पावसाळ्यातील स्वर्ग "कैलासगड"
पुणे शहराच्या पश्चिमेकडे भोर, मुळशी, वेल्हा व मावळ असे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधे वसलेले काही तालुके आहेत. छत्रपती शिवरायांच्या कालखंडाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले तालुके म्हणून जशी या तालुक्यांची ओळख आहे, तसेच निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेले तालुके म्हणूनही या तालुक्यांकडे पाहिले जाते. यातील पुणे शहराला सर्वांत जवळचा असणारा तालुका म्हणजे मुळशी.
खिंडीत पोहोचल्यानंतर दिसणारा कैलासगडाचा डोंगर |
एका बाजूला उंचच उंच डोंगरकडे, तर दुसऱ्या बाजूला काळजाचा ठाव घेणाऱ्या खोल दऱ्या, पावसाळ्यात कोकणाच्या बरोबरीने पडणारा धो-धो पाऊस, कडय़ाकपारीतून वाहणारे धबधबे, या सर्वांमुळे पुणेकरांचे आवडते विकेंड डेस्टीनेशन असणारा ताम्हीणी घाट याच मुळशी तालुक्यातून कोकणात उतरतो. ट्रेकर्सना साद घालणारी देवकुंड, प्लस व्हॅली, घनगड, तैलबैला, अंधारबन अशी आवडती ट्रेकिंगची ठिकाणे देखील याच मुळशी तालुक्यातली. पण हि गर्दीची ठिकाणे टाळून जर का ट्रेकिंगची आणि पावसाळ्यातील निसर्गाची खरी मजा लुटायची असेल तर मुळशी तालुक्यातील कैलासगडाला भेट देणे क्रमप्राप्त आहे.
पावसाळ्यात कैलासगडावरून पाहायला मिळणारा अप्रतिम नजारा |
लोणावळ्याच्या डोंगररांगेत उगम पावणार्या मुळा नदीवर टाटांनी मुळशी हे धरण बांधलेले आहे. पुण्यातून ताम्हिणी घाटाने कोकणात उतरताना मुळशी गाव सोडले की विशाल जलपात्राने भरलेला मुळशी जलाशय दिसायला लागतो. या जलाशयात त्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग करणारा एक भला मोठा डोंगर घुसला आहे. या डोंगराच्याच एका सोंडेवर कैलासगड किल्ला आहे. थोडक्यात सांगायचं तर कैलासगड मुळशी धरणाच्या
पसाऱ्याच्या अगदी मधोमध उभा आहे.
कैलासगडाच्या पायथ्याला असणाऱ्या वडूस्ते गावात पोहोचण्यासाठी रस्त्यांचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मुंबईकरांना कैलासगड लोणावळ्यावरून जवळ पडतो तर पुणेकरांना ताम्हिणी घाटातून. लोणावळ्याकडून जायचे झाल्यास भुशी डॅम, INS शिवाजी मार्गे सहारा आंबे व्हॅलीकडे जाणार्या रस्त्याने सर्वात आधी कोरीगडाच्या पायथ्याचे पेठशहापूर व नंतर साल्थर खिंडीमार्गे भांबुर्डे गाव गाठायचे. भांबुर्डे गावानंतर लागणारा नदी पुल ओलांडून डावीकडे वांद्रे गावामार्गे वडूस्ते या कैलासगडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावात पोहोचता येते. तर पुण्यातून जायचे झाल्यास पौड, मुळशी, ताम्हिणी अशी गावे ओलांडत ताम्हिणी घाटाच्या थोडेसे अलिकडे एक रस्ता सह्यधारेच्या कडेकडेने लोणावळ्याकडे जातो. या रस्त्यावर पिंप्री गावानंतर रस्त्याला एक फाटा लागतो. या फाट्यावर डावीकडे जाणारा रस्ता भांबुर्डेमार्गे लोणावळ्याकडे जातो तर सरळ जाणारा रस्ता वांद्रे गावामार्गे वडूस्ते या कैलासगडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचतो.
कैलासगड चढणी मधला दुसरा टप्पा |
वडूस्ते गावापासून फक्त दोन किलोमीटर पुढे रस्त्यामधे एक छोटी खिंड लागते. या खिंडीतूनच कैलासगडाला जाणारी पायवाट आहे. वडूस्ते गावातून खिंडीकडे जाताना उजव्याबाजूला मुळशीचे जलाशय तर डाव्याबाजूला एक अजस्त्र पसरलेली आडवी भिंत दिसत राहते. हाच तो कैलासगड. खिंडीत पोहोचल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक ट्रान्सफार्मर दिसतो तर उजव्या बाजूला कैलासगडाची एक डोंगरधार खाली उतरलेली आहे. येथेच "गड किल्ले सेवा समिती चिंचवड" व "स्वराज्य प्रतिष्ठान मुळशी" यांनी कैलासगड उर्फ घोडमांजरीचा डोंगर अशी माहिती लिहलेला बोर्ड लावलेला आहे. या बोर्डाच्या बरोबर समोर म्हणजे विद्युत ट्रान्सफार्मरच्या विरुद्ध दिशेला एक पायवाट डोंगरावर चढताना दिसते. ही पायवाट थेट कैलासगडाच्या माथ्यावर घेऊन जाते.
वडूस्ते गावानंतर लागणारी ही खिंड. खिंडीत असणारा ट्रान्सफॉर्मर व बोर्ड. उजवीकडील डोंगरावर जाणारी पायवाट किल्ल्यावर जाते. |
पायवाटेने गड चढायला सुरवात करताच साधारण १५ मिनिटांचा खडा चढ चढून आपण थोड्या सपाटीवर येतो. हा झाला गडाचा पहिला टप्पा. येथे उभारले की गडाच्या तिन्ही बाजूंना पसरलेला मुळशी जलाशयाचा पसारा आणि हिरवाईने नटलेल्या टेकड्या दिसायला लागतात आणि इथवर आल्याचे समाधान वाटते. आता येथून पुढे पायवाट समोर असणाऱ्या उंच टेकडीवर वर चढताना दिसते आणि वाटते अरे आला की कैलासगड जवळ. पण या पहिल्या टप्यावरून समोर दिसणारा डोंगर म्हणजे कैलासगड नाही बर. तर कैलासगड लपला आहे या उंच टेकडीच्या मागे. हि पुढे आलेली टेकडी किल्ल्याच्या मुख्य डोंगराला भिडलेली असल्यामुळे प्रथमदर्शनी आपल्याला हि टेकडी म्हणजेच कैलासगड वाटतो.
किल्ल्याचा पहिला चढ चढून गेल्यावर दिसणारा डोंगर. हा डोंगर चढल्यानंतर कैलासगडाचा मुख्य डोंगर दिसतो. |
आता समोरच्या टेकडीवर चढणारी पायवाट धरायची आणि डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत पुढच्या २० मिनिटात या टेकडीच्या माथ्यावर पोहोचायचे. आता मात्र येथून कैलासगडाचा मुख्य डोंगर आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. येथे आपण चढून आलेली टेकडी आणि समोर कैलासगडाच्या डोंगराची सरळसोट खाली उतरलेली एक डोंगरधार यामुळे एक छोटी खिंड तयार झाली आहे. ह्या खिंडीत पोहोचणे हा झाला कैलासगड चढाईचा दुसरा टप्पा.
कैलासगडाचा खडा चढ आणि वाटेच्या दुतर्फा वाढलेले गवत |
आता ही खिंड पार केल्यावर पायवाट सरळ किल्ल्यावर न चढता पुन्हा किल्ल्याचा डोंगर उजवीकडे आणि दरी डावीकडे ठेवत वळसा घालू लागते. काही ठिकाणी सरळ रेषेत तर काही ठिकाणी खडय़ा चढणीची असणारी ही पायवाट आणखी दोन टप्पे पार केल्यावर शेवटी गडाचा डोंगर डावीकडे ठेवत वर चढू लागते आणि पायथ्यापासून साधारण तासाभरात आपण गडमाथ्यावर दाखल होतो.
कैलासगडाच्या पायथ्यापासून ते अगदी माथ्यापर्यंत एकच पाऊलवाट गेलेली आहे. सुदैवाने या वाटेला कोठेही फाटे फुटलेले नसल्याने वाट चुकण्याची शक्यता नाही. पावसाळ्यात मात्र या वाटेवर भयंकर झाडी वाढते. पुरुष पुरुष उंच वाढलेल्या या झाडीतून मार्गक्रमण करत असताना पायाखाली येणारी वाट व्यवस्थित आहे ना याची खात्री करत अक्षरशः वाकूनच चालावे लागते. अगदी ३-४ फुटावरचा माणूसही दिसणार नाही इतके भयंकर गवत कैलासगडाच्या या वाटेवर सरत्या पावसाळ्यात उगवते. तसेच डोंगराला वळसा घालत असताना वाटेत १-२ लहान धबधबेही आडवे येतात ज्यामुळे पायाखालचा दगड निसरडा झाल्याने जरा जपून चालावे लागते.
पावसाळ्यात कैलासगडाच्या वाटेचा अंदाज येण्यासाठी टाकलेले काही फोटो |
माथ्यावर पोहोचताच दक्षिणोत्तर पसरलेला कैलासगड दिसतो. आता प्रथम आपला मोर्च्या गडाच्या उत्तर टोकाकडे असणाऱ्या पठाराकडे वळवायचा. उत्तर टोकावर एक ध्वजस्तंभ आहे. तसेच जवळच एक पावसाळी साचपाण्याचा छोटासा सुकलेला तलाव देखील आहे. पण या उत्तर टोकावरून सभोवताल दिसणारे दृश्य मात्र केवळ अप्रतिम. मुळशी जलाशयाचे अथांग पसरलेले जलाशय, ताम्हिणीचा हिरवागार परिसर तर डावीकडे घनगड आणि तैलबैला हे किल्ले दृष्टीक्षेपात येतात.
पावसाळी साच पाण्याचा तलाव व ध्वजस्तंभ |
उत्तर टोकावरून दिसणारे विहंगम निसर्गदृश |
उत्तर टोकावरून दिसणारे विहंगम निसर्गदृश |
उत्तर टोकावरील हे तुरळक अवशेष पाहून आता आपला मोर्च्या गडाच्या दक्षिणटोकाकडे वळवायचा. दक्षिणेकडे चालायला सुरवात करताच समोर एक छोटे टेकाड व त्यावर जाणारी स्पष्ट पायवाट दिसते. गडाच्या दक्षिण टोकावर जाण्यासाठी हि छोटी टेकडी चढावी लागते. पण टेकडी चढायला सुरवात करण्याआधी मुख्य पायवाटेच्या थोडे अलीकडे वाटेला दोन फाटे फुटतात. यापैकी डावीकडची वाट थोडी खाली उतरताना दिसते तर समोर उजवीकडची वाट वर टेकाडावर चढते.
गुहेकडे जाण्यासाठी डावीकडील पायवाट पकडावी |
खोदीव गुहांकडे जाणारी वाट उताराची व थोडी अवघड आहे |
डावीकडील अस्पष्ट पायवाट आपल्याला गडावरील खोदीव गुहांकडे घेऊन जाते. त्यामुळे समोरचे टेकाड न चढता आधी या डावीकडील पायवाटेला लागायचे. गुहांकडे जाणारी ही वाट थोडी धोकादायक आहे. पावसाळ्यात तर ही वाट पूर्णपणे झाडीत हरवून जाते त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक ह्या अवघड वाटेने उतरून पुढच्या १० मिनिटांत खोदीव गुहांसमोर पोहोचायचे. गडाच्या भिंतीत कोरलेल्या या लेण्यासारख्या गुहा म्हणजे सध्याची गडावरची पाण्याची टाकीच म्हणता येतील. पण हि टाकी सध्या वापरात नसल्यानं यातलं पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. गडाच्या पोटातील या खोदीव गुहा टाक्यांवरून त्या नि:संशय प्राचीन असाव्यात असे वाटते.
गडावरील खोदीव गुहा टाकी |
गुहा पहायच्या आणि पुन्हा त्याच अवघड पायवाटेने परत वर येऊन आता टेकाडावर चढणाऱ्या पायवाटेला लागायचे. टेकाडावर चढून गेल्यावर तसेच पुढे किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जायचे. गडाच्या या दक्षिण टोकावर दगडांचा माळ आहे. येथे अनेक कोरीव बांधकामाचे दगड इतस्ततः पडलेले दिसतात मात्र कुठल्याही वास्तुचा अंदाज बांधता येत नाही. पुढे किल्ल्याच्या टोकाकडे जाताना रचीव दगडाची एक छोटी चौकोनी भिंत घातलेली दिसते. त्यावर एक भगवा देखील अडकवलेला आहे. या छोट्या देऊळ सदृश भिंतीच्या आत एक कोरीव शिवपिंड आहे. महादेवाचे दर्शन घ्यायचे आणि गडाच्या दक्षिण टोकावरून थोडे खाली उतरायचे. येथे दगडात खोदलेली दोन छोटी पाण्याची टाकी आढळतात. या टाक्यात फक्त पावसाळ्यातच पाणी असते. हि दगडात खोदलेली टाकी प्रथमदर्शनी छोटी वाट असली तरी खाली दगडात चांगली ३/४ फुट खोल खणलेली आहेत. सध्यामात्र त्यात बऱ्यापैकी गाळ साचलेला आहे.
गडाच्या दक्षिण टोकावर असणारा दगडांचा माळ |
दक्षिण टोकावरील रचीव दगडाची छोटी भिंत आणि त्यातील कोरीव शिवपिंड |
दक्षिण टोकावरील दगडात खोदलेली पाण्याची टाकी |
हे सर्व अवशेष पाहिले की आपली साधारण ४५ मिनिटांची गडफेरी पूर्ण होते. आता गड उतरण्यासाठी आपल्यासमोर दोन पर्याय उपलब्ध आहेत. एकतर आल्यावाटेने गड उतरून पुन्हा ट्रान्सफार्मर असणाऱ्या खिंडीत परत यायचे किंवा मग गडाच्या दक्षिण टोकावरून भादसकोंडा या दुसऱ्या गावात उतरायचे. भादसकोंडा गावात उतरणारी वाट मात्र फारशी मळलेली नसल्याने एकदा स्थानिक माहितगार बरोबर असेल तरच या वाटेने खाली उतरावे. भादसकोंडा गावाच्या पायवाटेने खाली उतरल्यावर वडुस्ते - ताम्हणी रस्त्याच्या कडेला वाघदेवाचे एक मंदीर आहे. तसेच या मंदिरापासून काही अंतरावर एक नैसर्गिक गुहा देखील आहे ज्याला "भादसकोंडा" लेणे असे म्हणले जाते.
किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बऱ्यापैकी जुना असावा असे वाटते. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख ताराराणीच्या काळात इ.स. १७०६ मध्ये शंकराजी नारायण सचिवांनी हणमंतराव फ़ाटकांना लिहिलेल्या एका पत्रात मिळतो. ताम्हिणी ते लोणावळा दरम्यानच्या घाटमाथ्यावरून अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात. सवाष्णी व वाघजाई या त्यापैकीच दोन जुन्या घाटवाटा होत. या प्राचीन घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी घाटाच्या खाली सुधागड,सरसगड,मृगगड तर घाटमाथ्यावर घनगड, तेलबैला व कोराईगड या किल्ल्यांचा उपयोग केला गेला. कैलासगड देखील यापैकीच एक टेहाळणीचा किल्ला असावा.
कैलासगडावरील पुष्पसंपदा |
नेहमीप्रमाणे 👌👌🙌
ReplyDeletemast sir!!!!!
ReplyDeleteVery nicely written Vinit, also the pics are super cool.
ReplyDeleteखूप सुंदर ब्लॉग. आम्ही पण कैलासगड केलाय. पण मला एवढं सुंदर आणि मुद्देसूद लिखाण जमेल का यात शंका आहे.
ReplyDeleteविनित..सुंदर लिखाण
ReplyDeleteउपयुक्त माहिती लवकरच गड पाहणे होईल
ReplyDeleteBharich....kailasvar jave laganar aata!!!
ReplyDeleteअप्रतिम लेख आणि उत्तम फोटो, सर!
ReplyDeleteGood One Vinit...
ReplyDeleteWill plan to visit soon...
मी ही हा गड पावसाळ्यात केला आहे. पण मला या गुहा बघायला मिळाल्या नाही. ब्लॉक सुंदर लिहिला आहे
ReplyDelete