रामदरणे किल्ला

भटकंती रायगड जिल्ह्यातील अल्पपरिचित "रामदरणे" किल्ल्याची! पावसाळ्यात गडभटकंती आणि तीही गर्दीची ठिकाण टाळून? सध्या किल्ल्यावर होणाऱ्या गर्दीचे (कुंभमेळ्याचे) फोटो पाहून हे थोडं अवघडच काम वाटायला लागलंय. पण बाहेर पडणारा संततधार पाऊस आणि निसर्गाने सगळीकडे पांघरलेली हिरवीगार चादर माझ्यासारख्या भटक्याला घरी बसू देईल तर शपथ. मग शोध सुरु झाला अल्पपरिचित आणि अनवट वाटांचा. पुण्यातून पहाटे निघून जवळपास आणि फक्त एका दिवसाची गडभटकंती करायची असं ठरवल्यावर मग पुणे, सातारा आणि रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या किल्ल्यांच्या नावाची उजळणी सुरु झाली. तसे या तिन्ही जिल्ह्यातले जवळपास सगळे परिचित आणि अल्पपरिचित किल्ले आधीच भटकून झालेले असल्याने किल्ला करायचा तर तो शक्यतो याआधी न बघितलेला करावा असे ठरवल्यामुळे मग घरात असलेली गडकिल्ल्यावरील पुस्तके धुंडाळणे सुरु झाले. शेवटी दुर्गअभ्यासक आणि लेखक श्री. सचिन जोशी यांच्या "रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव" ह्या पुस्तकात अलिबाग जवळचा "रामदरणे" नावाचा किल्ला सापडला. आता येथे किल्ला सापडला म्हणजे किल्ला "शोधला" किंवा ...