विदर्भातील "प्रतापगड"

विदर्भ आणि प्रतापगड? ऐकून थोडं चकीत झालात ना? कारण प्रतापगड म्हणलं की आपल्या नजरेसमोर येतो तो "महाबळेश्वरच्या जटांत आणि पारघाटाच्या ओठात" शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि शिवप्रतापामुळे प्रसिद्ध पावलेला सातारा जिल्हयातील प्रतापगड. पण आपल्या याच महाराष्ट्रात पूर्व विदर्भाच्या अगदी टोकाला आणखी एक प्रतापगड नावाचा किल्ला आहे हे अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना माहिती असावं. आज आपण गोंदिया जिल्हयातील याच प्रतापगडाची ओळख करून घेऊ. 

महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांची सीमा लाभलेला आणि बराचसा भाग वनांनी व्यापलेला असल्याने काहीसा दुर्गम असलेला जिल्हा म्हणजे "गोंदिया". या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध व नवेगाव-नागझिरा राष्ट्रीय अभयारण्य प्रसिद्ध आहे. गोंदिया जिल्‍हयाच्‍या दक्षिणेस अर्जुनी मोरगांव तालुक्‍यात गोंदियापासून साधारण ७५ किमी तर तालुक्याच्या ठिकाणापासून केवळ १८ किमी अंतरावर प्रतापगड किल्ला आहे. नवेगाव बांधच्या अभयारण्यामधून एक डोंगररांग दक्षिणेकडे गेलेली आहे. याच डोंगररांगेवर घनदाट जंगलाचे सानिध्य लाभलेला प्रतापगड हा वनदुर्ग आहे. 

या ठिकाणी सुमारे ३०० वर्षापूर्वी गोंड राजाचे शासन होते व त्या काळातच या ठिकाणी डोंगर फोडून प्रतापगड हा किल्ला बांधण्यात आला. काही कालावधीनंतर गोंड राजांच्या या किल्ल्यावर नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी आक्रमण करून प्रतापगडवर विजय मिळविला. यानंतर किल्ल्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी राजा खान यांच्याकडे देण्यात आली. दरम्यानच्या काळात या ठिकाणी ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांचे वास्तव्य होते. प्रतापगड किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी पूर्व पठारावर त्यांचा दर्गा आहे. याच दर्ग्या जवळून गडावर जाण्याचा मार्ग आहे. दर्ग्याजवळ किल्ल्याच्या बांधकामाचे काही अवशेष पहायला मिळतात. येथे असणाऱ्या रचीव दगडांच्या तटबंदीची आता पडझड झालेली दिसते. 

किल्ल्याची चढाई पायथ्यापासून साधारण ३०० मीटर आहे. दर्ग्याजवळूनच उभ्या चढाईला सुरवात होते. पण किल्ल्याच्या कातळकड्यापर्यंत असणारी सुरवातीची साधारण एक किलोमीटरची वाटचाल ही करंज, बेहडा, बिब्बा, साग, पळस यासारख्या उंचच उंच झाडांच्या सहाय्याने घनदाट झालेल्या जंगलातून असल्याने थोडी सुखकर वाटते. ही वाटचाल सुखकर असली तरी समर्थांच्या "अखंड सावध असावे" या उक्तीप्रमाणे आजूबाजूला कायम नजर ठेवावी व गडफेरी करताना सर्व सहकारी मित्रांनी शक्यतो एकत्र राहावे. मानवाचा चहाळ नसल्याने हा किल्ला पूर्ण जंगलमय झालेला आहे. तसेच या परिसरात अस्वले खूप आहेत असे स्थानिक लोक सांगतात. अस्वल हा जंगलातील अतिशय धोकादायक प्राणी. त्यामुळे गावातून निघताना एखादा माहितगार व्यक्ती आणि एखादी मोठी काठी जवळ बाळगावी. 

असो, तर जंगलातील वाटचाल संपवून साधारण ४५ मिनिटात आपण किल्ल्याच्या कातळकड्यापाशी पोहोचतो. या कड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर उजवीकडे चढाई सुरू करावी. येथील कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लटकलेली दिसतात. आपली येथून पुढील वाटचाल कातळकड्याला अगदी लागून असल्याने गर्दी, गोंगाट न करता शांतपणे मार्गक्रमण करत राहावे. 

कातळकडा डावीकडे ठेवत पुढच्या १५ मिनिटांत आपण तटबंदीमध्ये प्रवेश करतो. हा किल्ल्याच्या माचीचा भाग असून तो रचीव तटबंदीने संरक्षित केलेलो आहे. या माचीपासून थोडे वर आल्यावर उजवीकडील बुरुजावर एक कबर दिसते. बुरुजाचा हा परिसर देखील भक्कम अश्या तटबंदीने संरक्षित केलेला आहे. या बुरूजापासून एक वाट बालेकिल्ल्यामागील भल्या मोठ्या माचीकडे जाते. या माचीवर घनदाट जंगल आहे. ही गडाची पश्चिम बाजू असून ती तटबंदीने पूर्णतः वेढलेली आहे. येथे तटबंदीच्या आत पाण्याचा तलावाचे अनेक अवशेष दिसतात. 

माचीचा वरील परिसर पाहून झाल्यावर कबर असणाऱ्या बुरुजाजवळ परत यावे आणि डावीकडील तटबंदीकडे वर जाणाऱ्या पायऱ्यांनी गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जावे. माथ्यावर काही चौथऱ्यांचे अवशेष पसरलेले असून ते एका तटबंदीने वेढलेले आहेत. या गडाला बराच मोठा माथा लाभलेला असून अनेक ठिकाणी बांधकामाचे अवशेष नजरेस पडतात. तसेच गडाला नैसर्गिक कातळकडयाची अभेदयता लाभलेली असल्यामुळे जिथे गरज आहे अगदी तेथेच रचीव दगडांची तटबंदी बांधलेली दिसून येते. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून दूरपर्यंतचा परिसर पहाता येतो. इटियाडोह प्रकल्पही येथून दिसतो. 

गोंडराजांच्या काळात उत्तरेकडील आक्रमण रोखण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असावा. त्यामुळे गोंडराजांचे एक दक्ष लष्करी ठाणे असे काहीसे या किल्ल्याचे इतिहासकाळातील महत्व असावे. १६ व्या शतकात बांधलेला देवगडाच्या गोंड राजांच्या अखत्यारीतील हा दुर्गम किल्ला आजतरी दुर्लक्षित असून इतिहासप्रेमींच्या प्रतिक्षेत आहे. 

किल्ल्याचे काही फोटो: 

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारा दर्गा


दर्ग्याच्या परिसरात गडाच्या पायथ्याशी असणारी उध्वस्त तटबंदी

गडाच्या वाटेवरील जंगल

जंगलाच्या वाटेवरून दिसणारा किल्ल्याचा कातळकोरीव माथा

किल्ल्याच्या वाटेवरील जंगल

प्रतापगड किल्ल्याचा कातळकोरीव माथा

कातळकड्याला अगदी लागून उजव्या बाजूने गडावर जाणारी वाट 

या कातळावर अनेक ठिकाणी मधमाश्यांची पोळी आहेत

या चौकोनी बुरूजामधून आपला माचीत गडप्रवेश होतो

गडाच्या माचीवर सर्वत्र अशी रचीव दगडांची तटबंदी आढळते

माचीवर तटबंदीच्या आत बांधलेला तलाव


माचीवरील तटबंदी

गडाचा एक नैसर्गिक बुरुज

बुरुजावर जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्या

बुरुजावरून दिसणारा किल्ल्याचा तटबंदीयुक्त परकोट

माचीवरील बुरुजावर असणारी एक कबर

गडाच्या बालेकिल्ल्याकडे

गडाच्या बालेकिल्ल्याचा एक बुरुज

बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार

बालेकिल्ल्यात जाणारी वाट


गडाच्या माथ्यावरील विस्तीर्ण असा बांधीव तलाव

तलावात मधोमध एक भिंत बांधून तलावाच्या पाण्याला वेगळे केलेले दिसते

गडावरील विस्तीर्ण बांधीव तलाव व शेजारी तलावाची भिंत

गडाच्या माथ्यावरून दिसणारा विस्तीर्ण प्रदेश

गडाच्या माथ्यावरून दिसणारा विस्तीर्ण प्रदेश


गडाच्या उत्तर टोकावर

गडाच्या माथ्यावर तयार झालेला एक नैसर्गिक पूल

गडाच्या उत्तर टोकावरून दिसणारा विस्तीर्ण प्रदेश

गडाच्या माथ्यावरील आणखी काही बांधकामाचे अवशेष



Comments

  1. खूप छान माहिती! सह्याद्री बाहेरची ही भटकंती दुर्मिळ असल्याने नोंद म्हणून महत्त्वपूर्ण ब्लॉग!

    ReplyDelete
  2. क मा ल.. नेहमीप्रमाणेच सुंदर आणि नेटका ब्लॉग लिहिलायस..

    ReplyDelete
  3. विनित, खुप छान ! अत्यंत धाडसाने अपरिचित अशा प्रतापगडाची आपण सफर केल्याचे सर्व फोटो पाहून लक्षात येते. सर्व टिमचे अभिनंदन !💐

    ReplyDelete
  4. Khup chhan lihile aahes and Photo suddha mast aahet. ~ Suhas Patil

    ReplyDelete
  5. खूप छान. एका नवीन किल्ल्याची माहिती.

    ReplyDelete
  6. सुंदर अन् दुर्मिळ किल्ल्याची. माहिती खूप छान आहे , अन् सोबत फोटोंद्वारे सर्व किल्ल्याची भ्रमंती करून आल्याचा भास होतो.....
    अप्रतिम विनीत....

    ReplyDelete
  7. विनित, अतिशय सुंदर माहिती. तुमच्या सगळ्या पोस्ट वाचतो. Keep Posting !

    ReplyDelete
  8. वा... विनीत... मस्तच.... एकतर हा असा माहित नसलेला किल्ला बघुन त्यावर आवर्जून लिहिणं हेच फार महत्त्वाचं.... उत्तम लिखाण, ह्या किल्ला आणि "चहाळ" हा नवीन शब्द पण कळला..

    ReplyDelete
  9. नव्या जोमाणे पुन्हा सुरवात
    मस्त विनत

    ReplyDelete
  10. Wa vinit .... khoop chan mahiti lihiliy .... all the best for your new "Bhatakanti " and blog -- Pradnya Dindorkar

    ReplyDelete
  11. विनीत, तुझ्या अथक भटकंतीमुळे नवीन ठिकाण कळतात, पाहायला मिळतात. असाच भटकत राहा

    ReplyDelete
  12. विनीत खूप छान माहिती. गडावर जाऊन आल्या सारखं वाटलं. 👏👏 🙏🙏
    योगेश लंके

    ReplyDelete
  13. अप्रतिम फोटो तसेच छान माहिती

    ReplyDelete
  14. सुंदर शब्दरचना, अप्रतिम फोटो आणि आगळावेगळा किल्ला! 👌👌

    ReplyDelete
  15. खरंच मानावाचा "चहाळ "नसल्यामुळे गड काट्याकुट्यानी भरल्याचे फोटो वरून कळते !बारीकसारीक गोष्टीचा उल्लेख असलेले उत्तम लेखन !धन्यवाद !👏👏

    ReplyDelete
  16. विनितजी, प्रतापगड वनदुर्गाचे खरोखर सुरेख आणि अप्रतिम असे सुयोग्य वर्णन केलेले आहे. अपरिचित किल्ल्यावर जाणं म्हणजे खरोखर धाडसाचे काम ! आपल्या धाडसाला सलाम संपूर्ण माहिती खूप छान दिलेली आहे सर्वच फोटो अप्रतिम. अशाच नवनवीन दुर्ग माहितीसाठी आणि भटकंतीसाठी खूप खूप शुभेच्छा !

    ReplyDelete
  17. छान, एक आडवाटेवरचा किल्ल्याबद्दल उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .

    ReplyDelete
  18. विनीत तुम्ही नेहमीच वेगळे किल्ले आणि घाटवाटा यांचा अनुभव घेता आणि तो शेअर करता. अजून एका नव्या किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
    लेखन अगदी ओघवत्या भाषेत आणि फोटो नेहमीप्रमाणे अप्रतिम.

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana