गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग २

गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग १ पासून पुढे ... 


ब्लॉगच्या पहिल्या भागात गोव्याच्या किल्ल्यांची जी भटकंती आपण केली ते सगळे किल्ले गोव्याच्या अंतरंगात लपलेले होते. म्हणजे हे सर्व किल्ले समुद्रकिनाऱ्यापासून थोडे लांब म्हणजे नदीकाठी किंवा खाडीवर बांधलेले आहेत. पण ब्लॉगच्या या दुसऱ्या भागत आपली सफर घडणार आहे ती गोव्यातील सागरी किल्ल्यांची. चला तर मग करूया सुरवात!

 

किल्ल्याचे नाव : खोलगड/काबो-द-रामा/Cabo de Rama Fort 

 

तालुका : काणकोण/Canacona/कॅनाकॉना 

जिल्हा : दक्षिण गोवा / South Goa 

Google Coordinates:  15°5'15"N 73°55'10"E 

Google map location: https://goo.gl/maps/ZVrEur5Zhoy


एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात आणि अश्या व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक जर का समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. गोव्याच्या काणकोण तालुक्याच्या पश्चिम अंगाला समुद्रामध्ये असेच एक भूशीर घुसलेले आहे ज्याला केप ऑफ रामा म्हणजे रामचे भूशीर असे म्हणतात. गोव्याच्या सौदर्याची भुरळ बहुदा प्रभू श्री रामचंद्रांना देखील पडली असावी. आपल्या चौदा वर्षांच्या प्रदीर्घ वनवासात प्रभू श्री रामचंद्रांनी सीता व लक्ष्मणासह या ठिकाणाला भेट दिली आणि येथे काही काळ वास्तव्य केले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळेच या ठिकाणाला केप ऑफ रामा म्हणजे रामचे भूशीर असे नाव पडले असे स्थानिक लोक सांगतात. याच भुशीरावर खोलगड उर्फ काब-द-राम नावाचा किल्ला उभा आहे.


खोलगड किल्ला अनेक वर्षं वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात राहिला पण या किल्ल्यावर सर्वात जास्त काळ सत्ता राहिली ती फक्त पोर्तुगीजांची. किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात जाण्याआधी सोंधे संस्थांनच्या राज्याची या किल्ल्यावर सत्ता होती. पण पुढे हैदरअलीने सोंधे संस्थान काबीज केले आणि इ.स. १७६३ च्या डिसेंबर महिन्यात काणकोण महाल घेऊन खोलगडास वेढा घातला. सोंधेच्या राजाची हैदरअली सारख्या बलाढ्य सरदारशी झुंज द्यायची ताकद नसल्याने त्याने खोलगडाचा ताबा सोडला आणि पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेला. यावेळी पोर्तुगीजांनी सोंधेच्या राजाशी संरक्षणात्मक करार करून त्याला राजकीय आश्रय दिला व काणकोण महालात पोर्तुगीज सैन्य धाडून हैदरअलीस खोलगडाचा वेढा उठविण्यास भाग पाडले. १ मार्च १७६४ रोजी हैदरअली वेढा उठवून कर्नाटकास परत गेला. त्यामुळे खोलगड किल्ला लगेच पुन्हा सोंधे संस्थानाच्या अंमलाखाली आला खरा पण पोर्तुगीजांशी झालेल्या संरक्षण कराराप्रमाणे किल्ल्यात शिबंदी मात्र पोर्तुगीज सैन्याची होती. अश्याप्रकारे इ.स. १७६४ ते १७९० या दरम्यानच्या काळात सोंधेचा राजा पोर्तुगीजांच्या आश्रयाखालीच जीवन जगत होता. शेवटी १७९१ मधे सोंधेच्या राजाने पोर्तुगीजांशी पुन्हा नवीन करार करून आपल्या राज्यावर उदक सोडले व या करारान्वये फोंडा, पंचमहाल व काणकोण महालावर पोर्तुगीजांचा अंमल सुरु झाला. अश्याप्रकारे खोलगड हा किल्ला सोंधे संस्थांन आणि पोर्तुगीजांमधे घडलेल्या अनेक करारांचा साक्षीदार आहे. १७९१ मधे हा किल्ला जेव्हा खऱ्या अर्थाने पूर्णपणे पोर्तुगीजांच्या ताब्यात आला तेव्हा त्यांनी किल्ल्याचे 'खोलगड' हे जुने नाव बदलून 'काब-द-राम' असे नवीन नाव ठेवले. 

 

हा किल्ला समुद्रात घुसलेल्या एका भूशिरावर अत्यंत मोक्याच्या जागी बांधलेला असल्याने या किल्ल्यावरून लांबवर पसरलेल्या सागरी किनाऱ्यावर तसेच सागरी मार्गाने होणाऱ्या शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सहज शक्य होते. त्यामुळेच पोर्तुगिजांचा या किल्ल्यावर खूप आधीपासूनच डोळा होता. साहजिकच असा अत्यंत महत्वाचा किल्ला ताब्यात येताच पोर्तुगीजांनी या किल्ल्यात अनेक सुधारणा करून किल्ला अधिक बळकट करून घेतला. आज किल्ल्यात पाहायला मिळणारे जवळपास सर्वच अवशेष हे पोर्तुगीजांनी त्यांच्या कार्यकाळात बांधलेले आहेत. पण पुढे या किल्ल्याचे संरक्षणात्मक महत्व कमी होऊ लागले तसे पोर्तुगीजांनी १९३५ ते १९५५ च्या दरम्यान या किल्ल्याचा तुरुंग म्हणून वापर केला. मात्र १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत किल्ला पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालीच राहिला. 

 

१८००० चौरस मीटर म्हणजे जवळ जवळ साडेचार एकर क्षेत्रफळ असणारा खोलगड हा गोव्यातील एक सगळ्यात जुना आणि मोठा किल्ला आहे. किल्ला तीनही बाजूने समुद्राने वेढलेला असून किल्ल्याच्या पूर्वेस त्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोरच किल्ल्याला जमिनीपासून वेगळे करण्यासाठी रुंद आणि लांबपर्यंत खंदक खोदलेला दिसतो. प्रवेशद्वाराच्या आत तटबंदीलगत अलीकडच्या काळात बांधलेली वास्तू असून ती कुलूपबंद असते. या वस्तूचा उपयोग सरकारी कार्यालय तसेच नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशोनोग्राफीच्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांना किल्ल्यावर राहण्यासाठी केला जातो. पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्यावर अनेक लष्करी बॅरेक, कमांड पोस्ट आणि अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृहे बांधली. या सर्व वास्तूंचे भग्नावशेष किल्ल्यात पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठे चर्च असून सेंट अँथनीला समर्पित असलेले हे चर्च आजही वापरात आहे. किल्ल्याच्या काळसर लाल जांभ्या दगडातील भिंतींच्या सानिध्यात पांढऱ्या शुभ्र रंगात रंगवलेली चर्चची एकमेव सुस्थितीत असणारी भव्य वास्तू उठून दिसते. चर्चच्या थोडे पाठीमागे सिमेंट कॉंक्रीटने बनवलेली एक वास्तू असून या वास्तूचे छत पूर्णपणे ढासळलेले आहे. १९३५ सालात बांधलेल्या या वस्तूचा किल्ल्यावरील जेल म्हणून उपयोग केला जात असे.    

 

किल्ल्याला सर्व बाजूने मजबूत तटबंदीने वेढलेले असून तटबंदी व किल्ल्याचे बांधकाम कोकणात मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या जांभ्या दगडात केलेले आहे. तटबंदीमधे जागोजागी भव्य बुरुज असून अनेक बुरुजांवर पोर्तुगीजकालीन तोफा आजही पाहायला मिळतात. किल्ल्याला संरक्षणात्मक दृष्टीने मजबुती देण्यासाठी त्याकाळी किल्ल्यावर एकूण २१ तोफा असल्याची नोंद कागदपत्रात आढळते. आज मात्र त्यातील फक्त आठ-दहा तोफा किल्ल्यात गंजलेल्या अवस्थेत पहायला मिळतात. किल्ल्याच्या तटबंदीवर झाडा-वेलींनी बरेच आक्रमण केलेले आहे पण असे असले तरी किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरा मारता येतो. तटबंदीवरून फेरा मारताना पश्चिमेकडे अथांग पसरलेल्या समुद्राचा खूप सुंदर देखावा दिसतो. तटबंदीवर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी रुंद फांजी ठेवलेली असून बंदुका व तोफा डागण्यासाठी जागोजागी जंग्यांची रचना केलेली दिसते. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त तटबंदीमधे तयार केलेली आणखी दोन-तीन छोटी प्रवेशद्वारे देखील दिसतात. किल्ला शत्रूच्या ताब्यात गेलाच तर समुद्रामार्गाने निसटता येण्यासाठी बहुदा असे चोर दरवाजे ठेवलेले असावेत.

 

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्याबाजूस तटबंदीमधे एक भव्य टेहळणी बुरूज बांधलेला असून या बुरुजावरून संपूर्ण किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो. या बुरुजावर तोफेला ३६० अंशात फिरवण्यासाठी एक वर्तुळाकृती चर बांधून काढला आहे. या बुरूजाच्या जवळच हा किल्ला हिंदू शासकांनी बांधला हे सिद्ध करणारा एक मोठा बांधीव तलाव दिसतो. चारी बाजूंना बांधीव भिंती असलेल्या या तलावात उतरण्यासाठी एके ठिकाणी काही पायऱ्या देखील केलेल्या आहेत. सद्यस्थितीत मात्र तलावाची अवस्था वाईट असून पाण्याचा उपसा नसल्याने तलाव कोरडा ठणठणीत पडलेला आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याच्या परिघात दोन झरे देखील आहेत. असे सांगतात की, एका झऱ्याचे पाणी लोक फक्त पिण्यासाठी वापरत तर दुसऱ्या झऱ्याच्या पाण्याला औषधी गुणधर्म असल्याने त्वचेचे रोग बरे होण्यासाठी त्यात स्नान करत असत.

 

तर असा हा खोलगड उर्फ काबो-द-रामा हा किल्ला दक्षिण गोव्याची राजधानी मडगावपासून फक्त ३० किमी अंतरावर आहे. हा किल्ला गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या ठराविक वेळेतच पाहता येतो.













किल्ल्याचे नाव : बेतुल/बैतुल/Betul Fort 

 

तालुका : Salcete/Salcette/साष्टी

जिल्हा : दक्षिण गोवा / South Goa 

Google Coordinates:  15°8'28"N 73°56'56"E 

Google map location: https://goo.gl/maps/NSoej51FEqH2


पोर्तुगीजांना घाम आणणारा व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने बांधला गेलेला गोव्यातील एकमेव सागरीदुर्ग म्हणजे हा बेतुल उर्फ बैतुलचा किल्ला होय. सन १६७९ मधे दक्षिण गोव्याच्या केपे तालुक्यात साळ नदीच्या तीरावर बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या बाळ्ळीच्या हवालदाराने हा किल्ला बांधला. बेतुल येथे साळ नदीजवळ मराठे व पोर्तुगीज यांच्या राज्यांच्या सीमारेषा एकमेकाला भिडलेल्या होत्या. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती. मडगावजवळ वेर्णा येथे उगम पावणारी साळ नदी पुढे मडगाव, चिचोणे, असोळणा असा प्रवास करत बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते. या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या खारेबांध भागापर्यंत जलवाहतूक करीत असत. या पोर्तुगीजांच्या सागरी व्यापाराला चाप देण्यासाठी बेतुल येथे साळ नदीच्या मुखावर एका मोक्याच्या जागी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला सुरवात केली.


१६६४ पूर्वी गोव्याचा पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी, अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा प्रदेश विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता तर बारदेश, तिसवाडी व सालसेत (साष्टी) हे पोर्तुगीजांकडे होते. १६६४ साली खवासखान या आदिलशाही सरदाराविरुद्ध काढलेल्या कुडाळच्या स्वारीत पेडणे, डिचोली, सांखळी, सत्तरी हे आदिलशाही मुलखातील तालुके शिवाजी राज्यांच्या ताब्यात आले. त्यावेळी अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, फोंडा, सांगे, केपे, काणकोण हा गोव्याचा प्रदेश सोंधे संस्थानच्या ताब्यात होता. पण सोंधे संस्थानचा राजाने आदिलशाहचे मांडलिकत्व स्विकारले असल्याने हा प्रदेश एकप्रकारे आदिलशाहाकडेच होता. राज्याभिषेकानंतर म्हणजे १६७५ नंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले व फोंड्यावर चालून गेले. त्यावेळी महाराजांनी फोंडा प्रांत घेतला व उरलेला आदिलशाही प्रदेश स्वराज्यात आणला. याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत महाराजांनी स्वराज्य सीमा गंगावल्ली नदीपर्यंत नेली. आता सोंधे संस्थानच्या राज्याला मराठ्यांचे मांडलिकत्व स्विकारावे लागले. अश्याप्रकारे मराठ्यांचे बाळ्ळी व चंद्रवाडी हे दोन महाल पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या साष्टी प्रांताला भिडले. अशा योग्यवेळी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची साळ नदीमार्गे चालणारी साष्टीतील जलवाहतूक संकटात आणण्यासाठी बेतुल येथे किल्ला बांधण्याची आज्ञा केली. 


बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखीखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांचा लष्करी अधिकारी म्हणजे राशोल किल्ल्याचा किल्लेदार याने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा – "असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे. तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण?" 


इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज व राजाराम महाराज यांनी मराठ्यांचे राज्य सांभाळले. पुढे राजाराम महाराजांनी कारवार, सिवेश्वर, काणकोण, खोलगड, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी व काकोडे हा सर्व प्रदेश सालाना बावीस हजार दोनशे होनास सोंधेचा राज्यास भोगवटयाने दिला. तेव्हा हा सर्व प्रदेश सोंधे राज्याच्या अंमलाखाली आला. नंतर इ.स. १७६३ मधे हैदरअली सोंधे संस्थानवर चालून गेला. पण सोंधेच्या राज्याची हैदरअलीसारख्या सरदाराशी झुंज देण्याची ताकद नसल्यामुळे सोंधेच्या राज्याने आपल्या मुलखातील अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी हा प्रदेश पोर्तुगीजांच्या हवाली केला व त्यांच्या आश्रयाला गेला. पोर्तुगीजांनी सोंधेकर राजा आणि त्याचे कुटुंब यांना आश्रय दिला आणि उपरोक्त क्षेत्र आपल्या नियंत्रणाखाली आणून काबो-दी-राम (खोलगड) व बेतुल या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अशाप्रकारे १७६३-६४ च्या सुमारास बेतुल किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला आणि अगदी १९६१ पर्यंत या परिसरावर त्यांचे नियंत्रण राहिले. 


आज बेतुल परिसरात किल्ल्याचे खूपच कमी अवशेष शिल्लक आहेत. साळ नदीच्या मुखावर एक बुरूज आणि त्यावर साळ नदीकडे मोहरा करून ठेवलेली एक तोफ एवढेच काय ते थोडके अवशेष इतिहासाची साक्ष देत आजही पाहायला मिळतात. या बुरुजावर उभे राहिले असता समोर गोव्यातील प्रसिद्ध मोबॉर बीच व समुद्राला मिळणारी साळ नदी यांचा खूप सुंदर देखावा दिसतो. किल्ला दुर्लक्षित राहील्याने परिसरात भयंकर झाडी माजलेली आहे. या झाडीतच काही ठिकाणी किल्ल्याची शेवटच्या घटका मोजणारी तुरळक तटबंदी बघता येते. तसेच नंतरच्या काळात या किल्ल्याचा परिसर कोण्या एका अनामिक फॅक्टरीला दिला गेल्याने त्या फॅक्टरीची काही जुनी बांधकामे व मशिनरी किल्ल्याच्या परिसरात आढळते. बेतुल किल्ला दक्षिण गोव्याची राजधानी मडगावपासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. 












किल्ल्याचे नाव : मार्मागोवा किल्ला/मुरगाव/Mormugao fort


तालुका : Mormugao/मुरगाव

जिल्हा : दक्षिण गोवा / South Goa 

Google Coordinates:  15°24'44"N 73°47'39"E

Google map location: https://goo.gl/maps/tarBHzbBrg12


जुवारी (झुआरी) नदी ही गोवा राज्यातील एक मोठी पश्चिमवाहिनी नदी. या नदीच्या उत्तरेला तिसवाडी आणि फोंडा हे तालुके आहेत, तर दक्षिणेला मार्मागोवा (मोर्मुगाव/मुरगाव) आणि सालसेटी (साष्टी) हे तालुके आहेत. जुवारी नदीच्या मुखाशी दक्षिण तीरावर मार्मागोवा नावाचे गोव्यातील व पर्यायाने भारतातील एक मोठे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आहे. इ. स. १५१० मध्ये अफांसो द अल्बुकर्क याने भारतातील पहिली पोर्तुगीज वसाहत येथे स्थापन केली. या बंदराच्या रक्षणासाठी जुवारी नदीच्या मुखाशी १६२४ मध्ये पोर्तुगीजांनी एक भक्कम लष्करी किल्ला बांधला. पोर्तुगीज सत्तेच्या अखेरच्या काळात खनिज निर्यातीसाठी या बंदराचे आधुनिकीकरण करण्यात आले व त्याबरोबरच लोखंडाच्या गोळ्या बनविणे, पडाव बांधणी व दुरूस्ती, जहाज दुरूस्ती या उद्योगांचाही विकास झाला. पुढे पोर्तुगीजांनी या बंदराच्या संरक्षणासाठी समुद्रकिनाऱ्यावर एक भिंतही उभारली. या संरक्षक भिंतीमुळे हा किल्ला १० किलोमीटर एवढ्या भव्य परिक्षेत्रात पसरलेला होता. पूर्वी मार्मागोवा हे संपूर्ण गावच या किल्ल्यात सामावलेले होते. 


पोर्तुगीजांना नेहमीच किनारपट्टीवरून होणाऱ्या परकीय आक्रमणांची भीती वाटत असे कारण त्यांच्या उत्पन्नातील सर्वात महत्त्वाचा स्त्रोत हा समुद्री व्यापार होता. यासाठी त्यांना गोव्यातील मार्मागोवा या महत्वाच्या बंदरांवर संपूर्ण नियंत्रण असणे आवश्यक होते. हे बंदर सुरक्षित करण्यासाठी १६२४ मध्ये पोर्तुगीजांनी मार्मागोवा येथे किल्ला बांधला. मूळ किल्ला त्रिकोणी आकाराचा असून त्याला संरक्षण देण्यासाठी किल्ल्याच्या तिन्ही कोपऱ्यात मोठे बुरुज आहेत. किल्ल्याच्या अंतर्गत भागात एक छोटे ख्रिस्ती देऊळ, जेल (तुरुंग) आणि सैनिकी अधिकाऱ्यांचे निवासस्थान अश्या वास्तू आहेत. किल्ल्याला पश्चिमेकडे व उत्तरेकडे असे दोन सुस्थितीत दरवाजे आहेत. त्याकाळी या किल्ल्याच्या संरक्षणासाठी ५३ तोफा, सशस्त्र शिबंदी व चार अधिकारी ठेवलेले असत. आज मात्र किल्ल्यात एकही तोफ पहायला मिळत नाही. किल्ल्यावरून समोरच मार्मागोवा बंदरात थांबलेली मोठमोठी जहाजे आणि त्या जहाजांमधे माल भरण्यासाठी कामगारांची चालेली गडबड असे दृश पहायला मिळते. 


मराठ्यांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमणाला कंटाळून १७०३ मध्ये गोव्याच्या तत्कालीन व्हायसरॉयने आपले निवासस्थान या किल्ल्यात स्थलांतरित केले. त्यावेळी या किल्ल्याला आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने किल्ल्याच्या परिघात तटबंदी बांधली गेली जी जवळपास ९ किलोमीटर एवढ्या अवाढव्य परिसरात पसरलेली होती. या तटबंदीत किल्ल्याचे आणखी दोन दरवाजे देखील होते. आज मात्र मूळ किल्ला सोडल्यास तटबंदीमधील हे दोन दरवाजे व तटबंदीचे कोणतेही अवशेष पहायला मिळत नाहीत. किल्ल्याच्या बाजूने असणाऱ्या तटबंदीचे काही थोडके अवशेष मार्मागोवा गावाजवळच असणाऱ्या वर्का (Varka) व मंकी या दोन समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पाहायला मिळतात असे स्थानिक लोक सांगतात.


मार्मागोवा किल्ला गोव्याच्या दाबोळी (दाभोळी/दाबोलीम) आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त ८ किमी तर वास्को दा गामा रेल्वे स्थानकापासून फक्त १० किमी अंतरावर आहे. तसेच हा किल्ला मडगाव शहरापासून ३३ किमी तर राजधानी पणजीपासून ३५ किमी अंतरावर आहे. किल्ला गोवा राज्य पुरातत्व खात्याकडे वर्ग केलेला आहे. 











किल्ल्याचे नाव : रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort 


तालुका : Bardez/बार्देश

जिल्हा : उत्तर गोवा / North Goa 

Google Coordinates:  15°29'47"N 73°48'32"E

Google map location: https://goo.gl/maps/nN8KjuGhftN2


एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेइश मागुश किल्ला. गोवा सरकारने या किल्ल्याची पुनर्बांधणी करून तो अतिशय उत्तम रीतीने जतन केला आहे. आग्वाद किल्ला, मिरामार बीच, काबो किल्ला आणि मांडवी नदीतील जहाजांवर करडी नजर ठेवणारा आणि आकाराने लहान असला तरी दक्ष व सर्व सोयींनी परिपूर्ण असलेला गोव्यातील हा एक पुरातन किल्ला आहे.


रेइश मागुश हे किल्ल्याला पोर्तुगीजांनी दिलेले नाव असले तरी गोव्यात पोर्तुगीजांचे आगमन होण्यापूर्वी याच ठिकाणी मांडवी नदीच्या किनारी एक पुरातन किल्ला होता. पोर्तुगीजांच्याही आधी गोमंतकावर इ. स. १४७२ साली बहामनी राज्याचा प्रधान गवाण याने आक्रमण करून गोमंतक जिंकून घेतले. तेव्हा त्याच्याबरोबर युसुफ आदिलशहा होता. पण तेव्हा तो एक साधा सरदार होता. इ. स. १४८२ साली बहामनी सुलतान महमद शहा मरण पावल्यावर बहामनी राज्याचे तुकडे होण्यास सुरुवात झाली. त्यातच युसुफ आदिलशहाने विजापुरात स्वातंत्र्य घोषित केले. इ. स. १४८९ साली त्याने गोमंतक जिंकून घेतले व जुने गोवे येथे राजधानी करण्याच्या दिशेने पावले टाकली. त्याने येथे अनेक राजवाडे, मशिदी व इमारती गोव्याच्या भूमीत बांधल्या. याच काळात राजधानीच्या रक्षणार्थ मांडवी नदीच्या उत्तर तीरावरील टेकडीवर छोटासा टेहळणी किल्ला बांधून मांडवी नदी आणि संपूर्ण बारदेश आपल्या हुकमतीखाली आणला. 


१६ व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १५१० मधे अल्फासो दि अल्बुकर्क याचे मांडवी नदी मार्गे गोव्याच्या भूमीत आगमन झाले. त्यावेळी गोव्याचा बराचसा प्रदेश विजापूरच्या युसुफ आदिलशहा याच्या ताब्यात होता. पण अल्फान्सो द अल्बुकर्क याने विजयनगरच्या सम्राटाच्या मदतीने गोव्यावर स्वारी करून गोव्याचा बराचसा प्रदेश जिंकला. बार्देशचा प्रदेश ताब्यात येताच पोर्तुगीजांनी १५५१ मधे गोव्याच्या तत्कालीन राजधानीला संरक्षण देण्यासाठी व मांडवी नदीच्या खाडीच्या तोंडावरील अरुंद रस्ता रोखण्यासाठी १५५१ मध्ये येथे किल्ला बांधला. या किल्ल्याच्या बांधकामात वेगवेगळ्या काळात बरेच बदल केले गेले. किल्ल्यात एकूण सात तळघरे असून ती किल्ल्याच्या तटबंदीतून एकमेकांशी जोडली आहेत. इ. स. १५८८-८९ साली गव्हर्नर जनरल मॅन्युअल डिसुझा कुटिन्हो याने ही तळघरे खास बांधून घेतली. दक्षिणेकडे म्हणजे मांडवी नदीकिनारी गलबतांसाठी धक्का (बंदर), उंच तटबंदी, बुरूज, भक्कम सागरद्वार अशी पोलादी संरक्षण व्यवस्था किल्ल्यासाठी करण्यात आली. बुरूज आणि तटबंदीवर त्याकाळी एकूण ३३ तोफा होत्या, त्यापैकी नऊ तोफा अद्यापही किल्ल्यात पाहता येतात. इ. स. १५५१ साली व्हाईसरॉय डॉन अफान्सो दे नोरोन्हा याच्या कारकीर्दीत डोम फ्रान्सिस्को द गामा याने किल्ल्याच्या पुनर्बांधणी व विस्तारास सुरुवात केली व ते काम इ. स. १७०४ साली केटेनो दे मेलो इ-कॅस्ट्रो हा व्हाईसरॉय असताना पूर्ण झाले. त्याकाळी ह्या किल्ल्यात लिस्बनहून आलेल्या किंवा लिस्बनला जाणाऱ्या व्हायसरॉय व इतर महत्वाच्या व्यक्तींना राहाण्याची सोय केली जात असे. सुरवातीला या किल्ल्याचा उपयोग व्हायसऱॉयचे निवासस्थान म्हणून केला जात होता पण नंतर त्याचे किल्ल्यात रुपांतर झाले. 


पूर्वी उत्तरेकडून किल्ल्याच्या शिखर माथ्यावर जाण्यासाठी उंच पायऱ्या बांधल्या होत्या पण आता तेथे रस्ता केला आहे. माणशी प्रत्येकी ५० रुपयांचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश घ्यावा लागतो पण हे दिलेले पैसे कोठेही वाया गेलेत असे अजिबात वाटत नाही. कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या पण अत्यंत टिकाऊ अश्या जांभ्या दगडात या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. किल्ल्याच्या भिंती, उंच व भव्य तर आहेतच पण त्याचबरोबर किल्ल्याला असणारे पोर्तुगिजांच्या खास शैलीतील चौकोनी बुरूज देखील बघण्यासारखे आहेत. किल्ल्याच्या तटबंदीमधे लाईट लावलेले आहेत. बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा कल्पकतेने मांडून ठेवलेल्या दिसतात. गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोव्याचा नजारा तर केवळ अफलातून असाच आहे. किल्ला अत्यंत स्वच्छ ठेवलेला असून किल्ल्यातील जुन्या निवासस्थानांचा अत्यंत खूबीने चित्रप्रदर्शन मांडण्यासाठी उपयोग केलेला आहे. किल्ल्यातील वेगवेगळ्या दालनात गोव्याचा इतिहास तसेच गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेल्या वीरांची चित्रे हिरिरीने मांडून ठेवलेली दिसतात. या सर्व चित्रात एक चित्र खूप खास आहे. शिवाजी महाराज घोड्यावर बसले असून त्यांच्या आजूबाजूला त्यावेळची गोमंतकीय जनता आपली पोर्तुगीजांच्या अन्यायापासून सुटका करण्याची विनवणी करत आहेत असे दाखवले आहे. येथील एका दालनामध्ये मध्यभागी किल्ल्याची लाकडी प्रतिकृती ठेवलेली आहे व सभोवतालच्या भिंतींवर किल्ल्याचे जुने व नवीन फोटो लावलेले दिसतात. चित्रप्रदर्शन पहात वेगवेगळ्या दालनातून फिरत असताना एका दालनात जमिनीत एक मोठे भोक दिसते व त्यासमोर डेथ होल (Death Hole) असे लिहलेले आहे. पूर्वी या भोकातून खालच्या मजल्यावर (तळघरात) ठेवलेल्या कैद्यांच्या अंगावर उकळते तेल अथवा गरम पाणी वगैरे टाकण्याची भयंकर शिक्षा दिली जात असावी. किल्ल्याच्या आवारात एक जिवंत पाण्याचा झरा असून त्याकाळी किल्ल्यातील शिबंदीला लागणाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था या झऱ्याच्या पाण्यातूनच होत असे.  


तर गोव्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा असा हा देखणा किल्ला गोव्यात जाऊन न पाहणे म्हणजे दुर्भाग्यच म्हणायला हवे. त्यामुळे पुढच्या गोवा भेटीत जेव्हा जवळच असणाऱ्या प्रसिद्ध अश्या कलंगुट बीचला भेट द्याल तेव्हा थोडी वाट वाकडी करून हा रेइश मागुश किल्ला आवर्जून पहावा. हा किल्ला गोव्याचे राजधानीचे शहर पणजीपासून फक्त ८ किमी अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो तर इतर दिवशी किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशी मर्यादित आहे. या वेळातील बदल तसेच किल्ल्याच्या अधिक माहितीसाठी www.reismagosfort.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.















किल्ल्याचे नाव : अग्वाद किल्ला/Aguada fort/आग्वाद किल्ला


तालुका : Bardez/बार्देश

जिल्हा : उत्तर गोवा / North Goa 

Google Coordinates:  15°29'32"N 73°46'25"E

Google map location: https://goo.gl/maps/KFu1Tq8bzUk (उप्पर आग्वाद)

                                     https://goo.gl/maps/AA9up4nKVTx (लोवर आग्वाद)


जवळपास ४५० वर्ष गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचे अगदी प्राणपणाने संरक्षण करणारा व पोर्तुगीज कारभाराचं सत्ताकेंद्र असणारा एक भव्य व प्रसिद्ध किल्ला म्हणजे हा आग्वादचा किल्ला होय. या किल्ल्याच खरं नाव मात्र सांता कातारीन. १७ व्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगीज गोव्यात चांगलेच स्थिरावले असताना अचानक एके दिवशी सात डच जहाजे मांडवी नदीच्या मुखाशी जुन्या गोव्यासमोर असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर उभी ठाकली. सशस्त्र अश्या या डच जहाजांनी मनात आणले असते तर तेव्हाच गोवे जिंकून घेतले असते. पण त्यांनी फक्त पोर्तुगीजांच्या ताब्यात असणाऱ्या गोव्याची प्रचंड लुट केली व ते निघून गेले. त्यावेळी मांडवी किनारी असणाऱ्या रेईश मागुश व गाश्पार दियश या पोर्तुगीजांच्या दोन किल्ल्यांनी कसेबसे या आक्रमणाला उत्तर दिले पण ते कमकुवत ठरले. या प्रकरणानंतर मात्र पोर्तुगीजांचे डोळे खाडकन उघडले आणि मांडवीच्या मुखाशी सांता कातारीन उर्फ आग्वाद किल्ल्याचा जन्म झाला. १६०९ ते १६१२ अशी पाच वर्ष या किल्ल्याचे बांधकाम सुरु होते. पुढे मात्र पोर्तुगीजांच्या ४०० वर्षांच्या राजवटीत हा एकच किल्ला कुठल्याच आक्रमणकर्त्याला जिंकता आला नाही. सलग शेकडो वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखालीच राहिला. जेंव्हा पोर्तुगीज गेले, तेंव्हा १९६२ च्या सुमारास हा किल्ला आपल्या ताब्यात आला. 


पोर्तुगीज भाषेत “आग्व” म्हणजे पाणी आणि अग्वाद म्हणजे पाणी भरण्याची जागा. हा किल्ला बांधत असताना पोर्तुगीजांना या किल्ल्याच्या परिसरात एक विहीर व खडकात एके ठिकाणी गोड्या पाण्याच्या जिवंत झऱ्याचा शोध लागला. गोड्या व थंड पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे मग हळू हळू या किनाऱ्यावर पोर्तुगीजांची जहाजे थांबू लागली. त्यामुळे मग पुढे या किल्ल्याचा जहाजांतून येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला. साहजिकच मग सांता कातारीन हे जुने नाव विस्मृतीत जाऊन हा किल्ला आग्वाद या नावाने ओळखला जाऊ लागला. जहाजामधे पाणी भरण्यासाठी या किल्ल्यातील एका भूमिगत टाकीत जवळपास २४ लाख गॅलन पाणी साठवले जात असे. १७ खांबावर उभी असलेली ही भुमिगत टाकी हे या किल्ल्याचे एक खास वैशिष्ठ्य आहे. पोर्तुगालमधून येणाऱ्या जहाजांचा हा भारतातला हा पहिला थांबा असायचा. या किल्ल्यावरून चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येते त्यामुळे साहजिकच किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना या किल्ल्याद्वारे पुर्ण संरक्षण पुरवता यायचे.


सध्या या किल्ल्याचा बराचसा भाग हा टाटा ग्रुपच्या ताज विवांता (ताज फोर्ट आग्वादा रिज़ॉर्ट एन्ड स्पा) या पंचतारांकित हॉटेलला दिलेला आहे. तसेच दक्षिण तटावरील किल्ल्याचा काही भाग हा गोव्यातील सर्वात मोठ्या व अजूनही वापरात असणाऱ्या सेंट्रल जेलसाठी वापरला जातो. त्यामुळे या किल्ल्याचे सध्या अप्पर अग्वाद (टेकडीवरील किल्ला) व लोअर आग्वाद (खालच्या भागातील किल्ला) असे दोन भाग झालेले आहेत. ताज विवांता हॉटेलचा परिसर व कारागृह ही दोन ठिकाणे सोडल्यास इतर ठिकाणी मात्र पर्यटकांना किल्ल्यात मुक्त प्रवेश आहे. 


अप्पर आग्वाद येथे किल्ल्याच्या सभोवती खंदक खोदलेला आहे. हा खंदक ओलांडून एका दरवाजातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. दरवाज्यातून चिंचोळ्या मार्गाने किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच मोकळे मैदान, त्यामधे एक दीपगृह, मध्यभागी पाण्याची टाकी आणि चारही बाजूला तटबंदी असे अवशेष दिसतात. किल्ल्याला ५ मीटर उंच आणि १.३ मीटर रुंद अशी भरभक्कम तटबंदी बांधलेली असून यात पोर्तुगीज धाटणीचे एकुण पाच चौकोनी बुरुज आहेत. त्याकाळी या बुराजांवर तोफा चढवण्यासाठी बनवलेले रॅम्प वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. तटबंदीवरून सैन्याला पहारा देता यावा यासाठी किल्ल्याची फांजी काही ठिकाणी चार फुट रुंद तर काही ठिकाणी सहा फूटापेक्षा जास्त रुंद आहे. या फांजीवरून संपूर्ण किल्ल्याला आरामात फेरफटका मारता येतो. किल्ल्याच्या तटबंदीची एक भिंत खाली समुद्रापर्यंत गेलेली असून या भागात कारागृह असल्याने तेथे जाण्यास परवानगी नाही. तटबंदीवरून फिरताना एकीकडे मांडवी नदीचे पात्र तर दुसरीकडे फेसाळणाऱ्या अरबी समुद्राचे विराट रुप पहायला मिळते. किल्ल्यामधे १८६४ साली बांधलेला आणि आशिया खंडातील सर्वात जुना दीपगृह पाहता येतो मात्र दीपगृहावर चढून जाण्यास परवानगी नाही. किल्ल्याच्या आतल्या भागात मध्यभागी मोठी अंडरग्राऊंड पाण्याची टाकी असून टाकीत पाणी जमा करण्यासाठी किल्ल्याच्या आतील भागातील जमीन जांभा दगडाने बांधुन काढलेली आहे. या जमिनीला टाकीच्या दिशेने उतार देखील दिलेला आहे. ह्या किल्ल्याचा मुख्य उपयोग पाणी व दारूगोळा साठविण्यासाठीच केला जायचा. पण किल्ल्यामधे सध्या दाखवली जाणारी दारूगोळ्याची कोठारं मोठया प्रमाणात तुटलेली असून त्यांचे केवळ अवशेष पहायला मिळतात. 


अप्पर आग्वाद किल्ल्यातील हे सर्व अवशेष पाहून आता आपला मोर्चा वळवायचा तो लोअर आग्वाद किल्ल्याकडे. सिक्वेरीम (साकेरी) बिच परिसरात असणारा लोअर आग्वाद किल्ला म्हणजे समुद्राच्या पाण्यात घुसलेला व अनेक वर्षे समुद्राच्या लाटांचे अनेक मार सहन करत उभा असलेला एक भव्य दिव्य बुरुज. या बुरुजावर उभारून फेसाळणाऱ्या समुद्रात अस्ताला जाणारा सूर्य बघण्यात एक वेगळीच मजा आहे. या परिसरात या भव्य बुरूजाव्यतिरिक्त एक सलग बांधलेल्या दुहेरी तटबंदीचे अवशेष व या तटबंदीमधे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने असणारे आणखी दोन बुरुज देखील पाहता येतात. 


आग्वाद किल्ला गोव्याची राजधानी पणजीपासून फक्त १९ कि.मी. तर कलंगुट या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यापासून फक्त सहा कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या ठराविक वेळेतच पाहता येतो.














किल्ल्याचे नाव : शापोरा किल्ला/चापोरा किल्ला/Chapora fort

तालुका : Bardez/बार्देश

जिल्हा : उत्तर गोवा / North Goa 

Google Coordinates:  15°36'21"N 73°44'9"E

Google map location: https://goo.gl/maps/DN3ZNrVj2Bq


बॉलिवुडमधील एक गाजलेला चित्रपट म्हणजे "दिल चाहता है". या चित्रपटातील एका दृश्यामध्ये समुद्रकिनारी असलेल्या एका किल्ल्याच्या तटबंदीवर बसलेले तिघे मित्र दाखविले आहेत. हाच तो गोव्यातला शापोरा किल्ला होय. "दिल चाहता है" चित्रपटात येथील दृश्य दाखवण्यापूर्वी या किल्ल्यावर इतिहासप्रेमी लोकांशिवाय इतर कोणी भटकत नसे पण "दिल चाहता है" चित्रपटात या किल्ल्याचे व परिसरातील निसर्गाचे सौंदर्य दाखवल्यापासून हा किल्ला गोव्यातील एक must visit डेस्टिनेशन बनला आहे.  


शापोरा नदी ते मांडवी नदी दरम्यान बारदेश प्रांत (तालुका) पसरला आहे. बारदेशच्या पूर्वेला आहे डिचोली, तर पश्चिमेला आहे अरबी समुद्र. बारदेश हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात जाण्यापूर्वी येथे विजापूरच्या अली आदिलशाहची सत्ता होती व त्याच्या अधिकाऱ्याने येथे किल्ला बांधला. पुढे १३ डिसेंबर १५७१ रोजी आदिलशहा आणि पोर्तुगीज व्हाइसरॉय ‘दों आंतोनियु द नोरोन्य’ यांच्यामध्ये तह झाला. या तहान्वये सासष्टी व बारदेश या प्रदेशांवरील आपला हक्क आदिलशहाने सोडला व हे प्रदेश कायमचे पोर्तुगीजांना मिळाले. पण तरीही पोर्तुगीजांच्या बारदेश प्रांताला उत्तरेकडून मुस्लीम सत्ता, पूर्वेकडून मराठे तसेच त्या भागातील देसाई व सावंत अशा स्थानिक शत्रूंकडून धोका होता. त्यामुळे पोर्तुगिजांनी १६१७ मधे शापोरा किल्ल्याचे बांधकाम केले. हा किल्ला आग्वाद किल्ल्यानंतर पाच वर्षांनी बांधण्यात आला. पोर्तुगीजांनी १५० हुन अधिक वर्षे या किल्ल्यावर राज्य केले खरे पण गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचा अंत होण्यापूर्वी हा किल्ला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या सत्तांच्या ताब्यात गेला. १६८४ मधे संभाजी महाराज गोव्याच्या स्वारीवर असताना मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. १७१७ च्या सुमारास मराठा सैन्याने या किल्ल्यातून माघार घेताच पोर्तुगिजांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला व किल्ल्याची युद्धशास्त्राच्या दृष्टीने बळकट करण्यासाठी पुर्नबांधणी केली. किल्ल्याच्या नव्या बांधकामात जमिनीखालील बोगद्यांचा समावेश त्यांनी केला. आणीबाणीच्या काळात बचाव करण्यासाठी व पळून जाण्यासाठी पोर्तुगीजानी बांधलेल्या या भूयारांचा उपयोग होत असे. पुढे १७३९ मध्ये हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला. पण पुढे दोनच वर्षांनंतर म्हणजे १७४१ मधे पोर्तुगिजांना उत्तरेकडील पेडणे तालुका दिल्यानंतर किल्ला त्यांना सुपूर्त करण्यात आला. पुढे मात्र १८९२ मध्ये पोर्तुगिजांनी या किल्ल्याचा वापर कायमचा बंद केला व तेव्हापासून या किल्ल्याने आपले पूर्वी असलेले वैभव गमावले. 


आज किल्ला अवशेष रुपात शिल्लक असला तरी या किल्ल्याला असणारे पोर्तुगीज धाटणीचे कॅप्सुल बुरुज, एक सुस्थितीत असलेला दरवाजा आणि किल्ल्याला सर्वबाजूने असणारी भक्कम तटबंदी असे अवशेष आवर्जून पाहण्यासारखे आहेत. पण पर्यटक मात्र या किल्ल्याला भेट देतात ते या किल्ल्यावरून दिसणाऱ्या समुद्राच्या पॅनोरमिक व्ह्यूसाठी. हे सुंदर विहंगम दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दयायला हवी. शापोरा किल्ला म्हापसापासून अंदाजे १० किमी तर प्रसिद्ध कलंगुट बीचपासून फक्त १५ किमी अंतरावर आहे. तसेच व्हॅगेटर/वागातोर व अंजुना हे गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे किल्ल्यापासून अगदीच जवळ आहेत.












किल्ल्याचे नाव : तेरेखोल किल्ला/Terekhol fort

तालुका : पेडणे/Perem

जिल्हा : उत्तर गोवा / North Goa 

Google Coordinates:  15°43'17"N 73°41'11"E

Google map location: https://goo.gl/maps/mnGzwLUwsX62


महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर तेरेखोल नदी जेथे समुद्रास मिळते तेथे नदीच्या उत्तर तीरावर खाडीच्या मुखाजवळील टेकडीवर तेरेखोलचा किल्ला उभा आहे. गंमत म्हणजे तेरेखोल गाव वेंगुर्ला तालुक्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येतो मात्र याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा म्हणजे उत्तर गोवा जिल्ह्याचा भाग आहे. 


१७ व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी केली. पोर्तुगिजांना हे सहन न झाल्याने १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नुतनीकरण केले. किल्ल्यातील चर्च व पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरुज त्यावेळी बांधण्यात आले. १७९४ मध्ये थोड्या काळासाठी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पण पोर्तुगिजांनी तो परत जिंकून घेतला. गोव्यात जन्मलेल्या डॉ बरनादी पेरेस डिसिल्वा हे १८२५ मध्ये गर्व्हनर झाले. त्यांनी तेरेखोलच्या किल्ल्यातून पोर्तुगिजांविरुध्द उठाव केला, तो उठाव पोर्तुगिजांनी मोडून काढला. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच किल्ल्यावरुन केली गेली. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे गुरुजी (तुळशीदास बाळकृष्ण हिरवे) व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला. त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले. त्यांचे स्मारक किल्ल्यासमोर डाव्या हाताला आहे. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. १९६१ ला गोवा मुक्त झाला आणि ९ डिसेंबर १९७६ ला किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले. अश्याप्रकारे गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम तेरेखोल किल्ल्याने केले. त्यामुळे तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे. 


तेरेखोल हा तसा एक आटोपशीर किल्ला आहे. गोवा सरकारने या छोटेखानी किल्ल्याचे तारांकीत हॉटेलमध्ये रुपांतर केल्यामुळे किल्ला अतिशय स्वच्छ व नीटनीटका ठेवलेला असला तरी सामान्य पर्यटकांना संपूर्ण किल्ला पाहण्याची परवानगी नाही. तसेच किल्ला पाहण्यासाठी सकाळी १० नंतरच परवानगी मिळते आणि तेही फक्त काही जणांनाच. किल्ल्यात हॉटेल असल्यामुळे सगळीकडे आकर्षक रंगरंगोटी केलेली असली रात्री किल्ल्याचे मूळ स्वरुप बऱ्याच प्रमाणात तसेच ठेवले गेले आहे. जांभ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याच्या स्थापत्यकलेत कोकणी, पोर्तुगीज व गॉथीक शैलीचा प्रभाव आढळतो. सुस्थितीत असणाऱ्या गडाच्या दक्षिणाभीमुखी प्रवेशद्वाराने गडात प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या समोरच भिंतीलगतच ठेवलेला एक भला मोठा जुना पेटारा आपले लक्ष वेधून घेतो. प्रवेशद्वाराचे दरवाजे जुने दिसत असले तरी रंगरंगोटी करून आकर्षक केलेले असल्यामुळे मुळचे आहेत कि हॉटेलसाठी जुन्या पद्धतीने बनवून घेतले आहेत ते कळत नाही. किल्ल्यात प्रवेश करताच समोर दिसते ते पोर्तुगीज धाटणीचे सेंट अॅंथोनी चर्च व किल्ल्याच्या तटबंदीला लागून हॉटेलसाठी बांधण्यात आलेल्या आखीवरेखीव खोल्या. पण या खोल्या आणि चर्च कायमच बंद असतात. 


प्रवेशद्वारावरील सज्ज्यावर जाण्यासाठीचा जिना केलेला आहे तर समोर असणाऱ्या चर्चच्या मागे उजव्या बाजूस असलेल्या जिन्याने देखील मागील बुरुजावर जाता येते. किल्ल्याचा एवढाच काय तो परिसर सामान्य पर्यटकांसाठी खुला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या तटावरुन प्रवेशद्वारापर्यंत फेरी मारुन गड दर्शन आटोपते घ्यावे लागते. पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेला कॅप्सुल आकाराचा बुरुज, मध्यभागी असलेले एक चॅपल, गडाची चौरस तटबंदी, एक भरभक्कम दरवाजा आणि किल्ल्यावरील सैनिकांच्या व अधिकाऱ्यांच्या निवासासाठी बांधलेल्या खोल्या एवढे मोजके अवशेष पाहून साधारण २० मिनिटांत गडफेरी उरकता येते. किल्ल्यावरून दिसणारा केरीमचा समुद्रकिनारा, त्यावरील पांढरी शुभ्र रेती आणि अरबी समुद्राचे निळेशार पाणी असे दृश पाहून मन सुखावते. 


मालवण - पणजी सागरी महामार्गावर असलेले तेरेखोल गाव, मालवण पासून ६० किमी व पणजी ४० किमी वर आहे. मालवणहून वेंगुर्ले आणि वेंगुर्ल्याहून बसने तेरेखोल गावात जाता येते. किल्ल्याच्या अगदी दारापर्यंत गाडीरस्ता आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या रेडीपासून तेरेखोल फोर्ट ५ कि.मी. अंतरावर आहे त्यामुळे वेळ असल्यास जवळच असणारा रेडीचा यशवंतगड देखील वाकडी वाट करून पाहता येतो. 









तर ब्लॉगवाचकांनो ब्लॉगच्या दोन्ही भागात मिळून गोव्यातील जवळपास १३ किल्ल्यांची सफर आपण केली. या गोव्यातील गडसफारीचा तपशीलवार प्लॅन खालील लिंकवर PDF फाइलद्वारे देत आहे. तुमच्या पुढच्या गोवा भेटीत समुद्रकिनारे, चर्चेस आणि देवळांबरोबरच आडवाटेवरच्या या किल्ल्यांना देखील तुम्ही भेट देताल अशी आशा आहे. 


https://drive.google.com/file/d/1oW51uy-qXnvyYkiPCmh3NT5TjqfSECDM/view?usp=sharing


वरील लेखातील गोव्याचे व किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ:

 

- मिलिंद गुणाजी लिखित "चला माझ्या गोव्याला" 

- गोव्यातील किल्ल्यांवर व इतिहासावर अभ्यास करणारे मूर्तिकार श्री. सचिन मदगे यांचे वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले लेख

- गोव्यातील किल्ल्यासंबंधी मायाजालावरून (Google) मिळालेली त्रोटक स्वरूपातील इंग्रजीमधील माहिती

- पोर्तुगीज-मराठा संबंध (लेखक - स.शं. देसाई)

 

@ VINIT DATE – विनीत दाते 

 

ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित करणे असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 



“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.




Comments

  1. खूप सुरेख माहिती

    ReplyDelete
  2. खूप सुंदर फोटो आणि माहिती,....

    ReplyDelete
  3. मस्तच. नेहमीप्रमाणे आवश्यक माहिती न विसरता मांडलेली आणि ती सुद्धा सविस्तर.
    ह्या भटकंतीचा मी साथीदार असूनही मलासुद्धा reference म्हणून वापरता येण्यासारखा ब्लॉग.
    👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ओंकार केळकर. अरे एकदाच लिहायचं तर नीट लिहायचं त्यासाठी खूप वेळ घेतला माझा या दोन गोव्याच्या ब्लॉगनी. पण पूर्ण झाले आणि एक चांगले documentation झाले

      Delete
  4. Wonderful Vinit, ek number, its captivating till the end, keep sharing 🙏🙏🙏👌👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच दीपक भाऊ. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

      Delete
  5. Jabardast!! Deatiling about each monument and history references gives good feel about Forts!!! Writing inspirational to all readers to visit Goan forts- salute to your travel and blog write up!!Keep it up!!!

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Prajakt. You must visit these forts in your next visit to goa

      Delete
  6. Wah....wah....dilkhush likhan....vistrut mahitee...Sarv killyanche samalochan khupach sudar

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद क्षितीजजी. आपण नेहमीच माझ्या प्रत्येक ब्लॉगला आवर्जून भेट देता त्याबद्दल धन्यवाद

      Delete
  7. उत्तम लेख! हे किल्ले अज्ञात होते

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! किल्ले अज्ञात होते म्हणण्यापेक्षा त्यांची आपल्या मातृभाषेत फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यासाठीच हा ब्लॉग प्रपंच केला.

      Delete
  8. super duper work Sirji!!!!
    mandal lay aabhri ahey tumcha.

    ReplyDelete
  9. १.खोलगड / कोप ऑफ द राम २- बेतूल किल्ला - जो कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने बांधला. काणकोण प्रदेशातील सविस्तर गावांच्या /प्रदेशांच्या नावासहित असलेले वर्णन, साल नदी चे नाव, ३. मार्मागोवा ४- रेईश मागुश ५. आग्वाद किल्ला - ताज विवंदा ला किल्ल्याचा काही भाग ६. तेरेखोल किल्ला ..... समुद्र किनारी असणारे हे सर्व किल्ले आणि त्यातील लहान सहान गोष्टींचा सुद्धा बारकाईने निरीक्षण करून त्याचा तपशील आणि पोस्ट केलेले सर्वच छायाचित्रे अप्रतिम आहेत. यातील केलेले सर्वच शब्दांकन खूपच भावले. कोठेही लिखाणात शब्दांची पुनरावृत्ती आलेली नाही. शब्दसंग्रह भरपूर असल्यामुळे लेख वाचनीय, माहिती देणारा, वर्णनाद्वारे समोर सर्व चित्र समोर उभे करणारा असा झाला आहे. पुढील भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा. ...... दत्तात्रय जोशी

    ReplyDelete
    Replies
    1. जोशीजी खूपच सुंदर आणि सविस्तर प्रतिक्रिया. आपण माझे सगळे ब्लॉग आवर्जून वाचता आणि सुंदर प्रतिक्रिया देता त्याबद्दल मी आभारी आहे

      Delete
  10. भन्नाट... उपयुक्त!
    पुस्तक प्रकाशित करावे..
    खूप शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद साई. एका सुंदर ब्लॉगर काढून प्रतिक्रिया मिळणे खूप छान वाटते. पुस्तकाचा खरच विचार करावा का? कारण आजकाल online चा जमाना आहे. लोकांनी मोबाईलवर माझा ब्लॉग वाचत वाचत हे किल्ले भटकावे अशी अपेक्षा आहे. जमलं तर PDF डॉक्युमेंटसारखं काही करून बघायला हरकत नाही.

      Delete
  11. अप्रतिम विनितजी,नेहमीप्रमाणे प्रत्येक किल्या व परिसराची एत्यभूत माहिती व सुरेख clicks. वेळेअभावी आपल्याबरोबर येता येत नाही ही खंत आपल्या ब्लॉग्समधून घडून आलेली सफरीतून दूर करत आहे..☺️😊 खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा..💐💐

    ReplyDelete
  12. Hi Vinit..Your blog has changed my perception of Goa. I have been going to Goa every quarter for work or for a holiday once a year, but never thought of visiting the coastal forts of Goa. But now as you have mentioned i will read your blog once in Goa and cover at least one fort in every visit:-) As always very well written!..Amit Marathe

    ReplyDelete
  13. नेहमीप्रमाणे मस्तच...

    घरबसल्या आम्हाला गोव्यातील किल्यांची छान सफर केली. वर्णन व फोटो सुद्धा १ नंबर

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana