दुर्गभ्रमंती कोल्हापूराच्या चंदगड परिसराची - भाग १

पूर्वनियोजन, प्रस्थान  आणि वल्लभगडाची भेट 



“ट्रेकिंगच भूत आणि सह्याद्रीच वेड, एकदा का कुणाला लागलं कि मग ते स्वस्थ बसू देत नाही”. आता हे कुणी म्हणलंय ते माहित नाही पण ज्याने कुणी म्हणलंय ते अगदी खरं आहे म्हणजे माझ्याबाबतीत तरी अगदीच १००% सत्य.


२०१६ च्या सप्टेंबर महिन्यात सायकलवरून पडण्याचे निमित्त झाले आणि गुढग्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर जवळ जवळ तीन महिने गपगुमान घरातच बसून काढले. जातिवंत भटक्याला हि एक मोठी शिक्षाच. त्यातच डोंगरभटक्यांचा सुर्वणकाळ असणारे सप्टेंबर ते फेब्रुवारी हे सहा महिने किमान यावर्षी तरी ट्रेकिंग शिवायच काढावे लागणार याची खंत देखील मनात होती. बरोबरच्या इतर सह्यमित्रांचे व्हाट्सएप्प ग्रुपवर रसाळ-सुमार-महीपत, रतनगड-कात्राबाई असे एक से बढकर एक ट्रेक्सचे नियोजन पाहून नुसती जळफळाट होत होती. शेवटी डिसेंबरच्या सुरवातीला या दुखापतीमधून हळू हळू बरा होऊ लागलो आणि डॉक्टरांकडून घराबाहेर पडण्याची मुभा मिळाली.


“पुढचे अजून सहा महिने तरी ट्रेक्स करायचे नाहीत”, इति डॉक्टर. पण घरी बसेल तर तो भटक्या कसला. ट्रेकिंग नाही तर नाही मग दुधाची तहान ताकावर भागवावी तसं डिसेंबर महिन्यात रत्नागिरीची आणि जानेवारीत महिन्यात औरंगाबादची एक सहकुटुंब सहल करून आलो. या सहलींचं प्लानिंग पण असंच केलं कि त्यातही एक/दोन किल्ले घुसडलेच. पुन्हा डिसेंबरच्या अखेरीस ट्रेकर मित्र चिन्मय कीर्तने याच्या लग्नाचे निमित्त साधुन सह्याद्रीमित्र ओंकार ओक याने केळवे-माहीम परिसरातल्या काही अल्पपरिचित किल्ल्यांचा एक मस्त ट्रेक जुळवून आणला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला विराग रोकडे याने मुंबईच्या किल्ल्यांची एक दिवसाची सफर घडवून आणली. एकूण काय तर जसं जसं बर वाटू लागलं तसं तसं घराबाहेर पडून किल्ल्यांच्या सानिध्यात जात राहिलो.


एक मात्र खरं कि ट्रेकिंगची पुनश्चः सुरवात थोडी आस्ते कदम करावी लागणार होती. त्यामुळे सुरवातीला छोटे आणि पूर्वी पाहिलेलेच किल्ले पुन्हा पहायचे ठरवले. तसाही कोणताही किल्ला किती वेळाही बघा (खास करून वेळवेगळ्या ऋतुत) एक वेगळाच आनंद देतो. त्यातही हे छोटे किल्ले पुन्हा पाहताना शक्यतो सहकुटुंब पहायचे जेणे करून मुलीला आणि बायकोला देखील ट्रेकिंगची आवड लागली तर बरच हा एक उद्देश ठेवला. त्याप्रमाणे सगळ्यात आधी फेब्रुवारीच्या मध्यावर तिकोना किल्ल्याचा एक ट्रेक सहकुटुंब व्यवस्थित पूर्ण केला. याच ट्रेकमधे मग येऊ घातलेल्या महाशिवरात्रीमुळे मिळणाऱ्या सलग सुट्ट्यांच्या ट्रेकचे नियोजन सुरु झाले.


तसा तीन दिवसांचा सहकुटुंब ट्रेक मी देखील पहिल्यांदाच करणार होतो त्यामुळे अनेक पर्यायांवर खल करून झाला. शेवटी दक्षिण कोल्हापूरातल्या चंदगड परिसरातले ६ किल्ले पहायचे यावर शिक्कामोर्तब झाले. त्यात पुन्हा सहकुटुंब ट्रेकला जातोय तर नुसतचं ट्रेक नको तर जमल्यास तिलारी परीसरातली दोन-चार ठिकाणं पण पाहून घेऊ असं ठरवलं. चंदगड परिसरातल्या या किल्ल्यांना मी या आधी पाचेक वर्षांपूर्वी भेट दिलेली असल्यामुळे कोणत्या किल्ल्यावर  विशेष काय पाहण्यासारखे आहे आणि निश्चित किती वेळ द्यावा लागेल याचा अंदाज व पूर्वानुभव होताच. त्यातच सह्याद्रीमित्र ओंकार ओक तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानच्या गितांजली लोकेगावकर यांनी या किल्ल्यांना नुकतीच भेट दिलेली असल्याने हा ट्रेक ठरवण्यासाठी त्यांची मोलाची मदत झाली.


आता फक्त प्रश्न होता ते म्हणजे घरातल्यांना या ट्रेकबद्दल राजी करायचं. तीन दिवसाच्या ट्रेकला सगळे मिळून जायचंय असं जेव्हा घोषित केलं तेव्हा अनेक प्रश्न विचारले गेले, “बापरे तीन दिवसांचा ट्रेक!”, “आम्हाला जमेल का?”, “किती चढाव लागेल”, “उन खूप वाढलं आहे” वगैरे वगैरे. मग घरी पटवून सागितलं कि या सहा किल्ल्यांपैकी फक्त एकाच किल्ल्यावर १ तासाची चढाई करावी लागते बाकी सगळ्या किल्ल्यावर गाडी बऱ्यापैकी माथ्यापर्यंत जाते तेव्हा कुठे संमती मिळाली. ट्रेकर मित्र प्रसाद परदेशी याला बरेच दिवसापासून हे किल्ले पहायचे असल्याने लगेच त्याला या ट्रेकबद्दल विचारलं आणि क्षणाचाही विलंब न लागता त्याचा देखील सपत्नीक या ट्रेकला येण्याचा होकार मिळाला. नंतरच्या आठवड्यात ट्रेकचे पूर्वनियोजन करत असताना आमच्याच सोसायटीमधले अजून एक कुटुंब (दिपक वनारसे आणि फॅमिली) त्यांचा दोन मुलांसह या ट्रेकला यायला तयार झाले. एकूण काय तर आता ट्रेकला एकूण १० जण झालो असल्याने दोन स्वतंत्र कार नेण्याचे ठरवले. 


आता या ट्रेकविषयी थोडक्यात सांगतो. दक्षिण कोल्हापूर म्हणजे चंदगड, आजरा आणि गडहिंगलज हे तीन तालुके. यातील चंदगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक दुर्गम, डोंगराळ पण तितकाच निसर्गसंपन्न असा तालुका. या तालुक्याच्या एका बाजूला आहे महाराष्ट्र-कर्नाटक राज्याची सीमा तर दुसरीकडे आहे विस्तृत वनक्षेत्राने व्यापलेला गोव्याचा दोडामार्ग परिसर. कोकण-गोव्याशी संलग्न असलेल्या तिलारी आणि आंबोली अशा दोन घाटमाथ्यांवर हा तालुका असल्याने येथे नैसर्गिक सौंदर्याचा खजिना आहे. शिवकालीन इतिहासाची आठवण करून देणारे पारगड, कालानिधीगड, महिपाळगड व गंधर्वगड असे चार किल्ले याच चंदगड तालुक्यात येतात. तर शेजारील गडहिंग्लज तालुक्यात सामानगड हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या पाच किल्ल्यांबरोबर महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेजवळील संकेश्वर गावाजवळचा वल्लभगड किल्ला देखील सहजी पाहता येतो. ट्रेकर मंडळींनी खालील प्रमाणे नियोजन केल्यास तीन दिवसात हे सर्व सहा किल्ले व तिलारीचा परिसर निवांतपणे पाहता येईल.


पुणे ==> कोल्हापूर ==> संकेश्वर ==> वल्लभगड ==> बेळगाव ==> चंदगड ==> पारगड(मुक्काम) ==> कलानिधीगड ==> तिलारी(मुक्काम) ==> महिपाळगड ==> गंधर्वगड ==> नेसरी ==> सामानगड ==> गडहिंग्लज ==> संकेश्वर ==> कोल्हापूर ==> पुणे


हेच सहा किल्ले तीन दिवसात खालील पद्धतीने सुद्धा करता येईल.


पुणे ==> कोल्हापूर ==> संकेश्वर ==> वल्लभगड ==> गडहिंग्लज ==> सामानगड (मुक्काम) ==> नेसरी ==> गंधर्वगड ==> महिपाळगड ==> कालानिधीगड ==> पारगड(मुक्काम) ==> तिलारी ==> चंदगड ==> बेळगाव ==> संकेश्वर ==> कोल्हापूर ==> पुणे


शुक्रवारी रात्री पुण्यातून निघाल्यास हाच ट्रेक दोन दिवसात (शनिवार व रविवार) असा देखील करता येईल.


पुणे ==> कोल्हापूर ==> संकेश्वर ==> वल्लभगड ==> कालानिधीगड ==> पारगड(मुक्काम) ==> महिपाळगड ==> गंधर्वगड ==> नेसरी ==> सामानगड ==> गडहिंग्लज ==> संकेश्वर ==> कोल्हापूर ==> पुणे 


थोडक्यात ट्रेक दोन दिवसांचा अथवा तीन दिवसांचा कसाही करता येईल मात्र पारगड किल्ल्यावरील मुक्काम चुकवू नये. या ट्रेकचे नियोजन अश्या पद्धतीनेच करावे कि पारगड किल्ल्यावर एक मुक्काम होईल. पारगड किल्ल्यावर राहण्यासाठी अनेक उत्तम जागा (मंदिर, शाळा, घरे) असल्याने व जेवणाची उत्तम व्यवस्था गडावर होत असल्याने पारगड किल्ल्यावर एक मुक्काम जरूर करावा. तसेच या तीन दिवसांमधे पहिल्या व तिसऱ्या दिवसाचे प्रवासाचे अंतर जवळ जवळ ४०० किलोमीटर पेक्षा जास्त असल्याने वेळेचे काटेकोर नियोजन फार महत्वाचे आहे. 





दिवस पहिला, २४ फेब्रुवारी २०१७:


शेवटी एकदाचा सहकुटुंब ट्रेकला निघण्याचा दिवस उजाडला. आज पहिल्या दिवशी संकेश्वर जवळचा वल्लभगड किल्ला पहायचा आणि पारगड किल्ल्यावर मुक्कामाला जायचे असे ठरवले होते. आजचे प्रवासाचे एकूण अंतर होते जवळजवळ ४१५ किलोमीटर. त्यातच आजचा मुक्काम पारगड किल्ल्यावर टेंट लाऊनच करायचा अशी सगळ्या बच्चे कंपनीची फार इच्छा होती त्यामुळे पारगड किल्ल्यावर दिवसाउजेडी पोहोचून मुक्कामासाठी योग्य जागा पाहणे गरजेचे होते. लवकर घर सोडू म्हणत सकाळी बरोबर ६.३० वाजता चिंचवडवरून निघालो व ७ वाजता प्रसाद व नेहा या उभयतांना कसबा पेठेतील त्यांच्या घराजवळून पीकअप केले. मग स्वारगेट, कात्रज आणि जुना कात्रज घाट असा प्रवास करत एकदाचे पुणे-सातारा रस्त्याला लागलो तेव्हा ७.४५ झाले होते. आता लवकरच कुठतरी सकाळचा मस्त नाष्टा उरकून घ्यावा असे वाटू लागले. मला एक कळत नाही, घरी उशिरापर्यंत म्हणजे अगदी सकाळी १० पर्यंत झोपून राहिलो तरी भुकेची जाणीव होत नाही पण प्रवासात मात्र सकाळी ७ वाजता सुद्धा शहराबाहेर पडलो कि लगेच भूक लागायला लागते. मग खंबाटकी घाट सुरु होण्याअगोदर नाष्टा उरकला आणि कोल्हापूरच्या दिशेने सुसाट गाडी सोडली.


कोल्हापूरच्या तावडे हॉटेल चौकात पोहोचलो तेव्हा दुपारचे १२.१५ झाले होते. येथेच माझी मेहुणी (प्राजक्ता) आम्हाला कोल्हापूर शहरातून या ट्रीपमधे जॉईन होणार होती. तिला गाडीत घेतले आणि इथून पुढे ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वल्लभगडाकडे निघालो. कोल्हापूर - कागल - निपाणी असा प्रवास करत संकेश्वर गावाच्या ३ किलोमीटर आधी सर्विस रोडवर वल्लभगडाच्या पायथ्याला जाणाऱ्या गावाकडे डावीकडे वळलो. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरूनच आपल्या उत्तम तटबंदीमुळे वल्लभगड आपले लक्ष वेधून घेतो. याआधी बेळगावकडे जाताना अनेक वेळा हा किल्ला लांबूनच पाहिला होता पण आज शेवटी या किल्ल्याला भेट देण्याचा योग आला. 


वल्लभगडाला पायथ्याच्या वल्लभगड या गावामुळे नामानिधान मिळाले. हा किल्ला महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर कर्नाटक राज्याच्या हुक्केरी तालुक्यात येतो. थोडक्यात काय तर महाराष्ट्राबाहेर असलेला शिवकालीन किल्ला म्हणून वल्लभगड हा एक महत्वाचा किल्ला आहे. राष्ट्रीय महामार्ग सोडला कि डांबरी रस्त्याने आपण थेट वल्लभगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावात पोहोचतो. गावातूनच एक कच्चा गाडीरस्ता गडाच्या अर्ध्या उंचीवर असणाऱ्या गावदेवी मरगुबाईच्या मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरापासून गडमाथा अगदीच थोडका म्हणजे फक्त १० मिनिटात गाठता येतो. देवीसमोर नतमस्तक व्हायचे आणि मंदिरामागून जाणाऱ्या पायवाटेला लागायचे. येथून मोजून ५ मिनिटात आपण वल्लभगडाच्या मुख्य दरवाज्यावर असणाऱ्या भरभक्कम बुरुजासमीप पोहोचतो. दोन मानवाकृती चित्रे असणारा हा भला मोठा बुरुज म्हणजे वल्लभगडाची वेगळी ओळख. हा बुरुज आणि बाजूची भक्कम तटबंदी यामधे वल्लभगडाचा गोमुखी पद्धतीने बांधलेला दरवाजा लपला आहे. हा दरवाजा आणि आतील पहारेकऱ्यांच्या देवड्या अजूनही उत्तम स्थितीत आहेत. 


गडाच्या अर्ध्या उंचीवर असणारे देवी मरगुबाईचे मंदिर. या मंदिरापर्यंत कच्चा गाडी रस्ता पोहोचलेला आहे.
किल्ल्याच्या दरवाज्यावरील भव्य बुरुज
गडाचा भव्य दरवाजा


दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करताच रस्ता काटकोनात वळतो. येथेच डाव्या हाताला एक झाड असून झाडाखाली नागदेवतेची मूर्ती आहे. समोरच हनुमंताचे सुंदर व प्रशस्थ मंदिर असून हे मंदिर म्हणजे गडावरील मुक्कामासाठी एक उत्तम जागा. पण आम्ही गडावर पोहोचलो तेव्हा मंदिर कुलूपबंद होते. मंदिराच्या दरवाज्यावर हिरव्या जाळीचा पडदा लावलेल्या असल्याने आतील हनुमंताची मूर्ती देखील पाहता आली नाही. मारुती मंदिराला लागुनच एक भव्य कमान असणारी व दगडी पायऱ्या असणारी भुयारी वाट आहे. हि वाट गडाच्या मध्यभागी असणाऱ्या खोल विहिरीत जाते असे वाचण्यात आले होते. भुयारी मार्गात उतरणाऱ्या पायऱ्यांचा हा मार्ग अत्यंत भव्य व प्रशस्थ असला तरी शेवटच्या काही पायऱ्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या मातीमुळे घसरड्या व धोकादायक झाल्या आहेत. आम्ही या भुयारी मार्गाने बरेच खाली उतरण्याचा प्रयत्न केला परंतु दाट काळोख व वटवाघुळांचा वावर यामुळे फार पुढे जाणे शक्य झाले नाही. 


झाडाखाली असलेली नाग देवतेची मूर्ती व समोर भव्य हनुमान मंदिर 
हनुमान मंदिराशेजारी असणारे भुयार
भुयारात उतरणाऱ्या पायऱ्या


हा भुयारी मार्ग पाहून गडाच्या मध्यभागी असणाऱ्या विहिरीकडे निघालो. गडाच्या बरोबर मध्यभागी एक मोठी विहीर आहे. हि चौकोनी आकाराची आणि जवळजवळ चाळीस फूट खोलीची जांभ्या दगडात खोदलेली विहिर सध्या मात्र पूर्णपणे कोरडी आहे. पूर्वी या विहिरीतूनच गडावर पाणी पुरवठा केला जायचा. हि विहीर पाहून गडाच्या उत्तर टोकाकडे निघालो. जाताना रस्त्यात अजून एक विहीर दिसली. येथेच आजूबाजूला अनेक जुन्या वास्तूंचे अवशेष देखील आहेत. गडाच्या तटाकडेने फेरी मारताना काही ठिकाणी उत्तम तर काही ठिकाणी ढासळत चालेली तटबंदी दिसते. गडाच्या दुसऱ्या टोकाला तटबंदीच्या आत असणारा एक सुटा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. या बुरुजावर चढण्यासाठी त्याच्या मध्यभागी काही पायऱ्या आहेत. बुरुजावर चढून गेले असता संपूर्ण गडावरील अवशेष दृष्टीक्षेपात येतात. बुरूजासमोरच एक भला मोठा टॉवर असून त्याच्या खाली पेशवेकालीन धाटणीचे महादेवाचे एक सुंदर दगडी मंदिर आहे.


गडावरील सगळ्यात मोठी विहीर
काही जुने बांधकामाचे अवशेष
गडाच्या एका टोकाला असणारा एकांड्या बुरुज
महादेवाचे पेशवेकालीन दगडी मंदिर 


महादेवाच्या मंदिराच्या थोडेसेच पुढे एक थोडा अवघड रस्ता गडाखाली उतरताना दिसतो. या रस्त्याने सावकाश खाली उतरले असता आपल्याला एका प्रशस्थ गुहेतील सिद्धेश्वराचे देवालय दिसते. गुहेत अलीकडेच्या काळात बांधलेला एक सिमेंटचा कट्टा असून त्यावर श्री सिद्धेश्वराच्या पादुका व मागे पितळी मुखवटा ठेवलेला आहे. या गुहेत उजव्या हाताला एक भुयार आरपार गेलेले असून ते पुढे संकेश्वर गावात उघडते असा समज आहे. येथे वल्लभगडाची साधारण ४५ मिनिटांची घडफेरी पूर्ण होते. आता येथूनच गडाला एक वळसा मारून मरगुबाई मंदिरापाशी पोहोचू शकतो किंवा आल्यावाटेने मग गड माथ्यावर येऊन मुख्य प्रवेशद्वारातून मरगुबाईच्या मंदिरापाशी पोहोचावे. गडावर जेवणाची अथवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही याची ट्रेकर मंडळींनी नोंद घ्यावी. वल्लभगडावर दुर्गवीर या संस्थेचे दुर्ग संवर्धनाचे खूप उत्तम काम चालते. त्यांच्या वेळोवेळो वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर होणाऱ्या दुर्ग संवर्धन मोहिमात आपण देखील सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी (http://durgveer.com/index.html)


गडाच्या दुसऱ्या टोकाला थोडे अर्ध्या उंचीवर गुहेत असलेले सिद्धेश्वर देवालय
गुहातील भुयार



आता वल्लभगडाच्या इतिहासात डोकावून पाहू. वल्लभगड नेमका कोणी बांधला याची निश्चित माहिती नाही मात्र वाचीव माहितीनुसार, कोल्हापूर प्रांतावर असणारा शिलाहारांचा अंमल पाहता हा किल्ला बांधण्याचे श्रेय देखील कोल्हापूर जिल्ह्यातील इतर किल्ल्याप्रमाणे शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते (जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा). पुढे सन १६६७ मध्ये शिवरायांनी गड स्वराजात आणला. सन १६८८ मध्ये वल्लभगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ मध्ये हा गड पुन्हा मराठयांकडे आला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. त्यानंतर १४ मे १७५३ रोजी करवीरकर छत्रपती संभाजी राज्यांनी सदाशिवराव भाऊ पेशवे यांना वल्लभगड, भीमगड,पारगड व कलानिधीगड हे किले जहागीर दिले. त्यांनतर किल्ला वंटमुरीकर देसाई यांच्या ताब्यात गेला. पुढे मराठ्यांच्या काळात तो सातारकरांकडे आल्यावर सन १७७६ मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी या किल्याची पुनर्बांधणी केली. यानंतर पुन्हा तो कोल्हापूरकरांच्या ताब्यात गेला. त्यानंतर पटवर्धनांच्या ताब्यात जाऊन सन १७९६ मध्ये परत कोल्हापूरकरांकडे आला. ज्यावेळी कोल्हापूरचे काही तालुके इंग्रजांच्या ताब्यात आले त्यावेळी सन १८४४ रोजी वल्लभगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. (माहिती साभार : http://durgveer.com/vallabhgad.html)


गडाची तटबंदी
गड माथ्यावरून वल्लभगड गाव


वल्लभगड पाहून पायथ्याला गाडी जवळ परत आलो तेव्हा दुपारचे २ वाजले होते आणि आता सगळ्यांनाच जाम भूक लागली होती. पटकन गाडी काढली आणि पुन्हा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन बेळगावकडे निघालो. आता पारगड किल्ल्याकडे जाण्यासाठी पार बेळगावपर्यंत याच टकाटक रोडवर गाडी चालवायची होती. पण जेवणासाठी हॉटेलचा शोध घेण्याच्या नादात गाडीचा स्पीड काही वाढत नव्हता. या महामार्गावर एकदा का तुम्ही महाराष्ट्र राज्याची बोर्डर ओलांडली कि हॉटेल्सची फार वानवा आहे. तेच पुणे ते कोल्हापूर दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूला इतकी हॉटेल्स आहेत कि अगदी वेटरचे तोंड जरी आवडले नाही तरी तुम्ही हॉटेल बदलू शकता. पण तेच कागल किंवा निपाणी गावानंतर हॉटेल्सची संख्या एकदम रोडावते. शेवटी आमच्या नशिबाने फक्त ३ किलोमिटर अंतरावर संकेश्वर गावाजवळ एक छान हॉटेल मिळाले आणि तिथेच पोटातल्या कावळ्यांना शांत केले. जेवण करून ३ वाजता हॉटेलमधून निघालो तेव्हा मोबाईल मधली GPS system पारगडाचे संकेश्वर गावापासूनचे अंतर १०५ किलोमीटर दाखवत होती. म्हणजे येथून पारगड किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण अडीच तासाचा वेळ लागणार होता. थोडक्यात, कुठेही न थांबता गेलो तरच अंधार पडण्याआधी पारगडावर पोहोचू शकणार होतो. तसेही पारगड किल्ल्यावर अगदी माथ्यापर्यंत गाडी रस्ता असल्याने किल्ला चढण्याचे कष्ट पडणार नव्हते. 


बेळगाव शहराच्या अगदी थोडेच आधी फ्लायओव्हर खाली उजवीकडे वळून चंदगड-सावंतवाडी रस्त्याला लागलो. पुढे मग पाटणे फाटा येथे डावीकडे वळून पाटणे गाव ओलांडले तसे रस्त्याच्या डाव्या बाजूस कलानिधीगड (काळानंदीगड) आमची सोबत करू लागला. गाडी थोडी बाजूला थांबवुन सर्वांना दुसऱ्या दिवसाच्या ट्रेकचे लक्ष असणारा व या संपूर्ण तीन दिवसांच्या ट्रेकमधे खऱ्या अर्थाने १ तास चढावा लागणारा कलानिधीगड दाखवला. पुढे पारगड गावाकडे जाणाऱ्या शेवटच्या रस्त्याला लागलो. हा पारगडाकडे जाणारा शेवटचा काही किलोमीटरचा रस्ता मात्र अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आणि त्यामधून जाणारा वळणावळणाचा रस्ता. किती ठिकाणी थांबू आणि किती ठिकाणी नको असं होतं पण दिवसाउजेडी गडावर पोहोचणे गरजेचे असल्याने बरेच ठिकाणी थांबावे वाटत असताना देखील मनाचा मोह आवरला. 


पारगड रस्त्यावरील अप्रतिम निसर्ग
पारगड किल्ल्याचे उत्तर टोक


संध्याकाळी बरोबर ५.४५ मिनिटांनी एकदाचे पारगड किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. समोरच किल्ल्यावर जाणारा पायऱ्यांचा मार्ग दिसला. इथून काही नवीन तर काही जुन्या अशा तीनशे ते साडेतीनशे पायऱ्या चढून गड माथ्यावर जाता येते. आम्ही मात्र या पायऱ्यांकडे दुरून डोंगर साजिरे करून त्याच्या अगदी शेजारून गडावर जाणारा गाडी रस्ता धरला. या शेवटच्या टप्प्यातील साधारण २ किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर गाडी अतिशय सावधपणे चालवावी लागते. कारण डाव्या बाजूला आहे पारगड किल्ल्याचा कातळ तर उजवीकडे आहे खोल दरी. त्यातच जेमतेम एकावेळी एकच मोठे वाहन जाऊन शकेल इतकाच हा रस्ता आहे. तसेच रस्त्याला खूप वळणे असून तीव्र चढ देखील आहे. 


हा पक्का गाडीरस्ता आपल्याला थेट गडाच्या माथ्यावर नेतो. रस्ता जिथे संपतो तिथेच पारगड निवासिनी भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत तर समोर वर्षानुवर्षे किल्ल्यावर नांदणाऱ्या लोकांची घरे. यातीलच एका देविदास गडकरी यांच्या घरात आमची जेवणाची व्यवस्था आधीच फोन करून कळवली होती. त्यामुळे बाकी सगळ्यांना सूर्यास्त पाहण्यासाठी पाठवून मी देविदास गडकरी मामांच्या घरी गेलो. आज दिवसभरात बऱ्याच लांबचा प्रवास झाल्याने सगळ्यांनाच कंटाळा आलेला होता. सगळ्यांसाठी मस्त चहा बनवायला सांगून मामांकडून रात्रीच्या मुक्कामासाठी गडावर कुठे राहता येईल याबद्दल विचारपूस केली. त्यांनी तर इथंच त्यांच्या घराच्या पडवीमधे किंवा बाहेरच्या एका खोलीत निवांत रात्र काढा असं सांगितलं. पण बच्चेकंपनी आणि इतर मोठ्यांना टेंटमधेच राहण्याचा व मोकळ्या आकाशाखाली कॅम्पिंग करण्याचा अनुभव घ्यायचा असल्याने तशी एखादी उत्तम व सुरक्षित जागा मामांना विचारली. गडाच्या दक्षिणेकडील तटबंदीजवळ बिनधोक तुमचे तंबू टाका असं त्यांनी सांगितले. एवढेच काय तर स्वतः बरोबर येऊन कॅम्पिंगच्या ठिकाणापासून जवळच असलेला तलाव दाखवून आमच्या पाण्याचा मोठा प्रश्न देखील सोडवला.


सुर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर कॅम्पिंगची जागा स्वच्छ करून तीन टेंट उभारले. कॅम्प साईटची व्यवस्था करून गडकरी मामांच्या घरी जेवणासाठी हजर झालो. मामांनी रात्रीच्या जेवणासाठी छोले, कोशिंबीर, पोळ्या, पापड, लोणचं, डाळ, भात आणि या सगळ्या बरोबर गरमागरम कच्च्या केळ्यांची भजी असा फक्कड बेत बनवला होता. सगळ्यांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. बच्चे कंपनी तर दिवसभर खेळून, पळून आणि उन्हात फिरून कंटाळाली असल्याने मोठ्यांची जेवण होईपर्यंत झोपी सुद्धा गेली. मामांना सकाळी लवकरच चहा आणि नाष्ट्याची व्यवस्था करायला सांगून त्यांचा निरोप घेतला व कॅम्पसाईटवर परत आलो. दुसऱ्याच दिवशी अमावस्या असल्याने आकाश एकदम निरभ्र आणि स्वच्छ होते. महत्वाचे म्हणजे आजूबाजूला शहरासारखा लाईटिंगचा झगमगाट नसल्याने आकाशात असंख्य तारे व नक्षत्र सहज पाहता येत होते. मुलांना टेंटमधे झोपवून सगळे थोडावेळ मोकळ्या आकाशाखाली गप्पा मारत बसलो. बरोबर आलेल्या दिपक वनारसे यांना आकाशातील ग्रह, तारे आणि नक्षत्रांची बऱ्यापैकी माहिती असल्याने त्यांनी त्याविषयीची माहिती सर्वांना सांगितली. पण थोड्यावेळातच झोप प्रत्येकाच्या मनावर ताबा मिळवू लागली तसे एक एक जण टेंटमधे शिरू लागला. मी देखील आजूबाजूचा परिसर पुन्हा एकदा न्याहाळून टेंटमधे शिरलो. आज दिवसभर ड्रायविंग करून पार कंटाळलो असल्यामुळे स्लीपिंग बॅग अंगावर ओढून कधी निद्रा देवीच्या आधीन झालो ते कळले देखील नाही!


क्रमश: 


@ VINIT DATE – विनीत दाते


Click here to visit Picasa album for Vallabhgad


ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 


“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.



Comments

  1. विनीत, खुप छान सखोल माहितीपूर्ण लेख आहे. अशीच छान भ्रमन्ती व लिखाण चालु राहु दे!

    ReplyDelete
  2. Nicely written!! waiting for next part!!

    ReplyDelete
  3. झकास, बऱ्याच दिवसांनी असा मराठी आणि गडां संबंधी माहिती देणारा ब्लॉग वाचला. छान लिहिता आपण, असच आपलं लिखाण चालू ठेवा म्हणजे आम्हाला उत्तम माहिती मिळत राहील :)

    ReplyDelete
  4. नमस्कार


    आपल्या वेबसाईटवर असलेला हरागापूर हा उलेख खोडावा या किल्ल्याचे नाव फक्त वल्लभगड आहे व गावचे नाव वल्लभगड आहे याची नोंद घ्यावी .

    धन्यवाद
    गजानन शिवाजी साळूंखे-वल्लभगड
    www.vallabhgad.com
    vallabhgad@gmail.com
    ८१०८६७५१७७


    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. ही माहिती मी जशी पूर्वी ऐकली तशी टाकली होती. आता योग्य ते बदल करून हारगापूर काढलेले आहे.

      Delete
    2. धन्यावाद. सर

      Delete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana