रोहिलागड उर्फ रोहिलगड

जालना जिल्ह्यातील एकमेव गिरिदुर्ग रोहिलागड 


डिसेंबर २०१८ साली केलेल्या वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) किल्ल्यांच्या भटकंतीवेळी थोडी वाट वाकडी करून भेट दिलेला मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील हा एकमेव गिरिदुर्ग.  खरंतर विदर्भातल्या किल्ल्यांच्या भटकंतीची सुरवात अकोला जिल्ह्यातील बाळापुरच्या किल्ल्यापासून करायची असे ठरवले होते. पण अगदी पहिल्याच रात्री चिंचवड ते बाळापुर असा ४७० किमीचा सलग १० तासांचा प्रवास जरा कांटाळवाणा झाला असता त्यामुळे मग प्रवासाच्या पहिल्या रात्री औरंगाबाद-जालना हायवेपासून जवळ असणाऱ्या "रोहिलागड" या गावात मुक्काम करायचा आणि सकाळी गावाच्या पाठीमागे असणारा "रोहिलागड" हा किल्ला लगे हात उरकून टाकायचा असे ठरवले. तसाही जालना जिल्ह्यातला हा एकमेव दुर्ग, त्यामुळे तो असाही जाता येताच पदरी पाडून घेणे गरजेचे होते. 


रोहिलागड हा खरंतर बरेच ट्रेकर्सना अल्पपरिचित असा किल्ला. कोणत्याही पुस्तकात या किल्ल्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. इंटरनेटवर देखील अलीकडेच ट्रेकक्षितीज या संस्थेच्या वेबसाईटवर या किल्ल्याची थोडीफार माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मग रोहिलागड किल्ल्याची आणखी माहिती शोधायला सुरवात केली तसे एका वेबसाईटवर रोहिलागड गावातील गडमित्र विशाल टकले याचा संपर्क क्रमांक मिळाला. सहज म्हणून त्या नंबरवर फोन लावला व २२ डिसेंबर २०१८ च्या सकाळी रोहिलागड गावामागील किल्ला पहायचा आहे अशी इच्छा त्याला सांगितली. पुण्यातून ३०० किमीचा प्रवास करून आम्ही त्याच्या गावातील किल्ला पाहायला येणार आहे असे कळताच त्याला खूपच आनंद झाला आणि त्याने स्वतः आमच्या बरोबर किल्ला दाखवायला येण्याचे कबूल केले. एवढंच काय तर २१ डिसेंबरच्या रात्री कितीही उशीर झाला तरी गावातल्या देवळात किंवा इतर कोठेही उघड्यावर मुक्काम न करता आपल्या घरीच झोपायला येण्याचा त्याने आग्रह धरला. खरंच गावातली माणसं किती प्रेमळ असतात नाही? बघा ना, कोण कुठला हा विशाल. या आधी ना त्याला कधी भेटलो होतो कि बोललो होतो पण फक्त एका फोनवर या पोराने स्वतःच्या घरी तेही अपरात्री आमची राहण्याची व्यवस्था केली.


शुक्रवारी, २१ डिसेंबरच्या रात्री ९ वाजता चिंचवड सोडलं आणि मग पुणे स्टेशन व नगररोड येथे अनुक्रमे ओंकार केळकर, भुषण नाडकर्णी, केतन मावळे, प्रसाद आणि नेहा परदेशी अश्या ट्रेकभिडूंना पिकअप करत पुणे - अहमदनगर रस्त्याला लागलो तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. मग वाघोली आणि शिक्रापूर मधल्या भयंकर ट्राफिकला मागे टाकत रात्री ३ वाजता औरंगाबादजवळ पोहोचलो. औरंगाबाद शहराच्या साधारण दहा-बारा किलोमीटर अलीकडे वाळूंज येथे औरंगाबाद शहराला बायपास करत आधी नगर-पैठण लिंकरोड गाठला आणि मग बीड-सोलापूर हायवेला लागलो. पुढे औरंगाबादवरून बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर चितेगाव, अडूळ अशी गावे मागे टाकली आणि दाभरूळ येथे डावीकडे रोहिलागड गावाकडे जाणारा रस्ता धरला. विशाल रात्री ३ वाजल्यापासूनच जागा होता आणि माझ्या कायम संपर्कात होता. आम्ही रोहिलागड गावाच्या रस्त्याला लागलो असे कळताच त्याने व्हॉट्सॲपवर त्याच्या घराचे लोकेशन शेअर केले. त्यामुळे एवढ्या रात्री कोणालाही काहीही न विचारता (तसंही विचारायला रस्त्यात काळं कुत्रं पण नव्हतं म्हणा) पहाटे ठीक ४ वाजता विशालच्या घरापुढे हजर झालो.


इतक्यावेळ गाडीच्या काचा बंद असल्यामुळे बाहेर असणारी थंडी जाणवत नव्हती पण गाडीतून बाहेर पडताच अंगावर थंडीने शहारा आणला. पण विशालने त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर अंथरूण पांघरूण टाकून आमच्या झोपण्याची जय्यत तयारी आधीच करून ठेवली होती. विशालचे आभार मानले आणि किमान दोन अडीच तासांची झोप मिळावी या अपेक्षेने सगळेच जण पटापट अंथरुणात चिडीचूप झालो. पण झोपायची एवढी उत्तम व्यवस्था असून देखील "उपर वालेने शायद हमारे नसीब मे निंद नही लिखी थी". कारण साधारण तासभर झोप लागली असेल नसेल तोच जवळच असणाऱ्या मंदिरातून भक्तीसंगीताचा कर्णकर्कश्श आवाज सुरु झाला आणि सगळ्यांची झोप पार बोंबलली. पण थंडीचे दिवस आणि त्यात सकाळी ७ वाजले तरी बाहेर उजाडत नसल्यामुळे एवढ्या लवकर उठून करणार तरी काय? म्हणून मग ती "सुमधुर" भक्तीगीते ऐकत तसेच ६.३० पर्यंत अंथरुणात अक्षरशः लोळत राहिलो. झोपेची पार वाट लागली होती पण झोपायची व्यवस्था एका घरात झाल्यामुळे संडास, बाथरूम, बेसिन आणि भरपूर पाणी अश्या आम्हा ट्रेकर्सच्या दृष्टीने फाईव्ह स्टार सुविधा मिळाल्या होत्या. त्याचा सगळ्याच ट्रेकर मंडळींनी पुरेपूर लाभ घेतला. त्यात आमची सकाळची आन्हिके उरकेपर्यंत विशालच्या आईने सगळ्यांसाठी गरमागरम फक्कड चहा देखील बनवला. त्या माऊलीचे व विशालच्या वडिलांचे आभार मानले आणि विशालला बरोबर घेऊन सकाळी ७ च्या सुमारास किल्ला बघायला निघालो.  


रोहिलागड किल्ल्याची छोटेखानी टेकडी 

किल्ला तसा रोहिलागड गावाच्या अगदी मागेच उभा आहे पण किल्ल्यावर जाणारी वाट मात्र थोडी गावाबाहेरून किल्ल्याशेजारी असणाऱ्या एका डोंगराला वळसा घालून जाते. त्यामुळे मग गाडी बरोबर घेऊनच किल्ल्याच्या दिशेने निघालो. गावातून किल्ल्याकडे जात असताना गावातील एका मंदिराबाहेर तसेच काही घरांबाहेर कोरीवकाम केलेले काही उद्ध्वस्त खांब ठेवलेले दिसले. विशालच्या सांगण्याप्रमाणे असे अनेक कोरीव खांब गावाच्या आजूबाजूच्या परिसरात सापडतात व गावकरी ते देऊळ आणि घराबाहेर आणून ठेवतात. गावात सापडणाऱ्या या पुरातन मंदिराच्या अवशेषांवरून हे गाव बरेच जुने असावे असे वाटते. पूर्वी रोहिलागड हे गाव छोट्या तटबंदीच्या आत वसलेलं होत असं गावातील लोक सांगतात. आज देखील गावाच्या चारी दिशांना दगडी वेस पहावयास मिळते. पूर्वी गावात एखादे भव्य दगडी मंदिर असावे कारण गावात अनेक ठिकाणी शिल्प व कोरीवकाम केलेले खांब इतस्तत: विखुरलेले दिसतात. मात्र हे अवशेष पाहण्यासाठी पूर्ण गाव पायी फिरून पाहावा लागतो. या सर्व शिल्पांना एकत्र करण्याचा विचार गावातील विशालसारखी अनेक तरुण मंडळी करू पाहत आहेत जे अत्यंत कौतुकास्पद आहे.


रोहिलागड किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दिशादर्शक कच्चा नकाशा 

रोहिलागड गावाच्या साधारण १ किलोमीटर अलिकडे एक रस्ता रोहिलागड गावाला बायपास करत अंबडकडे जातो. गुगलमॅपवर झूम करून पाहिल्यास "रोहिलागड बायपास" असेच या रस्त्याला नाव दिलेले आहे. या रस्त्याने किल्ल्याशेजारी असणाऱ्या "पालखा" नावाच्या डोंगराला वळसा घालत साधारण दोन किलोमीटरचे अंतर पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या हाताला एक कच्चा रस्ता दिसतो. हा कच्चा रस्ता पालखा डोंगर व किल्ल्याचा डोंगर यांच्यामधून पुन्हा रोहिलागड गावात जातो. या कच्च्या रस्त्याची खूण म्हणजे या रस्त्याच्या सुरवातीलाच एक सिमेंटकॉंक्रीटने जीर्णोद्धारीत केलेले "फिरंगी मातेचे" छोटेखानी पण बंदिस्त मंदिर आहे. गावात राहायचे नसल्यास या मंदिरात पाच-सात ट्रेकर्सची रात्र काढण्याची उत्तम सोय होऊ शकते. आम्हाला याच कच्च्या रस्त्याने पुढे जायचे असल्यामुळे या कच्च्या रस्त्यावर गाडी न घातला फिरंगी मातेच्या मंदिराजवळ गाडी लावली आणि किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालायला सुरवात केली. फिरंगी मातेच्या मंदिरापासून साधारण दहा मिनिटात आपण पालखा डोंगर व किल्ल्याचा डोंगर यांच्या बरोबर मध्यभागी असणाऱ्या एका घुमटीसदृश छोट्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. या घुमटीकडे पाठ करून उभे राहायचे आणि समोर दक्षिणोत्तर पसरलेल्या छोट्याश्या रोहिलागड किल्ल्याचे अवलोकन करायचे. 



कच्च्या रस्त्यालगत असणारे फिरंगी मातेचे मंदिर

मंदिरा शेजारून रोहिलागड गावाकडे जाणारा कच्चा रस्ता व उवीकडे किल्ला

औरंगाबाद व जालना शहराच्या आसपासचा सगळा परिसर शुष्क आणि खुरट्या डोंगररांगांनी व्यापलेला आहे. गुगल 3D मॅप किंवा विकीमॅपीयासारख्या वेबसाईटवर पाहिल्यास साधारण अवतरण चिन्हासारखा आकार रोहिलागडाच्या छोट्या डोंगराला लाभलेला आहे. जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात येणाऱ्या या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून जरी ७५० मीटर इतकी मोठी वाटत असली तरी प्रत्यक्षात गडपायथ्यापासून अवघ्या पंधरा-वीस मिनिटात आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचू शकतो. गड तसा टेकडीवजा असल्याने व कोठेही फारशी झाडी नसल्याने कोठूनही सहज वर चढून जाता येते. 


नकाश्याद्वारे रोहिलागडावरील आमच्या भटकंती मार्ग व किल्ल्यावरील वास्तू अवशेष दाखवण्याचा एक प्रयत्न 

छोटेखानी गिरिदुर्ग - रोहिलागड 

आम्ही मात्र किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्याच्या दक्षिणटोकाकडे उतरलेल्या डोंगरधारेचा पर्याय निवडला आणि मोजून फक्त १५ मिनिटात गडमाथ्यावर दाखल झालो. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला पसरलेले पठार दिसते. या पठाराचा विस्तार दक्षिणेकडे थोडा निमुळता तर उत्तरेकडे वाढत गेलेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणटोकावर कोणतेही दुर्गअवशेष नसल्यामुळे डोंगराच्या कडेकडेने उत्तरेकडे चालायला सुरवात करायची. पठाराच्या साधारण मध्यावर आले की पश्चिमेला (रोहिलागड गावाच्या दिशेस) रचीव तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाचे गडपण सिद्ध करणारी ही तटबंदी अजून तरी चांगल्या स्थितीत आहे. तटबंदीच्या मागे पठाराच्या साधारण मध्यभागी एक खोल खड्डा दिसतो. या खड्ड्यात प्रचंड प्रमाणात घाणेरी उर्फ़ टणटणीची विषारी झुडुपे वाढलेली आहेत. ही झुडपे बाजूला करत खड्ड्यात उतरताच कातळात खोदलेली प्रचंड मोठी गुहा दिसते. या गुहेला बाहेरील बाजूने चार खांब आहेत. गुहेच्या आत शिरताच आणखी मोठमोठाले आठ खांब दिसतात. हे सर्व खोदकाम पाहता हे १२ खांबांवर तोललेले एक भले मोठे खांब टाके असावे असे वाटते. पण सध्या मातीमुळे व गाळामुळे हे टाके बुजत चालले आहे. याच खांब टाक्याला लागून आणखी एक कोरडे पडलेले पाण्याचे टाके देखील आहे. 


गडावरील तटबंदीचे अवशेष 

गडाच्या मध्यावर जमिनीत खोदलेले खांब टाके 

खांब टाक्याचा अंतर्गत भाग 

खांब टाके व तटबंदीचे अवशेष पाहून पुढे निघताच एक भली मोठी खदान दिसते. हा बहुदा गडावरील पाण्याचा कोरडा पडलेला तलाव असावा. तलावाच्या लगेच पुढे साधारण ईशान्येस पठाराला छोटासा चढाव लागतो. हे गडाचे सर्वोच्च स्थान म्हणता येईल. या छोट्या चढावावर एक गोल खड्डा व त्यात दगड व विटांचा वापर करून केलेले बांधकाम दिसते. गडाच्या अगदी टोकावर केलेल्या या बांधकामावरून येथे बुरुज असावा असे वाटते. या भागात हा डोंगर सर्वात उंच असल्याने या बुरुजावरून आसपासचा संपूर्ण परिसर दिसतो. बुरुजाचे हे अवशेष पाहून पूर्व टोकाकडे निघताच एक दगडी रांजण आपले लक्ष वेधून घेतो. हा रांजण अगदी हुबेहूब नाणेघाटातील दगडी रांजणासारखा दिसतो. हा रांजण पाहून उत्तरेकडे खाली उतरत गेल्यास डोंगराच्या साधारण मध्यावर एक मोठे कातळकोरीव लेणे आहे. पण येथे उत्तरेकडे खाली उतरण्यासाठी मळलेली वाट अशी नाही त्यामुळे गावातील एखादा माहितगार माणूस सोबत असल्याशिवाय ही गुहा सापडणे थोडे अवघड आहे. कातळात खोदलेली ही लेणी खूप प्रशस्थ असून लेणीतील खांब मात्र पडलेल्या अवस्थेत आहेत. ही कातळकोरीव लेणी पाहून पुन्हा आल्यावाटेने किल्ल्याच्या पठारावर यायचे. आता येथून आपल्याला गडाच्या वायव्य टोकावर गावकऱ्यांनी उभारलेला ध्वजस्तंभ आणि त्यावरील भगवा ध्वज दिसतो. या ध्वजस्तंभाच्या परिसरात भग्न वाड्याच्या जोत्याचे अवशेष आहेत.


गडावरील कोरडा पडलेला तलाव 

गडाच्या उत्तरपूर्व टोकावरील बांधकाम. हे टाके असावे का बुरुज 

गडावरील दगडी रांजण 

गडाच्या उत्तरेकडे साधारण मध्यावर असणारी मोठी गुहा 

हा ध्वजस्तंभ रोहिलागड गावाच्या दिशेला असून या ध्वजस्तंभाला लागुनच गावाच्या दिशेने उतरणारी एक घसाऱ्याची पायवाट दिसते. या पायवाटेने काळजीपूर्वक उतरून जाताच गडाच्या साधारण मध्यावर पश्चिमेकडे कातळात कोरलेली एक प्रचंड मोठी लेणी आहे. ही लेणी गावाच्या दिशेने तोंड करून असल्यामुळे तसेच लेणीसमोर बरीच सपाट जागा असल्यामुळे येथे गावकऱ्यांनी शेती करण्यास सुरुवात केली आहे. या लेणीचे छत १२ कोरीव खांबांवर तोललेले असून दोन खांब अर्धवट कोरलेले आहेत. लेण्यातील खांबांना गावकऱ्यांनी अलीकडेच लाल रंग दिलेला आहे. या लेणीच्या समोर, डाव्या व उजव्या अश्या तिन्ही बाजूस छोट्या देवळ्या कोरलेल्या आहेत. या तीन देवळ्यांपैकी एका देवळीत एक अनगड देवतेची मूर्ती ठेवलेली दिसते. लेणीच्या प्रवेशव्दाराजवळच एक मोठा खड्डा असून त्यात उतरण्यासाठी लेणीच्या आतील बाजूने कातळकोरीव पायऱ्या आहेत. हे लेणे बहुदा दुमजली असावे किंवा लेण्यात प्रवेश करण्यासाठी तयार केलेला हा कातळकोरीव पायऱ्यांचा भुयारी मार्ग असावा. या लेण्याचे पुरातत्वीय दृष्टीकोनातून खोदकाम झाल्यास अजून अनेक नवीन गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. या लेणी शेजारीच अजून एक लेणी असून, ती पार बुजलेली असल्याने नीट पाहता येत नाही. येथे आपली साधारण तासाभराची गडफेरी पूर्ण होते. 


रोहिलागडाचे मुख्य आकर्षण असणारी गुहा 

ही गुहा गडाच्या पश्चिमेला म्हणजे रोहिलागड गावाच्या दिशेने तोंड करून आहे 

गुहेतील कातळकोरीव खांब 


हा किल्ला मुख्यत्वेकरून पहाऱ्याचे ठिकाण म्हणून वापरला जात असावा असे दिसते. रोहिलागडापासून जवळच असणारे अंबड हे गाव म्हणजे प्राचीनकाळी देवगिरीचा किल्ला व पैठण (प्रतिष्ठान) यांच्या मधोमध असणारी एक यादवकालीन बाजारपेठ होती. देवगिरी किल्ला तर इतिहासकाळात यादवांची राजधानी होता. त्यामुळे राजधानीहून अंबडसारख्या बाजारपेठेकडे जाणार्‍या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती यादवकाळात केली गेली असावी. किंवा मग जवळच असणाऱ्या नांद्र्याच्या लहुगडसारखाच रोहिलागडाचा वापर देखील देवगिरी किल्ल्याच्या संरक्षक फळीतील टेहळणी आणि पहाऱ्याचे स्थान म्हणून केला गेला असेल. रोहिलागड गावात सापडणारे मंदिरांचे अवशेष तसेच देवगिरी, पैठण, अंबड, जामखेड या यादवकालीन बाजारपेठांना जोडणाऱ्या मार्गावरील या किल्ल्याचे स्थान पाहता या गावाचा यादवकालीन संबंध अधोरेखित करता येऊ शकतो. 


रोहिलागड नावावरून रोहिले या अफगाण लोकांशी या किल्ल्याचा संबंध असावा का? काय ते इतिहासालाच ठाऊक. पण किल्ल्याचे प्राचीन नाव दुसरे असावे. रोहिलागड हे नाव रोहिले लोकांनी किल्ला हस्तगत केल्यापासून पडले असावे. रोहिले या लढाऊ जमातीच्या लोकांना औरंगजेबाने सतराव्या शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशात वसवले. हा भाग आजही रोहिलखंड म्हणूनच ओळखला जातो. अफगाणिस्तानातील कमालीच्या शुष्क डोंगरदऱ्यांमधील शूरवीर लढवय्ये म्हणून हे रोहिले त्यानंतर भारताच्या इतिहासात गाजले. पण मराठवाड्याच्या या भागातील त्यांचा इतिहास अजून तेवढासा ज्ञात नाही.


हा किल्ला औरंगाबाद शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असून अंबड तालुक्यात येतो. पायथ्याशी किल्ल्याच्याच नावाचे नामसाधर्म्य असणारे रोहिलागड हे गाव आहे. जालना-अंबड रस्त्याने जालन्यापासून किल्ला ४० किलोमीटर अंतरावर आहे. पण रोहिलागडाला जाण्यासाठी जालन्याहून किंवा औरंगाबाद येथून थेट एसटी सेवा नाही. जालन्याहून एसटीने आधी अंबड गाठावे आणि मग अंबडहुन रोहिलागडाला जाण्यासाठी दिवसातून ठराविक वेळेला एसटी बसेस मिळतात. यापेक्षा खाजगी वाहनाने गावात येणे सोपे आहे. तुम्ही स्वतःच्या वाहनाने औरंगाबादकडून येत असाल तर औरंगाबाद-बीड महामार्गावर रोहिलागड फाट्याहून आत फक्त ५ किमीवर  गाव आहे. जालन्याकडून येत असाल तर जालना-अंबड महामार्गावर हॉटेल सुखसागरपाशी रोहिलागड फाटा आहे तेथून १६ किमीवर गाव आहे. किल्ल्यावर वर्षभरात कधीही जाता येते पण येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही याची नोंद घ्यावी.


या गडाची फारशी माहिती आजमितीस उपलब्ध नाही. पण या किल्ल्यावर संशोधन व्हावे आणि हा किल्ला देखील इतिहासाच्या नकाशावर यावा यासाठी रोहिलागड गावातील विशाल टकले व त्याचे काही मित्र (ऋषिकेश गाढे, कैलास खंडागळे व पंकज पाटील) प्रयत्न करीत आहेत. गडावरील काही ठिकाणांचे संवर्धन देखील या तरुण मंडळींनी केले आहे. गडावर जायला एखादी चांगली वाट करणे, लेण्यामधील काटेरी झाडे कापणे, माती उपसणे अश्या अनेक कामाचे नियोजन देखील त्यांनी केले आहे. पण या कामासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आपण गडप्रेमी या गडाला एकदा तरी भेट देऊन त्यांच्या या प्रयत्नात नक्की सहभागी होऊ शकतो. नाही का?


रोहिलागडाच्या संवर्धनासाठी काम करणारे दोस्त

@ VINIT DATE – विनीत दाते  


या ब्लॉगसाठी वापरलेले काही संदर्भ:

https://m.lokmat.com/blog/aurangabad/rohilagad/
http://trekshitiz.com/marathi/Rohilgad-Trek-R-Alpha.html


ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित करणे असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 


“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.


Comments

  1. रोहीला गड पहिल्यांदाच ऐकल
    ऐकल. उत्तम 👍👍👍

    ReplyDelete
  2. Eka Anolkhi Killa chaan virtually pahta alaa. 🙏🙏👍👍

    ReplyDelete
  3. खूप सुंदर लिखाण नेहमी प्रमाणे

    ReplyDelete
  4. तेथील वर्णन वाचून, जाऊन आल्याचा भास झाला, मस्त रे

    ReplyDelete
  5. अप्रतिम वर्णन , विनीत
    डोळ्यासमोर किल्ला उभा केला
    - राजेंद्र

    ReplyDelete
  6. विनीतजी खूप छान लेखन
    स्वतः तिथे आहोत असेच वाचताना वाटते
    अभिनंदन
    विकास

    ReplyDelete
  7. अप्रतिम लिखाण , अप्रतिम किल्ला
    ...

    ReplyDelete
  8. Rajesh Deshmukh18 April, 2020 15:48

    अप्रतिम लिखाण विनितजी. नवीन किल्याबद्दल भरपूर माहिती मिळाली.. अभिनंदन व शुभेच्छा..

    ReplyDelete
  9. Bhaskar Rikame18 April, 2020 15:48

    विनीतजी खुपच सविस्तरपणे माहिती, ओघवत्या शैलीत लिखाण असल्याने प्रत्यक्ष ऐकत असल्याचे जाणवते. छायाचित्रे खुपच छान व सुस्पष्ट आहेत. पहाटेच भक्ती संगीत कदाचित काकडा आरती असावी. एकुण सुंदर अनुभव.

    ReplyDelete
  10. Shrikant Mapari18 April, 2020 15:56

    वा विनित, मस्तच! मी औरंगाबादला इतके वेळा जात असुन माहिती नव्हते. नक्की जाईल आता.
    आणि त्या मुलांचेही कौतुक! त्यांना प्रोत्साहन मिळायलाच हवे.

    ReplyDelete
  11. Chitradarshi lekhan ani titkech sundar photo. Tyamule pratyksh bhet dilya sarkhe vatle. Asech nehami lihit chala.

    ReplyDelete
  12. very nice blog well describe with good images... Thanks for visiting my village... Keep it up...

    ReplyDelete
  13. रोहिलागडाचे आटोपशीर आणि अत्यंत माहितीपूर्ण लेखन... ब्लाॅग उत्तम झाला आहे... मस्त...

    ReplyDelete
  14. मस्तच लिहिलंय. लेणी आहे याअर्थी पूर्वीचा ट्रेडरूट असणार.

    ReplyDelete
  15. हा ब्लॉग लिहिल्याबद्दल धन्यवाद...रोहिलागड हे माझं मूळ गाव आहे.लोकांना अपरिचित असलेल्या इतिहासाला उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  16. विनितजी नेहमीप्रमाणेच लहान मोठ्या गोष्टी बारकाईने रोहीलागङ आणि परिसर बघून त्याचं योग्य असं शब्दांकन करणं जेणेकरून नवख्या भटक्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल असं अप्रतिम लेखन कौशल्य ! आङवाटेने जाऊन नवनवीन गङ किल्ले शोधण्याचा यशस्वी प्रयोग मस्तच ! छायाचित्रे देखिल ऊत्तम. पुढील भटकंती आणि ब्लाॅग लेखनासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  17. किल्ले पदरी पाडुन घ्यायच्या अफाट उत्साहाच कौतुक करावे तेवढे थोडे. सुंदर लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  18. Vishal Takale Yancha number milel ka?

    ReplyDelete
  19. अप्रतीम लिखाण. मी स्वतः जालन्यातील असुन या किल्ल्याविषयी इतकी माहिती मला इथेच मिळाली. धन्यवाद

    ReplyDelete
  20. खुप छान माहिती आहे

    ReplyDelete
  21. Aapki Jankari bohot achi lgi Bhai but aapne Jo apni post m dala hai ki only Muslim Rohilas aae the woh Puri tarah se sahi nhi hai Hm Hindu Rohila Rajputs bhi jo UP m rehte hai or hmari History m ab TK esa koi part hmari older generation ko bhi ni janne m nhi aata jha hm log convert hue ho Muslims se Hindu m hmare Ancestors hme btate hai hm Rajputs hai Rohila RAJPUTS JO AAJ APNE ITIHAS K LIYE STRUGGLE KR RHE HAI BT ES DESH K hr ek kone m hmare name se Road forts bne hai or hmko hr unka pura itihas nhi pta kirpya krke Puri jankari dijiye taki hm apni bat sarkar TK rakh pae or apna pura itihas nikal pae Rohila only Muslim nhi hai ,Hm HINDU ROHILA RAJPUTS BHI HAI .

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana