खंडाळा घाटातील गंभीरनाथ किंवा नाथबाबाची गुहा

उभ्या महाराष्ट्रभर फिरस्ती करून उत्तमोत्तम पुस्तके लिहणारे जेष्ठ लेखक श्री. प्र. के. घाणेकर यांच्या "सहली एक दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या" या पुस्तकात म्हणल्याप्रमाणे खूप दगदग, त्रास आणि अडचणी यांना सामोरे जात जर का एका दिवसात एक थोडेसे अनगड ठिकाण पहायचे असेल तर एका ठिकाणाची शिफारस करण्याचा मोह आवरत नाही. ते ठिकाण म्हणजे खंडाळा (बोर/भोर) घाटातील गंभीरनाथ किंवा नाथबाबाची गुहा.


गंभीरनाथांची गुहा असणारा डोंगर 


पुणे-मुंबई हा रेल्वे प्रवास सर्वात सुंदर वाटतो तो म्हणजे लोणावळा ते कर्जत दरम्यान. खास करून पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर हा प्रवास नक्की करावा. लोणावळा स्टेशन मधून रेल्वे सुटली की सगळीकडे हिरवेगार डोंगर, त्यावर उतरलेले ढग आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे धबधबे असे दृश पाहून मन प्रसन्न होते. त्यात हा प्रवास खास गाडीच्या दारात किंवा खिडकीची जागा पकडून करायचा आणि आजूबाजूचे डोंगरदऱ्या, धबधबे डोळयात भरून घ्यायचे. चिंता, काळज्या आणि गाडीतल्या गर्दीने आणलेला वैताग या सगळ्या गोष्टी काही काळापुरत्या विसरायला लावणारी इथली झाडी, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या दऱ्या, उंच सुळके आणि या दृश्यावर तात्पुरता पडदा टाकणारे लहानमोठे बोगदे! आणि सोबत रूळांचे तालबद्ध आणि मोहक खडखडाटाचे सुरेख पार्श्वसंगीत.


गुहा परिसरातून दिसणारे उल्हास नदीचे खोरे


१६ एप्रिल १८५३ रोजी भारतात पहिली रेल्वे 'बोरीबंदर ते ठाणे' दरम्यान धावू लागली आणि तत्पश्चात ३ वर्षांत म्हणजे १८५६ मध्ये 'मुंबई-पुणे' हा लोहमार्ग बांधून पूर्ण झाला. त्याकाळी खंडाळा घाटातील हे काम “ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे” च्या जेम्स बर्कले या इंजिनिअरच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. याचा अर्थ तब्बल दीडशे वर्षांपूर्वी पहाडाच्या छाताडावर उभे राहून हा सुंदर रेल्वेमार्ग बांधणाऱ्या त्या अनामिक हातांना नक्कीच अभिवादन केले पाहिजे. हे डोंगर फोडत असताना काही अनवट आणि अल्पपरीचीत ठिकाण प्रकाशात आली त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे ही गंभीरनाथ गुहा. पण इथे पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटीमुळे अनवट ठिकाणांना भेट देण्याची खाज असणाऱ्या भटक्यांशिवाय बाकी हौशे-नवशे-गवशे इकडे भटकत नाहीत.


खंडाळा घाटातून जाताना रेल्वेचे मंकी-हिल आणि ठाकूरवाडी असे दोन तांत्रिक थांबे (Technical halt) लागतात. या दोन थांब्या दरम्यान अनेक छोटे मोठे बोगदे ओलांडत रेल्वे प्रवास करत असते. या प्रत्येक बोगद्याला रेल्वे प्रशासनाने एक विशिष्ठ असा नंबर दिलेला आहे. यापैकी बोगदा क्रमांक २८ व २९ या दोन बोगद्यांवर असणाऱ्या डोंगरावर गंभीरनाथ नावाचे अतिशय शांत आणि रमणीय असे गुहास्थान लपलेले आहे.


ठाकूरवाडी केबिन येथे उतरल्यानंतर रूळापलीकडे दिसणारा राजमाची किल्ल्याचा उत्तुंग डोंगर


आता हे गंभीरनाथांचे गुहास्थान ठाकूरवाडी स्टेशनला अगदीच लागून नाही. इथं पोहोचण्यासाठी तुम्हाला रेल्वे रुळाच्या बाजूबाजूने चांगली पाऊण एक तासाची म्हणजे दोन अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच या ठिकाणी पोहोचायचे असेल तर मध्य रेल्वेचे या मार्गावरील तांत्रिक थांबे कोणते, तेथे कोणत्या गाड्या थांबतात आणि त्या किती वेळासाठी थांबतात हे समजून घ्यावे लागते. एकूण काय तर रेल्वे प्रवासाची दगदग, तांत्रिक थांबे समजण्याची अडचण आणि सरते शेवटी रुळांवरून कसरत करत चालायचा त्रास हे सर्व सहन करायची तयारी असेल तरच येथे यावे.


या अनवट गुहास्थानापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात आधी मध्य रेल्वे खंडाळा ते कर्जत दरम्यान कशी धावते, रेल्वेचे या मार्गावरील नियोजन असे आहे आणि हे गुहास्थान असणारा डोंगर निश्चित कुठे आहे हे खालील एका छोट्या नकाशाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा नकाशा मला गंभीरनाथ गुहे विषयी माहिती हुडकत असताना https://nomadosauras.wordpress.com या ब्लॉगवर सापडला. हा परिसर समजून घेण्यासाठी या ब्लॉगर मित्राने रेखाटलेला हा कच्चा नकाशा खरोखर खूप उपयुक्त आहे.


Map credit : Nomadosauras


पुण्यातील लोकांना गंभीरनाथ येथे जाण्यासाठी सकाळी सहा वाजता पुणे स्टेशनवरून सुटणारी सिंहगड एक्सप्रेस पकडणे हा एक उत्तम पर्याय आहे. लोणावळा स्टेशनमधून गाडी सुटली की फारच कमी गाड्या खंडाळा स्टेशनला थांबतात. सिंहगड एक्सप्रेस त्यापैकीच एक. खंडाळा स्टेशन नंतर गाडी थांबते ती मंकी-हिल या ठिकाणी. आता मंकी-हिल हे रेल्वेस्टेशन नाही तर हा आहे रेल्वेचा एक तांत्रिक थांबा ज्याला केबिन असे म्हणतात. खंडाळा ते कर्जत दरम्यान मंकी-हिल, ठाकूरवाडी, नागनाथ, जांबरुंग आणि पळसदरी असे रेल्वेची काही केबिन्स आहेत जिथे गाड्या Technical Halts साठी थांबतात. कोणतीही गाडी घाट चढण्याआधी किंवा उतरण्याआधी ब्रेकची तपासणी करण्यासाठी तसेच इतर काही तांत्रिक बाबींसाठी उदाहरणार्थ पुढील रेल्वे ट्रॅक बिझी असणे, एखाद्या गाडीला क्रॉसिंग देणे इत्यादी कारणांसाठी या थांब्यांचा (केबिन्स) उपयोग केला जातो.


उत्तर भारताला दक्षिणेशी जोडणारा पुणे-मुंबई हा एक महत्वाचा आणि व्यस्त लोहमार्ग आहे. त्यामुळे पुण्यापासून दोन पदरी (डबल लाईन) असणारा हा लोहमार्ग लोणावळा स्टेशनच्या पुढे तीन पदरी (ट्रिपल लाईन) होतो. लोणावळा स्टेशन ते मंकी-हिलपर्यंत या तीनही रेल्वे लाईन्स एकमेकाला खेटून समांतर धावतात. मुंबईच्या दिशेने विचार केल्यास सगळ्यात डावीकडची रेल्वे लाईन हि उप-लाईन (Up Line), सगळ्यात उजवीकडची डाऊन-लाईन (Down Line) तर मधली मिडल-लाईन (Mid Line) किंवा बाय-डायरेक्शनल (Bi-Directional) लाईन आहे. उप-लाईनवर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या धावतात तर डाऊन-लाईनवर मुंबईकडून पुण्याकडे प्रवास करणाऱ्या गाड्या धावतात. यातील मिडल-लाईन किंवा बाय-डायरेक्शनल लाईनसुद्धा पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठीच वापरली जाते. पण क्वचितप्रसंगी डाऊन-लाईन वर काही तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा खंडाळा ते कर्जत रेल्वेमार्गावर अतिरिक्त ट्राफिक झाल्यास ते नियंत्रणात आणण्यासाठी या मिडल-लाईनचा वापर दोन्हीकडील रेल्वे वाहतुकीसाठी केला जातो.



मंकी-हिल केबिन नंतर या तीन लाईन एकमेकापासून वेगळ्या होतात. सगळ्यात डावीकडची उप-लाईन (Up Line) डोंगराच्या पलीकडून जाते तर मिडल-लाईन (Mid Line) आणि डाऊन-लाईन (Down Line) डोंगराच्या अलिकडून पुन्हा एकमेकाला समांतर धावतात. मंकी-हिल केबिन नंतर आपण प्रवास करत असलेली गाडी कोणत्या रेल्वे लाईनवरून पुढचा प्रवास करेल त्यावर रेल्वेचा पुढचा तांत्रिक थांबा अवलंबून असतो. रेल्वे जर उप-लाईन वरून मुंबईकडे जात असेल तर गाडीचा पुढचा तांत्रिक थांबा असतो नागनाथ केबिन. पण जर का गाडी मिडल-लाईन वरून मुंबईकडे धावत असेल तर तिचा पुढचा तांत्रिक थांबा असतो ठाकूरवाडी केबिन. नागनाथ आणि ठाकूरवाडी हे दोन्ही केबिन्स तसे एकाच ठिकाणी आहेत पण फरक फक्त एवढाच की एक केबिन आहे डोंगराच्या पलीकडे तर दुसरे केबिन आहे डोंगराच्या अलीकडे. गाडीने उप-लाईन वरून येत जर का नागनाथ केबिन येथे तांत्रिक थांबा घेतला तर नागनाथ केबिनच्या जवळ असणारे सर्विस टनेल गाठावे आणि चालत ठाकूरवाडी केबिनला यावे. हे सर्विस टनेल १९८२ साली जेव्हा नागनाथ केबिन बांधले गेले तेव्हा सामानाच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आले. या सर्विस टनेलबद्दलची सविस्तर माहिती लेखाच्या शेवटी येईलच.


पुण्याकडून मुंबईला जाणारी सिंहगड एक्सप्रेस ९९% मिडल-लाईन वरूनच मुंबईकडे धावते त्यामुळे मंकी-हिल नंतर सिंहगड एक्सप्रेस ठाकूरवाडी येथे तांत्रिक थांबा घेते. तसेच ठाकूरवाडी केबिन येथे सिंहगड एक्सप्रेसला मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसचे क्रॉसिंग असते. कोणत्याही गाडीचा तांत्रिक थांबा हा एक मिनिटापेक्षाही कमी असतो. तसेच ठाकूरवाडी किंवा नागनाथ हे रेल्वेचे केबिन्स आहेत त्यामुळे या ठिकाणी फलाट (प्लाटफॉर्म) नाहीत. गाडी असेच अधेमधे थांबते आणि बरेच वेळेस ठाकूरवाडी केबिन आले आहे हे गाडीत बसून समजत देखील नाही. त्यामुळे खंडाळा स्टेशनमधून गाडी निघाली की सतत गाडी कुठे कुठे थांबत आहे आणि कोणत्या रेल्वे लाईन वरून धावत आहे हे सतर्कतेने पाहणे गरजेचे आहे. ठाकूरवाडी केबिनला गाडीने ब्रेक मारताच सावकाश खाली उतरून जेथे जागा मिळेल तिथे गाडी सुटेपर्यंत उभे राहावे. पूर्ण गाडी आपल्या जवळून पुढे गेल्यानंतरच पुढील पायी प्रवासाला सुरवात करावी.



गाडी निघून जाताच परिसर एकदम शांत आणि निर्मनुष्य होऊन जातो. एकीकडे रेल्वे रुळला अगदीच खेटून असणारे उंचच डोंगर तर दुसरीकडे खोल दरी असे दृश पाहून आपण आज थोडी आगळीवेगळी भटकंती करणार आहोत याची जाणीव होते. दरीपल्याड बुरुजांचे शेले-पागोटे ल्यायलेला एक उंच डोंगर दिसतो. हा आहे राजमाचीच्या जुळ्या किल्ल्यांपैकी एक असणारा श्रीवर्धन हा उपदुर्ग. ऐन पावसाळ्यात आलो तर अनेक जलप्रपात या राजमाचीच्या उंच डोंगरावरून दरीत कोसळत असतात.


राजमाचीचा श्रीवर्धन दुर्ग


सभोवताली दिसणारे सुंदर दृश पहात आता पुण्याच्या दिशेने आपली पायपीट सुरु करायची. आता इथून पुढचा साधारण दोन ते अडीच किमीचा प्रवास हा एक तर रेल्वे रुळावरून किंवा त्याच्या बाजूने करावा लागतो. मुंबई-पुणे हा सर्वात व्यस्त लोहमार्ग असल्याने हा प्रवास अत्यंत जपून करावा. लोहमार्गावरून चालणे कटाक्षाने टाळावे. ठाकूरवाडी केबिन येथे उतरल्यानंतर पुण्याच्या/लोणावळ्याच्या दिशेने चालायला सुरवात करताना शक्यतो पुण्याकडे जाणारी डाऊन-लाईन व मुंबईकडे जाणारी मिडल-लाईन या दोन रेल्वेलाईनमधे असणाऱ्या मोकळ्या जागेतूनच चालावे.


बोगदा क्रमांक २७ व पुढे लगेच २८


साधारण दोन किमी अंतर चालत गेलो की इतक्यावेळ समांतर असणाऱ्या डाऊन-लाईन व मिडल-लाईन एकमेकांपासून थोड्याश्या दूर जात समोर दिसणाऱ्या डोंगरामधील दोन वेगवेगळ्या बोगद्यांमधे लुप्त होतात. याच डोंगरवर गंभीरनाथाचे गुहास्थान आहे. पण या डोंगरावर जाणारा रस्ता मात्र या बोगद्यांच्या पलीकडे आहे. डाऊन-लाईनवर असणारा समोरील बोगदा क्रमांक २९ पार केला की डावीकडे लगेच डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या लागतात. सध्या मात्र आपण डाऊन-लाईनवरील या २९ क्रमांकाच्या बोगद्यातून पलीकडे जाणे टाळायचे व त्याऐवजी मिडल-लाईनवरील बोगदा क्रमांक २७ व २८ चालत पार करायचा. असे करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे दोन्ही बोगदे २९ व्या बोगद्यापेक्षा पर्यायाने छोटे आहेत तसेच हे बोगदे पार करताना गाडी समोरून येत असल्याने सतत मागे वळून पाहण्याचा त्रास देखील कमी होतो.


बोगदा क्रमांक ३३ व ३४


बोगदा क्रमांक २७ व २८ काळजीपूर्वक पार करायचा आणि लगेच डावीकडे २९ क्रमांकाच्या बोगद्यातून आलेली रेल्वेलाईन ओंलांडून डोंगरावर जाणाऱ्या पायऱ्या गाठायच्या. आता येथून पुढे सुरु होतो तो म्हणजे खरा गंभीरनाथ गुहेकडे जाणारा ट्रेक. येथून डोंगराचा खडा चढ चढत मळलेल्या पायवाटेने साधारण २० मिनिटात आपण एका छोट्या खिंडीत येऊन पोहोचतो. डाव्याबाजूचा गंभीरनाथाच्या गुहा असणारा डोंगर तर उजव्या बाजूला उठवलेला दुसरा छोटा डोंगर यामुळे हि नैसर्गिक खिंड तयार झाली आहे. खिंडीच्या पलीकडील पायवाट नागनाथ केबिनच्या बाजूने असणाऱ्या रेल्वे लाईन जवळून डोंगरावर येते.


बोगदा क्रमांक २९ पासून दिसणारा गंभीरनाथाचा डोंगर, त्याला लागुनच असणारा गुहेचा मार्ग दाखवणारा बोर्ड व डोंगरावर जाणारा मार्ग


येथे खिंडीत एका झाडाखाली कुणीतरी अलीकडेच बनवलेली गणेशाची एक सुबक मूर्ती व त्याबरोबर छोट्या प्लास्टिकच्या अनेक गणेश मूर्त्या ठेवलेल्या दिसतात. येथून समोरच गंभीरनाथाच्या गुहेकडे जाणारा कातळकोरीव पायऱ्यांचा मार्ग सुरु होतो. एकापाठोपाठ एक अश्या साधारण चाळीस एक कातळकोरीव पायऱ्या चढून आपण कातळकड्या जवळील सपाटीवर येतो. नागमोडी असणाऱ्या या पायऱ्या पावसाळ्यात मात्र जरा जपूनच चढाव्या लागतात.


नागनाथ केबिनकडून येणारा मार्ग आणि ठाकूरवाडी केबिनकडून येणारा मार्ग यामधली खिंड

गुहेकडे जाणाऱ्या कातळकोरीव पायऱ्या


पायऱ्यांच्या शेवटी एक लोखंडी स्वागतकमान असून कातळकड्याच्या बाजूने उजवीकडे व डावीकडे अश्या दोन वाटा दिसतात. आपण मात्र पायऱ्या चढून येताच प्रथम उजवीकडे असणाऱ्या गंभीरनाथाच्या मुख्य गुहेकडे जायचे. या वाटेवर कमानीच्या समोरच एक पांढऱ्या टाईल्स लावलेला मोठा चौथरा दिसतो. हा चौथरा लोखंडी जाळी व पत्रा टाकून बंदिस्त केलेला असल्याने त्याचे निश्चित प्रयोजन लक्षात येत नाही. या चौथऱ्याला लागुनच पाण्याचे एक खोदीव टाके असून पावसाळ्यात ते नितळ पाण्याने काठोकाठ भरलेले असते. टाक्याच्या मागे एक छोटी नैसर्गिक गुहा असून तिथे एक शिवपिंड आणि नंदी ठेवलेला आहे. हे सर्व अवशेष पाहून आपण नाथबाबांच्या मुख्य गुहेसमोर येतो.


पाण्याचे टाके आणि शेजारी शिवलिंग व नांदी असणारी गुहा


गंभीरनाथांची मुख्य गुहा ही एक खूप मोठी नैसर्गिक गुहा असावी. नंतरच्या काळात या गुहेचा योग्य बांधकाम करून राहण्यासाठी व ध्यानधारणेसाठी उपयोग केला गेला असेल. सध्या गुहेला बाहेरील बाजूने लोखंडी जाळी लावून बंदिस्त केलेले आहे. जाळीचा दरवाजा उघडून आत जाताच समोर गुहेच्या भिंतीत दोन खिडकीसारखे कोनाडे कोरून काढलेले दिसतात. यातला डाव्याबाजूच्या कोनाडेवजा खिडकीतून आत डोकावले असता कातळात कोरलेले एक मोठे पाण्याचे टाके आढळते. या कोनाड्यासमोर एक यज्ञकुंड आणि बसण्यासाठी छोटा कट्टा केलेला दिसतो.


गंभीरनाथांची मुख्य गुहा
मुख्य गुहेला बाहेरील बाजूने असणारी लोखंडी बंदिस्त जाळी
गंभीरनाथांची गुहा व त्याचा खिडकीसारखा छोटा कोनाडा असणारा प्रवेश


आता आपला मोर्च्या दुसऱ्या कोनाडेवजा खिडकीकडे वळवायचा. आत डोकावले असता जवळपास २५ ते ३० माणसे बसतील, इतकी जागा आत दिसते. थोडेसे वाकून आणि जवळ जवळ आडवे होऊन रांगतच या छोट्या खिडकीवजा प्रवेशद्वारातून गुहेत प्रवेश करावा लागतो. या मुख्य गुहेत रांगत प्रवेश मिळवला की पुन्हा गुहेच्या आतल्या भागात एका कोनाडेवजा खिडकीतून आणखी आत जाता येते. या यातल्या छोट्या गुहेत एका कोनाड्यात गंभीरनाथांची मूर्ती ठेवलेली आहे. अशा शांत व गूढ ठिकाणी थोडावेळ गंभीरनाथांचं ध्यान करायचं आणि पुन्हा एकदा थोडेसे साहस करून गुहेतून बाहेर पडायचं.


गुहेत असे रांगतच प्रवेश मिळतो
मुख्य गुहेतील गंभीरनाथांची मूर्ती


गुहेच्या समोर उभारल्यानंतर लांबवर पसरलेला हिरवागार परिसर खूप सुंदर दिसतो. त्यातच एखादी रेल्वे वळणं घेत जाताना दिसली तर या नजाऱ्याला चार चांद लागतात. घटकाभर या ठिकाणी शांत बसून हा सुंदर नजरा डोळ्यात साठवायचा आणि जवळ बांधून आणलेली शिदोरी उघडायची.


गुहेसामोरून दिसणारे सुंदर निसर्ग दृश
गुहेसामोरून दिसणारे सुंदर निसर्ग दृश


आता पुन्हा पायऱ्यांपाशी परत येऊन लगेच खाली उतरायला सुरवात न करता सरळ समोर जाणाऱ्या पायवाटेने पुढे जायचे. येथे जमिनीपासून चार ते पाच फुट उंचीवर एक छोटी कोनाडेवजा गुहा दिसते. गुहेसमोर तीन-चार दगडी पावटया खोदलेल्या असून गुहेबाहेर तंतूसारखे वाद्य वाजणाऱ्या एका वादकाची अतिशय वेगळी आणि रेखीव मूर्ती कोरलेली आहे. या मूर्तीच्या शेजारील गुहेत एक गणपतीची, भैरवाची आणि मुषकाची मूर्ती आहे.


दुसऱ्या बाजूला असणारी दुसरी छोटी गुहा आणि तेथील कोरीव मूर्त्या


हे सर्व अवशेष पाहून पुन्हा आल्यावाटेने सावकाश पायऱ्या उतरत खालच्या खिंडीत पोहोचायचे. आता खिंडीतून ठाकूरवाडीच्या दिशेला जाणाऱ्या वाटेला लागण्याऐवजी विरुद्ध दिशेच्या नागनाथ केबिनकडे जाणाऱ्या पायवाटेला लागायचे. या वाटेवर थोडे अंतर चालत जाताच पुन्हा एक मोठी नैसर्गिक गुहा दिसते. या गुहेत थांबून मागे वळून पाहिले असता समोरचा गंभीरनाथांची गुहा असलेला डोंगर व त्यावरील दोन्ही गुहा नजरेच्या टप्प्यात येतात.


नागनाथ केबिनकडे उतरणाऱ्या वाटेवर असणारी एक नसर्गिक गुहा


आता याच पायवाटेने खाली उतरून रेल्वे रुळावरून कर्जतच्या दिशेने चालत जाऊन नागनाथ केबिन गाठता येते. पण हि रेल्वेची उप-लाईन असल्याने नागनाथ केबिनकडे जाताना पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या आपल्या मागून येत असल्याने चालताना सतत मागे वळून पहात रेल्वे मार्गाने चालणे थोडे अवघड पडते. त्यामुळे तूर्तास हा पर्याय रद्द करून पुन्हा खिंडीत परत यायचे.


ठाकूरवाडीकडे जाण्यासाठी पुन्हा २९ क्रमांकाच्या बोगद्याजवळ पोहोचायचे आणि आता कर्जतकडे जाण्यासाठी डाऊन-लाईनवरून २९ क्रमांकाचा बोगदा सावकाश पार करायचा. बोगदा पार केल्यानंतर डाऊन-लाईन व मिडल-लाईन पुन्हा एकत्र येतात. आता दोन्ही रेल्वे लाईनमधील मोकळ्या जागेत चालत जात ठाकूरवाडी केबिन गाठायचे. ठाकूरवाडी केबिन येथे पोहोचल्यानंतर पुण्याला अथवा मुंबईला जाण्यासाठी प्रथम कर्जत स्टेशन गाठणे अपरिहार्य आहे.


बोगदा क्रमांक २९

बोगदा क्रमांक २९


कर्जत स्टेशनला पोहोचण्यासाठी आपल्या समोर दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला म्हणजे ठाकूरवाडी केबिन येथून मिडल-लाईनवरून कर्जतला जाणाऱ्या एखाद्या रेल्वेची अथवा इंजिनाची वाट पाहणे किंवा डोंगरापलीकडल्या नागनाथ केबिनला जाऊन उप-लाईनवरील एखाद्या रेल्वेने किंवा इंजिनाने कर्जत गाठणे. आपण मात्र यातला दुसरा पर्याय मुद्दाम निवडायचा. याच महत्वाच कारण म्हणजे आपल्याला ठाकूरवाडी ते नागनाथ केबिन दरम्यान बांधलेला एक मस्त सर्विस टनेल पाहायला मिळतो. डोंगराच्या बरोबर मध्यावर भगदाड पाडून तयार केलेला हा जवळ जवळ ५०० मीटरचा सर्विस टनेल या अनवट सफरीत जरूर पहावा असाच आहे.


सर्विस टनेलची सुरवात


सर्विस टनेलकडे जाण्यासाठी ठाकूरवाडी केबिनच्या मागील बाजूने डोंगरावर चढणारी मळलेली पायवाट धरायची. साधारण १० मिनिटांचा खडा चढ चढल्यानंतर आपल्याला आजूबाजूला दाट झाडीत लपलेली सर्विस टनेलची सुरवात दिसते आणि इथून सुरु होतो एका वेगळा रोमांचक प्रवास. या टनेलमधे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असले तरी पायाखाली सिमेंटची व्यवस्थित पायवाट तयार केलेली असल्याने कोठेही धोका असा नाही. फक्त या टनेलच्या आजूबाजूला असणाऱ्या भिंतींना चुकूनही हात लावण्याचे धाडस करू नये कारण या भिंतींवरून रेल्वेचा विद्युतप्रवाह नेणाऱ्या मोठमोठ्या काळ्या वायरी गेलेल्या आहेत.


ठाकूरवाडी व नागनाथ केबिन यांना जोडणारा सर्विस टनेल


सर्विस टनेल मधला रोमांचक प्रवास संपवून नागनाथ केबिनकडील बाजूस बाहेर पडावे. मग नागनाथ केबिन गाठून स्टेशन मास्तरकडून कर्जतकडे जाणाऱ्या पुढील रेल्वे अथवा इंजिनाची चौकशी करावी. तर अश्याप्रकारे लोणावळा खंडाळा या गर्दीच्या जागा टाळून थोडी वेगळी वाट पकडायची असेल तर आज आपण पाहिलेले ठिकाण अगदी अप्रतिम आहे. मात्र इथला निसर्ग आणि शांतता आपल्या पर्यटनामुळे भंग पावणार नाही याची काळजी घ्यावी.


श्रावणातला खास सह्य्राद्री 


हा ब्लॉगवाचून ट्रेक करणाऱ्या सह्यमित्रांना महत्वाची सूचना:
 या ट्रेकमधील बराच प्रवास हा रेल्वे व लोहमार्ग याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच हा ट्रेक करावा. लोहमार्गावरून चालणे कटाक्षाने टाळावे. रेल्वेच्या तांत्रिक थांब्यावर स्वतःच्या जबाबदारीवर उतरावे. या ट्रेकदरम्यान पूर्वी घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे रेल्वेच्या तांत्रिक थांब्यावर रात्री अपरात्री उतरू नये त्यामुळे हा ट्रेक फक्त दिवसा उजेडीच करावा. गरज असल्यास तांत्रिक थांब्यावर उतरल्यानंतर जवळील असणाऱ्या केबिनमधील मोटरमन किंवा गार्डशी संपर्क साधून तुमचा त्या ठिकाणी उतरण्याचा उद्देश स्पष्ट करावा. रेल्वे वाहतुकीची सद्यस्थिती समजावून घेऊनच मोटरमन किंवा गार्डची पूर्वपरवानगी घ्यावी व मगच ट्रेकला सुरवात करावी. 

DISCLAIMER: I do not accept responsibility for, and explicitly disclaim all liability for any illegal or dangerous acts carried out by any person or persons in the pursuit of railfanning or hiking. I urge you to exercise extreme caution whenever in the vicinity of trains and railway lines in general & also follow all applicable laws, rules, and regulations, whether on railway property or not. 



@ VINIT DATE – विनीत दाते

ट्रेकिंग/भटकंती करताना:

  • कृपया कचरा टाकू नका आणि इतरांना देखील कचरा टाकू देऊ नका.
  • प्लास्टिकचा वापर टाळा. 
  • सह्याद्रीमधील उपयुक्त जलस्त्रोत जसे कि पाण्याची टाकी व छोटे तलाव यामधे पोहणे कटाक्षाने टाळा. 
  • गड-किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यात कपडे धुणे, खरकटे व कचरा टाकून पाणी दुषित करणे असे प्रकार करू नका.
  • निसर्गाच्या ताकदीला कमी लेखू नका. त्यामुळे नद्या, धबधबे आणि ओढे यामधे पोहण्याचा मोह आवरा. 
  • जंगलातून फिरताना चित्र-विचित्र आवाज काढणे व आजूबाजूला वावरणार्‍या प्राण्यांना त्रास देणे असे प्रकार टाळा.
  • मद्यपान आणि धुम्रपान या गोष्टींना ट्रेकिंगमध्ये अजिबात स्थान देऊ नका.
  • लैला-मजनू छाप जिथं जागा मिळेल तिथं नावं लिहून आणि बाण काढून स्वतःचा कपाळकरंटेपणा सिद्ध करू नका. 



“सुखद आठवणींशिवाय काही नेऊ नका!!!... पाऊलखुणांशिवाय काही ठेवू नका!!!!... Take nothing but memories, leave nothing but footprints!” ... सह्याद्री आणि पश्चिम घाट वाचवा.








Comments

  1. majja aa gaya......sundar mahiti sir!!!!

    ReplyDelete
  2. लेख आवडला.. चित्रांची आणि लेखाची सुंदर मांडणी केलीस!

    ReplyDelete
  3. विनित खुप दिवसांनी आडमार्गवारच्या एका भटकंतीचा परिपूर्ण ब्लॉग वाचायला मिळाला, तोही एकदम सोप्या आणि प्रवास वर्णनाच्या उत्कृष्ट शैलीमध्ये! रेल्वे लाइन ची माहिती खुप चांगल्या पद्धतिने आपण लिहिली. Off beat भटक्यांसाठी हा ट्रेक म्हणजे पर्वणीच. ब्लॉग बद्दल धन्यवाद आणि मनःपूर्वक शुभेच्छा.
    आभार,
    Satej

    ReplyDelete
  4. अप्रतिम, सुरेख लेखन आणि छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !!

    ReplyDelete
  5. जबरदस्त डिटेलिंग आहे. सुरेख लेख विनित!

    ReplyDelete
  6. खूप सुंदर माहिती मिळाली . याआधी या ट्रेक बद्दल कुठेच ऐकले नव्हते अथवा कुणी सांगितलेही नव्हते. खूप जबरदस्त उत्तम प्रकारे माहिती दिली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य ती खबरदारी घेऊनच हा ट्रेक करेन. खूप खूप धन्यवाद.

    ReplyDelete
  7. खुप छान लेखन आहे आम्ही हा ट्रेक 2018/19 केला आहे.आपन केलेले तंतोतंत वर्णनं अनुभवलेले आहे खुप लोकाना हा ट्रेक माहित नाही.हा ट्रेक अम्हाला नागनाथ म्हणूनच महीत होता आमचे मार्गदर्शक भुजबळ काका यांच्या माहितीतला व दर वर्षा सहा महीन्यानी नाग नाथाना दर्शनाला जाण्यासाठी ते जात त्यांचा मार्गदर्शनाखाली हा ट्रेक केला
    निसर्ग प्रेमी आनी गिरिभ्रमण करण्यासाठी ऊत्तम ठीकान पूणे व मुंबई दोन उचब्र्हू शहरांच्या मधे हे ठिकाण .

    ReplyDelete
  8. मुंबईतुन जाणे असल्यास कर्जत पासून पुढचा प्रवास कसा असेल??

    ReplyDelete

Post a Comment

My popular blogs

ब्रम्हगिरी/त्र्यंबकगड आणि थरारक वाटेचा दुर्गभांडार

"भोभी", भोरगिरी ते भीमाशंकर

पावनगड

ट्रेकर्ससाठी काही उपयुक्त पुस्तके

रांगणा_Rangana