दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग २
पारगड आणि कलानिधीगडाची दुर्गभ्रमंती
दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग १ पासून पुढे ... सकाळी ६.३० वाजता जाग आली तेव्हा बाहेर मस्त थंडी पडली होती. झोप पूर्ण झाली होती खरी पण थंडीमुळे स्लीपिंग बॅग मधून बाहेर येण्याची अजिबात इच्छा होत न्हवती. बाकीचे अजुनची आपापल्या पांघरुणात गुरफटून गाढ आणि शांत झोपलेले होते. तेवढ्यात टेंट बाहेर कसली तरी खटपट ऐकू आली म्हणून टेंटच्या बाहेर आलो तर मागे गडाच्या तटबंदीवर तीन-चार माकडांची टोळी जणू काही आमच्या उठण्याची वाट पाहत बसलेली. त्यातलच एक माकडाच पिलू चक्क माझ्या टेंटच्या बॅगमधे तोंड खुपसून काहीतर हुडकण्याचा प्रयत्न करत होतं. जवळच ठेवलेली काठी उचलली तशी सगळी माकडं पळून गेली.
पारगड किल्ल्यावर एका सुंदर ठिकाणी केलेले कॅम्पिंग |
पुर्व क्षितिजावर झोपलेल्या ढगांमागे हळू हळू तांबड फुटायला सुरवात झाली तशी सूर्यनारायण लवकरच आपल्या ड्युटीवर हजर होणार याची वर्दी मिळाली. मग पटापट सकाळची आन्हिक आवरून सगळ्यांना सूर्योदयाची ती सुंदर वेळ अनुभवण्यासाठी उठवलं. सूर्योदय एखाद्या डोंगरावरून पहायला मिळणे म्हणजे एक स्वर्गीय आनंदाची पर्वणीच असते. सूर्य उगवणे आणि मावळणे म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त या आपल्या आयुष्यात रोजच घडणाऱ्या घटना, पण ठिकाण बदलले की या घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात. सूर्यास्त अनुभवावा तो एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर, तर सूर्योदय फक्त डोंगरकड्यावरूनचं. किल्ल्याच्या पूर्वटोकावरून सूर्य हळू हळू बाहेर डोकावू लागला तसं किल्ल्याच्या माथ्यावरून गडद हिरवी शाल पांघरलेला आंबोली आणि तिलारीचा डोंगर परिसर अजूनच आकर्षक दिसू लागला. त्यातच या डोंगरदऱ्यांच्या कुशीत जमलेले पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके म्हणजे तर सोनेपे सुहागाच. कॅमेऱ्याचा भरपूर क्लीकक्लीकाट करत ते सुंदर चित्र कॅमेऱ्यात आणि मनात कैद करून घेतलं आणि टेंट आवरायला सुरवात केली. ट्रेकिंग आणि कॅम्पिंगमधल्या "LEAVE NO TRACE" तत्वाप्रमाणे कॅम्पसाईट चकाचक स्वच्छ करून गडकरी मामांच्या घरी सकाळचा पहिला चहा घेण्यासाठी हजर झालो. चहा आणि थोडी बिस्कीट पोटात ढकलली आणि मामांना नाष्ट्यासाठी गरमागरम पोहे बनवायला सांगून पारगड किल्ला भटकायला बाहेर पडलो.
एक नयनरम्य सकाळ |
गडकरी मामांच्या अगदी घरासमोरच पारगड निवासिनी भवानीमातेचे सुंदर, भव्य व जीर्णोद्धारीत मंदिर दिसते. मंदिर समोरच आहे तर प्रथम देवीचे दर्शन घ्यावे आणि मगच गडफेरीला सुरवात करावी असे ठरवून सगळ्यात आधी मंदिरात पोहोचलो. आजकाल सगळ्याच जुन्या मंदिरांना जीर्णोद्धाराचा नवीन साज चढत आहे. सिमेंट, मार्बल आणि ऑइलपेंटच्या रंगांचे थर चढवून मंदिरे चकाचक होत असली तरी त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या अनेक जुन्या पुरातन वास्तू, शिलालेख तसेच भिंतींवर असणारे कोरीवकाम नाहीसे होत आहे. पारगडावरील भवानी मातेचे हे जीर्णोद्धारीत मंदिर मात्र याला थोडेसे अपवाद असेच आहे. कारण भव्य सभामंडप आणि शिखर बांधून मंदिराचा कायापालट करण्यात आला असला तरी या मंदिरात डोकावताच आपल्याला आत जुने शिवकालीन चिरेबंदी मंदिर दिसते. म्हणजेच पारगडवासियांनी जुने शिवकाळातील मंदिर आहे तसेच ठेवून त्याभोवती नविन जीर्णोद्धारीत मंदिर उभे केले आहे. मंदिरात सुंदर रंगसंगतीचा वापर करून नक्षीदार कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या आतील बाजूस सभामंडपाच्या भिंतींवर शिवाजी महाराजांचा जीवनपट रेखाटणारी तैलचित्रे लावण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, दादाजी कोंडदेव, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, नेताजी पालकर, बाजी प्रभू देशपांडे अश्या अनेक थोरांचे तर संत तुकाराम महाराज, संत रामदास, संत ज्ञानेश्वर अश्या संतांचे अर्धपुतळे मंदिराच्या छोट्या छोट्या कोनाड्यात ठेवलेले आहेत. प्रत्येक अर्धपुतळ्यांखाली त्याव्यक्ती संदर्भातील प्रेरणादायी ओळी कोरण्यात आल्या आहेत. मूळ शिवकालीन मंदिराच्या गाभार्यात काळ्या पाषाणातील भवानी मातेची शस्त्रसज्ज अशी मनमोहक मूर्ती ठेवलेली आहे. मंदिर इतके आकर्षक व स्वच्छ ठेवलेले आहे की या मंदिरातून आपला पाय लवकर निघतच नाही.
पारगडनिवासिनी भवानी मातेचे मंदिर (फोटो ५ वर्षांपूर्वी पावसाळ्यात काढलेला आहे) |
मंदिराचा सुंदर, स्वच्छ आणि आकर्षक सभामंडप |
भवानीमातेपुढे नतमस्तक होऊन मंदिराच्याच बाजूने जाणाऱ्या मळलेल्या पायवाटेला लागतो. येथे पारगडवासियांची वस्ती सुरु होते. या वस्तीमधे काही टुमदार घरे आपले लक्ष वेधून घेतात. हि घरे म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज कान्होबा माळवे यांची आहेत. मात्र गडावर इतर कोणतेही उत्पनाचे साधन नसल्याने हि सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेरगावी राहतात. माघी महिन्यातील देवीच्या उत्सवात व दसऱ्याच्या उत्सवासाठी हे सर्व मावळे गडावर आवर्जून हजर असतात.
गडावरील वस्तीतून हि घरे बघत फिरत असताना मुख्य पायवाटेवर पुढे गडावरील शाळेचा परिसर नजरेस येतो. शाळेच्या आवारात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती काळ्या रंगाचा पुतळा आहे.
गडावरील वस्तीतून हि घरे बघत फिरत असताना मुख्य पायवाटेवर पुढे गडावरील शाळेचा परिसर नजरेस येतो. शाळेच्या आवारात छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती काळ्या रंगाचा पुतळा आहे.
शिवरायांना मानाचा मुजरा करून पुढे पायवाटेला लागणारा छोटा उतार उतरताच समोर हनुमंताचे मंदिर दिसते. हे मंदिर देखील जीर्णोद्धारीत असले तरी खूपच स्वच्छ ठेवलेले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात असणारी सव्वा मीटर उंचीची चपेटदान मुद्रेत असणारी हनुमंताची मूर्ती वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या बलभीमाने आपल्या डाव्या पायाखाली एका राक्षसाला तुडवलेले आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे हात उंचावलेला, चापट मारण्याच्या आवेशात असणारा मारूती ज्याच्या पायाखाली "पनवती" नामक राक्षसीण आहे असे मानले जाते. मंदिराच्या आवारातच गाभाऱ्यासमोर एक घडीव दगडातील समाधी देखील आहे. आम्ही मंदिरात गेलो तेव्हा गाभारा कुलूपबंद होता पण दरवाज्या शेजारीच एक भला मोठा ढोल ठेवलेला होता. मुलांनी लगेच त्या ढोलाचा ताबा घेतला आणि कितीतरी वेळ मनसोप्त ढोल वाजवून सगळा परिसर दणाणून सोडला.
मारुती मंदिराजवळच डाव्या हाताला शिवकालीन पायर्यांचा राजमार्ग दिसतो. गड पायथ्यापासून ह्या तिनशे ते साडेतीनशे पायऱ्या चढून गडावर पोहोचता येते. आम्ही मात्र काल डांबरी सडकेने थेट गडमाथ्यावर पोहोचलो होतो. हा गडमाथ्यावर येणारा थेट रस्ता पारगडवासियांनी सरकार दरबारी केलेल्या अथक प्रयत्नातून सन २००२ मध्ये तयार करण्यात आला आहे. त्यापूर्वी मात्र या पायर्या चढूनच गडावर यावे लागे. पायऱ्या जेथे सुरु होतात तेथेच गडावरील काही जुन्या तोफा अतिशय सुंदर रीतीने मांडून ठेवलेल्या दिसतात.
किल्ल्यावर येणाऱ्या पायऱ्यांचा मार्ग जिथे संपतो तिथे सुंदर पद्धतीने मांडून ठेवलेल्या काही तोफा |
किल्ल्यावर येणारा इतिहासकालीन पायऱ्यांचा मार्ग. |
आत्तापर्यंत पाहिलेले किल्ल्यावरचे महत्वाचे सर्व अवशेष हे भर वस्तीत होते त्यामुळे मारुती मंदिरामागून जाणाऱ्या पायवाटेने तटाकडेने फेरफटका मारण्यासाठी निघालो. पारगड किल्ल्याची लांबवर पसरलेली आणि अजूनही सुस्थितीतील असलेली तटबंदी पहायची असेल तर या उत्तर टोकाकडे येणे क्रमप्राप्त आहे. तशी गडाला पूर्व, पश्चिम व दक्षिण सर्वच बाजूने नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे, मात्र या उत्तर टोकाला उत्तम बांधीव तटबंदी असून त्यामधे काही बुरुज व सौचकुप सुद्धा केलेले आढळतात. तटबंदीवरून फेरफटका मारताना गडपायथ्याचे व दूरवर पसरलेले हिरवेगार जंगल पाहून डोळ्याचे पारणे फिटते. हा परिसर पहात असताना नकळतच जावळीचे घनदाट खोरे पहात आहोत असा भास होतो. पण उलट पारगड किल्ल्याभोवती असणारे हे जंगल जावळीपेक्षा ही जास्त घनदाट वाटते.
गडाची उत्तरेकडील अभेद्य तटबंदी |
किल्ल्यावरून दिसणारा आंबोली, चौकुळ आणि तिलारी परिसराचा हिरवागार निसर्ग |
तटबंदीमधील सौचकुप |
उत्तरेकडील उत्तम तटबंदी |
गडाची उत्तरेकडील तटबंदी न्याहाळत फेरफटका मारताना गडाच्या या बाजूस बरेच मोकळे विस्तृत पठार नजरेस पडते. पुढे एक कोरडा ठणठणीत पडलेला "महादेव तलाव" आणि त्याशेजारी महादेवाचे मंदिर आहे. तटाकडेने तसेच पुढे जात असताना एके ठिकाणी जमिनीत दहा-बारा दगडी पायऱ्या एका खड्ड्यात उतरलेल्या दिसतात. या खड्ड्याच्या इतर सर्वच बाजूच्या भिंती एकावर एक रचलेल्या दगडी तटबंदीच्या असून बहुदा एखाद्या बुरुजात उतरणाऱ्या त्या पायऱ्या असाव्यात असे वाटते. या अवशेषाचे अजून खोदकाम झाल्यास नक्कीच येथे इतिहासकाळातील एखादी बांधीव विहीर अथवा एखादा चोरदरवाजा सापडू शकेल.
पुढे गडाच्या तटाकडेने फेरी मारत आपण पूर्वटोकावरील गडमाथ्यावर येणाऱ्या डांबरी रस्त्याला येऊन मिळतो. येथेच समोर (डांबरी सडकेच्या पलीकडे) मोडकळीस आलेला पर्यटक निवास नजरेस पडतो. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ या दृष्टिकोनातून या किल्ल्याचे जतन व विकास करावयास प्रारंभ केला, तेव्हा पर्यटन विकासाच्या निधीतून या ऐतिहासिक किल्ल्यात पर्यटकांसाठी निवासाची उत्तम सोय व्हावी म्हणून हा पर्यटक निवास बांधला. सध्या मात्र याची अवस्था फार वाईट झाली आहे. पर्यटक निवासापासून तसेच थोडेसे पुढे गेल्यावर किल्ल्यावरील गंधर्व तलाव लागतो आणि येथेच आपली साधारण तासाभराची गडफेरी पूर्ण होते.
गंधर्व तलाव |
पारगड किल्ला महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील चंदगड तालुक्यात येतो. स्वराज्यातील पार टोकाचा शेवटचा किल्ला म्हणून या किल्ल्यास पारगड नाव पडले असावे असे वाटते. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ७३८ मीटर असून किल्लाचे क्षेत्रफळ अंदाजे ४२ एकर एवढे आहे. चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि. मी. अंतरावर निसर्गरम्य तिळारी प्रकल्पापासून थोडे पुढे असणाऱ्या पारगडापर्यंत पोहोचण्यासाठी चंदगडहून एस. टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्यांपर्यंत आणून सोडते. मात्र खाजगी वाहनाने आल्यास गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर जाता येते. पारगडावर पोहोचण्यासाठी आंबोली-चौकुळ-ईसापूर-पारगड असा २६ कि. मी. किंवा गोवा-दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-इसापूर-पारगड असा ५० कि. मी. असे इतर मार्ग देखील आहेत. हिरव्यागार निसर्गाचे कोंदण लाभलेल्या व घनदाट जंगलाच्या सानिध्यात असलेल्या पारगडावर वर्षभर कोणत्याही ऋतूमध्ये पर्यटनाचा आनंद घेता येतो. किल्ल्यावर पाणी आणि निवासाची मुबलक सोय उपलब्ध आहे. किल्ल्यावर वस्ती असल्याने आगाऊ कल्पना दिल्यास गावातील घरामधे भोजनाची उत्तम सोय होऊ शकते.
आता थोडेसे किल्ल्याच्या इतिहासात डोकावून पाहू. सिंहगड किल्ला इ. स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला पण त्यावेळी झालेल्या युद्धात तानाजींना दुर्दैवी मृत्यू पत्करावा लागला. पुढे गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन १६७६ साली या गडाची निर्मिती केली व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. गडाच्या वास्तूशांतीला दस्तूरखुद्द महाराज गडावर उपस्थित होते असे गडावरील लोक सांगतात. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला. हा किल्ला महाराजांना इतका आवडला कि त्यांनी किल्लेदार व उपस्थित मावळ्यांना आज्ञा केली "जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत हा गड जागता ठेवा". ही तर राजाज्ञाच होती. गडावरच्या मावळ्यांनी ती पाळली आणि आजतागायत पारगडावर वस्ती करून गड जागता ठेवला. पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला. पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर हल्ले करून त्यांना परतवून लावले. खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंताच्या मदतीने पुन्हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे. पुढे पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. नंतर मराठा राज्य संपून इंग्रज अंमल गडावर चालू राहिला, तरीही गडावरील लोक गडावरच राहिले. इंग्रजांनी त्यांना मासिक तनखेवजा पगार सुरू केला. हा पगार बेळगाव मामलेदार कचेरीतून १९५४ पर्यंत त्यांना मिळत असे. (इतिहास संदर्भ - दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे - श्री. भगवान चिले यांच्या पुस्तकातील)
गडफेरी पूर्ण करून सगळे पुन्हा गडकरी मामांच्या घरी परत आलो तोपर्यंत सकाळचे १०.१५ झाले होते. मामांनी गरमागरम पोहे पुढ्यात ठेवताच सगळ्यांनी त्यावर यथेच्छ ताव मारला. पुन्हा एकदा चहा आणि बिस्कीट असे पोटाचे सगळे लाड पुरवून शेवटी बरोबर ११ वाजता किल्ल्याचा व गडकरी मामांचा निरोप घेऊन गाडी चंदगड रस्त्याला लागली. आता पुढचे लक्ष होते किल्ले "कालानिधीगड". या तीन दिवसाच्या ट्रेक मधला एकमेव किल्ला ज्यावर किमान एका तासाची खडी चढाई करून जायचे होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातच कालानिधीगड नावाचा एक आटोपशीर आकाराचा, थोड्याश्या सुस्थितीतील तट, बुरुज, देखणे प्रवेशद्वार, घनदाट जंगल व सोपी चढण असलेला आणि त्यामुळेच सहकुटुंब पाहता येण्यासारखा डोंगरी किल्ला आहे.
चंदगड रस्त्यावर तिलारी फाटा ओलांडून पुढे पाटणे गावानंतर उजवीकडे "कालिवडे" ह्या कलानिधीगडाच्या पायथ्याला जाणाऱ्या गावाकडे वळालो. किल्ल्याकडे जाणारा रस्ता विचारत "कालिवडे" गावाच्याही थोडे पुढे असणाऱ्या एका छोट्या वस्तीमधे सावली हेरून गाडी पार्क केली. घडाळ्यात दुपारचे १२ वाजले होते. भर दुपारच्या उन्हात कलानिधीगड आणि त्यावरचा टॉवर मस्त तळपताना दिसत होता. एवढ्या उन्हात मुलांना घेऊन एका तासाची चढाई करण्याचे आव्हान थोडे अवघड वाटत होते पण मुलांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. खायला थोडा कोरडा खाऊ बरोबर घेऊन वस्तीतल्याच एका घरात पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. या पूर्वी कलानिधीगडाला भेट दिलेली असल्याने किल्ल्यावर जाणारा मार्ग व्यवस्थित माहिती होता, तरी देखील एका वयस्कर मामांना वाटाड्या म्हणून बरोबर घेतले आणि गडाच्या दिशेने कूच केले.
कलानिधीगड आणि त्याकडे निघालेले ट्रेकर्स |
कालिवडे गावातील शेतामधून जाणाऱ्या वाटेने चालायला सुरवात करताच आजूबाजूच्या जंगलातून पाचूसारखा शोभणारा कलानिधीगड समोर दिसू लागला. चालता चालता इतरांना किल्ल्याबद्दल वाचलेली आणि ऐकलेली थोडी माहिती सांगू लागलो तसं सोबत वाटाड्या म्हणून आलेल्या मामांची टेप सुरु झाली. "ह्यो काळानंदी गड हाये. गडामधे गड आमचा काळानंदी गड बघा. या चंदगड तालुक्यातला सगळ्यात उंच गड आहे बर का ह्यो. किमान तासाभराचा छातीवरचा चढाव चढला कि मगच किल्ल्यात जाता येतया. इतल्या बाकीच्या गडावर गाड्या पार वरपर्यंत जात्याती पण आमच्या गडावर तसं नाही. शिवाजी महाराजांचा लई आवडता गड बघा ह्यो". प्रत्येक स्थानिकाला आपापल्या परिसरातल्या किल्ल्याबद्दल प्रेम असतचं आणि तेच मामांच्या या बोलण्यातून दिसून येत होत. मामांकडून गडाबद्दलच्या अश्या अनेक गोष्टी ऐकत पुढल्या पंधरा मिनिटात गडाच्या पूर्व बाजूच्या उतारावर असलेल्या धनगरवाडीत पोहचलो.
हि जेमतेम १० ते १५ घरांची छोटी वस्ती पार केली कि गडावर जाणारा जांभ्या दगडात बांधलेला प्रशस्थ रस्ता लागतो. गडावर दूरसंचारचा (BSNL) एक टॉवर व इमारत असल्याने गड माथ्यापर्यंत हि जांभ्या दगडातली प्रशस्थ पायवाट नेलेली आहे. या वाटेने धनगरपाडयापासून १० मिनिटे चालत गेलो तसे मामांनी वाटेच्या उजव्या हाताला दाट झाडीत एक घडीव दगडात बांधलेला तुळशीवृंदावनासारखा अवशेष दाखवला. हि बहुदा कोणाची तरी दुर्लक्षित समाधी असावी. तसेच थोडे पुढे जाताच अजून एक दगडांचा रचीव चौथरा आणि त्यावर असणारा अनगड देव पाहिला. स्थानिकांना वाटाड्या म्हणून बरोबर आणण्याचा हा असा एक फायदा. पूर्वी कलानिधीगडाला भेट दिलेली असून सुद्धा हे अवशेष पाहीलेले न्हवते.
गडावर जाणाऱ्या मुख्य वाटेवर लागणारे वृंदावन (समाधी?) |
एक चौथरा आणि त्यावरील अनगड देव |
गडावर जाणारी जांभ्या दगडातली हि प्रशस्थ वाट बरीच फिरून व गडाला पूर्ण वळसा मारून गडमाथ्यावर जाते. त्यामुळे या वाटेने गडामाथ्यापर्यंत न जाता वाटेच्या उजव्या हाताला असणाऱ्या विद्युत ट्रान्सफॉर्मर शेजारून वर चढणाऱ्या छोट्या पायवाटेने गडावर जायचे. विजेच्या ट्रान्सफोर्मरची हि खुण लक्षात ठेऊन बरोबर त्याच्या शेजारील पायवाट घ्यायची. कालिवडे गावातून या ठिकाणी पोहोचण्यास साधारण ३० मिनिटे लागतात. आता येथून गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी खड्या चढणीची आहे मात्र आजूबाजूला असणाऱ्या दाट झाडीमुळे उन्हाचा त्रास फारसा जाणवत नाही. या वाटेवर कलानिधीगडावर दुर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या "दुर्गवीर" या संस्थेने जागोजागी दिशादर्शक फलक लावलेले आहेत.
पायवाटेने साधारण १० मिनिटे चढून गेल्यावर एका झाडावर दुर्गवीर संस्थेने लावलेला "तोफेचा माळ" असा फलक आणि उजवीकडे तिकडे जाणारी एक पायवाट दिसली. हि अजून एक जागा जी पूर्वी कलानिधी गडावर भर पावसाळ्यात आल्याने व वाटाड्या सोबत नसल्याने बघायची राहून गेलेली. थोडक्यात काय तर प्रत्येक गड प्रत्येक ऋतूत आणि अनेकवेळा बघावा. प्रत्येक भेटीत काही तरी नवीन नक्कीच हाताला लागत. म्हणूनच तर अप्पांच्यासारखे (गोनीदा) जातिवंत भटके रायगड आणि राजगड सारखे किल्ले १०० वेळा बघत.
मामांनी सांगितले कि ह्या तोफेच्या माळाकडे जाण्यासाठी गडाला बराच वळसा मारावा लागतो आणि तिकडे जाणारी वाट शेवटपर्यंत गच्च झाडोऱ्यातून जाते त्यामुळे उन लागत नाही. आपण गडावरून खाली उतरताना हा "तोफेचा माळ" पाहू आणि तिकडूनच दाट झाडीत असणाऱ्या "चाळोबा" चे दर्शन घेऊन धनगरपाडा गाठू. मामांचे म्हणणे देखील रास्तच होते. भर दुपारचे उन आणखी चटके देण्याआधी गडमाथ्यावरील अवशेष पाहणे गरजेचे होते. त्यामुळे मामांनी दिलेला सल्ला योग्य मानून पुढे चढायला सुरवात केली.
गड चढताना लागणारी खिंड |
येथून पुढे थोडा चढाव चढताच डोंगराच्या पहिल्या टप्प्यात असलेली एक खिंड लागते. हि बहुधा टेहळणीची जागा अथवा गडाचे मेट असावे. हि खिंड ओलांडली कि झाडोरा संपतो आणि गडाच्या आजूबाजूचा परिसर दिसू लागतो. यामध्ये सगळ्यात आधी आपले लक्ष वेधून घेतो तो निळ्याशार पाण्याने वेढलेला "जंगमहट्टी" जलाशय. हा आजूबाजूचा हिरवागार आसमंत न्याहाळत चिंचोळी होत जाणारी वाट पुढे फक्त १० मिनिटे चढून गेलो कि आपण गडाच्या दरवाज्यात येऊन दाखल होतो. किल्ल्याचे छोटेसे प्रवेशद्वार अतिशय देखणे आहे. महत्वाचे म्हणजे ते आजही उत्तम स्थितीत उभे आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूचे बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहेत. दरवाज्याची बांधणी पूर्णपणे गोमुखी पद्धतीची नसली तरी दरवाजा डावीकडील भव्य बुरूजाआड थोडासा लपवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दरवाज्यातून आत प्रवेश करताच दरवाज्याच्या आतील बाजूस फांजीवर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या दिसतात. तसेच उजव्या बाजूस दरवाज्यापासून सुरु होणारी दगडी बांधीव तटबंदी गडाच्या पार पश्चिम टोकापर्यंत धावत गेलेली दिसते.
गडाचे पूर्वाभिमुख प्रवेशद्वार |
पश्चिम टोकापर्यंत बांधलेली एक सलग तटबंदी |
ह्याच ठिकाणी दरवाज्याच्या डाव्या बाजूने तटबंदीच्या जाडीची अजून एक लांबलचक भिंत बांधत नेलेली दिसते. याला गडाची तटबंदी म्हणता येणार नाही कारण ही भिंत किल्ल्यावरील सपाट प्रदेशाचे दोन भाग करते ज्याला "पार्टिशन वॉल" म्हणता येईल. या भिंतीच्या अलीकडे व पलीकडे असे दोन्ही बाजूस गडाचे अवशेष दिसतात. या भिंतीमुळे दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्यासारखा दिसतो. या भिंतीला अगदी नंतरच्या काळात भगदाड पाडून पलीकडे (पूर्वेकडे) असणाऱ्या दुरसंचारच्या ऑफिसकडे जाण्यासाठी वाट केलेली आहे. गडाच्या या पूर्व बाजूला जमिनीशी समतल असणारे दोन उध्वस्त बुरुज, दोन छोटी वृंदावने, दुरसंचारची इमारत आणि एक टॉवर एवढेच काय ते पाहण्यासारखे अवशेष शिल्लक आहे. मात्र गडाचे सर्व मुख्य अवशेष हे भिंतीच्या अलीकडे म्हणजे पश्चिमेकडील बाजूस आहेत.
गडाला दोन भागात विभागणारी भिंत |
गडाचे पूर्वेकडील थोडके अवशेष पाहून गडाच्या मुख्य दरवाज्याकडे परत आलो तसे घड्याळात दुपारचे दीड वाजले होते. आता भुकेची आठवण होऊ लागली होती. तेवढ्यात दरवाज्याजवळ खालच्या धनगरपाड्यातला एक युवक भेटला. बाबू असं त्याच नाव. त्याच्याकडे इकडची तिकडची चौकशी केली असता असं कळाल कि तो दुर्गविरांच्या बरोबर गडावर नेहमीच संवर्धनाचे काम करत असतो. खरच, गडाचे गडपण शाबूत ठेवण्यात या स्थानिकांचा आणि दुर्गवीर सारख्या संस्थेचा खूप मोलाचा वाटा आहे. जेवणाची वेळ होत आल्याने त्यालाच कालिवाडे गावात किंवा खालच्या धनगरपाड्यात जेवणाची आमची काही सोय होईल का असं विचारलं. हा प्रश्न विचारताच त्याला खूप आनंद झाला आणि लगेच जवळचा मोबाईल बाहेर काढून "घरी पाव्हणे जेवाया येणार हायेत, पाच-सहा माणसांचा स्वयपाक तयार ठेव" असा निरोप देऊन पण टाकला. पलीकडून होय नाही असं काही उत्तर यायच्या आत पठ्याने फोन ठेऊन पण दिला. आता मलाच टेन्शन कि याच्या घरचे खरच जेवण बनवतील का. त्याला पुन्हा एकदा घरी फोन लावायला सांगितलं तसं म्हणाला "काय पण काळजी करू नगा, तुम्हास्नी जेवण मिळल". बसं, त्याच्या या वाक्यावर अजून काही बोलायची गरजच न्हवती. किल्ला पहायचा आणि मग खाली उतरून जेवणासाठी एखादे हॉटेल हुडकण्याचा फार मोठा त्रास या पठ्याने सोडवला होता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळेत जेवण देखील मिळणार होते.
जेवणाची व्यवस्था लागल्यावर बाबुला बरोबर घेऊन उर्वरित किल्ला भटकायला निघालो. मुख्य दरवाज्यासमोरच एक छोटा छप्पर नसलेला मंदिर समूह दिसतो त्याकडे मोर्च्या वळवला. आत प्रवेश करताच दोन तीन छोट्या छोट्या खोल्या दिसतात. डाव्या हाताच्या पहिल्या खोलीत डोकावले तसे एक दगडी व उतरत्या छपराचे वेगळ्याच पद्धतीचे मंदिर दिसले. मंदिराच्या गाभाऱ्यात एक शिवलिंग, भैरोबा आणि भवानी मातेची शस्त्रसज्ज मूर्ती ठेवलेली आहे. तर मंदिराच्या दारातच गणेशाची एक देखणी मूर्ती ठेवलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्थ अंगण असून अंगणात एक मोठं तुळशी वृंदावन आहे. बहुदा हि कुणा थोराची समाधी देखील असू शकते. मंदिराला लागुनच घरासारख्या एक दोन खोल्या आहेत. या खोल्यांच्या भिंतींमध्ये दिवे ठेवण्यासाठी छोटे छोटे कोनाडे देखील पाहायला मिळतात.
हे मंदिर पाहून तसेच पुढे निघाले असता मंदिराच्या मागे एक भला मोठा खड्डा आपले लक्ष वेधून घेतो. हि आहे गडावरील दगडात खोदलेली भली मोठी विहीर. येथे खाली उतरण्यासाठी दगडात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या विहिरीचा प्रचंड आकार पाहता हि विहीर खोदताना निघालेला दगडच या किल्ल्याच्या तटबंदीसाठी वापरला गेला असेल याचा अंदाज येतो. वापरलेल्या दगडाचे काम झाल्यावर अश्या खाणींचा उपयोग नंतर विहिरी म्हणून केला गेला असेल. अश्या प्रकारे दगडात खोदलेली प्रचंड विहीर फलटण तालुक्यातील संतोषगडावर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्याच गडहिंग्लज तालुक्यातील सामानगडावर तर अनेक आहेत. पण कलानिधीगडावरील हि विहीर खोदल्यानंतर पाणी न लागल्याने त्या प्रचंड विवराच्या तळाशी अजून खोल खणून पुन्हा तीन कोपऱ्यात तीन विहिरी काढलेल्या दिसतात. यातील दोन विहिरी मुजलेल्या असून एका विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे. या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे. मात्र विहिरीतील हे पाणी काढण्यासाठी एक मोठा दोर जवळ असणे आवश्यक आहे.
पाणी असणारी गडावरील एकमेव विहीर |
हा विहिर संकुल पाहून गडाच्या प्रवेशद्वारापासून सलग बांधलेल्या उत्तरेकडील तटबंदीच्या बाजूबाजूने फेरफटका मारायला सुरवात केली. दुपारच्या टळटळीत उन्हात तटबंदीवरून फेरफटका मारत असताना किल्ल्याच्या खाली असणारे हिरवेगार दाट जंगल मात्र डोळ्यांना सुसह्य करत होते. शेवटी पश्चिमेकडे किल्ल्याचे टोक निमुळते होत जाते तेथे एक उंच लोखंडी मनोरा उभारलेला दिसतो. गडाची उंची आणि मोक्याचे स्थान पाहता आजूबाजूच्या जंगलावर नजर ठेवण्यासाठी बहुदा वन विभागाने अथवा दुरसंचार विभागाने हा मनोरा उभा केला असावा. मनोऱ्यावर चढावे आणि किल्ल्याचा संपूर्ण पसारा एका नजरेत पहावा म्हणून त्या लोखंडी मनोऱ्याच्या शिडीला हात लावताच एक जबरदस्त चटका हाताला बसला आणि मनोऱ्यावर चढण्याचा बेत क्षणात रद्द झाला. मग तसेच पुढे किल्ल्याच्या पश्चिम टोकावर गेलो. येथे तटालगत समोरच्या डोंगराची सोंड आल्याने तटाखाली थोडा मैदानासारखा सपाट भाग तयार झाला आहे. या बाजूने शत्रूचा किल्ल्यात प्रवेश होऊ नये म्हणून या पश्चिम टोकावर एक भरभक्कम बुरुज बांधलेला आहे.
किल्ल्याखाली पसरलेले हिरवेगार जंगल |
पश्चिमटोकाकडे निमुळती होत जाणारी तटबंदी आणि बुरुज |
पश्चिम टोकावर असणारा लोखंडी मनोरा |
हा बुरुज आणि त्याच्या पुढे दक्षिणेकडे असणारा अजून एक भला मोठा बुरुज यामधली तटबंदी फोडून किल्ल्यावर एक रस्ता आलेला दिसतो. हिच ती गडाला लांबचा वळसा घालून येणारी धनगरपाड्यापासून बांधलेली जांभ्या दगडातली प्रशस्थ वाट. या वाटेने थोडेसे गडाखाली नक्की उतरावे कारण येथून खाली उतरले असता दोन्ही बाजूचे भरभक्कम बुरुज आणि गडाची बाहेरील मजबूत तटबंदी फारच सुंदर दिसते.
घड्याळात दुपारचे २ वाजून गेले होते. आता ज्याच्या घरी जेवणार होतो त्या बाबुला बरोबर घेऊन गडाच्या मुख्य दरवाज्यातून गड उतरण्यास सुरवात केली. २० मिनिटे खाली उतरल्यानंतर परतताना पहायचे असे ठरवलेल्या "तोफेचा माळ" या बोर्डापाशी पोहोचलो आणि तिकडून डावीकडे जाणाऱ्या पायवाटेला लागलो. हि मस्त झाडीभरली वाट गडाला बराच वळसा मारून एका मोकळवनात येते. येथून मागे वळून वर पाहीले असता पूर्व पश्चिम पसरलेला कलानिधीगड नजरेस येतो. येथे मोकळवनात दोन भग्न तोफा पडलेल्या दिसतात. इतिहासकाळात या माळावर बहुदा दारूगोळा साठवून ठेवण्यात येत असेल. चुकून कधी दारूगोळ्याचा स्फोट किंवा दुर्घटना घडलीच तर त्याची झळ किल्ल्याला व पर्यायाने गडावरील नागरी वस्तीला नको म्हणून ही खबरदारी घेतली गेली असेल. पण हा झाला तिथल्या पडलेल्या तोफा, तिथला बराच मोकळा भाग आणि "तोफेचा माळ" या वाक्यावरून मी बांधलेला अंदाज. इतिहास अभ्यासकांनी यावर अजून प्रकाश टाकावा.
माळावरून पुन्हा झाडी भरल्या वाटेने उतरणीला लागलो. साधारण १० मिनिटांची वाट चालून गेल्यावर एक दगडांनी बांधलेला चौथरा आणि त्यावर अनेक सुकलेल्या हारांच्या ढिगाऱ्या खाली झाकली गेलेली अनगड मूर्ती मामांनी दाखवली. हा देव "चाळोबा". मूर्तीवरचे हार बाजूला केले तशी एक भग्न मूर्ती दिसली. मनोमन त्या देवतेला नमन केले आणि शेजारीच असणारा एक जिंवत पाण्याचा झरा पाहिला. सध्या मात्र या झऱ्याच्या परिसरात झाडांचा पालापाचोळा पडू नये म्हणून लोखंडी जाळी टाकलेली असल्यामुळे त्यातले पाणी आपल्याला काढता येत नाही. गडाखाली असणाऱ्या धनगरपाड्यात लोखंडी पाईपने येथील पाणी नेलेले आहे असे मामांच्याकडून कळाले.
आता मात्र भूक अगदीच शिगेला पोहोचली होती. त्यामुळे झपाझप पावले टाकत पुढच्या १० मिनिटात धनगरपाड्यावरील बाबूच्या घरी पोहोचलो. मस्त थंडगार पाण्याने मनसोप्त हात, पाय आणि तोंड धुऊन फ्रेश झालो. नाचणीची भाकरी, झुणका, कुठलीशी रान भाजी, डाळ आणि भात अश्या फक्कड जेवणावर तुटून सगळे तुटून पडलो. पोटभर जेवण करून बाबू व त्याच्या घरच्यांचा निरोप घेतला तेव्हा घड्याळात दुपारचे साडेतीन वाजलेले. अजून "कालिवडे" गावापर्यंत किमान १० मिनिटे उतरल्यानंतरच गाडीजवळ पोहोचता येणार होते. भरपेट जेवणानंतर खरतर हे थोडसं अंतर सुद्धा नको वाटत होत. जड पावलांनी कसे तरी गड पायथ्याच्या "कालिवडे" गावात पोहोचलो आणि वाटाड्या म्हणून बरोबर आलेल्या कांबळे मामांचे आभार मानून त्यांच्या हातावर बिदागी ठेवली.
दुपारच्या उन्हात नको नको म्हणत शेवटी एकदाचा शिवरायांनी बांधलेला अजून एक गड सहकुटुंब पाहून झाला होता. सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत येतो. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा या किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात तसेच पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो. गडाची उंची समुद्रसपाटी पासून १०१५ मीटर एवढी आहे. गडाचा विस्तार लहान असल्यामुळे गड पाहण्यासाठी पायथ्याच्या "कालिवडे" गावातून ३ तासांचा कालावधी पुरेसा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे मात्र विहिरीतील पाणी काढण्यासाठी मोठा दोर बरोबर ठेवावा. गडावर मुक्काम करायचा झाल्यास दुरसंचार विभागाच्या बिल्डिंगच्या प्रांगणात पथाऱ्या पसरता येऊ शकतात.
गाडीला स्टार्टर मारला आणि वेगातच जवळ असणाऱ्या तिलारी गावाकडे रात्रीच्या मुक्कामासाठी निघालो. तिलारी गावात आधीच फोन करून "ग्रीन व्हॅली रिसोर्ट" बुक केलेले होते. रेसोर्टवर पोहोचलो तेव्हा दुपारचे ४.३० झालेले. हताशी तसा बराच वेळ शिल्लक होता आणि महत्वाचे म्हणजे बरोबरची सगळीच मंडळी चांगली अर्ध्या तासाची झोप काढून एकदम फ्रेश झालेली होती. मग इतक्या लवकर रूमवर जाऊन वेळ फुकट घालवण्यापेक्षा सूर्यास्त होईपर्यंत तिलारी परिसरातील पॉइंट्स बघण्याचा ठराव सर्वानुमते पास झाला. रेसोर्टमधीलच टाटांची दणकट अशी 4x4 झेनॉन गाडी घेऊन तिलारीमधील प्रसिद्ध स्वप्नवेल पॉर्इंट, रातोबा पॉइंट, गुहा, लष्कर सर्च पॉइंट, पारगड दर्शन असे महत्वाची ठिकाणे पाहिली. संध्याकाळी रातोबा पॉइंट येथे सुंदर सूर्यास्त पाहून ट्रेकचा दुसरा दिवस संपवला.
भारीच दादा ... 2 वर्षापूर्वीची भटकंती डोळ्यासमोर आली .. गडाजवळ एक छोटी वीरगळ हि पाहायला मिळाली होती
ReplyDeleteधन्यवाद प्रणव ... मला नाही दिसली ... चला म्हणजे अजून एक कारण झाल पुन्हा कलानिधीगड/पारगड पाहण्यासाठी :)
Deleteचांगल लिहीलय माहितीपूर्ण..
ReplyDeleteधन्यवाद भूषण
DeleteWah kya baat hai, khoop mast writing ahe Vinit, wonderful detailed info, keep blogging and share it whenever you write. Feels as if I am there on the fort while i read every word. ������
ReplyDeleteधन्यवाद दिपक भाई.
DeleteExcellent, very small small things covered, great, keep writing
ReplyDeleteमस्तच, वाचून अस वाटत होत की मीच गडावर जाऊन आलो. इथंबूत माहिती दिल्या बद्दल धन्यवाद!!
ReplyDeleteधन्यवाद विनय. ब्लॉग आवडला हे वाचून आनंद झाला.
Deletesuperb!!!!
ReplyDeleteThanks Ajit sir
DeleteAs always atishay uttam likhan, chitrikaran, Photo pahanyadhi likhanatun adhich te picture disun yete.
ReplyDeleteMahiti purvak tasech vachanala dharun theven ase likhan
Mast Vinit
Thanks for this comment Saurabh. I happy to see that you like the way I am writing the blogs and people are finding it helpful. Such comments encourage to write more and more. Thanks once again
Deleteविनीत खरोखरच खूपच सुंदर छान लेखन व फोटो. त्यामुळे असे वाटते की आपण प्रत्यक्ष गडावर जाऊन अनुभवत आहे.
ReplyDeleteधन्यवाद विनीत