सोनगड उर्फ नरसिंहगड उर्फ नृसिंहगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडवाटेवरील दुर्लक्षित गिरिदुर्ग सोनगड 


सिंधुदुर्ग! नैसर्गिक लावण्य आणि उज्ज्वल ऐतिहासिक वारसा असा अनोखा संगम लाभलेला जिल्हा. अथांग पसरलेला निळाशार समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, हिरवीगार दाट वनराई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देणारा सिंधुदुर्ग किल्ला. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्ह्याचा बहुमान असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणारा शिवलंका सिंधूदुर्ग आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे पण त्याचबरोबर या जिल्ह्यात आणखी तब्बल २३ किल्ले आहेत हे फार कमी लोकांना माहिती आहे. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची तालुकावार यादी खालील प्रमाणे: 


१) तालुका देवगड - विजयदुर्ग, देवगड, सदानंदगड, कोटकामते

२) तालुका मालवण - रामगड, भगवंतगड, भरतगड, सिद्धगड, वेताळगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड, सिंधुदुर्ग 

३) तालुका वेंगुर्ला - निवती, यशवंतगड 

४) तालुका कणकवली - खारेपाटण, भैरवगड 

५) तालुका कुडाळ - सोनगड, मनोहरगड, मनसंतोषगड 

६) तालुका सावंतवाडी - नारायणगड, महादेवगड 

७) तालुका दोडामार्ग - हनुमंतगड, बांदा 


वरील सर्व किल्ल्यांची वर्गवारी ढोबळपणे जलदुर्ग, किनारीदुर्ग, गिरीदुर्ग आणि वनदुर्ग अश्या चार प्रकारात करता येईल. पुणे किंवा मुंबई येथून शुक्रवारी रात्री निघायचं आणि भल्या पहाटे सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर डेरेदाखल व्हायचं. मग दोन दिवसांत तुम्ही या जिल्ह्यातील किमान चार गिरिदुर्ग निवांत बघून तुमचा विकेंड सार्थकी लावू शकता. त्यात जर का फक्त जलदुर्गच बघायचे ठरवले तर दोन दिवसात सात-आठ किल्ले तरी आरामात बघून होतात. बस फक्त थोडे आडवाटेवरचे आणि अवशेष कमी असले तरी किल्ले पाहण्याचा ध्यास हवा.


घाटमाथ्यावर राहणाऱ्या माणसाला उन्हाळ्यात कोकणात नुसतं फिरायला जायचं म्हणजे सुद्धा सजा वाटते. डोक्यावर टळटळीत ऊन आणि फुंकर मारली तरी पान देखील हलणार नाही असं दमट वातावरण. आमची या वेळेची सिंधूदुर्ग जिल्ह्यातील गिरिदुर्गांची भटकंती पण अशीच भर वैशाखातल्या उन्हातली. पण मनी ध्यास होता तो काही अल्पपरिचित, आडवाटेवरील आणि उपेक्षित गिरिदुर्गांची भटकंती करण्याचा. त्यात या ट्रेकला सोबत यायला माझ्यासारखाच किल्लेप्रेमी आणि नेहमीचा हक्काचा ट्रेकर मित्र प्रसाद परदेशी आणि त्याची बायको नेहा येणार म्हणल्यावर माझ्या गाडीतल्या पाच पैकी तीन जागा आधीच फिक्स झाल्या. आता फक्त अजून दोन जागा भरणे शिल्लक होते. मग ट्रेक संबंधी सगळ्या व्हाट्सअँप ग्रुपवर या ट्रेकबद्दलची माहिती टाकून कोणी येतंय का त्याची वाट पाहत बसलो. पहिले दोन दिवस कुठल्याच ग्रुपमधून काही प्रतिसाद आला नाही. येणार तरी कसा म्हणा, उन्हाळा आणि त्यात सिंधूदुर्ग जिल्ह्यातले गिरिदुर्ग करणार म्हणल्यावर सगळ्यांनी मला मनातल्या मनात का होईना पण वेड्यात काढलं असणार हे मात्र नक्की.


आम्ही तिघांनी का होईना पण हा ट्रेक करायचाच असे ठरवले. तेवढ्यात ट्रेकला निघण्याच्या दोन दिवस आधी एका ट्रेकसंबंधी व्हाट्सअँप ग्रुपमुळे परिचयाच्या झालेल्या अ‍ॅड. विंदा महाजन यांचा फोन आला. त्या आणि त्यांची एक मैत्रीण सुनिता या ट्रेकला येण्यासाठी इच्छुक आहेत असे त्यांनी सांगितले. या दोघी माझ्याबरोबर पहिल्यांदाच ट्रेकला येणार असल्याने त्यांना ट्रेकबद्दल व्यवस्थित माहिती दिली. एक तर भर उन्हाळा, त्यात मी दीड-दोन तास एखादा डोंगर चढवणार आणि वर जाऊन यांना दाखवणार काय तर थोडीफार कुठंतरी शिल्लक असलेली तटबंदी, एक-दोन कोरडी पाण्याची टाकी आणि काही उध्वस्त अवशेष. त्यात हा ट्रेक अल्पपरिचित आणि दुर्लक्षित किल्ल्यांचा, त्यामुळे यावर नेमके कोणते अवशेष आहेत ते मलाच फारसे माहित नव्हते. पण या दोघींनी सगळं नीट समजावून घेतलं आणि जेवढे जमतील तेवढे किल्ले चढू नाहीतर किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात भटकू अशी संमती दर्शवली. मग काय माझी गाडी आणि पाच ट्रेकर निघालो सिंधूदुर्ग जिल्ह्यात गड-किल्ले भटकायला!


माझी निलपरी (TATA TIAGO) आणि मी शुक्रवार दिनांक, १३ एप्रिल २०१८ च्या रात्री ८.३० वाजता चिंचवडवरून निघालो आणि चांदणी चौक, नवले ब्रिज, आंबेगाव असे पिकअप करत ९.३० च्या सुमारास नवीन कात्रज बोगद्यातून सातारा रस्त्याला लागलो. पुणे – कोल्हापूर – राधानगरी – फोंडाघाट – कनेडी असा रस्ता धरला आणि मोजून फक्त दोन ठिकाणी पाच-दहा मिनिटांचे थांबे घेत मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास तब्बल ३७० किलोमीटरचा प्रवास करून सिंधूदुर्ग जिल्ह्यातील नरडवे गावात पोहोचलो. पहाटे लवकर उठून घोटग्याचा सोनगड आणि थोडं ऊन उतरल्यावर दुपारच्या सत्रात नरडव्याचा भैरवगड असे दोन गिरीदुर्ग पहिल्या दिवशी पहायचे आणि वेताळगडसिद्धगड आणि सदानंदगड असे इतर तीन छोटे गिरिदुर्ग दुसऱ्या दिवशी पाहून साधारण दुपारी ४.३० च्या सुमारास पुण्याकडे प्रस्थान करायचे असा सुटसुटीत प्लान बनवला होता. ज्यांची पुस्तके वाचून आम्हा किल्ले प्रेमींना अल्पपरिचित किल्ल्यांची माहिती मिळते असे दुर्गअभ्यासक ‘भगवान चिले’ सर यांच्या ‘दुर्गम दुर्ग’ या पुस्तकानुसार सोनगड हा किल्ला चढायला जरा जास्त वेळ खाणारा होता. त्यामुळे शनिवारी पहाटे कितीही उशीर झाला तरी सोनगड या किल्ल्याच्या पायथ्याशीच जाऊन झोपायचे असे ठरवले होते. पण चिले सरांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलेले दुर्गवाडी हे गाव काही केल्या गुगल मॅप वर सापडत नव्हते. पण हे गाव नरडवे ते घोटगे या दोन मोठ्या गावांच्या दरम्यान कुठे तरी नक्की असणार असा अंदाज आलेला असल्याने मध्यरात्री नरडवे गाव ओलांडून तसेच पुढे जाऊ लागलो. पण नरडवे गाव ओलांडताच आत्तापर्यंत डांबरी असणारा रस्ता एकदम कच्च्या मातीच्या रस्त्यात रुपांतरीत झाला. आता मात्र आपण बरोबर रस्त्याने चाललो आहोत की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. त्यात एवढ्या मध्यरात्री रस्ता सांगायला कोणीही भेटणार नसल्याने यू-टर्न घेतला आणि पुन्हा मागे फिरून नरडवे गावाच्या थोडे अलीकडे असणाऱ्या एका मंदिरात सकाळ होईपर्यंत विश्रांती घेण्याचे ठरवले. 


नरडवे गावाजवळ असणारे "श्री विठ्ठलादेवी मंदिर". येथे शनिवारी पहाटे मुक्काम केला


सकाळी सहाच्या सुमारास आकाशात झुंजूमुंजू व्हायला लागलं तसं जाग आली ती रस्त्यावर जोरजोरात बोलत चाललेल्या काही माणसांमुळे. जवळच्याच नरडवे गावातली काही उत्साही मंडळी फिरायला म्हणून बाहेर पडलेली होती. त्यांनाच मग सोनगड किल्ल्याविषयी माहिती विचारली तसे त्यांनी उभारल्या जागेवरूनच लांब कुठेतरी एका डोंगरधारेकडे बोट दाखवत ‘सोनगड’ किल्ला त्या तिकडे पलीकडे आहे असं सांगितलं. आता माझ्यासाठी त्या लोकांना ‘सोनगड’ किल्ला माहित असणे हिच एक मोठी आणि आनंदाची गोष्ट होती. कारण आजकाल बऱ्याच दुर्लक्षित आणि आडवाटेवरच्या किल्ल्याबाबत त्या किल्ल्याच्या आसपास राहणाऱ्या गावकऱ्यांनाच माहिती नसते. पण इथं मात्र परिस्थिती आशाजनक होती. या लोकांना त्यांच्या गावजवळच्या 
भैरवगड’ या किल्ल्यारोबरच सोनगड किल्ल्याची देखील व्यवस्थित माहिती होती. त्यांच्याकडून कळले की सोनगड किल्ल्याच्या पायथ्याशी दुर्गानगर’ नावाचे गाव असून त्याच्या ‘पवारवाडी’ या छोट्या वस्तीतून किल्ल्यावर जाणारी एक वाट आहे. पण नरडवे गावानंतर ‘गड’ नदीवर नव्यानेच धरण बांधण्याचे काम सुरु असल्याने नरडवे गावानंतर पवारवाडी पर्यंत ७ किमीचा कच्चा मातीचा रस्ता पार करावा लागेल. या कच्च्या रस्त्याला पर्याय म्हणजे फोंडा घाट उतरल्यानंतर थेट कणकवली गाठायची आणि कनेडी – कणकवली – वागदे – कसाल – घोटगे – सोनवडेमार्गे गडपायथ्याची पवारवाडी गाठायची. या पर्यायी मार्गाने गडपायथ्याच्या अगदी पवारवाडी पर्यंत डांबरी रस्ता असून हा पक्का डांबरी रस्ता जिथे संपतो तिथूनच सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट सुरु होते. पण आम्ही फोंडा घाट उतरून बऱ्यापैकी पुढे नरडवे गावापर्यंत पोहोचलेलो असल्यामुळे परत उलटे जाऊन जवळपास ३० किमीचा अधिकचा फेरा वाढवण्यापेक्षा कच्च्या रस्त्यानेच गडपायथा गाठण्याचा निर्णय घेतला. 


सकाळची आन्हिके पार पाडून मुक्कामाची जागा सोडेपर्यंत सात वाजत आले होते. त्यात भर उन्हाळा आणि एप्रिलचा महिना त्यामुळे, सूर्यराव सकाळी जरा लवकरच ड्युटीवर हजर झालेले. खरंतर ज्यावेळेपर्यंत आम्ही अर्धाअधिक किल्ला चढून जाणे अपेक्षित होते त्यावेळी आत्ता कुठे आम्ही मुक्कामाची जागा सोडत होतो. त्यामुळे आता किल्ला चढताना उन्हाचा चांगलाच त्रास होणार यात तिळमात्र शंका नव्हती. त्यात नरडवे गावानंतरचा कच्चा रस्ता पार करताना गाडीचा वेग देखील मंदावला. हळू हळू गाडी चालवत पवारवाडी गाठेपर्यंत सकाळचे पावणेआठ झाले. गावातून किल्ल्यावर वाट दाखवण्यासाठी कोणी येईल का याची शोधाशोध करण्यात पुन्हा १५ मिनिटे खर्ची पडली. गावात भेटलेला प्रत्येकजण आमच्याकडे बघून “तुम्ही किल्ला चढणार का?”, “पाणी मुबलक घेतलं आहे का?” असे प्रश्न विचारू लागला. बहुदा त्यांना देखील आम्ही एवढ्या भर उन्हाळयात हा डोंगरी किल्ला चढून जाऊ की नाही अशी काळजी वजा शंका वाटत असावी. खूपच विनवणी केल्यानंतर एक वयस्कर मामा किल्ल्यावर यायला तयार झाले. गाडी रस्त्याकडेला व्यवस्थित उभी करून प्रत्येकी किमान ३ लिटर पाणी बरोबर घेतले आहे याची खात्री केली आणि सकाळी सव्वाआठ वाजता ‘सोनगडा’च्या डोंगर चढाईला भिडलो. 

 

सोनगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात येणारा गिरिदुर्ग. याची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारण ११५० फुट इतकी आहे. गडपायथ्याच्या पवारवाडीतून 'सोनगड' किल्ल्याचा दक्षिणोत्तर पसरलेला आयताकृती डोंगर नजरेस पडतो. कुडाळ किंवा घोटगे-सोनवडेमार्गे एक डांबरी रस्ता पवारवाडीत येऊन थांबतो. ज्या ठिकाणी डांबरी रस्ता संपतो आणि कच्च्या रस्त्याला सुरवात होते तिथेच उजव्या हाताला एक ठळक पायवाट डोंगरवर चढताना दिसते. हीच वाट आपल्याला सोनगड किल्ल्यावर घेऊन जाते. किल्ल्याची एक डोंगरधार बराच वळसा घालून खाली पवारवाडीपर्यंत उतरलेली आहे. ही डोंगरधार चढून दोन डोंगरामधे असणाऱ्या सपाटीवर पोहोचणे हे आपले पहिले लक्ष असते. इथंपर्यंत जाणारी साधारण अर्ध्या तासाची पायवाट करवंद आणि जांभळाच्या दाट झाडीतून वर चढत राहते. 


करवंदाच्या दाट झाडीतून सोनगड किल्ल्यावर जाणारी पायवाट


साधारण अर्ध्या तासाची खडी आणि दमवणारी वाट चढून आपण दोन डोंगरांमध्ये असणाऱ्या थोड्या सपाटीवर येऊन पोहोचतो. सपाटीवर पोहोचल्यावर किल्ला समोर दिसायला लागतो पण किल्ल्याचा माथा गाठण्यासाठी मात्र वाटेतले आणखी दोन-तीन डोंगरटप्पे पार करावे लागतात. आता इथून पायवाट सरळसोट एका धारेवरून किल्ल्याच्या दिशेने चढू लागते. खडी चढण आणि विरळ होत जाणारी झाडी यामधून मार्गक्रमण करत पुढच्या पाऊण तासात आपण किल्ल्यासमोर असणाऱ्या शेवटच्या डोंगरावर येऊन पोहोचतो. आता आपण उभे असलेला डोंगर थोडासा उतरायचा आणि समोर दिसणाऱ्या किल्ल्याच्या मुख्य डोंगराचा थोडका चढ चढून डावीकडे किल्ल्यावर जाणारी पायवाट धरायची. या पायवाटेने मार्गक्रमण करत असताना उजवीकडे पाहिले असता किल्ल्याचे अनेक मोठाले दगड खाली कोसळून एक नैसर्गिक खिडकी तयार झालेली दिसते. स्थानिक लोक या नेढ्याला “भीमाची आकडी” अश्या चमत्कारिक नावाने ओळखतात. या नेढ्याच्या आजूबाजूला दाट काटेरी झुडपांचे साम्राज्य असल्याने लांबूनच हे नेढे आपल्या कॅमेऱ्यात कैद करायचे आणि पुढच्या दहा मिनिटात किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख उध्वस्त दरवाज्यात दाखल व्हायचे.


अर्ध्या तासाच्या चढणीनंतर आपण थोड्या सपाटीवर येतो. तिथून दिसणारा सोनगड किल्ला

किल्ल्याची वाट चढताना असे दोन-तीन डोंगरटप्पे पार करावे लागतात

सोनगड किल्ल्याचा माथा

किल्ल्यासमोर असणारा शेवटचा डोंगर चढून गेल्यावर समोर दिसणारा सोनगड

"भीमाची आकडी" नावाचे नैसर्गिक खिडकी/नेढे

"भीमाची आकडी"


किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झालेला असून दरवाज्यासमोर असणाऱ्या दहा-बारा दगडी पायऱ्या आणि उजव्या बाजूला तग धरून उभा असलेला एक पडका बुरुज इतिहासकाळात येथे एक दरवाजा असावा याची साक्ष देतो. भग्न दरवाज्यातून आत प्रवेश करताच किल्ल्याचा माथा आणखी १०० फुट उंचावलेला दिसतो. येथून उजव्या हाताने दरवाज्याच्या बाजूला असलेल्या तटबंदीवरून चालत जात पुढच्या १० मिनिटात आपण गडमाथ्यावर दाखल होतो. गडपायथ्याच्या पवारवाडीतून इथंपर्यंत पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात. 


किल्ल्याचा उध्वस्त दरवाजा आणि पायऱ्या


गडमाथ्यावर पोहोचताच समोर पिंपळ वृक्षाच्या छायेत एक झोपडीवजा घरटे दिसते. हे झोपडे म्हणजे गडपायथ्याच्या ग्रामस्थांनी उभारलेले भैरवनाथाचे मंदिर होय. या छप्पर उडून गेलेल्या झोपडीवजा मंदिरात कोणत्याही देवतेची मूर्ती नाही. मात्र झोपडीत काही भांडी मांडून ठेवलेली दिसतात. या मंदिरातील देव म्हणजेच भैरवाची मूर्ती मंदिराच्या मागे असणाऱ्या एका जोत्यावर पिंपळवृक्षाच्या छायेत ठेवलेली आहे. या जोत्याच्या जवळच अजून एक अगदी तशीच दिसणारी पण थोडी अधिक जीर्ण झालेली दुसरी भैरवाची मूर्ती देखील आहे. 


किल्ल्यावरील सोनदेव उर्फ भैरवनाथाने झोपडीवजा मंदिर

गडावरील सोनदेव उर्फ भैरवाची नवी व जुनी मूर्ती


मंदिरासमोरच ५ ते ६ फुट उंचीची दगडांवर दगड रचून तयार केलेली एक भक्कम भिंत आपले लक्ष वेधून घेते. ही आहे गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे राजवाडा किंवा किल्लेदाराचा वाडा. या वाड्याचे अवशेष पाहून तसेच मागे किल्ल्याच्या टोकाकडे चालत जाताच दोन बुरुज आपल्याला दिसतात. या दोन्ही बुरुजांवर मातीचे अनेक थर साचले असून या दोन्ही बुरुजातून किल्ल्याखाली उतरणारी एक अवघड वाट दिसते. येथे बुरूजाजवळ एक कातळात खोदलेले पण पूर्णपणे कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. हे अवशेष पाहून पुन्हा गडप्रवेश केलेल्या दरवाज्यात परत येत असताना गडाच्या एका टोकाला हिरव्यागार झाडांनी भरलेला एक भला मोठा खड्डा दिसतो. हा खड्डा म्हणजे गडावरील एक कोरडा पडलेला तलाव होय. हे सर्व अवशेष पाहून आपली साधारण तासाभराची गडफेरी पूर्ण होते. 


गडावरील राजवाडा किंवा वाड्याचे अवशेष

दोन शेजारी शेजारी असणारे उध्वस्त बुरुज. दोन्ही मातीच्या ढिगाऱ्याखाली बुजले आहेत

कातळात खोदलेले पण सध्या कोरडे पडलेले पाण्याचे टाके


सोनगड किल्ला व्यवस्थित पाहून पवारवाडीत परतण्यासाठी साधारण ४ ते ५ तासांचा कालावधी लागतो. गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने गडप्रेमींनी गड पायथ्याच्या पवारवाडीतूनच पाण्याच्या बाटल्या भरून न्याव्यात. आता जरा गडाच्या इतिहासात डोकावून पाहू. ऐतिहासिक कागदपत्रात सोनगड किल्ल्याचा उल्लेख नरसिंहगड किंवा नृसिंहगड असा देखील आला आहे. इतिहासकाळात मालवण बंदरात येणारा माल घोटगे घाटातून घाटमाथ्यावरील आजरा किंवा पाटगाव मार्गे कोल्हापुरास जात असे. या घोटगे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी. या घाटमार्गाच्या मुखाशी घाटमाथ्यावर रांगणा हा एक इतिहासप्रसिद्ध आणि मोठा किल्ला आहे. सोनगड उर्फ नरसिंहगडाचे रांगणा किल्ल्याशी असणारे निकटत्व पाहता सोनगड हा रांगणा किल्ल्याच्या प्रभावळीतील येणारा एक महत्वाचा किल्ला असू शकेल. हा किल्ला बांधण्याचे श्रेय खेम सावंत यांना जाते. त्यांनी इ.स. १७०९ ते १७३८ दरम्यान सोनगडाची दुरुस्ती केली. इ.स. १७८८ मधे करवीर सत्तेने घोटगे घाटाने उतरून किल्ल्यास मोर्चे लावले आणि गड ताब्यात घेतला. पण इ.स. १७९३ मधे झालेल्या समेटानंतर गड पुन्हा सावंतांकडे आला. त्यावेळी गडावर धोंडो लक्ष्मण लेले यांना किल्लेदार नेमण्यात आले. पुढे १८०५ मधे सावंतांच्या गृहकलहात हस्तक्षेप करून रांगण्याचे राणोजी निंबाळकर यांनी गड ताब्यात घेतला. पण १८१८ मधे जेव्हा इंग्रजांनी महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या किल्ल्यांचा ताबा घेतला तेव्हा हा किल्ला मात्र करवीरकरांकडे ठेवला जो शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिला. (ऐतिहासिक संदर्भ: डोंगरयात्रेत दिसलेल्या दुर्गवास्तू)


किल्ल्याला लाभलेली नैसर्गिक कातळकोरीव तटबंदी

समोर घाटमाथ्यावर कुठे तरी रांगणा किल्ला असावा का?

किल्ल्याच्या पायथ्याला वाहणाऱ्या गड नदीचे कोरडे पात्र आणि आजूबाजूचा डोंगररांगांनी वेढलेला परिसर


आम्ही सोनगड किल्ला पाहून गावात उतरलो तेव्हा दुपारचे १ वाजले होते. भर दुपारचं ते जीवघेणं ऊन आता सगळ्यांनाच नकोस झालेलं होतं. त्यात तहान लागल्यामुळे घश्याला कोरड पडलेली. पाठीवरच्या सॅकमधे अजूनही एक बाटली पाणी शिल्लक होते पण ते इतकं गरम झालेलं की ते पिण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. कधी एकदा वाटाड्या म्हणून सोबत आलेल्या मामांच्या कौलारू घरात सावली खाली बसतोय आणि थंड पाणी पिऊन तापलेलं शरीर थंड करतोय असं वाटत होतं. गड उतरून डांबरी रस्त्याला लागलो तसे सगळ्यांनी मामांच्या घराकडे धूम ठोकली. मलाही अगदी तेच करायचं होतं. पण खाली येऊन पाहतोय तर काय गाडी भर उन्हात तापत होती. ती पटकन सावलीत लावण खूप गरजेच होतं. कारण एकदा का मी सावलीत जाऊन बसलो तर लगेच बाहेर येणं मुश्कील आणि सावलीत थंड झालेल्या शरीराला पुन्हा गरम झालेल्या गाडीत कोंबण तर त्याहूनही मुश्कील. त्यामुळे नाईलाजाने का होईना मी गाडीजवळ गेलो. गाडीपासून फक्त १०० मीटर अंतरावर आंब्याचं एक मस्त डेरेदार झाड होतं. ट्रेकर टीम मधल्या बाकी कोणालाही ड्रायविंग येत नसल्यामुळे त्या तापलेल्या गाडीत बसून ती सावलीत नेण्याचा भीम पराक्रम मलाच पार पाडावा लागणार होता. आधीच भर उन्हात गड उतरल्यामुळे पूर्ण शरीरातून गरम वाफा निघत होत्या आणि त्यात आता या तापलेल्या गाडीत बसायचं होतं. गाडीचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसलो तसा "कौन बनेगा करोडपती"च्या हॉट सीटवर बसल्याचा फील आला. स्टेरिंग, गियर, सिटकव्हर असं ज्याला हात लावेल ते सगळं भयंकर तापलेलं. 
गाडीच्या काचा खाली करून कशी तरी गाडी चालू केली आणि समोर दिसणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली आणली. त्यानंतर मात्र अक्षरशः गाडीतून बाहेर उडी टाकली. या दोन तीन मिनिटात खालून-वरून, मागून-पुढून सगळीकडून चटके बसले होते. हुश्श! गड चढण्या-उतरण्यापेक्षाही हे एक भयंकर अवघड काम पार पाडल्यासारख वाटून गेलं. 

वाटाडया मामांच्या घरात गेलो तसं जमिनीवर अक्षरशः अंग झोकून दिलं आणि थोड्यावेळ शांत पडून राहिलो. थोड्याच वेळात मामांकडून सगळ्यांना जेवणाचा आग्रह झाला. बहुदा आम्ही किल्ल्यावर जातानाच त्यांनी माणसं मोजली होती आणि आम्ही किल्ला पाहून परत येईपर्यंत जेवण तयार करून ठेवलं होत. खूप आग्रह झाल्यावर मग मामांच्या त्या सुंदर कौलारू घरात पंख्याची थंड हवा घेत जेवण उरकलं. आता सगळ्यांच तापलेलं शरीर देखील नॉर्मल व्हायला लागलं होतं. साधारण दुपारी २.०० पर्यंत जेवणाचा कार्यक्रम उरकला तसा हळूच पुढच्या किल्ल्याचा विषय काढला. पण कुणालाच त्या भर उन्हात पुन्हा बाहेर पडून दुसरा किल्ला करण्याची इच्छा दिसत नव्हती. तसेही दुपारी २.३० वाजता पवारवाडीतून निघून पुन्हा आलेल्याच कच्च्या रस्त्याने नरडवे गाव गाठायचे आणि मग तिथून भैरवगडाच्या पायथ्याच्या भेर्देवाडीत पोहोचायला कमीत कमी ३.३० वाजणार होते. त्यामुळे अंधार पडायच्या आत भैरवगड पाहून गावात परत येणे थोडे कठीण वाटत होते. त्यामुळे पुढचे प्लानिंग नंतर बघू असे म्हणत सर्वांनी तिथेच मामांच्या घरात पंख्याची थंड हवा घेत विश्रांती घेण्याचा ठरावा पास झाला. आदल्या रात्री अपुरी झोप झाल्यामुळे पुढच्या फक्त पाचच मिनिटात सगळ्यांच्या घोरण्याचे आवाज सुरु झाले. 


साधारण तासाभराच्या गाढ झोपेनंतर जाग आली तेव्हा दुपारचे सव्वातीन वाजलेले. तोंड धुऊन सगळे फ्रेश झालो तसा न मागताच कोरा फक्कड चहा मामांनी समोर आणून ठेवला. मग चहा घेता घेताच पुढचा नवीन प्लान तयार केला. नरडवेचा भैरवगड आज करणे आता अशक्य आहे तर मग त्याऐवजी दुसऱ्या दिवशी करायचा 'वेताळगड' हा छोटा डोंगरी किल्ला आज करूया आणि रात्री जरा लवकरच भैरवगडाच्या पायथ्याच्या भेर्देवाडीत मुक्कामाला जाऊया असा नवीन प्लान तयार झाला. या नवीन प्लानमुळे कमीतकमी ५० किलोमीटरचा जास्तीचा फेरा पडणार होता खरा पण ठरवलेले पाचही किल्ले करता येणे शक्य असल्याने सगळ्यांनीच नवीन प्लानला लगेच संमती दिली. ट्रेकला कमी लोक बरोबर असण्याचा हा एक फायदा असतो. अश्यामुळे कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब होण्यासाठी फार वेळ लागत नाही. मामांना त्यांची योग्य ती बिदागी देऊन त्यांचा निरोप घेतला. कुडाळ रस्त्याला गाडी लागली तेव्हा दुपारचे पावणेचार वाजले होते. पवारवाडी ते वेताळगडाच्या पायथ्याची गावडेवाडी हे जवळपास ५० किलोमीटरचे अंतर आणि वेताळगड किल्ला पाहणे हे सर्व आता पुढच्या तीन तासात व्हायला हवे होते. पण गाडीचे सारथ्य माझ्या विश्वासू हातात असल्यामुळे ठरवलेलं सगळं वेळेत होणार याची बाकीच्या ट्रेकर भिडूंना शाश्वती होती आणि झालं देखील तसंच. 


पण आता या अल्पपरिचित वेताळगडाची भ्रमंती एका नवीन ब्लॉगद्वारे करू. तोपर्यंत येथेच लेखणी थांबवतो. धन्यवाद!


ट्रेक दिनांक: शनिवार, १४ एप्रिल २०१८  

ट्रेकर मंडळ: विनीत दाते, प्रसाद परदेशी, नेहा परदेशी, अ‍ॅड. विंदा महाजन आणि सुनिता राजे-निंबाळकर 

किल्ल्याचे नाव: सोनगड   किल्ल्याची उंची:  ३५० मीटर

जिल्हा : सिंधुदुर्ग, तालुका : कुडाळ

किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग, चढाई श्रेणी: सोपी

पाण्याची सोय: किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. पावसाळ्यात किल्ल्यावरील तलावात पाणी साठते जे जानेवारी अखेरपर्यंत राहते मात्र पिण्यायोग्य नाही 

राहाण्याची सोय: किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. गडपायथ्याच्या वाडीतील मंदिरात मुक्काम करता येईल. 

किल्ल्यावर जाण्यासाठी लागणारा वेळ: पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास साधारण २ तास.

जाण्यासाठी उत्तम कालावधी: मार्च ते मे हा उन्हाळ्याचा कालावधी सोडून वर्षभर कधीही. पावसाळ्यानंतर गेल्यास उत्तम

भटकंतीचा कालावधी: मुंबई/पुणे येथून दोन दिवस

प्रवासाचा मार्ग: पुणे-कोल्हापूर-राधानगरी-फोंडाघाट-कणकवली-हलावल-पिंपळवाडी-जांभवडे-सोनवडे-घोटगे-दुर्गानगर-पवारवाडी

सोनगड किल्ल्याच्या पायथ्याच्या 'पवारवाडी'चे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/edLcDgfyasA2


@ VINIT DATE – विनीत दाते  


“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.



Comments

  1. Very good write-up. Your blogs are very informative. As said earlier now I am inclined to visit the forts that I have not done so far from this list.

    Best of luck.
    Sanjay Khade.

    ReplyDelete
  2. खुप सुंदर वर्णन आणि खूप सोपे लिखाण यामुळे गड फिरून आल्याचा अनुभव झाला.. एवढ्या प्रखर उन्हात गड पालथे घालण्यासाठी आपल्या जनुकीय वर्णनातच गिर्यारोहण लिहिले असणार..मानलं तुम्हाला आणि तुमच्या गिरिप्रेमाला..👌

    ReplyDelete
  3. मस्त माहिती दिली आहेस आणि खरंच गड फिरून आल्यासारखे वाटते

    ReplyDelete
  4. मस्त माहिती आणि निरीक्षण...
    मानलं दाद्या तुला...👍

    ReplyDelete
  5. मस्त माहिती

    ReplyDelete
  6. thanks you for sharing this article. its Amazing Article for us. your article writing skill is very good. carry on for sharing your thoughts.
    Thanks You for sharing Best Article your writing skill is so Cool. thanks you for sharing this post

    ReplyDelete
  7. वा!!!! फार छान वर्णन केले आहे. सर्व प्रसंग छानपैकी नमूद केले आहेत. तुमची निरीक्षण शक्ती उत्तम आहे.. Great!!!

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana