गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग १

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे

कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे|| 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फ़णसाची रास

फ़ुली फ़ळांचे पाझर फ़ळी फ़ुलांचे सुवास|| 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, 

पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी|| 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा

पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा|| 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा

ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा|| 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत चाफ़ा पानाविण फ़ुले

भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले|| 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळीचा रे भात

वाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा हात|| 

 

माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी

आतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी|| 

 

सर्व महाराष्ट्र ज्यांना 'आनंदयात्री' म्हणून ओळखतो असे कविवर्य बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) यांची गोव्याचे यथार्थ वर्णन करणारी ही कविता. पण गोवा म्हटलं की आपल्या नजरे समोर काय येत हो? तर तो इथला फेसाळणारा समुद्र, निसर्गरम्य समुद्रकिनारे, काजू, फेणी, मासे, इथली झिंग आणणारी मदमस्त रात्रीची दुनिया, अंगात शर्ट न घालता बाईकवरून सैराट फिरणारे फॉरेनर्स आणि इतर बरंच काही. त्यामुळे गोव्याबद्दल माहिती नाही आणि आकर्षण नाही असा माणूस विरळाच. लोकल आणि ग्लोबल यांचं अफलातून मिश्रण असलेल्या गोव्याची ट्रिप म्हणजे अनेकांचे स्वप्न असते. अश्या रंगरंगील्या गोव्याच रूप अनेकदा मित्र-मैत्रीणींसोबत तर कधीतरी घरच्यांसोबत तुम्ही नक्कीच अनुभवलं असेल. पण गोवा म्हणजे बियर आणि बीचेस असं समीकरण असलं, तरी याखेरीज गोव्यात बघण्यासारखं पुष्कळ काही आहे. काही तरी नवं, वेगळा अनुभव हवा असणाऱ्या पर्यटकांसाठी गोव्याच्या आतल्या भागात तर खजानाच दडलेला आहे. इवलंसं राज्य आहे गोवा. पण एकदा जाऊन स्थलदर्शन उरकून यायचं यासाठी गोवा नाहीच मुळी. पर्यटनाची अनेक रूपं गोव्याच्या छोटय़ाशा राज्यात सामावली आहेत. काही तरी वेगळं शोधणाऱ्या अस्सल भटक्याला गोव्यात बरच काही सापडू शकतं. गोव्यातली नुसती मंदिर आणि चर्चेस पहायची ठरवली तरी इथली एक खास वेगळी सहल होऊ शकते. 

 

तब्बल ४५० वर्ष पोर्तुगीजांच्या अमलाखाली असणाऱ्या गोव्यात त्यांनी बांधलेले स्थापत्यशास्त्राचे आणि युद्धनीतीचे पुरावे देणारे अनेक किल्ले पाहण्यासारखे आहेत. दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा गोव्यात काही किल्ले व मंदिर बांधली आहेत. त्यामुळेच यावेळची माझी गोवा सफर होती ती खास गोमंतकीय किल्ल्यांची. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा गोव्यातील किल्ल्यांशी आणि एकूणच गोमंतक भूमीशी आलेला इतिहास अनुभवायची. २९ एप्रिल २०१७ ते १ मे २०१७ या तीन दिवसात भेट दिलेल्या तब्बल १३ गोमंतकीय किल्ल्यांची माहिती सह्यमित्रांना व्हावी म्हणून हा ब्लॉग प्रपंच! आशा करतो कि ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सफर करूया गोव्यातील या किल्ल्यांची.


सह्य्राद्रीमधल्या दऱ्याखोऱ्यांत पायवाटा धुंडाळत केलेली भटकंती जितकी अंगातली रग शमवणारी असते तितकीच समुद्रकिनाऱ्यालगतची भटकंती मनाला रिझवणारी असते. त्यामुळे सह्य्राद्रीच्या अंगाखांद्यावरील किल्ले आणि डोंगरदऱ्या भटकत असताना अचानक कल्पना सुचली ती खूप दिवस मनात घर करून बसलेल्या गोव्यातील किल्ल्यांना भेट देण्याची. मग काय शनिवार, रविवार आणि १ मे रोजी महाराष्ट्रदिनामुळे सोमवारी मिळालेल्या सलग तीन दिवसांच्या सुट्टीचे औचित्य साधुन हि गोव्यातील किल्ल्यांची भटकंती पदरात पाडून घ्यायचे ठरवले. पण आता सगळ्यात मोठी अडचण होती ती गोव्यातील किल्ल्यांची माहिती मिळवण्याची. याच कारण देखील तसंच आहे मित्रांनो. दुर्गअभ्यासक भगवान चिले, सचिन जोशी, सतीश अक्कलकोटे, प्र. के. घाणेकर, महेश तेंडूलकर यांची महाराष्ट्रातील किल्ल्यांवर माहिती देणारी अनेक पुस्तके आज उपब्लध आहेत पण गोव्यातील किल्ल्यांबद्दल याबाबतीत फारच उदासीनता आढळून येते. तेरेखोल, आग्वाद, रेइश मागूश, चापोरा असे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढेच गोव्यातील किल्ले सुपरिचित आहेत. त्यामुळे मायाजालावर (Google) या किल्ल्यांची इंग्लिशमधून का होईना पण थोडी फार माहिती नक्कीच मिळते. पण काबो दि रामा, खोर्जुवे, जुवेम, कोळवाळ, राशोल, नाणूस, थीवी, मर्दनगड यासारखे अनेक गोव्यातील किल्ले अनेकांना तर नावाने देखील माहित नाहीत. 


गोव्याचे एकूण क्षेत्रफळ ३,७०२ चौ. किमी एवढे असून येथे उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे दोनच जिल्हे आहेत. यामधे उत्तर गोव्यात पेडणे, बार्देस, डिचोली, सत्तरी, तिसवाडी, फोंडा तर दक्षिण गोव्यात मार्मागोवा, सालसेत (साष्टी), धारबांदोडा, सांगे, केपे, काणकोण असे एकूण १२ तालुके येतात. अत्यंत निसर्गरम्य अशा ह्या राज्याच्या उत्तरेस महाराष्ट्र राज्य, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य तर पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे. गोमंतक भूमीला इतिहास देखील बहुत जुना. तिसऱ्या शतकात गोमंतक भूमी आधी मौर्य साम्राज्यात आणि त्यानंतर सातवाहन शासनाच्या अधिपत्याखाली होती. १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात गोवा पहिल्यांदा मुस्लीम राजसत्तेखाली आलं पण थोड्याच अवधीत म्हणजे १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात विजयनगर साम्राज्याने गोवा जिंकून घेतलं. पुढे जवळजवळ १५० वर्ष गोवा विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली सुखाने नांदल. पण १६ व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १५१० च्या आसपास पोर्तुगीजांनी पूर्वेकडील देशांशी मसाल्यांचा व्यापार करण्याच्या निमित्ताने गोव्यात आपले पहिले पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत म्हणजे सुमारे ४५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. त्यामुळे साहजिकच पोर्तुगीजांनी गोव्यात आपला लष्करी अंमल वाढवण्यासाठी या काळात येथे अनेक किल्ले बांधले. ३०, मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने गोवा हे जगाच्या नकाशावर एक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येऊ लागले.


महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यातील किल्ले तसे फारच लहान आहेत. पण डोंगरकपारीनं वेढलेल्या या राज्यात तब्बल ४२ किल्ल्यांची नोंद झालेली आहे. हे किल्ले या भूमीवरील गतकाळाचे, राजकारणाचे आणि अर्थव्यवस्थेचे उत्तम नमुने आहेत. पोर्तुगीजानी बांधलेले किल्ले गोव्यात सर्वत्र विखुरलेले आहेत. काही गोव्याच्या अंतरंगात नदीच्या मुखावर बांधलेले आहेत तर इतर बहुतेक सर्व समुद्रकिनाऱ्यांवर. काही सेंट आगुस्तीन टॉवरच्या अवशेषासारखे आकाराने प्रचंड मोठे आहेत तर काही छोटे असूनही वास्तूरचनेचा उत्कृष्ट उदाहरण असलेले आहेत. काही किल्ले आदिलशहाच्या वास्तुकलेची संपन्नता सांगतात, तर काही किल्ले पोर्तुगीजांच्या हुकमी चालींची. बेतूल आणि नानुज यासारखे किल्ले तर अगदी शिवाजी महाराजांशी नातं सांगतात. चला मग आता प्रत्येक किल्ल्याची थोडी सविस्तर माहिती घेऊ या.

 

किल्ल्याचे नाव : हळर्ण किल्ला / अलोर्ना किल्ला / Alorna fort 


तालुका : पेडणे/Pernem

जिल्हा : उत्तर गोवा / North Goa

Google Coordinates:  15°42'00.0"N 73°54'19.0"E

Google map location: https://goo.gl/maps/11HPXcHdQiD2


पेडणे तालुक्याच्या ईशान्येला शापोरा नदीच्या तीरावर हळर्ण/अलोर्ना नावाचा एक छोटा भुईकोट किल्ला आहे. १७ व्या शतकात सावंतवाडीच्या भोसल्यांनी पेडणे, डिचोली, मणेरी या आपल्या प्रदेशावर पोर्तुगीजांकडून वारंवार होणारे आक्रमण रोखण्यासाठी हा किल्ला बांधला. पण फार काळ तो भोसल्यांकडे राहिला नाही. ४ मे १७४६ मधे मार्किस ऑफ कास्टेलो नोवो या पोर्तुगीज अधिकाऱ्याने हा किल्ला जिंकून घेतला. या कामगिरीसाठी कास्टेलो नोवो याला “मार्किस दे अलोर्ना” असे म्हणले जायचे. पुढे १७६१ मधे तो पुन्हा भोसल्यांकडे आला पण पोर्तुगीजांनी डोम फ्रेडरिको गिलहेर्मे डिसूझाच्या नेतृत्वाखाली २५ ऑगस्ट १७८१ रोजी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. अश्याप्रकारे पोर्तुगिजांनी मराठ्यांच्या आक्रमणांपासून स्वतःला वाचवण्यासाठी उत्तम संरक्षण यंत्रणा असलेल्या या किल्ल्याचा अचूक फायदा करून घेतला. 


हळर्ण गावातून किल्ल्याजवळ पोहोचताच एक भव्य पोर्तुगीज धाटणीचा बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. या बुरुजापासुन सुरु होणाऱ्या एकसलग अश्या भव्य तटबंदीमधेच एक छोटा दरवाजा बनवलेला दिसतो. या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करताच दोन्ही बाजूला पडझड झालेल्या पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात. किल्ल्यात फारच थोडके अवशेष शिल्लक असून किल्ल्याच्या मध्यभागी एक जुनी इमारत वजा वास्तू उत्तम स्थितीत उभी आहे. या इमारतीमधे एका जवळ एक अश्या तीन खोल्या काढलेल्या दिसतात. इमारतीच्या मागेच एक खोल विहीर असून त्यातील पाणी मात्र पिण्यायोग्य राहिलेले नाही. हा किल्ला पुष्कळ वर्षे पोर्तुगिजांच्या ताब्यात राहिल्याने किल्ल्याच्या बांधकामात मराठे व पोर्तुगीज अशी दुहेरी स्थापत्यशैली दिसून येते. किल्ल्याची तटबंदी उत्तम स्थितीत असून या छोटेखानी गढी वजा किल्ल्याच्या संरक्षणासाठी चारी कोपऱ्यात चार भव्य बुरुज उभारलेले दिसतात. हे बुरुज पोर्तुगीज धाटणीचे असून बुरुजांवर तोफा चढवण्यासाठी तयार केलेले रॅम्प सुद्धा येथे पाहायला मिळतात. हा किल्ला गोवा राज्य सरकारद्वारे ओळखले जाणारे संरक्षित स्मारक आहे (Protected Monuments Of Goa). 


किल्ला शापोरा नदीच्या अगदी मुखावर बांधला असल्याने किल्ल्याबाहेर पडताच समोर चापोरा नदीचे नितळ पाण्याने भरलेले पात्र आणि नदीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा हे खास कोकणातले दृश्य आपली नजर खिळवून ठेवते. गजबजलेल्या गोव्यात एखादे शांत, दुर्गम, सुंदर व शांततापूर्ण ठिकाण अनुभवायचे असेल तर हळर्ण गावाला नक्कीच भेट द्यावी. 


पेडणे तालुक्याच्या ईशान्य भागात असलेला हळर्ण किंवा अलोर्ना किल्ला गोव्याची राजधानी पणजीपासून ४० किमी तर म्हापसापासून ३० किमी अंतरावर आहे. हा किल्ला पनवेल-कोची-कन्याकुमारी (NH17) या राष्ट्रीय महामार्गापासून फक्त १० कि.मी दूर असून येथे फक्त खाजगी वाहनानेच पोहोचता येते. 

 

हळर्ण किल्ल्यासमोरून वाहणारी शापोरा नदी
किल्ल्याचा पोर्तुगीज धाटणीचा भव्य बुरुज
किल्ल्याचे तटबंदी मधील छोटे प्रवेशद्वार

पहारेकर्यांच्या देवड्या
किल्ल्यातले हे चुना बारीक करायचे मशीन पण जुने वाटते
किल्ल्यातील एकमेव इमारत. यात तीन खोल्या आहेत
किल्ल्यातील एकमेव पाण्याचा साठा असणारी विहीर
पोर्तुगीज धाटणीचे बुरुज
किल्ल्याची अंतर्गत मजबूत तटबंदी
किल्ल्याच्या बाहेरील बाजूची तटबंदी, बुरुज व खंदकाचे अवशेष

किल्ल्याचे नाव : कोलवाळ किल्ला/Colvale Fort/थिवीचा किल्ला/Tivim fort


तालुका : बार्देस/बारदेश/Bardez

जिल्हा : उत्तर गोवा / North Goa

Google Coordinates:  15°38'5"N 73°51'1"E

Google map location (Colvale fort): https://goo.gl/maps/oNDpwcEjpqk 

Google map location (Tivim fort): https://goo.gl/maps/V3h4WedZxXo

 

बारदेश तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणावे असे गाव म्हणजे कोलवाळ. याच गावात कोलवाळ किल्ला गतकाळाची साक्ष देत उभा आहे. पण कोलवाळचा किल्ला म्हणजे एक किल्ला नसून तीन एकत्रीत बांधलेले किल्ले होय. बार्देश तालुक्याच्या उत्तरेकडील सीमेवर आहे शापोरा नदी तर दुसऱ्या अंगाला आहे म्हापसा नदी. या दोन नद्यांमधे सलग तटबंदी व खंदकाने जोडून पोर्तुगीजांनी सेंट थॉमस, सेंट मिंगेल व सेंट क्रिस्तोफर असे तीन किल्ले बांधले. किल्ले बांधताना पोर्तुगीजांनी या किल्ल्यांना आपल्या कॅथलीक संतांची नाव दिली व तिन्ही किल्ल्यात त्यांच्या नावाने चर्च उभारले. या तीन किल्ल्यांपैकी शापोरा नदीकाठी बांधलेला सेंट थॉमस किल्ला पूर्णपणे नष्ट झाला असून थिवी गावानजीक असणाऱ्या सेंट क्रिस्तोफर किल्ल्याचा सध्या फक्त एक बुरुज शिल्लक आहे. त्यामुळे आज या परिसरात किल्ला म्हणून पाहण्यासारखे जे काही थोडेफार अवशेष शिल्लक आहेत ते फक्त कोलवाळ गावाच्या मध्यभागी असणाऱ्या सेंट मिंगेल किंवा मायकेल या किल्ल्याचे. 

 

आदिलशाहाकडून होणारे आक्रमण रोखण्यासाठी इ.स. १६३५ ते १६५२ च्या दरम्यान पोर्तुगीजांनी कोलवाळच्या परिसरात हे तीन किल्ले उभारले. शिवाजी महाराजांच्या बार्देश स्वारीतला हा एक महत्वाचा किल्ला. पोर्तुगीजांचे बार्देश परिसरातील हिंदू लोकांवर होणारे जबरदस्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी व पोर्तुगीजांच्या आश्रयाखाली लपून बार्देश परिसरात बंडखोर बनलेल्या देसायांना वठणीवर आणण्यासाठी शिवाजी महाराज नोव्हेंबर १६६७ मधे बार्देशवर चालून गेले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी कोलवाळ व थिवीचा किल्ला ताब्यात घेतला व या परिसरात तीन दिवस वास्तव्य सुद्धा केले. पण मराठ्यांची पाठ वळताच पोर्तुगीजांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. सन १६७८ मधे संभाजी महाराज्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा एकदा या किल्ल्यावर आक्रमण केले. यात कोलवाळ किल्ल्यात असणाऱ्या सेंट मायकेल चर्चला भयंकर मोठी आग लागली व चर्चचे नुकसान झाले. आज कोलवाळ किल्ल्ल्यासमोर जे चर्च आपल्याला दिसते ते नंतरच्या काळात नुतनीकरन करून नव्याने बांधलेले आहे. पेशवेकाळात म्हणजे सन १७३९ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा एकदा जिंकून घेतला पण पुढे दोनच वर्षात म्हणजे १३ जुन १७४१ ला मार्किस ऑफ लॉरिकलने तो परत जिंकून पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आणला. या किल्ल्यामधे पोर्तुगीज अधिकाऱ्यांची एक खास सैनिकी तुकडी ठेवलेली होती. सन १८४१ मधे हि सैन्याची तुकडी म्हापसा येथे हलवण्यात आली आणि तेव्हापासून या किल्ल्याचे महत्व हळू हळू कमी होत गेले. किल्ल्याचा बहुतांश भाग आज जरी उद्ध्वस्त झाला असला तरी त्याचे संरचनात्मक महत्त्व अद्यापही लक्षात येण्यासारखे आहे. शापोरा व म्हापसा या नद्यामार्गे चालणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी पोर्तुगीजाना या किल्ल्याचा खूप उपयोग होत असे.

 

या किल्ल्याच्या बांधकामात मराठा आणि पोर्तुगीज अश्या दोन्ही वास्तुकलांचा प्रभाव आढळतो. या किल्ल्यात मराठ्यांचे वास्तव्य असताना, त्यांनी किल्ल्याच्या वास्तूशैलीत काही बदल केले. किल्ल्याच्या बांधकामात मुख्यता विटांचा व गरज भासेल तेथे दगड व मातीचा उपयोग केलेला पाहायला मिळतो. एखादा शत्रू किल्ल्यावर चाल करून आल्यास त्याला किल्ल्यात सहज प्रवेश मिळू नये यासाठी किल्ल्याच्या बाहेरील बाजूने असणाऱ्या भिंती जरा जास्त उंचीच्या आणि मजबुत अश्या बांधण्यात आल्या होत्या. किल्ल्याचे काही बुरुज आजही सुस्थितीत उभे असून पूर्वी या बुरुजांवर मराठा व पोर्तुगीजांनी त्यांच्या शासन काळात वापरलेल्या अनेक तोफा ठेवलेल्या होत्या. पण सद्य परिस्थितीत मात्र एकही तोफ किल्ल्यात दिसत नाही. या किल्ल्याचा पसारा खूपच मोठा आहे मात्र किल्ल्याच्या परिसरात बऱ्याच प्रमाणात झाडी वाढल्याने तो पूर्णपणे फिरता येत नाही.

 

कोलवाळे किल्ला थिवीम-डीचोली या मुख्य रस्त्यावर गोव्याची राजधानी पणजीपासून २३ किमी तर म्हापस्यापासून फक्त ८ किमी अंतरावर आहे. हा किल्ला गोवा राज्य सरकारद्वारे ओळखले जाणारे संरक्षित स्मारक आहे (Protected Monuments Of Goa).

 







 

किल्ल्याचे नाव : कोर्जुएम फोर्ट / Corjuem Fort) /खोर्जुवे किल्ला 

 

तालुका : बार्देस/बारदेश/Bardez

जिल्हा : उत्तर गोवा/North Goa

Google Coordinates: 15°35'48"N 73°53'34"E

Google map location: https://goo.gl/maps/Cuhkf9k3w3n

 

हळदोणे गावानजीक म्हापसा नदीच्या किनाऱ्यावर एका छोट्या बेटावर खोर्जुवे नावाचा किल्ला आहे. इ.स १५५० मधे बांधलेला हा किल्ला मूळतः सावंतवाडीकर भोसले यांच्याकडे होता. पण पोर्तुगीज व्हाईसरॉय कॅटानो डे मेलो ई कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली हा किल्ला पोर्तुगीज प्रशासनाच्या ताब्यात आला. त्यानंतर पोर्तुगीजांनी आपली राजधानी असलेल्या पणजीला संरक्षण देण्यासाठी इ.स. १७०७ च्या सुमारास हा किल्ला पुन्हा बांधून अधिक बळकट केला. १८ व्या शतकात, राणे राजपूत आणि सावंतवाडीकर भोसले यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी व त्यांचे वारंवार होणारे आक्रमण थोपवण्यासाठी पोर्तुगीजांना या किल्ल्याचा खूप उपयोग झाला. चार तोफांसह सज्ज अशी एक सशस्त्र बटालियन कायम या किल्ल्यावर पहारा देण्यासाठी ठेवलेली असायची. पुढे १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात, हा किल्ला एक मिलिटरी स्कूल म्हणून वापरला गेला. 

 

गोव्यातील इतर बहुसंख्य किल्ल्यांप्रमाणेच खोर्जुवे किल्ला सुद्धा कोकणात मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या लेटरेइट स्टोनपासून (जांभ्या दगडात) बनवलेला आहे. साधारण चौरस आकारामध्ये बांधलेला या छोटेखानी किल्ल्याला चारी कोपऱ्यात चार बुरुज असून बुरुजांवर पोर्तुगीज धाटणीच्या छोट्या आकाराच्या गोल खोल्या केलेल्या आहेत. या गोल बुरुजवजा खोल्यात एकावेळी जेमतेम एकच सैनिक उभा राहू शकेल एवढीच जागा असते. तसेच खोलीच्या तटबंदीआडून स्वत: सुरक्षित राहून शत्रूवर बंदुकीचा भडीमार करता यावा यासाठी चौकोनी खाचा केलेल्या असतात. किल्ल्याची तटबंदी रुंद असून त्यातही अनेक ठिकाणी ठराविक अंतरावर तोफा डागण्यासाठी चौकोनी खाचा केलेल्या आहेत. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी तटबंदीमधेच एक छोटे प्रवेशद्वार असून त्यावर पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह आणि पोर्तुगीज भाषेतील मजकूर लिहलेला एक छोटा शिलालेख आहे.

 

किल्ल्यात प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस तटबंदीमधे सेंट अँथनी यास समर्पित केलेले एक छोटे ख्रिस्ती देऊळ आहे. पण हे ख्रिस्त देऊळ म्हणजे खूप नंतरच्या काळात कुणीतरी केलेला उद्योग असावा असे वाटते. किल्ल्यात मध्यभागी एक विहीर असून पुरातत्व विभागाने सध्या ती लोखंडी जाळी टाकून बंद केली आहे. विहिरीच्या मागे तटबंदी लगत सैनिकांच्या मुक्कामासाठी बांधलेल्या तीन खोल्या आहेत. किल्ल्याच्या आतील बाजूने  बुरुजांवर तोफा चढवण्यासाठी तटबंदीमधे तयार केलेले रॅम्प देखील वैशिष्ठ्यपूर्ण आहेत.

 

या किल्ल्याच्या बाबतीत एक मनोरंजक कथा सांगितली जाते. उर्सुला इ लांकास्त्रे नावाची एक पोर्तुगीज महिला पुरुषांच्या जगात यशस्वी बनू पहात होती. त्या काळातील पोर्तुगीज महिलांवर घालण्यात येणाऱ्या निर्बंधांवर ती नाखूष होती. त्यामुळे तिने पुरुषांसारखा वेष धारण करून जगाची मुक्त सैर केली. ती इथे खोर्जुवे किल्ल्याच्या परिसरात एक सैनीक म्हणून उतरली व किल्ल्याची रक्षक म्हणून नियुक्ती झाली. पण काही दिवसांनी एक संशयीत व्यक्ती म्हणून तिला अटक करून तिचे कपडे उतरवण्यात आल्यावर तिचं रहस्य उघड झालं. तिला कारागृहात कैदेत ठेवलेले असताना त्या कारागृहाच्या पहारेकऱ्यांचा कॅप्टन तिच्या धिटाई आणि शौर्याने प्रभावित झाला आणि तिच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्याने तिच्याशी विवाह केला.

 

हा किल्ला गोवा राज्य सरकारद्वारे ओळखले जाणारे संरक्षित स्मारक आहे (Protected Monuments Of Goa). खोर्जुवे किल्ला म्हापसा शहरापासून १४ किमी अंतरावर असून  किल्ल्यावर पोहोचण्यासाठी म्हापसा - हळदोणे - खोर्जुवे असा गाडी मार्ग आहे. तसेच म्हापसा - डिचोली रोडवरील थिवी - शिरसय - असनोडा (असरोंडा) - शिरगाव या मार्गेही खोर्जुवे किल्ल्यावर पोहोचता येते.  

 

फोटो मायाजालावरून साभार





   

सप्तकोटेश्वर मंदिर

 

तालुका: डिचोली/Bicholim 

जिल्हा: उत्तर गोवा/North Goa 

Google Coordinates: 15°33'15"N 73°56'13"E 

Google map location: https://goo.gl/maps/DtYhowwb7QG2  

 

गोव्याला फिरायला गेले की बहुदा सगळेच पर्यटक मंगेशी, शांतादुर्गा, महालसा ही गोव्यातली प्रसिद्ध मंदिरे आवर्जून बघतात. पण दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांनी जिर्णोद्धार केलेलं आणि त्या प्रसंगाचे वर्णन करणारा शिलालेख म्हणजेच शिवरायांचे नाव कोरलेलं नार्वे गावाजवळील सप्तकोटेश्वराचे मंदिर मात्र खूप कमी जणांना माहिती असत. तसे पाहिले तर सप्तकोटेश्वर हे कोंकण प्रांतातील ६ मोठ्या मंदिरांपैकी एक. मंदिरही खूप पुरातन. कोकणमहात्म्यात या मंदिराचे वर्णन आहे,

 

द्वीपपाड क्षेत्र महाथोर! जेथे देव सप्तकोटेश्वर!
वारवें राहिवास मंदिर! स्थान  सप्तऋषींचे!
सप्‍तधातूंचे लिंग म्हणती! नवरत्नांची  ज्योती!
ऐसीनवल प्रभा स्थिती! योजवेता भूषणाते! 

 

मूळचे हे मंदिर दिवाड म्‍हणजे दीपवती बेटांवर होते. काही साधूंनी दिवाड बेटावर तपस्या केली तेव्हा सप्तकोट म्हणजे ७ करोड वर्षानंतर भगवान शिवानी त्यांना दर्शन दिले. मग त्या साधूंनी महादेवाजवळ याच गावात राहण्याचा वर मागितला आणि म्हणून याला नाव पडले सप्तकोटेश्वर अशी पुराणकथा सांगितली जाते. पुढे गोमंतक भूमी कदंब राजवटीचा एक भाग झाली आणि ‘श्री सप्तकोटेश्वरलब्धवर प्रसाद’ अशी बिरुदावली दिमाखात मिरविणाऱ्या कदंबांचे हे तीर्थक्षेत्र बनले. १२ व्या शतकात कदंब राजाने आपली पत्नी कमलादेवीसाठी हे मंदिर बांधले अशी नोंद आहे. पण पुढे या मंदिराचे दुर्दैव ओढवले. १३५२ मध्ये बहामनी राजवट आली आणि बहमनी सुलतान अल्‍लाउद्दीन गंगू हसन याने कदंबांचा उच्छेद करून गोवा प्रांत जिंकला. कदंबाचे राज्य जिंकल्यावर अनेक मंदिरांसोबत बहनमी सुलतानानी हे मंदिर देखील उद्ध्वस्त केले. त्याने तिसवाडी येथे असणारे मूळ देऊळ पाडले व शिवलिंग मुळासकट उपटून जवळच असणाऱ्या बांधाच्या चिखलात फेकून दिले. त्यानंतर विजयनगरच्या काळात बुक्कदेवरायाने गोवा मुसलमानांपासून मुक्त केला व या मंदिराचा जीर्णोद्धार करून देवाची प्रतिष्ठापना केली आणि मंदिराला गतवैभव प्राप्त करून दिले. पुढे शे-दीडशे वर्षे देव या मंदिरात वैभवाने नांदला. पण १५१० च्या सुमारास पोर्तुगीजांनी गोव्याच्या भूमीत पाऊल ठेवले व गोव्याचा प्रांत बळकावताच गोमांतकातील देवळांवर पुन्हा अवकळा आली. सन १६४० मध्ये तिसवाडीचे हे देऊळ पोर्तूगीजांनी नष्ट केले. या मंदिराचे जागी त्यांनी चर्चची उभारणी केली व शिवलिंग एका विहीरीच्या पायठणीवर रोवले. त्यांनी शिवलिंग विहिरीवर अशा ठिकाणी बसवलं की, जो कोणी विहिरीचं पाणी काढेल त्याला शिवपिंडीवर पाय दिल्यावरच पाणी काढता येईल. पुढे कोकणाचा हा प्रांत जेव्हा सूर्यराव सरदेसाई यांच्याकडे आला तेव्हा त्यांना या शिवलिंगाची दुर्दशा पाहवली नाही व त्यांनी शिवपिंडी विहिरीवरुन काढून नार्वे गावी एका छोट्या गर्भगृहात सप्तकोटेश्वराची प्रतिष्ठापना केली. अश्या प्रकारे पूर्वी तिसवाडी येथे असणारे हे मंदिर नार्वे गावी आले. पण त्यानंतरही गोव्यावर पोर्तूगीज अंमल कायम असल्याने हे मंदिर हळूहळु जीर्णावस्थेत पडले.

 

गोव्याचा विजरई (व्हाईसरॉय) कोंदी द सांव्हिसेंन्त मृत्यू पावल्यावर शिवाजी राजांनी दुसऱ्यांदा गोव्यावर हल्ला करून पुन्हा गोवा घेण्याचा बेत केला. गोव्याच्या स्वारीवेळी शिवाजीमहाराज वेंगुर्ल्याहुन नार्वे येथे मुक्कामी आले. त्यावेळी त्यांनी जवळच असणाऱ्या सप्तकोटेश्वराविषयी ऐकले व त्याच्या दर्शनास आले. येथील सप्तधातूचे शिवलिंग पाहून शिवाजी राजांना फार आनंद झाला पण त्याचवेळी उध्वस्त झालेले देवालय पाहून त्यांना खूप वाईटही वाटले. मग लगेच त्यांनी मोहिमेत आपल्या बरोबर आलेल्या मोरोपंतांना मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा दिली. मोरोपंतांनी लगेच देवालयाचा सुंदर सभामंडप बांधला व मंदिराचा जीर्णोद्धार केला. आज उभे असलेले श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर हे आपल्या शिवप्रभूंनी बांधलेले आहे. देवळाच्या प्रवेशद्वारावर खालील शिलालेख कोरवलेला आहे, जो या जीर्णोद्धाराची साक्ष देतो. 

 

श्रीसप्तकोटीश शके १५९० किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्यां सोमे श्रीशिवराज्ञा देवालयस्य प्रारंभाः।। 

 

मंदिराच्या डाव्या बाजूला हे मंदिर शिवाजी महाराजांनी बांधले अशी एका दगडी पाटीवर नोंद केलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या उभ्या असलेल्या मंदिराला मुखमंडप, प्रशस्त सभामंडप आणि गर्भगृह आहे. गर्भगृहातील शिवलिंग सोने, रूपे, तांबे, लोखंड, कथील, शिसे आणि कासे अशा सप्तधातूंच्या रसाने बनवलेले आहे. मंदिर सुंदर रंगसंगतीत रंगवलेले असून मंदिराच्या मागील बाजूस सलग खोदलेल्या कमानी दिसतात. मंदिरासमोर एक पाखाडी आहे. ती चढून वर गेले की गर्द झाडा-झुडपांत वसलेले हे मंदिर प्रेक्षणीय दिसते. अश्या या ऐतिहासिक महत्व लाभलेल्या सप्तकोटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पणजी, म्हापसा किंवा डिचोलीमार्गे नार्वे येथे जाता येते. मंदिरापर्यंत पक्का गाडी रस्ता असून पणजीपासून मंदिराचे अंतर २६ किमी, म्हापसापासून २१ किमी तर डिचोलीपासून मंदिर फक्त ८ किमी अंतरावर आहे.

 



 

किल्ल्याचे नाव: St Estevam fort /सांत इस्तेव्हांव / जूवे किल्ला

 

तालुका: तिसवाडी/Tiswadi

जिल्हा: उत्तर गोवा/North Goa 

Google Coordinates: 15°32'9"N 73°57'15"E

Google map location: https://goo.gl/maps/Sc7zm54Si6U2 

 

दक्षिण कोकण आणि गोव्यात नदी व समुद्रातील बेटांना जुवे असे म्हणतात. पणजीपासून साधारण २३ किमी अंतरावर मांडवी नदीकिनारी असेच एक बेट आहे जे सांत इस्तेव्हांव किंवा जुवे नावाने ओळखले जाते. मांडवी नदीमार्गे होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी आदिलशाही राजवटीत सर्वप्रथम या बेटावर किल्ला बांधला गेला. पुढे आदिलशाही राजवटीबरोबर झालेल्या युद्धात पोर्तुगीजांनी हा किल्ला त्यांच्याकडून जिंकून घेतला. किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात येताच १६६८ मधे त्यांनी किल्ला नव्याने बांधला व त्याला सेंट फ्रान्सिस झेवियरचा किल्ला असे नाव दिले. पण किल्ला सांत इस्तेव्हांव किंवा जुवे बेटावर बांधला असल्याने सांत इस्तेव्हांव फोर्ट किंवा जुवेचा किल्ला या नावानेच प्रसिद्ध आहे. हा किल्ला बेटाच्या सर्वोच्च स्थानी बांधलेला असल्याने येथून नार्वे, दिवार आणि डिचोली (बिचोलिम) येथील जवळच्या परिसरावर तसेच मांडवी नदीवरून चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवणे सोपे जात असल्याने त्या काळात या किल्ल्याला विशेष महत्व होते. 

 

जुवेचा किल्ला अत्यंत छोटा आहे. छोट्याशा टेकड़ीवर इवलासा किल्ला. हा किल्ला इतका छोटा आहे की आपल्या देशावरील एखाद्या गावच्या जुन्या सरदाराची गढी किंवा वाडा देखील याहून मोठा असेल. पण किल्ला सुंदर आहे आणि त्यापेक्षाही किल्ल्यावरून दिसणारे दृश फार छान आहे. साधारण त्रिकोणी आकारच्या या किल्ल्यामधे सुस्थितीत असणारी तटबंदी, मध्यभागी असणारी एक खोली, तटबंदीमध्येच काढलेले एक छोटेसे प्रवेशद्वार, तोफा ठेवण्यासाठी तटबंदीमधे सोडलेल्या विशिष्ठ जागा आणि किल्ल्याला मागे असणारे एक जुने चर्च एवढयाच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. पण या किल्ल्याला लाभलेला इतिहास मात्र खूप रोमांचक आणि शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र संभाजी राजांशी निगडीत आहे जो येथे जाणून घेतलाच पाहिजे. शंभूराजांनी गोव्यात जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे हा “जुवेचा किल्ला” असे काही जणांचे मत आहे. याच किल्ल्याच्या समीप असणाऱ्या मांडवी नदीमध्ये संभाजीराजांनी आपला घोडा घातला आणि व्हॉईसरॉय कौट दि आल्व्होरच्या पायदळाचा अक्षरशः धुराळा उडवला.

 

१६८३ साली संभाजी महाराज गोमंतकाच्या स्वारीवर होते. १० नोव्हेंबर १६८३ रोजी ५००० सैन्यासह संभाजी महाराज गोव्यातील फोंडा किल्लावर चालून गेले. मराठ्यांचा आवेश एवढा प्रचंड होता की त्यांनी बंदूकधारी पोर्तुगीज सैन्याला सुद्धा "सळो की पळो" करून सोडले आणि सहजच फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. यावेळी पोर्तुगीज सैन्याचे नेतृत्व करत होता व्हॉईसरॉय कोंदि द आल्व्होर. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला फोंडा किल्ला पडताच व्हॉईसरॉय आल्व्होर जुन्या गोव्याकडे पळत सुटला. त्यानंतर मराठे काही दिवस शांत राहिले. व्हॉईसरॉय आल्व्होरला वाटले की मराठे फोंड्याचा किल्ला घेऊन परत फिरतील. पण दिनांक २४ नोव्हेंबर १६८३ च्या रात्री मराठे अचानक जुवे बेटावर शिरले. रात्री समुद्राला ओहोटी सुरु झाली तसे मांडवी नदीचे पात्र उघडे पडू लागले. या उघड्या नदीपत्रातून मराठे नदी पार झाले आणि ऐन रात्री किल्ल्याला गराडा घातला. तटबंदीला शिड्या लावून मावळे वर गेले आणि अर्ध्या तासातच जुवे किल्ला ताब्यात घेतला. जुवे बेट मराठ्यांनी घेतल्याची नोंद जेधे शकावलीत मिळते ती अशी, 

 

"मार्गशीर्ष मासी फिरंगी याचे कुंभारजुवे घेतले, साष्टी व बारदेश मारिला"

 

संभाजी महाराजांनी ओहोटीच्या वेळी आपले सैन्य घेऊन जुवे बेटावरील किल्ला ताब्यात घेतला. मराठे किल्ल्यात घुसले आणी किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली. किल्ला ताब्यात आला याचा इशारा म्हणून मराठ्यांनी अनेक तोफ गोळे गोव्याच्या दिशेने सोडले. त्यावेळी जुन्या गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २५ नोव्हेंबर १६८३ च्या सकाळी विजरई (व्हॉईसरॉय) कोंदि द आल्व्होर याने संभाजी महाराजांचा प्रतिकार करण्यासाठी ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले. मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते. पोर्तुगीज सैन्य माऱ्याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीजांचे शिपाई जीव वाचवण्यासाठी विजरईस एकटे सोडून डोंगरावरून खाली मांडवी नदीच्या तीराकडे पळत सुटले. या सर्व झटापटीत विजरईच्या खांद्याला गोळी लागून तो घायाळ झाला. केवळ सुदैवानेच तो बचावला. तो मांडवी नदीच्या तीराकडे पळत सुटला. पण यावेळी त्याचा पाठलाग खुद्द संभाजी महाराज ससैन्य करत होते. आपण संभाजी महाराजांच्या तावडीत सापडलो तर अंत निश्चित आहे हे त्याला चांगलेच उमगले होते. विजरई तीरावर पोहोचताच एका मचव्यात बसला आणि पळाला. संभाजी महाराज देखील तीरावर पोहचले. विजरईला मचव्यात बसून पळून जाताना पाहून संभाजी महाराज संतापले आणि त्यांनी तुडुंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात आपला घोडा घातला! नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा पोहणीला लागला. पण त्यावेळी खंडो बल्लाळ देखील शंभूराजांसोबत होते. घोडा पोहणीला लागलेला पाहताच, त्यांनी नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जावून संभाजी राजांचे प्राण वाचवले. केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली पण विजरई मात्र हातातून निसटला. गोव्यावर झालेल्या या जोरदार हल्ल्याने विजरई कोंदि द आल्व्होर याने इतकी दहशत खाल्ली होती कि त्याने आपली राजधानी पणजीहुन मार्मा गोव्याला (सध्याचे मुरगाव) हलवायचा निर्णय घेतला. (इतिहासिक संदर्भ व माहिती साभार: http://www.jssvp.org/2017/06/blog-post_18.html

 

सान्त इंस्तेव्हाम किंवा जुवे किल्ला गोव्याची राजधानी पणजी पासून २३ किमी, म्हापसापासून ३४ किमी तर वास्को दी गामा रेल्वे स्थानकापासून ४० किमी अंतरावर आहे. डिचोली (बिचोलिम) मार्गे यायचे झाल्यास आधी नार्वे येथील सप्तकोटेश्वराचे मंदिर पहायचे आणि मग सारमानस येथील फेरीबोटीतून मांडवी नदीचे विशाल पात्र ओलांडून जुवे गावात पोहोचायचे असा पर्याय देखील उपलब्ध आहे. सारमानस येथून दर पंधरा मिनिटांनी फेरी बोटीची सोय आहे. जुवे गावात पोहोचताच गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी अरुंद पायऱ्यांचा मार्ग आहे. पायऱ्यांचा मार्ग नको वाटल्यास जुवे गावामागून जाणाऱ्या कच्च्या गाडी रस्त्याने देखील किल्ल्याजवळ जाता येते. 

 






 

किल्ल्याचे नाव: Rachol fort / राशोल किल्ला  

 

तालुका: Salcete/साल्सेत/साष्टी/सासष्टी

जिल्हा: दक्षिण गोवा/South Goa 

Google Coordinates: 15°18'30"N 74°0'3"E

Google map location: https://goo.gl/maps/deS69xnAxD42

 

दक्षिण गोव्याचे मुख्यालय म्हणजेच राजधानी समजली जाणाऱ्या मडगावच्या ईशान्येस साधारण ५ किमी अंतरावर राशोल किल्ला आहे. एक खणखणीत प्रवेशद्वार आणि काही ठिकाणी अस्तित्वात असलेला खंदक हे थोडके अवशेष आज किल्ल्याचे अस्तित्व सिद्ध करतात. राशोल किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार राशोल गावात असणाऱ्या प्रसिद्ध सेमिनारीला जाण्याऱ्या रस्त्यावर आहे. या प्रवेशद्वारातुनच आपला राशोल गावात प्रवेश होतो. सेमिनारी म्हणजे ख्रिश्चन पाद्री आणि धर्मगुरु यांना शिक्षण देणारे कॅथलिक विद्यालय. राशोल गावात असणारी सेमिनारी खूप जुनी असून पूर्वी ती किल्ल्याचाच एक भाग होती. आज सेमिनरी आणि राशोल गाव ज्या छोट्या टेकडीवर वसलेले आहे त्या पूर्ण टेकडीच्या बाजूने पूर्वी तटबंदी व खंदक होता. 

 

गोव्यातील कदंब राजवंशाची सत्ता कोसळल्यानंतर मुस्लीम बहामनी राज्याने आपली राजवट यशोशिखरावर असताना हा किल्ला बांधला. त्यानंतर किल्ल्याची सत्ता विजापूरच्या आदिलशहाकडे गेली. पुढे विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय याने हा किल्ला विजापूरचा सुलतान इस्माइल आदिलशहाकडून ताब्यात घेतला. पण १५२० साली त्याने किल्ला पोर्तुगिजांच्या हवाली केला. त्या बदल्यात कृष्णदेवराय याने पोर्तुगिजांकडून मुस्लिमांच्या विरोधात सैन्याची मदत घेतली. पुढे राशोल किल्ला शेवट पर्यंत पोर्तुगिजांच्या ताब्यातच राहिला. त्यांनी किल्ला युद्धशास्त्राच्या दृष्टीने अधिक बळकट केला व या किल्ल्यावर १०० तोफा व बंदुका ठेवून किल्ल्याचा चोख बंदोबस्त केला. या किल्ल्यामुळे पोर्तुगीजांनी इस्लामिक आक्रमणांना चोख प्रतिउत्तर तर दिलेच पण त्याचबरोबर १६८४ मधे संभाजी राज्यांनी या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यालाही त्यांनी जुमानले नाही. कालांतराने मात्र या किल्ल्याचे लष्करी महत्व कमी होत गेले व हा किल्ला निसर्गाच्या तडाख्यात सापडला.

 

आज राशोल किल्ल्याचे जवळपास सर्व अवशेष काळाच्या ओघात नष्ट झालेले असले तरी किल्ल्याचे प्रवेशद्वार मात्र आवर्जून वाट वाकडी करून पाहण्यासारखे आहे. सुंदर रंगसंगतीत रंगवलेले व पोर्तुगीज राजचिन्हे कोरलेले हे प्रवेशद्वार आजही उन, वारा व पाऊस यांचे तडाखे झेलत भक्कमपणे उभे आहे. 

 



श्री. विवेक काळे (http://www.sahyadrigeographic.com) यांनी काढलेले राशोल किल्ल्याच्या दरवाजाचे सुंदर स्केच

तर वाचकांनो, गोव्यावरील किल्ल्यांच्या या पहिल्या भागात आपण सफर केली ती गोव्याच्या अंतर्गत भागातील किल्ल्यांची म्हणजे जे किल्ले समुद्रकिनाऱ्यापासून थोडे लांब आहेत. पण लेखाच्या पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागात आपण सफर करू ती समुद्रकिनाऱ्याला लागून असणाऱ्या गोव्यातील सागरी किल्ल्यांची. गोव्यातील आणखी ७ किल्ल्यांची माहिती असणाऱ्या या लेखाच्या दुसऱ्या भागची लिंक खाली देतोय. धन्यवाद! 


गडभ्रमंती गोमंतकीय किल्ल्यांची - भाग २


@ VINIT DATE – विनीत दाते 

 

गोव्याचे व किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ:

 

- मिलिंद गुणाजी यांचे "चला माझ्या गोव्याला" हे पुस्तक

- गोव्यातील किल्ल्यांवर व इतिहासावर अभ्यास करणारे मूर्तिकार श्री. सचिन मदगे यांचे वर्तमानपत्रात प्रकाशित झालेले लेख

- गोव्यातील किल्ल्यासंबंधी मायाजालावरून (Google) मिळालेली त्रोटक स्वरूपातील इंग्रजीमधील माहिती


ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित करणे असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 



“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.

 

Comments

  1. नेहमीच्या सारखे अप्रतिम
    विनीत पुस्तक कधी प्रकाशित करणार
    waiting for the 1st copy

    ReplyDelete
  2. विनित खूपच छान माहिती दिली, आम्ही गोव्याला गेलो की फक्त मंदिर आणि बीच वर जाणे व्हायचे. पुढच्या वेळी नक्की गड किल्ले पाहू. फोटो तर अप्रतिम आहेत. धन्यवाद

    ReplyDelete
  3. विनितजी, गोव्याचे समग्र वर्णन असणारी अशी कविवर्यांची कविता. अशी सुरुवात असणारा हा ब्लॉग आत्ताच वाचला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यात बांधलेले किल्ले आणि मंदिरे, छायाचित्रासहित आणि अप्रतिम शब्दांकन करून सुरेख वर्णन आपण यात केले आहे. यामध्ये दिसून येते कि, आपण प्रत्येक किल्ल्यांची नावे, त्याचा, तालुका, झिल्ला, गुगल कॉ ऑर्डिनेट्स, गुगल मॅप , त्या किल्ल्याचा इतिहास, महामार्गापासूनचे अंतर, कसे जावे, वाहन कोणते असावे, त्याचा मार्ग इत्यादी गोष्टी आणि सखोल बाबींचे बारकावे टिपून त्याचे केलेले वर्णन मनाला नक्कीच भावते. लिखाण तर अप्रतिम आहेच आणि छायाचित्रे अत्यंत बोलकी आहेत. तसेच शेवटी भटकंती ला जाताना काय करू नये हे देखील नवीन भटकंती करणाऱ्यासाठी नक्कीच उपयुक्त माहिती आपण दिलेली आहे यामुळे हा ब्लॉग खूपच छान झाला आहे. तुमच्या तुलनेत मी भटकंती खूपच कमी केली आहे करत आहे. पण सांगावेसे वाटते कि ना तर मी सुंदर लिखाण करू शकतो .... आणि बोलकी छायाचित्रे काढू शकतो. असो. एकंदर उत्तम ब्लॉग आणि छायाचित्रे देखील. ..... एक नंबर ...... दत्तात्रय जोशी

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर लिखाण फोटो ही सुंदर नेहमी प्रमाणेच

    ReplyDelete
  5. खुपच सुंदर लिखाण फोटो ही सुंदर नेहमी प्रमाणेच

    ReplyDelete
  6. नेहमीप्रमाणे सुरेख!

    ReplyDelete
  7. गोव्यासारखच मस्त लिखाण

    ReplyDelete
  8. सुंदर लिखाण आणि व्यवस्थित माहिती त्यामुळे निश्चितच या किल्याना भेट देणार

    ReplyDelete
  9. विनीत,
    सुरेख छायाचित्रे अन सुरेख वर्णन! गोव्याची भटकंती बाकी आहेच, पण, ओळखपर मात्र तु आताच घडवून आणलीस!😍🌹👍🏽

    ReplyDelete
  10. सुंदर वृतांत आणि छायाचिञे. पार्ट 2 च्या प्रतिक्षेत.
    👌👍

    ReplyDelete
  11. खुपचं छान व अनोखी माहिती सर्व छायाचित्रे देखील अप्रतिम

    ReplyDelete
  12. मस्तच विनीत, एक तर ह्या भटकंतीला दीड वर्ष होईल. इतक्या दिवसांनंतर इतकी सगळी माहिती बरकाव्यासह लक्षात राहणे कठीण. त्यातून नुसती भटकंतीच नाही, तर त्यात इतिहासपण.
    सुंदर...
    किल्ला किंवा मंदिर इथे पोहोचेपर्यंतच्या वेळेत केलेली मजा किंवा घटना ह्यासुद्धा ब्लॉग अधिक मनोरंजक करतील. पण अर्थात तुझी ती शैली नाही आणि ह्या गोष्टी नसल्या तरी नवीन भटक्याला गरजेच्या सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये आहेतच.

    ReplyDelete
  13. sahich lihila aahes. alornla fort mhanje harmal ka?
    hya pudchya trip madhe nakkich hyatl 1-2 kille tari pahayla havet.
    harmal cha nakkich pahta yeil. Corjuem fort farch uttam disto aahe.

    ReplyDelete
  14. .... ,तरी याखेरीज गोव्यात बघण्यासारखं पुष्कळ काही आहे. .... अशी नजर आणि भटकंतीची इच्छा तुमच्यासारख्या भटक्याकडेच असू शकते.
    अनेक किल्ल्यांची नावं वाचता वाचता बोबडीच वळली lol .
    अजून वाचतोय ब्लॉग ...

    ReplyDelete
  15. छान, गोव्यात इतके किल्ले आहेत हे माहीतच नव्हतं. खरे तर गोवा म्हणजे स्वस्त दारू पिण्याचे आणि मजा करण्याचे ठिकाण अस काहीस गणित झालेलं आहे अलीकडे. हे किल्ले आणि त्यांची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  16. नेहमीप्रमाणे कमी शब्दात वर्णन केले आहेस आणि इतिहासात डोकावणारे देखील, जोडीला फोटो मोजकेच पण बरेच बोलून दाखवणारे. गोव्यात हे पण भेट देण्यासाठी जागा आहेत हे दाखवून दिले, असेच काम चालू राहू द्यावे.

    ReplyDelete
  17. उत्तम. These archeological places may also interest you.

    सप्तकोटेश्वर नार्वेच्या उत्तरेला ३५० मीटर अंतरावर एक लेणं आहे. @15.5550415,73.931304 तसा बोर्ड मंदिर परिसरात आहे. उसगळीमळ ची कातळशिल्प @15.1208046,74.1309135 आणि तांबडी सुरला मंदिर @15.4390298,74.2503907 हि गोव्याची आणखी खास वैशिष्ट. साखळी गावाजवळ आरवले लेणी आहेत @15.5527447,74.023261

    ReplyDelete
    Replies
    1. Aajun kaahi cuenta sarkhi maahiti asel tr nakki sanga mi 25 april te 28 april govyat firyala janar aahe 9823123525 ha majha whatsapp number aahe

      Delete
  18. विनीत भाऊ,

    नेहमीप्रमाणे परिपूर्ण ब्लॉग. माझ्या नुकत्याच झालेल्या गोवा मोहिमेत तुझ्या ब्लॉगचा आणि 'साप्ताहिक सकाळ'मधले काही कात्रणे आणि इतर ठिकाणाहून मिळालेल्या माहितीचा खूप उपयोग झाला..!!

    प्रत्येक किल्ल्याचा तालुका, जिल्हा, लोकेशन मॅपची लिंक, किल्ल्याला भेट द्यायच्या वेळा, इतिहास, सद्यस्थिती, कसं जायचं - You are taking lots of efforts, Vinit..!!

    साप्ताहिक सकाळ मधला एका किल्ला - ज्याची मायाजालावर खूपच त्रोटक माहिती उपलब्ध आहे - ते आपण personally discuss करू.

    बेतूल किल्ल्याच्या माहितीमध्ये तालुका Salcete/साष्टी असा आहे, पण पुढे 'केपे तालुक्यात साळ नदीच्या तीरावर' असा उल्लेख आहे. नक्की तालुका कुठला?
    याच किल्ल्याच्या माहितीमध्ये दुसऱ्या परिच्छेदामध्ये 'राज्याभिषेकानंतर म्हणजे १६७५ नंतर...' असे वाक्य आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक १६७४ ला झाला. तुला त्याच्या पुढच्या वर्षी म्हणायचं आहे कि हि प्रिंटिंग मिस्टेक आहे? ;)

    अजून एक बदल सुचवायचा आहे तो म्हणजे शापोरा किल्ल्याच्या माहितीबद्दलचा. त्यात बॉलिवूड असा उल्लेख आहे. त्या ऐवजी हिंदी चित्रपट सृष्टी (किंवा तुला इतर जे योग्य नाव वाटेल ते) असं म्हटलंस तर छान वाटेल. त्यांचं हॉलीवूड म्हणून आपलं बॉलीवूड हे आपणच आपल्या चित्रपट सृष्टीचा केलेला अपमान आहे. मस्त खिचडी-कढी खात असताना काचकन एखादा खडा दाताखाली यावा तसं तुझा छान, माहितीपूर्ण ब्लॉग वाचताना तो 'बॉलीवूड' शब्द आला..!! हिंदी चित्रपट सृष्टीला 'बॉलीवूड' म्हणून नये हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकी तुझा ब्लॉग अगदी परिपूर्ण. असाच भटकत रहा आणि माहिती दे जा - कधी-मधी मला पण नेत जा..!! ;)

    धन्यवाद..!!

    - योगेश पाचंगे.

    ReplyDelete
  19. अतिशय सुंदर लेख 👌
    आपला नंबर मिळेल का?

    ReplyDelete
    Replies
    1. Plz share your contact details on vinitvdate@gmail.com by email. I will connect with you. Thank you!

      Delete
  20. सुंदर लिखाण आणि फोटोज्

    ReplyDelete
  21. फोंडा किल्ला सुध्दा गाओ त आहे

    ReplyDelete
  22. खूप सुंदर माहिती दिलीत,फोटोही अप्रतिम आहेत,गोवा राज्यातील किल्ल्यांचे पुस्तक माझ्याकडे आहे,पण त्यामध्ये तुमच्या इतकी सविस्तर माहिती नाही,
    मी या वर्षी गोवा राज्यातील किल्ले भेटीचे नियोजन करत आहे,यासाठी तुमची खूप मोलाची माहिती मिळाली,
    तसेच याशिवाय अजूनही काही किल्ले गोव्यात आहेत,त्यांचीही माहिती असेल तर द्यावी,तसेच रूट मॅप दिला तर उत्तम

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana