भुदरगड_Bhudargad
शिलाहारांच्या विविध शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचे घराणे मानले जाते. या घराण्याने इसवी सन ९४० ते १२१२ या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण १६ राजे सिंहासनावर बसले त्यामधील शेवटचा राजा भोज (दुसरा) हा होता. त्याने ११७५ ते १२१२ या काळात राज्य केले आणि जवळ जवळ १५ किल्ले बांधले. सध्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्हयातील पन्हाळगड, विशाळगड, गगनगड, रांगणा, अजिंक्यतारा असे अनेक महत्वाचे किल्ले बांधण्याचे श्रेय या राजाकडेच जाते. चला तर मग, आज दुर्गभ्रमंती करू याच शिलाहार वंशीय महामंडलेश्वर राजा भोज (दुसरा) याने बांधलेल्या भुदरगड या किल्ल्याची.
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यात त्याच नावाचा हा किल्ला आहे. खर तर भुदरगड किल्ल्याचेच नाव या तालुक्याला दिले आहे असे म्हणावे लागेल. कारण भुदरगड नावाचे कोणतेही गाव या तालुक्यात नाही. गारगोटी हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण असून सर्व प्रशासकीय कामे गारगोटी शहरातूनच चालतात. गारगोटी पासून फक्त १० किलोमीटर अंतरावर भुदरगड किल्ला आहे. महाराष्ट्रातील निवडक किल्ल्याप्रमाणेच हा किल्ला देखील सहकुटुंब भेट देता yeto कारण या किल्ल्याच्या माथ्यापर्यंत डांबरी सडक पोहोचलेली आहे.
भुदरगड किल्ल्यावरील भैरवनाथाचे मंदिर |
कोल्हापूर – कागल – निढोरी – गारगोटी असा साधारण ७१ किलोमीटरचा प्रवास करून आपण थेट भुदरगडाच्या माथ्यावर दाखल होतो. गडमाथ्यावर भैरवनाथाचे जागृत देवस्थान असल्याने गडावर पर्यटकांची आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असते. पक्का डांबरी रस्ता आपल्याला भैरवनाथाच्या मंदिरासमीप घेऊन जातो. सध्या गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय असणारी एकवेम वास्तू म्हणजे हे भैरवनाथाचे मंदिर होय. प्राचीन असे हे मंदिर जीर्णोद्धार केलेले असल्याने नवीन बांधकामात हरवून गेलेले आहे.
भैरवनाथाचे मंदिर बसक्या पद्धतीचे असून याचा कळस देखील छोटा आहे. नंतरच्या काळात मंदिराच्या आजूबाजूने बरेच सिमेंटचे बांधकाम झालेले दिसून येते. या नवीन बांधकामातच पश्चिमेकडे मंदिरच्या आवारात प्रवेश करण्यासाठी एक छोटे प्रवेशद्वार बनवलेले आहे. मंदिर आवारात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस पालखीचा चौथरा तर डाव्या बाजूस मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. मुख्य मंदिरासमोरील चौथऱ्यावर तेलाने माखलेल्या काही कोरीव शिळा आहेत. येथेच मागील बाजूस एक जुनी दगडी दीपमाळ असून तिचे अस्तित्व आता धोक्यात असल्याचे जाणवते.
भैरवनाथाच्या मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार, मंदिर आवारातील काही शिळा आणि जुनी दगडी दीपमाळ |
मुख्य मंदिरात प्रवेश करताच लक्षात येते कि भैरवनाथाचे मुळ मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. मुळच्या मंदिराच्या बांधणीतच अजून एक प्रवेशद्वार असून मंदिराचे मंडप आणि गाभारा असे दोन भाग दिसतात. मंदिराचा मंडप प्रशस्थ असून दोन्ही बाजूस कमानी आहेत. मंडपात जमिनीवर आणि दोन्हीकडील कमानीच्या अर्ध्या पर्यंत विविध रंगाच्या टाईल्स बसवलेल्या आहेत. समोर गाभाऱ्यात भैरवनाथाची काळ्या पाषाणातील शस्त्रसज्ज मूर्ती खूप सुंदर दिसते.
भैरवनाथाच्या मूळच्या जुन्या मंदिरामधील दगडी ओवऱ्या, दोन्ही बाजूने कमानी असणारा मंडप आणि त्यामधील श्री भैरवनाथ |
भैरवनाथाचे दर्शन घेऊन मंदिरा बाहेर पडलो की प्रवेशद्वारासमोर काही अंतरावर दोन छोट्या दीपमाळा आणि त्याच्या मधे एक जुना समाधीचा चौथरा दिसतो. त्याच्या शेजारीच डावीकडे मोबाईचा एक भला मोठा टॉवर आहे. मंदिरासमोरच ध्वजस्थंभाचा बुरुज अजून त्यावर एक इंग्रजकालीन तोफ ठेवलेली आहे. या बुरुजावर उभे राहिले कि गडपायथ्याची छोटी छोटी गावे आणि अजूबाजूचा हिरवागार निसर्ग याचे सुंदर दर्शन होते. तसेच बुरुजाच्या दोन्ही बाजूस लांबपर्यंत पसरलेली वळणदार तटबंदी खूप सुंदर दिसते. या बुरूजाशेजारीच तटबंदीला लागून एका दगडी चौथऱ्यावर अजून एक भव्य दीपमाळ उभी आहे. मंदिर आवारातील जुन्या दीपमाळेची पडझड झाल्यानंतर बहुदा हि दुसरी दीपमाळ नंतरच्या काळात बांधली गेली असावी.
मंदिरासमोरील दोन दीपमाळा आणि मधे समाधीचा चौथरा |
गडपायथ्याला वसलेले निसर्गाच्या कुशीतील पेठ शिवापूर गाव |
गडाच्या एका भव्य बुरुजावर ठेवलेली इंग्रजकालीन तोफ व त्यावरील काही चिन्ह |
भुदरगड हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३२०० फुट उंचीवर असून, गडपायथ्याच्या गावापासून साधारण २१०० फूट उठवलेला आहे. या किल्ल्याला महाराष्टातील फार थोड्या किल्ल्यांप्रमाणे विस्तीर्ण आणि सपाट गडमाथा लाभलेला आहे. किल्ल्याची दक्षिणोत्तर लांबी २६०० फूट असून रूंदी २१०० फूट इतकी प्रचंड आहे. भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत पक्का गाडी रस्ता जात असल्याने मंदिर परिसरातले वरील दिलेले अवशेष प्रथम बघून घ्यायचे आणि मग गड्माथ्याच्या विस्तीर्ण परिसरात विखुरलेले इतर अवशेष पाहायला निघायचं. हे अवशेष पायी चालत पाहण्यासाठी बराच वेळ लागू शकतो त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी गाडी असेल तर कच्च्या रस्त्याने गडावरील जवळ जवळ सर्वच अवशेषांपर्यंत गाडीने पोहोचता येते.
आता आपला मोर्च्या वळवायचा तो भुदरगडावरील भव्य दुधसागर तलावाकडे. गाडी रस्त्याने गडावर दाखल होताच हा भव्य तलाव आपले लक्ष वेधून घेतो आणि कधी एकदा या तलावाकडे धूम ठोकू असं होऊन जात. तलावाकडे जात असताना रस्त्यातच एक भग्न वास्तू दिसते. हे आहे गडावरील "अंबामाता मंदिर". हे छप्पर नसलेले भवानी मातेचे मंदिर पूर्णपणे उध्वस्थ झालेले असून बाजूच्या भिंती कश्याबश्या तग धरून उभ्या आहेत. मात्र मंदिरामधली काळ्या पाषाणातील जुनी व रेखीव अशी देवीची मूर्ती अजूनही उत्तम स्थितीत आहे. या मंदिरापुढे आणि आजूबाजूला असणाऱ्या काही समाध्या पाहून तलावाच्या काठावर यायचे.
छप्पर नसलेले व उध्वस्त झालेलेल भवानी मातेचे "अंबामाता मंदिर" |
गडावर विखुरलेल्या काही समाध्या |
तलावाजवळ आलो कि भुदरगडाच्या माथ्यावर वाहणारा भर्राट वारा आपले स्वागत करतो. या वाऱ्यामुळे तलावातील पाणी सुद्धा हेलकावे खाते आणि त्यामुळे सुंदर लाटा तयार झालेल्या दिसतात. तलावाचे पाणी येथील मातीच्या गुणधर्मामुळे म्हणा किंवा मातीच्या रांगामुळे थोडे दुधाळ दिसते. मात्र तलावातले पाणी पिण्यास योग्य नाही. या तलावाच्या सगळ्या बाजूंनी घडीव दगडाची सुंदर तटबंदी बांधलेली आहे. तलाव उजवीकडे ठेवत चालायला लागलं कि जमिनीत अर्ध गाडलं गेलेलं एक जीर्ण मंदिर दिसत. मंदिरात वाकून पाहिल्यावर लक्षात येत की हि तर चक्क एक गुहा आहे. मंदिरासाठी जमीन पोखरून गुहा बनवली आहे आणि नंतर बाहेरून सभामंडप घालून मंदिर बनवलेले दिसते. मंदिराच्या घुमटाला सुंदर नक्षीकाम केलेले असून गुहासदृश गाभाऱ्यात काही जुन्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
गडाचे वैभव असणारा “दुधसागर तलाव” |
जमिनीत अर्धे गाडले गेलेले एक जीर्ण मंदिर |
तलावाच्या काठाने तसेच पुढे गेल्यानंतर अजून एक छोटे मंदिर दिसते. त्याच्या डाव्याबाजूला अजून एक छोटा साच पाण्याचा तलाव असून पुन्हा काही समाध्या दिसतात. काही अंतर तसेच पुढे चालून गेल्यावर घरांची अनेक जोती दृष्टीस पडतात. येथेच गडाची जुनी पण उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटामधे काही ठिकाणी दगडी जिने तयार केलेले असून त्याने तटावर चढता येते. तटावर उभे राहीले की गडपायथ्याला वसलेले पेठ शिवापूर गाव दिसते. हे सर्व अवशेष पाहून पुन्हा "दुधसागर" तलावाजवळ परत यायचे आणि तलावाच्या दुसऱ्या काठावर असणाऱ्या एका मंदिराकडे जायचे. तलावाच्या या दुसऱ्या काठावर शंकराचं एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर मोठया घडीव दगडांनी शुष्कसांधी पद्धतीने बांधलेले दिसते. शुष्क सांधी म्हणजे दोन दगडांमध्ये चुना, सिमेंटसारखे कोणतेही जोडणारे मिश्रण न वापरता निव्वळ दगड एकमेकावर ठेऊन बांधलेली मंदिरे होत.
“दुधसागर” तलावाच्या सगळ्या बाजूंनी घडीव दगडाची सुंदर तटबंदी बांधलेली आहे |
मोठया घडीव दगडांनी शुष्कसांधी पद्धतीने बांधलेले महादेवाचे मंदिर |
महादेवाचे मंदिर पाहून तसेच पुढे पूर्वेकडील गड पायथ्याच्या "जाखिणपेठ" गावाकडे उतरणारा कच्चा गाडी रस्ता धरायचा. पूर्वी येथे जाखिणपेठ गावात उतरणारा "जाखिण दरवाजा" होता. हा दरवाजा काल्लौघात पूर्णपणे नष्ट झाला असून त्याजागी शासनाने लाल रंगाच्या दगडातील नवीन भिंत वजा तटबंदी बांधलेली आहे. जाखिणपेठ गावात उतरणाऱ्या वळणावळणाच्या या कच्च्या रस्त्याने साधारण १ किलोमीटर खाली उतरले कि रस्त्याच्या डाव्याबाजूलाच एक भला मोठा दगड (शिळा) आपले लक्ष वेधून घेतो. हे भली मोठी ताशीव शिळा नक्की आहे तरी काय हे बघण्यासाठी आपण जेव्हा तिच्या जवळ पोहोचतो तेव्हा दिसते चक्क दगडात खोदलेली १०x१० ची एक मोठी खोली. याला स्थानिक लोक "पोखर धोंडी" असे म्हणतात. पहारेकर्यांच्या विसाव्यासाठी केलेली अशी वेगळ्याच धाटणीची व्यवस्था बहुदा फक्त याच किल्ल्यावर असावी.
दगडात खोदलेली १०x१० ची एक मोठी खोली |
या खोलीला स्थानिक लोक "पोखर धोंडी" असे म्हणतात |
हि "पोखर धोंडी" पाहून कच्च्या गाडी रस्त्याने पुन्हा गडमाथ्याकडे परत फिरायचे. जाखिणपेठ गावातून गडमाथ्यावर जेथे आपला गडप्रवेश होतो तिथेच रस्त्याच्या डाव्याबाजूला एक छोटा कोरीव नंदी दिसतो. "हा नंदी असा एकटाच कसा?" असा प्रश्न नक्कीच पडतो कारण या नंदीसमोर कोणतेही मंदिर किंवा इतर अवशेष दिसत नाहीत. मात्र या नंदीजवळ पोहोचलो की येथे जमिनीत खोदलेले एक भुयार दिसते. या भुयारात उतरण्यासाठी १० कातळकोरीव पायऱ्या असून हे आहे गडावरील "श्री जाखुबाई" मंदिर. हे जाखुबाईचे गुहा मंदिर म्हणजे जमिनीत खोदलेले एक मोठे दालन आहे. या दालनात अनेक कोरीव मूर्त्या मांडून ठेवलेल्या असून उजेड व हवा खेळती राहण्यासाठी दालनाच्या समोरील बाजूस कातळ खोदून दोन खिडक्या केलेल्या आहेत.
गडावरील "श्री जाखुबाई" गुहा मंदिर |
भुयारात उतरण्यासाठी असणाऱ्या १० कातळकोरीव पायऱ्या आणि देवता |
आता पुन्हा जाखिणपेठ गावातून येणाऱ्या कच्च्या रस्त्यावर परत येऊन भैरवनाथ मंदिराकडे निघायचे. या रस्त्याने भैरवनाथ मंदिराकडे जाताना डाव्या हातास एक जीर्णोद्धार झालेले मोठे मंदिर दिसते. हे आहे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले गडावरील पुरातन असे "केदारलिंग शिवमंदीर". या मंदिराच्या सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा असून गाभाऱ्यात सुंदर शिवलिंग स्थापन केलेले आहे. हे मंदिर प्रशस्थ असून गडावरील मुक्कामासाठी एकदम योग्य अशी जागा आहे. या मंदिराच्या लगेच पुढे जांभ्या दगडात बांधलेले पण सध्या पूर्णपणे ढासळलेले गडावरील कचेरीचे भले मोठे बांधकाम आहे. कचेरीच्या आत सदरेचे अवशेष दिसतात. हे अवशेष पाहून भैरवनाथ मंदिरापाशी पुन्हा डांबरी सडकेला लागायचे. येथे आपली साधारण ३ तासांची गडफेरी पूर्ण होते. गडावर पिण्यायोग्य पाणी भैरवनाथ मंदिराच्या मागे असणाऱ्या हातपंपावर उपलब्ध आहे. गडावर जेवणाची मात्र कोणतीही व्यवस्था नाही.
करवीरकर छत्रपतींनी जिर्णोध्दार केलेले गडावरील "केदारलिंग शिवमंदीर" |
मंदिरातील प्रांगणातील शिवरायांचा अर्धपुतळा |
कचेरीच्या उद्ध्वस्त वास्तूचे अवशेष |
ब्लॉग भारीच झालाय. नेहमीप्रमाणे मुद्देसूद!
ReplyDeleteट्रेकर ब्लॉगरचा फोटो पण लागला__/\__
मंदिरासमोरील दोन दीपमाळा आणि मधे समाधीचा चौथरा असे जे म्हटलंय तो समाधीचा चौथरा नसून तुळशी वृंदावन असावे असे माझ्या बाळबोध मनाला वाटते. कारण मंदिरासमोर दोन दीपमाळ आहेत आणि मंदिरा समोरच समाधी हे समीकरण जुळत नाही असे वाटते.
तुम्ही अभ्यासू आहात.
धन्यवाद देवा! मंदिरासमोर समाधी असते. तो चौथरा तुळशी वृंदावन मात्र नाही. तो चौथरा बहुतेक पालखीचा असू शकतो.
Deleteधन्यवाद मुकुंद
ReplyDeletesuperb......very nicely done Sir!!!
ReplyDeleteThanks Ajit!
Deleteखूप सुंदर लिखाण. तुमचा ब्लॉग म्हणजे किल्ल्यांची virtual भेटच असते. अभ्यासपूर्ण लिखाण आणि ट्रेकर ब्लॉगरचा फोटो यामुळे ब्लॉगला चार चाँद वगैरे काय ते लागालेत .
ReplyDeleteमस्त
धन्यवाद सुजित
Deleteमला भुदरगड किल्ला विषयी बांधकाम व सुरक्षा यंत्रणा वर माहिती हवी आहे
ReplyDelete