाणातील छोटी मूर्ती आहे. मुख्य मंदिर व गाभाऱ्यात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. मंदिर आवारात मुख्य मंदिराच्या अगदी समोर समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी “दासमारूती” चे मंदिर आहे. हा मारुती श्रीरामाच्या समोर 'दोन्ही कर जोडोनि' उभा आहे. श्रीरामासमोर नम्र हनुमंताची मूर्ती असली पाहीजे म्हणून समर्थांनी सुदंर दगडी मंदिर बांधून त्यात दासमारूतीची स्थापना केली. ही मूर्ती सुमारे ६ फूट उंचीची असून चेह-यावर अत्यंत विनम्र भाव आणि समोर असलेल्या प्रभु श्रीरामाच्या चरणांवर विसावलेले नेत्र, अशी ही मूर्ती आहे.
मुख्य मंदिरा जवळच समर्थांची “ध्यानगुंफा” आहे. हि ध्यानगुंफा म्हणजे जमिनीत खोदलेले एक दालन. या ध्यानगुंफेचे प्रवेशद्वार आणि पहिलीच भली मोठी पायरी बघून धडकी भरते आणि आत उतरण्याचे धाडसच होत नाही. समर्थ ध्यानधारणेसाठी अशा एकांत जागी जाऊन बसत. समर्थ व शिवाजी महाराजांच्या अनेक गुप्त मसलती याच गुंफेत होत असत. मंदिर आवारात तानाजी मालुसरे सभागृह असून देवस्थाना तर्फे ‘प्रकटले श्रीराम चाफळी’ ही २० मिनिटांची चित्रफीत माफक दरात या सभागृहात भाविकांना दाखवली जाते.
श्रीराम मंदिराच्या पाठीमागे सुमारे २०० मीटर अंतरावर समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी “प्रताप मारुती” चे मंदिर आहे. ह्या मारुतीला प्रताप मारुती, भीम मारुती किंवा विर मारुती अशी ३ नावे आहेत. हे मंदिर समर्थांनी जसे बांधले त्याच स्थितीत आजही उभे आहे. या मंदिराला ५० फुट उंचीचे शिखर आहे. गाभाऱ्यातील मारुतीची उंची ७ फुट असून मूर्ती खूप भव्य व रेखीव आहे.
आम्ही चाफळ मंदिर परिसरातील वरील ठिकाणे पाहिली आणि गाडीतळाकडे पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात मंदिर परिसराची देखभाल करणारे एक वयस्कर काका (सेक्युरीटी गार्ड) तिथें आले. मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरवात केली. मला ट्रेकिंगमुळे लागलेली एक चागंली सवय म्हणजे स्थानिकांशी संवाद साधणे. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात, एक म्हणजे स्थानिकांना आपल्याबद्दल आपुलकी वाटते आणि दुसरे म्हणजे गप्पांच्या ओघात आपल्याला त्या परिसरातील काही अनोळखी ठिकाणांची व इतिहासाची माहिती मिळते. रत्नागिरीला जाताना सहजच म्हणून या चाफळच्या राम मंदिराला भेट दिली त्यामुळे या परिसराबद्दल आधी फार काही वाचलेले नव्हते. त्यामुळे अगदी योग्य वेळेला मला त्या काकांशी बोलण्याचा फायदा झाला. काकांनी सांगितले कि चाफळपासून अगदी जवळच समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी आणखी एक शिंगणवाडीचा मारुती, समर्थ आणि शिवाजी महाराज यांची प्रथम भेट झाली ते शिवसमर्थ स्मारक, शिवाजी महाराजांना पाणी पिण्यासाठी समर्थांनी कुबडी आपटून तयार केलेले कुबडीतीर्थ आणि रामघळ अशी इतर काही ठिकाणे आहेत. हे सर्व ऐकून मला तर नवीन ठिकाणांचा खजीनाच भेटल्याचा आनंद झाला. लगेच काकांकडून या सर्व ठिकाणांपर्यंत जाणारा रस्ता कसा आहे, तिथं पर्यंत चारचाकी जाते का आणि वाटेत कोणती गावे लागतात इत्यादी गोष्टींची रीतसर चौकशी करून पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
आता पुढचे टार्गेट होते शिंगणवाडीचा मारुती आणि शिवसमर्थ स्मारक. हि दोन्ही ठिकाणे चाफळ गावापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आणि एकाच रस्त्यावर आहेत असे काकांनी सांगितले. त्यानुसार चाफळच्या नैऋत्येस असणाऱ्या टेकडीकडे निघालो. शिंगणवाडीच्या या डोंगराजवळ असणाऱ्या एका प्रशस्थ गुहेत (रामघळीत) समर्थ संध्या करावयास जात असत. म्हणून आपल्या दैवताची म्हणजेच मारुतीची मूर्ती त्यांनी येथे शके १५७१ (इ. स. १६४९) मध्ये स्थापन केली. या मारुतीस खडीचा मारुती किंवा बालमारुती असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब व रुंद असणा-या गाभा-यात साडेतीन फूट उंचीची छोटी मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. हे मंदिर अकरा मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. चाफळ राममंदिरातून बाहेर पडल्यानंतर अर्ध्याच किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याला डावीकडे एक फाटा फुटतो. याला शिंगणवाडी फाटा म्हणतात. या रस्त्यावर शिंगणवाडीकडे डावीकडे वळल्यानंतर पुन्हा अर्धा किलोमीटर पुढे जायचे की डाव्याबाजूला एक कच्चा गाडी रस्ता दिसतो. हा रस्ता थेट हनुमंतांच्या मंदिरा समीप घेऊन जातो. मात्र हा शेवटचा १ किलोमीटरचा रस्ता बराचसा खराब, कच्चा व थोड्या खड्या चढणीचा आहे. कारसारखे वाहन मंदिरापर्यंत नेता येत असले तरी गाडी अत्यंत जपून चालवावी लागते अन्यथा हे अंतर पायीच चढून गेलेले बरे.
समर्थ स्थापित "खडीचा मारुती" |
साधनेत तल्लीन झालेली एक योगिनी |
शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतले आणि डोंगर उताराचा कच्चा रस्ता उतरून चाफळकडे जाणाऱ्या रस्त्याला न वळता डावीकडे वळण घेऊन तसेच पुढे शिवसमर्थ स्मारकाजवळ पोहोचलो. हे स्मारक म्हणजे शिवाजी महाराज व समर्थ रामदास या दोन महान विभूती ज्या ठिकाणी साडेतीनशे वर्षापूर्वी प्रथम भेटल्या ते ठिकाण. या मठालगतच्या एका शेवरीच्या झाडाखाली समर्थानी शिवरायांना अनुग्रह दिला. येथे समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या सुंदर मुर्त्या असून आजूबाजूचा परिसर सुंदर फुलझाडे लाऊन सुशोभित केलेला आहे. या स्मारकाचे उद्घाटन २६ एप्रिल १९९० साली शरद पवार यांच्या हस्ते झाले.
शिव-समर्थ स्मारक |
शिव-समर्थ स्मारकाचा सुंदर परिसर |
स्मारक बघितले आणि तिथंच एका गावातल्या व्यक्तीला रामघळ कुठे आहे असे विचारले. मामांनी तिथूनच लांब एका डोंगराकडे बोट दाखवले आणि म्हणाले "ती बघा रामघळ, त्या तिथं". त्या कातळ टोपी घातलेल्या डोंगराकडे बघताच लक्षात आले की हि रामघळ म्हणजे निश्चितच काहीतरी अफलातून जागा असणार. चाफळपासून एक-दोन डोंगर ओलांडून साधारण दोन तासाच्या पायपिटीने चालत रामघळीत जाता येते असे मामांनी सांगितले. म्हणजे हा तर झाला एक छोटा ट्रेकच. पण सध्या मात्र ट्रेक करणे शक्य नसल्याने आणि कुटुंबकबिला बरोबर असल्याने रामघळीपर्यंत जाण्यासाठी काही गाडी रस्ता आहे का याची पुन्हा चौकशी केली. थोड्या चर्चेअंती असे कळाले की रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या पठारावर पवनचक्क्या बसवलेल्या आहे. या पवनचक्क्यामुळे एक कच्चा गाडी रस्ता थेट रामघळीच्या वर असणाऱ्या पठारावर गेलेला आहे. डोंगरावर जाऊन गाडी लावली की फक्त १०० पायऱ्या उतरून रामघळीत पोहोचता येते. मग काय बेस्टच काम झालं. लगेच रस्त्यात लागणाऱ्या गावांची नावे नीट समजून घेतली आणि तडक रामघळीकडे गाडी वळवली.
कुबडीतीर्थ रामघळ येथील पठार |
चाफळ राममंदिराजवळून जाणारा मुख्य रस्ता पुढे पाटणला जातो आणि कराड-चिपळूण रस्त्याला जोडतो. आम्हाला रत्नागिरीला जायचे असल्याने रामघळ करून पुढे हा रस्ता पाटण गाठण्यासाठी खूप शॉर्टकट होता. त्यामुळे रामघळीला जाण्यासाठी पुन्हा चाफळ-उंब्रज मुख्य रस्त्यावर आलो आणि आता चाफळकडे न वळता डावीकडे पुढे पाटण-साताऱ्याकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर चाफळ पासून फक्त १.५ किलोमीटर अंतरावर गमेवाडी नावाचे गाव लागते. या गावात समोर जाणारा डांबरी रस्ता सोडायचा आणि डावीकडे वळायचे. मग पुढे डेरवण ==> मधलीवाडी ==> वाघजाईवाडी ==> दाढोली अशी छोटी छोटी गावे आणि घाटाचा वळणावळणाचा रस्ता ओलांडत दाढोली गावानंतर साधारण ५०० मीटर अंतरावर डांबरी रस्त्याला डावीकडे एक वळण घेतले. येथे वळणावर सुरवातीलाच "रामघळ कुबडीतीर्थ, सडादाढोली ३ कि.मी." असा बोर्ड लावलेला दिसला आणि आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची खात्री पटली. पण इथून पुढे मात्र ३ किलोमीटरचा रस्ता बराच खराब, लाल मातीचा आणि रामघळ ज्या डोंगरात आहे त्या डोंगराच्या कातळटोपीच्या बाजूबाजूने एका मोठ्या सड्यावर (पठारावर) जातो. ह्या रस्त्यावर गाडी अतिशय जपून चालवावी कारण अधेमधे मोठमोठ्या दगडांनी आपली डोकी वर काढलेली आहेत. थोडं सांभाळून गाडी चालवत हा रस्ता पार केला आणि दुपारच्या कडक उन्हात सुद्धा पठारावरच्या थंडगार वाऱ्याने आमचं स्वागत केलं. पठारावर सगळीकडे लांबच लांब पवनचक्क्यांचे राज्य आहे. येथेच डोंगरकड्यालगत लांबून काही रेलिंग लावलेले दिसले आणि त्याच्या जवळच दिसली रामघळीची स्वागत कमान.
“रामघळ प्रवेशद्वार” असे लिहलेल्या कमानीतून घळीमधे उतरणाऱ्या जांभ्या दगडाच्या पायऱ्या सुरु होतात. ह्या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत आहे. परिसरात माकड, वाघ, हरीण अशा प्राण्यांचे अनेक प्रतीकात्मक पुतळे ठेवलेले आहेत. साधारण १० पायऱ्या उतरल्यानंतर डोंगरकड्याला लाकडी रेलिंग लाऊन आजूबाजूचा डोंगरदऱ्यांनी नटलेला सुंदर परिसर पाहण्यासाठी छान पॉइंट बनवला आहे. येथेच एका उंच दगडावर समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभा केलेला आहे. हा सर्व परिसर न्याहाळत जसं जसे आपण पायऱ्या उतरु लागतो तसा अचानकच हवेतला थंडपणा जाणवायला लागतो. बाजूच्या कातळाला आधारासाठी थोडा जरी स्पर्श केला तरी तो नुकताच फ्रीज मधून काढून तिथे ठेवल्यासारखा थंड लागतो. साधारण ५० ते ६० पायऱ्या उतरून मुख्य डोंगर आणि त्याच्या शेजारी पडलेल्या एका विशाल शिळेमुळे तयार झालेल्या नैसर्गिक कमानीतून आपण रामघळी समोर येऊन पोहोचतो.
सुशोभीकरणासाठी लावलेले लाकडी रेलिंग |
रामघळीत उतरणाऱ्या ६०/७० पायऱ्या |
डोंगरामध्ये राहणाऱ्या रामदासांना एकांत प्रिय होता. त्यामुळे महाराष्ट्रात समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक घळी व गुहा आहेत. त्यापैकीच एक हि चाफळ किंवा शिंगणवाडीची रामघळ. समर्थांचे हे अत्यंत आवडते ठिकाण. त्यांचे बरेचसे लेखन याच घळीत झाले. चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर ही घळ आहे. ह्या घळीत काही काळ समर्थांचे वास्तव्य होते. घळीतून समोरच चाफळच्या राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच बहुदा "दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो' असे म्हटले असावे. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या घळीत अनुभवता येते ती म्हणजे फक्त आणि फक्त निरव शांतता. इतका पवित्र आणि शांत परिसर कि तोंड उघडून शांतता भंग करण्याची इच्छा देखील होत नाही.
घळीच्या समोर बरीच मोकळी जागा आहे. घळ दुमजली असून बाहेरूनही दोन मजले स्पष्ट दिसतात. घळीच्या डाव्या हाताला एक मोठे विवर आहे. येथे आत गेल्यावर वर्तुळाकार जागा आहे. हीच समर्थांची ध्यानस्थ बसण्याची जागा. हि घळ म्हणजे डोंगरात खोदलेलं एक भन्नाट लेणं. भर दुपारी १ च्या उन्हात सुद्धा घळ इतकी थंड कि थोड्याच वेळात नाकातून पाणी यायला लागलं. घळीमधे प्रवेश करण्याआधी चपला काढल्या आणि तिथल्या खडकावर पाय ठेवताच थंडीमुळे एक सणक डोक्यात गेली. घळ खूप स्वच्छ ठेवलेली आहे त्यामुळे इथले वातावरण मन प्रसन्न करते. मुख्य घळीमधे आत दोन छोट्या गुहा आहेत. उजव्या बाजूच्या गुहेत सदगुरु जनार्दन महाराज (वसंतगडकर) यांची साधना गुंफा आहे. या गुहेत जनार्दन महाराज यांचा पुतळा आहे. तर डाव्या हाताच्या गुहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीची जागा म्हणून त्यांच्या छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. घळीच्या गवाक्षामधून समोर दूरवर पसरलेला डोंगरदर्यांनी व्यापलेला परिसर खूप सुंदर दिसतो.
समर्थ ध्यानाला बसत ते विवर |
घळीच्या आतील दोन गुहा |
गवाक्ष |
या घळीच्याजवळच अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर पवित्र कुबडीतीर्थ आहे. कुबडीतीर्थ म्हणजे डोंगर कपा-यातून अविरत झिरपून खालील कुंडासारख्या जागेत उतरणारी थंड व रूचकर पाण्याची एक छोटी संततधार. शिवाजीराजांसाठी हे तीर्थ समर्थानी कुबडीने निर्माण केले असा इतिहास आहे. एकदा शिवराय समर्थांच्या दर्शनास आले असता त्यांच्या तृषातृप्तीसाठी समर्थानी एक दगड कुबडीच्या साहाय्याने हलवून दूर केला आणि तेथे हे तीर्थ प्रकट झाले. आश्चर्य म्हणजे ही पाण्याची संतत धार कधीही आटत नाही. बाराही महिने वाहात असते.
रामघळीचे हे फोटो पाहून भविष्यात या ठिकाणाला भेट देणाऱ्या पर्यटकांना एक विनम्र सूचना, रामघळीच्या या पवित्र वातावरणास इजा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करू नये. हे पिकनिक अथवा मौजमजा करण्याचे ठिकाण अजिबात नाही. हा परिसर स्वच्छ व शांत ठेवण्यास मदत करावी.
रामघळीच्या शांत आणि सुंदर परिसराने आमच्या सगळ्यांच्या मनावर इतकी मोहिनी घातली की तिथून निघण्याची इच्छाच होईना. पण छोटी अन्विता बरोबर असल्याने आणि दुपारचे २ वाजत आल्याने पोटात भुकेची जाणीव होऊ लागली. पुन्हा एकदा इथं निवांत वेळ काढून नक्की यायचं असं मनाशी पक्क ठरवून रामघळीचा निरोप घेतला. पठारावर गरागरा फिरणाऱ्या पवनचक्क्या पहात डोंगराच्या कडेने कच्चा रस्ता पार करून पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. आता चाफळकडे न जाता समोर पाटण-तरळे-पाली असा रस्ता घेतला आणि पुढे पाचच मिनिटात डावीकडे पाटणकडे जाणाऱ्या रस्तावर लागलो. रामघळ ते पाटण हे अंतर साधारण १२ किलोमीटर आहे. कराड-चिपळूण रस्त्यावर कोयनानगर येथे एका बऱ्यापैकी चांगल्या दिसणाऱ्या धाब्यावर दुपारचे जेवण उरकले आणि दुपारी ४ वाजता गाडी चिपळूणच्या दिशेने भन्नाट वेगात सोडली.
आता आजच्या दिवसाचे शेवटचे टार्गेट होते ते म्हणजे डेरवणचा शिव-समर्थ गड. कुंभार्ली घाटाचा वळणावळणाचा घाट रस्ता आणि या घाटावर आपली कडवी नजर ठेऊन उभा असलेल्या जंगली जयगड या किल्ल्याचे रौद्र रूप पहात कोकणच्या भूमीत प्रवेश केला. घाटमाथा उतरायचा अवकाश की देशावरच्या कोरड्या हवेत राहणाऱ्या माणसाला कोकणातला दमटपणा लगेच जाणवायला लागतो. कुंभार्ली घाट उतरलो तेव्हा घड्याळाचा काटा संध्याकाळचे ४.३० वाजले असे दाखवत होता. इंटरनेटवर कुठे तरी वाचण्यात आले होते की डेरवणची शिवसृष्टी संध्याकाळी ६ वाजता पर्यटकांसाठी बंद होते. त्यामुळे काहीही करून ५.३० पर्यंत तरी डेरवणला पोहोचणे गरजेचे होते. मोबाईल मधील गुगल मैप APPLICATION डेरवणला जाण्यासाठी दोन पर्याय दाखवत होती. एक म्हणजे चिपळूण शहराच्या थोडे अलीकडे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर डावीकडे वळायचे आणि पुढे सावर्डे गावापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर जाऊन सावर्डे फाट्याला पुन्हा डावीकडे वळायचे. इथून डेरवण फक्त ४ किलोमीटर. हा रस्ता नेहमीच्या वापरातला आणि मोठा असला तरी थोडा लांबचा वाटत होता. तर दुसरा रस्ता म्हणजे कुंभार्ली घाट उतरल्यावर शिरगाव नावाचे गाव लागते. या गावानंतर डावीकडे वळायचे आणि तिथून फक्त १५ किलोमीटरवर डेरवण. दोन्ही रस्त्यामधला किलोमीटरचा फरक होता जवळ जवळ २० आणि वेळेची बचत होती ३० मिनिटे.
डेरवणला वेळेत पोहोचण्यासाठी निश्चितच दुसरा पर्याय उत्तम वाटत होता पण पूर्वानुभवानुसार ट्रेक दरम्यान बरेच वेळेस गुगल आणि GPS यावर अति विश्वास ठेवण्याचे झालेले परिणाम चांगलेच लक्षात होते. त्यामुळे या दुसऱ्या रस्त्याचा पर्याय निवडण्याआधी स्थानिकांना या रस्त्याची सध्याची परिस्थिती कशी आहे ते विचारायचे आणि मगच डावीकडे वळायचे असा निश्चय केला. त्यानुसार दोन-चार स्थानिकांना रस्त्याबद्दल विचारले तेव्हा फक्त एकच जण म्हणाला की मधे ४ किलोमीटरचा रस्ता खूपच खराब आहे त्यामुळे जाऊ नका. मात्र बाकीच्या दोन-तीन जणांनी सल्ला दिला कि रोड चांगला आहे आणि डेरवणला जाण्यासाठी तुम्हाला शॉर्टकट पडेल आणि तुम्ही लवकर पोहोचाल.
आता स्थानिकांनीच रस्ता चांगला असल्याचा निर्वाळा दिल्याने शिरगाव नंतर गाडी डावीकडे डेरवणच्या दिशेने वळवली आणि इथंच चूक झाली. सुरवातीचा साधारण ९ किलोमीटरचा रस्ता फारच छान घाटाचा आणि निसर्गरम्य असा होता. संध्याकाळच्या शांत उन्हात कोकणातल्या आंब्या-फणसाच्या हिरव्यागार बागा पहात आणि छोट्या वाड्या-वस्त्या मागे टाकत अचानक एका वळणावर गाडीला करकचून ब्रेक मारला. पाहतो तर काय रस्ता एकदम गायबच. समोर एक ओबडधोबड कच्चा आणि फार तर फार एका वेळी एक छोटी चारचाकी गाडी कशीबशी जाऊ शकेल एवढाच रस्ता झाडीत शिरलेला दिसत होता. आपण रस्ता चुकलो की काय अशी शंका मनात आली पण आत्ता पर्यंत पार केलेल्या अंतरावर कोठेच वळण लागले नसल्याने ती शक्यता पण नव्हती. बऱ कुणाला काही विचारावं तर रस्त्यावर चीटपाखरू सुद्धा नाही. शेवटी गाडी पुढे नेण्याआधी थोडं चालत जाऊन रस्त्याचा अंदाज घ्यावा असा विचार करून गाडीतून खाली उतरलो आणि तेवढ्यात समोर झाडीत एक छोट कोकणी कौलारू घर दिसलं. घरापर्यंत चालत जाऊन एक हाक दिली आणि आमच्या सुदैवाने आतून प्रतिसाद देखील मिळाला. मामांना रस्त्याबद्दल विचारल तेव्हा म्हणाले “रस्ता बरोबरच आहे, हाच पुढ डेरवणला जातो. पण मधे फक्त ४ किलोमीटर थोड जपून जावं लागेल. नंतर रस्ता पुन्हा डांबरी आहे”. गाडी जाईल का असं दोन-तीनदा पुन्हा पुन्हा विचारल्यावर मामा म्हणाले “जाईल ओ चारचाकी आरामात, डेरवणमधल्या वालावलकर ट्रस्टच्या हॉस्पिटलच्या छोट्या गाड्या याच रस्त्याने कायम ये-जा करतात”. तसाही ट्रेकमुळे यापेक्षाही भंगार आणि टुकार रस्त्यावर गाडी चालवण्याचा दांडगा अनुभव आमच्या दोघांच्याही (माझ्या आणि गाडीच्या) पाठीशी असल्याने देवाचं नाव घेतलं आणि गाडी पुढे नेली. पण खर सांगू तो ४ किलोमीटरचा रस्ता मात्र भयंकरच खराब होता. कसं तरी जीवावर उदार होत हळू हळू गाडी चालवत पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो आणि शेवटी सुटकेचा निश्वास सोडला. आता एवढ सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच कि चुकूनही या मार्गाने डेरवणला जाऊ नये. काही दिवसांनी हा रस्ता चांगला होईलही पण तो पर्यंत कशाला उगाच विषाची परीक्षा.
डेरवणला जाण्यासाठी घेतलेला शॉर्टकट खराब होता खरा पण याच रस्त्यावर कोकणातली अशी काही सुंदर दृश पाहायला मिळाली |
शेवटी एकदाचे संध्याकाळी ५.३० ला डेरवण शिवसृष्टीच्या दारात पोहोचलो. दारात प्रवेश करताच तेथील एका कर्मचाऱ्याने नियमांच्या फलकाकडे बोट दाखवून ते वाचण्यास सांगितले. डेरवण येथे दोन गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. एक म्हणजे शिवसमर्थ गड ज्याला शिवशिल्पसृष्टी म्हणतात. येथे शिवाजी महाराज्यांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग शिल्परुपात चितारले आहेत. तर दुसरी पाहण्यासाठी गोष्ट म्हणजे सुंदर आणि अतिशय स्वच्छ असे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, श्री दिगंबरदास महाराज आणि श्रीराम यांचे मंदिर. इथला एक सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे मंदिर परिसरात स्त्रिया व मुलींना वयोमानानुसार साडी व फ्रॉक परिधान केला असेल तरच सोडले जाते. मात्र शिवशिल्पसृष्टी पाहण्यासाठी हा नियम लागू होत नाही. मी फार पूर्वी म्हणजे साधारण १५ वर्षांपूर्वी शिवसमर्थ गडाला भेट दिली होती तेव्हा हा नियम शिवशिल्पसृष्टी पाहण्यासाठी सुद्धा लागू होता. माझ्या ताईने तेव्हा पंजाबी ड्रेस घातला असल्याने तिला आत सोडले नव्हते. आता पँट, ट्राऊझर घातलेल्या स्त्रियांनाही आत सोडतात, फक्त मंदिरात प्रवेश करायची परवानगी मिळत नाही. शॉर्ट पँट घातलेल्या पुरुषांना सुद्धा मंदिरात प्रवेश नाही.
डेरवण येथील शिवसमर्थ गडाचे प्रवेशद्वार |
शिवचरित्रामधील एक प्रसंग |
श्रीसंत सीताराम बुवा आत्माराम वालावलकर यांच्या निकटवर्तीयांनी सद्गुरू जोशी तथा दिगंबरदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आपला समाज व राष्ट्र वैभवशाली बनविण्याची स्फूर्ती केवळ दृश्यरूपातील शिवचरित्र अनभुतीतून येईल, हा विचार सद्गुरू दिगंबरदास महाराजांनी प्रत्यक्ष उतरविण्यास डेरवणची भूमी निवडली. पंधरा वर्षांच्या अथक मेहनतीतून शिवाजी महाराजांची शिवशिल्पसृष्टी प्रत्यक्षात साकारली. हे ठिकाण एखाद्या छोट्या किल्ल्याप्रमाणे बनवले आहे. श्रीशिवसमर्थ गडात भव्य तटबंदीतून प्रवेश करताना प्रथम सुसज्जतेने गस्त घालणारे मावळे स्वागतास दुतर्फी सामोरे येतात. गडाच्या महादरवाजासमोर दोन हत्ती झुलत आहेत. महादरवाजाच्या आत प्रवेश करताच दिव्य शिल्पसृष्टी चित्त वेधून घेते. शिवचरित्रातील चित्तथरारक प्रसंग घटना कलात्मकतेने साकारले आहेत. तटबंदीवर चौफेर कडा पहारा देत उभे असलेले मावळ्यांचे पुतळे अगदीच जिवंत वाटतात. प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि प्रत्येकाच्या हातातील विविध मराठा हत्यारे कल्पकतेने बनवलेली आहेत. छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधलेले असून मंदिराच्या बाजूने विविध सरदार घोड्यावर बसलेले आहेत. शिवरायांच्या मंदिरात भवानी माता महाराजांना तलवार देतानाचा प्रसंग, शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा, समर्थ रामदास, तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या सुंदर मूर्त्या आहेत.
शिवसमर्थ गडाच्या बाजूने उभे केलेले मावळे |
Superb!!!!!
ReplyDeleteThanks sirji
Deleteअप्रतिम लेखन विनीत.
ReplyDeleteपुढच्या भागांची वाट पाहात आहेच.
धन्यवाद सागर. होय भाग 2 लवकरच
Deleteखूप सुंदर लिखाण. विनीत तुम्ही दिवसेंदिवस लेखात व्हायला लागला आहात.
ReplyDeleteछान सविस्तर ब्लॉग लिहिला आहे. कुणाला रत्नागिरीची ट्रिप प्लॅन करायची झाल्यास हा ब्लॉग सोबत घेऊन जावा , बस्स. बाकी अगदी गुगल मॅपची पण गरज नाही. ब्लॉग लिहिताना निसर्गाबद्दलची तुमच प्रेम आणि तळमळ दिसून येते. तश्या सूचनाही तुम्ही ब्लॉगमधून करता, त्याच विशेष कौतुक.
खूप खूप धन्यवाद. पुढच्या भागाची वाट पाहतोय.
धन्यवाद सुजित एवढ्या सविस्तर व छान कंमेन्टबद्दल. मी लेखक वैगरे काही नाही फक्त मनातले विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्याबरोबर निसर्गाची जपणूक देखिल तेव्हढीच महत्वाची.
Deleteधन्यवाद मुकुंदा
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteफार छान ब्लॉग. उपयोगी माहिती. सुंदर छायाचित्रे.
ReplyDeleteवाचुन आनंद झाला. मजा आली.
दरवेळेस गावी जाताना चाफळ फाटा लागतो आणि त्याठिकाणी लागलेला चाफळ चा बोर्ड मला खुणवायचा... का खुणावत असेल? .. नक्कीच आपल्यासाठी राखून ठेवलेलं असेल अस काहीतरी वाटायचं... तुम्ही हा खजाना रीता केलात त्याबद्दल धन्यवाद. आता गावला जाताना थोडा आडमार्ग करून एकदा भेट देवूनच येतो.
ReplyDeleteपुढचा भाग लवकर येवू दे हो महाराजा......
विनितजी, पुढील महिन्यात रत्नागिरीला फिरायला जायचे आहे तर पाहण्यासारखे काय आहे पहावे म्हणून गुगल करताना तुमचा अप्रतीम माहिती असलेला ब्लॉग सापडला आणि खजीनाच गवसल्यासारखं झाल. तिथली माहिती तर मिळालीच पण माझ्या गावाशेजारीच अ्सून सुद्धा पूर्वी न सापडलेल्या रामघळीची पण माहिती मिळाली. खूप धन्यवाद !
ReplyDeleteमनोज जी इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभार. फिरता फिरता माहिती गोळा करतो आणि ती बाकी भटक्यांना उपयोगी पडावी या हेतूने लिहून ठेवतो. त्याचा उपयोग होतोय हे वाचून आनंद झाला.
Deleteधन्यवाद विनीत, इतकं सुंदर लिखाण वाचून आनंद झाला आणि अप्रतिम माहिती नक्कीच मदतीस येईल.
ReplyDelete