मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०१६

पळशीचा भुईकोट_Palashi Land Fort

लाकडातील नक्षीकामाचा अप्रतिम ठेवा, पळशी येथील होळकरांचे दिवाण पळशीकर यांचा वाडाअहमदनगर म्हणजे सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक अप्रतिम गढ्या असणारा जिल्हा. याच नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्‍यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी यादव कांबळे-पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. या छोट्याशा किल्ले वजा गढीचे खरे वैशिष्ठ म्हणजे भान हरखून जाईल असे लाकडातील नक्षीकाम केलेला पळशीकरांचा वाडा.आपल्या महाराष्ट्रात पळशी नावाची अनेक गावे आहेत. त्यामुळे गुगलच्या नकाशात मात्र हे गाव जरा प्रयत्न पूर्वकच हुडकुन काढावे लागते. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की एक रस्ता डावीकडे अण्णा हजारे यांच्यामुळे प्रसिद्ध असणाऱ्या राळेगणसिद्धीकडे वळतो. या रस्त्यावर आधी पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेरनंतर हाच रस्ता पुढे २० किलोमीटर अंतरावर टाकळी येथील ढोकेश्वराच्या लेणीजवळ नगर–कल्याण महामार्गला मिळतो. आता टाकळीजवळ आलाच असाल तर ढोकेश्वराची कोरीव लेणी देखील वाकडी वाट करून आवर्जून पहावीत अशीच. टाळकी येथे नगर–कल्याण महामार्ग सोडायचा की एक छोटा डांबरी रस्ता अनेक वळणे घेत वासुंदे गावामार्गे पळशीत पोहोचतो. गावानजीक पोहोचताच किल्ल्याची अजुनची सुस्थितीत असलेली तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. तसा पळशीचा हा किल्ला भुईकोट म्हणावा इतका मोठा नसला तरी गावाला चहुबाजूने दगडी तटबंदी, तटबंदीमधे अनेक बुरुज आणि दोन दिशांना दोन भक्कम व अजूनही सुस्थितीत असणारे दरवाजे आहेत. पळशी गावाचा सर्व पसारा या दोन दरवाज्यांच्या आताच आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार भव्य असून त्याला पहारेकारांच्या देवड्या आहेत. या मुख्य दरवाज्याला नुकतेच रंगकाम केलेले असून अनेक राजकीय पक्षांचे झेंडे व फ्लेक्स यामध्ये तो झाकोळून गेलेला आहे. दरवाज्याच्या दोन्ही बाजूंस शेलालेख कोरेलेले असून ते नीट वाचता येण्यासारखे उत्तम स्थितीत आहेत. 
या भव्य दरवाज्यातून आत गेल्यानंतर गावातून फेरफटका मारत असताना नवीन झालेल्या सिमेंटच्या जंगलामध्ये उत्तम प्रकारचा दगड व चौकोनी विटांचे बांधकाम असेलेले तीन चार वाडे आपले लक्ष वेधून घेतात. सध्या मात्र यापैकी एकच वाडा सुस्थितीत असून बाकी तीनही वाड्यांची पूर्णपणे वाताहत झालेली आहे. पण हा सुस्थितीतील वाडा वेळ देऊन नक्की पहावा असा अप्रतिम आहे. 


पळशीकरांचा मुख्य वाडा म्हणजे काष्ठ्शिल्पाचा उत्कृष्ठ नमुनाच. पूर्वी हा वाडा चार मजली होता असे सांगतात पण सद्य स्थितीत फक्त दोनच मजले तग धरून उभे आहेत. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच मधे चौक व चारसोपी वाडा आपल्या दृष्टीस पडतो. वाड्याच्या प्रत्येक खांबावर एकसंध लाकडात खुप सारे बारीक कोरीव काम केलेले आहे. यासर्वात परमोच्च बिंदु म्हणजे एकसंध लाकडात कोरलेली फुलांची परडी व अंबारीसह असणारा हत्ती. हे सर्व कितीतरी वेळ भान हरखून पहात राहवे असेच आहे. पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा असून, ते इंदूरला असतात. या वाड्याची देखभाल करण्यासाठी एक कुटुंब मात्र कायमस्वरूपी येथे राहते.हा वाडा पाहून झाल्यावर किल्ल्याच्या मागील प्रवेशद्वाराने पळशी गावाचे भूषण असलेल्या विठ्ठल मंदिरात जायचे. हे मंदिर नदीकाठावर बांधलेले असून उत्तम नक्षीकाम केलेले आहे. मंदिराला सुंदर असा नगारखाना असून पाषाणात बांधलेल्या या मंदिरावर अनेक शिल्पे व देव देवतांच्या मूर्ती कोरलेल्या असल्याने ते वैशिष्ठपुर्ण आहे. या मंदिराचा गाभारा आणि मंदिराचे शिखर हे विलक्षण प्रेक्षणीय आहे. मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती ही राही व रुक्‍मिणीसह असून शाळिग्राम शिळेची बनवलेली आहे. या मंदिराला देखील चहुबाजूंनी तटबंदी असून चारही कोपऱ्यात छोटे बुरुज वजा बांधकाम केलेले आढळते. हे मंदिर अंदाजे २५० वर्षांपूर्वीचे असून ते १८ व्या शतकात येथील रामराव अप्पाजी पळशीकर यांनी बांधले असे सांगतात. 

पर्यटनाची आवड असणाऱ्या कुटुंबाने टाकळी ढोकेश्वर येथील लेणी, जामगावचा भव्य भुईकोट आणि पळशी गावचे आकर्षण असणारा वाडा व विठ्ठल मंदिर अशी एक दिवसाची मस्त सहल नक्की करावी. 

एक विनंती: कृपया पर्यटन करताना पाऊलखुणा शिवाय मागे काही ठेऊ नका. आठवणी शिवाय काही नेऊ नका. सह्याद्री आणि या ऐतिहासिक वास्तू हि आपली संपत्ती आहेत. कृपया त्यांना जपा.

- © VINIT DATE (विनीत दाते)

Picasa album on Palashi fort


१२ टिप्पण्या:

 1. वा!! सुंदर वर्णन.शिलालेख आणि दरवाजे ऑइल पेंट केलेले आहेत :( नशिबाने वाडा आणि लाकडी कोरीव काम वाचलंय,

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद अजय. होय जे काही जुन लाकडाच कोरीवकाम उरलंय ते लवकर बघून घे. काय सांगाव त्याच हि विद्रुपीकरण होईल नवीन बांधकामत

   हटवा
 2. asha vatsunchi japavnuk khup mahatvachi ahe ti apanch keli pahije ani te flex wagare lavle aahet tepan kadhale gele pahije...vastu khupach sundar ahet mandir pan khupach chan ahe... dhanyawad mahiti sathi

  उत्तर द्याहटवा
 3. जबरदस्त माहिती दादा, बेत लवकरच आखावा लागणार.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. नक्कीच देवा ... नगर रस्त्यावर बऱ्याच गढ्या आहेत नक्की चक्कर मारावी

   हटवा
 4. इतिहास समोर आणलात,धन्यवाद
  संदीप शिंदे(पळशी)

  उत्तर द्याहटवा
 5. विठ्ठल मंदिर फारच सुंदर आहे,मी संदेश खंडेराव भोर,व माझा मित्र गणेश बाळासाहेब पोखरकर मु.पो खडकी पिंपळगाव ता. आंबेगाव जि.पुणे आज दिनांक7/11/2018 रोजी ते रमणीय स्थळ पाहून आलो.अप्रतिम

  उत्तर द्याहटवा