पळशीचा भुईकोट_Palashi Land Fort
लाकडातील नक्षीकामाचा अप्रतिम ठेवा, पळशी येथील होळकरांचे दिवाण पळशीकर यांचा वाडा अहमदनगर म्हणजे सुंदर ऐतिहासिक वाडे व अनेक अप्रतिम गढ्या असणारा जिल्हा. याच नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी यादव कांबळे-पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. या छोट्याशा किल्ले वजा गढीचे खरे वैशिष्ठ म्हणजे भान हरखून जाईल असे लाकडातील नक्षीकाम केलेला पळशीकरांचा वाडा. आपल्या महाराष्ट्रात पळशी नावाची अनेक गावे आहेत. त्यामुळे गुगलच्या नकाशात मात्र हे गाव जरा प्रयत्न पूर्वकच हुडकुन काढावे लागते. पुणे–अहमदनगर रस्त्यावर शिरूर गाव ओलांडले की एक रस्ता डावीकडे अण्णा हजारे यांच्यामुळे प्रसिद्ध असणाऱ्या राळेगणसिद्धीकडे वळतो. या रस्त्यावर आधी पारनेर हे तालुक्याचे गाव गाठायचे. पारनेरनंतर हाच रस्ता पुढे २० किलोमीटर अंतरावर टाकळी येथील ढोकेश्वराच्या लेणीजवळ नगर–कल्याण महामार्गला मिळतो. आता टाकळीजवळ आलाच असाल तर ढोकेश्वराची कोरीव लेणी देखील वाकडी वाट करून आवर्जून पहावीत अशीच. टाळकी येथे नगर–कल्याण महामार्ग सोडायचा की एक छोटा डांबरी रस्ता अनेक वळणे घेत वासुंदे गावामार्गे पळशीत प...