भ्रमर भ्रमंती कोकणाची - रत्नागिरी - भाग १
गुढघ्याला झालेल्या दुखापतीमुळे जवळ जवळ अडीच महिने घरीच बसून काढले. सक्तीची विश्रांती होती खरी पण माझ्यासारख्या भटक्याला एवढा काळ घरी बसून काढायचा म्हणजे एक भयंकर शिक्षा सुनावल्यासारखं वाटत होत. अजून पुढचे ३/४ महिने तरी ट्रेकिंग किंवा सायकलिंग सारख्या जास्त स्ट्रेस देणाऱ्या गोष्टी करता येणार नसल्याने कुठतरी कौटुंबिक भटकंती तरी करून यावी असं सारखं मनात होत. त्यातच डॉक्टरांकडून कार चालवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याने सौं बरोबर चर्चा करून अखेरीस कोकणात भटकंतीला जाण्यावर शिक्कामोर्तब झाले. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा तसा कोकणात भटकंतीला जाण्याचा एक सर्वोत्तम काळ. त्यानुसार ९ ते १२ डिसेंबर २०१६ असे सुट्ट्या पाहून चार दिवस मोकळे काढले. ठरलं असं की रत्नागिरी शहरातल्या एखाद्या बऱ्यापैकी हॉटेलमधे राहायच आणि एकेक दिवस रत्नागिरी शहराच्या उत्तर आणि दक्षिण बाजूकडील ५० किलोमीटरचा परिसर भटकायचा. त्यानुसार या चार दिवसात कोणकोणती मंदिर, समुद्र किनारे आणि अनवट ठिकाण पाहता येतील याचा शोध सुरु झाला. त्याप्रमाणे चार दिवसात जी ठिकाण पहिली ती अशी दिवस पहिला: पुणे ते रत्नागिरी माजगावचा प्रताप मारुती...