रोहिलागड उर्फ रोहिलगड

जालना जिल्ह्यातील एकमेव गिरिदुर्ग रोहिलागड डिसेंबर २०१८ साली केलेल्या वऱ्हाडातील (पश्चिम विदर्भ) किल्ल्यांच्या भटकंतीवेळी थोडी वाट वाकडी करून भेट दिलेला मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील हा एकमेव गिरिदुर्ग. खरंतर विदर्भातल्या किल्ल्यांच्या भटकंतीची सुरवात अकोला जिल्ह्यातील बाळापुरच्या किल्ल्यापासून करायची असे ठरवले होते. पण अगदी पहिल्याच रात्री चिंचवड ते बाळापुर असा ४७० किमीचा सलग १० तासांचा प्रवास जरा कांटाळवाणा झाला असता त्यामुळे मग प्रवासाच्या पहिल्या रात्री औरंगाबाद-जालना हायवेपासून जवळ असणाऱ्या "रोहिलागड" या गावात मुक्काम करायचा आणि सकाळी गावाच्या पाठीमागे असणारा "रोहिलागड" हा किल्ला लगे हात उरकून टाकायचा असे ठरवले. तसाही जालना जिल्ह्यातला हा एकमेव दुर्ग, त्यामुळे तो असाही जाता येताच पदरी पाडून घेणे गरजेचे होते. रोहिलागड हा खरंतर बरेच ट्रेकर्सना अल्पपरिचित असा किल्ला. कोणत्याही पुस्तकात या किल्ल्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. इंटरनेटवर देखील अलीकडेच ट्रेकक्षितीज या संस्थेच्या वेबसाईटवर या किल्ल्याची थोडीफार माहिती उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे मग रोहिलागड क...