चालुक्यांची प्राचीन राजधानी “कल्याणी”
कर्नाटक, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेला लागून असणारे एक मोठे राज्य. महाराष्ट्रासारखीच किल्ल्यांची परंपरा या राज्याला देखील लाभली आहे. अगदी आपल्या राज्यासारखे भरमसाठ किल्ले कर्नाटक राज्यात नसले तरी येथे सुद्धा गिरिदुर्ग, वनदुर्ग आणि स्थलदुर्गांची रेलचेल पाहायला मिळते. याच कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बसवकल्याण नावाचा एक अल्पपरिचित दुर्ग आहे. चला तर मग आज दुर्गसफर करू या थोड्याश्या आडवाटेवरील स्थलदुर्गाची.
बसवकल्याण हे महाराष्ट्र-कर्नाटक-हैदराबाद या तीन राज्यांच्या सीमेवर असणारे तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे. चालुक्य घराण्याची प्राचीन राजधानी कल्याणी म्हणजेच आजचे बसवकल्याण शहर. चालुक्यानंतर येथे कलचुरी राजवट होती. अकराव्या शतकात बदामीच्या चालुक्यांचा वंशज पहिल्या सोमेश्र्वराने (कल्याणचा चालुक्य) आपली मान्यखेट (मालखेड) ही राजधानी सोडून ‘कल्याणपूर’ किंवा 'कल्याण' येथे राजधानी स्थापन केली. त्याकाळी ऐश्र्वर्य, सपंत्ती व सुबत्ता यांमुळे हे शहर खूप प्रसिद्धीस आले. पण बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात चालुक्यांचा सामंत बिज्जल कलचुरी (११५६-६७) याच्या हाती सर्व सत्ता जाऊन चालुक्य घराणे लयास गेले. मात्र कल्याणचे महत्त्व कायमच राहिले. बिज्जल कलचुरी या राजाकडे बसवराज हे भांडारप्रमुख होते. त्यांना ‘भक्तिभंडारी’ असे म्हणत. ते धार्मिक होते पण त्य़ांना समाजातल्या विषमतेचा अतिशय तिटकारा होता. यांनीच वीरशैव (लिंगायत) पंथाची स्थापना केली. यांचे नावावरूनच या गावाला बसवकल्याण हे नाव पडले.
बहमनी राज्याच्या काळात ‘कसबा कल्यान’ असा देखील बसवकल्याण या गावाचा उल्लेख आढळतो. कलचुरीनंतर देवगिरीचे यादव, चौदाव्या शतकात बहमनी राज्य, आदिलशाही राज्य अशी अनेक सत्तांतरे येथे झाली. १६५३ मध्ये हे शहर मोगलांनी लुटले आणि १६५६ मध्ये औरंगजेबाने येथील किल्ला जिंकला. त्यानंतर निजामशाहीकडून मोगलांकडे गेलेल्या एका सरदाराला हे शहर जहागिरी म्हणून मिळाले.
अश्या ऐतिहासिक बसवकल्याण शहराच्या उत्तरेस चिरेबंदी दगडी पायावर उभारलेला चालुक्यकालीन भव्य भुईकोट किल्ला पुरातन वैभवाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. किल्ला एका छोटयाश्या टेकाडावर बांधलेला होता पण आज मात्र किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. किल्ल्यात शिरताना प्रथम एक भव्य दगडी दरवाजा लागतो ज्याचे बांधकाम पूर्णतः मुस्लीम पद्धतीचे आहे. दरवाज्यावर सुंदर दगडी झरोके बांधलेले असून त्यावर चारी बाजूला घुमटाकार मिनार बांधलेले आहेत.
दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर समोर मोकळे पटांगण दिसते. येथे एक मशीद, छोटी इमारत आणि काही ओवऱ्या बांधलेल्या दिसतात. मोकळ्या आवारात एक सुंदर दगडी कारंजा असून व त्याच्या मध्यभागी नक्षीकाम केलेला एक दगड ठेवलेला आहे. हे सर्व बांधकाम मात्र अलिकडच्या काळातले म्हणजे हैदराबादच्या निजामाने केलेले आहे. हे सर्व अवशेष पाहून किल्ल्याच्या प्रथम प्रवेशद्वाराकडे जायचे.
तीन दगडी कमानीचे सुंदर नक्षीकाम असणाऱ्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रवेशद्वारावर असणारा खंदक ओलांडून दुसऱ्या दरवाज्यापाशी पोहोचावे लागते. किल्ल्याचे प्रथम प्रवेशद्वार ते दुसरे प्रवेशद्वार यामध्ये जो खंदक आहे त्यावर पूर्वी काढता घालता येणारा लोखंडी पूल होता. सध्या मात्र येथे कायमस्वरूपी दगडी पूल बांधलेला दिसतो.
किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार भव्य असून बाजूला असणाऱ्या दोन भक्कम बुरुजांमुळे ते अजुनच भारदस्त वाटते. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर किल्ल्याच्या परिसरात सापडलेले अनेक तोफगोळे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस कल्पकतेने मांडून ठेवलेले दिसतात. आत प्रवेश करताच दोन्ही बाजूने उंच तटबंदीने वेढलेली नागमोडी वाट आणि तटबंदीमधे असणारे भव्य-दिव्य बुरुज एकदम अंगावरच येतात.
या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस एका शेजारी एक अश्या पाच खोल्या असणारी एक इमारत आहे. यातील प्रत्येक खोलीला बाहेरील बाजूस जेलसारख्या काळ्या सळया लावलेल्या असून त्यातच प्रत्येक खोलीला एक छोटा दरवाजा काढलेला आहे. या इमारतीवर “जेल-खाना” असे लिहलेले असले तरी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या ह्या पहारेकर्यांच्या देवड्या असाव्यात असे वाटते. कारण दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इतक्या जवळ जेल असणे शक्य वाटत नाही. किंवा मग नंतरच्या काळात म्हणजे किल्ला हैद्राबादच्या निजामाकडे असताना त्याचे या किल्ल्यात बरेच बदल करून त्याचे क्षेत्र वाढवले. तेव्हा या खोल्यांचा उपयोग कैद्यांना ठेवण्यासाठी केला गेला असेल. या इमारतीला लागुनच काही पायऱ्या असून त्या चढून जाताच आपण दुसऱ्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या बुरुजावर जाऊन पोहोचतो.
हे अवशेष पाहून थोडे पुढे चालत जाताच किल्ल्याचा तिसरा दरवाजा समोर येतो. हा दरवाजा थोडेसे वळण देऊन बाजूला असलेल्या दोन भव्य बुरुजांच्यामधे मुद्दाम लपवलेला आहे. किल्ल्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रवेशद्वारामध्ये असणाऱ्या तटाबुरुजांवर आपली अभ्यासू नजर फिरवल्यास आपल्याला विविध मुर्त्या व शरभ शिल्पे असलेले कोरीव दगड बांधकामात अनेक ठिकाणी वापरलेले आढळतात. तसेच दोन्ही दरवाज्यांच्यामधे असणाऱ्या मोकळ्या जागेत एक सुंदर कोरीवकाम केलेला व अखंड पाषाणात कोरलेला हत्ती, घोडा व काही भग्न मुर्त्या इतस्तता पडलेल्या दिसतात. हे सर्व अवशेष पाहून हा किल्ला चालुक्यांच्या राजवटीत किती ऐश्वर्यसंपन्न असेल याची कल्पना येते. नंतरच्या काळात मात्र अनेक इस्लामी आक्रमणात या किल्ल्याचे गतवैभव पार लयास गेलेले पाहून मन खिन्न होते.
किल्ल्याचा तिसरा दरवाजा पार केल्यानंतर अजून दोन-तीन आणखी दरवाजे लागतात. किल्ल्याला लष्करी दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीमध्ये एकूण १६ देखणे बुरूज बांधलेले आहेत. पण त्याचबरोबर किल्ल्याच्या आतही काही अतिभव्य बुरुज बांधलेले दिसतात. किल्ल्याच्या चौथ्या दरवाजावर पुन्हा एक भव्य आकाराचा गोलाकार बुरुज बांधलेला असून त्याला एक गुप्त सज्जा ठेवलेला आहे. या सज्ज्यामधुन किल्ल्यात चालणाऱ्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवता येत असे. एवढेच काय तर वेळप्रसंगी येथून उकळते तेल अथवा निखारे खाली सोडण्याची व्यवस्था देखील केलेली पाहायला मिळते. या पुढे वळणावळणाच्या मार्गाने गडाचे आणखी दोन दरवाजे लागतात. हे सर्व सात दरवाजे वैशिष्टय़पूर्ण आहेत. हे दरवाजे ओलांडल्यावरच मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो. थोडक्यात काय तर कोणाही गैर व्यक्तीला किल्ल्यात सहज प्रवेश मिळणे केवळ अशक्यच.
किल्ल्याच्या सातव्या आणि शेवटच्या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करताच डाव्या हाताला असणारा दगडी पायऱ्यांचा जिना आपल्याला किल्ल्याच्या सगळ्यात उंचावर असणाऱ्या बुरुजाकडे घेऊन जातो. या सर्वोच्च बुरुजावरून किल्ल्यातील जवळ जवळ सर्वच वास्तू आपल्या नजरेच्या कक्षेत येतात. तसेच या सर्वोच्च बुरूजावर दडले आहे आहे एक आश्चर्य. ते म्हणजे या किल्ल्याची खासियत असणारी ‘कडकबिजली’ तोफ. हि दिमाखदार तोफ पंचधातूची असून ती मकरमुखी (तोंड मगरीच्या तोंडासारखे) आहे. यावरील कोरीवकाम केवळ अप्रतिम कारण या कोरीव कामात मीनावर्क केलेले असून सोनेरी नक्षीकामही आहे. ऊन-वारा-पाऊस सोसत आजही हि तोफ सुस्थितीत असून या तोफेची सर्व यंत्रणा आजही व्यवस्थित आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तोफ एका आसावर बसविली असून ती ३६० अंशात आजही सुलभतेने फिरविता येते.
‘कडकबिजली’ तोफ पाहून पुन्हा दगडी जिन्याने खाली उतरताच दरवाज्याजवळ भिंतीत बसवलेला एक फारसी शिलालेख आपले लक्ष वेधून घेतो. पुढे मुख्य किल्ल्यात प्रवेश करताच समोर दरबारमहल नावची एक सुंदर वास्तू आहे. पण या वास्तूचे खरे सौंदर्य दडले आहे ते तिच्या अंतरंगात. या दरबारमहल या वास्तूच्या भिंतीवर आणि छतावर अप्रतिम कोरीवकाम आणि रंगकाम केलेले आहे. या कोरीवकामातील काही रंग आजही शाबूत आहेत. हे रंग फळे, फुले, वनस्पती व खाद्यपदार्थापासून नैसर्गिक रित्या बनवले जात.
याच दरबारमहल वास्तूमधील एक दरवाजा त्याच्या मागे असणाऱ्या रंगिनमहल ह्या वास्तूत घेऊन जातो. रंगिनमहल हे एक विलास मंदिरच होते. याच्या भिंतीवरील गिलाव्यात सुरेख नक्षीकाम केलेले आहे. महालाच्या मध्यभागी नक्षीकाम केलेले सुंदर कारंजे आहेत. भिंतीवर वेलबुट्टया आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सर्व काम फक्त आणि फक्त दगडावर केलेले आहे हे पाहून आश्चर्य वाटते.
दरबारमहालातून बाहेर पडताच समोर एका मंदिराचा गाभारा आपले लक्ष वेधतो. गाभाऱ्यावर असणारे सुंदर दगडी नक्षीकाम पहाता हे मंदिर नक्कीच चालुक्यकालीन असावे असे वाटते. सध्या मात्र या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही. येथे आधी देवी होती असे सांगतात, पण मग नंतर काही दिवस येथे बसवराराजांची मूर्ती होती. या मंदिराच्या जवळच असणाऱ्या छोट्या दरवाज्याने आपण एका छोट्या प्रांगणात प्रवेश होतो. येथे एक दर्गा आहे पण बांधणीवरून हेसुध्दा पूर्वी देऊळच असावे असे वाटते.
आता या किल्ल्यातील अजून एक अप्रतिम वास्तू म्हणजे हैदरमहल. या महालाच्या विस्तीर्ण आयताकृती प्रांगणात मधोमध एक संपूर्ण लांबीचा पाण्याचा पाट आहे. या महालातील सर्व स्थापत्य मुस्लीम शैलीचे आहे. या किल्ल्यातले आणखी एक नवल म्हणजे येथील हैदरमहालाजवळ असलेला तालीमखाना. ही तालीम इमारतीच्या तळघरात असून ती केवळ खाशांकरिता होती. किल्ल्याच्या मागील बाजूस जलतरण तलावही आहे. काही ठिकाणी पाणी खेचण्याकरिता केलेली मोटेची व्यवस्था आजही दिसते. पाणी साठवण्याचीही उत्तम सोय या किल्ल्यात केलेली आहे.
या किल्ल्याच्या जवळ जवळ सर्वच बुरूजावर वॉचटॉवर असून प्रत्येक बुरुजावर छोट्या मोठ्या तोफा ठेवलेल्या आहेत. हैदरमहल या वस्तूच्या जवळच असणाऱ्या बुरुजावर ‘नऊगज’ नावाची अजून एक अजस्र तोफ ठेवलेली आहे. हि पंचधातूची तोफ दुर्गप्रेमींनी आवर्जून पहावी. या बुरुजावरून किल्ल्याच्या परकोटाची लांबवर पसरलेली तटबंदी व त्यावर बांधलेले बुरुज पाहून आपली साधारण २ तासांची दुर्गभ्रमंती संपते.
हा किल्ला कर्नाटक तसेच केंद्र सरकारच्या पुरातत्व वास्तू विभागाकडे आहे. किल्ल्याच्या वास्तूची कोणत्याही प्रकारची नासधूस होऊ नये तसेच इतर कोणतेही अतिक्रम होऊ नये यासाठी किल्ल्यात सर्वत्र युनिफॉर्म घातलेले रक्षक तैनात केलेले आहेत. त्यामुळे किल्ला अतिशय स्वच्छ आहे व कोठेही कचरा दिसत नाही. किल्ला फक्त सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० या वेळेतच पर्यटकांकरिता उघडा असतो. या किल्ल्याला सोमवार हि साप्ताहिक सुट्टी असून इतर महत्वाच्या सरकारी व राष्ट्रीय सुट्ट्यांना (उदाहरणार्थ: १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबर) हा किल्ला बंद असतो याची दुर्गभटक्यांनी नोंद घ्यावी.
किल्ल्याशेजारीच असणाऱ्या एका स्वतंत्र इमारतीत पुराणवास्तू संग्रहालय असून इथे किल्ल्याच्या परिसरात सापडलेल्या अनेक चालुक्यकालीन कोरीव मुर्त्या व दगड ठेवलेले आहेत. हे संग्रहालय देखील आवर्जून पहावे असेच.
बसवकल्याण किंवा कल्याणचा किल्ला, जिल्ह्याचे ठिकाण बिदर येथून ८० किमी, गुलबर्ग्यापासून ७८ किमी तर बसवकल्याण बस स्थानकापासून १.५ किमी अंतरावर आहे. येथे येण्याकरिता सोलापूर, गुलबर्गा तसेच बिदर येथून अनेक बस उपलब्ध आहेत. गावात शिरणाऱ्या रस्त्याने सरळ पुढे गेल्यावर फक्त अर्ध्या किमीवर किल्ला आहे. दोन दिवस हाताशी असल्यास बसवकल्याण किल्ल्याबरोबर बिदर येथील बहमनी सत्तेचा राजेशाही ठेवा असणारा बिदरचा भुईकोट आणि गुलबर्गा येथील भुईकोट देखील बघता येईल.
© VINIT DATE – विनीत दाते
लेख "दुर्गांच्या देशातून" या २०१७ च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित
ReplyDeleteजबरी झालाय. सविस्तर लिखाणात नेहमीप्रमाणे षटकार! मला वाटल कि पूर्ण कर्नाटक मोहिम लिहिली जाईल... तसा काही मानस असल्यास हयगय करू नये...
विनीत भाऊ अप्रतीम लीखाण आणि खरच वाचून किल्ला पहायची ऊत्कंठा वाढली.
ReplyDeleteधन्यवाद माहिती सांगीतल्याबद्दल.
तूमचं लीखाण खरच ऊत्तम 👌🏼👌🏼👌🏼
Very nice one Vinit, wonderful photography and writing.
ReplyDelete😊😊😊😊😊
Deleteफारच सुंदर माहिती, शैली, इतिहास, वर्णन, फोटो इत्यादी........ दिवाळी अंकात वाचले, परंतु ब्लॉगची मजा काही औरच आहे. अंकात मला वाटते सर्व फोटो दिले नाहीत. एकंदरीत अप्रतिम.����⛳����
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteवाह...सुंदर
ReplyDeleteApratim likhan ahe dosta!! Aata Basavkalyan la bhet nakki!!
ReplyDelete
ReplyDeleteमी पण धन्य झालो तुझ्या सोबत या ट्रेकला येऊन...
मस्त रे विनीत भाऊ...
तुझी किल्ले भ्रमंती मोहीम म्हणजे एक पर्वणी असते..
पूर्ण लेख वाचला...👌👌👌
खूप सुंदर माहिती दिली आहे आपण ह्या गडाची.विनीत आपण केव्हा गेला होता इथे,माझं गाव आहे हे
ReplyDeleteवा सर्वांगसुंदर किल्ला आहे! धन्यवाद सफर घडवल्याबद्दल!
ReplyDeleteजिंकलस मित्रा ! खूप सुंदर माहिती संकलन !
ReplyDeleteखुपच छान माहिती मिळाली आहे
ReplyDeleteChan sunder mahiti dilya Badal mandal aple abhari ahe. 💐💐💐👍👏 photo mule direct jagevar
ReplyDeletegelacha bhas zala vinit mitra asech pravas karat raha lihit raha parat aple khuap khaup dhanewad
नेहमीप्रमाणे मस्त लिहीलाय..👍
ReplyDeleteकिल्ल्याचा इतिहास, सात दरवाजे, कडकबिजली तोफ, रंगिनमहल ..... अहाहा .. विनीत तुम्ही तर रपेट घडवलीत आमची. असं वाटलं किल्ल्यातच फिरतोय तुमच्यासोबत. नेटका सुंदर आणि माहितीपूर्ण ब्लॉग. मस्त . खूप आवडला
ReplyDeleteSolid, ekdam masta, khupach sundar. Tumhi tumachya likhanane Ani presentation skillne killyana adhik Sundar banawata
ReplyDeleteखुप सविस्तर आणि छान वर्णन! ब्लॉग वाचून पुर्ण किल्ला फिरता येईल.
ReplyDeletemastach.....sundar mahiti!!!!
ReplyDeleteछान सुंदर! !!!!
ReplyDeleteअत्यंत अभ्यासपूर्ण व सुरेख माहिती ,लिखाणातून किल्ला डोळ्यापुढे उभा केलात . अशाच प्रकारच्या लेखनासाठी शुभेच्छा 💐
ReplyDeleteक्या बात है दाद्या, नेहमीप्रमाणे मुद्देसूद, ओघवता आणि व्यवस्थित असा नेटका ब्लॉग...
ReplyDeleteलिहीत रहा मित्रा...💐💐
क्या बात है दाद्या, नेहमीप्रमाणे मुद्देसूद, ओघवता आणि व्यवस्थित असा नेटका ब्लॉग...
ReplyDeleteलिहीत रहा मित्रा...💐💐
15 min adakavun thevanare likhan, Likhanachi paddhat atishay uttam, suruvat killyacha itihas tasech pratek tapyatil veg vegali varane waaa Vinit khup chan
ReplyDeleteItihasa pasun pudhey Buruj , Darwaje, mandir ,masjid, aatil parisar, imarati, tofa pratek bhagache spashti karan tasech pudhey kai pudhey hyachi odh, Photos atishay uttam likhana sobat photo asalya karanane tu
“Kalyan” keles ase mhanayala harkat nahi
Apratim blog! As usual Vineet. Tumachi swatahachi lihinyachi ek shaili ahe, Tumachya kade shabdasampada khup. Upjat Ani afat aahe. Sarwatt mahatwache mhanaje te usfurta asate.sarwat mahatwache mhanje sarwa barkawe Ani details astat. Apan tithe na jatahi gelyacha anubhav milto. Asech liha, khup,khup liha. Parmeshwar apnas bharpur bhatkanti Ani lihinyachi sadbuddhi dewo.Ek diwas pustak lihinyacha vichar jarur Kara. Tumache sarwa anubhav ektra kelyas, Uttam pustak hoil he pudhchya anek pidhyana upyogi padel.all the best
ReplyDeleteखुप छान लिहिलंय आपण. वाचत असताना आपल्यासोबत हे गतवैभव याची देही याची डोळा पाहिल्याची अनुभूती दिलीत आपण. धन्यवाद.
ReplyDeleteआपल्या भ्रमंतीत आणि लिखाणात कधीही खंड ना पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Thanks
ReplyDeleteThanks and I have a super supply: Who Does Renovations home renovation burnaby
ReplyDelete