दाट जंगलात हरवलेला, अल्पपरिचित वनदुर्ग "मुडागड"
उन्हाळा हा ट्रेकसाठी सामान्यतः निषिद्ध मानला जातो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रेक करताना बसणारा उन्हाचा तडाखा तर दुसर कारण म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे आटत जाणारे पाण्याचे स्त्रोत. मग उन्हाळ्यात ट्रेक करायचेच नाहीत का? तर अगदी तसंही काही नाही. खास उन्हाळ्यात करता येतील असे काही ट्रेक आजही पश्चिम घाटाच्या समृद्ध वनसंपदेत शिल्लक आहेत ज्यांना वनदुर्ग म्हटले जाते. घनदाट निबीड अरण्यात सह्याद्रीच्या विराट माथ्यावर विराजमान झालेले किल्ले म्हणजे वनदुर्ग. वासोटा, प्रचितगड, भैरवगड (हेळवाक), जंगली जयगड हि अश्याच काही सह्याद्रीमधील सुप्रसिद्ध वनदुर्गांची नावे. काहीश्या अश्याच निबिड अरण्यात लपलेला आणि बहुतेक ट्रेकर्सना नावाने देखील माहित नसलेला एक वनदुर्ग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात येणारा "मुडागड".
करवीर नगरी कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, पावनगड, विशाळगड, मुडागड, गगनगड, शिवगड, रांगणा, भुदरगड, सामानगड, गंधर्वगड, कलानिधीगड, महिपालगड, पारगड असे तब्बल १३ किल्ले येतात. यापैकी काही किल्ले त्यांचे असणारे ऐतिहासिक महत्व, किल्ल्यावर जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या मुबलक सोयी-सुविधा तसेच किल्ल्यांविषयी उपलब्ध असणारी भरपूर माहिती यामुळे कायम गजबजलेले असतात. पण मुडागडाच्या बाबतीत या सर्वच गोष्टीत अनास्था असल्यामुळे फारच कमी ट्रेकर या किल्ल्याकडे वळतात. अशावेळी जेष्ठ दुर्ग अभ्यासक, लेखक आणि गिरीप्रेमींचे मार्गदर्शक "श्री. भगवान चिले" सर यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. सविस्तर वर्णन करणारी तसेच निवडक व आकर्षक छायाचित्रांबरोबर गडकिल्ल्यांची इत्यंभूत माहिती देणारी अनेक संदर्भ पुस्तके चिले सरांनी लिहिल्यामुळेच मुडागडासारखा एक अल्पपरिचित दुर्ग माझ्यासारख्या भटक्याला बघता आला.
"शिवारण्य", मस्त वाटतो ना शब्द ऐकायला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे अभय मिळालेल्या मुडागडाच्या परिसरातील निबिड अरण्यास पूर्वी "शिवारण्य" म्हणले जायचे. याच जंगलात मुडागड लपला आहे. होय! लपला आहे असं म्हणावं लागेल कारण घनदाट जंगल हे या किल्ल्याचे बलस्थान असले तरी याच जंगलाने या किल्ल्याच्या अवशेषांचा पार ऱ्हास केला आहे. घनदाट वनराईने वेढलेल्या मुडागडाची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण २२९० फुट इतकी आहे. मुडागडला भेट देण्यासाठी सगळ्यात आधी गडपायथ्याचे पडसाळी हे गाव गाठावे लागते. कोल्हापूर-कळे-बाजारभोगाव-कोलीक-पडसाळी अशा साधारण ५५ किमीच्या गाडी मार्गाने आपण या गावात दाखल होतो. पडसाळी गावापर्यंत पोहोचण्यासाठी पक्की डांबरी सडक उपलब्ध असून कोल्हापुरातून दिवसाला चार ST बसेस गावात येतात. गावातल्या चौकात जेथे बस येऊन थांबते तेथेच शेजारी "विद्यामंदिर पडसाळी" या नावाची जिल्हा परिषदेची शाळा आहे. रात्रीच्या मुक्कामासाठी येणारे भटके या शाळेच्या कट्ट्यावर आपल्या पथाऱ्या पसरू शकतात.
|
पडसाळी गावातली शाळा (विद्यामंदिर) |
पडसाळी गावात पोहोचताच सगळ्यात आधी शोध सुरु करायचा तो एखाद्या जुन्या, वयस्क आणि जाणत्या माणसाचा. याचे मुख्य कारण म्हणजे मुडागडाच्या परिसरात असणारे घनदाट जंगल आणि किल्ल्यावर जाणाऱ्या अनेक फसव्या वाटा. त्यामुळे गडावर वाटाड्या शिवाय पोहोचणे अशक्य आहे. त्यात प्रत्यक्ष पडसाळी गावातीलच खूप कमी जणांना या किल्ल्याविषयी आणि त्यावरील शिल्लक असणाऱ्या अवशेषांविषयी माहिती आहे. त्यामुळे अशा योग्य व्यक्तीचा शोध घेऊन गावातूनच बरोबर आणलेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि गडाकडे कूच करायचे.
पडसाळी हे हिरव्यागार झाडांची झालर ओढलेल्या डोंगराच्या सानिध्यात वसलेले एक निसर्गसंपन्न गाव. जवळच कोकणातल्या "काजिर्डा" गावात उतरणारा ऐतिहासिक काजिर्डा घाट. काही वर्षापूर्वीच गावाजवळ पडसाळीचे धरण झाले आणि गावाचे नशीबच पालटले. आज येथे वर्षभर हिरवीगार शेते डुलताना दिसतात. याच शेतामधून वाट काढत पाच मिनिटात आपण एका कच्च्या रस्त्यावर येतो. हाच कच्चा रस्ता काजिर्डा घाटाच्या मुखाशी असणाऱ्या खिंडीपर्यंत जातो. या "काजिर्डा" घाटाने इतिहासकाळात कोल्हापुरातून सरळ रत्नागिरीच्या राजापुरात जाता येत असे. गावातून या कच्च्या रस्त्याने चालत जाताच एक ओढा आडवा येतो. अव्याहतपणे वाहात असणाऱ्या या ओढ्यात जलक्रीडेचा कितीही मोह झाला तरी तो तूर्तास आवरून पायातले बूट ओले होणार नाहीत याची काळजी घेत हा ओढा पार करायचा. या ओढ्यापासून पाचच मिनिटात आपण "काजिर्डा" घाटाकडे जाणारा कच्चा रस्ता सोडून डावीकडे शेताच्या बांधावर चढणाऱ्या पायवाटेला लागतो.
|
पडसाळी गावाबाहेर असणारा ओढा |
|
"काजिर्डा" घाटाच्या मुखाशी असणाऱ्या खिंडीपर्यंत पडसाळी गावातून जाणारा कच्चा रस्ता |
शेताच्या बांधावरून पडसाळी गावाच्या पश्चिमेकडे दिसणारा झाडी भरला डोंगर चढणे हे असते आपले पुढील लक्ष. डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेने थोडा दमछाक करणारा (१५ मिनिटांचा) चढ चढून जाताच आपण थोड्या मोकळवनात येतो. येथे डोंगर चढाई करून आलेला दम घालवण्यासाठी थोडावेळ थांबायचे आणि आजूबाजूला दिसणाऱ्या सुंदर परिसरावर नजर फिरवायची. समोर "काजिर्डा" घाटात उतरणारी खिंड, पडसाळीचे धरण आणि हिरव्यागार शेतांच्या सानिध्यात वसलेले पडसाळी गाव खूप सुंदर दिसते. घटकाभर विश्रांती घेऊन हे दृश डोळ्यात साठवायचे आणि पुन्हा वर चढत जाणारी व समोरच्या दाट झाडीत घुसणारी वाट धरायची.
|
समोर "काजिर्डा" घाटाची खिंड, डोंगराच्या मागे पडसाळी धरण आणि हिरव्यागार जंगलाची झालर ओढलेले पडसाळी गाव |
ह्या पायवाटेवर जंगल सुरु होण्याआधी उजव्या हातास एक जिवंत पाण्याचा झरा लागतो. या झऱ्यातून वर्षभर पाणी वाहत असते. हा झरा म्हणजे जंगलातील असंख्य जीवांचा पाण्याचा स्त्रोत. त्यामुळे येथे हात, पाय किंवा तोंड धुणे अश्या गोष्टी करून कृपया झऱ्याचे पाणी प्रदूषित करू नये. नितळ आणि थंडगार पाणी मनसोप्तपणे पिऊन तृप्त व्हायचे आणि लगेच जंगलात घुसायचे.
|
जिवंत पाण्याचा झरा |
|
जंगलाचे प्रवेशद्वार |
येथून खऱ्या अर्थाने सुरु होतो मुडागडाचा एक सुंदर आणि निसर्गरम्य जंगल प्रवास. जंगल भटकंतीचे अपरंपार सौख्य मिळवून देणारी हि मुडागडाकडे जाणारी वाट कधी एकदम घनदाट जंगल तर अधे मधे छोटे मोकळवण असे करत दोन पठारे उलांडून गडावर नेते. या जंगलात किल्याकडे जाणारी वाट अशी नाहीच. गावकर्यांनी एकावर एक दगड रचून तयार केलेल्या खुणेच्या मदतीने वाटाड्या आपल्याला गडाकडे नेत असतो. साधारण तासाभराची हि दाट जंगलातली वाट तुडवल्यावर शेवटी गडाचा झाडी भरला माथा समोर दिसू लागतो.
|
किल्ल्याच्या वाटेवर दाट दाट होत जाणारे जंगल |
|
किल्ल्याकडे जाणारी भर जंगलातली वाट |
किल्ल्याजवळ पोहोचताच वाटेला थोडासा चढ लागतो. साधारण दहा मिनिटांचा चढ चढून जाताच वाटाड्या आपल्याला दाट झाडीत विखुरलेले तटबंदीचे अनेक दगड दाखवतो, तेव्हा आपल्या लक्षात येते कि आपला गडप्रवेश झालेला आहे. सगळीकडे नुसत्या अस्ताव्यस्त वाढलेल्या वेली आणि गगनाशी स्पर्धा करणारी उंच उंच झाडे. त्यामुळे हा सगळा परिसर एकसारखाच भासतो. गावातला माहितगार माणूस बरोबर नसेल तर मुडागडाचे हे अवशेष आपण त्यांच्या अगदी जवळून गेलो तरी लक्षात येणार नाहीत.
|
तटबंदीचे निखळलेले दगड |
थोडे आणखी वर चढून जाताच वाटेच्या डाव्या हाताला झाडीमधे एकसलग तटबंदीचे आणखी काही अवशेष दिसतात. येथे बहुदा एखादा बुरुज असावा. आता येथून पुढील पाचच मिनिटात आपण गडाच्या माथ्यावर दाखल होतो. गडाचा माथा तरी केवढा तर जेमतेम १० माणसे बसू शकतील एवढीच काय ती मोकळी जागा. बाकी सगळे जंगलच जंगल. गडमाथ्यावरील या मोकळ्या जागेत एका झाडाखाली एक उखळ सदृश दगडी वस्तू आढळते. येथून समोरच दाट झाडीत एक भगवा झेंडा आपले लक्ष वेधून घेतो. झेंड्याजवळ पोहोचताच पुन्हा दगडी बांधकामाचे अवशेष दिसतात. हे बहुदा एखाद्या वाड्याचे जोते असावे.
|
दगडी चिऱ्याची एकसलग तटबंदी |
|
हे वाड्याचे जोते असावे |
|
दगडी उखळ सदृश भांडे |
सद्य परिस्थितीत मुडागडाचे गडपण सिद्ध करणारे एव्हढेच तुरळक अवशेष शिल्लक आहेत. पूर्वीच्या काळी पाण्याची व्यवस्था गडावर नक्कीच केलेली असणार पण बरीच शोधाशोध करून देखील एखादे पाण्याचे टाके किंवा हौद गडावर सापडत नाही. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी खास विदेशातून काही हत्ती आणून या शिवारण्यात ठेवले होते व त्या हत्तींसाठी बांधलेला तलाव व तट मुडागडाच्या परिसरात आहे असे वाचण्यात आले, पण हे अवशेष देखील घनदाट झाडीमुळे सापडत नाहीत.
|
दाट जंगलामुळे अश्याप्रकारे मुडागडावरील वास्तू खराब होत आहेत |
|
गडाबद्दलची माहिती वाचताना |
झाडी बाजूला करत गडाच्या माथ्यावरून पश्चिमेला थोडे खाली उतरले असता समोर लांबवर पसरलेले हिरवेगार घनदाट जंगल पाहून डोळ्याचे पारणे फिटते. वातावरण स्वच्छ असल्यास कोकणाच्या बाजूची दरी, दक्षिणेस गगनगड तर लांबवर विशाळगड देखील पाहता येतो. या सुंदर जंगलावर माणसाची वक्रदृष्टी न पडो अशी देवाकडे विनंती करून आल्या वाटेनेच पुन्हा पडसाळी गाव गाठायचे आणि आपली मुडागडाची भटकंती संपवायची. गावातून किल्ला पाहून परत येणास साधारण ५ तासांचा कालावधी पुरेसा आहे. मात्र या कालावधीत गडावर कोठेही पाणी उपलब्ध नाही यांची डोंगर भटक्यांनी नोंद घ्यावी. पडसाळी हे मोजून १५ घरांचे छोटेसे गाव असल्याने फक्त चार/पाच लोकांची जेवणाची व्यवस्था आगाऊ कल्पना दिल्यासच गावात होऊ शकते.
|
मुडागडाच्या माथ्यावरून दिसणारा परिसर |
आता थोडेसे गडाच्या इतिहासात डोकावू. हा गड कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणार्या "काजिर्डा घाटाच्या" रक्षणासाठी मुडागड हा किल्ला बांधण्यात आला होता. १७४८ च्या पेशव्यांच्या कागदपत्रात याचा उल्लेख आढळतो. नानासाहेब पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आले होते. त्यावेळी तुळाजीने हा गड वसविला व या गडाच्या आश्रयाने पन्हाळा प्रांतावर हल्ले केले. त्याला आळा घालण्यासाठी यसाजी आंग्रे व पेशव्यांना मदत करणारे सावंतवाडीकर यांनी एकत्रितपणे मुडागडाला वेढा घातला व गड जिंकून घेतला.
|
जंगलात सापडलेले रान गव्याचे शीर |
तर असा हा कोल्हापूर जिल्ह्यातील फारसा कोणास माहिती नसलेला, किल्ल्याचे अगदी तुटपुंजे अवशेष शिल्लक असलेला पण सुंदर जंगल भटकंतीचे अपरंपार सौख्य मिळवून देणारा मुडागड सच्च्या दुर्गप्रेमींनी एकदा नक्की पहावा.
@ VINIT DATE – विनीत दाते
ट्रेकिंग/भटकंती करताना:
- कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
- प्लास्टिकचा वापर टाळा.
- सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा.
- गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित असे प्रकार करू नका.
- निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा.
- जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
- मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
- लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका.
“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.
विनीत दा ब्लॉग नेहमीप्रमाणे, सोबत घेऊन जवावा असाच.
ReplyDeleteमे महिन्यात हिरवागार पट्टा पाहून नेत्र सुखावले��
अपरिचित आणि दुर्गम दुर्गाचा ब्लॉग लिहलास हे विशेष��
धन्यवाद देवा. अपरिचित किल्ल्यांची माहिती लोकांना व्हावी हाच हेतू आहे
Deleteआभारी आहे देवा..... आम्ही जाणार आहे तिकडे. पण तिथे जंगली प्राणी दिसतात का?
Deleteशिवारण्य"1दम मस्तच
ReplyDeleteधन्यवाद निशिकांतजी. बरेच दिवसात तुमच्याकडून लिखाण झाले नाही. द्या वाचायला काहीतरी फेरफटका वर
Deleteas always......mast lihilay......thanks for sharing it!!!!!
ReplyDeleteThanks Ajit sir
Deleteमस्तच, किल्या बद्दल दिलेल्या माहिती आणि फोटो उत्तम. इतक्या कडक उन्हात सुद्धा इतकी छान हिरवीगार झाडी टिकडे आहे हे बघून आश्चर्य वाटतं. अश्या दुर्मिळ किल्याचा इतिहास उलगडल्या बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद विनय. होय मुडागडाचे जंगल खूप सुंदर आहे
DeleteMastch Vinit bhau.. Aaj detail madhe vachu shaklo....khupach sundar
ReplyDeleteधन्यवाद क्षितिजजी
Deleteखुपच सुंदर ब्लॉग आहे तुमचा आणि फोटोग्राफी अफलातून आहे. मी रांगणा भटकंती केली होती तेव्हा माझ्याकडे रोल कॅमेरा होता, त्यामुळे ईतके छान फोटो माझ्याकडे नाही. सध्या मी http://www.misalpav.com या वेबसाईटवर अनवट किल्ले हि मालिका लिहीतो आहे, त्यामधे यातील काही फोटो वापरले तर चालतील का? अर्थात आपल्या नावासहच ते वापरणार आहे आणि तसा उल्लेखही असेलच.
ReplyDeleteकृपया कळवावे. माझे मिसळ्पाव वरचे लेखन तुम्ही ईथे पाहू शकता. http://www.misalpav.com/node/39881
फोटो नक्कीच वापरू शकता मात्र त्यावरील copyright वॉटरमार्क न काढता वापरणे तसेच फोटोसाठी उल्लेख व योग्य क्रेडिट देत असल्यास माझी काहीच हरकत नाही. धन्यवाद. लिहीत राहा
Deleteविनीत,
ReplyDeleteसुरेख अरण्यदुर्गाची भटकंती आणि ब्लॉग.. 👍🏻👏🏻😊
नेहेमीप्रमाणे, या दुर्गाबद्दलची comprehensive माहिती तुझ्या ब्लॉगवर ट्रेकर्सना वाचायला मिळेल..
(उन्हातल्या मुडागड पाजेच्या वाटेच्या आठवणीने काटा आला)
धन्यवाद!
विनीत,
ReplyDeleteसुरेख अरण्यदुर्गाची भटकंती आणि ब्लॉग.. 👍🏻👏🏻😊
नेहेमीप्रमाणे, या दुर्गाबद्दलची comprehensive माहिती तुझ्या ब्लॉगवर ट्रेकर्सना वाचायला मिळेल..
(उन्हातल्या मुडागड पाजेच्या वाटेच्या आठवणीने काटा आला)
धन्यवाद!
As expected
ReplyDeleteAtishay sundar rekhatan
👌🏼👌🏼👌🏼
Keep it up and give us best of it as u giving
आपल्याला यापुर्वी रांगणा किल्ल्याचे फोटो माझ्या लेखामधे वापरण्यासंदर्भात विनंती केली होती. माझ्या लेखाची हि लिंक
ReplyDeletehttp://www.misalpav.com/node/40062
आपण फोटो वापरु दिले त्याबध्दल आपला शतशः ऋणी राहीन.
श्री दाते
ReplyDeleteआपल्याकडे हेलवाक चे गाईड लांबोर याचा फोन नंबर असल्यास कृपा करून कळवा
राजू ठाकूर 9422036043
उत्तम वर्णन, वाचताना किल्ल्यावर स्वतः गेलो आहे असे वाटते.
ReplyDelete- राजेंद्र
भाऊ तुमचा नंबर हवा होता
ReplyDelete8600787212 या नंबरवर संपर्क करा आम्ही हा गड संवर्धनासाठी जाणार आहोत याची माहिती हवी प्लीज तुमचा नंबर द्या
ReplyDeleteEk no dada
ReplyDelete