महाडप्रांतीचे लिंबूटिंबू

'कियौ रायगढ़ वास' असे कवी भूषण आपल्या एका काव्यात लिहतो. शिव छत्रपतींची व रायगडाची थोरवी गाताना कवी भूषण म्हणतो,

 

दच्छिन के सब दृःग्ग जिती, दुग्ग सहाय विलास।

सिव सेवक, सिव गढपति, कियौ रायगढ़ वास॥

तहाँ नृप राजधानी करी, जीति सकल तुरकान।

शिव सरजा रचि दान में, किनौ सुजस जहान॥

देसनि देसनि ते गुनी आवत जाचन ताहि।

तिनमें आयौ एक कवि भूषन कहियतु जाहि॥

 

दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे स्वराज्याच्या तख्ताची जागा. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली. त्यासाठी महाराजांनी मंगळगड, कावळा, मानगड, कोकणदिवा, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, पन्हाळघर, दौलतगड यासारखे काही दुर्ग उभारले तर काही जुने दुरुस्त करून स्वराज्यात सामील केले. याला रायगडाची दुर्गप्रभावळ किंवा दुर्गसमूह अथवा इंग्रजीत Cluster of forts असं म्हणता येईल. ही दुर्गप्रभावळ म्हणजे शिवाजी महाराजांच्या कल्पक बुद्धीने आखलेली एक अफाट व्युहरचना. यामुळे रायगडावर होणारे थेट आक्रमण थोपवणे तसेच राजधानीच्या जागेला वेढा पडल्यास त्याचा उपराळा करणे हा मुख्य उद्देश या उपदुर्गांच्या मदतीने साध्य होत असावा.

 

महाराष्ट्रात अनेक असे किल्ले आहेत, की जे ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ या प्रकारात मोडतात. आकाराने आणि विस्ताराने अगदी नगण्य असले तरी या किल्ल्यांचे भौगोलिक किंवा ऐतिहासिक महत्व तिळमात्रही कमी होत नाही. रायगडाच्या प्रभावळीत येणारे वरील सात किल्लेही असेच आकाराने लहान पण शिवकाळात रायगडाच्या घेऱ्याची जबाबदारी सांभाळणारे. चला तर मग आज या ब्लॉगद्वारे गडभटकंती करूया सहय़ाद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या भाऊगर्दीत आपले छोटेखानी अस्तित्व राखून असलेल्या महाहट्ट उर्फ महाड परिसरातील तीन गिरिदुर्गांची. 

 

किल्ले "पन्हळदुर्ग उर्फ पन्हळघर" :

=========================

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लोणेरे गावाजवळ महामार्गापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर पन्हळघर नावाचा एक छोटा पण आटोपशीर दुर्ग उभा आहे. या किल्ल्याचे नाव काही ठिकाणी पन्हाळघर तर काही ठिकाणी पन्हळगड असे देखील वाचण्यात आलेले आहे. मुंबईकडून येताना अथवा पुण्यामार्गे ताम्हिणी घाट उतरून माणगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागताच माणगावपासून १० किलोमीटर अंतरावर महामार्गालगत लोणेरे गाव लागते. हे गाव सुरु होण्याच्या फक्त ५०० मीटर आधी डावीकडे एक रस्ता पन्हळघर नावाच्या छोट्या पाड्याकडे जातो. येथे पन्हळघर नावाचे बुद्रुक आणि खुर्द असे दोन पाडे असून त्यापैकी पन्हळघर खुर्द येथून किल्ल्यावर जाणारी मळलेली पायवाट आहे. पन्हळघर खुर्द गावात किल्ल्याकडे तोंड करून उभे राहिल्यास डोंगराच्या पायथ्याशी अलीकडेच बसवलेल्या काळ्या रंगाच्या दोन सिंटेक्स टाक्या दिसतात. या टाक्यांच्या अगदी शेजारून एक मळलेली पायवाट किल्ल्यावर जाते. 

 

किल्ल्याची उंची थोडकी असली तरी किल्ल्यावर जाणारी पायवाट मात्र खड्या चढणीची आणि दम काढणारी आहे. या मळलेल्या पायवाटेने डोंगर चढाईला सुरवात करताच मोजून फक्त २० मिनिटात आपण माचीसदृश थोडक्या सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे समोरच खडकात खोदलेली तीन पाण्याची टाकी आपले लक्ष वेधून घेतात. या सर्व टाक्यात फक्त पावसाळ्यातच पाणी साठते. इतरवेळी ही टाकी एकतर गाळाने भरलेली किंवा कोरडी ठणठणीत असतात. टाक्यांसमोर काही पोस्टहोल्स पण आहेत. उघडय़ावर असलेल्या टाक्यांतील पाण्याचे सूर्यप्रकाश किंवा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होते. ते कमी करण्यासाठी टाक्यांच्या बाजूला बऱ्याचदा कातळात काही भोके खोदलेली दिसतात. त्यांना पोस्टहोल्स म्हणतात. या पोस्टहोल्सचा उपयोग बांबू रोवण्यासाठी केला जात असे. बांबू रोवून त्यावर कापडाचे आच्छादन टाकल्यामुळे पाण्याचे झाडाझुडपांचा केरकचरा आणि बाष्पीभवनापासून संरक्षण होत असे. या टाक्यांना लागुनच दगडांचा एक चर बांधलेला असून तो थोड्या अंतरावर डोंगराच्या नाळेपर्यंत नेलेला आहे. याचे प्रयोजन मात्र लक्षात येत नाही. 

   

टाकी पाहून झाली कि त्याच्या शेजारून वर चढत जाणाऱ्या पायवाटेने आणखी ५ मिनिटे चढून जाताच पायवाटेला दोन फाटे फुटतात. गडाचा माथा येथून अगदीच थोडक्या अंतरावर राहिलेला असतो. आपण मात्र सरळ जाणाऱ्या पायवाटेने गडमाथ्यावर न जाता आधी डावीकडे जाणाऱ्या पायवाटेला लागायचे. येथे समोरच डोंगराच्या कडेला एका उंच लोखंडी खांबावर भगवा ध्वज फडकताना दिसतो. या लोखंडी खांबाच्या उजवीकडे १० पावलावर डोंगरकड्यालगत आणखी एक खोदीव पाण्याचे टाके दिसते. भगवा ध्वज, डोंगरकड्यावरून दिसणारा लांबवरचा प्रदेश आणि पाण्याचे टाके हे अवशेष पाहून पुन्हा मुख्य पायवाटेवर यायचे व आता गडमाथा जवळ करायचा. गडमाथ्यावर एका बांधकामाचे जोते व तुरळक तटबंदी असे मोजकेच अवशेष आहेत. पण हे अवशेष भयंकर वाढलेल्या झाडीझुडपात शोधणे म्हणजे थोडे अवघड काम आहे. येथे आपली अर्ध्या तासाची गडफेरी पूर्ण होते. 

 

पन्हळघर किल्ला ते रायगड हे अंतर फक्त १२ किलोमीटर एवढेच आहे (हे दोन किल्ल्यामधील थेट अंतर आहे. महामार्गवरून नव्हे). तसेच पन्हळघर गावातून एक वाट गावापाठीमागच्या डोंगरधारेवरून सरळ रायगड खोर्‍यात उतरते व तिथून रायगड किल्ल्यावर जाते. त्यानुसार पन्हळघर हा रायगडाच्या प्रभावळीतील येणारा एक किल्ला असावा. गडाचे छोटेखानी आकारमान पाहता येथे मोजकी शिबंदी ठेऊन रायगडाला जाण्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजेच टेहळणीसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असेल. हा दुर्लक्षीत किल्ला दुर्गअभ्यासक श्री. सचिन जोशी यांच्या प्रयत्नामुळे प्रकाशात आला. पायथ्याचे पन्हळघर गाव शिवकालीन असले पाहीजे कारण ह्या गावावर रायगडावरच्या घरांना पावसात लागणारे झाप (गवताच्या पेंढ्या) पुरवण्याची जबाबदारी होती. बहुदा पन्हळघर किल्ल्याच्या किल्लेदारावर ह्या कामावर देखरेख करायची जबाबदारी दिलेली असेल. पन्हळघर गाव तसेच आजूबाजूला खूप मोठा गवताळ भाग आहे त्यावरून रायगडावरच्या सर्व घरांना येथून गवत पुरवठा करता येऊ शकत असावा.

 

तालुका: माणगाव     जिल्हा: रायगड   किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग    चढाई श्रेणी: सोप्पी     उंची: पायथ्यापासून ४२५ फुट  

भ्रमंतीसाठी लागणारा वेळ: पायथा ते पायथा साधारण एक ते सव्वा तास (किल्ला चढून, व्यवस्थित पाहून, खाली उतरण्यासाठी)

गडावरील पाण्याची सोय: किल्ल्यावर पाण्याची चार टाकी आहेत मात्र त्यात फक्त पावसाळ्यात पाणी साठते

राहण्याची सोय: किल्ल्यावर राहण्यासाठी निवारा नाही 

किल्ल्याचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/KqNeWbG3UrK2

ऐतिहासिक संदर्भ: श्री. सचिन जोशी यांचे "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" व श्री. आनंद पाळंदे यांचे "दुर्गवास्तू"



पायथ्याच्या पन्हळघर खुर्द वाडीतून दिसणारा पन्हळघर किल्ला
माची सदृश सपाटीवरील तीन पाण्याची टाकी
टाक्यांपुढे बांधलेला दगडाचा चर. तसेच टाक्यपाशी असलेले पोस्ट होल्स

गडावरील चौथे पाण्याचे टाके. हे टाके गडमाथ्याच्या अगदी जवळ आहे

 

दासगावचा किल्ला उर्फ "दौलतगड"

========================= 

 

सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांच्या वैभवसंपन्न परिसरात वसलेल्या महाड गावाला सातव्या शतकापासूनचा इतिहास आहे. महाड हे प्राचीनकाळापासून एक मोठी बाजारपेठ असलेले ठिकाण. इतिहासकाळी महाड, खेड, गोवळकोट, चिपळूण ही नामांकित बंदरे होती. अरब, रूमशान, ग्रीस इथपासूनचा माल चौल, दाभोळ आणि नालासोपारा अश्या मोठ्या बंदरात यायचा. या मोठ्या बंदरातून मग तो माल छोट्या गलबतामधून महाडसारख्या आतल्या बंदरात आणला जायचा. सावित्री नदीच्या मार्गाने महाड परिसरात मालाची आवक-जावक होत असे. पण कालांतराने खाड्या ओहरल्या आणि नद्यांची पात्र अरुंद होऊन महाड बंदरावरून होणारी वाहतून बंद झाली. इतिहासकाळात या सावित्री नदीच्या तीरावरून होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दासगावचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगडाची निर्मिती झाली असावी.


दासगावचा "दौलतगड" मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला अगदी खेटूनच उभा आहे. माणगावकडून महाडकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर (महाड गावापासून साधारण ७ किमी) महामार्गावरच दासगावची खिंड लागते. या खिंडीच्या उजवीकडचा (सावित्री नदीच्या बाजूचा) छोटेखानी डोंगर म्हणजेच दौलतगड किल्ला होय. खिंड ओलांडली की लगेच उजव्याबाजूला सिमेंटची एक पायवाट खिंडीला लागून असणाऱ्या डोंगरावर चढताना दिसते. या सिमेंटच्या पायवाटेने साधारण ५ मिनिटे चढून जाताच आपण रायगड जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या "आदर्श केंद्रशाळा, दासगाव" या शाळेच्या प्रांगणात येऊन पोहोचतो. दासगावची "आदर्श केंद्रशाळा" ही किल्ल्याच्या डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. शाळेचा स्वच्छ परिसर, सुंदर कौलारू इमारत, आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडी आणि शाळेच्या मागेच उभ्या असलेल्या हिरव्यागार डोंगराचे लाभलेले सानिध्य यामुळे हा सर्व परिसर कमालीचा सुंदर दिसतो आणि नकळतच आपल्याला पुन्हा एकदा शाळेत जावे असे वाटायला लागते. पण आपल्याला मात्र किल्ला पहायचा असल्याने शाळेच्या मागच्या बाजूला असणाऱ्या फाटकातून बाहेर पडायचे आणि डोंगर चढणीला लागायचे. 

 

शाळेपासून साधारण १० मिनिटे डोंगर चढून जाताच पायवाटेला तीन फाटे फुटतात. यातली डाव्याबाजूची पायवाट पाण्याच्या टाक्याकडे, सरळ वर चढत जाणारी पायवाट किल्ल्याच्या माथ्याकडे तर उजवीकडे जाणारी पायवाट डोंगराला वळसा (ट्राव्हर्स) मारून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाते. यात सगळ्यात आधी आपण डाव्याबाजूची पायवाट पकडायची आणि मोजून फक्त दोनच मिनिटात दगडात खोदलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचायचे. पावसाळ्यात हे दगडात खोदलेले पाण्याचे टाके नितळ पाण्याने तुडुंब भरून वाहत असते. या टाक्यातले थंडगार पाणी पिऊन तृप्त व्हायचे आणि उरलेल्या गडभटकंतीसाठी निघायचे. आता टाक्यापासून पुन्हा तीन वाटांच्या जंक्शनला परत येऊन गडमाथ्यावर जाणारी मधली पायवाट धरायची. पण गडावर जाणाऱ्या या पायवाटेवर प्रचंड झाडी माजलेली असल्याने पावसाळ्यात या वाटेने गडमाथा गाठणे थोडे अवघड काम आहे. त्यामुळे निराश न होता पायवाटांच्या जंक्शनवरून उजवीकडे डोंगराला वळसा (ट्राव्हर्स) मारून दक्षिण टोकाकडे जाणाऱ्या तिसऱ्या पायवाटेचा पर्याय समोर ठेवायचा. थोडक्यात काय तर गडाच्या मागच्या बाजूने देखील गडमाथा गाठता येऊ शकतो.

 

गडमाथा गाठण्यासाठी आता तिसऱ्या (उजव्या) ठळक पायवाटेने किल्ल्याच्या डोंगराला वळसा मारायला सुरवात करताच एक सुंदर निसर्गाविष्कार आपल्या डोळ्या समोर उलगडायला लागतो. सावित्री आणि काळ नद्यांच्या संगम, बारमाही वाहणाऱ्या सावित्री नदीचे विस्तीर्ण पात्र, त्यात तयार झालेली अनेक छोटी छोटी बेटे, बेटांच्या सुपीक जमिनीवर डोलणारी हिरवागार शेती, नदीकाठाने वसलेली छोटी गावे, या सगळ्यातून वाट काढत जाणारी कोकण रेल्वे आणि नदीचे पात्र ओलांडणारा रेल्वेचा देखणा पूल. अगदी एखाद्या निसर्गचित्रात शोभून दिसावं असं कमालीच सुंदर दृश्य. बहुदा किल्ल्यावरून दिसणाऱ्या या दृश्याच्या प्रेमात पडूनच ब्रिटीशकाळात जेव्हा हा किल्ला इंग्रजांकडे गेला तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांना या किल्ल्यावर बंगले बांधण्याचा मोह झाला असावा. 

 

तर पायवाटेने आपण किल्ल्याच्या पिछाडीला जाईपर्यंत वरील वर्णन केलेले सुंदर निसर्गचित्र कायम आपल्या डोळ्यासमोर दिसत राहते आणि साधारण १० मिनिटात आपण किल्ल्याच्या पिछाडीला येऊन पोहोचतो. येथेच खाली दासगावची भोईआळी नावाची एक वस्ती आपल्याला दिसते. किल्ल्यावर येणारी दुसरी पायवाट या भोईआळीतून किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आपण याच पायवाटेने किल्ल्याचा उरलेला १० मिनिटांचा चढ चढून गडमाथा जवळ करायचा. गडमाथा आटोपशीर असला तरी सध्या किल्ल्यावर वावर कमी असल्याने प्रचंड झाडी माजलेली आहे. या झाडीतच आपल्याला इंग्रज अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या विश्रामगृहाच्या बांधकामाची जोती, तटबंदीचे तुरळक अवशेष आणि दोन उध्वस्त बुरुज असे थोडकेच दुर्गाअवशेष अगदी मह्तप्रयासाने सापडतात आणि येथेच आपली साधारण ४५ मिनिटांची गडफेरी पूर्ण होते.  

 

रायगड किल्ला कितीही बळकट असला तरी फिरंगे, पोर्तुगीज, सिद्धी यांच्यामार्फत रायगडाला सागरी आक्रमणाची भीती ही होतीच. त्यामुळे शिवकाळात सावित्री नदीच्या बाणकोट खाडी किनाऱ्यावर पहारे देण्यासाठी दौलतगडाचा उत्तम उपयोग होत असावा. सागरी मार्गाने होणाऱ्या हालचालींचा प्रथम अहवाल दौलतगडाला मिळत असेल आणि तिथून पुढे तो सोनगड आणि चांभारगड या महाड परिसरातील इतर किल्ल्यावरून रायगडाला पोहोचत असण्याची शक्यता आहे. पुढे १७५६ ला इंग्रज आणि पेशवे यांच्यात झालेल्या तहानुसार दौलतगड इंग्रजांकडे गेला. त्यांनी किल्ल्यावर डागडूजी करून इथे दोन बंगले बांधले आणि किल्ल्याचे नाव दासगाव फोर्ट असे ठेवले. पुढे १७७५ च्या सुमारास मराठ्यांनी किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यातून परत घेतला. तर असा हा दासगावचा दौलतगड, अगदी तुरळक ऐतिहासिक अवशेष असले तरी किल्ल्यावरून दिसणाऱ्या अप्रतिम निसर्गदृशासाठी नक्की भेट द्यावा असा. 

 

तालुका: महाड     जिल्हा: रायगड    किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग     चढाई श्रेणी: सोप्पी    उंची: पायथ्यापासून २०० फुट  

भ्रमंतीसाठी लागणारा वेळ: पायथा ते पायथा साधारण एक ते सव्वा तास (किल्ला चढून, व्यवस्थित पाहून, खाली उतरण्यासाठी)

गडावरील पाण्याची सोय: किल्ल्यावर पाण्याचे एक टाके आहे. पण गडाच्या परिसरात पाळीव जनावरांचा मुक्त वावर असल्याने पावसाळा सोडून इतरवेळी ते पिण्यायोग्य असण्याची शक्यता कमी.

राहण्याची सोय: किल्ल्यावर राहण्यासाठी सोय नाही 

किल्ल्याचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/iG7jqjZEAUU2

ऐतिहासिक संदर्भ: श्री. सचिन जोशी यांचे "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" व श्री. आनंद पाळंदे यांचे "दुर्गवास्तू"

 

मुंबई-गोवा महामार्गावरील दासगावची खिंड
खिंडीतून दिसणारा छोटेखानी दौलतगड
किल्ल्याच्या पायथ्याची शाळा
किल्ल्यावरील पाण्याचे टाके
किल्ल्याच्या दक्षिणटोकाकडे (पिछाडीला) जाताना दिसणारे सुंदर निसर्गदृश
तटबंदीचे भग्न अवशेष
बुरुजांचे अवशेष
गडावरील जोत्यांचे अवशेष
सावित्री नदी व त्यावरील रेल्वेचा पूल

किल्ले "सोनगड" 

=============

 

महाराष्ट्रात एकाच नावाचे किंवा नावात साधर्म्य असणारे बरेच किल्ले आहेत. तसाच हा सोनगड किल्ला. सोनगड नावाचा एक किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या सोनेवाडी गावाजवळ उभा आहे तर दुसरा रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील पाले गावाजवळ. महाड शहराच्या वायव्येला, महाड गावापासून साधारण ३ किमी अंतरावर, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या एका डोंगरात गांधारपाले ही बौद्धकालीन लेणी आहेत. ही लेणी महामार्गावरून सहज नजरेस पडत असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक भटका या लेण्यांना भेट देतो. पण याच लेण्यांच्या डोंगरावर असणाऱ्या एका भव्य पठारावर सोनगड नावाचा एक इतिहासकालीन किल्ला ठाण मांडून बसला आहे हे मात्र फार कमी लोकांना माहिती असते. शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून दोन इंगज अधिकाऱ्यांना या किल्ल्यावर कैदेत ठेवले होते यावरून सोनगड किल्ला हा रायगडाच्या प्रभावळीतला एक महत्वाचा किल्ला होता हे सिद्ध होते. 

 

महाडच्या सोनगडाला भेट देण्यासाठी मार्गांचे तीन वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जाणारी एक वाट गांधारपाले लेण्यावरून, दुसरी वाट गांधारपाले लेण्यांच्या थोडे अलिकडे असणाऱ्या बौध्दवाडीतून तर तिसरी वाट या दोन्ही वाटांच्या बरोबर विरुद्ध दिशेने म्हणजे मोहोप्रे गावातून किल्ल्यावर जाते. या तीनही वाटांनी सोनगडाचा माथा गाठण्यासाठी साधारण दीड तासांचा कालावधी लागतो. मोहोप्रे गावातून किल्ल्यावर जाणारी वाट ही खड्या चढणीची तर गांधारपाले लेण्यांच्या कातळमाथ्यावरून जाणारी वाट पावसाळ्यात थोडी अवघड व घसरडी आहे. त्यामुळे यापैकी गांधारपाले लेण्यांच्या अलिकडे महामार्गालगत असणाऱ्या बौध्दवाडी समोरून किल्ल्यावर जाणारी तिसरी वाट तुलनेने सगळ्यात सोप्पी आणि मळलेली आहे. 

 

सोनगडावर जाण्यासाठी प्रथम महाडपासून ४ किमी अंतरावरील गांधारपाले लेण्यांच्या पायथ्याचे "पाले" गाव गाठावे. या गावाच्या साधारण १ किमी अलिकडे महामार्गालगत गांधारपाले लेण्यांची एक बौद्धवाडी लागते. या बौद्धवाडीच्या बरोबर समोर एक कच्चा गाडीरस्ता डोंगरावर चढताना दिसतो. या कच्च्या रस्त्याने बाईक किंवा जीप यासारखे वाहन गांधारपाले लेण्या ज्या डोंगरात कोरलेल्या आहेत त्या डोंगराच्या पठारावर असणाऱ्या धनगरपाड्यापर्यंत (गोलगडवाडी) जाऊ शकते. हा धनगरपाडा म्हणजे खऱ्या अर्थाने सोनगड किल्ल्याचा पायथा होय. महामार्गापासून कच्च्या रस्त्याचे हे अंतर वाहनाने फक्त २० मिनिटात पार करता येते. पण जर का या कच्च्या रस्त्याने जाण्यासारखे वाहन जवळ नसेल तर मात्र पायगाडीने धनगरपाड्यापर्यंतचे अंतर गाठण्यासाठी साधारण ४५ मिनिटे लागतात. किल्ल्यावर जाण्याऱ्या या वाटेवर ठराविक अंतराने किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करणाऱ्या "सह्याद्री प्रतिष्ठान" या संस्थेने दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत. 

 

कच्च्या रस्त्याने डोंगर चढत असताना कातळकड्यात कोरून काढलेल्या गांधारपाले लेण्यांची शृंखला फार सुंदर दिसते. विविध अंगाने लेण्यांचे अवलोकन करत पठारावर दाखल होताच कोणतेही निर्बंध नसलेला भर्राट वारा आपले स्वागत करतो व आत्तापर्यंत डोंगर चढून आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो. मग थंडगार वारे अंगावर झेलत कच्च्या रस्त्याने पठारावरून चालत निघायचे आणि पुढच्या १५ मिनिटात धनगरपाडा गाठायचा. सोनगड किल्ला ज्या डोंगरावर बांधलेला आहे तो डोंगर दक्षिणोत्तर अवाढव्य पसरलेला असून या डोंगराची एक धार धनगरपाडयापर्यंत खाली उतरलेली आहे. या डोंगरधारेने चढायला सुरवात करायची आणि पुढल्या २० मिनिटात थोड्या सपाटीवर पोहोचायचे. या डोंगर सपाटीवर बरीच उंच झाडी वाढलेली असल्याने किल्ल्याचा माथा येथून देखील दृष्टीक्षेपात येत नाही. त्यामुळे आणखी थोडा चढ चढत त्या झाडीभरल्या डोंगरमाथ्यावरून चालत राहायचे की पुढील १० मिनिटात आपल्याला किल्ल्याचा माथा आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज दिसायला लागतो. आता समोर दिसणारा छोटासा डोंगरमाथा म्हणजेच सोनगड किल्ला हे आपले पुढील लक्ष मानून किल्ल्यासमोर डेरेदाखल व्हायचे. गांधारपाले गावाच्या बौध्दवाडीत गाडीत लावल्यापासून या ठिकाणी पोहोचण्यास साधारण दीड तासांचा कालावधी लागतो. 

 

किल्ल्याच्या कातळटोपीजवळ पोहोचताच समोर एक अत्यंत ढासळलेल्या अवस्थेतला बुरुज आणि त्याच्या शेजारून किल्ल्यावर जाणाऱ्या काही पायऱ्या दिसतात. या पायऱ्या चढून वर जाताच वाटेच्या डाव्या हातास थोडे खाली कातळात खोदलेली दोन टाकी दिसतात. ही पाण्याची टाकी थोड्या अवघड जागी असून टाक्यापर्यंत जाणारी वाट थोडी बेचक्यात व घसाऱ्याची आहे. पाण्याची टाकी पाहून परत गडमाथ्यावर येताच प्रशस्थ व अजूनही उत्तम स्थितीत असलेली एक वास्तू नजरेस पडते. या वास्तूच्या काळ्या पाषाणात बांधलेल्या भिंती अजूनही उत्तम स्थितीत असून या वास्तूत प्रवेश करण्यासाठी एके ठिकाणी उध्वस्त दरवाजा आणि काही दगडी पायऱ्या देखील आहेत. या वास्तूच्या मध्यभागी भगवा ध्वज उभारलेला असून ही गडावरची सर्वोच्च जागा आहे. बहुदा याच वास्तूचा शिवकाळात इंग्रजांना कैदेत ठेवण्यासाठी तुरुंग म्हणून उपयोग केला गेला असावा. 

 

गडावरील उत्तम स्थितीत असलेली एकमेव वास्तू पाहून गडाच्या उत्तर टोकाकडे निघाले असता वाटेवर बांधकामाची आणखी दोन-तीन जोती नजरेस पडतात. गडमाथा आटोपशीर असल्याने साधारण २० मिनिटात आपला किल्ला पाहून होतो. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून नजर फिरवताच पश्चिमेला सावित्री नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याच्या शेजारून धावणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गालगत पसरलेले महाड शहर, उत्तरेला गांधारी नदीचे खोरे तर पूर्वेला चांभारगड किल्ला असे विहंगम दृश दिसते.

 

सोनगडाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवाजी महाराजांनी हा गड जावळी जिंकून घेतल्यानंतर महाडजवळील चांभारगडाबरोबर स्वराजात सामील केला असावा. शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा विजापूरकरांना वेढा अधिक बळकट करण्यासाठी इंग्रजांनी मदत केली. या गोष्टीचा महाराजांच्या मनात प्रचंड राग होता. पन्हाळयाच्या वेढ्यातून सुटताच सन १६६१ च्या सुमारास महाराजांनी इंग्रजांच्या राजापूर येथील वखारीवर हल्ला चढवला आणि वखारीचा प्रमुख रेव्हिंटन व इतर काही इंग्रजांना कैद केले. याच कैद्यांना सोनगडावर काही दिवस कैदेत ठेवले होते. त्यानंतर मात्र सोनगडाचा उल्लेख सन १८१७ च्या पेशवेकाळातील कागदपत्रात येतो. तर असा हा ऐतिहासिक सोनगड किल्ला त्याच्या पायथ्याच्या गांधारपाले लेण्याबरोबर वाकडी वाट करून नक्की पहावा.

तालुका: महाड     जिल्हा: रायगड    किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग     चढाई श्रेणी: सोप्पी    उंची: पायथ्यापासून ९८४ फुट  

भ्रमंतीसाठी लागणारा वेळ: पायथा ते पायथा साधारण तीन ते साडेतीन तास

गडावरील पाण्याची सोय: किल्ल्यावर पाण्याची दोन टाकी आहेत त्यातील पाणी वर्षभर रहात नाही. पिण्याचे पाणी पठारावरील धनगरवाडीत मिळेल.

राहण्याची सोय: किल्ल्यावर राहण्यासाठी सोय नाही. पठारावरील धनगरवाडीत राहता येईल.

किल्ल्याचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/kWWb8MZnTwo

धनगरपाड्याचे GPS लोकेशन: https://goo.gl/maps/6E8o7TbZPVk

ऐतिहासिक संदर्भ: श्री. सचिन जोशी यांचे "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" व श्री. भगवान चिले यांचे "दुर्गम दुर्ग"



गांधारपाले लेण्यांच्या डोंगरावरील भव्य पठार
पठारावरील धनगरपाड्याकडे जाणारा कच्चा रस्ता
पठारावरील वस्ती/धनगरपाडा

किल्ल्याचा उध्वस्त बुरुज
गडावरील पाण्याची टाकी
तटबंदीचे अवशेष
गडावरील काळ्यापाषाणातील एक वास्तू
बांधकामाचे अवशेष / जोती
ट्रेकर शिलेदार: विनीत, प्रसाद, नेहा, ओंकार आणि कौस्तुभ

@ VINIT DATE – विनीत दाते  

 

ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित करणे असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 



“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.

 




Comments

  1. रायगडाची प्रभावळ एका अव्वल ब्लॉगरकडून समजावून घेण्यासारखे सुख नाही...
    दुर्गवेध हा माझ्या आवडत्या ब्लॉग्ज पैकी एक आहे...त्यामुळे नेटवरची मुशाफिरी सत्कारणी लागते...

    विनीत, पुढच्या अशाच उपयुक्त, माहितीपूर्ण लेखनासाठी अनेक शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. mast lihilayes re :) pics tar uttamach. sarvaat best mhanje hirva rang chedat janari aapli kokan railway :)

    ReplyDelete
  3. सुंदर लिखाण विनीत

    ReplyDelete
  4. झकासच, उत्तम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  5. सुंदर फोटोग्राफी व लेख

    ReplyDelete
  6. mastach Sir......nehmi sarkhach ekdam chan varnan aani photos pan best!!!!
    Thanks for sharing it.

    ReplyDelete
  7. Very Nice Vinit. Really a nice information Thnx.

    ReplyDelete
  8. खुप सुरेख माहिती

    ReplyDelete
  9. खुप सुंदर ब्लॉग

    ReplyDelete
  10. Jabardast, superb. Utkrisht shabdankan. Pratyakshat sarwa dolyasamor unhen rahat hote. Nisargane odhleli hirwi chadar photott kai sundar distey. Lovely pics. Mazhahi ek photo taklybaddal mandal aple abhari ahe
    You are rare combination of a good human being, very good friend, excellent treker and a very good planner.

    ReplyDelete
  11. Worth reading it. Well organised and detailed content along with reference pictures.

    Keep it up.

    Its very useful to preplan a visit to any of these places. - Manoj Sinkar

    ReplyDelete
  12. Treak la jaun alyacha surekh anubhav, vachanatun awadi kade

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana