जामगावचा किल्ला_Jamgaon fort

श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांचा भव्य जामगावचा किल्ला/गढी


किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८६ एकर असून संपूर्ण किल्ल्याच्या बाहेरील तीनही बाजूने तटबंदी आहे तर मागे डोंगराचे नैसर्गिक संरक्षण


अहमदनगर जिह्यातील पारनेर तालुक्यामध्ये अनेक सुंदर गढ्या व ऐतिहासिक वाडे आहेत. त्यातीलच एक भुईकोट किल्ला शोभावा असा भव्य वाडा पारनेर पासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या जामगाव येथे आहे. श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांचा हा भव्य वाडा प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी नक्कीच पहावा एवढा भव्य आणि अजूनही उत्तम स्थितीत उभा आहे. ह्या किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ ८६ एकर असून या संपूर्ण परिसराला वाड्याच्या बाहेरील बाजूने औरस चौरस भलीमोठी तटबंदी बांधलेली आहे. बहुदा पूर्वी जामगाव हे गाव सुद्धा तटबंदीच्या आतच वसलेलं असावं. या अभेद्य तटबंदी मधून बाहेर पडण्यासाठी पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन भलेमोठे दरवाजे आहेत. 


 मारुती मंदिरातील बलभिमाची भव्य आणि अतिशय सुंदर मूर्ती 
किल्ल्याचा पूर्वाभिमुख मुख्य दरवाजा
दरवाज्यावर उभे राहून लांबवर नजर टाकली असता किल्ल्याची दूरवर पसरलेली तटबंदी दिसते.


किल्ल्याच्या मुख्य दरवाज्या समोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस मारुतीचे एक मंदिर आहे. या मंदिरातील बलभिमाची मूर्ती भव्य आणि अतिशय सुंदर आहे. हे मंदिर पाहून किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्याकडे परत यायचे. हा दरवाजा दोन बलदंड बुरुजांमध्ये उभा आहे. दरवाजा अजूनही भक्कम स्थितीत असून दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या बुरुजांवर उभे राहून लांबवर नजर टाकली असता किल्ल्याची दूरवर पसरलेली तटबंदी लगेच नजरेत भरते. या तटबंदीच्या आत पूर्वी वसलेल्या जुन्या घरांचे काही अवशेष तसेच प्रभू रामचंद्र, मारुती आणि विठ्ठल रुक्मिणी यांची सुंदर मंदिरे आहेत.


मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहिलो कि समोर दिसतो भक्कम बुरुजांनीयुक्त आणि दुहेरी दगडी तटबंदी मधील मुख्य वाडा
वाड्याची दुहेरी तटबंदी
मुख्य वाड्याचे भरभक्कम व भव्य प्रवेशद्वार
मुख्य वाड्याचा दरवाजा आणि त्यावरील शिंदे घराण्याचे राजचिन्ह

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहिले असता ६०० मीटर अंतरावर महादजी शिंदे यांचा भक्कम बुरुजांनी युक्त, दगडी तटबंदी व भक्कम प्रवेशद्वार असणारा मुख्य वाडा आपले लक्ष वेधून घेतो. हा मुख्य वाडा देखील दुहेरी तटबंदीने सुरक्षित केलेला आहे. शिंदे घराण्याचे राजचिन्ह असणारे वाड्याचे भरभक्कम व भव्य प्रवेशद्वार आपली नजर खिळवून ठेवते. मुख्य वाड्याचे सर्वच्या सर्व ६ बुरुज आजही सुस्थितीत उभे आहेत.


जमिनी पासून साधारण १५ फूट उंचीवर बांधलेला, ६८ मीटर x ४० मीटर आकाराचा महाकाय वाडा 

मुख्य वाड्याचे उत्तरेकडील प्रवेशद्वार

वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर १०० मीटर अंतरावरच जमिनी पासून साधारण १५ फूट उंचीवर बांधलेला, ६८ मीटर x ४० मीटर आकाराचा महाकाय वाडा पाहून आपण क्षणभर स्तब्ध होतो. हा वाडा तीनमजली व दोनचौकी आहे. या मुख्य वाड्यास देखील तटबंदीमधे पूर्व, दक्षिण व उत्तर बाजूस दरवाजे आहेत.


दगडी बांधकामाची विहीर

विहिरीची खोली १५० फुट आहे तर दुसऱ्या बाजूस मोट


वाड्यामधे प्रवेश करण्याआधी डाव्या बाजूस असणारी दगडी बांधकामाची खोल विहीर नक्की पहावी अशीच आहे. १५० फुट खोल या विहिरीत वाकून पाहिलं कि क्षणभर धडकीच भरते. विहीरीतील पाणी खेचण्यासाठी मोटेची व्यवस्था केलेली आहे.


लाकडातील नक्षीकाम
राजदरबाराची किंवा सल्लामसलतीची जागा
राजदरबाराच्या चौकामधे असणाऱ्या खांबावरील सुबक नक्षीकाम

वाड्याच्या प्रवेशद्वारावर लाकडातील नक्षीकाम केलेले असून काही राजचिन्ह कोरलेली दिसतात. दरवाज्यातून आत प्रवेश करताच उजवीकडे भली मोठी राजदरबाराची किंवा सल्लामसलतीची जागा दिसते. हा वाडा शिंदे सरकारांनी रयत शिक्षण संस्थेला बक्षीस दिला असल्याने सध्या येथे रयत शिक्षण संस्थेचे डी. एड कॉलेज भरते. या राजदरबाराच्या चौकामधे असणाऱ्या प्रत्येक खांबावर सुबक नक्षीकाम आहे. वाड्यातच एका कोपऱ्यात छोटेखानी महादेवाचे मंदिर कुलूपबंद असते. 


वाड्याच्या पहिल्या मजल्यावर डी. एड. कॉलेजचे काही वर्ग आहेत.
सोप्यांमध्ये काढलेले जिने व लाकडात सुबक कोरीवकाम केलेले खांब.

वाडयाच्या दुसऱ्या मजल्याची थोडीफार पडझड झालेली आहे मात्र तिसरा मजला जवळ जवळ उद्ध्वस्त होत आला आहे.

वाड्याच्या प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी सोप्यांमध्ये दोन्ही बाजूला जिने काढलेले आहेत. वाड्याच्या पहिल्या मजल्यावर डी. एड. कॉलेजचे काही वर्ग, वसतीगृह व सेवक वर्गांच्या खोल्या आहेत. दोन्ही मजल्यावर लाकडात सुबक कोरीवकाम केलेले खांब खूपच सुंदर दिसतात. वाड्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याची बऱ्यापैकी पडझड झालेली असून तिसऱ्या मजल्यावर भिंतीमधे काही ठिकाणी पाण्याचे हौद बांधलेले आढळतात.


किल्ल्याच्या तटबंदीमधे विठ्ठलाचे आणि रामासमोर दास मारुतीचे मंदिर आहे.

वाड्यातील रंगमहाल, मच्छीमहाल, आंबे महाल व मुदपाकखाना सर्वच आवर्जून पाहावे असे आहे. या वाड्यात रयत शिक्षण संस्थेचे डी. एड कॉलेज भरत असल्याने शक्यतो या वाड्यास सार्वजनिक सुट्टी किंवा रविवारी भेट द्यावी जेणेकरून कॉलेज मधील विद्यार्थी व स्टाफ यांना व्यत्यय येणार नाही.


काही जुने अवशेष व किल्ल्याची तटबंदी


आता ज्यांचा हा वाडा आहे अशा महादजी शिंदे यांच्या बद्दल किती आणि काय लिहावं. थोरले बाजीराव पेशव्यांचे विश्वासू साथीदार राणोजी शिंदे यांचे महादजी हे सर्वात कर्तबगार आणि रणधुरंधर असे पाचवे पुत्र. महादजी हे शंकराचे निस्सीम भक्त देखील होते. दिल्लीची सत्ता स्वराज्यात आणणारे आणि उत्तरेत मराठी सत्ता स्थापन करणारे महादजी शिंदे हे एक खूप मोठे पराक्रमी योद्धे. सध्याच्या मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथे महादजी यांचे सर्वात जास्त काळ वास्तव्य होते आणि येथूनच जवळ जवळ २१ वर्ष त्यांनी हिंदुस्थानचे प्रशासक म्हणून काम केले. पानिपतच्या तिसर्‍या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्याच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी, इ.स. १७९४ रोजी महादजी यांचे निधन झाले. शिंद्यांची छत्री हे पुणे शहराजवळील वानवडी येथे याच्या स्मॄत्यर्थ बांधले गेलेले स्मारक आहे. इ.स. १७९४ सालाच्या सुमारास वर्तमान शिंद्यांच्या छत्रीच्या जागी महादजी यांनी बांधलेले शिवालय होते. महादजी यांच्या मॄत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले. महादजी यांचे वंशज जिवाजीराव शिंदे यांनी जामगावचा हा वाडा १९५५ साली “रयत शिक्षण संस्थेला” बक्षीस करून दिला. 

जाणू सृष्टी, करू निसर्गाशी मैत्री! आरोग्य, जीवन आणि सुखी जीवनाची हीच खरी खात्री!


@ VINIT DATE – विनीत दाते


Click here for Picasa photo albumComments

 1. छान माहिती व उत्तम प्रकाशचित्रे. भटकत रहा व लिहीत रहा..👌👌👍👍

  ReplyDelete
 2. अतिशय उत्तम आणि दुर्मिळ माहिती। असेच प्रकाशित करत रहावे ही विनंती

  ReplyDelete
  Replies
  1. नक्कीच ... धन्यवाद सर ... keep following the blog

   Delete
 3. Replies
  1. धन्यवाद साताव साहेब

   Delete
 4. खूप छान माहिती विनित. फोटोही मस्त आहेत.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद हेम ... तुला माहिती आवडली हे वाचून आनंद वाटला

   Delete
 5. सुरेख मस्त माहिती आणि छायाचित्रे..
  आवड्या!!!👍👌☺
  धन्यवाद...

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद साई ... तुझ्यासारख्या सुंदर ब्लॉग लिहिणाऱ्या लेखकाची प्रतिक्रिया फार मोलाची वाटते.

   Delete
 6. उत्तम काम करत आहात सर तुम्ही

  ReplyDelete
 7. छान लिहिलंयस.. फोटोही छान!
  मस्त विनीत!
  😊👍

  ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

रांगणा_Rangana

पावनगड