भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग ३

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २ पासून पुढे ....



आज जायचे होते रत्नागिरी शहराच्या दक्षिणेकडे म्हणजेच आंबोळगडापर्यंत स्वैर भटकायला. त्यामुळे आजच्या दिवसाची सुरवात देखील मुक्कामी हॉटेलवर भरपूर अल्पोपहार करून सकाळी ९.३० वाजता केली. रत्नागिरी-भाट्ये-पावस-पूर्णगड-कशेळी-आंबोळगड असा सुमारे ६० किलोमीटरचा समुद्रकिनाऱ्याजवळून जाणारा निसर्गरम्य रस्ता आणि या रस्त्यावरील काही निवडक ठिकाणे पहायची असे आजचे टार्गेट ठरवले होते. 


आजच्या दिवसाची सुरवात देखील एखाद्या बीचवर छानसा वॉक घेऊन करावी असे ठरवून रत्नागिरी शहरापासून अगदीचं हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भाट्ये बीचवर पोहोचलो. पण या भाट्येच्या समुद्रकिनाऱ्याने आमची पार निराशा केली. रत्नागिरी शहराच्या अगदीच जवळ असल्याने अनेक होम स्टे, रिसॉर्ट आणि हॉटेल्स यामुळे सदैव गजबजलेला असा हा भाट्ये बीच. साहजिकच आजूबाजूला असणाऱ्या गर्दीमुळे हा बीच बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या आणि अस्ताव्यस्त पडलेले प्लास्टिक यांनी भरलेला दिसला. ज्यांना भरपूर खायला मिळणारे आणि वॉटर स्पोर्ट्स सारख्या सुविधा उपलब्ध असणारे गजबजलेले बीच आवडतात त्यांच्यासाठी भाट्ये बीच हा उत्तम पर्याय आहे. पण आम्हा उभयतांना मात्र शांत, स्वच्छ आणि निर्मनुष्य बीच आवडत असल्याने आम्ही या बीचवरून लवकरच काढता पाय घेतला आणि पुढे निघालो.


भाट्ये बीच


भाट्ये बीचपासून थोड्याच अंतरावर पुढे एक घाट सुरु होतो. हा घाट सुरु होण्याअगोदर उजव्या हाताला झरी विनायकाचे मंदिर लागते. झरी विनायक म्हणजे डोंगरातून वाहणारा पाण्याचा झरा आणि त्याच्या जवळच एक सुंदर गणेश मूर्ती असणारे मंदिर. झऱ्यांच्या काठावर असणारा विनायक म्हणून "झरी विनायक" असे याचे नामकरण झाले आहे. येथे वर्षाचे बाराही महिने मधुर आणि गोड पाणी असते. मंदिर खूप मोठे नाही पण जाता जाता दहा/पंधरा मिनिटे थांबून पाहण्यासारखे आहे.


भाट्ये बीच ओलांडल्यानंतर लागणारा छोटासा घाट आणि त्याच्या एक कोपऱ्यात असणारे "झरी विनायका"चे मंदिर


'झरी विनायक' मंदिरानंतर येणारा वळणावळणाचा छोटासा घाट चढायचा कि भाट्ये बीचपासून पुढे फक्त अर्ध्या किलोमीटर अंतरावर उजव्या हाताला एक प्रशस्थ रिसॉर्ट आपले लक्ष वेधून घेतो. हा आहे “कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट”. हा लक्झरी रिसॉर्ट समुद्राजवळील एका मोठ्या टेकडीवर बांधलेला आहे. या रिसॉर्टच्या आवारात समुद्राकडे तोंड करून एक भली मोठी बोटीसारखी कलाकृती बनवलेली आहे. हि बोटीच्या आकाराची रचना टायटॅनिक पॉइंट म्हणून ओळखली जाते. हा संपूर्ण परिसर कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट यांची खाजगी मालमत्ता असल्याने जर का आपण या हॉटेलमधे उतरलेले टूरिस्ट नसाल तर माणशी ५० रुपये मोजून या रिसॉर्टच्या आत जाण्यासाठी गेटपास मिळतो. पण हे मोजलेले ५० रुपये वाया जात नाहीत हे मात्र खरं. या टायटॅनिक पॉइंट नावाच्या सी-फेसिंग बोटीतून समोर अमाप सुंदर दृश दिसते. मी इतर कोणत्याही हॉटेल किंवा रिसॉर्ट मधून अरबी समुद्राचे एवढे सुंदर दृश्य कधीच पाहिले नाही. येथे थोडा वेळ घालवून आणि कॅमेऱ्याचा भरपूर क्लीकक्लीकाट करून रिसॉर्टच्या बाहेर पडलो. थोडक्यात सांगायचे तर १५० रुपये पूर्ण वसूल करूनच.


“कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट” मधला टायटॅनिक पॉइंट
टायटॅनिक पॉइंटवरून दिसणारे भाट्ये बीचचे विहंगम दृश


आता पुढचे लक्ष होते महापुरुष स्वामी स्वरुपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले पावस गाव. रत्नागिरीपासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर पावस हे निसर्गरम्य गाव आहे. श्री ज्ञानेश्र्वर महाराजांच्या नाथ परंपरेतील महापुरुष स्वामी स्वरुपानंद यांचे पावस हे जन्मगाव. येथेच स्वामी स्वरूपानंदांची संजीवन समाधी आहे. स्वामी स्वरूपानंदांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्याने पुनीत होऊन पावस हे आता तीर्थक्षेत्र बनले आहे. विष्णुपंत आणि रखमाबाई गोडबोले यांच्या पोटी स्वामींचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस इथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस तर पुढील शिक्षण रत्नागिरीला झाले. उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल मध्ये सन १९१९ ला दाखल झाले. तिथे त्यांना आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षण मिळाले. अठराव्या वर्षापासूनच ते महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याकडे आकर्षित झाले. स्वामीजींनी महात्मा गांधीजींच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सामिल होऊन स्वावलंबन आणि राष्ट्रीय शिक्षण याला अनुसरुन पावस येथे शाळा काढली. ब्रिटीश सत्तेविरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेताना त्यांनी येरवडा तुरुंगात तुरुंगवास भोगला. नंतर पुण्याचे गुरु बाबामहाराज वैद्य यांच्या कडून आध्यात्मिक कार्याची दीक्षा मिळाली आणि त्यांचे सारे आयुष्यच बदलून गेले. पावसला येऊन त्यांनी कठोर तपश्चर्या केली. दासबोध, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला आणि त्यांना स्वामी ही उपाधी मिळाली. “राम कृष्ण हरी” हा गुरुमंत्र त्यांनी आपल्या शिष्यांना दिला.


पावस येथील श्री स्वामी स्वरुपानंद यांचा समाधी मठ


स्वामींजी १५ ऑगस्ट १९७४ रोजी समाधिस्त झाले. स्वामी स्वरूपानंदांनी जेथे संजीवन समाधी घेतली त्याच जागी भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या स्मृतिमंदिराच्या तळाशी असलेल्या ध्यानगुंफेत त्यांचा नश्वर देह ठेवला आहे. मंदिरातील शांतता, पावित्र्य आणि रम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. स्वामींचे वास्तव्य असलेली ‘अनंत निवास’ ही इमारत समाधीजवळच आहे. १९३४ ते १९७४ पर्यंत स्वामीजींचे वास्तव्य येथे होते. समाधी मंदिराच्या शेजारी एका आवळीच्या झाडात काही वर्षांपूर्वीच एक स्वयंभू गणपती प्रकट झाला आहे ज्याला "आवळी गणेश" असे म्हणतात. मंदिर परिसर मोठा असून येथे भक्तनिवास व प्रसादाची सोय देखील आहे. मंदिर परिसरात फोटो काढण्यास मनाई आहे.  


पावसपासून जवळचे पुढचे ठिकाण म्हणजे गलबतवाल्यांचा गणपती म्हणून ओळखले जाणारे गणेशगुळे. थोडे आडवाटेला असल्याने पावस गावापासून जवळ असूनही हे सहसा कोणाला माहीत नसणारे ठिकाण. पावस गावातून बाहेर पडताच साधारण २ किलोमीटर अंतरावर ढाकणी मोहोल्ला एरियामधे रस्त्यांचे एक जंक्शन (चौक) लागते. इथून सरळ जाणारा रस्ता राजापूर-पूर्णगड-आंबोळगडाकडे तर उजवीकडे जाणारा छोटा रस्ता काझी मोहोल्ल्यावरून गणेशगुळ्याकडे जातो. गणेशगुळ्याचे गणपती मंदिर याच रस्त्यावर गणेशगुळे गावाच्या खूप आधी एका मोठ्या सडयावर (पठारावर) आहे. त्यामुळे गणपती मंदिर पाहण्यासाठी गणेशगुळे गावात जाण्याची गरज नाही. मात्र ज्यांना सुंदर समुद्रकिनारा पहायचा असेल त्यांनी एक बराच मोठा डोंगरउतार उतरून समुद्राकाठी वसलेले गणेशगुळे गाव नक्की पहावे. 

 

डोंगरकड्यावर असलेले गणेशगुळ्याचे गणपती मंदिर


"गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला" या म्हणीवरून गणेशगुळे गाव आणि हे मंदिर प्रसिद्ध आहे. जांभ्या दगडाची बांधणी असणारे हे पुरातन मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. दर्शनी बाजूच्या उजव्या दालनालगतचे दालन पूर्णपणे बंदच आहे. दोन्ही दालनांना जोडणारी सुमारे १२ फूट उंचीची एक मोठी शिळा आहे. ही शिळा म्हणजेच श्री गणेश आहे असे मानले जाते आणि म्हणूनच या गणपतीला स्वयंभू संबोधिले जाते. पूर्वी श्रीगणेशाच्या नाभीतून पाण्याची संततधार वाहत असे. हे पाणी गोमुखातून बाहेरच्या बाजूला पडत असे. एके दिवशी हे पाणी पडणे बंद झाले. त्याच दिवशी या गणपतीने गणेशगुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले असे सांगितले जाते. याची साक्ष म्हणून तेथून दीड किमीवर असलेल्या पावस मार्गावरील डोंगरावर श्रीगजाननाच्या एका पायाचा ठसा उमटलेला आहे असे मानले जाते. 


गणेशगुळे येथील आगळीवेगळा गणेश


स्थानिक कथेनुसार पावस गावचे ग्रामस्थ रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण पोटशूळाच्या विकाराने आजारी होते. या आजाराला कंटाळून ते गणेशगुळे येथील समुद्रात जीव द्यायला निघाले. परंतु वाटेतच इतक्या वेदना सुरू झाल्या की त्यांना पुढे जाता येईना, त्यामुळे तेथेच एका झुडुपात ते पडून राहिले. तेथे त्यांनी गणेश अनुष्ठान व नामस्मरणाला प्रारंभ केला. २१ दिवसानंतर श्रीगणेशाने त्यांना दृष्टांत दिला, "माझं इथे वास्तव्य असून, याठिकाणी असणा-या विहिरीतलं पाणी प्राशन कर, तुझी व्याधी बरी होईल". चिपळूणकरांचा पोटशूळ गणेशकृपेने बरा झाल्याची वार्ता गावात पसरली. तेव्हापासून हा गणपती पीडितांच्या व्याधी व दु:ख नाहीसे करणारा म्हणून प्रसिद्धी पावला. गणेशगुळे गावाजवळील किनारपट्टीवर समुद्रमार्गे गलबतांमधून व्यापार करणारे अनेक गलबतवाले पूर्वी या ठिकाणी व्यापारउदीम सुरळीत व्हावा, असं या गणपतीकडे मागणं मागायचे. तेव्हापासूनच हा गणपती ‘गलबतवाल्यांचा गणपती’ म्हणून ओळखला जाऊ लागला. हे मंदिर एका बाजूला टेकडीवर निसर्गाच्या सान्निध्यात असून येथील वातावरण हे मन प्रसन्न व शांत करणारे आहे.


गणेशगुळ्याचे मंदिर डोंगरकड्यावर असल्याने सभोवतालचा हिरवागार परिसर खूप सुंदर दिसतो


गणेशगुळ्याच्या मंदिरात थोडा वेळ घालवून पुन्हा रत्नागिरी-राजापूर रस्त्याला लागलो आणि राजापूरकडे जाणारा रस्ता धरला. याच रस्त्यावर पुढे फक्त १० किलोमीटर अंतरावर इतिहासकाळात घेऊन जाणारा पूर्णगड नावाचा एक छोटासा किल्ला लागतो. किल्ला अगदीच इटूकला म्हणजे जाता जाता फक्त ३० मिनिटे वेळ काढून पहावा एवढाच. किल्ला एका लहानश्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला मुचकुंदी नदीची खाडी तर पश्चिमेला पसरला आहे अथांग समुद्र त्यामुळे किल्ल्यावरून दिसणारे दृश अमाप सुंदर दिसते. कोणी म्हणत छत्रपती शिवरायांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड. तर कोण म्हणत लहान आकाराचा किल्ला म्हणजेच पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा हा किल्ला दिसतो म्हणून पूर्णगड. काही का असेना पण किल्ला अगदी छोटुसा आणि सहकुटुंब भेट देण्यासारखा. 


पुर्णगडावरून दिसणारे सुंदर दृश


पूर्णगड हे किल्ल्याच्या टेकडीच्या पायथ्याचे गाव. कोकणी कौलारू घरांच्या रांगांमधून वर चढणाऱ्या पायऱ्यांच्या वाटेने मोजून १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या दरवाज्याजवळ पोहोचतो. दरवाज्याच्या डाव्या हाताला एक विहीर दिसते. दाराशीच एक हनुमंताचे छोटेखानी मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे. दरवाज्याच्या मध्यभागी गणपती तर बाजूला चंद्र आणि सूर्य कोरलेले दिसतात. आत असणाऱ्या पहारेकऱ्यांच्या देवडय़ा अजूनही सुस्थितीत आहेत. दरवाज्याजवळच तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे ज्यावरून संपूर्ण गडाची फेरी मारता येते. बहुतेक ठिकाणची तटबंदी अजुनची उत्तम स्थितीतील आहे. याच तटबंदीत किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस एक लहानसा दिंडी दरवाजा आहे. आयताकृती असा आटोपशीर घेर असणाऱ्या या किल्ल्यात आत एक वृंदावन, किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, दारूगोळा किंवा धान्य साठवण्यासाठी असणाऱ्या काही इमारती असे मोजकेच अवशेष दिसतात. 


पुर्णगडाचे प्रवेशद्वार

किल्ल्यातील मोजकेच अवशेष 


गडाची अजूनही सुस्थितीत असणारी तटबंदी


इटुकला पिटुकला पूर्णगड पटकन पाहून घेतला आणि पुन्हा मुख्य रस्त्याला येऊन राजापूरकडे निघालो. आता पुढे जायचे होते कशेळी येथील कनकादित्य मंदिर पाहण्यासाठी, पण त्याआधी भुकेची जाणीव होऊ लागल्याने आधी पोटोबा आणि मग विठोबा असं म्हणत एका छानश्या हॉटेलचा शोध सुरु झाला. आडीवरे-राजापूर रस्त्यावर पूर्णगडापासून साधारण ११ किलोमीटर अंतरावर कशेळी गावात जाण्यासाठी उजवीकडे फाटा आहे. या रस्त्याला उजवीकडे वळण्याआधी फक्त अर्धा किलोमीटर आधी "हॉटेल रत्नप्रभा पॅलेस" नावाचे एक चांगले व नवीनच झालेले हॉटेल दिसले. येथेच पोटभर जेवण केले आणि लगेच कशेळीकडे जाण्यासाठी उजवीकडे वळलो. या फाट्यापासून कनकादित्य मंदिर फक्त ३ किलोमीटर.


रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असणारे कशेळीचे श्री कनकादित्य मंदिर हे भारतातील मोजक्याच सूर्य मंदिरापैकी एक. निसर्गाचा सुंदर वरदहस्त लाभलेले कशेळी गाव रत्नागिरीपासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. गावातले कनकादित्य सूर्यनारायणाचे मंदिर हे एखाद्या कोकणी घरासारखेच वाटते. पुर्णपणे लाकडाने बनवलेले हे अत्यंत सुंदर मंदीर निश्चितच पाहण्यासारखे आहे. मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे खांबांवरील नक्षीकाम तसेच अनेक देवदेवतांच्या व पुराणातील निवडक प्रसंगांच्या कोरलेल्या लाकडी प्रतिमा अतिशय सुंदर आहेत. गाभाऱ्यात कनकादित्याची काळ्या पाषाणाची मूर्ती नजरेत भरण्यासारखी आहे. हि मूर्ती सुमारे ९०० वर्षापूर्वीची आहे असे सांगतात. 


सगळ्यात मधे कनकादित्याची मूर्ती आणि गाभाऱ्याच्या आजूबाजूला देवदेवता व पुराणातील निवडक प्रसंगांच्या कोरलेल्या लाकडी प्रतिमा


मंदिरात मूर्ती कशी आली याबाबत या परिसरात कथा सांगितली जाते ती येथे देतोय. इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला. प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या ठिकाणी सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी कुणकुण लागल्याने पुजार्‍याने दक्षिणेकडे जाणार्‍या एका व्यापार्‍याच्या गलबतावर मूर्ती चढवल्या. काही मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. ते गलबत कशेळीजवळ समुद्रकिनार्‍याजवळ अडकले. कशेळीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर जहाज पुढे जात नसल्याने नावाड्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील एका गुहेत आणून ठेवली आणि जहाज सुरू झाले व पुढे मार्गस्थ झाले. काही वर्षांनी गावातील कनकाबाई या सुर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिने गावकऱ्यांच्या मदतीने मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या कनकेचा आदित्य म्हणजे सूर्य म्हणून यास 'कनकादित्य' असे संबोधले जाते. समुद्रकिनार्‍यावरील कड्यावर सुमारे १५ फूट उंचीवर, ४०० चौ. फुटांची एक नैसर्गिक गुहा आहे, ज्या गुहेत ही मूर्ती सापडली. त्या गुहेला आता 'देवाची खोली' असे म्हणतात. 


पुर्णपणे लाकडाने बनवलेले कनकादित्याचे सुंदर मंदिर


बाराव्या शतकात गोविंद भट्ट भागवत कनकादित्याचे पुजारी होते. त्यांची किर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहारराजा शके १११३ मध्ये संक्रांतीच्या दिवशी समुद्रस्नानासाठी कशेळीला आला असताना त्याने ब्राह्मण भोजनासाठी गाव इनामात दिला, असे वर्णन करणारा ताम्रपट या मंदिरात आहे. हा ताम्रपट सुमारे ८५० वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर संस्कृतमध्ये एक लेख कोरलेला आहे. काही दिवसांपूर्वीच मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडल्याने हा तीन ताम्रपृष्ठांचा काही किलो वजनाचा ताम्रपट सध्या मंदिरात न ठेवता बँकेच्या लॉकरमधे ठेवण्यात आला आहे. मंदिराचे आवार खूपच प्रशस्त असून मंदिर परिसरात श्री गणपती, श्री शंकर, श्री आर्यादुर्गादेवी, श्री विष्णू अशी इतरही चार छोटी मंदिरे आहेत. शिवाय एक मारुती मंदिर देखील आहे. मंदिराच्या परिसरातील जुन्या पद्धतीची विहीरदेखील आवर्जून पहावी अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील स्वारीच्यावेळी कशेळी गावाला भेट दिल्याचे देखील स्थानिक लोक सांगतात. मंदिराजवळ नुकताच एक मोठा भक्त निवास बांधण्यात आला आहे. इथे मुक्काम करावयाचा झाल्यास भास्कर नारायण भागवत, मुख्य विश्‍वस्त श्री कनकादित्य मंदिर, कशेळी यांच्याशी संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक - ०२३५३-२२६३१७ किंवा रमेश पांडुरंग ओळकर ०२३५३-२२६३२३.


कनकादित्याचे मुख्य मंदिर व आवारातील शंकर आणि श्री आर्यादुर्गादेवी यांची छोटी मंदिरे


कशेळीचा हा मंदिर परिसर इतका सुंदर, शांत आणि रमणीय आहे कि तिथून निघायची इच्छाच होत नाही. शेवटी मनाला आवर घातला आणि पुन्हा खास या कशेळीच्या भक्तनिवासात दोन दिवस सवड काढून राहायला यायचं असं मनाशी पक्क ठरवून पुढच्या ठिकाणाकडे निघालो. आता पहायचे होते कशेळीच्या कनकादित्य मंदिरापासून फक्त चार किलोमीटरवर अंतरावर असणारे आडीवरे गावातील महाकालीचे जागृत देवस्थान. पुन्हा रत्नागिरी-राजापूर या मुख्य रस्त्यावर आलो आणि उजवीकडे राजापूरकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर लगेच एक छोटासा घाट उतरला कि उजवीकडे लागतो व्येत्येच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा रस्ता तर अगदी थोडसंच पुढ रस्त्याच्या डाव्याबाजूला दिसते महाकालीचे कौलारू मंदिर. भर दुपारी ३ ची वेळ आणि पुढची ठिकाणे बघण्याचे वेळेचे नियोजन लक्षात घेता व्येत्येचा समुद्रकिनारा परतीच्या प्रवासात पहायचा असे ठरवून महाकालीच्या मंदिरात पोहोचलो.


रत्नागिरी-आडिवरे हे अंतर ३९ किलोमीटर तर राजापूर-आडिवरे हे अंतर २८ किलोमीटर. थोडक्यात काय तर रत्नागिरी शहर किंवा राजापूरपासून आडिवरे तसं जवळ जवळ सारख्याच अंतरावर. कोल्हापुरच्या अंबाबाईप्रमाणेच आडिवरे गावातील महाकालीचे देवस्थान रत्नागिरीच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे आडिवरे हा गाव धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखला जातो. अनेकांची कुलदेवता असलेल्या या देवीचे पवित्र स्थान आद्य शंकराचार्यांनी १३२४ मध्ये स्थापन केले अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. असे म्हणतात कि कशेळीच्या मंदिरात असणाऱ्या ताम्रपटात 'अट्टविरे' नामक गावाचा उल्लेख आढळतो, तेच हे आडिवरे. शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे, समर्थ रामदास स्वामी अशा अनेक थोरांनी या मंदिराला भेट देऊन महाकालीचे दर्शन घेतल्याचे लोक सांगतात.


आडिवरे येथील महाकाली मंदिर


आडिवरे येथील महाकलीच्या या सुंदर पण नुकतेच जीर्णोद्धाराचा साज चढवलेल्या मंदिरात महालक्ष्मीचे पंचायतन आहे. पंचायतन म्हणजे एकाच मंदिरात महाकाली, योगेश्वरी, महालक्ष्मी, महासरस्वती आणि रवळनाथ असे पाच देवतांचे अधिष्ठान आहे. महाकालीची मूर्ती चतुर्भुज असून काळया पाषाणात कोरलेली आहे. या दक्षिणाभिमुख मूर्तीच्या मस्तकावर पंचमुखी टोप, एका हातात डमरू, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात तलवार तर चौथ्या हातात पंचपात्र आहे. मंदिर गाभाऱ्यात फोटोग्राफी करण्यासाठी मज्जाव असणारा बोर्ड लावलेला असल्यामुळे या सुंदर मुर्त्यांचे फोटो मात्र काढता येत नाहीत.



मंदिर आवारातच एक विहीर आहे. आता या विहिरचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण म्हणजे या विहिरीवर असणारा एक लाकडी रहाट. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पूर्वीच्या काळी वापरली जाणारी रहाटाची पद्धत खूप दिवसांनी येथे पाहायला मिळाली.


पाणी उपसण्याचा राहाट


आता आमचे पुढचे लक्ष होते अणुऊर्जा प्रकल्पामुळे प्रसिद्ध झालेल्या जैतापूर गावाजवळचा यशवंतगड. तसे महाराष्ट्रात यशवंतगड नावाचे दोन किल्ले आहेत. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी जवळचा तर दुसरा रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर खाडीलगत असणाऱ्या नाटे या गावाजवळचा. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हा यशवंतगड नाट्याचा यशवंतगड म्हणून देखील ओळखला जातो. यशवंतगडाला जाण्यासाठी आडिवरे गावातूनच पुन्हा राजापूरकडे जाणारा रस्ता धरला. या रस्त्यावर आडिवरेपासून साधारण ६ किलोमीटर अंतरावर धारतळे फाटा आहे. येथेच एक पोलीस चेक नाका देखील आहे. या धारतळे फाट्यावरून सरळ जाणारा रस्ता राजापूरकडे तर उजवीकडे जाणारा रस्ता जुवे जैतापूर, नाटे, यशवंतगड आणि आंबोळगडाकडे जातो. येथून उजवीकडे वळले की फक्त ८ किलोमीटर अंतरावर नाटे हे यशवंतगडाच्या जवळचे गाव लागते. गाव ओलांडून आंबोळगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच डाव्याबाजूस दगडी तटबंदी आणि बुरुजांनी युक्त असा यशवंतगड आपले लक्ष वेधून घेतो.


नाटे ते आंबोळगड रस्त्यावर डाव्या हाताला दिसणारा यशवंतगडाचा बुरुज आणि पाटी


नाट्याचा हा यशवंतगड दोनच वर्षांपूर्वीच अनेक वर्तमानपत्रामधून अचानक बराच प्रसिद्धीस आला. त्याचे कारण होते २०१२ साली कुणाला तरी हा किल्ला ३५ लाखाला विकला गेला याबद्दल. तो पर्यंत हा किल्ला ना शासनाच्या ताब्यात होता ना पुरातत्त्व खात्याकडेही त्याची कोणती नोंद होती. आहे कि नाही गंमत. तर अश्या या यशवंतगडाची उभारणी १६व्या शतकात विजापूर शासकांच्या कारकिर्दीत झाली. पुढे छत्रपती शिवरायांनी किल्ल्याची योग्य डागडुजी करून तो सुस्थितीत आणला. शिवाजी महाराजांनी पडकोट आणि महादरवाजा ते खाडीपर्यंतची तटबंदी बांधली. पुढे मराठय़ांच्या ताब्यातील हा किल्ला इतर अनेक किल्ल्यांप्रमाणे १८१८ मध्ये इंग्रजांनी जिंकला.


गडाच्या मुख्य दरवाज्यावरील भव्य बुरुज
दोन बुरुजांमधे लपवलेले प्रवेशद्वार


यशवंतगड किल्ला अर्जुना नदीतून होणा-या जलवाहतुकीच्या देखरेखीसाठी जैतापूर खाडीच्या मुखाजवळ आंबोळगडाच्या जोडीने बांधला गेला असावा. किल्ल्याची बांधणी जांभ्या दगडात केलेली असून गडाची तटबंदी भक्कम आणि प्रशस्त आहे. किल्ल्याला एकूण १७ बुरुज असून जवळ जवळ सगळेच बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. किल्ल्याचा परिसर एकूण सात एकरचा आहे.



गडाचे मुख्य प्रवेशद्वार आणि पहारेकर्यांच्या देवड्या


गडावरील एका बुरुजावर नाटेच्या ग्रामस्थांनी भगवा झेंडा आणि रस्त्यावर ‘किल्ले यशवंतगड’ अशी पाटी लावलेली दिसते. मात्र रस्त्यावरून किल्ल्याचे प्रवेशद्वार नेमके कोठे आहे ते लक्षात येत नाही. मुख्य रस्त्यावर गाडी लाऊन समोर दिसणारा भव्य बुरुज आणि किल्ल्याची तटबंदी उजव्या बाजूला ठेवत चालत गेलं कि दोन बुरुजांमधे लपलेलं प्रवेशद्वार समोर दिसते. प्रवेशद्वार समोरचं दिसत असले तरी किल्ल्यात प्रवेश करणे थोडे अडचणीचेच आहे. किल्ल्याजवळ जाण्यासाठी जमिनीच्या बाजूने असणारा एक छोटासा खंदक पार केल्या शिवाय किल्ल्यात प्रवेश मिळत नाही. खंदकात उतरताच प्रवेशद्वारावर असणारे दोन भव्य बुरुज नजरेस पडतात. येथेच एका बुरुजाच्या बाजूला महापुरुषाचे स्थान आहे. पुढे किल्ला डाव्या हाताला ठेवत खंदकातून चालत गेले कि खडकात कोरलेला एक मारुती दिसतो. त्यापुढे थोडे आणखी चालत गेले कि एक चौकोनी विहीर लागते. आता इथे मात्र खंदकाच्या पुढे जाणारा रस्ता या विहिरीमुळे अडवला गेला आहे. त्यामुळे येथून माघारी फिरायचे आणि पुन्हा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी परत यायचे.


गडाच्या तटबंदी बाहेर खंदकामधे बांधलेली विहीर


गडाला एकूण चार दरवाजे होते त्यापैकी दोन दरवाजे मोडकळीस आले आहेत. समोर दिसणाऱ्या महाद्वारातून प्रवेश केला की आपला थेट बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. या प्रवेशद्वाराजवळील देवड्या मात्र अजूनही सुस्थितीत व पाहण्यासारख्या आहेत. किल्ल्यात प्रवेश करताच मध्यावर दरवाजाच्या डावीकडे एक गोलाकार बुरूज दिसतो. या बुरुजावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. पायऱ्या चढून गेल्या की बुरुजावर एख्याद्या भव्य बांधकामाचे अवशेष दाखवणारे एक मोठे जोते दिसते. हि बहुदा गडकचेरी किंवा सदर असावी. या बुरुजाची भव्यता आणि मध्यवर्ती अशी मोक्याची जागा लक्षात घेता पूर्वी या बुरुजावरून संपूर्ण गडावर नियंत्रण ठेवता येत असावे. सध्या मात्र किल्ल्यात प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे वाढलेली असल्याने आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. हे सर्व अवशेष पाहून आता बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडील सुस्थितीत असणारा दुसरा दरवाजा पाहायला जायचे. या दरवाज्याबाहेर किल्ल्याच्या परकोटातील काही अवशेष आहेत. मी एकटाच किल्ला भटकत असल्याने आणि समोर बिसलेरी व दारूच्या बाटल्यांचा प्रचंड कचरा तसेच काटेरी झुडपे अस्ताव्यस्तपणे वाढलेली दिसल्याने मी पुढे जाण्याचे धाडस टाळले.



किल्ल्याच्या मध्यभागी असणारा गोलाकार बुरुज. या भव्य बुरुजावर सदरे सदृश बांधकामाचे अवशेष आहेत.

गडाचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार


यशवंतगडाची ३० मिनिटांची छोटीशी गडफेरी करून गाडीपाशी परत आलो तो पर्यंत गाडीत बसलेल्या पब्लिकची एक मस्त झोप काढून झाली होती. मग लगेच त्याच रस्त्याने पुढे आंबोळगडाकडे निघालो. यशवंतगडापासून पुढे फक्त ५ किलोमीटर अंतरावर आंबोळगड आहे. यशवंतगडाप्रमाणेच मुसाकाजी बंदरावर लक्ष देण्यासाठी आंबोळगड या किल्ल्याची निर्मिती झाली असावी. तटबंदीच्या तुरळक अवशेषावरून येथे पूर्वी किल्ल्या होता एवढीच काय ती या आंबोळगडाची राहीलेली ओळख. 


आंबोळगड गावात प्रवेश करताच डावीकडे सुंदर असा समुद्रकिनारा दृष्टीस पडला. मग काय इतका शांत, स्वच्छ आणि निर्मनुष्य समुद्रकिनारा डावलून पुढे जाण्याचे पाप आमच्याकडून घडणे शक्य नसल्याने आंबोळगड किल्ल्याचे तुटपुंजे अवशेष बघण्याचा पिलान रद्द केला. लगेच गाडी एका डेरेदार झाडाखाली लावली आणि पळतच अन्विता बरोबर समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो.


आंबोळगडाचा समुद्रकिनारा


आंबोळगडाचा समुद्रकिनारा खुपच विस्तीर्ण आहे. आम्ही जेव्हा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा तर समुद्राच्या लाटांबरोबर वाहून आलेल्या विविध आकाराच्या शंखांचा नुसता सडा पडलेला होता. अन्विताला तर किती शंख गोळा करू आणि किती नको असे झाले होते. "माझ्या प्रत्येक मैत्रिणीला मी एक शंख देणार" असं म्हणत तिने जवळ जवळ एक मोठी प्लास्टिकची पिशवी भरून शंख गोळा केले. मऊशार रेतीत लांबवर पसरलेले शंख-शिंपले पाहत समुद्रकिनाऱ्यावर एक फेरफटका मारला. आंबोळगडाच्या त्या विस्तीर्ण समूद्रकिनाऱ्यावर, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघणारी सोनेरी वाळू आणि फेसाळणा-या लाटा यांच्याशी मस्ती करताना वेळ कसा निघून गेला ते कळालेच नाही. 




घड्याळात ५ वाजले होते त्यामुळे गाडीपाशी परत येऊन आजच्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली. आता आलेल्या रस्त्यानेच म्हणजे आंबोळगड-आडिवरे-पूर्णगड-पावस-भाट्ये-रत्नागिरी असा परतीचा प्रवास करायचा होता. या रत्नागिरी भटकंतीतला आजचा शेवटचा सूर्यास्त कोठे तरी निवांत थांबून पाहू असे ठरवून आडिवरे जवळच्या वेत्येच्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायचे ठरवले. आडिवरे गावात महाकाली मंदिराला लागुनच असणाऱ्या एका छोट्या हॉटेलात चहा घेऊन फ्रेश झालो आणि आडिवरे गावानंतर लगेचच डावीकडे 'वेत्ये चौपाटीकडे' असे लिहलेल्या रस्त्यावर गाडी वळवली. या फाट्यापासून समुद्रकिनारा आहे फक्त ३ किलोमीटर. 



वेत्ये गावाला श्रीदेवी महाकालीचे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते. वेत्ये गावातल्या सफेद वाळूच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा दिवसभर प्रखर तेजाने चमकणारा तो तेजोनिधी अस्ताला चालला होता. अन्विताला मातीत खेळायची परवानगी देऊन आम्ही सूर्यास्तावेळचे मनमोहक आणि विहंगम दृश्य डोळ्यात साठवु लागलो. फेसाळणाऱ्या सागरी लाटांत पश्चिम क्षितिजावर दिवसभराचा दाह मागे ठेवून अस्तंगत होणाऱ्या त्या सूर्याने अत्यंत मनमोहक आणि गोजिरे रूप धारण करताच, माणिक-मोत्यांप्रमाणे सागर लाटा चमकू लागतात. प्रत्येक ठिकाणचा ‘सूर्यास्त’ ही क्रिया एकच असते मात्र समृद्रावर होण्याऱ्या सूर्यास्ताची मजा काही औरच!


वेत्येचा समुद्रकिनारा
वेत्ये समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त


पावस-भाट्ये-रत्नागिरी असा परतीचा प्रवास करून रत्नागिरी शहरात हॉटेलवर आलो तेव्हा रात्रीचे ८ वाजलेले आणि आजच्या दिवसाचा एकूण प्रवास झाला होता १५० किमी.


क्रमश:


@ VINIT DATE – विनीत दाते


"भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी" शेवटचा भाग ४ लवकरच .....


पर्यटन करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. “सुखद आठवणीं शिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.

भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा


भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा





























Comments

  1. सुंदर वर्णन केले आहेस विनीत तू. आमचा कोकण बघण्याचा योग केव्हा येतो, माहीत नाही. आता पत्रकार क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर वेळच वेळ आहे

    नागपूर वरून प्रकाश टवके

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana