मुडागड
दाट जंगलात हरवलेला, अल्पपरिचित वनदुर्ग "मुडागड" उन्हाळा हा ट्रेकसाठी सामान्यतः निषिद्ध मानला जातो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रेक करताना बसणारा उन्हाचा तडाखा तर दुसर कारण म्हणजे सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारे आटत जाणारे पाण्याचे स्त्रोत. मग उन्हाळ्यात ट्रेक करायचेच नाहीत का? तर अगदी तसंही काही नाही. खास उन्हाळ्यात करता येतील असे काही ट्रेक आजही पश्चिम घाटाच्या समृद्ध वनसंपदेत शिल्लक आहेत ज्यांना वनदुर्ग म्हटले जाते. घनदाट निबीड अरण्यात सह्याद्रीच्या विराट माथ्यावर विराजमान झालेले किल्ले म्हणजे वनदुर्ग. वासोटा, प्रचितगड, भैरवगड (हेळवाक), जंगली जयगड हि अश्याच काही सह्याद्रीमधील सुप्रसिद्ध वनदुर्गांची नावे. काहीश्या अश्याच निबिड अरण्यात लपलेला आणि बहुतेक ट्रेकर्सना नावाने देखील माहित नसलेला एक वनदुर्ग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यात येणारा "मुडागड". करवीर नगरी कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा, पावनगड, विशाळगड, मुडागड, गगनगड, शिवगड, रांगणा, भुदरगड, सामानगड, गंधर्वगड, कलानिधीगड, महिपालगड, पारगड असे तब्बल १३ किल्ले येतात. यापैकी काही किल्ले त्...